तृष्णा भयकथा - ४

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
11 Aug 2022 - 12:39 pm

संदीपची गाडी भरधाव वेगाने ओल्ड सिटी रॉड वर जात होती. संदीप अतिशय शिताफीने वळणे घेत होता. त्या अरुंद रस्त्यावर तशी वर्दळ नव्हतीच. संदीप शहराच्या मुख्य भागी आला तेंव्हा त्याला आधीप्रमाणेच एक ओढ जाणवली. मेघदूत कॅफे चालू होता. गाडी सावकाश चालवत संदीप ने दोन्ही बाजूने पाहत कुरियर कंपनी चे ऑफिस शोधायचा प्रयत्न केला. आणि नंतर त्याला आठवले की ते ऑफिस अगदी शेवटी होते. बेलकीन अँड वॉरेन कुरिअर सर्विस. "अजब आहे" संदीप पुटपुटला. त्याला DHL ठाऊक होते, Bluedart ठाऊक होते. अगदी पाळंदे कुरियर सुद्धा ठाऊक होते पण बेलकीन अँन्ड वॉरेन अगदी प्रत्येक रेल्वेस्टेशन वर जसे व्हीलर बुक शॉप असते तसे इंग्रजी वाटत होते.

संदीप ने गाडी बाहेर पार्क केली आणि तो त्या कुरियर कंपनीच्या ऑफिस मध्ये घुसला. ७० च्या दशकांत अमिताभ च्या चित्रपटांत ज्या प्रकारे ऑफिस चा डेकोर असायचा तास अगदी रिट्रो लूक वाला डेकोर होता. चेरी वूड आणि सनमायका लावलेले लाकडी फर्निचर, स्प्रिंग वाला एक सोफा, काऊंटर रिकामीच होता. संदीपने दार उघडले तेंव्हा दारावर लावलेला एक खुळखूळा वाजला. तो ऐकून आंत एका खोलीमध्ये काही तर हालचाल झाली असावी. एक साधारण ५०-६० वर्षांची वयस्क व्यक्ती बाहेर आली. दोरी लावून गळ्यांत टांगलेला चष्मा त्यांनी डोळ्यावर लावला. "काय सेवा करू मी आपली ? " त्यांनी विचारले. शब्द अदबीचे वाटले तरी त्यांत एक पुणेरी कोरडेपणा स्पष्ट जाणवत होता. संदीपला तो अजिबात आवडला नाही.

संदीप त्यांच्या जवळ गेला. आपला चेहरा त्यांना स्पष्ट दिसेल अश्या अंतरावरून त्याने त्यांना म्हटले "सुधाकर कंत्राटदार म्हणाले कि माझे एक पार्सल इथे आहे , तुम्ही माझा फोटो दाखवला होता म्हणे त्यांना.". संदीपने आपला आवाज मुद्दाम रुक्ष ठेवला.

त्या गृहस्थानी चष्मा काढला पुसला आणि पुन्हा एकदा संदीपकडे निरखून पहिले नंतर काहीतरी पुटपुटत ते पुन्हा आपल्या खोलींत गायब झाले. आंत ते काही तर बोलत होते असे वाटले. बराच वेळ संदीप ताटकळत उभा राहिला. त्याला प्रचंड संताप आला होता. कुणाच्या म्हशी आणि कोण काढतोय उठाबशी !

ते बऱ्याच वेळाने आले. त्यांचा हातांत एक रजिस्टर आणि दुसऱ्या हातांत एक छोटे पांढरे पाकीट. "हे तुमचे पार्सल. इथे सही मारा.". ते जीर्ण झालेले रजिस्टर आणि एक जुनाट पेन त्यांनी ठेवले.

"अहो पण हे माझेच पार्सल आहे कश्यावरुन ? फोटो कुठे आहे ? " संदीपने विचारले.

"तुमचेच आहे. फोटो कशाला पाहिजे तुम्ही आरशांत पाहू शकता ना तुम्हाला हवे तेंव्हा." त्याने संदीपला उद्धट पाने सांगितले आणि तो पुन्हा काही तरी पुटपुटला.

