आपुले मरण पाहिले म्या..

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
7 Nov 2020 - 10:58 am

मला काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला व एंजिओप्लास्टी झाली. त्या अनुभवाविषयी लिहिले आहे. चार भागात पैकी हा पहिला .

आपुले मरण. २२ऑगस्ट २०२०.

सुरुवात नक्की कधी आणि कशी झाली,माहित नाही. १६\१७ ऑगस्ट २०२०ची रात्र असावी. छातीत उजव्या बाजूला अगदी वर ,गळ्याचे खाली भरून आल्यासारखे जाणवले. थोडे दाबल्यावर बरे वाटले. नंतर रोज रात्री कमी जास्त प्रमाणात तोच प्रकार. पाठ  दंड हात चोळून घेतले की ठीक व्हायचे .दिवसा मात्र काही नाही. ॲसिडिटी  होते अधूनमधून. अस्थमा ही आहे.गॅसेसचा त्रास आहे.त्यामूळे किंवा वातविकाराने होत असावे हा समज झाला. शुक्रवारी सकाळी नियमित योगासने, प्राणायाम ,ध्यान केले.शनिवारी गणेश चतुर्थी,आणि नंतर महालक्ष्मीचा सण, त्यासाठी  बाजारात जाऊन काही खरेदी व बॅंकांची कामेही केली .संध्याकाळी गणपतीच्या मखराची सजावट ही केली. शुक्रवारी मध्यरात्री नंतर परत तोच त्रास सुरू. सकाळी काही घरगुती उपाय केले, पण फरक नाही .शनिवारी गणपतीची प्रतिष्ठापना होती त्रास सुरूच .काही तरी गडबड असावी असे  वाटले. मुंबईच्या डॉक्टर मित्राने लगेच तपासणी करण्याचा सल्ला दिला. डॉ.हेडगेवार रुग्णालयातील डॉ.रंजना देशमुखांना फोन केला, त्या रजेवर होत्या.त्यांनीही  लगेच  हॉस्पिटलमध्ये जाण्यास सल्ला दिला. दुपारी तीन पर्यंतच डॉक्टर  उपलब्ध होते, म्हणून तिकडे सुचनाही दिल्या. दोन वाजत आले होते. मुलाने (अनुप)लगेच गाडी काढली .बेंगलूरचे साडूंनी फोन वरून डॉ.हेडगेवार रुग्णालयात त्यांचे परिचयातील डॉ.फाटकांशी संपर्क करून ,मी तिकडे येतअसल्याचे कळवले  .

रुग्णालयातील कॅज्युअलटी विभागा समोर उतरलो. अनुप गाडी पार्क करायला गेला. स्वतः चालत आत गेलो. काय त्रास होतो ते सांगितले. स्टाफने लगेच बेडवर झोपवले .ईसीजी काढून  डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन गेले. मी निर्धास्त होतो. नक्की वाताचा प्रकार असणार हा आशावाद. तेवढ्यात डॉ.फाटक स्वतःईसीजी रिपोर्ट घेऊन आले. "तुमच्या सोबत कोण आहे?केव्हा पासून त्रास होतो? एवढा उशीर का केला?तुम्हाला हार्ट एटैक येऊन गेला आहे. आता इथे राहावे लागेल. सोमवारी एंजिओग्राफी करून मग काय ते ठरवू. "_डॉक्टर.

