लाक्कुंदी आणि दांडेली - भाग १

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
2 Jan 2021 - 3:03 pm

एखाद्या ठिकाणाबद्दल तुम्ही कुठेतरी वाचता, कुणाकडून तरी ऐकता किंवा त्याची एखादी झलक पाहता आणि ते ठिकाण तुमच्या मनाच्या एका कोप-यात कुठेतरी आत जाऊन बसतं. हे ठिकाण ताजमहाल किंवा अजिंठा-वेरूळ सारखं प्रसिद्ध नसतं पण तरीही (की त्यामुळेच?) ते तुम्हाला भावलेलं असतं. भेट द्यायच्या ठिकाणांच्या यादीत त्याचा क्रमांक वरचा नसतो, पण तरीही ते कधीही विस्मरणात जात नाही. लाक्कुंदीच्या बाबतीत असंच झालं. इंटरनेटवर कुठेतरी या ठिकाणाबाबत वाचलं आणि तेव्हाच तिथं जायचं हे पक्कं ठरवून टाकलं.
दर वर्षी पुढे पुढे ढकलत जात शेवटी २०१९ च्या डिसेंबर महिन्यात लाक्कुंदीला जायचा योग आला. या सहलीच्या आधी नोव्हेंबरात भुज, जुनागढ आणि गीर अभयारण्य आणि नंतर जानेवारीत कच्छचे छोटे रण (LRK) अशा सहली झाल्या. आजच्या या करोनाच्या काळात ते दिवस एखाद्या सुखद स्वप्नासारखे वाटतात. (गेले ते दिन गेले...)
सुरुवातीला या सहलीत दांडेली नव्हतं. पण मग असं वाटलं की फक्त लाक्कुंदी पहायला एवढ्या लांब जायचं? मग लाक्कुंदीच्या आजूबाजूच्या जागांचा शोध सुरू झाला. ऐहोळे, पट्टडक्कल, हंपी, विजापूर, गोकाक धबधबा ही सगळी ठिकाणं पाहून झालेली असल्यामुळे शेवटी मग दांडेलीची निवड झाली. बेत असा ठरला-
दिवस १: पुणे ते गडग, लाक्कुंदी स्थलदर्शन
दिवस २: लाक्कुंदी स्थलदर्शन
दिवस ३: लाक्कुंदी ते दांडेली, दांडेली स्थलदर्शन
दिवस ४: दांडेली अभयारण्यास भेट, दांडेली ते पुणे
सहल २१ ते २४ डिसेंबर अशी असल्यामुळे हॉटेलांमधे जागा नव्हत्या. त्यातल्या त्यात गडगला चांगलं हॉटेल मिळालं, पण दांडेलीला कुठल्याच हॉटेलात जागा नव्हती. शेवटी एका कळकट मळकट हॉटेलात उपलब्ध असलेल्या दोन खोल्या गोड मानून घ्याव्या लागल्या.
दिवस पहिला:
आम्ही पहाटे पाच वाजता निघालो. आजकाल पुण्यात दुर्मिळ झालेली सुंदर गुलाबी थंडी पडली होती. पुणे-बेंगलूरू रस्ता हा एकाच वेळी रडवणारा आणि हसवणारा असा आहे. या रस्त्याचा महाराष्ट्रातला भाग जितका भयानक आणि थरकाप उडवणारा आहे, तितकाच कर्नाटकातला भाग सुंदर आणि आनंददायी आहे. भयंकर खड्डे असलेल्या आणि सतरा ठिकाणी काम चालू असलेल्या या रस्त्यावर टोल नामक खंडणी देऊन आम्ही पुढे निघालो.
सातारच्या पुढे कुठेतरी


कोल्हापूर पार केल्यावर गाडी कर्नाटकात शिरली. कोल्हापूर ते बेळगावी रस्त्यावर गाडी चालवणे हा एक प्रसन्न करणारा अनुभव असतो. आत्तापर्यंत झालेल्या मानसिक त्रासाची ही एक भरपाईच असते म्हणाना. रूंद, तीन मार्गिका असलेला रस्ता, दोन्ही बाजूला असलेले प्रशस्त सेवा रस्ते, दुभाजकावर लावलेली आकर्षक झाडे, तुरळक गर्दी यामुळे हा प्रवास संपूच नये असे वाटते.
साधारण एकच्या सुमारास आम्ही गडगला पोचलो. हॉटेलात गेलो, खोल्या ताब्यात घेतल्या आणि जेवण केले. गडगपासून लाक्कुंदी फक्त ११ किमी दूर आहे. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच लाक्कुंदीला निघालो. लाक्कुंदीला पोचल्यावर आमचा पहिला थांबा होता तिथले वस्तुसंग्रहालय. हे वस्तुसंग्रहालय म्हणजे एक सुखद धक्का होता. लाक्कुंदीसारख्या छोट्या, अपरिचित ठिकाणालाही कर्नाटक सरकार किती महत्व देते याचेच ते द्योतक होते.


