मॅरेज सर्टीफिकेट

सरिता बांदेकर's picture
सरिता बांदेकर in जनातलं, मनातलं
7 Jan 2021 - 1:54 pm

मॅरेज सर्टीफिकेट

सौ सरिता सुभाष बांदेकर

आज समीरने घरी आल्या आल्या सांगितले ,” ऊद्या मी घरीच आहे.माझा डबा करू नकोस.”
राधा विचारात पडली , अरे हा बरा आहेना सकाळी तर म्हणत होता की वीकएंडला ॲाफिसला जावे लागेल आणि हे काय मध्येच??
“काय रे सगळं ठीक आहे ना समीर??”
“होय गं काही प्राब्लेम नाहीय हे घे तोंड गोड कर.”समीर म्हणाला
“अगं कंपनी मला २ वर्षांसाठी अमेरिकेला पाठवतेय . मला ऊद्या सगळी कागदपत्रं गोळा करायची आहेत. म्हणून ऊद्या घरीच राहून ते सगळं करणार.”
राधाचा मूडच गेला.
“दोन वर्ष???समीर तुला नाही वाटत का दोन वर्ष हा खूप मोठा पिरियड आहे. म्हणजे आपल्याला दोन वर्ष फॅमिलीचा विचार करता येणार नाही.”
“ अगं पण मी एकटा जाणार नाहीय. तुला पण नेणार आहे.कंपनी माझा फॅमिली व्हिसा व्हावा असं रेकंमेंडशन लेटर देणार आहे.व्हिसाची प्रोसीजर करायला सगळे पेपर जमवायचे आहेत. मग आपण फॅमिली व्हिसासाठी इंटरव्ह्यू द्यायचा.”
समीरचं सगळं बोलणं झाल्यावर राधा विचारात पडली.दोन वर्ष ??समीर बरोबर जायचं तर आपल्या करियरचं काय??
आता आपले पण कदाचित प्रमोशन होणार आहे त्याच्यावर पण पाणी सोडायचं???
पण समीर खूषीत होता काय काय करायला लागेल याची लिस्ट करत होता.
सकाळी समीरसाठी दुपारचे जेवण आणि स्वत:चा डबा करून ती ॲाफिसला गेली.समीरने फाईल कपाटातून बाहेर काढली सगळे पेपर चेक केले आणि तो देशपांडे सरांनी सांगितलेल्या एजंटकडे निघाला. देशपांडे सरांचे आणि एजंटचे बोलणे झाले होते त्यामुळे समीरला जास्त काही सांगावे लागले नाही.त्यांनी लगेच फार्म दिले आणि विचारले की “तुम्ही सिंगल आहात की फॅमिली व्हीसा काढायचा आहे ??”
समीर म्हणाला “अहो फॅमिली व्हिसा काढायचाय आणि फॅमिलीसाठी वर्क परमिट पण पाहिजे आहे.”
एजंट म्हणाला “बरं मग तुमच्या मिसेस् चे सर्व पेपर आणि मॅरेज सर्टीफिकीट लागेल.लिव्ह ईन् नाही चालणार कारण मग फॅमिली व्हिसा नाही काढता येणार त्याचे वेगळे प्रोसिजर आहे जरा गुंतागुतीचं असतं आणि मिळण्याचे चान्सेस् पण कमी असतात.”
“मॅरेज सर्टीफिकीट आहेना तुमच्याकडे??”
समीर “हो आहे ना मॅरेज सर्टीफिकीट नीट जपून ठेवले आहे.
सगळ्यांनी सांगितलं होतं नीट जपून ठेव, हरवलं तर डुप्लीकेट काढताना फार कटकटी असतात.त्यामुळे एकदम सुरक्षित राहील असं ठेवलं आहे.”
राधा घरी आली तेव्हा समीर खूषीत होता, त्याने राधाला मस्त चहा करून दिला आणि तिच्या समोर फॅार्म ठेवला.
“फॅार्म भरून ठेव राधा.मी सगळे कागदपत्र जमा करतो तू तेव्हढे फार्मचे बघ.आज जेवण बाहेरून आणलंय मी.आज तुला आराम , जेवण बनवायची कटकट नाही.”
राधा म्हणाली, “बरं मी फॅार्म भरून देते.पण माझ्या व्हिसाचं आपण नंतर बघितलं तर नाही का चालणार??”
“ नाही राधा तुझा व्हिसा पण आताच काढावा लागेल.तरच तुला पण वर्क परमिट मिळेल.”
“अरे पण समीर मी कशी येऊ तुझ्या बरोबर?मला कदाचित जानेवारीत प्रमोशन मिळेल.आणि तिकडे मला जॅाब नाही मिळाला तर घरी बसून रहावं लागेल.”
“अगं पण राधा,तुला पण तिकडे जॅाब मिळेल. मी एजंटला तसं सांगितलय की फॅमिली व्हिसा पाहिजे म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज् मिळतील आपल्याला. आणि मी तिकडे, तू इकडे असं डिस्टन्स मॅरिड लाईफ नकोय मला पण.तुला पण सहज मिळेल जॅाब असं मला बॅासनी सांगितलंय.आधी व्हिसा काढू ,व्हिसा आला की तू जॅाब शोधू शकतेस, जॅाब मिळाला की मग रिझाईन कर.”
तेव्हा कुठे राधाला लक्षात आलं की समीरने सगळा व्यवस्थित विचार केलेला दिसतोय.तरी ती थोडी साशंकच होती त्यामुळे तिने जाताना धाडकन दरवाजा आपटला.