मलाआणि हार्ट एटैक? धक्काच होता. विश्वास बसत नव्हता. पण काय करणार? आलीया भोगासी असावे सादर. वास्तव स्विकारले. बेडवर पडून राहिलो.
रुग्णालयात दाखल करायची प्रक्रिया करण्यासाठी अनुप गेला. मला काही औषधे देण्यात आली. काही वेळात उलटी झाली. अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अस्थम्याचा एटैक  असावा असे वाटले. इनहेलर स्प्रे घेतला. पण फरक नाही. तोंडाने श्वास घ्यायचा, प्राणायाम करायचा प्रयत्न केला .पण उपयोग नाही .त्रास खूप वाढला.स्टाफ ची धावपळ सुरू झाली . ऑक्सीजन सिलिंडर आणले, मास्क लावला. तरीही सारे असह्य होऊ लागले. 'लगेच आयसीयू  मधे घ्या'
कुणी तरी ओरडले. तेव्हा अडीच वाजले असावेत. आयसीयूच्या वाटेवर, बेडवरून घाईघाईने घेऊन नेताना आजू बाजूचे लोक पाहात होते. श्वास घेण्याचा प्रयत्न करत होतो. एरवी सहजपणे  नकळत ये जा करणारा श्वास, तो घेणे आज मोठे दुष्कर होत होते .जीवाची घालमेल होत होती.एकतीस वर्षापूर्वीची वसंत काकांची(माझे वडिल)शेवटच्या क्षणांतली तगमग आठवली.

मरणाचे दारात उभे आहोत का आपण?
'आपुले मरण पाहिले म्या डोळा'म्हणजे हेच का?

किती श्वास उरले असतील? हे शेवटचेच काही असतील का? प्रत्येकाचे आयुष्यात कधीतरी हा क्षण येणारच. माझ्या आयुष्यात आता आला. त्याला सामोरे जायला हवे. नीलू,अनुप, रुचा,मैत्रू , राहूल पत्नी ,मुलगा,मुलगी,नातू ,जावाई आणि इतर जवळच्या लोकांचे चेहरे समोर आले. एवढाच ऋणानुबंध होता का यांच्याशी या जन्मी? हा विचार डोक्यात आला. काळजी मात्र नव्हती अन भितीही नव्हती.आणि मग एकदम सगळीकडे काळोख ,अंधार.
(क्रमश:)

नीलकंठदेशमुख .
nilkanthvd1@gmail.com
8793838080

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

7 Nov 2020 - 11:04 am | कंजूस

पुढचे भाग वाचेनच. आता काही त्रास नाही ना?

नीलकंठ देशमुख's picture

7 Nov 2020 - 11:17 am | नीलकंठ देशमुख

आता एकदम व्यवस्थित. म्हणून लिहीता झालो. धन्यवाद

बाप्पू's picture

7 Nov 2020 - 11:17 am | बाप्पू

पुढचे भाग लवकर टाका..
काळजी घ्या. आता कशी आहे तब्येत.. ??

नीलकंठ देशमुख's picture

7 Nov 2020 - 11:18 am | नीलकंठ देशमुख

आता एकदम व्यवस्थित. म्हणून लिहीता झालो

बाप्पू's picture

8 Nov 2020 - 10:22 am | बाप्पू

ओके.. छान.!!
काळजी घ्या..

प्रकाश घाटपांडे's picture

7 Nov 2020 - 11:27 am | प्रकाश घाटपांडे

माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ अभय बंग यांचे पुस्तक खूपच गाजले. ते आठवले

नीलकंठ देशमुख's picture

7 Nov 2020 - 11:33 am | नीलकंठ देशमुख

त्या विषयी ऐकून होतो आता मागवले आहे. अजून वाचले नाही

संजय क्षीरसागर's picture

7 Nov 2020 - 1:41 pm | संजय क्षीरसागर

आता वाचकांना जास्त वेळ श्वास रोखून धरायला लावू नका ! पुढचे भाग लगेच टाका.

लेखनाचं पॅराग्राफिंग पण व्यवस्थित होतंय !

