फौजी मटन करी - शेफ रणवीर रेसिपी

Primary tabs

जेम्स वांड's picture
जेम्स वांड in पाककृती
13 Feb 2022 - 7:38 pm

मटन म्हणजे आमचा जीव की प्राण, साधारणतः मटनाचा रस्सा, सुकं, पाया सूप, कलेजी-भेजा फ्राय हे प्रकार घरी होतच असतात, पण कधीतरी स्वयंपाकाची हुक्की आली का करायला काहीतरी वेगळं, सुलभ पण भयानक टेस्टी असं मी शोधत असतो, अशीच नेट मुशाफिरी करताना ही रेसीपी सापडली.

सापडली ते सापडली ती कोणी बनवलेली सापडावी ? साक्षात शेफ रणवीर ब्रार, मास्टरशेफ इंडिया जज अशी ओळख असलेला शेफ ब्रार मला मात्र आवडायला लागला तो एपिक टीव्हीच्या राजा रासोई और अंदाज अनोखा ह्या कार्यक्रमामुळे. व्हेज नॉनव्हेज रेसिपीज उत्तम करणारा, बोलघेवडा अन त्याच्या विषयाचा बेताज बादशहा म्हणावा इतका ज्ञानी शेफ ब्रार एखाद रेसिपी सांगतोय सोपी आहे म्हणून अन आम्ही ती ट्राय करणार नाही असे शक्यच नव्हते.

शेफ ब्रारने ही रेसीपी त्याला असणाऱ्या एका बालपणीच्या आठवणीला रिक्रियेट करत बनवली आहे. फौजी पलटणीतले बडे खाने अन त्यात असणारी मटन करी ह्यासंबंधी असलेल्या शेफच्या आठवणी ऐकत ही रेसिपी बघितली अन इतकी सुलभ वाटली का रविवारचा मौका पाहून बनवुनच टाकली एकदम!

तर, सुरुवात करूया ?

टप्पे एकूण ३

अ. मॅरीनेशन
ब. फोडणी
क. सिक्रेट इनग्रीडीयंट (ग्रीन पेस्ट)

अ. मॅरीनेशन (साहित्य)
१. मटन १ किलो (हाडे, नळ्या, चरबी ५० ग्रॅम)
२. कांदे २.५ मध्यम (स्लाइसेस करून, अर्धे)
३. चारपाच पुदिन्याची काडे (कोवळी असल्यास काडे पण घेणे, नाहीतर फक्त पाने)
४. आले २ इंच
५. लसूण पाकळ्या ८-१०
६. हिरव्या मिरच्या (तिखट) ५
७. अर्धा चमचा मीठ
८. दही एक कप (अंदाजे २०० ग्रॅम)
९. धणेपूड २ टेबलस्पून
१०. हळद पावडर १ टी स्पून
११. लाल तिखट १ टी स्पून
१२. जीरा पावडर १/४ टी स्पून

ब. फोडणी
१. साजूक तूप १/४ कप
२. मसाल्याचे वेलदोडे २
३. साधे वेलदोडे ४
४. लवंगा ८
५. काळीमिरी १२-१५
६. तमालपत्र १
७. दालचिनी २ इंच तुकडा
८. कांदे २.५ मध्यम वरीलप्रमाणे स्लाईस करून
९. मॅरीनेटेड मटन
१०. पाणी गरजेप्रमाणे

क. सिक्रेट इनग्रीडीयंट (ग्रीन पेस्ट)
१. ताजी कोथिंबीर १ कप
२. साखर १/२ टी स्पून
३. तेल १ टेबलस्पून
४. हिरवी मिर्ची १-२
५. रम (शक्यतो ओल्ड मोंक) ५० एम एल (पूर्णपणे ऐच्छिक)

कृती :-

अ. मॅरीनेशन

खलबत्ता/ पाटा वरवंटा/ ब्लेंडर वाटेल त्याच्या आलं लसूण हिरवी मिर्ची अन एक चमचा मीठ ह्यांचा भरड खर्डा करून ठेवावा