समीरने सगळी कागदपत्र गोळा केली आणि तो पण निघाला.
एजंटने सगळी कागदपत्र बघितली आणि समीरला सांगितलं “यांत मॅरेज सर्टीफिकेट नाहीय साहेब.”
समीर म्हणाला , “आहे मॅरेज सर्टीफिकेट .मी देतो आणून ऊद्या, तुम्ही काम सूरू करा.”
यांवर एजंट समीरला म्हणाला, “साहेब मॅरेज सर्टीफिकेट नक्की आणून द्या.तुमच्या मिसेसचा पासपोर्ट मेडन् नांवावर आहे त्यामुळे प्रूफसाठी मॅरेज सर्टीफिकेट लागेलच.”
समीर घरी आल्या आल्या मॅरेज सर्टीफिकेट शोधायला लागला. सगळं घर शोधून झालं पण त्याला मॅरेज सर्टीफिकेट मिळाले नाही. मग त्याने स्वत:च्या आणि राधाच्या बाबांना फोन केला आणि मॅरेज सर्टीफिकेट आहे का ते शोधायला सांगितलं. अर्जंट आहे लवकर शोधा आणि रात्री पर्यंत सांगा असे दोघांना बजावायला तो विसरला नाही.
ऊद्या बॅंकेत ठेवलंय का ते बघायला पाहिजे असा विचार करत असतानाच राधाचा फोन आला. ती विचारत होती काम झालं का म्हणून.
समीर म्हणाला , “अगं तुझं लग्नाआधीचं नांव पासपोर्टवर आहे , त्यामुळे मॅरेज सर्टीफिकेट मॅंडेटरी आहे. घरात तर नाहीय तुला काही आठवतंय का???बॅंकेत ठेवलाय का??”
राधा म्हणाली, “अरे घरातच आहे. नेहमीप्रमाणे तुला सापडलं नसेल. नाही सापडलं तर तुझा एकट्याचाच काढ व्हिसा, माझा नंतर बघूया.असं पण माझं प्रमोशन ड्यू आहेच.”
संध्याकाळी राधा घरी आल्यावर तिने पण सर्टीफिकेट शोधलं पण सर्टीफिकेट नाहीच मिळालं.
दुसर्या दिवशी समीरने एजंटला फोन केला आणि सांगितलं की “मला सर्टीफिकेट मिळत नाहीय.मी ॲफिडेव्हीट देतो आणि फोटो लावून ॲफिडेव्हीट नोटरी करून घेऊया.”
यावर एजंट म्हणाला “नाही तसं चालणार नाही. तुम्ही डुप्लीकेट सर्टीफिकेट मिळतंय का बघा. तुमच्याकडे लग्नाची पत्रिका असेलच, त्यावर तारीख असेलच. शिवाय फोटो आणि ज्या भटजींनी लग्न लावले त्यांची सही असली की तुम्हाला डुप्लीकेट सर्टीफिकेट मिळेलच. “
समीर म्हणाला , “चालेल बघतो भटजींना भेटतो आणि सही घेतो. ॲाफिसमध्ये जाऊन पहिल्यांदा फॅार्म आणतो.”
समीरने लगेच बाबांना फोन लावून भटजींचा फोन नं. आणि पत्ता विचारला.
समीर रजिस्ट्रारच्या ॲाफिसमध्ये गेला आणि मॅरेज रजिस्ट्रेशन काऊंटरवर जाऊन डुप्लीकेट मॅरेज सर्टीफिकेट बद्दल विचारलं.इकडे त्याचा चांगलाच हिरेमोड झाला. क्लार्कने सांगितलं असं डुप्लीकेट सर्टीफिकेट नाही देऊ शकत.
आता काय करावं असा विचार करत असताना त्याला राकेश भेटला.
समीरने राकेशला सगळं रामायण सांगितलं तेव्हा राकेश म्हणाला “अरे ,हल्ली दुसर्यांदा लग्न करायची फॅशन आलीय. तू पण परत लग्न कर २०/२५ माणसं जमव आणि पार्टी कर. मग मॅरेज रजिस्टर कर म्हणजे तुला सर्टीफिकेट मिळेल. “
समीर एव्हढा खूष झाला कि त्याने राकेशला मिठीच मारली.
म्हणाला, “अरे असंच करतो. नाही तरी मित्रांना पार्टी द्यायची आहेच.तेव्हाच लग्न करतो २ ईन् १ होईल. थॅंक्स यार, एव्हढी मस्त आयडिया दिलीस.तू पण पार्टीला आलंच पाहिजे सहकुटुंब.”
राकेश म्हणाला “नक्की येईन, पार्टी कोण सोडणार?
तू तयारीला लाग.”
संध्याकाळी राधा आल्यावर समीर म्हणाला,”राधा आपण परत लग्न करतोय.”
“अरे,पण का? कशासाठी? “राधाने विचारले.
“अगं,मी आज डुप्लीकेट सर्टीफिकेट आणायला गेलो होतो. तेव्हा समजलं की असं डुप्लीकेट सर्टीफिकेट नाही मिळत.
तिथून बाहेर पडलो तर राकेश भेटला .त्याने आयडिया दिली की पार्टी दे आणि पार्टीत लग्न करून ते लग्न रजिस्टर कर. तुला काय नवीन साडी/ ड्रेस घ्यायचे असेल तर घेऊन टाक.”समीरने राधाला सांगितले.
