दिवाळी अंक २०२१ : थेटर!

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

"अरे, अशोकला 'आन मिलो सजना' लागलाय अन विजयला 'हाथी मेरे साथी'. काय करायचं?" - मित्र.
"आन मिलो सहाचा पाहू अन तिथून विजयला जाऊ. साडेनऊचा 'हाथी मेरे साथी." मी.
दहावीची परीक्षा डोक्यावर आलेली असताना लागोपाठ दोन सिनेमे पाहायचे असे बेत आखणारे केवळ मी आणि माझे मित्रच नव्हतो.
'एक ढूंढो, हजार मिलेंगे' असा तो जमाना!

साठ-सत्तरच्या दशकात, शाळा-कॉलेजच्या जमान्यात सिनेमा हेच मनोरंजनाचे मुख्य आणि एकमेव साधन. ते आपल्यापर्यंत किवा आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे थेटर (थिएटर) किंवा टाकी (टॉकीज).

तेव्हा बीडला ईन-मीन दोन थेटरं होती - 'विजय'आणि 'अशोक '.
मुंबईत प्रदर्शित झाल्यानंतर वर्ष-दोन वर्षांनी बीडच्या थेटरात सिनेमे लागत. पडेल असेल तर थोडा लवकर! ईद, दिवाळीला तुलनेने नवा सिनेमा झळके. पाच-सहा महिन्यांचा नवा सिनेमा लागला, तर अप्रूप वाटे. सिनेमाच्या सुरुवातीस सेन्सॉरचे प्रमाणपत्र दाखवतात, त्यात प्रदर्शनाची तारीख आणि सिनेमाची लांबी (किती रिळांचा) कळते. ते दिसले की पब्लिककडून तारीख व रिळे यांचा सामूहिक उच्चार होई.
मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, जालना या ठिकाणी थेटरांची संख्या जास्त होती. तिथे सिनेमे लवकर लागत.
बीडातले काही लाडावलेले धनाढ्य सिनेरसिक खास नवे सिनेमे पाहण्यासाठी भाड्याच्या जीप वगैरे करून तिकडे जात आणि परत आल्यावर इतरांसमोर नवा सिनेमा पाहिल्याच्या बढाया मारत आणि सिनेमाच्या 'इस्टुर्‍या'ही सांगत. ज्यांना हे चोचले शक्य नव्हते, ते निमूटपणे ऐकत. बिच्चारे! सिनेमा नाही, तर स्टोरी तरी.. दुधाची तहान ताकावर!

सिनेमा लागण्यापूर्वी गावात पोस्टर लागत. रात्रीच्या शांत वेळी, थेटरात काम करणारी दोन-तीन पोरे हातात शिडी, पोस्टर चिकटवायला लागणार्‍या खळीच्या बादल्या, ब्रश आणि पोस्टरचे गठ्ठे घेऊन संचार करत. पोस्टरच्या जागा ठरलेल्या. मोठे पोस्टर मुख्य रस्त्यावरील इमारतींच्या भिंतीवर.

पोस्टर लावण्याचे काम मेहनतीचे आणि कसरतीचे. आधीचे पोस्टर ओरबडून काढायचे. तो कचरा तिथेच गटारात टाकायचा. लावायचे पोस्टर रिकाम्या रस्त्यावर उलटे टाकून ब्रशने बादलीतील खळ त्याला लावायची. शिडीवर चढून ते भिंतीवर डकवायचे.

पोस्टरचे आकार वेगवेगळे असत. लहान पोस्टर लावणे सोपे. मोठे पोस्टर चार-पाच भागांत असे. ते भाग एकत्र जुळवून चिकटवण्यासाठी चिकटवणारा अनुभवी लागे. उलटसुलट झाले तर सगळी मेहनत वाया.

पोस्टरबाजीचा उद्योग पाहाणे हे रिकामटेकड्यांसाठी वेळ घालवण्याचे व मनोरंजनाचे उत्तम साधन होते. याचा एक फायदा म्हणजे कुठल्या थेटरला कुठला सिनेमा कधी लागणार, हे त्यांना सर्वातआधी कळे. पोस्टर लावण्याच्या प्रक्रियेच्या एवढ्या सविस्तर वर्णनावरून रिकाम्या मंडळींत आस्मादिकांचाही समावेश होता, हे चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात अर्थात आले असेलच!

सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हातगाडीवरून शंकूच्या आकारात लावलेले सिनेमा पोस्टर फिरवले जात. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी समोर ताशा-हलगी वाजत असे. नंतरच्या काळात एक निवेदक रिक्षातून लाउडस्पीकरवर ओरडून सिनेमाची जाहिरात करत असे. त्याची खास स्टाइल बरीच प्रसिद्ध झाली होती.

सिनेमाच्या प्रिंट्सचे - म्हणजेच रिळाचे डबे जालना, परळी इ. ठिकाणांहून बसने लोखंडी पेट्यांतून येत. अतिउत्साही मंडळी त्याच्याही मागावर असत. बसस्टँडवर किंवा थिएटरवर जाऊन त्याची माहिती काढणे हा त्यांचा छंद असे. कुठल्या सिनेमाची रिळे आली, हे त्यांच्याकडून कळे. निजामाबाद टेरिटरी, अमरावती टेरीटरी असे शब्द त्यांच्याकडून कानी पडत. तिथे सिनेमा डिस्ट्रिब्यूटर असत आणि ते सिनेमाच्या प्रिंट्स गावोगावचे थेटराला पाठवतात, अशी माहिती या तज्ज्ञ मंडळींकडूनच कळली होती. म्हणजे नक्की काय होते, हे मात्र कळत नसे.

