केतकीच्या बनातून
धूसरल्या संध्याकाळी
सळसळत येणाऱ्या
अचपळ नागिणीचा
नागमोडी डौल घ्यावा
काजव्यांनी ओथंबल्या,
झपाटल्या झाडाखाली
अंधाराला अव्हेरून
उजेडाचा कौल घ्यावा
भणाणत्या वाऱ्यावर
वेळूवनी उमटल्या
सात सुरांचा कल्लोळ
रोमरोमी झंकारावा
ऐन भरातल्या रात्री
स्फटिकाच्या तळ्याकाठी
ओंजळीत काठोकाठ
चांदण्याचा सडा घ्यावा
रातव्याची गूढ साद
भवताली कोंदताना
अदृष्टाचा पायरव
एकाएकी थबकावा
उगवतीच्या भांगात
तांबडफुटीचे कुंकू
भरताना आसमंत
किल्बिलत जागा व्हावा
रानभूल सरताना
रातभूल विरताना
हातातून कायमच्या
निसटल्या क्षणांसाठी
जीव थोडा थोडा व्हावा
प्रतिक्रिया
21 Oct 2025 - 11:06 am | सुक्या
सुंदर !!
रातवा म्हणजे काय?
21 Oct 2025 - 11:57 am | अनन्त्_यात्री
(= Indian Nightjar) एक निशाचर पक्षी आहे. रात्री सक्रिय असतो आणि दिवसा झाडाझुडपांमध्ये लपून राहतो.
हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात आणि त्यांच्या आवाजामुळे रात्री ते सहज ओळखता येतात.
23 Oct 2025 - 9:12 pm | सुक्या
धन्यवाद
22 Oct 2025 - 9:49 pm | कर्नलतपस्वी
कवीता आवदली.
23 Oct 2025 - 9:12 pm | सुक्या
धन्यवाद !!
21 Oct 2025 - 11:49 am | श्वेता२४
शेवट आवडला...
22 Oct 2025 - 5:57 pm | मारवा
सुंदर कविता आहे.
कुसुमाग्रजांची एक similar कविता आठवली.
23 Oct 2025 - 11:07 am | अनन्त्_यात्री
कोणती कविता?