दिवा़ळी अंक २०२१ : द ब्ल्यू क्रॉस

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

द ब्ल्यू क्रॉस
GoodReads : The Blue Cross: A Father Brown Mystery
Wiki : The Blue Cross (short story)

मूळ लेखक: जी. के. चेस्टरटन
अनुवाद: अभिषेक अनिल वाघमारे

सकाळच्या आभाळातला चंदेरी पट्टा आणि समुद्राच्या चकाकत्या हिरवट पट्टा यांमधून बाहेर येत एक बोट येऊन हार्विचच्या धक्क्यावर लागली आणि मधमाश्यांचं पोळं फुटावं तसे माणसांचे जथे त्यातून बाहेर पडले. पण आपल्याला या गर्दीतल्या ज्या माणसावर लक्ष ठेवायचं आहे तो मात्र या गर्दीतला आणखी एक असा अजिबात वाटत नव्हता - किमान तसली अपेक्षा तरी नव्हती. एका बाजूला त्याचा धीरगंभीर रुक्ष सरकारी चेहरा, तर दुसरीकडे त्याने घातलेले सुट्टीवर निघाल्यासारखे कपडे यातला किंचित विरोधाभास सोडला, तर त्याच्या,बाबतीत नोंद घेण्यासारखी काहीच गोष्ट नव्हती. त्याने एक मचूळ राखाडी रंगाचं जॅकेट, पांढरा वेस्टकोट आणि राखाडी-निळी रिबिन व चंदेरी वेलबुट्टी असलेली हॅट घातली होती. त्याचा लांबट, सावळ्या चेहर्‍यावरची स्पॅनिश वाटणारी काळी आखूड दाढी तो एलिझाबेथियन आयाळ (रफ) वापरत असावा हे सांगत होती. तोंडातली सिगारेट तर तो एखाद्या आळशी माणसाच्या तन्मयतेने ओढत होता. वरवर पाहिलं तर त्याच्या राखाडी जॅकेटमध्ये एक भरलेलं रिव्हॉल्व्हर असेल किंवा पांढर्‍या वेस्टकोटमध्ये पोलिसांचा बिल्ला असेल किंवा त्या वेलबुट्टीवाल्या हॅटखाली युरोपातल्या अत्यंत हुशार डोक्यांपैकी एक डोकं असेल असं कोणालाही वाटलं नसतं. हा होता दस्तुरखुद्द वॅलेंटिन, पॅरिस पोलिसांचा प्रमुख आणि जगातला सर्वाधिक लोकप्रिय गुप्तहेर. आणि आता तो ब्रुसेल्सवरून लंडनला शतकातली सगळ्यात मोठी अटक करायला आला होता.

फ्लॅम्बो इंग्लंडमध्येच होता. अखेरीस या महान बदमाषाचा माग काढण्यात तीन देशांचे पोलीस यशस्वी झाले होते. आधी घेंटमधून ब्रुसेल्सला, तिथून हूक ऑफ हॉलंडला तो गेला होता. तिथून तो लंडनमध्ये येऊन तिथे भरलेल्या युकरिस्टिक कॉंग्रेस या ख्रिस्ती धर्मसभेच्या धामधुमीत काहीतरी गडबड करेल असा वहीम होता. एखादा साधारण कारकून किंवा सचिव म्हणून तिथे घुसू शकत होता. अर्थात वॅलेंटिन असो वा इतर कुणीही, फ्लॅम्बोबद्दल काही अंदाज करणं अवघड होतं.

इतक्या वर्षांत पहिल्यांदाच हा गुन्हेगारीचा मेरुमणी अचानक लुप्त झाला होता. त्याच्या अशा गायब होण्याने जग बुचकळ्यात पडलंं होतं. रोलॅण्डच्या मृत्यूनंतर जग जसं शांत झालं होतं म्हणतात, तसंच आता झालं होतं. पण त्याचे 'अच्छे दिन' असताना (म्हणजे एका अर्थाने वाईटच असं मला म्हणायचं आहे) फ्लॅम्बो हा जवळजवळ सम्राट कैझरच्या उंचीचा आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त असामी होता. एक मुलखावेगळा गुन्हा करून दुसरा गुन्हा करायला तो कसा निसटला, याची वर्णनं दैनिक वर्तमानपत्रांत जवळपास दररोजच छापून येत. राक्षसासारखा धिप्पाड आणि अंगापेराने मजबूत. त्याच्या अचाट शक्तिप्रयोगाच्या विनोदी आख्यायिका कर्णोपकर्णी होत्या. उदाहरणार्थ, त्याने एकदा एका दंडाधिकारी न्यायमूर्तीला त्याच्या डोक्यातला काडीकचरा साफ व्हावा म्हणून खाली डोकं - वर पाय करून कसं उलटं धरून ठेवलं होतं किंवा दोन बखोट्यांत दोन पोलीसवाल्यांना पकडून रिवोली रस्त्यावरून कसं दौडवलं होतं इत्यादी. या त्याच्या अचाट शारीरिक सामर्थ्यामुळेच 'रक्ताचा एक थेंबही न सांडता' तो त्याची मुख्य कामगिरी म्हणजे घाऊक प्रमाणातल्या अनोख्या चोर्‍या फत्ते करत असे. पण त्याची प्रत्येक चोरी हे एक कधी न ऐकलेलं पाप आणि कधी न ऐकलेलं आख्यान होतं. लंडनच्या प्रसिद्ध टायरोलीन डेअरी कंपनीचा कर्ताधर्ता तोच होता. फक्त त्या कंपनीकडे कधीही एखादी डेअरी, एखादी गाय, एखादी ढकलगाडी वा दूध नव्हतं इतकंच! पण तरीही हजारावर गिर्‍हाईक होतं. इतर लोकांच्या घराबाहेर ठेवलेल्या दुधाच्या भरलेल्या बाटल्या चोरून आपल्या गिर्‍हाईकांच्या दारासमोर आणून ठेवायच्या की झालं त्याचं काम. त्याच्या बहुतांश प्रयोगातला मनाला भावणारा गुण म्हणजे साधेपणा. असं म्हणतात की एकदा एका प्रवाशाला चकवण्यासाठी त्याने एका रात्रीतून एका गल्लीतल्या सगळ्या घरांवरचे नंबर सफेदी मारून बदलून टाकले होते. दूरच्या उपनगरांमधे तुरळक वस्ती असते. तिथल्या नवख्या लोकांनी पोस्टल ऑर्डर टाकण्यासाठी खर्‍या म्हणून समजलेल्या बोगस टपालपेट्यांचा निर्माताही तोच होता, यात शंका नव्हती. शिवाय एवढा आडदांड असूनही तो होता एक तरबेज कलाबाज. एखादा नाकतोडा तरी काय त्याच्यासारखा सूर मारणार की एखादं माकड तरी काय त्याच्यासारखं झरझर झाडावर चढून गायब होणार? आणि म्हणूनच तो निव्वळ सापडला म्हणून काही आपलं काम तिथेच संपणार नाही, हे आपल्या महान वॅलेंटिनला पुरेपूर ठाऊक होतं.

पण तो त्याला शोधणार तरी कसा? या बाबतीत वॅलंटिनचा अजूनही विचार पक्का झाला नव्हता.

आपल्या वेषांतर विद्येची पराकाष्ठा करूनही फ्लॅम्बोला एक गोष्ट लपवणं अशक्य होतं! ती म्हणजे त्याची उंची! वॅलंटिनला एखादी उंच फळविकी बाई, एखादा उंच तोपची किंवा माफक उंचीची उमरावीण जरी दिसली असती, तर त्याने त्यांना तिथल्या तिथे बेड्या ठोकण्यास वेळ लावला नसता. पण त्याचं दुर्दैव बघा, एक वेळ एखादा जिराफ मांजरांचं सोंग घेऊन येईल, पण त्याच्या आगगाडीवर मात्र फ्लॅम्बोसारखं कुणीच नव्हतं. बोटीवरच्या लोकांबद्दल त्याला काही संशय नव्हता. शिवाय हार्विचला मोजून पाच ते सहा जण चढले होते. त्यातला एक टर्मिनसला कामावर जाणारा बुटका रेल्वे कर्मचारी होता, त्यानंतरची दोन स्टेशनं सोडून तीन बर्‍यापैकी बुटके माळी चढले होते. त्याशिवाय ईसक्स परगण्यातल्या एका लहान शहरातून आलेली एक फारच बुटबैंगण विधवा बाई आणि ईसक्सच्याच एका लहानशा खेड्यातून आलेला एक खूप बुटका रोमन कॅथोलिक धर्मोपदेशक होता. आणि ही शेवटची वल्ली पाहिल्यावर तर मात्र वॅलेंटिनने हसू फुटलं. 'बस झालं आता!' म्हणून कपाळावर हात मारत त्याने शोधमोहिमेचा नाद सोडला. हा ठेंगणा पुजारी म्हणजे अगदी अर्क होता. नॉरफ्लॉकी डंपलिगइतकाच गोल आणि निस्तेज चेहरा, उत्तर समुद्राइतके सुकलेले डोळे आणि हातात खाकी कागदात गुंडाळलेली आणि घडीघडी घसरत जाणारी अनेक पार्सलं. या युकरिस्टिक धर्मसभेने अशा अनेक स्थानिक प्राण्यांना त्यांच्या सुप्तावस्थेतून जागं केलं होतं, हे नक्की. अंध आणि निराधार चिचुंद्र्यांना औषध फवारून हुसकावूनच बाहेर काढलं होतं जणू. वॅलेंटिनचं संशयी असणं आणि धर्मोपदेशकांप्रती त्याला फारशी आपुलकी नसणं यात तो फ्रेंच असल्यामुळे काही नवल नव्हतं. उलट त्याला त्यांची कीव येत होती आणि ह्या असामीकडे पाहून तर कोणालाही कीव यावी. त्याच्याकडे एक मोठी, जीर्ण छत्री होती, जी वारंवार जमीनीकडे झेपावत होती. आपलं परतीचं तिकीट नेमकं कसं धरावं हेही त्याला माहीत नव्हतं असं वाटत होतं. “या पुडक्यातल्या एकात बरं का, खर्‍याखुर्‍या चांदीची एक वस्तू आहे. निळे खडे असलेली!" डब्यातल्या प्रत्येकाला तो बावळटासारखा सांगत होता. त्याच्या ठायी असलेल्या ईसक्समधल्या लोकांचा निस्तेजपणा आणि साधूचा साधेपणा यांच्या विलक्षण मिश्रणाने आपला फ्रेंचमन भारावून गेला होता. तोवर टोट्टेनहम आलं आणि पुजारी आपला बाडबिस्तरा घेऊन उतरला आणि छत्री विसरली म्हणून ती घ्यायला परत आला. तेवढ्या वेळातही वॅलेंटिनने त्याला सगळ्यांसमोर चांदीच्या ऐवजाबद्दल न बोलण्याचा सल्ला दिलाच. परंतु समोर बोलणारी व्यक्ती कुणीही असो, वॅलेंटिनची नजर मात्र दुसर्‍याच कुणाला शोधत होती. राव असो वा रंक, बाई असो वा बुवा, कोणीही कमीतकमी उंची सहा फूट. कारण फ्लॅम्बो त्यापेक्षाही चार इंच अधिक उंच होता.