संदीपने संतापानेच पार्सल घेतले, सही केली आणि तो बाहेर पडला. पार्सल त्याचे असेल ह्याची शक्यता शून्य होती पण आपले नसेल तरी ते ठेवायचे असा त्याचा विचार होता. आणि त्यांत नक्की काय असेल ह्याची उत्सुकता सुद्धा होती.

त्याने ठरवले आधी कॅफे मेघदूत मध्ये जायचे आणि तिथेच पार्सल उघडायचे. बाहेरून हात लावल्यास आंत कदाचित T शर्ट सारखा कापड किंवा काही कागदेच असावीत असे त्याला वाटले. तो आरामांत चालत मेघदूत मध्ये गेला. आज तिथे चांगली वर्दळ होती. ती युवती नेहमीच्या सफाईने काम करत होती आणि मदतीला आणखीन एक दोन व्यक्ती होत्या. संदीप आंत येताच तिची नजर संदीप कडे गेली आणि तिच्या डोळ्यांत एक चमक आली. तिने आपले हात लगबगीने त्या काळया एप्रन ला पुसले आणि संदीप ला हाय केले.

"चहा ?" तिने त्याला विचारले. "हो".

"you got it. तुम्ही बसा मी घेऊन येते" संदीप पार्सल घेऊन एका कोपर्यातील टेबल वर आसनस्थ झाला. ती काही वेळाने चहा घेऊन आली आणि फक्त दिवून नाही थांबली तर त्याच्या पुढे बसली सुद्धा.

"धन्यवाद ! माझी बाईक व्यवस्थित रिपेर केल्या बद्दल. मी तुम्हाला फोन करून सांगणार होते पण नंतर आठवले कि मी तुमचा नंबर सुद्धा नाही घेतला."

"अहो मी तर चक्क आपले नाव सुद्धा विचारायला विसरलो." संदीप थोड्या आगाऊपणेच म्हटले.

ती थोडी लाजली. "Actually मी तोच विचार करत होते. ज्याने माझे नाव सुद्धा विचारले नाही तो बाईक पाठवणार का ? "

मग दोघेही मनसोक्त हसले "मी गायत्री. हा माझा नंबर." तिने संदीपला फोन नंबर दिला आणि संदीपने मिस्ड कॉल देऊन तिचा कॉन्टॅक्ट सेव केला.

"तुम्ही इथे माझे नाव विचारायला तर आला नाहीत ? " तिने संदीप ला मिश्किल पणे विचारले.

खरे तर तिच्या प्रश्नात तथ्य हतोय पण संदीपने हसून उत्तर देणे टाळले. "आणखीन एक काम होते. मला पार्सल आले होते. ह्या तुमच्या विक्षिप्त बेल्किन्स अँड वॉरेन मध्ये. तेच घ्यायला आलो होतो पण तिथला माणूस बराच उद्धट होता.

"बेल्किन्स अँड वॉरेन" ? "ते काय आहे " तिने प्रश्न केला आणि संदीपला आश्चर्य वाटले.

"अरे इथेच पुढे ऑफिस आहे ना तिथे कुरियर कंपनीचे ?" संदीपने तिला म्हटले.

"नाही हो. इथे कुठे कुरियर कंपनी आहे. बेल्किन्स नावाचे तर काहीच आस्थापन नाही. मी आहे ना इथे किती तर वर्षे" तिने म्हटले.

"गायत्री please डोन्ट जोक. मी घेऊन तर आलो ना पार्सल तिथून" त्याने पार्सल दाखवत म्हटले.

"हातच्या कंकणाला आरसा कशाला ? तुम्ही दाखवा मला" असे म्हणून ती उठली. संदीप सुद्धा उठला आणि दोघे बाहेर गेले. मेघदूत मधून डावी कडे वळून संदीप सरळ गाडीकडे गेला गाडीच्या पुढेच तर होते ते कुरियर ऑफिस. दोघेही तिथे पोचले तेंव्हा समोर ते कुरियर ऑफिस नव्हतेच. तिथे होते जगदाळे नावाच्या वकिलांची कचेरी. दरवाजा सुद्धा वेगळा होता आणि त्याला भले मोठे कुलूप होते.