थेटरला चार प्रकारची आसन व्यवस्था असे. तिकीट दर अर्थातच वेगवेगळे असत. फर्स्टक्लास म्हणजे खुर्चीचा दर एक रुपया. सेकंड क्लास म्हणजे पाठी असलेले बेंच/बाकडे, सत्तर पैसे. थर्ड क्लास म्हणजे बिनापाठीचे बेंच/जमीन - तीस पैसे. पुढे त्यात वाढ होऊन ती अनुक्रमे दीड रुपया, एक रुपया व पंचाहत्तर पैसे झाली. नंतरही त्यात नियमित वृद्धी होत गेली असणार, हे सांगायला नको. चौथा वर्ग म्हणजे जनाना क्लास - फक्त महिलांसाठी. महिला व पुरुष एकत्र बसणे, बसवणे सभ्यपणाचे समजले जात नसावे किंवा पुरुषांच्या बाजूला बसणे सुरक्षित वाटत नसावे. कदाचित हा भाग निजामशाहीत होता, हेही एक कारण असेल. महिलांसाठी ही स्वतंत्र व्यवस्था फर्स्टक्लासच्या बाजूला होती. पुरुषांची नजरसुद्धा त्यांच्यावर पडू नये, म्हणून 'जनाना'समोर एक पडदा लावलेला असे. सिनेमा सुरू होण्याच्या वेळीच तो पडदा हटवला जाई. मध्यंतर झाले, लाइट लागले की तो भाग 'पडदानशीन' होई. समोरचे अनेक गब्रू, मिळेल तेवढे नयनसुख घेण्याच्या आशेवर मागचा पडदा उघडण्याच्या प्रतीक्षेत मागे माना वळवून बसलेले असत. बहुधा पदरी निराशाच येई. मग माना पुढे वळवून समोरच्या पडद्यावर. असो.

एकदा एक गमतीचा प्रकार घडला, एका वनसाइडेड रोमिओला, त्याची 'वन साइडेड लव्ह स्टोरी' माहीत असलेल्या एका 'मित्राने' त्याची 'गम्मत' करण्यासाठी, शाळेतील त्याची 'ती' फर्स्ट शोला येणार, अशी थाप मारली. वरती ही खातरीशीर बातमी आहे अशी पुस्ती जोडली. त्याचा जीव टांगणीला! तयार होऊन तो थेटरासमोर हजर. वाट पाहून पाहून जीव शिणला आणि सिनेमा सुरू होण्याची घंटा झाली तरी तिचा पत्ता नाही. आपल्यालाच उशीर झाला असावा आणि कदाचित ती आधीच आत गेली असावी, या आशेने घाईघाईत आत गेला. इंप्रेशन मारण्यासाठी नेहमीप्रमाणे थर्डक्लासऐवजी फर्स्टक्लासचे तिकीट काढलेले. सिनेमात कसले लक्ष लागते? मागे परत परत परतुनि पाहे, या अवस्थेत सगळा वेळ गेला. सिनेमा संपल्यावरहि तेच. ती आलीच नव्हती. मग आपण फसवले गेलो हे ध्यानात आले. ती दिसली नाही व मित्राने फसवले असे दुहेरी दु:ख. 'दोस्त दोस्त ना रहा' (मित्रासाठी), तेरी राहो मे खडे है दिल थामके (तिच्यासाठी) इत्यादी इत्यादी गाणी आळवत घरी परत गेला बिचारा. दुसर्‍या दिवशी शाळा सुटल्यावर शाळेसमोर तिच्या साक्षीने दोघांची फ्रीस्टाइल हाणामारी आम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळाली.

रोज संध्याकाळी सहा/साडेसहा व रात्री नऊ/साडेनऊ दोनच खेळ. मॉर्निंग शो, मॅटिनी शो असे स्वतंत्र खेळ नसत. नवा सिनेमा असेल, तर सुरुवातीचे काही दिवस तीन/चार शो होत. सिनेमा गाजलेला असला की पहिल्या दिवशी गर्दी (अर्थातच 'तुफान') होई. रांग, शिस्त असले फालतू लाड मोठमोठ्या शहरात, अशी पब्लिकची धारणा होती, तर आगाऊ तिकीट विक्री हा आगाऊपणा आहे, अशी थेटरवाल्यांची धारणा. पहिल्याच दिवशी पहिला शो पाहणारे 'व्रतस्थ' असंख्य. त्यामुळे तिकीट खिडकीवर ही झुंबड उडे. एक॔दरीत गर्दी लक्षात घेता सगळ्यांना तिकीट मिळणे अपवाद वगळता अशक्य नसे. परंतु ढकलाढकली, दंडेली करत, समोरच्यांना बाजूला सारत, गरज पडल्यास इतरांच्या खांद्या-डोक्यावर चढून खिडकीजवळ जायचे, खिडकीच्या छोट्या भोकातून आधी आत घुसलेल्या दोन-तीन हातांमधून आपलाही हात पैशासह कोंबायचा, हाताच्या बोटांनी किती तिकिटे पाहिजेत ते तिकीट देणार्‍या त्या अदृश्य माणसाला सांगायचे, त्याने हाती दिलेली तिकिटे आणि परत दिलेले सुट्टे पैसे काबीज करून युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात परतण्यात मिळणारा आनंद वेगळाच, असे मानणारे असंख्य होते. या सगळ्या प्रकारात आपल्याहून जास्तीचे 'भुजबळ' असलेला कुणी वीर मध्ये आला, तर हाणामारीची शक्यता असणारच! ती गृहीत धरलेली असे. एवढा पराक्रम गाजवताना शर्ट फाटणे, गुंड्या तुटणे, खिडकीचा पत्रा लागून हाताला जखमा होणे असे किरकोळ प्रकार होणारच की! पण त्याची फिकीर कुणाला? 'भुजबळांच्या' तिकीट खिडकी वरील चढाया आणि धुमश्चक्री निमूटपणे पाहत दूर उभे असलेल्या गरीब बापड्या प्रेक्षकांना नंतर उरलेली तिकिटे आरामात मिळत.