कहाणी लाक्कुंदीची (Story of Lakkundi) या नावाचे हे वस्तुसंग्रहालय ब-यापैकी मोठे आहे. आजूबाजूच्या परिसरात उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्त्या तिथे ठेवल्या आहेत. लाक्कुंदी गावातल्या सगळ्या मंदिरांचे स्थान दर्शविणारा एक नकाशाही तिथे आहे. तिथे काही वेळ घालवून आम्ही बाहेर पडलो. वस्तुसंग्रहालयाच्या मागेच ब्रह्म जिनालय आहे. लाक्कुंदीतील ११ मंदिरांपैकी सुमारे ५ मंदिरांचा ताबा आत्ता सरकारकडे आहे - ब्रह्म जिनालय यापैकी एक आहे. हे लाक्कुंदीतील सगळ्यात जुने मंदिर असून सगळ्यात मोठे जैन मंदिर आहे. मंदिर उत्तम स्थितीत आहे. आजूबाजूला राखलेली हिरवळही मन सुखावणारी आहे.






मंदिरात दोन सुंदर मुर्त्या आहेत. त्यापैकी एक ब्रह्मदेवांची असून तिला चार मुखे आहेत (सोबत सावित्री आणि गायत्री आहेत), दुसरी यक्षी पद्मावतीची आहे. दोन्ही मुर्त्या कमालीच्या देखण्या आहेत. ब्रह्मदेवांच्या मुर्तीमुळे या मंदिरास त्याचे नाव मिळाले आहे.



मंदिरात ब-यापैकी गर्दी होती. मला वाटले त्यापेक्षा लाक्कुंदी थोडे अधिक लोकप्रिय दिसत होते. आजकाल हंपी, ऐहोळे, पट्टडक्कल पाहून झाल्यावर लोक इथेही येत असावेत. मंदिरात कुठल्यातरी शाळेची सहल आली होती. भिरभिरणा-या डोळ्यांनी ती लहान मुले इकडेतिकडे पहात होती. बाजूच्याच हिरवळीवर माकडांचाही खेळ रंगला होता. मंदिरासमोरच एक घर होते. मला त्या घरातल्या लोकांचा हेवा वाटला. पण काय माहीत? कदाचित त्यांना ह्या मंदिराचे अजिबात कौतुक नसेल. हे लहानसे खेडे सोडून आपण शहरात जाऊन रहावे असे त्यांना वाटत नसेल कशावरून?
ब्रह्म जिनालय आणि त्याला लागून असलेले एक छोटेसे जैन मंदिर पाहून झाल्यावर आम्ही निघालो नान्नेश्वर मंदिराकडे. (ह्या दोन मंदिरांशेजारीच नागनाथ मंदिर आहे, पण आज त्याची स्थिती दयनीय आहे. मंदिराभोवती अतिक्रमण झाले असून त्याची पडझड झालेली आहे. ह्या मंदिराची सद्यस्थिती https://www.youtube.com/watch?v=XmeJDrC4IqU ह्या व्हिडिओत पाहता येईल.)
नान्नेश्वर आणि काशीविश्वेश्वर ही मंदिरे अगदी जवळजवळ (रस्त्याच्या दोन बाजुंना दोन) आहेत. नान्नेश्वर मंदिर भल्यामोठ्या उंच जोत्यावर उभारलेले आहे. मंदिर भापुसच्या ताब्यात असल्यामुळे अर्थातच स्वच्छ, नीटनेटके आणि उत्तम स्थितीत आहे.



