स्मृतींची चाळता पाने --अनगाव-२

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
20 Nov 2020 - 1:46 pm

आधीचे भाग
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
स्मृतींची चाळता पाने -अनगाव

अनगावच्या शाळेतील माझ्या मैत्रिणी म्हणजे शेजारीच राहणाऱ्या मंदा/उषा लेले, सुशी साठे,लीला ओक वगैरे वर्गातील मुली.गावात मला सगळेजण बाईंची मुलगी म्हणूनच ओळखत असत.आईशिवाय आमच्या शाळेत लीलाताई गोडबोले, फडकेबाई,केतकर मास्तर असे चांगले शिक्षक होते. शाळा मराठी ७वी पर्यंतच होती. आता मात्र गावातील लोकांनी ही शाळा मोठी बांधली आहे आणि भव्य इमारत, बारावीपर्यंत कॉलेज अशी मोठी वस्तू असून आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी सुद्धा शिकायला येतात. माझे इतक्यात तिकडे जाणे झाले नसले तरी लवकरच तिथे जायचा योग्य येवो अशी इच्छा करते व आईच्या स्मरणार्थ काही देणगीही देईन म्हणते.

अनगावच्या शाळेत मी ५वी ते ७वी अशी ३ वर्षे होते. आणि ती वर्षे खूपच मजेत गेली. सुट्टीत दुपारी काचपाणी, सागरगोटे, पत्ते, सोंगट्या असे बैठे खेळ आम्ही खेळात असू तर सायंकाळी समिती(संघ) च्या मोठ्या मुली आमचे खेळ घेत असत ज्यात लेझीम ,विविध व्यायाम असत आणि शाखा भरताना आणि सुटताना प्रार्थना होत असे व वेगवेगळी माहिती मिळत असे. दररोज रात्री मी आणि घाणेकरांची मुलगी आम्ही कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत असू व नंतर झोपाळ्यावर बसून कविता पाठ करत असू. शिवाय त्यांची २ लहान मुले व आम्ही राहिलेल्या वेळात गाण्याच्या भेंड्या वगैरे लावत असू. मी महिना व दिवाळीच्या सुट्टीत बहुतेकदा मुंबईची पाव्हणी मंडळी येत किंवा कोणाची मुले मुंबईला शिकायला असत ती येत असत. अनगावला आमच्या शेजारीच भावेतात्या राहत होते व त्यांचे घर खूपच मोठे होते तसेच मोठा भाजीचा मळा होता. भावे आजी आजोबा सर्व कारभार बघत. मळ्यातील विहिरीला रहात गाडगे होते ते वापरून सर्व बागेला पाणी दिले जाई. विहिरीजवळच एक मोठी दगडी धोंड/डोण होती त्यात आम्ही सर्व लहान मुले डुंबत असू. त्यांची मुले/नातवंडे कुठेतरी बाहेर राहत असत व फक्त सुट्टी मध्ये राहायला येत असत. त्यावेळी आम्ही सर्वजण त्यांच्या अंगणात खूप मजा मस्ती करत असू. त्यांच्याशी बोलताना नवनवीन माहिती समजत असे व ते सर्व ऐकून खूपच कुतूहल वाटत असे.राणीचा बाग ,बस, ट्राम घोडागाडी, म्हातारीचा बूट, वाळकेश्वर,महालक्ष्मी वगैरे देवळे इत्यादी वर्णन ऐकताना मस्त वेळ जाई. आमच्याकडेही सुट्टीत माझे काका काकू मामा मामी मावशी वगैरे येत असत आणि त्यांचे आगत स्वागत करण्यात मजा येई. यावेळी माझी मोठी बहीण विमल मात्र काका-काकूंबरोबर ठाण्यालाच राहत होती. ती ठाणे येथे गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कुलमध्ये ८ वी मध्ये शिकत होती व तिचा शाळेत नेहमी पहिला नंबर असे. बीजगणित व भूमिती हे तिचे आवडते विषय होते आणि वर्गातील किंवा चाळीतील मुलेमुली गणितात काहीही अडले तर तिला विचारायला येत असत. पुढे तिला रिझर्व बँकेत चांगली नोकरी मिळाली.