तो लिवरपूल स्ट्रीटला उतरला. गुन्हेगार आपल्या तावडीतून अद्याप निसटलेला नाही असं त्याला मनोमन वाटत होतं. स्कॉटलंड यार्डला जाऊन त्याने काही कागदी काम निपटलं आणि गरज लागल्यास मदत मिळण्याची तजवीज करून ठेवली. मग एक सिगारेट शिलगावली आणि लंडनच्या रस्त्यांवरून फेरफटका मारण्यास सुरुवात केली. विक्टोरिया स्टेशनाबाहेरचे चौक आणि रस्ते पार करताना तो अचानक एके ठिकाणी थांबला. लंडनमधली विचित्र शांतता असलेला एक चौक. चारी बाजूंनी उंच, डौलदार, कधीकाळी भरलेल्या पण आता निर्जन घरांच्या रांगा. पॅसिफिक समुद्रातल्या एकाट बेटासारखं मध्यावरचं वाहतुकींचं दुर्लक्षित बेट. चौकाच्या चार बाजूंपैकी एक बाजू इतरांपैक्षा फारच उंच होती. एखाद्या सभागारासारखी. त्याबाजूला लंडनच्या शोभेवर डाग लागावा अशी एक वास्तू होती. एक रेस्टॉरेंट जे थेट सोळाव्या शतकातल्या उमरावी सोहो काळातून रेंगाळल्यासारखं वाटत होतं. एक अतिशयच अनाकर्षक जागा. मडक्यांमधे ठेवलेली खुरटी झाडं, पांढर्‍या आणि लिंबाच्या रंगाच्या लांबच लांब ब्लाईंडचे पडदे वगैरे. रस्त्याच्या पातळीपासून ते बरंच वर होतं. अगदी लंडनच्या खास पद्धतीप्रमाणे. दारापर्यंत पोहोचण्यास इतक्या पायर्‍या जणू काही पहिल्या मजल्यावरच्या खिडकीपर्यंत येणारी फायर एस्केपची शिडीच. वॅलेंटिन त्या पिवळ्या-पांढर्‍या ब्लाईंडसपुढे उभं राहून बराच वेळ निरीक्षण करत राहिला.

चमत्कारांबद्दल सर्वात नवलाची गोष्ट ही की ते घडत असतात. आकाशातले ढग कधी एखाद्या उघड्या मानवी डोळ्यांचा आकार घेतात, कधीकधी आपल्याला नेमकं कुठे पोहोचायचं आहे हे माहीत नसताना दिसलेल्या एखाद्या नयनरम्य देखाव्यामध्ये एखादं झाड नेमक्या प्रश्नार्थक चिन्हासारखं नेमकी जागा पकडून उभं असतं. मी स्वत: गेल्या काही दिवसांमध्ये या दोन्ही गोष्टी पहिलेल्या आहेत. जिंकता जिंकता स्वत:च मेलेला एक नेल्सन मी पाहिला आहे. विलियम्स नावाच्या व्यक्तीने विलियम्सन नावाच्या माणसाचा अपघाताने खून केलेला होता. याला बालहत्या म्हणता येईल का? थोडक्यात, जीवनात योगायोगाचा एक मोठा विलक्षण घटक कार्यरत असतो जो जीवनाला केवळ निरस समजाणार्‍यांना कधी दिसत नसतो. एडगर अ‍ॅलन पोच्या आयुष्यातल्या विरोधाभासाप्रमाणेच, शहाणपणाने नेहमी अज्ञातालाही जमेस धरावं, हेच बरं!

अर्टिस्टाईड वॅलेंटिन हा अंतर्बाह्य फ्रेंच होता. आणि फ्रेंच बुद्धिमत्ता ही खास आणि निखळ असते. तो काही आजकालची नियतिशरणता आणि उपभोगवादातून आलेली मेंदूविरहित 'थिंकिंग मशीन' नव्हता. यंत्र हे केवळ एक यंत्र असतं, कारण त्याला विचार करता येत नाही. पण तो एक विचार करणारा माणूस होता. आणि त्याच वेळी एक नुसता 'माणूस'ही. त्याच्या आश्चर्यकारक जादुई यशामागे फक्त हळूहळू उलगडणारं तर्कशास्त्र आणि साधा फ्रेंच कॉमन सेन्स होता. हे फ्रेंच लोक जगाला चकित करायला काही फार मोठ्या खेळ्या करत नाहीत तर साधं सर्वज्ञात सत्यच सांगतात. हे सत्यापन ते फ्रेंच क्रांतीसारख्या घटना घडेपर्यंत खेचू शकतात. वॅलेंटिनला तर्कशास्त्र येत असल्यामुळेच त्याला तर्कशास्त्राच्या मर्यादाही माहीत होत्या. मोटारींबद्दल काहीच माहीत नसलेला माणूस जसा मोटारीतून भटकण्याबाबत गप्पा मारताना पेट्रोलबद्दल बोलत नाही, तसाच तर्कशास्त्राबद्दल काहीच माहीत नसलेला माणूस त्याचे मूळ गोष्टी सोडून भलतंच बोलत असतो. इथे त्याच्या हाती कुठल्याच मूलभूत गोष्टी नव्हत्या. फ्लॅम्बो हार्विचवरून निसटला होता, एवढं मात्र नक्की. आणि जर तो आता लंडनमध्ये असेल तर कुठेही असू शकत होता. विम्बल्डनच्या पठारावर फिरत असलेला एखाद्या उंच भटक्या ते मेट्रोपोल हॉटेलमधला एखादा उंच वेटर कुठल्याही रूपात. अशा अफाट अज्ञानी अस्वस्थेत वॅलेंटिनचा एक स्वत:चा स्वतंत्र दृष्टीकोन आणि स्वतंत्र पद्धत होती.

अशा प्रसंगी तो नेहमी अज्ञाताला जमेस धरत असे. अशा प्रसंगी त्याला तार्कितेतचा दावा पकडून उपयोग नसे, तर उलट तो थंडपणे आणि काळजीपूर्वक जे अतार्किक आहे त्याचा माग काढत असे. बॅन्क, पोलिस स्टेशन, बैठकींचे कट्टे अशा 'बरोबर' ठिकाणी जाण्याऐवजी तो मुद्दाम चुकीच्या ठिकाणी जाई. प्रत्येक रिकाम्या घराचं दार ठोठावी. रस्ता संपतो तिथपर्यंत मुद्दाम जात जाई, घाणीने भरलेल्या गल्ल्यांमध्ये फेरी मारी, त्याला रस्त्यावरून भटकवणार्‍या अर्धचंद्राकृती इमारतीभोवती चक्कर मारी.. इत्यादी. या वाकड्या वाटेच्या समर्थनाचा त्याचा एक वेगळा तर्क होता. त्याच्या मते एखाद्या मार्गाबद्दल तुम्हाला काही सुगावा असेल तर तो सर्वात चुकीचा मार्ग आहे, पण त्याच वेळी ज्या मार्गाबद्दल काहीच सुगावा नाही तोच मार्ग सर्वात चांगला असतो. कारण पाठलाग्याची नजर ज्या विचित्र गोष्टी टिपू शकते, त्याच कदाचित पाठलागूच्या नजरेनेही टिपलेल्या असण्याची काही ना काही शक्यता असते. माणसाला कुठेतरी सुरुवात करावी लागते. दुसरा माणूस जिथे थांबला असेल अशा ठिकाणी ती करणं कधीही चांगलं. दुकानापर्यंत जाणारा तो लांबलचक जिना, रेस्टॉरंटचा तो जख्खपणा पाहून आपल्या गुप्तहेराच्या चित्तवृत्ती उफाळून आल्या आणि त्यावरच हल्ला करावा असं त्याला वाटलं. तो पायर्‍या चढला, खिडकीजवळच्या एका टेबलाशी बसला आणि एक ब्लॅक कॉफी मागवली.