गर्दी असली की तिकीट मिळेल की नाही या विचाराने अनेकांच्या जिवाची घालमेल होई. अशा वेळेस एखादा धूर्त भामटा एखादे भोळे सावज हेरून, तिकीट काढून देतो म्हणून त्याच्याकडून पैसे घेऊन पसार होण्याचे प्रकारही होत. मग रिकाम्या खिशात हात घालून, मान खाली घालून घरी परतायची वेळ! गाजलेला शिनुमा असला की पहिले काही दिवस काळा बाजारवाल्यांची चलती असे. अतिगरजू, दर्दी सिनेरसिक दुप्पट-तिप्पट भावाने तिकीट खरेदी करीत आणि बहुतेक वेळेस पस्तावत. कारण नंतर ओळखीचा कुणीतरी, "मला तर आरामात खिडकीवरच तिकीट मिळाले" किंवा "मी तर एकचे तिकीट फक्त दीडलाच घेतले" असे सांगून त्याचा 'तिकिटानंद' हिरावून घेई. काळा बाजारवाले आणि तिकीट विकणारे यांच्यात 'गॅटमॅट' आहे असे त्या विषयातले तज्ज्ञ सांगत. पण मला काही बोध होत नसे. हल्लीच्या काळात मात्र सिनेतिकिटांच्या काळा बाजाराचा धंदा बुडून ही जमातच नामशेषच झाली असावी. 'बिच्चारे' काळा
बाजारवाले! या धंद्यात अर्थ उरला नाही असे कळल्यानंतर कुठल्या धंद्यात शिरले असतील, कोण जाणे? एका थेटरजवळच्या पान टपरीवरून ब्लॅकने तिकिटे विकणारा मात्र काही वर्षांनंतर नगरसेवक झाल्याचे पाहण्यात आहे. पण तिकिटांचा काळा बाजार हा त्याचा साइड बिझनेस होता. मुख्य धंदा मटक्याचे आकडे घेण्याचा होता. असो.

गुलाबी, निळ्या-हिरव्या रंगाची पातळ कागदी तिकिटे हाती घेऊन आपापल्या 'क्लासनुसार' त्या त्या दरवाजावर जायचे. डोअरकीपर नामक प्राणी तिकीट फाडून आत पाठवे. सीट नंबर वगैरे भानगड नसल्यामुळे त्याने प्रेक्षकाला जागेपर्य॔त सोडण्याचा प्रश्नच नसे. मोकळी जागा पाहून बसायचे. एखादा आधीच आपल्या मित्रांसाठी वगैरे आख्खे बाकडे आडवून ठेवी. मग भांडाभांडी आलीच. त्यात कोण जास्त 'पावरफुल' यावरून सीट मिळणार की 'आरक्षित' केलेली सीट जाणार, हे ठरे. थर्ड क्लासवाल्या मंडळींना बाकांसमोर मोकळी जागा अगदी पडद्यापर्यंत उपलब्ध असे. शिवाय प्रवेशद्वाराजवळच्या पायर्‍यांवरहि दाटीवाटीने लोक बसत. एकमेकाच्या पायावर पाय पडणे, धक्काधक्की होणे हे नित्याचेच असे.

हा कल्लोळ फक्त पहिले दोन-तीन दिवस असे. नंतर मात्र सगळ्या जागा ओपन कॅटॅगरीत जात. कुणी कुठेही बसा, नो प्रॉब्लेम.

तिकीट मिळून थेटरात जाईपर्यंत अंधार होऊन फिल्म डिव्हिजनची सरकारी डॉक्युमेंटरी सुरू झालेली असे. शेती, आरोग्य, कुटुंबनियोजन, सहकार, विविध सरकारी योजना असे कुठलेही विषय शक्य तेवढ्या रटाळ पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे हा त्यामागचा उद्देश असे. राष्ट्रपतींचे, पंतप्रधानांचे विदेशी दौरे, परदेश प्रमुखांचे भारतदौरे, वाटाघाटी, बैठका, करार, कुठले कुठले शासकीय समारंभ इ.ची वार्तापत्रे दाखवली जात. कधी कधी क्रिकेट, हॉकी सामन्यांची अर्धवट, अपुरी चलतचित्रेही दाखवली जात. टीव्ही नव्हता त्या काळात, अशा रितीने आवडते खेळाडू आणि त्यांची कामगिरी पाहायला छान वाटे.