एका भांड्यात स्वच्छ धुतलेले मटन, कापलेला कांदा, पुदिना पाने चिरून, आलं-लसूण-हिरवी मिर्ची खर्डा, दही, धणेपूड, हळद, लाल तिखट, जिरे पावडर एकत्र करून चांगले मिक्स करावे आणि किमान एक तास व कमाल रात्रभर मुरू द्यावे (रात्रभर ठेवणार असल्यास फ्रिजचा उपयोग करावा). मी तासभर मुरवले होते, टेस्ट मध्ये फरक पडला नाही बहुतेक.

ब. फोडणी

जाड तळाच्या कढईत/ भांड्यात पाव कप (अंदाजे ५० ग्रॅम) तूप गरम करावे, तूप गरम झाले की त्यात मसाल्याचे वेलदोडे, साधे वेलदोडे, तमालपत्र, दालचिनी, काळीमिरी आणि लवंगा घालून चांगले तडतडू द्यावेत. आता चिरलेले अर्धे कांदे घालून वरचेवर परतत कांदे नीट ब्राऊन करून घ्या, कांदे नीट ब्राऊन करणे ह्यावर करीचा रंग पोत अन चव मेजर अवलंबून असते, त्यामुळे ह्या कामात अजिबात हयगय नको.

कांदे नीट ब्राऊन झाले की आता ह्यात मॅरीनेट केलेले मटन घालून ५ ते ८ मिनिटं मोठ्या आचेवर मटन चांगलं परतून घ्यावे, मटनाला हलका ब्राऊन रंग यायला हवा. ह्यानंतर आवडीप्रमाणे पाणी (मी थोडं अंगाबरोबर पाणी ठेवलं होतं) घालून नीट ढवळून हे पूर्ण प्रकरण नीट ढवळून घ्यावे आणि जवळपास २५ मिनिटं झाकून मंद ते मध्यम आचेवर शिजू द्यावे. मटन जवळपास ८०% शिजायला हवे. मध्ये मध्ये (दर दहा मिनिटांनी एकदा) हलक्या हाताने ढवळत राहावे. ह्याचवेळी खर्ड्यात घातलेल्या मिठाचा विसर न पडू देता चवीप्रमाणे मीठ घालणे, नीट एकत्र करणे.

जोवर मटन झाकून शिजते आहे तोवर एका ब्लेंडरमध्ये एक कप कोथिंबीर, अर्धा टी स्पून साखर, तेल, हिरवी मिर्ची आणि रम टाकून त्याची सरसरीत पेस्ट करून घ्यावी, अगदी गंधप्रमाणे बारीक वाटलेली नकोय, सरसरीतच करावी.

२५ मिनिटांनी मटनावरचे झाकण काढून मटन एकदा नीट हलक्या हाताने ढवळावे, आता त्यात तयार ग्रीन पेस्ट टाकावी , नीट एकत्र करून घ्यावे आणि जवळपास १५ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर शिजवून घ्यावे.

बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर वरतून शिवरून चपाती, पराठा, तंदुरी रोटी किंवा भातासोबत वाढावे, हमखास हिट रेसिपी होईल, शेफ रणवीर शपथ :)

माझी टीप - सगळं झालं, मटन पूर्ण शिजलं की वाढण्याच्या अगोदर जवळपास २० मिनिटं ते झाकून रेस्ट करावं, रेस्ट केलेलं मांस हे अजून रुचकर लागतं असा स्वानुभव आहे (त्यामागचे विज्ञान मात्र मला माहिती नाही).

.

.
(नेमका रंग कळावा म्हणून कॅमेराच्या फूड मोड मध्ये केलेले प्रयोग)

.

प्रतिक्रिया

चामुंडराय's picture

13 Feb 2022 - 7:56 pm | चामुंडराय

लई भारी वांड भौ !
लाळ गळणारी स्मायली कल्पावि.
ब्रारच्या पाकृची लिंक द्या की.
अन मी पयला... हे राहिलेच.