“अरे समीर तुला वेड लागलंय. मला काही हे करण्यात इंटरेस्ट वाटत नाहीय, मिळेल सर्टीफिकेट आपण व्यवस्थित ठेवलंय हरवू नये किंवा खराब होऊ नये म्हणून. “
“अगं राधा मी तुला तेच सांगतोय कि ते इतके व्यवस्थित ठेवलंय ना की कामाच्या वेळेला मिळणारच नाही. “समीर म्हणाला.
पण त्याने जेव्हा तो फॅार्म भरायला घेतला तेव्हा चकरावूनच गेला.त्यात विचारलं होतं हा तुमचा पहिला विवाह आहे का??आणि दुसरा असेल तर तुम्ही विधूर आहात का घटस्फोटीत आहात??
आता याचं ऊत्तर काय लिहायचं?? आपण तर दुसर्यांदा विवाह करत आहोत.बरं दुसरा लिहीला तर घटस्फोट कुठे झालाय.
आता त्याने आता वकील गाठायचा ठरवलं
दुसर्या दिवशी वकिलाला सगळं सांगितल्यावर वकीलांनी सांगितलं कि “तुम्हाला परत लग्न करायचं असेल आणि ते रजिस्टर करायचं असेल तर तुम्हाला घटस्फोट घ्यावा लागेल, पण त्यासाठी तुमचं लग्न झालंय आणि आता तुम्हाला एकत्र रहायचं नाही म्हणून घटस्फोट घ्यायचा आहे हे कोर्टात सिद्ध करावं लागेल.
आणि तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर तुमचे कायदेशीर लग्न झालंय हे सिद्ध करावं लागेल. त्यासाठी मॅरेज सर्टीफिकेट लागेलच.जर पती पत्नी आहात हे सिद्ध करू शकत नाही तर कोर्ट तुम्हाला घटस्फोट कसा देणार??
म्हणजे तुम्ही पती पत्नी आहात आणि आता तुम्हाला वेगळं व्हायचंय हे सिद्ध करण्यासाठी त्तुमचं मॅरेज सर्टीफिकेट तर लागणारच.”
हे सगळं ऐकून समीरचं डोकं गरगरायला लागलं.
त्याने वकिलाला सांगितले सगळ्या फॅार्मलिटी पूर्ण करून येतो असं सांगितलं आणि तिकडून बाहेर पडला.
समीरचे पाय आता बागेकडे वळले, तिकडे बसून शांतपणे विचार करता येईल असे त्याला वाटले.
समीरने खूप विचार केल्यावर त्याला आता राधाचा संशय यायला, कदाचित तिला यायचे नाहीय म्हणून तिनेच सर्टीफिकेट कुठेतरी ठेवले असेल. राधाला आपली बातमी ऐकल्यानंतर अजिबात आनंद झाला नाहीय, नक्कीच तिने लपवून ठेवले असणार मॅरेज सर्टीफिकेट. खरं म्हणजे नवर्याच्या प्रगतीचा आनंदपेक्षा तिला स्वत:च्या प्रमोशनचीच चिंता होती. आता मी काय तिला न घेता जाऊ शकेन का??
तिच्या करीयर बद्दल मला पण आस्था आहेच. तिला जेव्हा जेव्हा कामासाठी जावं लागत होतं तर मीच तर तिला प्रोत्साहन देत होतो मग राधा माझ्याशी अशी का वागतेय??
समीरच्या डोक्यात काहूर उठलं होतं. विचार करून करून डोकं दुखायला लागलं होतं.
राधा घरी आली तेव्हा समीरने सगळी जेवणाची तयारी करून ठेवली होती.समीरने विचार केला होता कि पहिल्यांदा जेवण करूया मग राधाला विचारूया तिने असं का केलं.
जेवण झाल्यावर समीर राधाला म्हणाला “चल आता मस्करी खूप झाली ते मॅरेज सर्टीफिकेट कुठे ठेवलंयस ते सांग आता.”
राधा आधीच खूप दमली होती, ती समीरला म्हणाली “म्हणजे तुला असं वाटतंय की मी लपवलंय सर्टीफिकेट??
हाच का तुझा माझ्यवरचा विश्वास??”
समीर शांतपणे तिला म्हणाला “अगं तसं नाहीय पण तू जर ते ठेवले असशील तर दे आता. बस्स झाली मस्करी.
त्या सर्टीफिकेटशिवाय आपल्याला व्हिसाचे पेपर सबमिट् करता येणार नाहीयत.आणि मी डुप्लीकेट काढायचा पण प्रयत्न केला पण डुप्लीकेट सर्टीफिकेट मिळत नाही.
मी एकटा अमेरिकेला जाणार नाही म्हणजे जर सर्टीफिकेट नाही मिळालं तर माझ्या ऐवजी दुसरं कुणीतरी जाईल.
एव्हढा चांगला चान्स आहे दोघांना जायचा त्यात तुझं पण नुकसान होणार नाहीय, मग तू असा आडमुठेपणा का करतेयस??”
आता मात्र राधा चिडली तिने समीरला विचारले, “समीर तुला खरंच असं वाटतंय की मी मुद्दाम ते सर्टीफिकेट लपवून ठेवलंय??? ठीक आहे मग तू तसंच समज, मला अजिबात आनंद झालेला नाहीय.तुला काय करायचे ते कर मला या विषयावर आणखीन काहीच बोलायचं नाहीय. परत जर तू या विषयावर माझ्याशी बोललास तर मी माहेरी निघून जाईन कायमची. मग तू अमेरिकेला जा नाहीतर नको जाऊस. मला अजिबात इंटरेस्ट नाहीय.”