घासून गुळगुळीत केलेले अगदी आरशासारखे चमकणारे खांब ही कर्नाटकातल्या मंदिरांची खासियत आहे, इथेही ती दिसते. (ब्रह्म जिनायलातही हे खांब होतेच.) मंदिराच्या मंडपाला लाकडी दरवाजा असला तरी सध्या तो उघडा होता. आम्ही आत शिरलो. मंडपही देखणा होता. आत गाभा-यात एक शिवलिंग दिसत होते, पण सध्या त्याची पूजाअर्चा होत नसावी.
नान्नेश्वर मंदिराजवळ आम्ही थोडा वेळ थबकलो. वरून लाक्कुंदीचा बराच मोठा परिसर दृष्टिपथात येत होता. भारतात असणा-या लाखो खेड्यांसारखेच लाक्कुंदी एक चिमुकले झोपाळू खेडे होते. रस्त्यावर स्वच्छंदपणे फिरणारी गुरे, त्यांनी टाकलेल्या शेणामुताचा सगळीकडे पसरलेला दरवळ, इकडून तिकडे जाणारे ट्रॅक्टर, छोटी बसकी घरे, चौकात असणारे पार आणि त्यांवर बसलेले गावकरी.
नान्नेश्वर पाहून आम्ही निघालो शेजारच्या काशीविश्वेश्वर मंदिराकडे. काशीविश्वेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरचे देखणे कोरीवकाम. लाक्कुंदीच्या इतर कुठल्याच मंदिरात असे कोरीवकाम नाही. काशीविश्वेश्वर मंदिराच्या बाजूलाच एक खुला रंगमंच आहे. लाक्कुंदीतले सांस्कृतिक कार्यक्रम बहुधा इथेच होत असावेत.





काशीविश्वेश्वर मंदिर पाहून घाईघाईने आम्ही निघालो मणिकेश्वर मंदिर आणि त्याशेजारी असलेल्या मुस्कानीबावी अर्थात मुस्कानी विहिरीकडे. सूर्यास्त होत होता आणि आज दिवस मावळायच्या आधी आम्हाला हे शेवटचे मंदिर पाहून घ्यायचे होते. लाक्कुंदीच्या मुख्य रस्त्यापासून एका अरुंद रस्त्याने आत गेलो की हे मंदिर लागते. मणिकेश्वर मंदिराला मी लाक्कुंदीतील सगळ्यात सुंदर मंदिर म्हणेन. हे मंदिर स्वत: सुंदर आहेच, पण त्याची शोभा वृद्धिंगत केली आहे त्यासमोर असलेल्या पाय-या पाय-यांच्या त्या अतीदेखण्या विहिरीने.






सूर्य महोदय आता अगदी दिसेनासे होण्याच्या बेतात आले होते. मंद असा तांबूस प्रकाश सगळीकडे पसरला होता. त्या मंद प्रकाशात हे मनोहर मंदिर अधिकच लोभसवाणे दिसत होते. ह्या मंदिरात आम्ही बराच वेळ रेंगाळलो. शेवटी तिथे देखरेख करणा-या कामगाराने आम्हाला आता निघा असे बोलल्यावर नाईलाजाने आम्हाला तिथून निघावे लागले.
एक टीप: इतिहासात रस असलेल्या आणि हा इतिहास पाहिलेल्या प्रत्येक जुन्या वास्तूविषयी आस्था असलेल्या कुठल्याच व्यक्तीचे मत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात् Archaeological Survey of India या संस्थेविषयी फारसे चांगले नसते. अर्थात् हे नकारात्मक मत निराधार नाही हे सत्य आहेच. भारतातल्या अनेक वास्तुंची होणारी अक्षम्य हेळसांड पाहून कुणाचेही मत असेच होईल. मीही स्वत: असे म्हणतो की भापुसचे काम सुधारण्यास अजून बराच वाव आहे. ते जे काही करतात ते उत्तम असते हे खरे, पण अनेकदा ते काहीच करत नाहीत हेही तितकेच खरे आहे. मणिकेश्वर मंदिर पाहिल्यावर भापुसने इथे काही खास केलेले नाही असेच कुणीही म्हणेल. थोडीशी हिरवळ आणि काही शोभेची झाडे लावण्याइतपतच भापुसचे काम आहे असेच कुणालाही वाटेल. पण भापुसने इथे केवढे प्रचंड काम केले आहे हे खाली दिलेल्या दोन छायाचित्रांवरून स्पष्ट होते. जुनी छायाचित्रे कुणा अज्ञात छायाचित्रकाराने १८८५ साली काढली आहेत (ब्रिटिश लायब्ररीच्या संकेतस्थळावरून साभार), तर आजची छायाचित्रे मी काढली आहेत. दोन्ही छायाचित्रांमधला फरक अक्षरश: थक्क करणारा आहे! मी तर म्हणेन की काहीही काम केलेले नाही असे वाटणे हीच भापुसच्या कामाची खरी पावती आहे! (त्यांचे अजिंठा आणि वेरूळमधील कामही थक्क करणारे आहे. ब्रिटिश लायब्ररीच्या संकेतस्थळावर अजिंठा आणि वेरूळची अनेक जुनी छायाचित्रे उपलब्ध आहेत, गरजुंनी जरूर पहावीत.)



