.

दोघे आपण...!!

Primary tabs

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
7 Nov 2020 - 3:53 pm

दोघे आपण...!!

परिणय आपुला, हे नवजीवन,
त्यास प्रीतीचे, अनुपम कोंदण,
जगा वेगळा वाटे साजण,
तरी, दोन ध्रुवांवर दोघे आपण..

मनी बांधते मखमली तोरण,
छोटे घरकुल, मोठे अंगण,
अनुरागाचे त्या, मधुर शिंपण,
पण, दोन ध्रुवांवर दोघे आपण..

दोन मनांची नाजूक गुंफण,
जना मनाचे सुरेख बंधन,
विवेक करितो अभिनव कुंपण,
कां, दोन ध्रुवांवर दोघे आपण..

दोन जीवांचे एकच बंधन,
सुगंधी नाते, जणु ते चंदन,
आता उरले अबोल क्रंदन,
दोन ध्रुवांवर दोघे आपण..

कलहामधुनि सदैव घर्षण,
संघर्षाचे चर्वित चर्वण,
कुठे हरवले ते आकर्षण,
दोन ध्रुवांवर दोघे आपण..

संसारी या एक उणेपण,
आनंदाची भासे चणचण,
वादविवादाची ती तणतण,
दोन ध्रुवांवर दोघे आपण..

दुःखाने जरी अश्रू दाटती,
मनसंयम करी नयनी राखण,
करावेच का विचार मंथन,
दोन ध्रुवांवर दोघे आपण..

उभयतांच्या सुखी क्षणांचे,
मनात चाले अविरत चिंतन,
वैचारिक ती दरी भराया,
तडजोडीचे घालू लिंपण,

गतस्मृतींची करुनी आठवण,
क्षमाशील मग होऊ आपण,
एकच होतो दोघे आपण..
एकच होऊ दोघे आपण..!!

जयगंधा..
७-११-२०२०.

कविता

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

7 Nov 2020 - 4:20 pm | संजय क्षीरसागर

शेवटही सुरेख झाला आहे.

एकच होतो दोघे आपण..
एकच होऊ दोघे आपण..!!

Jayagandha Bhatkhande's picture

10 Nov 2020 - 12:53 pm | Jayagandha Bhat...

धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

10 Nov 2020 - 1:44 pm | प्राची अश्विनी

कविता आवडली.
पण प्रत्यक्षात आणणं कठीण आहे.

VRINDA MOGHE's picture

12 Nov 2020 - 12:08 pm | VRINDA MOGHE

खुपच छान !
एकच होतो दोघे आपण
एकच होऊ दोघे आपण ...मस्तच !

Jayagandha Bhatkhande's picture

13 Nov 2020 - 8:24 pm | Jayagandha Bhat...
Jayagandha Bhatkhande's picture

13 Nov 2020 - 8:25 pm | Jayagandha Bhat...