जवळजवळ निम्मी सकाळ उलटून गेली होती, तरी त्याने अद्याप न्याहारी केली नव्हती. टेबलावरचे इतर खाद्यपदार्थ पाहून त्याच्या पोटातले कावळे कावकाव करू लागले. त्याने त्याच्या ऑर्डरमध्ये उकडलेल्या अंड्याची पुस्ती जोडली आणि फ्लॅम्बोचाच विचार करत कॉफीत पांढरी साखर घोळली. त्याला आठवलं फ्लॅम्बो आजवर कसा कसा निसटला ते. एकदा एका नखं सोलायची कात्री वापरून, एकदा एका घराला आग लावून, एकदा एकाला 'अनपेड' पत्रावरचा दंड भरायला लावून आणि एकदा तर लोकांना टेलिस्कोपमधून पृथ्वीवर चालून येणार्‍या एका धुमकेतूला बघण्यात गुंगवून! त्याच्या मते त्याचा गुप्तहेरी मेंदू या बदमाषापेक्षा काही कमी नव्हता. आणि ते खरंच होतं. पण त्या वेळी त्याला स्वत:च्या मर्यादांची जाणीव होती. "गुन्हेगार हा एक सर्जनशील कलावंत असतो. पण गुप्तहेर मात्र एक य:कश्चित समीक्षक," तो कसनुसा हसत म्हणाला आणि कॉफीचा कप सावकाश ओठांना लावला आणि तसाच खाली ठेवला. त्याने त्यात मीठ घातलं होतं.

त्याने ती चंदेरी भुकटी ज्या बरणीतून आली होती तिच्याकडे पाहिलं. ती साखरेचीच बरणी होती. शॅम्पेनच्या बाटलीत जसी शॅम्पेनच असते तेवढीच नि:संशय. पण तीत मीठ का ठेवलं असावं बरं? तसल्या आणखी जुन्यापुराण्या बरण्या तिथे आहेत का, हे बघायला त्याने मान वळवली. होत्या, मिठाने गच्च भरलेल्या आणखी दोन मिठाच्या बरण्या तिथे होते. अर्थात त्यात आणखी काहीतरी विशेष होतं. त्याने चाखून पाहिलं, ती साखर होती. हवेत कुठूनतरी अचानकच उत्साह आला. त्याच उत्साहाने मग त्याने रेस्टॉरंटवर एक नजर फिरवली. मिठाच्या बरणीत साखर आणि साखरेच्या बरणीत मीठ भरून ठेवण्याची आणखी काही कलात्मकता दिसते का, हे तो बघू लागला. पांढरा कागद लावलेल्या भिंतीवरची कसल्यातरी गडद द्रवाची पिचकारी सोडली, तर ती जाग फारच नीटनेटकी, उत्साही आणि अर्थातच साधारण होती. त्याने वेटर बोलवण्यासाठी घंटी वाजवली.

पहाटेचे पिंजारलेले केस आणि तांबारलेले डोळे घेऊन एक कर्तव्यदक्ष अधिकारी धावतपळत आला. आपल्या गुप्तहेराला तर विनोदाचं अजिबातच वावडं नव्हतं. त्याने वेटरला ती साखर चाखायला सांगून त्यांच्या हॉटेलच्या लौकिकास साजेशी आहे का हे विचारलं. परिणामस्वरूप वेटरने अचानक एक जांभई दिली आणि तो खडबडून जागा झाला.

"तुम्ही तुमच्या ग्राहकांशी रोजच सकाळी असे नर्मविनोद करता का?" वॅलेंटिननने विचारलं. "विनोद म्हणून मीठ आणि साखरेची अदलाबदल करून अशीच थट्टा करता वाटतं?"

काय गडबड झाली आहे हे जसं स्पष्ट होऊ लागलं, तसा त्या वेटरने त्यांच्या हॉटेलचा मुद्दाम तसं काही करण्याचा इरादा नव्हता हे ठामपणे सांगितलं. त्याच्या मते ती एक अजब चूक होती. त्याने आधी साखरेची बरणी हातात घेतली आणि तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने मिठाची बरणी उचलली आणि तिच्याकडे पाहत राहिला. त्याचा चेहरा अधिकाधिक बावचळल्यासारखा दिसू लागला. शेवटी तो तिथून निघाला, पळत गेला आणि मालकाला घेऊन आला. मालकानेही साखरेच्या बरणीचं निरीक्षण केलं, मग मिठाच्या बरणीचं केलं आणि त्याचाही चेहरा अधिकाधिक बावचळल्यासारखा दिसू लागला.

अचानकच वेटर तोंडावाटे बाहेर पडू पाहणार्‍या शब्दांच्या प्रचंड प्रवाहाने भारावून पुटपुटू लागला.

"मला वाटतं," तो अडखळत म्हणाला, "मला वाटतं हे त्या दोन पुजार्‍यांचच काम असावं"

"कुठले दोन पुजारी?"

"तेच दोन पुजारी, ज्यांनी त्या पडद्यावर सूप फेकलं," वेटर म्हणाला.

"ज्यांनी पडद्यावर सूप फेकलं?" वॅलेंटिनने पुनरुक्ती केली. जणू काही तो एखादा इटालियन रूपक अलंकार असावा.

"हो हो नक्की तेच," तो गडी उत्साहाने भिंतीवरच्या त्या डागाकडे बोट दाखवत म्हणाला, "त्या तिथे भिंतीवर उडवलं त्यांनी ते सूप."

वॅलेंटिननने अधिक माहितीखातर मालकाकडे पाहिलं.

"हो साहेब," तो म्हणाला, "खरंच आहे ते. पण त्याचा साखर आणि मिठाच्या अदलाबदलीशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही. असो. सकाळी सकाळी, अगदी आम्ही शटर नुकतीच उघडली, तेव्हा दोन पुजारी सूप प्यायला आले होते. ते अतिशय शांत, सभ्य वाटत होते. त्यातल्या एकाने पैसे अदा केले आणि बाहेर गेला आणि दुसरा, जरा वेंधळा वाटणारा त्यानंतर जरा वेळाने त्याच्या सगळ्या वस्तू गोळा केल्यावर गेला. पण गेला एकदाचा. तो रस्त्यावर पाऊल टाकणार, अगदी नेमकं त्या क्षणी त्याने त्याचा अर्धवट भरलेला कप उचलला आणि मुद्दामच भिंतीवर सुपाचा शिपका टाकला. मी आणि माझा वेटर, दोघंही मागच्या खोलीत होतो. आम्ही धावत येईस्तोवर भिंत भरलेली होती आणि हॉटेल रिकामं झालं होतं. अर्थात आमचं फारसं नुकसान झालं नाही, पण हे मुद्दाम खोडी काढणं नाही का? मी रस्त्यावर त्यांच्या मागे धावलो, पण तोवर ते फार दूर निघून गेले होते. पुढच्या चौकात कार्टस्टेअर्स स्ट्रीटवर वळताना मी त्यांना शेवटचं पाहिलं."

आपला गुप्तहेर उभा राहिला, हॅट नेटकी केली आणि हातातली छ्डी सावरली. आपल्या मनातल्या सर्वव्यापी अंधारात पहिल्यांदा दिसलेल्या विचित्र गोष्टीचाच माग घ्यायचा, हे त्यानं मनोमन ठरवलं होतं. आणि ही गोष्ट तर फारच विचित्र होती. बिलाचे पैसे भरून व काचेचा दरवाजा ढकलून तो लवकरच त्या दुसर्‍या रस्त्यावर भटकू लागला.

इतक्या गरमागरमीच्या वातवरणातही त्याची नजर मात्र थंड आणि चपळ होती. मागे गेलेल्या एका दुकानासमोरच्या जागेत आपल्या नजरेसमोर काहीतरी झळकून गेल्याचा भास त्याला झाला. तो परत त्या ठिकाणी आला. ते एक प्रसिद्ध फळ आणि भाजीचं दुकान होतं. बाहेर मोकळ्या हवेत अनेक जिन्नस मांडून ठेवलेले होते आणि प्रत्येकासमोर त्यांची नावं आणि किंमतीच्या चिठ्ठ्या होत्या. सर्वात मोठ्या दोन ढिगांपैकी एक संत्र्यांचा होता, तर दुसरा कसल्यातरी नट्सचा होता. नट्सच्या ढिगावर एक पुठ्ठ्याचा तुकडा पडला होता, ज्यावर लिहिलं होतं, 'उत्कृष्ट संत्री, एका पेनीला दोन'. आणि संत्र्यांच्या ढिगावरही तेवढंच स्वयंस्पष्ट वर्णन होतं, 'सर्वोत्तम ब्राझिल नट्स, चार पेनीला एक पौंड.' वॅलेंटिनने दोन्ही पाट्या पाहिल्या आणि असला नर्मविनोदाचा प्रकार आधी कुठेतरी पाहिल्याचं त्याला आठवलं. आधी म्हणजे नुकतंच केव्हातरी. त्याने त्या खजील झालेल्या फळविक्याचं लक्ष आपल्याकडे वेधलं. तो त्या पाट्यांमध्ये झालेल्या चुकीकडे काणाडोळा करण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर भलतीकडेच निरुद्देशपणे बघत होता. फळविक्याने काही न बोलता त्या पाट्या आपापल्या योग्य जागी ठेवल्या. मात्र गुप्तहेर मात्र हातातल्या वेताच्या छ्डीवर बाकदारपणे वाकून दुकानाच्या आत झाकून पाहू लागला. अखेरीस तो म्हणाला, "साहेब माझं बोलणं वरवर पाहता असंबंद्ध वाटू शकेल, त्यासाठी मला माफ करा. पण मी तुम्हाला प्रायोगिक मनोविज्ञान आणि विविध संकल्पनामधले आंतरसंबंध या संदर्भाने एक प्रश्न विचारू शकतो का?"