अनेकदा वार्तापटांना फाटा देऊन डायरेक्ट सिनेमा सुरू होई. थेटरात पब्लिक स्थिरस्थावर होईपर्यंत एखादे गाणे किंवा महत्त्वाचा प्रसंग होऊन गेलेला असे. 'सुरुवात चुकवू नका' अशा टाइपचा सिनेमा असला की नेमकी सुरुवातच चुके. वैताग येई. लोकांनी पुन्हा सिनेमाला यावे, म्हणून थेटरावाले मुद्दाम असे करतात असे काही सराईत प्रेक्षक बोलत. अशा वेळेस सिनेमा रिपीट पाहणारा एखादा, सुरुवात चुकलेल्याला, आधीची 'इष्टुरी 'थोडक्यात सांगायचा प्रयत्न करी. बाजूचे लोक "शुक शुक, गप्प बस" असे ओरडून त्याला गप्प करत. काही उत्साही सिनेरिपीटर मध्ये मध्ये रनिंग कॉमेंट्री करून, पुढे काय होणार आहे ते आधी सांगत. 'आता बघ धर्मेद्रच्या मागून प्रेम चोप्रा येतो आणि त्याच्या पाठीला पिस्तूल लावतो, मग धर्मेंद्र..' वगैरे वगैरे. हे ऐकून आजूबाजूचे पब्लिक शिवीगाळीवर येई. 'शेवट कुणाला सांगू नका' टाइपच्या सिनेमात 'द एंडचे'आधीच रहस्यभेद करणारे कुणी सिनेरिपीटर आपल्यासोबत असणे परवडत नसे. त्याची बडबड ऐकून, पडद्यावर पाहण्याऐवजी बाजूचे कुणी बदडणार तर नाही नं? याकडेच लक्ष द्यावे लागे.

हे सिनेरिपीटर परवडले, असा बालप्रेक्षकांचा एक वर्ग असे. हाणामारीच्या प्रसंगात स्वतःच्या जागेवरून बसल्या बसल्या वा उभे राहून अ‍ॅक्शनसह हिरोला वाचिक, कायिक स्वरूपात सूचना देत सावध करणे, प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर त्याचे काही खरे नाही, असे समजून "अरे, तो मागून येतोय, लक्ष दे, बदड त्याला, सोडू नको, दे ठोसा, अजून एक, हां.." अशी बडबड सुरू असे. इतरांसाठी वैताग किंवा करमणूक!

सिनेमाला साधारणत: एक मध्यंतर असते. बीडच्या थेटरात एकच प्रोजेक्टर असल्याने, चार-पाच रिळांनंतर आधीचे रीळ बदलून पुढची रिळे प्रोजेक्टरवर चढविण्यासाठी सिनेमा थांबवला जाई. अशी एकूण तीन मध्यंतरे होत. त्याला मध्यंतराऐवजी 'पावांतर' म्हणता येईल. या पावांतरात काही प्रेक्षक पाय आणि पोट मोकळे करायला बाहेर जात आणि फेरीवाले थेटरात येत. खारे दाणे, चणे-फुटाणे, चॉकलेट, गोळ्या, सोडालेमनची विक्री करीत. सोडा बाटल्यांवर ओपनर फिरवत 'खर्रर्रर्रर्रटक, खर्रर्रर्रर्रटक' असा चमत्कारिक आवाज काढत. तो ऐकून "ए सोडा.. (हे त्याला उद्देशून) दोन इकडे दे तिसर्‍या लायनीत" वगैरे ऑर्डरी सुटत.

अशा रितीने सिनेमा पुढे सरकत असताना अचानक वीज जाणे हा प्रकार नवीन नव्हता. वीज जाण्याने रसभंग होऊ नये, म्हणून थेटरात जनरेटर ठेवणे ही फुजुलखर्ची आहे, असे थेटरमालकांचे मत होते. वीज गेल्यावर अर्थात सिनेमा बंद पडे. वीज परत कधी येईल हे निश्चित नसे. मग अंधारात आणि उकाड्यात बिच्चारे प्रेक्षक विजेची वाट पाहत बसत. काही अँग्री यंग मेन मात्र थेटरमालकाचा पिढ्यांसहित उद्धार करत. वीज येणारच नाही असे निश्चित कळल्यावर, दुसर्‍या दिवशी 'हाच खेळ पुन्हा' असे जाहीर होई. मग प्रेक्षक घरी जात, उद्या परत येण्यासाठी. फुकटात 'डब्बल' पाहायला मिळते म्हणून काही जण खूशही होत.

एकदा सलग तीन दिवस मध्यतरानंतर वीज जाऊन खेळ बंद पडला. तिन्ही दिवस तेच थेटर, तोच सिनेमा, तीच तिकिटे, तेच पब्लिक. सिनेमात काही 'एकदम खास' सीन होते. पुन्हा पुन्हा आणि फुकटात पाहायला मिळते, म्हणून प्रेक्षक भलतेच खूश. थेटरमालकासाठी मात्र वैतागच की!