अनगावला आमच्या शेजारीच भावेतात्या राहत होते व त्यांचे घर खूपच मोठे होते तसेच मोठा भाजीचा मळा होता. भावे आजी आजोबा सर्व कारभार बघत. मळ्यातील विहिरीला रहात गाडगे होते ते वापरून सर्व बागेला पाणी दिले जाई. विहिरीजवळच एक मोठी दगडी धोंड/डोण होती त्यात आम्ही सर्व लहान मुले डुंबत असू. त्यांची मुले/नातवंडे कुठेतरी बाहेर राहत असत व फक्त सुट्टी मध्ये राहायला येत असत. त्यावेळी आम्ही सर्वजण त्यांच्या अंगणात खूप मजा मस्ती करत असू.
आमच्याकडे तेव्हा फार जास्त ताटे वाट्या भांडी वगैरे नव्हती पण गरज लागल्यास घाणेकर कुटुंबाकडून आम्ही भांडी आणत असू व माजघरात बसून सगळेजण जेवत होतो.कधी कधी घाणेकर काकू व त्यांची मुलेही आमच्याबरोबर जेवत.भाडेकरू-मालक असे संबंध आमच्यात कधीच नव्हते. एक दिवस सुट्टीमध्ये आम्ही सर्वजण मुले व मोठी माणसे मिळून २ घोडागाडी करून गणेशपुरी येथील गरम पाण्याची कुंडे ,वज्रेश्वरी देवी व इतर परिसर बघण्यासाठी निघालो. त्यावेळी तिथे हॉटेल्स वगैरे नव्हती त्यामुळे सकाळी ७ वाजता पुरीभाजी ,चटणी ,पाणी व इतर काही पदार्थ घेऊन आमची सहल सुरु झाली. घोडागाडीचे भाडे फक्त २०-२५ रुपये होते. दिवसभर गप्पा गोष्टी करून, फिरून सायंकाळी ६ वाजेपर्यंत परत आलो. त्यावेळी वज्रेश्वरी पर्यंत खाजगी बसेस होत्या पण त्यांची वेळ ठरलेली नसे. १९६० च्या सुमारास एस. टी. बसेस सुरु झाल्या पण त्या आधी ठाणे ते अनगाव खाजगी बसने प्रवास करत असू आणि तिकीट २-३ रुपये होते.

माझी खास मैत्रीण मंदा लेले हिचे घर म्हणजे मोठा चौसोपी वाडा होता. माडीवर ५-६ खोल्या होत्या तिथे आम्ही परीक्षेच्या वेळी अभ्यासाला बसायचो. रात्री कंदिलाच्या प्रकाशात थोडाच वेळ अभ्यास आणि बराच वेळ गप्पा गोष्टी असा कार्यक्रम असे. खरेतर परीक्षा या गोष्टीची जास्त कल्पनाच नव्हती. केंद्राची सातवीची परीक्षा म्हणजे पहिली मोठी परीक्षा. तोवर पासापुरते गुण मिळाले तरी बस असे वाटत असे. जेव्हा सातवीच्या परीक्षेसाठी १९५२ साली ठाणे केंद्रावर गेलो तेव्हा खरेतर भीतीच जास्त वाटत होती. शहरातील शाळेची सवय नव्हती आणि आम्ही ८-१० मुली आणि १५-२० मुलगे परीक्षेला बसलो होतो. मी व मंदा जेमतेम पास झालो व बरेचसे मुलगे नापास झाले. आता मला ८वी साठी मोठ्या शाळेत घालायला हवे म्हणून आईने ठाणे किंवा आसपास बदली मिळावी म्हणून अर्ज केला.त्यामुळे तिला मुलुंड जवळ नाहूर रोड येथील मराठी शाळेत बदली मिळाली व आम्ही दोघी जड अंत:करणाने अनगावचा निरोप घेऊन ठाण्याला काकांकडे राहावयास आलो. ठाण्याला मो.ह. विद्यालयात मला ८ वी साठी प्रवेश मिळाला व माझे हायस्कुलचे शिक्षण सुरु झाले(क्रमशः)

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

केदार पाटणकर's picture

23 Nov 2020 - 12:13 pm | केदार पाटणकर

लेखन रसाळ आहे.