आणि राधा झोपायला निघून गेली.
सकाळी राधा समीरशी एक शब्द न बोलता ॲाफिसला निघून गेली.समीरची आता पक्की खात्री झाली कि नक्कीच राधाने काही तरी गडबड केली आहे म्हणून ती विषय टाळते आहे.
समीरने राघवला फोन करून पार्टी पोस्टपोन झाल्याचं सांगितलं.राघव म्हणाला ,” का काय झालं पार्टी कॅन्सल करायला?? सर्टीफीकेट मिळालं वाटतं. ठीक आहे तू व्हिसा झाल्यावर पार्टी दे.”
त्यावर समीर त्याला थांबवत म्हणाला,”अरे नाही रे,मला सर्टीफिकेट नाही मिळालंय आणि मला नाही वाटत मी अमेरिकेला जाईन. राधाची इच्छा नाहीय यायची आणि मला एकट्याला नाही जायचंय. जाऊ तर दोघं नाहीतर नाही.ते जाऊ देत भेटू आपण लवकरच.”
राघव म्हणाला “समीर असा निराश होऊ नकोस. होईल काहीतरी मी पण जरा ओळख काढतो डुप्लीकेट सर्टीफिकेट साठी.भेटूया आपण लवकरच.”
दिवसभर सगळ्या सामानाची उलथापालथ केली पण काहीच हाती लागलं नाही. समीरने दोन पोती भरून भंगार काढलं आणि राधाला फोन केला,” राधा मी आज भंगारवाल्याला बोलावलं आहे भरपूर भंगार साठलंय.सगळ्या वस्तू जपून ठेवायच्या आणि आयत्या वेळेला महत्वाची वस्तू आणि पेपर मिळत नाही. मी आता आपल्या घरात मोजक्या वस्तू ठेवायच्या असं ठरवलं आहे.”
“ समीर ठीक आहे आपण देऊया सगळं पण मला आधी बघू देत काय काय द्यायचं आहे ते. आणि एव्हढी घाई करून भंगार दिलं तर सर्टीफिकेट लगेच मिळणार आहे का?? पॅनीक होऊन निर्णय कधी घ्यायचे नसतात.तू एक काम कर बॅासला सांगून एक आठवड्याची मुदत मागून घे बघूया नक्की काही तरी पॅाझिटीव्ह रिझल्ट मिळेल. कधी कधी एखादी गोष्ट मिळत नसली की तो नाद सोडून द्यायचा आणि दुसरं काम करायचं मग मिळते ती वस्तू किंवा पेपर.”
राधाचे समजूतीचे बोलणं ऐकल्यावर समीरची खात्री झाली की नक्कीच सर्टीफिकेट राधाने लपवलंय आणि अमेरिकेला जाण्यासाठी दुसर्याचं नांव डिक्लेयर झालं की ती देईल सर्टीफिकेट. या विचाराने त्याच्या रागाचा पारा चांगलाच चढला. त्याने राघवला फोन केला आणि भेटायला बोलावलं.
राघवने सांगितल्याप्रमाणे समीर पोचला चांदनी बारमध्ये.
राघवचा हा आवडता बार होता. समीर प्रथमच बार मध्ये येत होता.तिकडचे वातावरण आणि सिगरेटचा धूर त्याला नवीनच होता,आत शिरल्या शिरल्या त्याला गुदमरल्यासारखे झाले.
वेटर समीरजवळ आला आणि म्हणाला “ साहेब ते राघव साहेब तुमची वाट बघतायत.”आणि समीरला राघव बसलेल्या टेबलजवळ घेऊन गेला.
समीरने राघवला विचारले” काय रे तू काय नेहमी येतोस का?? सगळे तुला ओळखतायत ते?”
राघव म्हणाला” नाहीरे नेहमी नाही येत पण मूड खराब असला की येतो इकडे. ड्रिंक घेतलं की जरा बरं वाटतं.तू बोल काय झालं तू पार्टी का कॅन्सल केलीस?”
समीर म्हणाला,” अरे काय सांगू तुला, मला खात्री आहे राधानेच ते सर्टीफिकेट लपवून ठेवलं आहे.ती मला सांगतेय तू एकटाच जा.तिला माझ्यापेक्षा तिचं प्रमोशन महत्वाचं वाटतंय.मला कळत नाहीय ती इतका स्वार्थीपणा का करतेय.तिने मला सांगितलं की मी लग्न झाले तरी माझी आयडेंटीटी बदलणार नाही, मी एकत्र कुटुंबात राहणार नाही , माझ्या मनाची तयारी होईपर्यंत मला आई होण्यासाठी जबरदस्ती करायची नाही मी तिच्या सर्व अटी बिनशर्त मान्य केल्या, मग आता जेव्हा माझ्यासाठी काही तरी करायची वेळ आली तर ती का असा दुष्टपणा करतेय.”
राघवने तोपर्यंत ड्रिंक मागवले होते. पहिला पेग समीरने एका घोटात संपवला आणि वेटरला लार्ज पेग आणायला सांगितलं.
राघव समीरला म्हणाला,”समीर बेताने घे. तुला सवय नाहीय.”