प्रेक्षकानां वैताग आणणार्‍याही अनेक गोष्टी असत. सिनेमा रंगात आलेला असे. उंच पर्वताच्या कड्यावर हिरॉइन झाडाच्या फांदीला लोंबकळत आहे, ती फांदी कोसळायच्या बेतात आहे, तिला वाचवण्यासाठी हिरो एका दोराला लटकून खाली उतरत आहे, त्यातच व्हिलन त्याच्याशी मारामारी करत दोर कापण्याच्या प्रयत्नात आहे.. काय होईल? दोर तुटेल? फांदी सुटेल? हिरो-हिरॉईन दरीत पडतील? की? असे प्रश्न डोक्यात घेऊन प्रेक्षक दातांनी नखे कुरतडत जीव मुठीत धरून पाहत आहेत. एवढ्यात..
रीळ तुटते. सिनेमाची रिळे जोडून सिनेमा सुरू होईपर्यंत तिकडे हीरो-हिरॉइन आणि इकडे प्रेक्षक लटकलेले!

हे रीळ तुटून सिनेमा बंद पडण्याचे प्रकार वारंवार होत. एकप्रोजेक्टरी थेटरे असल्याने 'पावांतरात' रिळे बदलण्याच्या प्रक्रियेत कधी उलटापालटही होई - म्हणजे मध्यंतरापूर्वी खुनाचा रहस्यभेद होऊन खरा खुनी पकडल्याचे आधी दाखवले जाई. खून कुणाचा झाला, कधी झाला हे मात्र मध्यंतरानंतर दिसे. हे ऑपरेटरचे 'संकलन कौशल्य!' 'आधी कळस मग पाया' पद्धतीची ही गंमत अनेकांच्या लक्षातही येत नसे.

शिस्तप्रिय आणि नियमाने चालणार्‍या प्रेक्षकांच्या वैतागाची कारणे वेगळीच असत. 'धूम्रपान निषेध' असे फलक सगळीकडे असूनही, सिगारेट-बिड्यांचा धूर थेटरात वर वर जाताना दिसे. तो पाहून यांच्या डोक्यात धूर! थेटराच्या भिंतीवर अतिसंथ गतीने फिरणारे मोठे पंखे सुरू असल्यास त्यातून येणारी मंद हवा, तो धूर (खरा, डोक्यातला नाही) थेटरात सर्वत्र पसरवायला मदत करे. तो धूर, ती हवा तेव्हाच आसमंतात विलीन झाली.

इतक्या वर्षांनंतर ती थेटरेही विस्मृतीच्या अवकाशात लुप्त झालीत. आता अस्तित्वात तरी आहेत की नाहीत, माहित नाही. आत खोलवर कुठेतरी दडून बसलेल्या बालपणाच्या, तरुणपणाच्या अशा अनेक आठवणी मात्र आपल्या नकळत केव्हातरी तळ ढवळून वर्तमानाच्या पृष्ठभागावर येतात आणि आठवणींचा सिनेमा सुरू होतो मनाच्या थेटरात!

हे थेटर सुरूच राहणार आहे, श्वास सुरू आहे तोपर्यंत.

नीलकंठ देशमुख .

प्रतिक्रिया

Madhavi1992's picture

2 Nov 2021 - 8:00 pm | Madhavi1992

मस्तच

नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:43 pm | नीलकंठ देशमुख

लेख आवडला हे कळून छान वाटले.

कानडाऊ योगेशु's picture

2 Nov 2021 - 9:14 pm | कानडाऊ योगेशु

रहस्य असलेल्या सिनेमातले रहस्य फोडायची पण ष्टाईल होती. गुप्त चित्रपटाच्या वेळे चित्रपट सुरु झाल्यावर मागुन अंधारातुन फक्त जोरात काजोल असा पुकारा झाला होता आणि पुढचा सिनेमा पाहणे मग फक्त एक उपचार बनला होता.
बाकी लेख मस्तच.

नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:44 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. लेख वाचून तुमच्या ही आठवणी जाग्या झाल्या.छान.

नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:46 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. लेख वाचून तुमच्या आठवणी जाग्या झाल्या. छान.

भागो's picture

3 Nov 2021 - 4:38 pm | भागो

लेख आवडला

नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:42 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.

सौंदाळा's picture

3 Nov 2021 - 5:32 pm | सौंदाळा

गमतीशीर काळ होता.
सातारला मामेभावाबरोबर कोणतातरी चित्रपट बघायला गेलो होतो - त्याने सांगितले होते की बाल्कनीचे तिकीट आहे म्हणून खूश होतो. गेलो तर काय स्टॉलच्या दोन फूट वर बाल्कनी आणि साध्या लोखंडी खुर्च्या. तेव्हा झालेला हिरमोड आठवतोय. मल्टीपेक्सच्या पण किती तरी आधी सोलापूरात उमा, चित्रा आणि काहीतरी अशी ३/४ चित्रपट्गृहे एकाच कंपाउंड्मधे होती. ती एकाच मालकाची होती आणि त्याने आपल्या मुलींची नावे चित्रपट्गृहांना दिली होती असे ऐकले होते. १० रुपये तिकीट - खूप सिनेमे पाहिले तिकडे.
काळ्याबाजारात तिकीट काढून मात्र फक्त एकच चित्रपट पाहिला : डीडीएल्जे पुण्यात नीलायम टॉकीजला
आता तर चित्रपट थेटर काय किंवा टीव्हीवर काय - बघायची आवड खूपच कमी झाली.
नाटकं मात्र भरपूर बघायला आवडतात - आता निर्बंध उठले आहेत, परत चालू करायला पाहिजे.

नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:41 pm | नीलकंठ देशमुख

गमतीशीर काळहोता हे खरे. लोकांमधे काहीसा भाबडेपणा भोळेपणा होता.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 6:02 pm | मुक्त विहारि

पुर्वीचा गंमत आता राहिली नाही ...

नो टाईम टू डाय, हा सिनेमा थिएटर मध्येच बघा, असे मुलाने बजाऊन सांगीतले, म्हणून गेलो होतो

इनमिन चारच डोकी

तीच गत, नीरजा नामक चित्रपटा बाबतीत, तेंव्हा तर आम्ही तिघेच जण होतो

नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:39 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

बोलघेवडा's picture

3 Nov 2021 - 7:36 pm | बोलघेवडा
बोलघेवडा's picture

3 Nov 2021 - 7:36 pm | बोलघेवडा
नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:39 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

5 Nov 2021 - 12:52 pm | चौथा कोनाडा

फर्मास लेख. ते एक युग होते !!!
तंतोतंत चित्र डोळ्यापुढे उभे राहिले.
माझ्याही आठवणी जाग्या झाल्या.

नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:38 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

Rajesh188's picture

5 Nov 2021 - 1:22 pm | Rajesh188

खूप छान लिहल आहे .तुमची निरीक्षण शक्ती खूप च उत्तम आहे.बारीकसारीक प्रसंग पण तुम्ही उभे करता.

सिनेमाचे रिळ प्रतेक theater मध्ये पोचवले जात.कधी इंटरव्ह्यू नंतर चा रीळ च पोचला नाही म्हणून त्या नंतर च सिनेमा च थिएटर मध्ये दाखवला जात नसे असे प्रसंग यायचे.
ह्या मधून फिल्म जगातला आपल्या मराठी ग्रेट व्यक्ती नी मुक्त केले त्यांचे नाव माझ्या अंदाजाने संजय गायकवाड असे आहे.
थिएटर मध्ये रीळ ऐवजी सिनेमाचे प्रक्षेपण करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले
बाकी देशमुख साहेब तुम्ही न्यायाधीश नसता झाला तर अतिशय उत्तम लेखक नक्कीच झाला असता.
न्यायदान सारख्या गंभीर,खूप जबाबदारी असणाऱ्या क्षेत्रात काम करून पण तुम्ही कला रसिक आहात.
दुर्मिळ गुण आहे.

नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:37 pm | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद. माझ्या लिखाणाला तुम्ही नेहमीच दाद देता. छान वाटते..
तसं नियमितषपणे लिहायला खूप उशीरा सुरुवात केली. बरंच काही लिहायचं डोक्यात आहे. बघूया जेवढं जमेल तेवढं.. कोर्टातले किस्से पण आहेत..

तुषार काळभोर's picture

5 Nov 2021 - 1:29 pm | तुषार काळभोर

आमच्या हडपसरात कित्येक दशके एकच थेटर होते. वैभव. वडील त्यांच्या शालेय वयापासून पिक्चर बघायला तिथे जायचे. राज कपूरचे फार्म हाऊस आमच्या गावी असल्याने त्याचे चित्रपट वडील न चुकता पाहायचे.
मी आई वडिलांसोबत (धाकटा असल्याने) बरेच पिक्चर तिथे पाहिले. मला आठवणार पहिला हमाल दे धमाल. नंतर २००० च्या आसपास ते बंद पडले. पुन्हा उघडले २००५ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर खबरदार चित्रपटाने. (त्यातला अण्णा चिंबोरी तंदूर चापत असतो, तो सीन पाहून पिक्चर संपल्यावर तसेच आम्ही 'रेड्डी' ला गेलो).
ब्लॅक मध्ये पाहिलेला एकमेव पिक्चर नीलायम मध्ये हृतिक रोशनचा अग्निपथ. सिंगल स्क्रीन मध्ये पुण्यात फारतर ५-६ पाहिले असतील. बाकी सगळे वैभवमध्ये. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुण्यात मल्टिप्लेक्स सुरू झाले. सिटी प्राइड ला पहिला धूम पाहून ७५cc ची स्कूटी घेऊन कान पिरगाळत घरी गेलो होतो. नंतर मगरपट्ट्यात सिनेपोलीस आणि अमानोरा मध्ये आयनॉक्स सुरू झाल्यावर वैभव शेवटच्या घटका मोजयाला लागलं. पहिल्या लॉक डाऊन मध्ये त्याने मान टाकली. आणि गेल्या मार्च मध्ये त्याने डोळे मिटले.
मार्च २०२१ च्या मुंबई सागा चं फाटकं पोश्टर अजून तिथं फडफडतंय.

