हंपी एक अनुभव - भाग २

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in भटकंती
7 Aug 2021 - 8:13 pm

हंपी तुंगभद्रा नदी किनारी वसलेलं एक गाव आहे. खरं सांगू.... हंपीचा उल्लेख गाव म्हणून करताना माझं मन तुटतं आहे. चाळीस ते पन्नास किलोमीटर परिसरात उभे असलेले महाल, मोठमोठी मंदिरे, स्थापत्याचा अद्भुत नमुना म्हणावा अशा दगडी कमानी, स्नानकुंडे, जिकडे नजर फिरवाल तिथे असंख्य टेकड्यांमधून दिसणारे छोटे छोटे मंडप, मंदिरांच्या बाहेर असणाऱ्या एक मजली-दुमजली बाजारपेठा.... इतकं समृद्ध स्थापत्य असलेला भाग हा गाव कसं असेल? पण आपलं दुर्दैव की आता हे फक्त भग्नावस्थेतले ऐतिहासिक स्त्यापत्य सौंदर्य आहे. मात्र प्रत्येकवेळी मनात एकच विचार येतो.... हा आपल्या भारतवर्षातील सुवर्णकाळाचा भव्यदिव्य साक्षात्कार आहे.

इ. स. 1336 ते 1565 मधील विजयनगर म्हणजे बलाढ्य हिंदू साम्राज्य जे महाराज कृष्णदेवराय यांनी सुवर्ण कळसाला पोहोचवलं. मात्र हंपीचा इतिहास हा त्याहूनही मागचा आहे. अगदी त्रेतायुगातील रामायण काळातला. इथे मला एक थोडा वेगळा मुद्दा अधोरेखित करायचा आहे.

माझा विश्वास आहे की आपण श्री भागवत रामायण ज्याला पौराणिक कथा मानतो आणि त्यामध्ये वर्णन केलेल्या व्यक्तिमत्वांना देव किंवा दानव या दोन श्रेणींमध्ये विभागतो ते चूक आहे. रामायण काही पौराणिक कथा नाही.... तो आपला गौरवशाली इतिहास आहे. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे या सत्याला दुजोरा देणारी. अगदी अलीकडंच उदाहरणच सांगायचं तर श्रीराम जन्मभूमी येथील श्रीरामजन्म स्थळ हे खरेच असल्याचे पुरावे आदरणीय कोर्टाने देखील मान्य केले आहेत. त्याचप्रमाणे श्रीलंका आणि भारत यामधील रामायण काळात बांधल्या गेलेल्या पुलाचे काही भग्न अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे..... हंपीचा इतिहास हा कृष्णदेवराय यांच्याहूनही मागील काळातला म्हणजे अगदी रामायण काळातला आहे.... हे सत्य आहे.

रामायणातील उल्लेखा प्रमाणे वानरराज सुग्रीव यांची नगरी होती किष्किंधा. जी तुंगभद्रा (त्रेतायुगात या नदीचे नाव पंपा नदी होते) नदीच्या जवळ वसलेली होती. रामायण काळातील ऋष्यमूक पर्वताचा उल्लेख श्रीराम आणि लक्ष्मणाने राहण्यासाठी वापरलेला पर्वत असा आहे. तो पर्वत देखील किष्किंधे जवळ असल्याचा आहे आणि विजयनगर साम्राज्याचा मानबिंदू असलेल्या विरुपाक्ष मंदिराच्या जवळच एक पर्वत होता ज्याचा उल्लेख ऋष्यमूक म्हणूनच केलेला लिखित स्वरूपात आढळतो. त्रेता युगातील पंपा नगरी म्हणून ओळखली ही नगरी पुढे आपभ्रंशीत होऊन हंपी म्हणून ओळखली जायला लागली; अशी देखील मान्यता आहे. तर असं हे आजचं हंपी गाव आणि आपल्या सुवर्ण काळातील एक सर्वांग श्रीमंत शहर पाहण्यासाठी मी निघाले होते.

आपण सुरवात वरती उल्लेख केलेल्या विरुपाक्ष मंदिरापासूनच करूया.