नीलकंठ देशमुख's picture

7 Nov 2020 - 2:23 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
रोज एक भाग टाकत आहे

कंजूस's picture

7 Nov 2020 - 2:06 pm | कंजूस

साक्षात्कारी हृदयरोग - डॉ अभय बंग यांचे पुस्तक
त्या अगोदर दिवाळी अंकांत ( कालनिर्णय) लेख आलेला.
थोडक्यात 'उंची-वजन-कोलेस्टराल वगैरेचे सुरक्षित सीमारेषेचे त्राटक ( table ) 'प्रचलित होते ते परदेशी लोकांचे इथे खपवले जात होते. त्याप्रमाणे बंग सेफ समजत होते. हार्ट अट्याकनंतर चिकित्सा केली. कोणते अंक सेफ धरायला पाहिजेत.
----------------
सोप्या शारिरीक टेस्ट ( व्यायामाच्या) आहेत त्यावरून प्रत्येक जण आपापली प्रकृती ढासळत आहे का अजमावू शकतो. सहा सहा महिन्यांनी करत राहिल्यास वय वाढत जाते तसे दम कधी लागतो हे ताडून पाहता येईल. तो एक इंडिकेटर आहे.
----------------------
योगासनांबद्दल न बोललेलंच बरं कारण याचे क्लासेस चालवणारेही हार्ट अट्यकने उताणे पडल्याची उदाहरणे पाहिली आहेत. म्हणजे ते प्रिवेटिंव आहेच असं मानता येत नाही. तर रोग झाल्यावर काय अपेक्षा ठेवणार?

प्रकाश घाटपांडे's picture

8 Nov 2020 - 9:47 am | प्रकाश घाटपांडे

योगासनांबद्दल न बोललेलंच बरं कारण याचे क्लासेस चालवणारेही हार्ट अट्यकने उताणे पडल्याची उदाहरणे पाहिली आहेत

त्याच बरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांवर हृदयशस्त्रक्रिया करणारे हृदयरोग सर्जन डॉ नीतू मांडके देखील हार्ट अ‍ॅटॅकनेच गेले.प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे १०० टक्के खात्रीशीर उपाय नव्हेत

सिरुसेरि's picture

8 Nov 2020 - 11:22 pm | सिरुसेरि

वास्तववादी अनुभव कथन . काळ आला होता पण सुदैवाने वेळ आली नव्हती . काळजी घ्या . शुभेच्छा .

लेख वाचुन असे वाटते की , औषधे घेतल्यावर उलटी होणे , श्वसनाचा त्रास हे त्रास सुरु झाले . ही त्या औषधांची अ‍ॅलर्जी / रिअ‍ॅक्शन होती का ?

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 7:36 pm | नीलकंठ देशमुख

नाही. ह्रदयविकाराचा प्रक्रिया अगोदर सुरू झाली होती. ती थांबवण्यास औषधे दिली. पण काहींना ती लागू पडत नाहीत. मी त्यातला.

श्रीरंग_जोशी's picture

9 Nov 2020 - 10:32 am | श्रीरंग_जोशी

हृदयविकाराच्या धक्क्यातून वाचल्याबद्दल आपले अभिनंदन. तसेच हा अनुभव इतरांसाठी लिहिल्याबद्द्ल धन्यवाद.

डॉ.हेडगेवार रुग्णालय म्हणजे अमरावतीच्या मुधोळकर पेठेतले का?

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 7:37 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. हे औरंगाबाद चे डॉ.हेडगेवार रुग्णालय

तुमचे तब्येत आता व्यवस्थित आहे अशी आशा करतो. पुलेशु.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 7:38 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

प्रसाद गोडबोले's picture

9 Nov 2020 - 11:43 am | प्रसाद गोडबोले

छान !

लेखनासाठी शुभेच्छा !

पण हे असे अर्धवट अभंग क्वोट करुन वापरलेले पाहिल्यावर मला जरा विचित्रच वाटते - संपुर्ण अभंग असा आहे :

आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥1॥
आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥
एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥2॥
फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥3॥
नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥4॥
तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥5॥

लेखकाचे पुढील लेखातील अनुभव " तो जाला सोहळा अनुपम्य" किंवा " आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला" ह्या धाटणीचे असतील तर ही लेखमालिका वाचायला मजा येणार !!