नीलकंठ देशमुख's picture

5 Nov 2021 - 10:38 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

देशमुख साहेब, अतिशय मनोरंजक, नोस्टाल्जिक आणि खुसखुशीत लिखाण आहे तुमचे. 'साध्याही विषयात आशय मोठा आढळे' हे तुमच्या लेखनाचे वैशिष्ट्य या आणि कोर्टाबद्दलच्या लेखातून उत्कृष्टपणे व्यक्त होत आहे. "तेरी राहों मे खडे है दिल थाम के" हा उल्लेख वाचून मन एकदम त्या काळात पहुचले, शिवाय भालचंद्र नेमाडेंच्या बिढार-जरीला-झूल या अनेक पारायणे केलेल्या कादंबर्‍यातला मजेशीर प्रसंगही आठवला. (गेल्या वीस वर्षांत मात्र एकही पारायण झालेले नाही, आता परत केले पाहिजे)
माझे बालपण १९५० च्या दशकातल्या इंदौरमधे गेले. त्याकाळी तुम्ही लिहिल्यासारखीच परिस्थिती होती. मात्र थेटरे सात-आठ की अकरा की काहीतरी आणि जरा बरी होती. माझे दोन तीन मोठे भाऊ आणि काका इंग्रजी पिच्चर बघायला जायचे तेंव्हा मलाही न्यायचे (अर्थात मला फक्त मध्यंतरात मिळणार्‍या 'क्रीम रोल' ची आकर्षण असायचे, तेवढे झाले की मी 'घरी चला' चा धोशा लावायचो) अगदी पुढल्या बाकड्यांचे तिकीट 'दुवन्नी' असायचे, तिथे आम्ही बसायचो. आणखी मागे चवन्नी, अठन्नी वगैरे असायचे.
दळवी म्हणून माझा एक मित्र देवानंदचा आशिक होता. घरची परिस्थिती उत्तम असल्याने त्याने देवानंदचा प्रत्येक पिच्चर पन्नास-साठ वेळा बघितलेला असायचा आणि केंव्हाही रस्त्यात भेटला की तीन देविया, ज्वेल थीफ वगैरेंचे डायलॉग घडाघडा म्हणून दाखवायचा.
तुमच्या पोतडीत असलेल्या नानाविध अनुभवांचे तुमच्या मार्मिक शैलीतील चित्रण वाचण्याची उत्सुकता आहे.

नीलकंठ देशमुख's picture

6 Nov 2021 - 4:36 pm | नीलकंठ देशमुख

छान वाटले. तुमची प्रतिक्रिया वाचून. ये मुलगा हुरूप वाढतो

रंगीला रतन's picture

6 Nov 2021 - 1:27 pm | रंगीला रतन

झकास लेख.

नीलकंठ देशमुख's picture

6 Nov 2021 - 4:35 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

श्रीरंग_जोशी's picture

7 Nov 2021 - 10:30 pm | श्रीरंग_जोशी

३५-४० वर्षांपूर्वी निमशहरी भागांतले चित्रपट संबंधी वातावरण डोळ्यांपुढे हुबेहूब उभे करून जुन्या काळात नेणारा लेख खूप आवडला.

यावरून आठवलं: १५ वर्षांपूर्वी आम्ही हापिसातले सहकारी सहज म्हणून पुण्याच्या लिनाचिम (विजय) चित्रपटगृहात त्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार विजेता क्रॅश चित्रपट पाहायला गेलो होते. चित्रपटगृहात पाऊल ठेवल्याक्षणी थेट १९८०च्या दशकात गेल्यासारखे वाटले होते.

नीलकंठ देशमुख's picture

8 Nov 2021 - 8:04 am | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार

बबन ताम्बे's picture

7 Nov 2021 - 11:34 pm | बबन ताम्बे

तंतोतंत वर्णन!! तो काळ तुम्ही हुबेहूब डोळ्यासमोर आणलाय. आमच्या गावी एका मोठ्या पडलेल्या वाड्याच्या जागेचे थेटर केले होते. चारही बाजूंनी कम्पाउंड (त्याला और म्हणतात) आणि एंट्रीचा एकच दरवाजा.
बसायला वाळूची जमीन. एक रुपया तिकीट. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे गाड्यावर दोन पोस्टर एकमेकाला खेटून तिरकी उभी केली जात आणि ताशाच्या गजरात गावभर पिक्चरची जाहिरात करत. जाहिरात करणारा एक पत्र्याचे भोंगे तोंडाला लावी आणि कुर्र ऐका आणि लक्षात ठेवा, आज रात्री ठीक साडे नऊ वाजता.. अशी मोठ्या आवाजात सुरवात करून पिक्चरचे नाव, कलाकार वगैरे अनाऊन्स करत असे. त्यावेळी थांब लक्ष्मी कुंकू लाविते, वारणेचा वाघ वगैरे प्रचंड लोकप्रिय चित्रपट होते. हे चित्रपट लागले की गावातल्या आणि आजूबाजूच्या वाडीतल्या लोकांची, महिला वर्गाची तुडुंब गर्दी व्हायची. खूप आनन्ददायी काळ होता तो. आम्ही लहान पोरे सूर्यकांत, चंद्रकांत , निळू फुले यांचे चित्रपट असले की आवर्जून पिक्चर पहायचो.
आपण खूप छान लिहिलेय.

नीलकंठ देशमुख's picture

8 Nov 2021 - 8:08 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. उतारवयात जुन्या आठवणी आधार देतात. तेवढाच विरंगुळा मिळतो. माझे लिखाणामुळे आपल्याही आठवणी जाग्या झाल्या. तो काळ क्षणिक का होईना,पुन्हा अनुभवायला मिळाला हे वाचून छान वाटले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Nov 2021 - 9:21 am | ज्ञानोबाचे पैजार

काही आठवणी तर अगदी तंतोतंत जुळतात.