विरुपाक्ष मंदिर हे श्रीमहादेवाचे मंदिर आहे. येथील रहिवासी विरुपाक्ष महादेवांना पांपापति या नावाने देखील उल्लेखताट. या देवालयाच्या स्थापत्य सौंदर्याबद्दल वर्णन करायला मला शब्द कमी पडतील आणि तुम्हाला कधी गेलात तर बघायला वेळ कमी पडेल... इतकं हे देवालय अप्रतिम सुंदर आणि अत्यंत कल्पकतेने वातावरणातील नैसर्गिक बदल आणि त्याचा होणारा स्त्यापत्यावरील परिणाम याचा विचार करून बनवलेले आहे. विरपाक्ष मंदिराच्या दरवाजावरील नक्षीकाम अजोड आहे. आजच्या काळातील कलाकारांचा पूर्ण मान राखत मी म्हणेन की अनेकविध आयुधं उपलब्ध असूनही त्यांना इतकं सुंदर नक्षीकाम जमणार नाही. मंदिराच्या बाहेर प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. आज जरी ती भग्नावस्थेत असली तरी ते स्थापत्य कृष्णदेवराय महाराजांच्या काळातील वैभव आजही मिरवताना दिसते.

माझ्या गाईडने मला सांगितले की हंपीच्या इतिहासामध्ये या मंदिराचा वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धाराचा उल्लेख आहे. मात्र हे मंदिर नक्की कधी आणि कोणी बांधले याचा ठोस पुरावा नाही. एक अत्यंत महत्वाची बाब ही की भारतावर अनेक आक्रमणे झाली. या प्रत्येक आक्रमणामध्ये हिंदू मंदिरांचे अतोनात नुकसान करण्यात आले. भग्न मूर्ती, अत्यंत विचारपुर्वक बांधलेले स्थापत्य लयाला गेले. मात्र विरुपाक्ष मंदिराला कधीच हात लागला नाही. त्यामुळे येथील लोकांमध्ये एक मान्यता ही देखील आहे की आपल्या ऐतिहासिक रामायण काळात या जागेवर एक मंदिर उभे राहावे यासाठी काही यज्ञ किंवा बंधन निर्माण केले गेले असेल. मला माझ्या गाईडने अजून एक कारण सांगितले... अर्थात हे कारण स्वीकारणे प्रत्येकाच्या मानसिकतेवर आहे. त्याच्या सांगण्याप्रमाणे; मुसलमान मूर्ती पूजेच्या विरोधात आहेत आणि विरुपाक्ष मंदिरात शिव पिंडी आहे... मूलतः हिंदू देव हे मानवीय शरीराप्रमाणे असल्याने इतर मंदिरे भग्न पावली. पण शिवाला मानवीय रूप नसल्याने हे मंदिर वाचले. आठव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत हे मुख्य विजयनगरचे केंद्रस्थान होते. राज्याचा विध्वंस झाला पण हे मंदिर तसेच राहिले. हे पंपातिर्थ स्वामीस्थल म्हणून देखील ओळखतात. पूर्वेकडील गोपुर एकशे पाच फूट म्हणजे जवळ जवळ दहा मजले उंच आहे. मध्ये मोठे प्रांगण असून त्यात अनेक गोपुरे आहेत. संपूर्ण मंदिराभोवती राम, कृष्ण, विष्णू, शिव या अवतारांच्या कथा शिल्प स्वरूपात कोरलेल्या आहेत. प्रत्येक कथा परिपूर्ण आहे. या शिल्प कथा बघताना मला असं वाटलं की राम, कृष्ण, विष्णू आणि शिव यांच्या आयुष्यातील विविध प्राण्यांसंदर्भातील कथा या विशेष करून इथे शिल्पित केल्या आहेत. (अर्थात हे माझं मत झालं.) मंदिराच्या बाजूने खळखळा वाहणारी तुंगभद्रा नदी आहे आणि नदीकडे उतरणारे अनेक घाट देखील आहेत. या ह नदीचे पाणी दगडी पन्हाळींमधून मंदिराच्या प्रांगणात खेळवले आहे आई वरून या पन्हाळीं दगडांनी बंदिस्त केलेल्या आहेत. स्वच्छ आणि शुद्ध पाणी सहज उपलब्ध होण्यासाठी आवश्यक अशी उत्तम सोय आहे इथे. मंदिर अति प्राचीन आहे यात शंकाच नाही. मात्र कृष्णदेवरायाने आपल्या पट्टाभिषेकाच्या स्मरणार्थ या देवळाचा रंगमंडप बनवला आहे.