तेव्हा समीर जोरात हसला आणि म्हणाला” राघव आज मला अडवू नकोस आज मला सगळं विसरून जायचं आहे. मला पिऊ देत मला अडवू नकोस.”
दोन पेग झाल्यावर राघवने वेटरला बील आणायला सांगितले आणि समीरला म्हणाला “ चल आपण इथून बाहेर पडूया दुसरीकडे जाऊन काहीतरी खाऊया इकडचं जेवण बेकार असत.”
राघवला राधाचा मोबाईल नं. माहित नव्हता त्यामुळे बारमधून समीरला बाहेर काढून एका बागेत बाकड्यावर बसले दोघेजण.बराच वेळ समीरची बडबड चालू होती. समीरची बडबड बंद झाल्यावर समीरच्या मोबाईलवरून राघवने राधाला फोन केला आणि ॲड्रेस विचारला.राधाने ॲड्रेस सांगितला पण समीर घरी पोचेपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता.
राघव आणि समीर घरी पोचल्यावर समीरची अवस्था बघून राधा मटकन् खाली बसली.राघवने राधाला विचारले” वहिनी बेडरूम कुठे आहे?”
राधाने हातानेच खूण केली. राघवने समीरला बेडवर झोपवले आणि बाहेर येऊन राधाला म्हणाला” वहिनी काही काळजी करू नका,समीरला ड्रिंकची सवय नाहीय म्हणून त्याची ही अवस्था आहे. त्यानी जास्त ड्रिंक नाही घेतलंय. सकाळी उठल्यावर त्याचं डोकं दुखेल खूप. तुम्ही त्याला काळी कॅाफी द्या लिंबू पिळून. होईल तो सोबर १०/११ वाजेपर्यंत.”
“ अहो पण त्याने ड्रिंक का घेतली??असं काय झालं त्याला ड्रिंक घेण्यासारखं?”
“ वहिनी ते तुमचं मॅरेज सर्टीफिकेट मिळत नाहीय ना त्यामुळे तो जरा तणावात आहे. मला रस्त्यात भेटला. मग कुठेतरी बसून बोलूया म्हणून आम्ही समोरच चांदणी बार होता तिकडे गेलो. माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही हा त्या मॅरेज सर्टीफिकेटमुळे एव्हढा डिस्टर्ब असेल आणि ड्रिंक घेईल. सॅारी वहिनी सगळी माझी चूक आहे.हा माझा मो. नं. आहे काही मदत लागली तर सांगा.”
राघव निघून गेल्यावर राधा तशीच सून्न होऊन बराच वेळ बसली.तिला काहीच कळत नव्हतं काय करावं. विचार करता करता तिला तिथेच झोप लागली.सकाळी जाग आली तीच डोकं दूखून.पटकन आवरून राधा ॲाफीसला निघून गेली.
समीर सकाळी जागा झाला तेव्हा हॅंग ओव्हर मुळे त्याचं डोकं प्रचंड दुखत होतं.प्रकाश सहन होत नव्हता आणि मुख्य म्हणजे राधा कुठेच दिसत नव्हती. तो परत बेडरूममध्ये गेला आणि डोक्यावर चादर घेऊन झोपायचा प्रयत्न केला. दुपार झाली तरी राधाचा फोन आला नव्हता,म्हणजे आता शेवटचा उपाय करायची वेळ झाली होती. नाही तर अमेरिकेची वारी तर हातची गेलीच असती आणि कालच्या सारखं परत झालं तर राधा पण.मॅरेज सर्टीफिकेट शोधण्यासाठी काय करावं याच्यासाठी आता स्वत:च्या आणि राधाच्या आई, बाबांची मदत घ्यायची असा समीरने विचार केला.
समीरने बाबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आज संध्याकाळी दोघांनी जेवायला घरी या,त्यांनी जास्त काही विचारायच्या आत फोन ठेवून दिला.नंतर राधाच्या बाबांना पण फोन करून संध्याकाळचे जेवणाचे आमंत्रण दिले.
संध्याकाळच्या जेवणासाठी कुठे ॲार्डर करायची ते पण ठरवून टाकले.
संध्याकाळी सगळे जमल्यावर राधाची चिडचिड चालूच होती कारण समीरने तिला न विचारता आई/बाबांना बोलावलं होतं कालचा दारू पिऊन केलेला गोंधळ मला का करावा लागला याचं स्पष्टीकरण देताना मॅारल सपोर्ट असावा म्हणून समीरने आपल्याला न विचारता हा खटाटोप केलाय याची पक्की खात्री तिला झाली
समीर राधाची नजर चुकवत होता पण स्वत:च्या आणि राधाच्या आई, बाबांची चांगली सरबराई करत होता.
समीर म्हणाला “आधी जेवून घेऊया मग गप्पा मारू. राधाला पण भूक लागली असेल .”
जेवून झाल्यावर समीरने सगळ्यांना सांगायला सुरूवात केली,”मला कंपनी २ वर्षांसाठी अमेरिकेला पाठवत आहे, आणि हो मी एकटा जाणार नाहीय तर राधाला पण घेऊन जाणार आहे. “