त्या फळविक्याने 'ही कुठली ब्याद आली आता?' या भावनेने त्याच्याकडे पाहिलं. पण तो वेताची छडी हालवत बोलत राहिला, "का, म्हणजे लंडनला सुटी घालवलायला आलेल्या फावडाकृती हॅटवाल्याला एका फळविक्याच्या दुकानात चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या पाट्या का बरे आवडाव्यात? माझं बोलणं कळलं नसेल तर आणखी स्पष्ट करुन सांगतो. ब्राझिल नट्सवर संत्र्यांची पाटी लावणं आणि दोन पुजारी, एक उंच आणि एक बुटका, या दोन संकल्पनांमधला रहस्यमय दुवा काय?"

त्या व्यापार्‍याचे डोळे एकदम गोगलगायीसारखे बाहेर आले. तो आता पाव्हण्यावर झेपावतो की काय असं एका क्षणी वाटून गेलं. शेवटी तो दातओठ खात म्हणाला, "तुला त्यांच्याशी काय काम आहे हे मला ठाऊक नाही. पण तू त्यांच्यापैकी एक असशील तर सांग त्यांना, त्यांनी पुन्हा जर माझ्या सेफांची नासधूस केली तर मी त्यांना ठोकून काढीन. पाद्री बिद्री असतील घरचे!"

"जरूर!" गुप्तहेराने मोठ्या सहानुभूतीने विचारलं, "त्यांनी तुझ्या सफरचंदांचीही नासाडी केली का?"

"त्यातल्या एकानं," दुकानदार फणफणला. "सगळ्या रस्त्यावर उधळून टाकली त्यानं ती. मी त्या मूर्खांना पकडलं असतं पण आधी मला माझा माल गोळा करायचा होता."

"ते पाद्री कुठल्या वाटेनं गेले?" वॅलेंटिनने विचारलं.
"वरच्या अंगाला, डावीकडच्या दुसर्‍या रस्त्यानं वळले आणि मग चौक ओलांडून गेले." तो पटकन उत्तरला.

"धन्यवाद," असं म्हणून वॅलेंटिन परीसारखा अदृश्य झाला. दुसर्‍या चौकाच्या पलीकडे एक पोलीस त्याला दिसला. तो त्याला गाठून म्हणाला, "तुम्ही फावडे-हॅटमधल्या दोन पुजार्‍यांना पाहिलं आहे का? फार तातडीचं आहे माझ्यासाठी!"

पोलीस मोठमोठ्याने हसू लागला, "हो साहेब, पाहिलंय मी. आणि माझं मानत असाल तर त्यातला एक तर नक्कीच प्यायलेला होता. त्यातला एक तर रस्त्याच्या मध्यभागी उभं राहून बावचळल्यासारखा इकडेतिकडे बघत होता- "

"ते कुठल्या रस्त्याने गेले"? वॅलेंटिनने त्याला मध्येच थांबवलं.

"त्या तिथल्या एका पिवळ्या बसमध्ये ते चढले," तो माणूस म्हणाला; "हॅम्पस्टेडला जाणार्‍या बसमध्ये."

वॅलेंटिनने त्याचं अधिकृत ओळखपत्र दाखवलं आणि चटकन म्हणाला: "तुमची दोन माणसं बोलवा आणि माझ्यासोबत द्या." आणि त्याने तो रस्ता अशा संसर्गजन्य ऊर्जेने ओलांडला की त्या 'अवजड' पोलीसवाल्यातसुद्धा लवचीक आज्ञाधारकतेचा एक उत्साह आपसूकच संचारला. फक्त दीड मिनिटात पलीकडच्या पदपथावरून एक इन्स्पेक्टर आणि साध्या वेषातला पोलीस येऊन आपल्या फ्रेंच गुप्तहेराला सामील झाले.

"तर साहेब," इन्स्पेक्टरने मंद स्मिताने सुरुवात केली. "आम्ही आपली- ?"

वॅलेंटिनने एकदम आपल्या छडीने एका दिशेला इशारा केला, "त्या बसमध्ये बसल्यावर मी तुम्हाला सगळं सांगतो." तो म्हणाला आणि त्या वर्दळीतून धक्काबुक्की करत वाट काढू लागला. तिघेही धापा टाकत कसेबसे त्या पिवळ्या बसच्या वरच्या मजल्यावर बसले, तसा इन्स्पेक्टर म्हणाला, "टॅक्सीने आपण चौपट वेगानं गेलो असतो सर!"

"खरंय तुमचं, पण केव्हा, जेव्हा आपल्याला कुठे जायचं आहे हे माहीत आहे तेव्हा." त्यांचा म्होरक्या शांतपणे म्हणाला.

"पण तुम्ही जाताय तरी कुठे?" दुसर्‍या पोलिसाने त्याच्यावर नजर रोखत विचारलं.

वॅलेंटिनने काही सेकंदांकरता एक मनसोक्त कश मारला, तोंडातली सिगारेट बाजूला केली आणि म्हणाला, "एखादा माणूस काय करणार आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्याच्यापुढे जाण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्हाला तो काय करतोय याचा अंदाज घ्यायचा असेल तर त्याच्या मागे राहा. तो निरुद्देश हिंडत असेल तर तुम्हीही हिंडा, तो थांबला की तुम्हीही थांबा, तो जितक्या सावकाश जाईल तेवढं सावकाश जा. मग तुम्हाला त्याने काय पाहिलं असेल ते दिसू शकेल आणि तो जसा वागला तसं तुम्हाला वागता येईल. एखादी विचित्र गोष्ट दिसते का यावर लक्ष ठेवणं एवढंच सध्या आपण करू शकतो."

"कसल्या प्रकारची विचित्र गोष्ट?" इंस्पेक्टरने विचारलं.

"कुठल्याही प्रकारची विचित्र गोष्ट," वॅलेंटिनने उत्तर दिलं आणि तो एका निग्रही मौनात हरवला.

ती पिवळी बस उत्तरेकडे रांगल्यासारखी चालत होती. जणू काही खूप तास उलटून गेले होते. इकडे आपला महान गुप्तहेर काही स्पष्टीकरण द्यायला तयार नव्हता. साहजिकच त्याच्या सहकार्‍यांच्या मनात या फेरफटक्याच्या निष्पतीबद्दल शंकेची पाल चुकचुकू लागली. चुकचुकीचा आवाजही वाढू लागला. आणि त्या पालीला आता दुपारच्या जेवणाचीही इच्छा होऊ लागली. कारण रोजच्या जेवणाची वेळ तर केव्हाच टळून गेली होती. वर ते उत्तर लंडनमधले एका मागून एक फुटणारे लांबच लांब रस्ते. नरकातल्या भुयारांसारखे. संपतच नव्हते. काही प्रवास असे असतात की माणसाला सतत वाटत राहतं की आता तरी आपण जगाच्या शेवटच्या टोकाला पोहोचले असू (आणि प्रवास संपला असेल). पण प्रत्यक्षात ती उत्तर लंडनच्या टफनेल पार्कची सुरुवातच असते. तर हा प्रवास असला होता. मध्येच गेलेल्या कुबजट झोपड्या आणि निरस माळरानं आल्यावर लंडन संपलं असं वाटताच अचानकच त्याचा पुनर्जन्म होत होता. पुन्हा एकदा मोठमोठे रस्ते आणि टोलेजंग हॉटेलं. एकमेकांना नुसत्या टेकवून ठेवलेल्या तेरा शहरातून आरपार गेल्यासारखा तो प्रवास होता. हिवाळ्यातला संधिप्रकाश दार ठोठावून पुढची वाट अवघड आहे हे सांगू लागला तरी आपला पॅरिसकर गुप्तहेर मात्र अजूनही शांत आणि एक एक करून मागे जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर नजर ठेवून बसला होता. त्यांनी कॅमडेन टाउन भाग मागे सोडला, तोवर तर पोलिसवाले जवळपास झोपी गेले होते. तोच वॅलेंटिनने अचानक उठत झेप मारली, दोघांच्या खांद्यावर हाताने थोपटलं आणि ड्रायव्हरला थांबण्यासाठी मोठ्याने हाक मारली. दोघांनी उडी मारल्यासारखी केली.

आपल्या का स्थानभ्रष्ट करण्यात आलं हे न कळताच ते पायर्‍यांवरून खाली घरंगळत आले. आजूबाजूला पाहिल्यावर त्यांना वॅलेंटिन रस्त्यावरच्या एका खिडकीकडे विजयी मुद्रेने बोट दाखवताना दिसला. ती एक मोठी खिडकी होती, एका प्रासादासारख्या सार्वजनिक जागेच्या सोनेरी भिंतीचा हिस्सा. आणि त्या इमारतीवर लिहिलं होतं, 'रेस्टॉरंट'. इतर नक्षीकाम केलेल्या धुवट खिडक्यांसारखी तीसुद्धा एक खिडकी होती. फक्त तिच्या मध्यभागी एक मोठा काळा खड्डा होता, बर्फाळ जमिनीवर खोदलेल्या चांदणीसारखा.

"आपल्याल सुगावा मिळाला तर अखेरीस," हातातली छडी नाचवत वॅलेंटिन म्हणाला, "फुटकी खिडकी असलेली जागा."

"कसली खिडकी? कसला सुगावा?" त्याच्या मुख्य सहकार्‍याने विचारलं. "याचा त्यांच्याशी संबंध असल्याचा पुरावा काय?"

वॅलेंटिनने छडी इतकी त्वेषाने उगारली की ती फक्त तुटायचीच शिल्लक राहिली.