विरुपाक्ष मंदिरासंदर्भात अजून एक कथा प्रचलित आहे. दक्ष यज्ञामधील सती देवींच्या दहना नंतर भगवान शंकर कैलास सोडून हेमकूट पर्वताच्या पायथ्याशी येऊन राहिले. तिथे पंपा देवी (पार्वती) भगवान शंकराची प्रेमभावनेने सेवा करीत होती. मात्र उग्र तापश्चर्येत मग्न श्रीशंकरांचे मन विचलित होत नव्हते. त्याचवेळी राक्षसांच्या सततच्या आक्रमाणांमुळे इंद्रादि देव त्रस्त झाले होते. त्यावेळी ब्राम्हदेवांनी दूरदृष्टीने जाणले की राक्षसांचा संहार केवळ शिवकुमारच करू शकतो. मात्र तपस्येत लीन श्रीशंकरांना जागे करणे अशक्य होते. त्यामुळे मन्मथाला पाचारण करण्यात आले. पंपादेवी श्रीशंकरची पूजा करण्यास नेहेमीप्रमाणे आली असता मन्मथाने पुष्पतीर सोडून श्रीशंकरांची तपस्या भंग केली. क्रोधीत श्रीशंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून मन्मथाला भस्म केले. मात्र त्यानंतर त्यांचे लक्ष देवी पंपा (पार्वती) कडे गेले आणि यथावकाश शिवकुमार (कुमार स्वामी) यांचा जन्म झाला आणि त्यांनी राक्षसांचा संहार केला. मात्र मन्मथ पत्नी मन्मथाच्या मृत्यूने शोकाकुल झाली आणि जीव देण्यास निघाली. त्यावेळी तिला पंपादेवींनी थांबवले आणि श्रीशंकरांना संकडे घातले. त्यावेळी श्रीशंकरांनी मन्मथाला उ:शाप दिला. मात्र त्याला त्यानंतरचे जीवन बिना रूपाचे व्यतीत करावे लागले. बिनारूपाचा उ:शाप दिल्याने श्रीशंकरांना विरुपाक्ष हे नामाभिधान पडले आणि त्याचवेळी पंपादेवींचे पति म्हणून पंपापती देखील म्हंटले जाते.

















विरुपाक्ष मंदिर बघून मी पुढे निघाले. कोदंडधारी रामाचे मंदिर देखील असेच निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी असल्याचे मी वाचले होते. त्यामुळे ते बघण्याची मला खूप उत्सुकता होती. (थोडं विषयांतर होईल खरं पण... 'कोदंडधारी राम' हा उल्लेख झाला आणि पु. ल. देशपांडेंची सहकुटुंब सहपरिवार पार्ले भेट आठवते नाही.) त्यावेळी तुंगभद्रा नदीच्या तिरावरून लहान-मोठे चढ उतार पार करून पुढे जात होते. शेजारून वाहणारी भद्रा नदी मला प्रेमाने खुणावत होती. 'मंदिर बघशीलच ग.... थोडं माझ्याजवळ येऊन बस् तरी.' असं तर सुचवत नव्हती न ती? शेवटी मोह न आवरून तिचं आग्रहाचं आमंत्रण स्वीकारत मी तिच्याशी हितगुज करत बसले होते. तो शांत परिसर आणि तिचं ते खळाळत वाहाणं... निसर्गाच्या ओंजळीत हरवल्यासारखं वाटत होतं मला. बराचवेळ असंच रमल्या नंतर रामदर्शन घेण्यासाठी मी निघाले. अप्रतिम सुंदर राम, लक्ष्मण आणि सीतेची काळ्या दगडातील किमान दहा फुटी मूर्ती मन प्रसन्न करत होत्या. रामाच्या हातातील कोदंड (धनुष्य) सुंदर बांक असलेलं होतं. पूजा करणाऱ्या गुरुजींशी सहज गप्पा मारायला लागले आणि आश्चर्य म्हणजे मी महाराष्ट्रातुन आले आहे आणि मराठी आहे हे कळल्यावर ते उत्तम मराठी बोलायला लागले. अनेक वर्ष मुंबईमध्ये ते नोकरी करत होते. पण मूळचे हंपी सारख्या निसर्गरम्य ठिकाणचे असल्याने त्यांचे मन मुंबईमध्ये रमले नाही आणि काही वर्षातच परत हंपीमध्ये येऊन ते पूर्वापार चालत आलेल्या कोदंडधारी रामाच्या सेवेत रुजू झाले; असे म्हणाले.
१०