"wait, असे होऊच शकत नाही. मी आत्ता इथे आलो होतो, आंत गेलो होतो. आणि हे पार्सल मी सही करून घेतले" संदीप ची अवस्था वेड्यागत झाली. तो इथे तिथे पळून दुखणे पाहू लागला. पण बेल्किन्स कंपंनीचा बोर्ड कुठेच नव्हता.

"गायत्री . मी दारू वगैरे नाही प्यालोय. हे बघ हे पार्सल आहे माझ्याकडे" त्याने तो लिफाफा तिच्या पुढे धरला.

"ठीक आहे. पण लिफाफा उघडून तर पहा" तिने म्हटले. ती सुद्धा थोडी कावरी बावरी झाली होती.

संदीपने थरथरत्या हातानी लिफाफा उघडला. त्यांच एक चुरगळलेला पांढरा कागद होता. त्याने त्यावर काही लिहिले होते का म्हणून पहायचा प्रयत्न केला . तर त्यावर अर्धवट आणि विचरीत्र हस्ताक्षरांत लिहिले होते. "हमरी मदद करो साहिब". हस्ताक्षर पाहून लिहिणारा माणूस कमी शिकलेला वाटत होता. लिफाफ्यांत आणखीन काय होते म्हणून पहिले तर एक कपडा आला. पांढरा कपडा, कश्याचा तरी फाडला असल्या प्रमाणे. काय असावा हा कपडा. "कफन ? " विचार मनात येऊन संदीपच्या अंगावर काटा उभा राहिला. हे कफन त्याने शेवटी स्मशानात पहिले होते. ज्यावेळी त्याने त्या प्रेताचे केस आणले होते. ज्या प्रमाणे एक असत्य पचविण्यासाठी हजार वेळा खोटे बोलावे लागते त्याच प्रमाणे एक चुकीचे पर्यवसान वारंवार संकट कोसळण्यात होते ह्याची अनुभूती त्याला होत होती.

गायत्री निमूट पणे त्याचा चेहेरा पाहत होती. संदीपचा चेहेरा नक्कीच पांढरा पडलेला असावा.

"संदीप, मला वाटते मला ठाऊक आहे काय चालले आहे. पण तुम्हाला ह्याची कल्पना नाही असावी असे वाटते" तिने म्हटले.

"तुला ठाऊक आहे ? काय ? मला सांग" संदीपने तिच्याकडे अतिशय दीनवाणे प्रमाणे याचना केली.

तिने डोके हलवले. नकारार्थी. "बराच वेळ लागेल. पण ह्या गोष्टीला तुम्ही अजिबात लाईटली घेऊ नका."

"what do you mean ?" संदीपने विचारले .

"मला एक सांगा, ह्या पूर्वी ह्या शहराचे नाव तुम्ही ऐकले होते ? "

संदीप ने नकारार्थी डोके हलवले.

"कधी तुमचे मित्र, परिवार ह्यांनी ह्या शहराला भेट दिली होती ?"

त्याने पुन्हा नाही म्हटले.

"इतके मोठे, राहण्याजोगे, गजबजलेले शहर आणि संपूर्ण आयुष्यांत कधीच ह्याचे नाव ऐकले नाही. ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटले नाही का ? संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासांत कधीच ह्या जागेचे नाव कुठेच येत नाही, ह्या शहरातील कुठलीही व्यक्ती प्रसिद्ध नाही. ना कुणी क्रिकेट पटू किंवा अभिनेता किंवा नेता."

"गायत्री, खरेच मी सुद्धा ह्यावर विचार केला. अगदी गुगल किंवा मराठी विश्वकोशांत सुद्धा माहिती अत्यंत जुजबी आहे."

"ह्याला कारण आहे संदीप. ह्या जागेचा इतिहास. पण हे जे पत्र तुम्हाला आले आहे, त्यांत एक संदेश आहे"

"कसला संदेश ?"

