स्मरण रंजन ४

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
24 Oct 2020 - 9:36 am

स्मरण रंजन
रेडिओ( ४)

कोई लौटा दे मेरे...

   ज्या फिलीप्स रेडिओ चा ऊल्लेख केला  तो  कालौघात
कुठे गेला लक्षात नाही. गावतल्या घरी त्याची जागा ट्रांझिस्टर ने  घेतली.
त्याचा  वेगळा रुबाब. सेलवर चालणारा.
कातडी वेष्टण.
स्टीलच्या काड्याचे खालीवर करता येणारे
एरिअल. कुठेही घेऊन जा. शेतात पण.
'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.'
एके संध्याकाळी शेतात पं.भीमसेनजी आणि
बालमुरली कृष्णन यांची जुगलबंदी ऐकल्याचे आठवते.

     त्या काळी लग्नात  हुंडा म्हणून
' रेडू ' ,'घडी, 'सायकल 'इ.मागायची  प्रथा.
त्याचा परिणाम म्हणून
  गुराखी  मुले  व  औत हाकणारी मंडळी ही 
बगलेत ट्रांझिस्टर अडकवून जे 'चालू' आहे ,
ते मोठ्या आवाजात ऐकत असलेली
दिसू  लागली.
तेव्हा पासून 'त्याला 'घराबाहेर काढणे बंद
 
रात्री  उशीरा  पांघरुणात ट्रांझिस्टर वर गाणी
ऐकत पडणे ही परमसुखाची पर्वणीच.
   टीव्ही चे आगमन झाले नव्हते.
रेडिओ वरच क्रिकेट चे धावते वर्णन .
हिंदीत सुरेश सरैय्या,नरोत्तम पुरी,जगदेव सींग
( हे हॉकी आणि  प्रजासत्ताक दिनाची परेड स्पेशालिस्ट)ईंग्रजीत विजय मर्चंट,
अनंत सेटलवाड,बालू अलगनन, मराठीत
बाळ ज.पंडित हे प्रसिद्ध समालोचक.
अजूनही बरेच.
ऑस्ट्रेलिया ,न्यूझीलंड मधे  भल्या पहाटे सामने सुरू.
त्यासाठी रात्रीच रेडिओ कुशीत.
     एकोणीसशे त्र्याऐंशीचा विश्वचषक जिंकला
ते सामने पण रेडिओवरच ऐकले.

नंतर पॉकेट रेडिओ आला.
खास क्रिकेट साठी.
प्रवासात पण बरोबर.
वकील असताना  कोर्टात पण खिशात.
बाररुम मधे मित्रांचे कोंडाळ्यात कॉमेंट्री.
एक न्यायाधीश क्रिकेट प्रेमी. त्यांना माझ्याकडे
रेडिओ असल्याचे कळले. डायस वरुन
स्कोअर साठी शिपाया मार्फत निरोप.
मधल्या सुट्टीत तर  त्यांचा शिपाई येऊन
रेडिओ घेऊन जाई. मग तो दिसताच लपावे लागे.

  पूढे   न्यायाधीश म्हणून नोकरीत लागलो ,तेव्हा
सामने असताना स्वतः चा पॉकेट रेडिओ चेंबर मधे.
मधल्या सुट्टीत ऐकायला.

  
त्या काळात   टेप रेकॉर्डर  सिडी सहज उपलब्ध होऊ लागले.
हवे ते गाणे  हवे तेव्हा मिळण्याची सोय.
ते आता दर्शन दुर्मिळ सुंदरी या कॅटेगरीत राहिले नाही.
जबाबदारी वाढली. कामे ही  वाढली .
    दरम्यान  टीव्ही ने सगळीकडे पाय पसरले होते .
करमणूकीचे क्षेत्रात एक क्रांतीच.
सामाजिक,कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात अमुलाग्र बदल. संध्याकाळ टीव्ही समोर.
रेडिओ साठी  वेगळा वेळ नव्हता.
गरज ही नव्हती.
तो मागे पडत गेला. अडगळीत. दुर्लक्षित.
मोठेपणी  व्यापात गुंतल्यावर बालपणीचा मित्र
दुरावतो तसा.
  हल्ली  मोबाईल,मधे ही रेडिओ.
पण ऐकायला सवड कुणाला?
  पण अजून ही खूप लोक रेडिओशी आपले नाते
टिकवून आहेत. रेडिओतील सुर हीच भुपाळी
अन रात्री त्या सुरांचेच अंगाई गीत .
त्यांचे कौतुक .

एकदा प्रवासात कार मधे रेडिओ लावला  .
जुनी गाणी .
आशाताईंचे
'ये रंगीन महेफिल..'
किती,किती वर्षांनी कानावर.
झपाटल्यासारखं झाले.
  जुन्या  दिवसांचे स्मरण.
त्या काळात अनेक छोट्या छोट्या गोष्टींच
किती अप्रुप का असे?,
साध्या साध्या गोष्टीत आनंद का मिळत असे?
याचं उत्तर यात होते का?
माहिती नाही. 
पण,
कालचक्र रिवाइंड करावे,
ते दिवस परत यावेत,
असे  मात्र वाटले.

ना कसली जबाबदारी.
ना चिंता.
ना तणाव.
जवळ रेडिओ असावा .
आवडती गाणी असावीत.
आणि आपण असावे.
तेंव्हा सारखे...
'कोई लौटा दे मेरे बिते हुए  दिन..'.

          नीलकंठ देशमुख   .
            ८७९३८३८०८०.
nilkanthvd1@gmail.com

    

मुक्तकलेख