कोदंडधारी राममंदिर बघून पुढे निघाले ते विठ्ठल मंदिर बघण्यासाठी. कदाचित माझा हा लेख वाचायला सुरवात करतानाच तुम्ही या मंदिराचे वर्णन अपेक्षित केले असेल. कारण हंपी म्हंटलं की कोणार्कच्या सुर्यमंदिराच्या धर्तीवर भव्य कोरीवकाम केलेल्या जगप्रसिद्ध दगडी रथाचे फोटो आणि वर्णन सर्वात प्रथम अपेक्षित असते. विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे राजा कृष्णदेवरयांनी स्वतःच्या दिग्विजया प्रित्यर्थ हे मंदिर बनवले आहे. असंख्य कोनांनी नटवलेला मुख्य चौथरा हा अजस्त्र कोरीव शिलांनी बनवलेला आहे. आता या चौथऱ्यावर जाण्यास परवानगी नाही. मात्र माझ्या गाईडने दिलेल्या माहिती प्रमाणे या चौथऱ्यावरील जे स्तंभ आहेत ते अत्यंत मजबूत आणि दगडांचे असले तरी त्यातून ह्रिदम निर्माण होते. म्हणजे जर एका ठराविक पद्धतीने या खांबांवरून आपण बोटं फिरवली तर नाद निर्माण होतो. पूर्वी मंदिरामध्ये ज्यावेळी मोठे मोठे समारंभ, विवाह, उत्सव होत असत त्यावेळी या स्तंभांचा उपयोग वाद्य म्हणून केला जाई. या स्तंभांवर प्राणी, पक्षी यांचे कोरीव काम आहे. तर मंदिराच्या भिंतींवर विविध देवतांची शिल्पे आहेत. मंदिरासमोरील जगप्रसिद्ध दगडी रथ म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटवणारे वास्तुशिल्प आहे. अनेक दगडीणी रचनात्मक रीतीने साधलेला आणि अप्रतिम कोरीव नक्षकाम केलेला, दगडी चाके असणारा आणि पुढील बाजूस दोन दगडी हत्ती असणारा हा रथ एकेकाळी चालवत असत. या रथाच्या मध्यभागी दगडी सोपान आहे आणि चाकांमध्ये आरीचा दांडा आहे. या रथाचे विशेष म्हणजे रथावरील सैनिकांचे शिल्प आहेत त्याचे चेहेरे अरब, पर्शियन किंवा पौर्तुगीज लोकांशी मिळते-जुळते आहेत.

माझ्या गाईडने सांगितले की तुम्ही जर प्रत्येक मंदिर किंवा राजाच्या राजवाडा आणि त्याच्या आजूबाजूचे स्थापत्य बघितलेत तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे विविध चेहेरे दिसतील. त्याच्या म्हणण्यानुसार विजयनगर भारतवर्षातील सर्वात श्रीमंत शहर होते. राजा कृष्णदेवराय अत्यंत कलासक्त आणि आगत्यशील होता. त्यामुळे दूरदूर देशातील (किंबहुना असं म्हणू की सर्वदूर पसरलेल्या भारतवर्षातील) लोक आपल्या वस्तू, कला-कौशल्य घेऊन राजाश्रयाच्या आशेने इथे येत असत; आणि त्यांची ही आशा राजा कृष्णदेवराय पूर्ण करत असे.