राघव's picture

9 Nov 2020 - 5:06 pm | राघव

@धागाकर्ता, लेखन छान. तब्येतीची काळजी घ्या. पण जो अभंग वापरलाय त्याचा संदर्भ वेगळा आहे, एवढे नमूद करतो. :-)

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 7:52 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
केवळ आकर्षक मथळा होणेसाठी मी ते स्वातंत्र्य घैतले. शेवटचा चवथा भाग वाचावा.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 7:45 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. मी फक्त या लेखाचा मथळा आकर्षक व्हावा या हेतूने ती ओळ
वापरली. इतरत्र अनेकांनी वापरल्याचे वाचण्यात होते.
माझ्या त्या लेखातील अनुभवाशी सुयोग्य वाटली.
माझे लेखमालेचा शेवटचा भाग आपण वाचावा .कदाचित मी फार विचित्र पणा केला असे वाटू नये.
शेवटी नम्रपणे नमुद करतो..
मज पामरासी काय थोरपण.
पायीची वहाण पायी बरी.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 7:56 pm | नीलकंठ देशमुख

या लेकमालेचा चवथा शेवटचा भाग वाचून कदाचित हे फार विचित्र वाटू नये.मी बहुतेक आपल्या प्रतिक्रिये वर ऊत्तर चुकीने दुसरे एका प्रतिक्रिये खाली दिले असावे. ती प्रतिक्रिया वाचावी.

अनुभव योग्य शब्दात व्यक्त केल्या मुळे त्याचा परिणाम होण्याची तीव्रता जास्त आहे.
पुढचा भाग लवकर टाका.
माझा पण असाच अनुभव आहे पण खूप च वेगळा.
आणि काही नवीन माहिती मिळेल म्हणून इथे देत आहे.
आढवड्या मधून 2 वेळा तरी ड्रिंक करण्याची सवय लागली होती .
आणि ही सवय आमच्या सौ ना सहन होणे शक्यच नव्हते.
त्यांनी फॅमिली डॉक्टर च्या सल्यानी दारू सुटण्याचे आयुर्वेदिक औषधं मागवलं गुपचूप .
ती पुडी मधील पावडर ते गुपचूप देत असत .
आणि मी घरीच होतो त्यांनी ते औषध दिले गुपचूप आणि मी पण खाली जावून गुपचूप ड्रिंक केली.
आणि नंतर.
श्वास हळू झाला,बैचेन वाटायला लागले,शरीराला घाम फुटल अस्वस्थ वाटायला लागले.
काहीच समजेना असे वाटायला लागले.
मला हार्ट अटॅक ची भीती वाटायला लागलो.
सौ आणि मुलगा दोघे घाबरले.
Dr ना घरी बोलावून घेतले Bp normal.
Dr confuse.
तरी त्यांनी सल्ला दिला काही नाही आराम करा.
पण मी खूपच भीती च्या छायेत होतो .
हार्ट स्पेशल लिस्ट कडे आम्ही सर्व हॉस्पिटल मध्ये दाखल झालो.
व्हील chair च वापरावी लागली.
लगेच ecg, केला गेला रिपोर्ट नॉर्मल.
हार्ट beat normal.
अटॅक येवून गेला आहे का त्याची टेस्ट केली ती नॉर्मल .
पण मला श्वास घेण्यास त्रास होतच होता.
कोणतेच औषध dr ni दिले नाही.
आणि साक्षात्कार झाल्या सारखं दारू सोडण्याचे औषद दिले होते आणि मी ड्रिंक केली हे आठवले .
Dr ना हे सांगितल्यावर चांगलीच माझी हजामत त्यांनी केली.
पण काही वेळ dr हैराण झाले होते नक्की झालंय काय.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 7:48 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. आपला अनुभव विलक्षण आहे.
मांडला पण परिणाम कारक रितीने. आपल्या घरची मंडळी आपल्या बाबतीत आपल्या पेक्षा जास्त संवेदनशील असतात. असे जिथे असते ते भाग्यवान. मी तसा आहे.