माझी राधा - ५

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 May 2022 - 12:02 am

माझ्या चेहेर्‍यावरचे ते हसू तुझ्या चेहेर्‍यावरही पसरते.
का कोण जाणे आपण दोघेही एकदम हसायला लागतो. आपल्याला कसला आनंद झाला आहे हे दोघानाही समजत नाही. समजण्यापलीकडची भावना. दोघांनाही एकाच वेळेस जाणवते. एक अलौकीक अनुभूती ,बासरीच्या स्वरांनी , त्या अनहद नादाने आपल्याला दिली.

मागील दुवा http://misalpav.com/node/50080

अनहद नादाची एक गम्मत असते. त्याला सुरू व्हायला कसलेही कारण लागत नाही. तुम्ही मनात विचार आणा , तो स्वतःहोऊन येतो.बोलवावे लागत नाही. कधीकधी तर तो मनातच वास्तव्य करतो. मुक्कामाला असतो.
त्या दिवसापासून मी ही थोडा बदललो. इतर गोपाळ मित्रांच्या सोबत दंगा करत असायचो. पण बासरी वाजवताना त्यांच्या जगापासून वेगळा व्हायचो. माझ्या ही नकळत.
त्या अनहद नादाची ओढ तुलाही होती. ज्या कदम्बाच्या झाडाखाली बसून मी बासरी वाजवायचो तेथे तू कधीकधी माझ्याही अगोदर येवून आतूरतेने माझी वाट पहात बसलेली असायचीस.
यमुनेच्या काठावर असताना मला अनेक खोड्या सुचायच्या. नदीकाठाने दही लोणी घेउन मथुरेच्या बाजाराला जाणार्या गवळणींना अडवून त्याच्या डोक्यावरच्या माठातले लोणी खाणे दही खाणे हे कुणी सुचवले माहीत नाही पण ते तसे करायला मज्जा यायची. लोणी खाणं कमी पण गवळणीं घाबरून गेल्या की त्याचंई धांधल पहायला गम्मत यायची. तू नको म्हणायचीस. म्हणायचीस की असे नको रे करू. त्या बिचार्या इतक्या कष्टाने त्यांचा प्रपंच सावरत असतात. त्यांना असे नको छळत नको जाऊस. अंगात हूड पणा असायचं वय होतं माझे ते. तू असशील माझ्यापेक्षा दोन चार वर्षानी मोठी. पण त्या वयात तुला कितीतरी चांगली समज होती. कदाचित लग्न झालेली होतीस म्हणून असेल ते.
तू म्हणायचीस की आपल्यापेक्षा कमी बलवान लोकांना त्रास देण्यात कसली आली आहे गम्मत. त्यापेक्षा एखाद्या दुष्टाचे निर्दालन कर आणि त्यातली गम्मत घे.
मला समजायचे नाही. पण यशोदामायी हे करू नकोस ते करू नकोस असे म्हणायची त्यापेक्षा तू काहीतरी कर म्हणायचीस. मला ते आवडलं
एके दिवशी यमुनेच्या पात्रात पाणी पिण्यासाठी गेलेल्या काही गायी परत आल्याच नाहीत. गोपाळ मुलांना डोहात काहितरी दिसल्याचे ते सांगत होते. काय पाहिले ते ते त्यांना सांगता येत नव्हते. खूप घाबरलेली दिसली. कोणीतरी तेथे कालिया नाग असल्याचे सांगितले. याच कालिया नागाने नदीवर पाणी प्यायला गेलेली आमची मी थेट डोहात उडी घेतली. कालिया नागाला खेचून मारले. वार्ता सर्वत्र झाली. तुला कधी कळाले माहीत नाही. त्या दिवशी तू माझ्या अगोदरच येऊन बसली होतीस.तुझ्या डोळ्यात काही वेगळेच भाव होते.भीति , काळजी अभिमान , आनंद असं बरंच काही होतें त्यात. मी समोर दिसल्याबरोबर तू माझ्या चेहेर्यावरून हात फिरवलास. कानावर बोटे दुमडत माझी दृष्ट काढलीस. अगदी यशोदामाय ने काढली होती तश्शी.
यमुनेच्या काठावर मी गवळी मित्रांसोबत गवळणींची थट्टा करतो , खोड्या करतो , दही लोणी चोरतोअशा बर्याच तक्रारी घरी येत. एकदा आम्ही कानल आणि कनिका या गवळणींच्या घरी जाऊन तेथे ठेवलेल्या माठातले लोणी पळवलं. त्या दोघींनी नंदवाड्यात तक्रार केली. अशा तक्रारींनी यशोदामाय कातवून जायची. तक्रारी नवीन नव्हत्या. पण त्या यशोदामायला काहीतरी घालुन पाडून बोलल्या. मायने मला शिक्षा द्यायचे ठरवले. आपला मुलगा चोर्या करतो हे ऐकायला कुठल्या आईला आवडेल. तेही दूध लोणी घरात सहज उपलब्ध असताना! आत्तापर्यंत मला उखळाला बांधून झाले होते. हातावर एखादी छडी मारणे असल्या किरकोळ शिक्षा देऊन झाल्या होत्या. असल्या शिक्षा देऊन काही भागणार नाही हे यशोदामायला आत्तापर्यंत कळून चुकले होते. तीने या वेळेला वेगळाच पावित्रा घेतला. मायने माझ्याशी अबोला धरला. मी संध्याकाळी घरी आल्यावर माय माझ्याशी काहीच बोलली नाही. दिवसभरात घडलेल्या गमती सांगायला गेलो तर तीने तोंड फिरवले. जेवतानाही काहीच बोलत नव्हती.