कदाचित असं देखील असेल की महाराज कृष्णदेवराय यांच्या कलाप्रेमाविषयी समजल्यानंतर अनेक कलाप्रेमी विद्यार्थी शिल्पकला शिकण्यासाठी विजयनगरीमध्ये दाखल झाले असतील; आणि शिक्षणादरम्यान शिल्पकलेतील कथा तर रामायण, महाभारतातील घेतल्या असतील आणि स्वतःची ओळख सांगण्यासाठी (special signature establishment) चेहेरे मात्र आपल्या देशातील जडणघडणी प्रमाणे निर्माण केले असतील.

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१
हंपी मधील हमखास बघावे अशी एक खास गणपतीची मूर्ती आहे. कडलेकलू या नावाने ओळखली जाणारी ही गणेश मूर्ती एका उंच गर्भगृहात स्थापित असुन ती अखंड कातळात कोरलेली आहे. गर्भागृहासमोर रंगमंडप असून तो उंच स्थभांनी तोललेला आहे.

२२

२३

पुढील शिल्प म्हणजे बडवी शिवलिंग. अखंड काळ्या पाषाणात कोरलेले एक भव्य शिवलिंग आहे हे. याचे गर्भगृह अत्यंत साधे असून याला वर छत देखील नाही. शिवलिंगाचा तळ सतत पाण्यात असतो.

२४

२५

लक्ष्मी नरसिंव्ह ही 6.7 मित्र उंच सर्वात भव्य मूर्ती असावी हंपीमधील. या मूर्तीची निर्मिती एका ब्राम्हणाद्वारे केली गेली असे मानले जाते. मात्र आर्य कृष्णभट्ट यांच्या शुभहस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असे मानले जाते. या मूर्तीचे विशेष म्हणजे नरसिंव्ह मूर्ती असूनही त्यांच्या उजव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली असल्याचे शिल्प होते. मात्र ही लक्ष्मी मूर्ती खंडित झाली आहे. आता केवळ लक्ष्मीचा डावा हात उरला आहे जो अत्यंत मनोहरपणे भगवान नरसिंव्हांच्या कमरेला धरलेला आहे.

२६

२७

यापुढच्या हंपी वर्णनाच्या अगोदर थोडा श्वास घेऊया का? मला माहीत आहे; तुम्हाला वाटतंय की ज्याप्रमाणे मी एकामागून एक वर्णन करत सुटले आहे त्यावरून संपूर्ण हंपी मी एका दमात आणि एका दिवसात बघितलं आहे. पण तसं नाही हं. निसर्गात आणि अप्रतिम शिल्पकला आणि स्त्यापत्य कला यात रमत मी एकूण पाच दिवस फिरले हंपीमध्ये. तसं तीन दिवस पुरेसे असतात. पण मला सगळंच मनापासून बघायचं आणि त्याहूनही जास्त अनुभवायचं होतं. त्यामुळे मी मुद्दाम दोन दिवस जास्त राहिले. अर्थात प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे दिवस ठरवावेत असं मला वाटतं. या हंपी वर्णनातला एक खास वेगळा अनुभव आहे. पण तो वर्णन करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष पाहिलात तर जास्त मजा येईल.

महानवमी डिब्बा ही एक विशाल पाषाणाची वेदी आहे. हिचा आकार चौकोनी असून तळ प्रचंड मोठा असून हळूहळू तो लहान होत जातो. राजा कृष्णदेवराय यांच्या ओरिसा विजयाच्या स्मरणार्थ ही वेदी उभारली गेली होती. या वेदीच्या चारही बाजुंनी शिल्पपट कोरलेले आहेत. यामध्ये स्त्रिया शिकार करताना, युद्धकला शिकत आहेत अशी शिल्प देखील आहेत. याचा अर्थ असा होतो की महाराज केवळ कलासक्त, हुशार, उत्तम स्त्यापत्यकार नव्हते; तर स्त्रीसन्मान कसा केला जावा आणि त्यासाठी स्त्रियांना देखील बरोबरीची वागणूक मिळावी हा विचार त्यांच्या राज्यात केला जात होता असे दिसते. या शिल्पांमध्ये होळीचे, पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंग शिल्पित केले आहे. एकेठिकाणी डोक्यावर पर्शियन टोपी घातलेली आणि लहान दाढी असलेली व्यक्ती शिल्पित आहे. या व्यक्तीला हत्ती नमस्कार करतो आहे असे शिल्पित आहे. कदाचित त्याकाळात महाराज कृष्णदेवराय यांना दूरदूरहुन इतर राजे देखील भेटायला येत असतील आणि त्यांचा यथोचित सत्कार केला जात असेल. याच प्रसंगाला शिल्पित केले गेले असेल.

