NEET च्या धामधुमीत डोळे झाकुन दुध पिणारी मांजर म्हणजे आयुर्वेद वैद्यक शाखेचा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि तो पुरवणारी भारंभार आयुर्वेद कॉलेजेस. MBBS परवडणार नाही म्हणुन कसं का होईना मळवट भरायचाच असा चंग बांधलेले पालक आपली मेंढरं मु. पो. ह्यालागाड च्या यड्या बाभळीखालच्या आयुर्वेद महाविद्यालय व रिसर्च सेंटरच्या दावणीला बांधतात. वार्षिक फी दोन लाखाच्या आसपास म्हणजे निव्वळ पदवीकरता १२-१५ लाख खर्ची घालणे आले. त्यानंतर करियर म्हणजे उपजिविका संसाधन निर्मिती करण्याचा धोपट मार्ग म्हणजे वैद्यक व्यवसाय. यात पार्श्वभुमी, वकुब आणि कौटुंबिक आर्थिक परिस्थितीनुरुप शुद्ध आयुर्वेद किंवा जनरल प्रॅक्टीस असे पारंपारिक दोन मार्ग असले तरी अजुन काही म (प)ळवाटा आहेत त्यांचा धांडोळा घेवुयात.
नव मध्यमवर्गीय पालकांच्या ( प्रामुख्याने शिक्षक) वाढलेल्या क्रयशक्तीने बाजार नियमानुसार खाजगी आयुर्वेद कॉलेजेसची संख्याही दरवर्षी वाढते आहे. अनुभवी आचारी जसा नुसत्या पाण्यावर ऐनवळीची वाढीव मागणी हाताळतो तसेच द्रष्ट्या संस्थाचालकांनी आयुर्वेद कॉलेजच्या दोन तीन शाखाही सुरु केल्यात. याने झालं असं की आयुर्वेद कॉलेजला शिक्षक हा एक करियर पाथ निर्माण झाला. त्यातही लेक्चरर, ट्युटर, रिडर, प्रोफेश्वर, संलग्न रुग्णालयात मेडिकल ऑफिसर अश्या उतरंडी आहेत. त्याकरता पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएट होणे आले. म्हणजे पीजीच्या वाढीव जागा आल्या. पीजीच्या प्रवेशपरिक्षांची तयारी वर्ग चालविणे ह्या मार्गावरचे जाणतेही आता आधीच्या पिढीचे गणले जातात. बरं ज्या कारणे पोस्ट ग्रॅज्युएशन अपेक्षित असते ते म्हणजे "संशोधन" यांची शुन्य टक्के प्रतिपुर्ती होईल अश्याच दर्जाचे महाविद्यालये हे पी जि कोर्स चालवतात. सुमारे १०० आयुर्वेद कॉलेजपैकी शैक्षणिक दर्जा आणि प्रात्यक्षिकांसाठी पुर्ण क्षमतेचे वाहते रुग्णालय ही चैन किरकोळ काही ठिकाणी आहे.
व्यावहारिक जगात या साचेबद्ध यंत्रणेची उपयुक्तता (आणि उपद्रवमुल्यदेखिल) फोल ठरल्याने आयुर्वेद ज्ञानदानाची धुरा हाताळणारी प्राचीन गुरुकुल परंपरा हा देखिल व्यावहारिक मार्ग होवु शकतो हे काही चतुर सश्यांनी ओळखलं आणि मग पापभिरू अर्धकच्च्या नववैद्यांना कधी वृद्धवैद्य परंपरा, कधी ग्लोबल सम्मेलन, तर कधी आध्यात्मिक गुरुजींच्या छत्राखाली पर्यायी विद्याशाखेतुन अनुभवकथन आणि संस्कृत ग्रंथ डिकोडिंगचे "पेड" खाजगी वर्ग सुरु झाले. Online संहीता वाचन, ठराविक अंतराने ठिकठिकाणी होणारे आयुर्वेद सेमिनार्स, वर्कशॉप्स, कार्यशाळा असोत किंवा तास दोन तास एखाद्या हॉटेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये दोन चार गोर्यांच्या साक्षीने फोटो काढत २०-३० च्या ग्रुपने फॉरेन टूरच्या ऑर्गेझमसाठीचे इंटरनॅशनल सेमिनार्स हे देखिल नवे बिझनेस मॉडेलच आहेत. युरोप व इतर देशात स्थानिक जुगाड करत वेलनेस सेंटरच्या नावाखाली ग्लोबल आयुर्वेदाचा पुणेरी भंपकपणा आताशा जरा उतरलाय. पण त्याच कारण आपापल्या सोयीनं परदेशवारी करण्याईतपत सधनतेचे प्रमाण वाढले हे आहे. अन्यथा मसाजिस्ट हुन अधिक काही हाती लागत नव्हते.
थोडी मळलेली वाट म्हणजे औषधीनिर्माण. शास्त्रच मुळात सापेक्ष असल्याने सॅन्डर्डाजेशनची य:कश्चित तमा बाळगत घरगुती पातळीवर हेअर ऑईल, पेन बाम पासुन गुटी वटी पाडणार्या डायवाल्यापर्यंतची अनियंत्रित यंत्रणा देखिल रुढ आहे. याच्याच जोडीला आताशा पंचकर्म साहीत्याची विक्री, त्यांच्या साध्याश्या यांत्रिकीकरणाने अचंबित होणारे वैद्यगण Advanced Technology नावानं जाहीरात करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. याशिवाय स्वानुभवाच्या बळावर यशस्वी झालेले तांत्रिक कौशल्य किंवा ठराविक उपचार पॅटर्न SOP साख्या व्यवस्थापकीय पद्धतीत बसवुन फ्रेंचायजी पद्धतीने FOCO/ COCO मॉडेल विकणे हा देखिल एक नवा मार्ग रुळत आहे. यात क्षारसूत्र पासुन आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजि पर्यंत बरेच प्रोडक्ट आणि विक्रेते उपलब्ध आहेत.
या मांजरी जिथे आपल्याच पिलांच्या गळ्याला नख लावत एका व्यावसायिक विद्याशाखेला अशास्त्रीय मार्गांची कास धरत छद्मविज्ञानाच्या खोल गर्तेत ढकलू पाहत आहेत. सोशल मिडियावर कोणा निनावी वैद्याने BAMS शिक्षण हे मुलींना आयता (म्हणजे सेटल) डॉक्टर नवरा मिळावा म्हणुन करण्याईतपतच मर्यादित आहे असे मत मांडले होते. वैचारिक विरोध करुनही प्रत्यक्षात व्यावहारिक जगात BAMS पदवीधारकांची सुरु असलेली परवड व्यक्त करायच्या जागा देखिल नाहीत ही खंत आहे. धर्माधिष्ठित शासकीय धोरणांची तात्कालिक अनुकुलता ही तद्दन क्षणभंगुर आहे. उद्या पुन्हा धोरणे बदलली तर ????
________________
डॉ वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे
आयुर्वेदाचार्य, सामाजिक आरोग्य सल्लागार, आरोग्य व्यवस्थापन तज्ञ, नाशिक
प्रतिक्रिया
1 Jul 2024 - 5:28 am | कंजूस
लक्षात घेण्यासारखे.