समीरच्या बाबांनी विचारले, “अरे पण राधा कशी येईल तिचा जॅाब सोडून??तिकडे काय करणार ती दिवसभर? कंटाळून जाईल ती.”
समीर म्हणाला , “पण बाबा, मी हा विचार केला नसेल का??अहो, फॅमिली व्हिसा काढला की तिला पण तिकडे नोकरी मिळेल.पण हिला माझा पॅाईंट समजत नाहीय.आणि फॅमिली व्हिसासाठी मला मॅरेज सर्टीफिकेट पाहिजे आहे,ते हिने कुठे ठेवलंय ते सांगत नाहीय.
आता मात्र राधाच्या रागाचा बांध तुटला, ती म्हणाली “मी लपवलंय???मी कशाला लपवू ??मी काही आडकाठी आणत नाहीय,मला वेळ मिळाला नाहीय ते सर्टीफिकेट शोधायला.ॲाफीसमध्ये एक महत्वाचा प्रोजेक्ट चालू आहे. सूट्टी पण घेऊ शकत नाही मी.याला जर नाही सापडत नाहीय तर याला जाऊदेत एकटा.इकडे माझं प्रमोशन ड्यू आहे ते सोडून मी कशाला जाऊ???मी याला सांगितलं सांगितलं बॅासकडून एक आठवड्याची मुदत घे मग व्हिसा करूया “
समीर म्हणाला,”सर्टीफिकेट सापडत नाही म्हणून मी दुसरा मार्ग काढायचा प्रयत्न केला. पण हिने लग्नानंतर नांव बदललं नाहीय त्यामुळे मॅरेज सर्टीफिकीट नाही मिळालं तर फॅमिली व्हिसा नाही मिळणार आणि हिला तिकडे जॅाब नाही मिळणार.
राधाचं म्हणणं आहे कि ते सर्टीफिकेट घरातच आहे मग गेलं कुठे?आता तुम्हीच हिला समजावून सांगा जर फॅमिली व्हिसा नाही मिळाला तर हिला नोकरी मिळणार नाही, आणि आता फॅमिली व्हिसा झाला की ती नंतरसुद्धा येऊ शकते.तो काहीच प्रॅाब्लेम नाहीय.मुख्य मुद्दा असा आहे की फॅमिली व्हिसा आताच काढावा लागेल नंतर काढता येणार नाही म्हणजे नंतर व्हिसा मिळेल पण जॅाब परमिट नाही मिळणार हिला.म्हणून ते मॅरेज सर्टीफिकेट शोधायलाच पाहिजे.पण हिला फक्त स्वत:चचं करीअर दिसतंय. “
राधाचे बाबा म्हणाले, “अरे अरे भांडू नका असे. निघेल मार्ग यातून. “
राधा म्हणाली,”बाबा मला आता या स्वार्थी माणसाबरोबर रहायचंच नाहीय,याला वाटतंय मी हा जाऊ नये म्हणून मॅरेज सर्टीफिकेट लपवून ठेवलंय.जर याचा माझ्यावर विश्वासच नाहीय तर मग काय फायदा??सर्टीफिकेट मिळत नाही म्हणून हा काल दारू पिऊन आला. तुम्ही सांगा मी पण दारू पिऊन येऊ काय? ?? त्याने सगळा प्रश्न सुटणार असेल तर दोघं मिळून दारू पित बसतो.”
समीरचे बाबा म्हणाले,”बापरे समीर तू दारू पिऊन आलास??”
समीर म्हणाला,”अहो बाबा, होय मी दारू पिऊन आलो पण तुम्ही सांगा सगळे आम्हाला आदर्श जोडी समजतात, अशी असते का आदर्श जोडी??नवर्याच्या प्रगतीच्या आड येणारी बायको आणि म्हणे आदर्श जोडी.ही मला जरा पण मदत करत नाहीय.हिचं आपलं एकच माझं प्रमोशन आणि माझं काय मला हा एव्हढा मोठा चान्स आलाय तो मी सोडून देऊ काय??”
आता राधाचा आवाज पण चढला , “होय जरा कुठे स्वत:च्या मनाविरूद्ध झालं की जोडीदाराला दोष द्यायचा आणि जोडीदारानी स्वत:ची स्वप्नं बाजूला ठेवली तरच ती आदर्श.”
समीर म्हणाला, “अगं तू विचार करून बघ, मी तुला सांगितल्यापासून तुझं एकच पालुपद चालू आहे, तू एकटाच जा. सगळी कागदपत्र मी गोळा केली आहेत फक्त मॅरेज सर्टीफिकेट नसल्यामुळे अडलय गाडं.”
राधा म्हणाली ,”आई,बाबा मी तुमच्या बरोबर येते. मला तर अजिबात जायचे नाही आता. याचा माझ्यावर विश्वासच नाहीय.ते सर्टीफिकेट नीट ठेवलेलं आहे पण याला धीर असेल तर ना.मी आजच बॅासशी बोलले होते कि मी जर दोन वर्षासाठी अमेरिकेला गेले तर माझा या कंपनीत क्लेम राहिल का ?आणि त्यांनी मला सांगितलं की तशी प्रोव्हिजन आहे कंपनीत.तुला व्हिसा मिळून तिकडची जॅाब ॲाफर मिळाली की २ वर्ष अनपेड लिव्हची ॲप्लिकेशन दे. आणि मी ऊद्या सुट्टी पण घेतली होती सर्टीफिकेट शोधायला.पण याचा विश्वासच नाहीय माझ्यावर तर मला पण याच्याबरोबर रहायचं नाहीय. “