"तुमच्या जवळची व्यक्ती मृत झाली आहे. पण तुमचे काही तरी ऋण आहे त्यामुळे ती व्यक्ती मरून सुद्धा तुमची पाठ सोडत नाही. आणि म्हणूनच ह्या शहरांत तुमचे आगमन झाले असावे".

"आणि ह्या असल्या गोष्टीवर तुझा विश्वास आहे किंवा तू मुद्दाम माझी फिरकी तर घेत नाहीस ? " संदीपला कसल्याच गोष्टीवर विश्वास वाटत नव्हता.

"खूप कमी लोक असे आहेत ज्यांना अश्या प्रकारे टार्गेट केले जाते. ह्या जागेची रहस्ये अनेक आहेत पण हे रहस्य मला ठाऊक आहे. तुम्ही ताबडतोब ह्या प्रकरणावर तोडगा काढला पाहिजे", गायत्रीच्या आवाजांत एक आत्मविश्वास होता , एक स्पष्टपणा होता त्यावरून ती जे काही बोलतेय त्याचा संपूर्ण अर्था तिला स्वतःला समजतो हे संदीपला कळून येत होते. आणि ते कफन आणि ते हस्ताक्षर ह्यावरून ती मृत व्यक्ती नक्की कोण हे सुद्धा संदीप ला ठाऊक होते. पण ते गायत्रीला सांगितले तर ती माझ्याबद्दल काय विचार करेल ? हाच विचार करून संदीप गप्प राहिला.

"आणि काय असेल हा तोडगा ?" संदीपने विचारले.

"ते मलाही ठाऊक नाही. कदाचित ती व्यक्ती कोण आणि तिचे ऋण काय आहे हे समल्यास तुम्ही ते फेडून कदाचित त्या आत्म्याला मुक्ती देऊ शकाल"

"पण मला एक गोष्ट समजत नाही ... हे सर्व काही माझ्या सोबतच का घडत आहे. ह्या अविश्वसनीय गोष्टी, अतींद्रिय शक्ती इथे वास करून आहेत हे इथल्या सर्वानाच ठाऊक आहे का ? " संदीप गोंधळला होता.

"अंशतः होय. इथल्या प्रत्येक व्यक्तीची आपली अशी गुपिते आहेत. त्यामुळे अश्या गोष्ट इथे घडतात हे सर्वानाच ठाऊक आहे".

"तुझी सुद्धा रहस्ये आहेत का ? " संदीपने तिला थेट प्रश्न केला.

"actually yes. पण तुम्हाला नाही सांगू शकत" तिने सांगितले.

"any ways. तुम्ही ह्या घटनेवर विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत बोला, पहा काय मार्ग आहे. आणि अगदी काहीच मार्ग नाही मिळाला तर मग माझ्या काही ओळखी आहेत, काही इतर मार्ग आहेत. आम्ही ते घेऊ. पण काही रस्ते आपण न घेतलेलेच बरे. " तिने सांत्वनपूर्ण नजरेने संदीप कडे पहिले.

चित्राचा विचार मनात येऊन संदीप आणखीन विचलित झाला.

गायत्रीचा विदा घेऊन संदीप लगबगीने गाडींत बसला. ज्या हातात त्याने तो कागद आणि कफन पकडला होता तो पुन्हा पुन्हा धुवून साफ करावा असे त्याला वाटत होते. गायत्री लगबगीने आपल्या कॅफे मध्ये गेली. संदीपने गाडी सुरु करून भरधाव वेगाने घराच्या दिशेने सोडली. दुपार असून सुद्धा त्याला अंधार असल्याप्रमाणे जाणवत होते. आपण आता अश्या संकटात सापडलो आहे ज्यातून मार्ग काढणे मुश्किल आहे असे त्याला वाटत होते. "माझ्या मागे आत्मा ?"

तो कागदाचा तुकडा आणि फाटलेली कफनाची चिंधी बाजूच्या सीटवर जणू काही त्याच्याकडे पाहत त्याची खिल्ली उडवत होती. "मी हे नको करायला हवे होते. या प्रेताचा आणि माझा संबंध नाही पण माझ्यामुळे त्याला त्रास झाला हि सुद्धा चांगली गोष्ट नाही" चित्रा काय म्हणेल ? तिला तर धोका नाही ना ? असंख्य विचार त्याच्या मानत उठत होते. त्याची गाडी त्याच्या घराजवळ पोचली तेंव्हा त्याच्या जिवंत जीव आला. चित्रा व्हरांड्यावर राहून त्याची वाट पाहत होती.