कॉमी's picture

13 Feb 2022 - 8:17 pm | कॉमी

झकास रेसिपी !

जेम्स वांड's picture

13 Feb 2022 - 8:30 pm | जेम्स वांड

नाहीतर लिहीत बसण्यापेक्षा विडिओच डकवला असता की सरळ 🤣 🤣 🤣 🤣

शेफ रणवीर ब्रार, मास्टरशेफ इंडिया जज अशी ओळख असलेला शेफ ब्रार मला मात्र आवडायला लागला तो एपिक टीव्हीच्या राजा रासोई और अंदाज अनोखा ह्या कार्यक्रमामुळे. व्हेज नॉनव्हेज रेसिपीज उत्तम करणारा, बोलघेवडा अन त्याच्या विषयाचा बेताज बादशहा म्हणावा इतका

जुन्या आठवणी ताज्या झाल्या :)

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

13 Feb 2022 - 9:11 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे रेसीपी.

जेपी's picture

13 Feb 2022 - 9:28 pm | जेपी

छान आहे रेसिपी.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.वेळ मिळाल्यास करून पाहतो.

सरिता बांदेकर's picture

13 Feb 2022 - 9:30 pm | सरिता बांदेकर

छान आहे रेसीपी. आणि तुम्ही लिहीली पण छान आहे.
रणवीर ब्रारच्या सगळ्याच रेसीपी आवडतात.
एक सुचवू का कधी तरी कोथिंबीरच्या काड्या आलं, लसूण बरोबर वाटून घाला.
कसा घमघमाट सुटतो बघा.

Bhakti's picture

13 Feb 2022 - 9:33 pm | Bhakti

+१

जेम्स वांड's picture

13 Feb 2022 - 9:37 pm | जेम्स वांड

मी पाने प्रामाणिक नाही इतका, चव खरी कोवळ्या काड्यांतच, मी पानांसोबत काड्या आवर्जून घेतो बऱ्यापैकी, पाने उगा आपलं गर्निश करायला वगैरे ठीकच असतात पण जिथे वाटण करायचं असतं तिथं मात्र आपण काड्या घेणारच वाटणात इतकं नक्की !

चामुंडराय's picture

13 Feb 2022 - 11:34 pm | चामुंडराय

सागुती खावी हाडांची
आणि
भाजी खावी काड्यांची

सेम गोष्ट दोडक्याच्या शिरांची,त्याची चटणी अप्रतिम लागते,ठेच्यासारखीच.गाजराच्या सालाचीपण चटणी होती म्हणे.

जेम्स वांड's picture

14 Feb 2022 - 5:42 pm | जेम्स वांड

आमची आई तर दुधीभोपळ्याच्या शिरांचा पण उपयोग करत असे, सेम तीळ, हिरवी मिर्ची, सुकं खोबरं घालून सरबरीत चटणी, लैच तुफान लागत असे ती, झणझणीत एकदम.

Bhakti's picture

15 Feb 2022 - 8:29 pm | Bhakti

भोपळ्याचे नव्हतं माहिती, करुन पाहते एकदा.

मुक्त विहारि's picture

14 Feb 2022 - 11:35 am | मुक्त विहारि

नक्कीच करून बघीन...

सुरिया's picture

14 Feb 2022 - 11:59 am | सुरिया

मस्त. भारी जमलीय.
रणवीरपाजी की दावत बोले तो धनिया और देसी घी.
बादमे बोलना नही रणवीरने बोला नही.

जेम्स वांड's picture

14 Feb 2022 - 12:08 pm | जेम्स वांड

मी फौजी नई हो, माझी तर फौजेत लांगरी व्हायची पण लायकी नाही बघा. बाकी रणवीर फॅन तर आपण आहेच :)

प्रिय मित्र धनिया और घी ठोक के, बाद में नही बोलना रणवीर तुमने बताया नही.