समीर म्हणाला “हे तू मला आधी का सांगितलं नाहीस? “

राधा म्हणाली, “कधी सांगणार काल मी तुझ्याशी सर्व बोलून घेणार होते तर तू आलास तर्र होऊन. मी सकाळी ॲाफीसला गेले तेव्हा तू झोपला होतास.अरे तुला वाटतंय ना मी मुद्दाम लपवलंय ते सर्टीफिकीट तर तसंच समज.होय मीच लपवलंय कारण मला नाही यायचंय तुझ्या बरोबर. जा तू एकटाच.आज आई /बाबांना बघून मी एव्हढी खूष झाले पण तू , तू तर माझी कम्लेंट करायला बोलावलेस. तुला छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करायची सवयच झालीय.आतासुद्धा तुला एकट्याला जायचं नाहीय कारण तिकडे गेल्यावर लाईंफ सुरळीत चालू रहाण्यासाठी एका मॅनेजरची गरज लागणार आहे, म्हणून मला बरोबर न्यायचं आहे.लग्नाआधी आई/बाबा होते आता बायको आहे. मी नांव बदलणार नाही हे मी तुला आधीच सांगितले होते तेव्हा तुला त्यात काही वावगं वाटलं नाही पण तीच गोष्ट तुझ्या स्वप्नांच्या आड आली म्हटल्यावर तुला खटकली.आपल्याला आदर्श जोडपे हा किताब मिळाला होता गेममध्ये पण आता मला समजतंय की आपण तोपर्यंतच आदर्श जोडपे होतो , जो पर्यंत तुझ्या मनासारखं होत होतं. मनाविरूद्ध व्हायला लागल्यावर विश्वास कुठे गेला?? आता तू जा एकटाच अमेरिकेला मी आता माहेरी जातेय. “
आता समीरचे आई /बाबा पण सांगायला लागले “अरे समीर तू पण जरा राधाला समजून घ्यायला पाहिजे होतंस. तिने तुला एव्हढी साथ दिली प्रत्येक गोष्टीत. आधी तिच्याशी चर्चा करून मग आमचा सल्ला घ्यायचा ना कि सर्टीफिकेट मिळत नाहीय तर कसा मार्ग काढूया?”
आता समीरचा पारा चांगलाच चढला होता कारण आपले आई/बाबा पण राधाचीच बाजू घेतायत.
तो उठला आणि तरातरा त्याच्या आणि राधाच्या फोटोकडे गेला, हा फोटो दोघांना आदर्श जोडपे हा किताब मिळाला तेव्हाचा होता आणि म्हणाला , “जा राधा तू जा माहेरी. मला अमेरिकेला जायचं आहे आणि मी जाईन. आणि मला कुणाच्याच मदतीची तिकडे गरज लागणार नाही. माझं मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेन.आणि हो हा फोटो जो आपण आपल्याला आदर्श जोडपे किताब मिळाल्यानंतर काढला होता,याची आता काहीच गरज नाहीय. “
समीरने तो फोटो जोरात जमिनीवर फेकला आणि रूममध्ये स्मशान शांतता पसरली. राधाचे बाबा पुढे झाले आणि त्यांनी त्या फ्रेमचे तुकडे गोळा करायला सुरूवात केली काचा गोळा करता करता त्यांनी त्यातला फोटो हळूवारपणे उचलला आणि त्यांना फोटोच्या मागे काहीतरी चिकटलं आहे असं वाटलं म्हणून त्यांनी बघितलं तर कसलातरी कागद होता. तो कागद त्यांनी उघडला आणि त्यांना हसू आवरेना.त्यांना तसं हसताना बघून राधाची आई चिडली.
ती म्हणाली , “अहो हसताय काय,इकडे आम्हाला कळत नाहीय या दोघांची समजूत कशी घालायची आणि तुम्ही मोठ्ठा जोक झाल्यासारखे हसताय.”
त्यावर राधाचे बाबा म्हणाले , “अगं खरंच मोठा जोकच आहे हा .अगं खरंच हसण्यासारखंच आहे सगळं.ज्या सर्टीफिकेट साठी एव्हढं रामायण झालंय ना तेच मला या फोटोमागे मिळालं.या दोघांनीच ते सुरक्षित रहावं म्हणून तिकडे ठेवलं असणार, बाकीच्या सर्टीफिकेट बरोबर न ठेवता.हे कधी लागेल याची यांना कल्पना नसणार.नेहमी असंच होतं काही महत्त्वाच्या गोष्टी इतक्या जपून ठेवतो की वेळेला त्या कधीच सापडत नाहीत.आणि असं रामायण घडते पण बाबांनो एक लक्षात ठेवा हरवलेल्या वस्तू सापडतील पण हरवलेली नाती सापडणार नाहीत. एकमेकांवरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका.हा एक साधा कागद आहे पण तोच तुमचं नाते सिद्ध करून काही गोष्टी सुलभ करेल पण एकमेकांवरचा विश्वास तुमचं नातं सुंदर करेल.”
त्यावर समीरच्या बाबांनी दाद दिली “ लाख मोलाचे बोललात तुम्ही”
सगळे हसत होते पण समीर खजील झाला होता.
आता समीर आणि राधाला आपली चूक समजली होती दोघांनीही इथून पुढे कधीच टोकाची भूमिका न घेण्याचा वचन एकमेकांना दिले.
समीरचे बाबा म्हणाले “ हे घ्या आम्ही तुम्हाला मॅरेज सर्टीफिकेट देतो.जा सगळ्या फॅार्मॅलिटी पूर्ण करा आणि आनंदाने अमेरिकेला जा.आम्ही पण येऊच अमेरिका बघायला.”
आणि सगळ्यांच्या हसण्यानी सगळं घर भरून गेलं.

सौ सरिता सुभाष बांदेकर


कथा

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

8 Jan 2021 - 5:37 am | अनन्त अवधुत

एकदम हलकेफुलके.

Bhakti's picture

8 Jan 2021 - 10:05 am | Bhakti

मस्त

टर्मीनेटर's picture

8 Jan 2021 - 10:31 am | टर्मीनेटर

छान लिहिलंय....आवडले.

सिरुसेरि's picture

8 Jan 2021 - 2:07 pm | सिरुसेरि

छान लेखन . सुरुवातीला विनोदी वाटणारी कथा नंतर गंभीर होत जाते . शेवटी सुखद धक्का देउन संपणारी बबड्या स्टाइल कथा .

चौथा कोनाडा's picture

8 Jan 2021 - 6:02 pm | चौथा कोनाडा

छान, मस्त !
आवडली !