मंदिर पाहून झाल्यावर आम्ही परत गडगला निघालो. वाटेत एका ठिकाणी एका छोट्याश्या टपरीवर मिरची आणि (चक्क अख्ख्या) वांग्याची भजी खाऊन आणि चहा मारून (एकूण बील 50 रुपये!) आम्ही परत हॉटेलवर परतलो.

प्रतिक्रिया

निशाचर's picture

2 Jan 2021 - 3:40 pm | निशाचर

मस्त भटकंती. फोटो खूप सुंदर आलेत. ब्रह्मदेवाची मूर्ती खरेच देखणी आहे.

गेले ते दिन गेले...

याला मम.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

Jadya's picture

2 Jan 2021 - 3:51 pm | Jadya

खुप सुन्दर

आंबट चिंच's picture

3 Jan 2021 - 8:12 am | आंबट चिंच

सगळे फोटो मस्त.
कर्नाटक हे सगळ्यात जास्त ऐतिहासिक वारसा लाभलेलं राज्य असावे.
आता वल्लीदांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

शा वि कु's picture

3 Jan 2021 - 8:43 am | शा वि कु

फोटो आणि कथन दोन्ही आवडले.

अनिंद्य's picture

3 Jan 2021 - 10:56 am | अनिंद्य


..... ऐहोळे, पट्टडक्कल, हंपी, विजापूर, गोकाक धबधबा ही सगळी ठिकाणं पाहून झालेली असल्यामुळे....

तुमचा हेवा वाटल्यावाचून राहिला नाही.

हा भाग एकदा निवांत वेळ काढून पालथा घालायचा'च' आहे.

कर्नाटक राज्य स्वतःच्या वारसास्थळांबद्दल अन्य राज्यांपेक्षा अधिक जागरूक आहे असे माझेही मत आहे. नुसत्याच अस्मितेच्या गफ्फा ऐकण्यापेक्षा जतनाची खरीखुरी कामे केलेली बघून आनंद वाटतो. अनुकरणीय !

.... कोल्हापूर ते बेळगावी रस्त्यावर गाडी चालवणे हा एक प्रसन्न करणारा अनुभव असतो...... तंतोतंत !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2021 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन आहे, आवडले. फोटोही छान आलेले आहेत. भापुस बद्दल फार काही बोलावे वाटत नाही. पण हे काम भरीव वाटले.

-दिलीप बिरुटे

सुंदर फोटो आणि माहितीपूर्ण लेखन. काही दुरुस्त्या..
लाक्कुंदी - लक्कुंडी
पट्टडक्कल - पट्टदकल
गडग - गदग
मुस्कानीबावी - मस्कीन बावी

तुषार काळभोर's picture

3 Jan 2021 - 4:41 pm | तुषार काळभोर

अप्रतिम ठिकाणच्या प्रवासाचे अप्रतिम फोटो!
कर्नाटक राज्यसरकार व भारतीय पुरातत्व खात्याचं (किमान येथील) काम प्रचंड कौतुकास्पद आहे.

लखुंडी निवडलेत हे छान झाले. दांडेलीचा अनुभव - काळी नदी राफ्टींग केले का? धनेश पक्षी ( मलबार हॉर्नबील काळा पांढरा )इकडे खूप आहेत म्हणतात.

इकडे सर्व ठिकाणी फिरलो दोनदा. लेखही इथे दिलेत. पण त्या वेळच्या बटण फोनातून फारसे लेखन जमले नव्हते. ते आता दुरुस्त करताही येईल परंतू प्रतिसाद विस्कटतील म्हणून तसेच ठेवले.