आंबट गोड's picture

14 Feb 2022 - 12:58 pm | आंबट गोड

रणावीर ने बताया था......

प्रचेतस's picture

14 Feb 2022 - 1:17 pm | प्रचेतस

क्या बात है वांडोबा...!
लैच भारी वर्णन आणि पाकृ. आमच्यासारख्या घासफूसवाल्यांसाठी एखादी पनीर करी वगैरे पाकृ पण येऊ द्यात.

जेम्स वांड's picture

14 Feb 2022 - 1:31 pm | जेम्स वांड

सध्या ग्रामीण मराठी / महाराष्ट्रीयन शाकाहारी रेसिपीजवर वाचन/ युट्युब सुरू आहे.

भक्तीताईंच्या धाग्यावर बोलल्याप्रमाणे सध्या जोर आहे तो खान्देशी रेसिपीजवर त्यामुळे लवकरच त्यातील काहीतरी खास तुमच्यासाठी घेऊन येऊच सरजी.

प्रचेतस's picture

14 Feb 2022 - 1:36 pm | प्रचेतस

झक्कास.
लवकर येऊ द्यात खुमासदार वर्णनासह.

टर्मीनेटर's picture

15 Feb 2022 - 11:38 am | टर्मीनेटर

जंक्शन रेसिपी आहे...
घरी बनवता येणे शक्य नाही, बाहेर कुठेतरी बनवून बघणार 👍

चव खरी कोवळ्या काड्यांतच, मी पानांसोबत काड्या आवर्जून घेतो बऱ्यापैकी, पाने उगा आपलं गर्निश करायला वगैरे ठीकच असतात

+१००

जेम्स वांड's picture

15 Feb 2022 - 8:14 pm | जेम्स वांड

ही रेसिपी तसेही जरा रस्टीक आहे, तुमच्या फार्महाऊसवर बनवून पहा, तसेही शेफ म्हणतो की ही रेसिपी चुलीवर, मातीच्या हंडीत केली तर अजूनही जास्त खुमासदार व्हावी !

टर्मीनेटर's picture

16 Feb 2022 - 4:06 pm | टर्मीनेटर

Yup!
चार-सहा मित्रमंडळी असतील तेव्हा ट्राय करण्यात येईल.... (अर्थातच चुलीवर)

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

17 Feb 2022 - 9:29 pm | सौ मृदुला धनंजय...

जबरदस्त रेसिपी नक्की करून बघेन.

अनिता's picture

20 Feb 2022 - 1:40 am | अनिता

हे आज करून पाहिले
रस्याचा रंग हिरवा झाला पण चव उत्कृष्ट झाली !

-- शांत तळीराम

जेम्स वांड's picture

23 Feb 2022 - 8:32 am | जेम्स वांड

कांदे नीट ब्राऊन करणे ह्यावर करीचा रंग पोत अन चव मेजर अवलंबून असते, त्यामुळे ह्या कामात अजिबात हयगय नको.

ह्या स्टेपमध्ये थोडा सुधार केलात तर कलर नेमका साधेल, शेवटी ग्रीन पेस्टमध्ये जी साखर टाकतो आहोत ती कॅरेमलाईज होऊन जो रंग येतो तो खरा शेवटचा कलर बघा. कांदे ब्राऊन म्हणजे पूर्ण गळून काळपट ब्राऊन व्हायला हवेत.

अनिता's picture

9 Mar 2022 - 7:31 am | अनिता

धन्यवाद..जमला कलर...

पाटलांचा मह्या's picture

30 Mar 2022 - 7:24 pm | पाटलांचा मह्या

उत्तम लिखाण आणि झकास मटण!

भारतामध्ये कितीतरी वेगवेगळ्या पध्दतीने मटण बनवले जाते. त्यातील मसाले बहुतेक करुन सारखेच असतात पण चव मात्र वेगवेगळी होते.