वजनकाटावाला

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
20 Jan 2022 - 8:57 am

वजनकाटावाला
---------------------
तो चौकात वळणावर बसायचा . वजनकाटा घेऊन.
पांढरा पायजमा ,पांढरा नेहरू शर्ट आणि पांढऱ्याच मिशा . सावळासा देह. वय झालेलं असूनही अंगाने तो चांगला होता . रोज सकाळी तो त्याच्या काट्याला नमस्कार करून स्वतःचं वजन बघायचा. म्हणजे धंदा चांगला होतो अशी त्याची श्रद्धा होती.
त्याचा वजनकाटा सर्वधर्मसमभाव मानणारा होता .
त्याच्याकडे लहान अवखळ पोरं , लुकड्या पोरी , मध्यम वजनाची मध्यमवयीन माणसं आणि जाड्याजुड्या बायका , सगळेच यायचे .
चौक बदलला . शेजारचं दारूचं दुकान मोठं झालं . चायनिजच्या नव्या गाड्या रस्ता अडवू लागल्या .
तो तसाच राहिला .
एके दिवशी लॉकडाउन पुकारण्यात आलं . पहिलं . कडक ! सगळं बंद !
त्याचा वजनकाटाही. त्याला कितीही नमस्कार केला तरी त्याचा काहीच उपयोग नव्हता आता . तो आणि त्याच्यासारखी माणसं अशा वेळी काय करतील ?... कोरोनाला त्याच्याशी काहीच घेणंदेणं नव्हतं ... आणि कोणालाच ... प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं .
रोज कमवायचा तेव्हा खायचा तो . अवघड परिस्थिती झाली . बाहेर पडायची चोरी . करायचं काय ? त्याच्याकडे बँक बॅलन्स थोडाच होता ? की वर्क फ्रॉम होम ? की घरी बसून पगार ? ...
म्हाताऱ्याची अन्नानदशा झाली . भीक मागायला लागला तो .
वजनकाटा मात्र तो उराशी बाळगून होता . पडलाझडला तरी - शेवटी पोटपाणी होतं ते त्याचं .
लॉकडाउनच्या ऑक्टोपससारख्या नांग्यांनी जीव गुदमरायला लागल्यावर काही जणांना काही लोकांच्या भुकेकंगालपणाची जाणीव झाली . ती अशी भुकेकंगाल माणसं होती की जी कायमची भिकारी नव्हती . पण वेळच अशी वाईट आली होती . पोट माणसाला सारं विसरायला लावतं ! लाचारी पत्करायला लावतं xxx !
मग अन्नदान सुरु झालं . थोडयाफार गरीब बिचाऱ्या जनतेची भूक तरी भागू लागली . थोडीफार. तोही रांगेत उभं राहू लागला . दोन टायमाला गिळू लागला . xxxx , जीवजाळ्या भुकेला बुस्टर डोसच जणू ! पण पुढे ? ...
अशा अवघड काळातही देशात अब्जाधीशांची संख्या एकेकाने वाढत होती ; तेव्हा त्याच्यासारख्या लोकांच्या फाटक्या पत्रावळींवरचं एकेक शीत कमी होत चाललं होतं .
परिस्थितीच्या पारड्यात त्याचं वजन कमीच होतं .
त्याची परिस्थिती आणखी बिघडत गेली . त्याच्या डोईवरचे केस आणखी राठ झाले. तो आणखी म्हातारा दिसू लागला . खंगला बिचारा .
एके दिवशी तो त्याच चौकात मरून पडला .
कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याला सहज उचलला , कारण त्यावेळी त्याचा देह वजनाला कापसासारखा हलका झाला होता .
बाजूला पडलेला वजनकाटा पोरका झाला होता . त्याचं आता कोणीच नव्हतं . तो धुळीने भरला होता , त्याचा काटाही तुटला होता , त्याची वाट लागली होती ... मालकासारखी अन भंजाळलेल्या विस्कळीत समाजासारखी .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