कथा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

11 Aug 2022 - 1:05 pm | श्वेता२४

कथा वेगवान आहे.

अनन्त अवधुत's picture

11 Aug 2022 - 1:05 pm | अनन्त अवधुत

सुरू आहे कथानक.
सगळे भाग वाचले, उत्तम आहेत आणि चांगली संगत लागत आहे.
पुभाप्र.

सौंदाळा's picture

11 Aug 2022 - 2:55 pm | सौंदाळा

पटकन संपला.
पुभाप्र

कर्नलतपस्वी's picture

11 Aug 2022 - 3:33 pm | कर्नलतपस्वी

ह्या भागात थरार वाढलाय.

थरारक... पुढचा भाग लवकर टाका __/\__

सुचिता१'s picture

14 Aug 2022 - 11:54 pm | सुचिता१

अप्रतिम!!! जबरदस्त थरार उभा केलाय.... पुलेशु!!!

रात्रीचे चांदणे's picture

24 Aug 2022 - 5:04 pm | रात्रीचे चांदणे

पुढचा भाग कधी?

diggi12's picture

1 Sep 2022 - 2:36 pm | diggi12

पुढचा भाग कधी?

diggi12's picture

22 Sep 2022 - 6:44 pm | diggi12

पुढचा भाग कधी

मास्टरमाईन्ड's picture

28 Oct 2022 - 9:01 pm | मास्टरमाईन्ड

पुढचे भाग वगैरे काही येणार आहेत का?

मास्टरमाईन्ड's picture

28 Oct 2022 - 9:01 pm | मास्टरमाईन्ड

पुढचे भाग वगैरे काही येणार आहेत का?

चित्रगुप्त's picture

20 Dec 2022 - 12:50 am | चित्रगुप्त

या भागात विशेष असे फारसे घडलेले नाही, पण यापुढला भाग प्रकाशित झालेला आहे की नाही हे समजले नाही.

शित्रेउमेश's picture

21 Dec 2022 - 9:00 am | शित्रेउमेश

पुढचा भाग कधी?

७० च्या दशकांत अमिताभ च्या चित्रपटांत ज्या प्रकारे ऑफिस चा डेकोर असायचा तास अगदी रिट्रो लूक वाला डेकोर होता. चेरी वूड आणि सनमायका लावलेले लाकडी फर्निचर, स्प्रिंग वाला एक सोफा, काऊंटर रिकामीच होता. संदीपने दार उघडले तेंव्हा दारावर लावलेला एक खुळखूळा वाजला. तो ऐकून आंत एका खोलीमध्ये काही तर हालचाल झाली असावी. एक साधारण ५०-६० वर्षांची वयस्क व्यक्ती बाहेर आली. दोरी लावून गळ्यांत टांगलेला चष्मा त्यांनी डोळ्यावर लावला. "काय सेवा करू मी आपली ? " त्यांनी विचारले. शब्द अदबीचे वाटले तरी त्यांत एक पुणेरी कोरडेपणा स्पष्ट जाणवत होता. संदीपला तो अजिबात आवडला नाही.

--- अश्या बारीकसारीक तपशीलांमुळे कथेची रंजकता खूपच वाढली आहे. फार पूर्वी बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा फार लोकप्रिय असायच्या, त्या खूप वाचायचो. त्यात अश्या प्रकारचे बारकावे असायचे ते आठवले.
--- इथे खूप जणांनी पुढील भागांविषयी पृच्छा केलेली आहे, आणि कथानक सर्वांना आवडत आहे तरी पुढील सगळे भाग लवकर प्रकाशित करावेत ही विनंती.

अनिल हटेला's picture

13 Aug 2023 - 3:35 pm | अनिल हटेला

पूढील भाग कधी????