२८

२९

३०

३१

३२

स्थापत्य सौंदर्याने नटलेल्या हंपीमधील काळ्या दगडाची पुष्कर्णी अत्यंत खास आहे. अलीकडे लग्नाच्या अगोदर मुलगा-मुलगी विविध ठिकाणी जाऊन सुंदर फोटो काढतात. ज्याच्या-त्याच्या हौसे प्रमाणे आणि आर्थिक सोयीनुसार ही ठिकाणं ठरतात. या prewedding shoots मधील अगदी खास ठिकाण म्हणजे ही पुष्कर्णी. काळ्या पाषाणात बनवलेली पायऱ्या-पायऱ्यांची स्थापत्य रचना आहे हिची. अनेक वर्षे मातीच्या टेकडीखाली दबली गेलेली ही पुष्कर्णी अप्रतिम सुंदर आहे. पूर्व काळापासून एका दगडी पन्हाळीतून या पुष्कर्णी मध्ये पाणी खेळवले गेले आहे. माझा गाईड संगत होता की ही पुष्कर्णी शोधताना जे कामगार होते त्यात तो देखील होता... अर्थात त्यावेळी तो खूपच लहान होता. मात्र नाजूक ब्रश आणि जमिनीवर जवळ-जवळ सरपटत जाऊन एक एक भाग मोकळा करावा लगत असे. प्रत्येक फुट स्वच्छ केल्यानंतर तिथे असणाऱ्या वास्तू संशोधकांपैकी कोणाला तरी बोलावून झालेले काम दाखवावे लागायचे. तो बोलत असताना त्याच्या डोळ्यातील भाव सांगत होते की तो परत एकदा लहान होऊन सरपटत ती पुष्कर्णी शोधत होता.

या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक मंदिर आहे. या पुष्कर्णीची कथा अशी आहे की राज घराण्यातील स्त्रियांनी या पुष्कर्णीमध्ये पाय धुवून मगच या मंदिरातील देवीच्या दर्शनाला रोज जाणे अपेक्षित होते.

३३

३४

महानवमी डिब्बा, पुष्कर्णी यानंतर राज परिवारातील स्त्रियांसाठी बनवलेला कमल महाल ही देखील एक सौंदर्यपूर्ण कलाकृती आहे. लोटस महाल असा याचा उल्लेख अलीकडे केला जातो. या स्थापत्यामध्ये मुसलमानी शैलीचा काहीसा भास होतो. या तीन मजली इमारतीमध्ये जाण्यासाठी आतल्या बाजूस जिने आहेत. पण आता ते बंद करून टाकले आहेत. कड उन्हात देखील या महालात थंड हवा खेळती असते. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे ही थंड हवा खेळती राहण्यासाठी हवेच्या दाबावर पाणी या महालाच्या सर्वात वरील टोकापर्यंत पोहोचवण्याची सोय केली आहे. हे पाणी वरून महालाच्या चोहीकडून कारंज्याप्रमाणे खाली येते. त्यामूळे भर उन्हाळ्यात देखील पाऊस पडत असल्याप्रमाणे हा महाल पाण्यात भिजत असतो. कौतुकास्पद स्थापत्य हे की खाली पडणारे पाणीचं नाल्यामधून एका बाजूस एकत्र करून परत वर चढवले जाते. खरंच मानत येतं त्या काळातील भारतीय स्थापत्यकार आजच्या मानाने कितीतरी पुढचा विचार करणारे होते.

३५

३६

क्रमशः

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

7 Aug 2021 - 8:32 pm | टर्मीनेटर

वाह मस्तच!

निसर्गात आणि अप्रतिम शिल्पकला आणि स्त्यापत्य कला यात रमत मी एकूण पाच दिवस फिरले हंपीमध्ये.