20 Jan 2022 - 9:26 am | कर्नलतपस्वी

कोणी नाही कुणाचा पण.....
लागल्या आवघ्याले भुका
द्यारे घासतला घास
करोना करोना
कुणाच्या तोंडाला पदर
कुणा नशिबी चादर

कालाय तस्मै नमाः

सौंदाळा's picture

20 Jan 2022 - 10:30 am | सौंदाळा

विदारक
खूपच परीणामकारक लिहिले आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jan 2022 - 12:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

नका लिहित जाऊ असल्या गोष्टी,
वाचतना देखिल कसेतरी होत होते
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

20 Jan 2022 - 12:18 pm | कर्नलतपस्वी

मनाला रक्तबंबाळ करतात माणुस किती तोकडा, हतबल आहे,प्रकृती पुढे किती विवश आहे याची जाणीव होते. अर्थात ज्यांच्यात थोडी तरी माणूसकी शिल्लक आहे त्यांना बाकी संधीसाधू ना तुबंडी भरायची सुवर्ण संधी.

करून नक्कीच आहे. पण एक प्रश्न पडतो.
लोक स्वतःला असे का बनवतात. परिस्थितीला व्हर्नलेबल?
तारुण्यात शिकण्याच्या उमेदीत संधी मिळत नाही / शोधत नाहीत / स्वतःचा आर्थीक वर्ग मोडून वरच्या वर्गात जायची खटपट करत नाहीत. आणि म्हातारपणी परिस्थितीचा घास बनतात.
आपला देश म्हणजे अफगाणीस्तान , चेंट्रल अफ्रीका किंवा उत्तर कोरीया नाही की जिथे जन्माला येणे हीच एक मोठी हतबलता ठरते.
( कोणाच्या दारीद्र्यावर टीका करायची नाहिय्ये पण विचारावेसे वाटते)

कर्नलतपस्वी's picture

20 Jan 2022 - 6:02 pm | कर्नलतपस्वी

इतके सोपे आणी सरळ आयुष्य नसतयं.ज्याच जळत त्यालाच कळत.
नुकतीच पहिली लाट ओसरत होती काही निर्बंध शिथील केले होते. बाहेर पडलो काही महत्त्वाचे काम होते. रस्ता सुनसान एखाद दुसरे वाहन दिसत होते. शाँपिगं काँमप्लँक्स मधली किराणा व भाजी दुकाने वगळता बाकी बंद होती. एक काटकुळा फुगेवाला कुणीतरी फुगा घेईल म्हणून आशाळभूत नजरेने सर्व येणाऱ्या जाणाऱ्या कडे बघत होता. मी दोन फुगे नाती करता घेतले तेव्हा अक्षरशः त्याने पायावर लोटांगण घातले म्हणला साहेब मला पैसे नको पण काहीतरी खायला द्या काल संध्याकाळ पासून उपाशी आहे. जरा विचारपूस केली समजले छोटे मोठे गोळ्या बिस्किटे विकून प्रपंच चालवत होतो महामारी मुळे भीक मागायची पाळी आली लाज वाटते पण बायका पोरांना साभांळायच कसे.
डोळ्यात पाणी आले. एखाद आठवड्याचा किराणा, डाळ तांदूळ घेऊन दिले.
गरीबी फार वाईट, कोणाला गरिबीत रहायला आवडते?
चक्रव्यूह आहे ,भेदणे फार कठीण.

सरिता बांदेकर's picture

20 Jan 2022 - 9:28 pm | सरिता बांदेकर

तुमचे लेख वाचले की काय प्रतिक्रिया द्याव्या कळत नाही.तुम्ही खूप छान लिहीता.
लिहीत रहा ,

कपिलमुनी's picture

21 Jan 2022 - 1:07 am | कपिलमुनी

लॉक डाऊन मुळे एकही मृत्यू झाला नाहीये असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
त्यामुळे सदर कथा ही काल्पनीक आहे

श्रीरंग_जोशी's picture

21 Jan 2022 - 2:39 am | श्रीरंग_जोशी

हृदयद्रावक.