चलत मुसाफिर's picture

8 Jan 2021 - 7:29 pm | चलत मुसाफिर

इतकं होऊनही शेवटी "जा दोघेही अमेरिकेला" हेच का निष्पन्न? तिच्या करीअरचे काय?

सरिता बांदेकर's picture

8 Jan 2021 - 10:31 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद, तिला दोन वर्षाची अनपेड लिव्ह मिळणार आणि जॅाबचा क्लेम रहाणार.

सरिता बांदेकर's picture

8 Jan 2021 - 10:35 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,अनंत अवधूत, भक्ती,टर्मिनेटर,सिरूसेरी,चौथा कोनाडा
तुम्हा सर्वांचे आभार.
जरा उशीरच झाला म्हणून सगळ्यांना एकाच वेळी धन्यवाद केलाय.

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 8:02 pm | मुक्त विहारि

फक्त एकच चूक आहे.

माझे मॅरेज सर्टिफिकेट हरवले होते.

डुप्लीकेट काढून मिळाले.

काहीही त्रास झाला नाही.

सरिता बांदेकर's picture

14 Jan 2021 - 10:15 am | सरिता बांदेकर

धन्यवाद, कथा वाचल्याबद्दल आणि चूक दाखवल्याबद्दल. पुढची कथा लिहीताना ही काळजी नक्कीच घेईन.
कृपया यापुढेही अशा चुका दाखवत जाल अशी आशा.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2021 - 10:28 am | मुक्त विहारि

माझ्या कडून पेपर हरवतात.

माझी डिप्लोमाची मार्क शीट पण हरवली होती, तो पण डुप्लीकेट काढून मिळाली.

(आता मला, हा धंदा सुरू करायला हरकत नाही, आमच्या इथे, डुप्लीकेट कागदपत्र काढून मिळतील. अर्थात, डोंबोलीकर असल्याने, आमच्या शाखा सगळीकडे आहेत, हे वेगळे सांगायला नको,)

सरिता बांदेकर's picture

14 Jan 2021 - 2:26 pm | सरिता बांदेकर

चालेल. तुम्ही एजन्सी काढा पण गोष्टी हरवू नका.
इम्प्रेशन खराब होतं.

निनाद's picture

14 Jan 2021 - 10:28 am | निनाद

याच विषयावर याच क्लायमॅक्स चा एक चीनी चित्रपट पाहिला होता.

प्राची अश्विनी's picture

14 Jan 2021 - 11:08 am | प्राची अश्विनी

मलाही. World movies वर होता.

सरिता बांदेकर's picture

14 Jan 2021 - 2:23 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,मला खूप आनंद झाला कुणाच्यातरी लक्शात आलं. मी खूप वर्षापूर्वी बघितला होता.

सरिता बांदेकर's picture

14 Jan 2021 - 2:21 pm | सरिता बांदेकर

मी पण ही संकल्पना त्याच चित्रपटावरून घेतलीय.मी खूप वर्षापूर्वी बघितला होता तो चित्रपट. मला खूप आनंद झाला कुणीतरी ओळखलं. धन्यवाद.
त्यात त्यांची मुलगी फ्रेम तोडते रागाने आणि तिला सापडते सर्टीफिकेट.

खुप छान कथा. पण परस्परांमधला संवाद हरवला होता कथेत. ती संध्याकाळी सांगणार होती ऑफीसात जे बोलणं झाल जाॅब क्लेम बद्दल वगैरे. ..मोबाईल नव्हते का त्यांच्याजवळ? आपण तर लगेचच आनंदाने कळवलं असतं. तशी कथेतली राधा जरा नाराजच वाटली सुरवातीपासूनच.
बाकी ठिक वाटली कथा.

सरिता बांदेकर's picture

19 Jan 2021 - 2:38 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
कथा वाचल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या कथेच्या वेळेस नक्की लक्शात ठेवेन.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jan 2021 - 11:22 am | राजेंद्र मेहेंदळे

मला वाटले व्हिसा प्रकरणाने सुरुवात होउन केस घटस्फोटापर्यंत जाते का काय?

पण आय. टी कपल्स चा हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. एकाला ऑनसाईट्ला जायची संधी मिळाली आणि दुसरा तयार नसला तर एकट्याने जाणे किवा संधी सोडुन देणे किवा एकाने करीअरचा त्याग (काही काळापुरता) करणे हे ओघाने आलेच. शिवाय मूल नसले तर चान्स कधी घ्यावा तिकडे कि ईकडे आणि असले तर त्याच्या शिक्षणाचे काय (तिकडल्या आणि परत आल्यावर इकडल्या), घर असल्यास रिकामे ठेवावे कि भाड्याने द्यावे कि कोणा नातेवाईकाला रहायला द्यावे, गाडी पार्किंग अडवायला ठेवावी कि विकावी एक ना दोन लफडी. शिवाय आजकाल ऑनसाईट म्हणजे खच्चुन पैसा वगैरे राहिलेले नाही. एकतर प्रत्येक देशात आणि शहारात वेगवेगळे खर्च असतात. शिवाय ६ महिन्यात एकदा कुठेतरी फॅमिली ट्रिप किवा ईंडिया व्हिजिट केली की पैसे साठत नाहीत. तेव्हा दोघेही इथे छान कमवत असतील तर कुठेही जाउ नये इत्यलम.

सरिता बांदेकर's picture

19 Jan 2021 - 2:39 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद कथा वाचल्याबद्दल. तुमचं म्हणणं पटतंय मला.