"पुरावा!" तो किंचाळला, "अरे देवा! या माणसाला पुरावा हवा. याचा त्यांच्याशी संबंध असण्याची शक्यता विसात एक इतकी आहे; मान्य आहे. पण आपण दुसरं काय करू शकतो? तुम्हाला कळत नाहीये का आपण एक तर एका अशक्यकोटीतल्या शक्यतेचा पाठलाग करू शकतो किंवा घरी जाऊन बिछान्यात ताणून देऊ शकतो?” तो तडक रेस्टॉरंटमध्ये शिरला. त्याचे दोन सहकारीही मागोमाग आत शिरले आणि काही वेळातच एका छोट्या टेबलापाशी पोटात जायला उशीरच झालेल्या दुपारच्या जेवणाची वाट पाहू लागले. बसल्या बसल्या त्यांनी काचेवरच्या फुटक्या चांदणीकडे पाहिलं आणि तरीही त्यांना त्यातून फार काही कळलं असं नाही.

"तुमची ही खिडकीची काच फुटली वाटतं," बिलाचे पैसे देता देता वॅलेंटिन वेटरला म्हणाला.

"हो सर," सुट्टे पैसे मोजायला वाकत वेटर म्हणाला. वॅलेंटिनने हळूच त्याच्याकडे भलीमोठी बक्षिसी सरकवली. वेटर ताठ उभा झाला. त्याच्या चेहर्‍यावर किंचितसं स्मितहास्य तर नक्कीच आलं होतं.

"हो, हो सर," तो म्हणाला. "खूपच विचित्र होतं ते, सर."

"खरंच? आम्हाला त्याबद्दल जरा सविस्तर सांग बघू," निष्काळजी औत्सुक्याने गुप्तहेराने विचारलं.

"काळ्या कपड्यांतले दोन पुरुष आले होते," वेटर सांगू लागला; "ती धर्मसभा का काय चालू आहे ना त्यातले दोन विदेशी पुजारी. त्यांनी थोडसंच आणि स्वतातलंच अन्न मागवलं. त्यातल्या एकानं पैसे दिले आणि बाहेर गेला. दुसराही त्याच्या मागोमाग निघण्याच्या तयारीतच होता. मी एकीकडे हातातले पैसेच मोजत होतो. तोच त्याने मला नेहमीपेक्षा तिप्पट टीप दिल्याचं माझ्या ध्यानात आलं. 'अहो जरा थांबा,' मी दरवाज्यातून बाहेर पडण्याच्या बेतात असलेल्या त्या माणसाला म्हणालो, 'तुम्ही खूपच जास्त पैसे दिलेत'. 'असं का', तो शांतपणे म्हणाला, 'नक्की आम्हीच का?' 'हो खरंच' मी म्हणालो. त्याला दाखवायला बिल उचललं. आणि नेमकं तेव्हा ते घडलं."

"म्हणजे काय?" प्रश्नकर्त्याने विचारलं.

"म्हणजे मी बायबलवर हात ठेवून सांगेन की मी बिलात ४ शिलिंग लिहिले होते. पण आता माझ्यासमोर तिथे १४ लिहिलेले दिसत होते. स्पष्ट."

"हो का?" वॅलेंटिन उद्गारला आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी हळुहळू पुढे येत विचारता झाला, "आणि नंतर?"

"त्यावर दरवाज्यावरचा पुजारी कसा म्हणतो, 'तुझा हिशेब बिघडवल्याबद्दल माफ कर पण असू देत ते. खिडकीसाठी कामी येतील,' 'कुठली खिडकी?' मी विचारलं तर म्हणतो, 'जी मी आता फोडणार आहे' असं म्हणून त्याने ते चांगलं तावदान हातातल्या छत्रीच्या टोकानं फोडून टाकलं."

तिन्ही चौकशी अधिकार्‍यांनी एकदम उसासा सोडला. इन्स्पेक्टरने पुटपुटत विचारलं, "आपण पळून गेलेल्या वेड्यांच्या तर मागावर नाही आहोत ना?" वेटरने ती 'अजीब दास्तां' मोठ्या उत्साहाने पुढे चालू ठेवली.

"मला एका सेकंदाकरता काही कळलंच नाही. मला काहीच करता आलं नाही. तो माणूस इथून बाहेर पडला आणि कोपर्‍यावर उभ्या असलेल्या त्याच्या दोस्ताला सामील झाला. मग ते बुलक स्ट्रीटवर इतक्या झपाझप चालत गेले की मला त्यांना गाठता आलं नाही."

"बुलक स्ट्रीट," गुप्तहेर म्हणाला आणि ती जोडी ज्या वेगाने तिथून निसटली असेल तितक्याच लगबगीने हाही निसटला.

आता त्यांच्या वाटेवर भुयारांसारख्या कच्च्या विटांच्या सडका, मोजके दिवे असलेल्या आणि त्याहूनही मोजक्या खिडक्या असलेल्या गल्ल्या आणि सगळीकडे अंधारातून कोरून काढलेले वाटावे असे रस्ते होते. सायंप्रकाश गडद होत होता आणि खुद्द लंडनच्या पोलिसवाल्यांनासुद्धा आपण नेमकं कुठे चाललो आहोत हे नेमकं सांगणं अवघड होतं. अर्थात ते शेवटी हॅम्पस्टेडच्या टेकडीला जाऊन पोहोचणार यात इंस्पेक्टरच्या मनात शंका नव्हती. अचानक त्या संधिप्रकाशाला छेद देणारा गॅस बत्तीचा प्रकाश एका खिडकीतून येताना वॅलेंटिनला दिसला. तो क्षणभर थांबला आणि काही विचार करून तडक त्या मिठायांच्या छोट्याशा दुकानात घुसला. त्या चॉकलेट-गोळ्यांच्या रंगीबेरंगी गोंधळात उभं राहून त्याने तेरा सिगारेट खरेदी केल्या. तो अर्थातच बोलायला निमित्त शोधत होता, पण त्याला त्याची गरजच पडली नाही.

तो आला, तेव्हाच दुकानातल्या चौकस वाकड्या म्हातारीने त्याच्या अस्तित्वाची दखल घेतली होती. पण जेव्हा तिने त्याच्यामागे उभा असलेल्या निळ्या गणवेषधारी पोलिसाला पाहिलं, तेव्हा तिच्या डोळ्यांत खरी तरतरी आली.

"ओह, तुम्ही त्या पार्सलबद्दल विचारायला आले आहात ना. मी तर ते केव्हाच पाठवलंय." ती म्हणाली.

"पार्सल?" वॅलेंटिनने पुनरुक्ती केली.

"म्हणजे, तो सद्गृहस्थ ठेवून गेला ते. त्या पुजारी लोकांपैकी एक."

"कृपा करून नेमकं काय घडलं ते सांगता का?" वॅलेंटिनने गयावया करत प्रथमच त्याच्या उत्सुकतेचं प्रदर्शन केलं.

"सांगायचं झालं तर," म्हातारी जरा साशंकच होती, पण बोलली, "ते पुजारीलोक अर्ध्या तासापूर्वी आले होते. त्यांनी पेपरमिंटच्या गोळ्या घेतल्या, थोडा वेळ बोलले आणि मग टेकडीकडे निघून गेले. पण काही सेकंदातच त्यातला दुसरा पळत परत आला आणि म्हणाला, 'माझं काही पार्सल राहिलंय का?' मी सगळीकडे शोधलं, पण काहीच नव्हतं. 'हरकत नाही. पण सापडलं तर या पत्त्यावर पाठवून द्या.' असं म्हणून त्याने मला एक पत्ता आणि एक शिलिंग दिला. मी पुन्हा नीट पाहिल्यावर मला ते पार्सल दिसलं आणि मी ते पोस्टात टाकूनही दिलं. मला पत्ता काही पूर्ण आठवत नाही, पण वेटमिन्स्टरमधला कुठला तरी होता. पण इतकं महत्त्वाचं असल्यावर पोलीस त्यासाठी येणार हे मला ठाऊकच होतं."

"आणि आम्ही आलोही," वॅलेंटिन चटकन म्हणाला, "बरं ती हॅम्पस्टेडची टेकडी किती दूर आहे इथून?"

"सरळ गेलात की पंधरा मिनिटांवर की दिसेलच तुम्हाला ती," बाई म्हणाली तसा वॅलेंटिन धावतच निघाला. उरलेले गुप्तहेरही काचकूच करत का होईना त्याच्यामागे निघाले.

ती वाट इतकी अरुंद व अंधारी होती की एकदम मोकळ्या मैदानावर आल्यावर अचानक स्वच्छ प्रकाश पाहून ते हरखूनच गेले. जणू एक मोरपंखी हिरव्या रंगाचा घुमट सोनेरी रंगात मिसळून, दूरवरच्या जांभळ्या अंधारात उभ्या असलेल्या काळसर झाडांच्या शेंड्यांवर टेकवलेला वाटत होता. वाढत्या हिरव्या छटेमध्ये एक दोन चांदण्या चमचमू लागल्या होत्या. दिवसाच्या प्रकाशाचा मागे राहिलेला चुकार सोनेरी पट्टा तेवढा हॅम्पस्टेडच्या आकाशकाठावर दिसत होता. हाच तो प्रसिद्ध 'वेल ऑफ हेल्थ' भाग. सुट्टी साजरी करायला आलेले सगळे लोक अजून परतले नव्हते, कुठे काही जोडपी बाकड्यांवर अस्त्याव्यस्त पसरली होती तर मध्येच कुठेतरी एखादी लहान मुलगी झोक्यावर हिंदोळे घेत होती. आभाळाचा वाढता काळेपणा माणसाचा खुजेपणा अधिकच मोठा करून दाखवत होता. आणि दरीकडे तोंड करत एका उतारावर उभं राहून, वॅलेंटिन त्याच्या लक्ष्याकडे बघत होता.