पुण्यात सोनमर्ग थेटर मधे सगळे जुने सिनेमे लागायचे. मी आणि माझ्या भावाने तिथे मुक्कद्दर का सिकंदर, डॉन, पडोसन असे अनेक सिनेमे पाहिले होते.

तिकीट काढतानाच विचारुन घ्यायचो या नंतर कोणता सिनेमा लावणार आहे ते.

तिकडे सिनेमा पहायला येणारी लोकं सुध्द्दा दर्दी होती. म्हणजे ते कोणी उच्चभ्रु रसिक नसायचे तर सिनेमावर मनापासुन प्रेम करणारी सामान्य जनता असायची. त्यातल्या प्रत्येकाने तो सिनेमा आधी बर्‍याच वेळा पाहिलेला असायचा इतका की "पडोसन" मधले मेरे सामने वाली खिडकी पे हे गाणे सुरु असताना मागून कॉमेंट यायची "अरे तो केश्टो बघ कसला दिसतो आहे" असल्या डिटेलिंग मुळे सिनेमातली बारीक सारीक गोष्टही एनजॉय करता यायची.

तुमची गोष्ट रंगवून सांगण्याची हातोटी फारच वाखाणण्यासारखी आहे. या लेखा बद्दल विशेष धन्यवाद

पैजारबुवा,

नीलकंठ देशमुख's picture

8 Nov 2021 - 12:40 pm | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद. आपण लिहिलेलं वाचकांना आवडतयं हे कळल्यावर छान वाटते.हुरूप येतो. धन्यवाद. कळवल्याबद्दल!

नीलकंठ देशमुख's picture

8 Nov 2021 - 12:41 pm | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद. आपण लिहिलेलं वाचकांना आवडतयं हे कळल्यावर छान वाटते.हुरूप येतो. धन्यवाद. कळवल्याबद्दल!

श्वेता व्यास's picture

15 Nov 2021 - 12:14 pm | श्वेता व्यास

छान आठवणी आहेत. निमशहरी भागातला अनुभव नाही, पण आतापर्यंत मोजून १०-१५ चित्रपट थेटरात जाऊन बघितले असतील, आता तर बॉलिवूडवाल्यांची थेरं बघून तीसुद्धा इच्छा राहिली नाही.

नीलकंठ देशमुख's picture

15 Nov 2021 - 2:37 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

17 Nov 2021 - 6:28 am | सुधीर कांदळकर

माहीमला श्री नावाचे एक सिनेगृह आहे. तेव्हाच्या आमच्या घरापासून दोनेक किमीवर. मूळच्या अलीशान घराला सिनेगृहाचे रूप दिलेले. तिथे चांगले इंग्रजी सिनेमे लगत. अर्थार्जन सुरू झाल्यावर माझा एक मित्र रात्री स्कूटर घेऊन येई. पण इंग्रजी सिनेमे लागत असले तरी यंत्रचालकाला मात्र इंग्रजी येत नव्हते. त्यामुळे सिनेमाचा अगोदरचा भाग नंतर असे प्रकार होत. एकदा एका दे मार मारधाड सिनेमातला एक गुन्हेगार सुरुवातीला तुरुंगात होता. नंतर तो गुन्हे करतांना दिसला. एकदा तर जेरी लुईस - टोनी कर्टीस जोडगोळीचा बोईंग बोईंग हा विनोदी चित्रपट पाहायला गेलो. पण चॅस्टीटी बेल्ट नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर सुरू झाला तो संपेपर्यंत दोन तास उलटले आणि खेळ सुटला. नंतर कळले की तिथे शुक्रवार ऐवजी गुरुवारीच सिनेमा बदले.

छान लेख, धन्यवाद.

नीलकंठ देशमुख's picture

17 Nov 2021 - 9:05 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.लेख वाचून तुमच्याही आठवणी जाग्या झाल्या.अनेकदा स्मृतींना उजाळा मिळणे आवश्यक असते असे मला वाटते.

आमच्या वेळेस अनेक संसार या काळ्याबाजाराच्या पैश्यावर पोसले गेले आहेत. त्या काळच्या अनेक सिनेमांमधेही हीरो/हीरोइन तिकीटांचा काळाबाजार करणारी आसायची. ाणि प्रेक्षकांना तेही आवडायचे.
त्याकाळात शहरी भागात सिनेमाला जाणे हा एक सोहळा असायचा. नटुन थटुन सिनेमाला जाणे एक शोक असायचा. नंतर ’दोघेच’ असतील तर कुठेतरी आइस्क्रीम/कोफ़ी वगैरे पिणे हा रोमान्सचा एक भाग असायचा.
गेले ते दिन गेले. पण तो जो आनंद होता तो आताच्या काळात कितीही मोठ्या थेटरात तीनशे रुपयांचे तिकीट काढुन आणी मध्यंतरात वीस रुपयांचा वडा दीडशे रुपयांना खाउनही मिळत नाही.

नीलकंठ देशमुख's picture

17 Nov 2021 - 10:06 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अभिजीत अवलिया's picture

19 Nov 2021 - 6:43 am | अभिजीत अवलिया

छान लेख. आवडला.

नीलकंठ देशमुख's picture

19 Nov 2021 - 10:49 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसाद वाचून छान वाटले