नचिकेत जवखेडकर's picture

24 Jan 2022 - 10:27 am | नचिकेत जवखेडकर

सहमत. खरोखर हृदयद्रावक कथा आहे.

सुखीमाणूस's picture

21 Jan 2022 - 3:25 am | सुखीमाणूस

सत्य परिस्थीती वाचुन डोळ्यात पाणी आले. सरकारने जरी रेशन वर धान्य पुरवले असले तरी सगळ्या जनतेपर्यन्त ते पोचले असेल असे नाही.
गरीबी हटाव असे म्हणत प्रत्यक्शात मात्र चोन्ग्रेस्स ने अफाट लोक्सन्ख्या वाढायला मदत केली. खाबुगिरी आणि भ्रष्टाचाराल कोणताही आळा घातला नाही.
फक्त परत परत निवडुन यावे यासाठी जनता अशिक्शीत आणि मागास राहील असे पाहिले. या कर्माची फळे आहेत ही.
अमेरिकेत पण गरिबी आहे पण ती सन्धी नाही म्हणुन नाही. तर लोकान्च्यातील व्यसनाधीनता, आळस ही कारणे आहेत जास्ती करुन..

https://www.statista.com/statistics/1124563/us-presidents-party-affiliation
या साइट वरील माहीतीप्रंमाणे
democratic 17
Republican 19
Democratic Republican 4
असे president आजपर्यन्त होउन गेले. उजव्या विचार्सरणीचे सरकार जे business minded असते तेच हवे देशातील गरिबी दुर करायला.
अडाणी अम्बानी गरीब राहुदे मग भले जनता उपास्मारीने मेली तरी हरकत नाही...असली विचार्सरणी काय कामाची. ऊद्योगपती हवे पण ते राजकीय पक्शाना भान्डवल पुरवायला यापलिकडे जाउन रोजगार निर्माण करायला कसे आवश्यक आहेत हे बघायला हवे.
घेता घेता देण्यारचे हात घ्यावे वगैरे विचार्सरणी काव्यात्मक जरुर आहे पण हा फुकटेपणा समा़जात रुजलाय हेच दुर्दैव आहे देशाचे.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jan 2022 - 4:18 am | श्रीरंग_जोशी

गेल्या शतकापासून जगभरच लोकसंख्यावाढीच्या वेग वाढण्याची कारणे म्हणजे वाढलेला जन्मदर नसून कमी झालेला मृत्यूदर आहे.
मेडीकल सायन्समधे झालेल्या अतुलनीय प्रगतीमुळे सरासरी आयुष्यमान भरपूर वाढले. साथीचे रोग, इतर जीवघेणे रोग यातून होणारे मृत्यू पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी झाले.
गेल्या चार दशकांत या विषयावरच्या जनजागृतीमुळे जन्मदर लक्षणीयपणे कमी होत चाललेला आहे. आणखी काही दशकांत लोकसंख्यावाढीचा दर कमी होत जाऊन लोकसंख्या स्थिर होण्याची शक्यता आहे.

बाकी लोकसंख्या कितीही असो या कथेतल्या सारखी उदाहरणे कालविरहित व स्थलविरहित आहेत.

बिपीन सुरेश सांगळे's picture

21 Jan 2022 - 9:55 pm | बिपीन सुरेश सांगळे

सर्व वाचकांचे खूप आभार
हि एक काल्पनिक कथा आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

21 Jan 2022 - 9:55 pm | बिपीन सुरेश सांगळे

कथेबद्दल लिहावंसं वाटतं - पण -

कोणी आपल्या जोशात खरे
कोणी आपल्या कोषात बरे

मदनबाण's picture

22 Jan 2022 - 11:57 am | मदनबाण

:(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Siva Jag Mein... :- Tadap