विरत जाणार्‍या घोळक्यांमध्ये एक दोन लोकांचा न विरलेला घोळका होता- धर्मवस्त्रं घातलेला. तिथून ते एखाद्या मुंगीएवढेच दिसत असले तरी त्यातली एक मुंगी दुसरीपेक्षा फारच बुटकी होती हे वॅलेंटिनच्या लक्षात आलं. आणि दुसरा माणूस साळसूदपणे एखाद्या विद्यार्थ्याच्या नम्रतेने झुकलेला दिसत असला, तरी तो नक्कीच सहा फुटांच्या वर उंच होता. वॅलेंटिनने मुठी आवळल्या आणि अस्वस्थपणे हातातली छडी नाचवत पुढे सरकला. तो त्यांच्यातलं अंतर कमी करत गेला, तसं एखाद्या सूक्ष्मदर्शकातून पाहावं तशा त्या आकृती मोठ्या होत गेल्या आणि तो चकित झाला. अर्थात त्याला त्याची कल्पना आली होती. उंच पुजारी कुणीही असला तरी बुटका कोण होता याबाबत त्याच्या मनात शंका नव्हती. तो हार्विचच्या ट्रेनवर त्याला भेटलेला त्याचा मित्रच होता. ईसक्सवरून आलेला भोळाभाबडा पुजारी ज्याला त्याने त्या खाकी पार्सलांबद्दल सावध केलं होतं.

अखेर आतापर्यंतच घटनाक्रम वॅलेंटिनच्या तर्काच्या चौकटीत नीट बसू लागला. ईसक्सचा कोणी एक फादर ब्राऊन नीलम खड्यांनी सजवलेला एक चांदीचा बहुमूल्य क्रॉस धर्मसभेतल्या विदेशी पाहुण्यांना दाखवायला घेऊन येणार आहे, ही खबर वॅलेटिंनला सकाळीच लागली होती. तीच ती 'खर्‍याखुर्‍या चांदीची एक वस्तू. निळे खडे असलेली' वस्तू होती आणि फादर ब्राऊन या कामासाठी अतिशय नवखा होता यात शंका नव्हती. आणि हे सगळं जसं वॅलेंटिनला माहीत झालं होतं, तसंच फ्लॅम्बोलाही माहीत झालं असणार यात काही नवल नव्हतं. आणि नीलम खड्यांचा तो क्रॉस चोरण्याचा फ्लॅम्बो प्रयत्न करणार यातही काही नवल नवल नव्हतं. ही सार्‍या नैसर्गिक इतिहासातली सर्वात नैसर्गिक गोष्ट होती. आणि साहजिकच फ्लॅम्बो छत्री आणि पार्सलं घेऊन फिरणार्‍या असल्या भोळ्या बकर्‍याला कापायला काहीतरी वेगळं तंत्र वापरणार, यात काही म्हणजे काहीच नवल नव्हतं. कुणीही यावं आणि बोलता बोलता ज्याला सहज उत्तर ध्रुवापर्यंत न्यावंं असं ते ध्यान होतं. त्यामुळे फ्लॅम्बोसारख्या अभिनयसम्राटाने त्याला हॅम्पस्टेड टेकडीपर्यंत आणलं यात नवल ते काय? आतापर्यंत गुन्हा पुरेसा स्पष्ट झाला होता आणि गुप्तहेराला बिचार्‍या पुजार्‍यावर दया येत होती. त्याच वेळेला इतक्या साध्याभोळ्या, शेळपट सावजाची फ्लॅम्बोने अशी फसवणूक करावी, याबद्दल त्याला त्याचा तिरस्कारही वाटत होता. पण इतकं सगळं झाल्यावर, तो आता विजयाच्या इतक्या जवळ येऊन ठेपल्यावर त्याचा मेंदू या सगळ्यात काही संगती लागते का, काही तार्किकता दिसते का याचा विचार करू लागला. ईसक्सच्या पुजार्‍याचा निळा क्रॉस चोरणं आणि भिंतीवर सूप फेकणं याचा काय संबंध असावा बरं? शिवाय ब्राझिल नट्सना संत्री म्हणणं काय किंवा आधी नुकसानभरपाई देऊन मग खिडकी फोडणं काय, यांचा या प्रकरणाशी काय संबंध असेल बरं? तो त्या पाठलागाच्या अंतापर्यंत आला तर होता, पण मधलं काहीतरी त्याच्या हातून सुटलं होतं. जेव्हा तो नापास होई (अर्थात हे कधीतरीच होई), तेव्हा गुन्हेगार निसटला तरी त्याला किमान काही ना काही सुगावा तरी मिळालेला असे. इथे मात्र गुन्हेगार मिळाला होता, पण कोणताही सुगावा न मिळता.

ते पाठलाग करत असलेल्या त्या दोन आकृत्या एखाद्या डोंगरकड्यावरून दोन माश्या चालाव्यात तशा दिसत होत्या. ते बोलण्यात आकंठ बुडालेले होते आणि आपण कुठे चाललो आहोत याचंही त्यांना बहुधा भान उरलेलं नव्हतं. पण ते टेकडीच्या अधिक उंच, रानटी आणि एकाट भागाकडे निघाले होते, हे निश्चित. पाठलागे जसजसे त्यांच्या जवळ जवळ पोहोचत होते, तसतसं पाठलाग्यांना हरीणमारू शिकार्‍यांसारखे अवघड पवित्रे घ्यावे लागत होते. म्हणजे झुडपांमागे दबा धरून बसणं काय किंवा गवतातून सरपटत जाणं काय. असं करता करता आपले शिकारी त्यांच्या सावजाच्या इतक्या जवळ आले की आता त्यांना त्याचं बोलणंही पुटपुटण्याइतकं का होईना पण अस्पष्टसं ऐकू येऊ लागलं. त्यातले इतर शब्द कळत नव्हते, तरी मोठ्या आणि बालिश आवाजातला एक शब्द मात्र वारंवार आणि स्पष्ट ऐकू येत होता - "तर्क". मध्येच जमिनीवर अचानक एक घळई आणि झुडपांची जाळी आली आणि दोघं पाठलागू आपल्या पाठलाग्या गुप्तहेरांच्या नजरेआड झाले. दहा मिनिटं तसंच चाचपडत शेवटी ते टेकडीच्या घुमटासारख्या शिखरावर पोहोचले, जिथल्या रंगमंचावर मावळत्या सूर्यप्रकाशाचे रसपूर्ण विभ्रम चालू होते. त्या नयनरम्य पण दुर्लक्षित जागी एक जराजर्जर लाकडी बाकडं होतं. त्यावरच बसून आपले धर्मोपदेशक अजूनही कसल्यातरी गहन चर्चेत गुंतले होते. काळोख्या होत जाणार्‍या क्षितिजावर अद्याप काही हिरवट आणि सोनेरी पट्टे लटकलेले होते. पण डोक्यावरचं मोरपंखी हिरव्या रंगाचं आभाळ मात्र आस्ते आस्ते मोरपंखी निळ्या रंगात रंगत होतं. आणि तारे एकमेकांपासून अधिकाधिक सुटे होऊन हिर्‍यांसारखे लकाकू लागले. वॅलेंटिनने आपल्या साथीदारांना मूक इशारा केला आणि हळूच एका मोठ्या वृक्षामागे लपून बसला. अखेर त्या भयाण शांततेत त्या अजब पुजार्‍यांचं बोलणं त्याला पहिल्यांदा ऐकू आलं.

एक मिनिटभर त्यांचं बोलणं ऐकल्यावर त्याच्या मनात भलताच संशय आला. आपण त्या इंग्लिश पोलीसवाल्यांना आपल्यासोबत इतक्या दूर या एकाट टेकडीवर उगाच फरफटत तर आणलं नाही ना? कारण साधं होतं. ते धर्मोपदेशक खर्‍या धर्मोपदेशकांसारखेच बोलत होते. अतिशय दिखाऊ नम्रतेने, धर्मशास्त्रातल्या कुठल्यातरी डोक्यावरून जाणार्‍या समस्येबाबत, नवं काही न शिकता, नवं काही न सांगता. छोटा ईसक्सचा पुरोहित जरा साधं आणि तारकांकडे सरळ पाहात बोलत होता, तर दुसरा मान खाली घालून बोलत होता, जणू काही त्याच्या लेखी त्यांची काही किंमतच नव्हती. कुठल्याही शुभ्र इटालियन मठीतल्या किंवा काळ्या स्पॅनिश कॅथ्रेडलमधल्या धर्मचर्चेइतकंच ते संभाषण (अ)गम्य होतं.

पहिल्यांदा त्याच्या कानावर पडला तो फादर ब्राऊनच्या एका वाक्याचा शेवट, जो असा होता: "... म्हणूनच मध्ययुगातले लोक सांगत असावेत की स्वर्गात खोटेपणा चालत नाही."

उंच धर्मोपदेशकाने वाकलेली मान संमतीदर्शक हलवली आणि म्हणाला,
"हा, खरं आहे. हे आजकालचे धर्मबुडवे लोक काही झालं की तर्कशास्त्र उगाळतात. पण या वरच्या अथांग आकाशाकडे पाहून त्यांना का वाटत नसावं की त्या, तिथे, पलीकडे अशी अनेक विश्वे असावीत, ज्यांच्या अस्तित्वाचं काहीही कारण सांगता येणार नाही."

"नाही" दुसरा धर्मोपदेशक म्हणाला; "तर्क हा नेहमीच तार्किक असतो. अगदी दीक्षा घेण्याआधीच मृत्यू आल्यावरच्या अनिश्चित अवस्थेत किंवा पार्थिव-अपार्थिव जगाच्या सीमारेषेवरसुद्धा. लोक चर्चकडे तर्कशास्त्राचा विरोधक म्हणून पाहतात याची मला कल्पना आहे. पण प्रत्यक्षात ते उलट आहे. या पृथ्वीवर फक्त चर्चनेच तर्कवादाची पताका फडकवत ठेवली आहे. या पृथ्वीवर फक्त चर्चनेच सांगितलं की खुद्द देवही तर्कवादाने बद्ध आहे."