मग मी दहा दिवसांसाठी जाणार 😀

पुढचा भाग लवकर येउदे!

कंजूस's picture

7 Aug 2021 - 9:45 pm | कंजूस

हम्पी परिसर खरोखरच 'करण्याचा' नाही, रेंगाळण्याचा आहे.

फोटोंना क्रमांक हवे आहेत. गुजरातमधल्या मेहसाणाजवळच्या मोढेरा सूर्यमंदिर आणि पाटण इथल्या 'रानी की वाव' यांचेही फोटो चांगले आलेत.

ज्योति अळवणी's picture

8 Aug 2021 - 12:11 am | ज्योति अळवणी

सगळे फोटो मी स्वतः काढलेले आहेत हंपी मधलेच आहेत

प्रचेतस's picture

8 Aug 2021 - 9:23 am | प्रचेतस

नाही हो, त्यात मोढेरा सूर्यमंदिर आणि राणी की वावचे काही फोटो चुकून आलेत.

कंजूस's picture

8 Aug 2021 - 10:04 am | कंजूस

असतील तर आणि त्याचे Rename केले नसेल तर टाइमस्टँपवरूत तारीख कळेल. किंवा metadata viewer app फोटोची सर्व माहिती देतात. अगदी लोकेशन longitude latitude असते. त्यावरून कळेल. दोन ठिकाणचे लोकेशन्स खूप वेगळे आहेत. गुजरात ट्रिप केली आहे का?

दुसरी एक शक्यता म्हणजे blogger वर blog लिहितांना आणि फोटो अपलोड करताना from computer/ google photos/ url/ sites या पर्यायात चुकून दुसरे फोटो चढवले जातात.

फोटो तुम्हीच काढलेत याबद्दल संशय नाही .

आणखी एक गोष्ट म्हणजे blog वरच्या फोटोची लिंक घेऊन शेअर करणे फारच सोपे असले तरी त्यांचे रेझलुशन २५ -५० kB म्हणजे फारच केविलवाणे असते. Imgur वापरा.

फोटोची रिअल साइज 3-8 MB असेल तर अगोदर साधारणपणे 250kB - 500kB करून Imgur वर upload /publish करून लिंक घ्या.

ज्योति अळवणी's picture

8 Aug 2021 - 11:19 am | ज्योति अळवणी

बरोबर आहे
मोबाईल मधल्या डिसेंबर २०२० च्या फोटोंमध्ये सरमिसळ झाल्याने लेखात ५ फोटो गुजराथ मधले आले होते. रात्री तपासले तेव्हा लक्षात नाही आले पण आता नक्की काय गोंधळ झाला ते समजले. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार. आता फोटोंना क्रमांक दिले आहेत.

कंजूस's picture

8 Aug 2021 - 11:26 am | कंजूस

लेखमाला चालू ठेवा.
---------------

कंजूस's picture

8 Aug 2021 - 10:11 am | कंजूस

या लेखातले ( https://www.misalpav.com/node/43380 ) फोटो पाहा.

प्रचेतस's picture

8 Aug 2021 - 9:21 am | प्रचेतस

छान लिहिलंय. हंपी हा एक समृद्ध अनुभव आहे.

ज्योति अळवणी's picture

8 Aug 2021 - 11:28 am | ज्योति अळवणी

टर्मिनेटर, तु १० नाही १५ दिवसांसाठी जा :)
कंजूसजी आणि प्रचेतस प्रतिसादासाठी आणि फोटोंची चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आपले आभार.

प्रसाद_१९८२'s picture

8 Aug 2021 - 2:54 pm | प्रसाद_१९८२

आणि वर्णन.
पु.भा.प्र.

चौथा कोनाडा's picture

8 Aug 2021 - 5:16 pm | चौथा कोनाडा


व्वा, एक नंबर !


🗓

मोठे फोटो डकवल्यामुळे प्रत्यक्ष तिथेच आहोत असं वाटतं !
("मोठे फोटो"साठी विशेष धन्यवाद !)
सगळेच प्रचि क्लासिक आहेत !
क्र. ८ चे कोम्पोझिशन भन्नाट आहे !