भापुसचे काम उत्तम आहेच पण गाववाल्यांनी एक हजार वर्षं सांभाळली आहेत देवळं हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.
अजिंठासाठी जपान सरकारने फंड दिला होता.

...गाववाल्यांनी एक हजार वर्षं सांभाळली आहेत देवळं हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. ...

बरोबर, जय हो !

प्रचेतस's picture

4 Jan 2021 - 9:29 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंय.
रावण गजारुढ इंद्राशी युद्ध करतानाचे आणि त्याखालचे गजासुरवधप्रसंगाची शिल्पे मस्त आहेत.

तीनेक वर्षापूर्वी हंपीची ३ दिवसांची सफर केली होती. जाताना गदग, लक्कुंडीमार्गेच गेलो होतो मात्र वेळेअभावी गदग (इथेही काही प्राचीन मंदिरे आहेत) आणि लक्कुंडीलाही भेट देता आली नाही.

चौकटराजा's picture

4 Jan 2021 - 10:30 am | चौकटराजा

तुन्गभद्रेच्या पलिकडचे हम्पी, लक्कुन्डी व चित्रदुर्ग किल्ला असा प्लान केला होता पण कोरोना मुळे तो फिसकटला .आता तुमचा लेख पाहून पुन्हा सुरसुरी आली आहे ! पण आम्ही रेल्वे यात्री असल्याने अद्याप नियमित रेल्वे सेवेची प्रतिक्षा करीत आहे !!

Nitin Palkar's picture

4 Jan 2021 - 1:04 pm | Nitin Palkar

प्रकाशचित्रण आणि लेखन दोन्ही सुरेख.

एक_वात्रट's picture

4 Jan 2021 - 3:42 pm | एक_वात्रट

प्रतिसाद देणा-या सर्वांचे आभार! गुंड्या: दुरुस्त्या सुचवल्याबद्दल धन्यवाद. आता वाटते, गावांची नावे चुकवायला नको होती, पण काय करणार, खात्री करून घेण्यासाठी माझ्याजवळ काही मार्गच नव्हता.

दांडेलीचा अनुभव - काळी नदी राफ्टींग केले का?

नाही. दांडेलीने एकूणच आमची निराशा केली, पुढे येईलच.

पण आम्ही रेल्वे यात्री असल्याने अद्याप नियमित रेल्वे सेवेची प्रतिक्षा करीत आहे !

मी म्हणेन की ही ठिकाणे स्वतःच्या गाडीने जाण्यास अधिक सोयीची आहेत. जवळही आहेत. स्वतःची गाडी असल्यास ह्या पर्यायाचा नक्की विचार करा.

चौकटराजा's picture

4 Jan 2021 - 8:12 pm | चौकटराजा

मी म्हणेन की ही ठिकाणे स्वतःच्या गाडीने जाण्यास अधिक सोयीची आहेत. जवळही आहेत. स्वतःची गाडी असल्यास ह्या पर्यायाचा नक्की विचार करा. स्वतःची गाडीच नाही ! कश्मीर ते कन्याकुमारी भुवनेश्वर ते जेसलमेर सर्व भारत, एवढेच काय , इटली,फ्रान्स, स्वीस देखील रेल्वे प्रवास करूनच पाहिले आहेत. एकूण ३० वर्षात एकही प्रवास टूर ओपरेटर वापरून केला नाही.

MipaPremiYogesh's picture

4 Jan 2021 - 6:43 pm | MipaPremiYogesh

वाह कमालीचे सुंदर आहे. आपल्याकडची मंदिरं पण अशीच जपायला हवीत.

उपयोगी पडतं ट्रिप प्लान करताना.

एखाद्या ठिकाणाबद्दल तुम्ही कुठेतरी वाचता, कुणाकडून तरी ऐकता किंवा त्याची एखादी झलक पाहता आणि ते ठिकाण तुमच्या मनाच्या एका कोप-यात कुठेतरी आत जाऊन बसतं.

अगदी अगदी 👍
लाक्कुंदी / लक्कुंडी बद्दल हा लेख वाचूनच समजले आणि ते आवडलेही! सगळे नवे/जुने फोटो पण मस्त.

चौथा कोनाडा's picture

8 Jan 2021 - 5:37 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर !
वर्णन आणि प्रचि, एक नंबर !