दुसर्‍या धर्मोपदेशकाने आपला मख्ख चेहरा आभाळाकडे उंचावला आणि म्हणाला,
"पण तरीही या अफाट विश्वात कुणास ठाऊक-?"

"फक्त आकाराने अफाट," छोटा धर्मोपदेशक आपल्या जागी वळत चटकन म्हणाला, "सत्याच्या नियमांपासून पळून जाण्याच्या अमर्याद क्लृप्तींच्या अमर्यादतेच्या तुलनेत तर काहीच नाही."

झाडामागे लपलेला वॅलेन्टीन चिडचिडत नखं खात होता. इंग्लिश गुप्तहेरांची चेष्टेने पिकलेली खसखस ऐकू आल्यासारखं त्याला झालं. जणू काही दोन प्रौढ धर्मपदेशकांच्या गहन चर्चा ऐकायला आपल्याला इथवर बोलावलं, यावर ते हसत असावेत. या भानगडीत उंच पुजाऱ्याने दिलेलं सविस्तर उत्तर ऐकायचं त्याचं राहून गेलं. पुन्हा त्याने कान टवकारले तर फादर ब्राऊनच बोलत होता.

"तार्किकता आणि न्याय एखाद्या दूरच्या एकाकी ताऱ्यासारखे असतात. त्या चांदण्यांकडे पहा. नीलमचे सुटे सुटे खडे उधळल्यासारखे वाटतात, नाही का? अर्थात तू त्याबद्दल कसल्यातरी निरर्थक वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्राची कल्पना करायला स्वतंत्र आहेस. मग्रूरांच्या जंगलात काही बुद्धिमान पातीही असतात. कल्पना कर की हा निळा चंद्र, चंद्र नसून एक अगडबंब नीलमणी आहे. पण खगोलशास्त्रात कितीही भरार्‍या मारल्याने तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्रात काही तसूभरही फरक पडणार नाही. स्वर्गातल्या ओपल खड्याच्या जमिनीवर, मोत्यांच्या कड्यांखालीसुद्धा तुला हीच पाटी मिळेल की, 'चोरी करू नये.' "

वॅलेंटिन त्या दबा धरलेल्या अवघडलेल्या परिस्थितीतून मोकळं होत शक्य तेवढ्या सावकाश थोडं पुढे सरकण्याचा प्रयत्न करणारच होता. पण उंच पुजार्‍याच्या मौनाने त्याला विचारात पाडलं. अखेर त्याने मौन सोडलं आणि मान खाली झुकवत, गुडघ्यांवर हात ठेवत साध्या आवाजात म्हणाला,

"खरं आहे, मला वाटतं इतर विश्वे आपल्या तर्कशास्त्राच्या पलीकडे आहेत. स्वर्गाचं रहस्य अथांग आहे. त्यापुढे मी केवळ मान तुकवून उभा राहू शकतो."

मग भुवईही न हालवता आणि आवाजातली ऐट वा पोत जराही न बदलू देता तो पुढे म्हणाला,

"चल, आत तुझा तो निलमण्यांचा क्रॉस दे पाहू, देतोस ना? इथे आपल्याशिवाय कुणीही नाही आणि कचकड्याच्या बाहुलीसारखे तुझे तुकडे करायला मला काहीच वेळ लागणार नाही."

आवाजात आणि ऐटीत जराही बदल न करता त्याने त्या भाषिक अलंकाराला हिंसेचा मुलामा चढवला होता. पण त्या इतिहासाच्या प्रतिपाळावर काही परिणाम झालेला दिसला नाही. त्याने फक्त होकायंत्रावर उपलब्ध असलेल्या कमीत कमी कोनात मान वळवल्यासारखी केली. तो अद्याप काहीसा बावळटासारखा तार्‍यांकडेच बघत होता. कदाचित त्याला त्या बोलण्याचा अर्थच समजला नसेल. किंवा तो समजून तो भीतीने गारठला असेल.

"होय," उंच धर्मोपदेशक म्हणाला, त्याच बारीक आवाजात आणि त्याच पवित्र्यात, "होय, मीच तो फ्लॅम्बो आहे"

मग, त्याने थोडा विराम घेतला आणि म्हणाला,

"चल, मला तो क्रॉस देतोयस ना?"

"नाही," दुसरा पुजारी म्हणाला आणि कुठल्याही अक्षरात लिहिता येणार नाही असा एक आवाज झाला.

फ्लॅम्बो एकदम उठला आणि त्याने ते धार्मिक सोंग झटकून टाकलं. तो शर्विलकोत्तम मागे रेलला आणि हळू आवाजात बराच वेळ हसत राहिला.

"नाही" तो मोठ्याने म्हणाला, "तू तो मला देणार नाहीस म्हणतो, अहंमन्य पुजार्‍या. तू तो मला देणार नाहीस म्हणतोस काय रे संसारापासून पळणार्‍या बुटक्या पळपुट्या संन्याश्या. तुला सांगू , तू ते मला का देणार नाहीस ते? कारण ते मी आधीच हस्तगत केलंय, इथे आहे माझ्या खिशात."

ईसक्सवरून आलेला त्या बुटक्या माणसाने भेदरलेल्या कोकरासारखा चेहरा केला. आणि म्हणाला,

"काय सांगतोस, खरंच?"

फ्लॅम्बो आनंदाने चित्कारला.

"खरंच, तू तर एखाद्या तीन अंकी फार्सात शोभून दिसशील. होय, अरे गिड्ड्या, मला आधीच त्या पार्सलची नक्कल करून ठेवायची अक्कल सुचली होती. आणि आता मित्रा तुझ्याकडे बनावट तर माझ्याकडे खरी रत्नं आहेत. एक जुनीच खेळी, फादर ब्राऊन, खूप जुनी. अदलाबदली."

"हो," अगम्यपणे हवेत हातवारे करत फादर ब्राऊन म्हणाला, "मी ऐकलंय याबद्दल पूर्वी."

गुन्हेगारीचा मेरुमणी वाकला. छोट्या पुजार्‍याच्या बोलण्यात त्याला अचानक रस निर्माण झाला.

"तू याबद्दल ऐकलंयस?" त्यान विचारलं, "कुठे ऐकलंयस याबद्दल?"

"मी तुला त्याचं नाव सांगायला नको अर्थात", तो छोटा प्राणी सहज म्हणाला. "तो एक पश्चात्तापदग्ध माणूस होता. त्याने अशीच खाकी पाकिटांची अदलाबदली करून वीस वर्षं चैनीत घालवली होती. जेव्हा मला तुझा संशय येऊ लागला, तेव्हा मला त्या इसमाचीच आठवण झाली."

"माझा संशय येऊ लागला?" त्या लफंग्याने पुन्हा तेच शब्द जोर देत उच्चारले. "खरं सांग, मी तुला टेकडीवरच्या या निर्मनुष्य भागात घेऊन आलो एवढ्याने तुला माझा संशय येऊ लागला?"

"नाही, नाही," ब्राऊन दिलगिरीच्या स्वरात म्हणाला, "आपण प्रथम भेटलो तेव्हाच मला तुझा संशय आला. तुझ्या हातातल्या काटेरी कड्यामुळे अंगरख्याची बाही थोडी फुगलेली दिसली ना, तेव्हाच."

"अरे देवा, तुला त्या काटेरी कड्याबद्दल कसं ठाऊक?" फ्लॅम्बो किंचाळला.

"एका छोट्याशा धार्मिक समारंभात." भुवया ताणत फादर ब्राऊन म्हणाला, "जेव्हा मी हार्टलेपूलमध्ये चर्चचा मदतनीस होतो, तेव्हा असल्या काटेरी कडेवाली तीन माणसं आली होती. म्हणून मला पहिल्यापासून तुझ्यावर वहीम होता, कळलं का? आणि तो क्रॉस सुरक्षित कसा राहील याची मी काळजी घेतली. मी तुला पार्सल बदलताना पाहिलं होतं. पण मी नंतर पुन्हा त्यांची अदलाबदली केली, ते मात्र तू पाहिलं नाहीस. आणि मग मी योग्य ते पार्सल मागे ठेवून आलो."

"मागे ठेवून आलो?" फ्लॅम्बोने पुन्हा तेच शब्द उच्चारले, पण प्रथमच्या त्याच्या आवाजात विजयाशिवाय दुसरी कसलीतरी भावना झळकली.

"तर ते असं झालं," छोटा धर्मोपदेशक त्याच सुरात सांगू लागला, "मी त्या हलवायाच्या दुकानात परत गेलो आणि माझं काही पार्सल तर राहिलं नाही ना ते विचारलं. आणि सापडल्यास एक पत्ता देऊन एका ठिकाणी पाठवण्यास सांगितलं. मला माहीत होतं की माझी काही वस्तू राहिली नव्हती, उलट परत गेलो तेव्हा मीच ते पार्सल ठेऊन आलो. त्यामुळे ते किंमती पार्सल घेऊन माझ्या शोधात हिंडण्यापेक्षा त्यांनी साहजिकच ते वेस्टमिन्स्टरमधल्या माझ्या मित्राकडे धाडून दिलं." मग तो काहीशा दु:खाने म्हणाला. "हेसुद्धा मी हार्टलेपूलमधल्या त्या बिचार्‍या माणसाकडूनच शिकलो. रेल्वेस्टेशनवर हॅन्डबॅग चोरायला तो ही युक्ती वापरत असे. आजकाल तो एका मठात असतो. एखादी गोष्ट माहीत व्हायची असेल तर ती कुठुनही माहीत होतेच, नाही?" त्याने मनापासून दिलगिरी मागण्याच्या आविर्भावात हात चोळले, "आम्ही तरी काय करणार? पुजार्‍यांचं कामच असं आहे! लोक स्वत: येतात आणि असल्या गोष्टी आम्हाला सांगतात."