काहितरी बिनसलय हे कळायलाच मला वेळ लागला. माय दिवसभर जेवलीही नव्हती हे तीने कोणालाच सांगितले नव्हते. रात्री झोपाताना कोणीतरी मुसमुसून रडल्याचा आवाज आला. मी त्या दिशेला पाहिले. यशोदामाय रडत असेल असे डोक्यातही आले नाही. मी तसाच झोपून राहिलो.बराच वेळ तो रडण्याचा आवाज येत राहिला.
पहाटे कधीतरी माय उठून कामाला लागली असेल. नेहमीप्रमाणे गायींच्य अहंबरण्याच्या आवाजाने जागा झालो. माय अंगणात सडा टाकत होती. तीचे डोळे काहितरी वेगळेच दिसत होते.लाल लाल. मला पाहिल्यावर ती रोज हसायची तशी हसली ही नाही. माझ्याकडे निर्विकार नजरेने पहात राहिली. मायच्या अशा नजरेची मला सवयच नव्हती. मुखप्रक्षालन स्नान वगैरे करून मी स्वयंपाकघरात गेलो. तेथे माझ्यासाठी न्याहारी तयारच होती. शेजारी धारोष्ण दुधाने भरलेले एक पात्र. माय दिसत नव्हती.
मी थबकलो. न्याहारीला स्पर्ष ही न करता तसाच बसून राहीलो. माय मला मांबून पहात असावी. ती जवळ आली. मायचे डोळे अजूनही रडल्यासारखे दिसत होते. ती माझ्या जवळ आली. काहीही न बोलता तीने न्याहारीचे ताट माझ्या समोर सरकवले. आणि माझ्याकडे एकटक पहात राहिली. मायचा अबोला अजून संपलेला नव्हता.
तीने माझ्या समोर दोन मोठी मडकी आणून ठेवली. एकात काठोकाठ दही भरलेले होते दुसर्‍यात पांढरेशुभ्र लोणी. ती मडकी माझ्या पुढ्यात आणून ठेवली आणि मायने माझ्या समोर दोन हात जोडले. तीला म्हणायचे होते की आपल्या घरात हे इतके सगळे भरलेले असताना तू लोकांना का त्रास देतोस. दही लोणी चोरून का खातोस. तुझ्यामुळे मला लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. माय हे बोलत नव्हती. पण तीच्या डोळ्यांमधून हे सगळे सांगत होती. मायला इतके रागीट असे कधीच पाहिले नव्हते. मी मायचे दोन्ही हात पकडले. काही बोलणार इतक्यात मायने हात सोडवून घेतले. आणि तोंड फिरवून तेथून निघून गेली.
मला राग आला. मायने माझे काहीच ऐकून न घेता असा अबोला धरावा, माझा राग करावा हे आत्तापर्यंत कधी झालं नव्हतं.तीने दिलेलम न्याहारीचे ताट रागारागात सरकावून दिले, दही लोण्याच्या त्या मडक्याना तिथेच पालथे पाडून टाकावे असे वाटले. पण तसे केले नाही. न्याहारी न करताच नंदवाड्यातून बाहेर पडलो. वाटेत काशीनाथ दिसला. मला वाटले की तो मला बाहेर जाताना पाहिल म्हणून. प्ण तो बिचारा गायींसाठी आंबील तयार करण्यात गुंग होता. मी चुपचाप बाहेर पडलो. रागाच्या भरात बासरीही बरोबर घ्यायचे विसरलो.आणि रागारागातच निघालो. मनात विचारांनी थैमान माजवले होते.काय समजते काय माय स्वतःला. तुला माझ्याशी बोलायचे नसेल तर मलाही नाही बोलायचे तुझ्याशी. चालत चालत कुंजवन कधी आले तेच समजले नाही. चालून चालून थकलो होतो. सकाळी न्याहारीही केली नव्हती. भूक बरीच लागली होती. नदीचे पाणी प्यालो. औदुंबराच्या झाडावरची काही फळे तोडून खाल्ली. झाडाची एक जाडशी फांदी पाहिली त्या,झोप लागली तरी पडणार नाही अशी खात्री करून घेतली अणि वर चढून बसलो. आता येऊ दे मायला शोधत मी सापडणारच नाही तीला.
मग कळेल की आपल्या कान्ह्याशी अबोला धरला की काय होते ते.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

हा भाग इतके दिवस कुठे लपून बसला होता

श्रीगणेशा's picture

22 May 2023 - 8:23 am | श्रीगणेशा

छान लिहिलंय!

पुढील, सहाव्या भागाची लिंक इथे दिली नव्हती.
ती शोधून आणली :-)
http://misalpav.com/node/50189