फ्लॅम्बोने त्याच्या आतल्या खिशातून खाकी पुडकं काढलं आणि त्याचे तुकडे तुकडे केले. त्यात कागद आणि शिसाच्या कांड्या सोडून काहीच नव्हतं. तो एखाद्या राक्षसासारखा पाय पसरून उभा राहिला आणि चित्कारला,

"माझा तुझ्यावर विश्वास नाही. तुझ्यासारखा बावळट माणूस एवढं सारं करूच शकत नाही. मला माहीतेय, तो ऐवज अजूनही तुझ्याकडेच आहे. आणि तो जर तू दिला नाहीस तर... तर आपण एकटे आहोत आणि मी तो सहज हिसकावून घेईन, लक्षात घे!"

"अंहं" फादर ब्राउनही उभा होत सहज स्वरात म्हणाला, "तो तू हिसकावून घेणं शक्यच नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे तो माझ्याकडे नाही आणि दुसरी म्हणजे आपण एकटे नाही."

फ्लॅम्बोने त्याची झेप अर्धवट टाकली.

फादर ब्राऊन एका ठिकाणी बोट दाखवत म्हणाला, "त्या झाडामागे दोन पहिलवान पोलीसवाले आणि जगातला सर्वोत्तम गुप्तहेर आहेत. ते इथवर कसे आलेत विचारशील की नाही? अर्थातच, मी त्यांना आणलंय? कसं विचार? तुला ऐकायचं असेल तर सांगतो! देव तुझ्यावर कृपा करो. गुन्हेगारांसोबत काम करताना असल्या डझानावारी गोष्टी आम्हाला ठाऊक असाव्या लागतात. खरं म्हणजे, तू चोर असशील याची मला खातरी नव्हती आणि आपल्याच पुरोहितवर्गातल्या समव्यावसायीविरुद्ध असं कारस्थान करणंही काही योग्य नव्हतं. म्हणून तू तुझं खरं रूप उघड करावंस, म्हणून मी तुझी परीक्षा घेतली. कुठलाही माणूस कॉफीत मीठ लागलं तर थोडाफाळ गोंधळ करणारच. त्याने तो नाही केला याचा अर्थ हा की त्याची शांत राहण्याची काहीतरी मजबुरी आहे. तिप्पट बिल आल्यावर कुणीही चिडतो. पण त्याने ते गुपचूप भरलं याचा अर्थ आपली कोणी नोंद घेऊ नये असा त्याचा इरादा असतो. मी बिलात खाडाखोड केली आणि तू ते भरलंस."

जग आपल्यावर वाघासारखी चाल करून यायला सज्ज आहे असं फ्लॅम्बोला वाटलं. एखाद्या जादुई मंत्राने थिजल्यासारखा तो थिजला. पण त्याच वेळी त्याची जिज्ञासा जागृत झाली होती.

"तर," फादर ब्राऊन आपल्या ओघवत्या वाणीत पुन्हा सुरु झाला, "तू तर पोलिसांसाठी काही सुगावा मागे ठेवणारच नव्हता, मग कुणालातरी तो ठेवणं भाग होतं. ज्या ज्या ठिकाणी आपण गेलो तिथे तिथे लोक आपल्याबद्दल निदान दिवसभर तरी बोलत राहतील अशी तजवीज मी करून ठेवली होती. मी काही फारसं नुकसान केलं नाही कुणाचं - फक्त एक घाण झालेली भिंत, सांडलेली सफरचंदं आणि एक फुटकी खिडकी, बस्स! पण मी क्रॉसला सुरक्षित ठेवण्यात यशस्वी झालो, कारण क्रॉस नेहमी सुरक्षितच ठेवायचा असतो. तो आता वेस्टमिनस्टरला आहे. अर्थात तू गाढवं हाकारायच्या शिट्टीने गडबड करणार नाहीस म्हणा."

"कशाने म्हणालास?" फ्लॅम्बोने विचारलं.

"बरं झालं तू त्याबद्दल ऐकलं नाहीस ते," पुजारी वेडावत म्हणाला, "ती एक बेकार गोष्ट आहे. तू काही शिट्टी मारणार्‍यांपैकी नाही हे मला ठाऊक आहे. माझ्याजवळ स्पॉटस असले तरी तरी मला ती मिळवता आली नसती, आणि तसाही मी धावत पाठलाग करण्याबाबत कच्चा आहे."

"अरे बाबा! कशाबद्दल बोलतोयस तू?"

"अरे, मला वाटलं तुला स्पॉट्सबद्दल माहीत असेल," फादर ब्राउन आश्चर्याने म्हणाला, "तुझ्या अजूनही ध्यानात कसं आलं नाही?"

"तुला या सगळ्या भयंकर गोष्टीची माहिती कशी?" फ्लॅम्बोने विचारलं.

त्याच्या पुरोहित शत्रूच्या चेहर्‍यावर सूक्ष्म स्मितहास्याची रेषा चमकून गेली.

"संसारापासून पळालेला पळपुट्या संन्यासी असल्यामुळेच बहुधा," तो म्हणाला, "तुला काय वाटतं काही काम न करता आयुष्यभर लोकांची पापं ऐकणारा मानवी आयुष्यातल्या सैतानी गोष्टींपासून अनभिज्ञ राहू शकतो? परंतु, माझ्या या उचापतीचा दुसरा भाग म्हणजे तू पुरोहित नाहीस याची खातरजमा करणं हा होता."

"काय?" तो चोर 'आ' वासत म्हणाला.

"तू तर्कशास्त्रावर टीका केली," फादर ब्राऊन म्हणाला, "जे फारच चुकीचं धर्मशास्त्र होतं."

आणि तो आपल्या वस्तू आवरायला उठला तसं झाडाखालच्या संधिप्रकाशातून तीन पोलिसवाले प्रकट झाले. फ्लॅम्बो एक कलावंत आणि खिलाडूही होता. तो एक पाऊल मागे सरकला आणि त्याने वॅलेंटिनला कुर्निसात केला.

"माझ्या समोर नको झुकुस, माझ्या मित्रा," वॅलेंटिन निर्मळ मनाने म्हणाला, "आपण आपल्या उस्तादाला मुजरा करू या."

ते त्या ईसक्सच्या ठेंगण्या धर्मोपदेशकाकडे वळले, पण तो मात्र त्यांची नजर चुकवून आपली छत्री सावरू लागला.

ए ए वाघमारे

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Nov 2021 - 12:04 pm | मुक्त विहारि

कथा आवडली

ए ए वाघमारे's picture

4 Nov 2021 - 8:01 am | ए ए वाघमारे

धन्यवाद

कवी मुक्तविहारी's picture

2 Nov 2021 - 1:02 pm | कवी मुक्तविहारी

खूप छान साहेब!

ए ए वाघमारे's picture

4 Nov 2021 - 8:01 am | ए ए वाघमारे

धन्यवाद

राघव's picture

2 Nov 2021 - 1:14 pm | राघव

मिस्टीक कथा! उत्तम अनुवाद. धन्यवाद!

ए ए वाघमारे's picture

4 Nov 2021 - 8:02 am | ए ए वाघमारे

धन्यवाद

तेनालीराम चा दुरचा मावसभाऊ शोभेल तो ठेंगणबुवा

ए ए वाघमारे's picture

5 Nov 2021 - 5:17 pm | ए ए वाघमारे

धन्यवाद!

जेम्स वांड's picture

5 Nov 2021 - 8:58 am | जेम्स वांड

खूप आवडली कथा मला, एक नंबर अनुवाद आहे.

व्हॅलेंटीन हाक मला फ्रेंच असणाऱ्याच दुसऱ्या हर्क्युलीस पॉइरोट (उच्चारी एर्क्युल पॉईरॉ) सारखा वाटला, नेमका काल रात्रीच मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस बघितल्यामुळे सहीच कनेक्ट झालो कथेशी.

ए ए वाघमारे's picture

5 Nov 2021 - 5:17 pm | ए ए वाघमारे

धन्यवाद!

जेम्स वांड's picture

5 Nov 2021 - 6:44 pm | जेम्स वांड

हर्क्युलीस पॉइरोट (एर्क्युल पॉइरा) हा फ्रेंच नाही तर बेल्जियन असतो.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Nov 2021 - 11:02 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे कथा. तुम्ही अनुवादही चांगला केलात.

ए ए वाघमारे's picture

5 Nov 2021 - 5:17 pm | ए ए वाघमारे

धन्यवाद!

रंगीला रतन's picture

6 Nov 2021 - 12:51 pm | रंगीला रतन

भारी आहे कथा.

ए ए वाघमारे's picture

15 Nov 2021 - 8:15 am | ए ए वाघमारे

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

12 Nov 2021 - 7:05 am | तुषार काळभोर

सुगम आणि छान रूपांतर केलं आहे.

ए ए वाघमारे's picture

15 Nov 2021 - 8:15 am | ए ए वाघमारे

धन्यवाद

नावातकायआहे's picture

14 Nov 2021 - 6:20 pm | नावातकायआहे

कथा आवडली!

ए ए वाघमारे's picture

15 Nov 2021 - 8:16 am | ए ए वाघमारे

धन्यवाद

सुखी's picture

21 Nov 2021 - 5:42 pm | सुखी

कथा छान रंगवली आहे

गुल्लू दादा's picture

1 Dec 2021 - 12:05 pm | गुल्लू दादा

अनुवाद छान झालाय. कथा मात्र इतकी आवडली नाही. धन्यवाद.