पन्हाळघरदुर्ग ( Panhalghar Fort)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
2 Oct 2020 - 11:58 am

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडच का निवडला ह्यामागे अनेक भौगोलिक कारणं आहेत. रायगडाच्या चोहोबाजूंनी मानगड, दौलतगड पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची प्रभावळ असल्याने युध्दशास्त्राच्या दृष्टीने रायगड अधिकच बळकट झाला होता. या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. रायगडाभोवती उभा केलेले किल्ल्यांचे कडे नीट अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल कि मानगड ते दौलतगड या दरम्यान कोणता गड दिसत नाही. वास्तविक मुंबई, सुरतकडून येण्याचा मार्ग नागोठणे-पाली- कोलाड-पाणेसे असा होता, याचा अर्थ या बाजूने मोघली किंवा ईंग्रजांचा हल्ला झाला तर रायगडाला सावध करण्यासाठी शिवकाळात निश्चित किल्ला असावा असा आढाखा बांधून पुण्याचे दुर्ग अभ्यासक श्री.सचिन जोशी यांनी जि.पी.एस.च्या सहाय्याने या परिसराचा शोध घेतला.पुढे लोणेरेजवळच्या एका डोंगराचा आकार किल्ल्यासारखा आहे, हे लक्षात आल्यावर प्रत्यक्ष पहाणी केली. किल्ल्याला आवश्यक असणारे अवशेष आहेत अशी खात्री झाल्यानंतर एका नवीन किल्ल्याचा शोध लागल्याचे जाहीर केले गेले. अर्थात मुळ किल्ल्याला कागदोपत्री काय नाव आहे, याची कल्पना नसल्याने पायथ्याच्या पन्हाळघर गावावरुन त्याला पन्हाळघरचा किल्ला हे नाव देण्यात आले. सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगांच्या गर्दीत हा लहानसा किल्ला आजही आपले स्थान टिकवून आहे.

      मुळात गडाचे नक्की नाव काय आहे, याचीच कल्पना नसल्याने या गडाचा इतिहास सांगता येणार नाही. तसेच पन्हाळघर दुर्गाची निर्मिती ही नेमकी कोणत्या काळात झाली हे ही सांगणे शक्य नाही. तरीही हा किल्ला रायगडाच्या घेर्‍यात असल्याने राजधानीचा उपदुर्ग म्हणुन नक्कीच असणार.पन्हाळघर किल्ला ते रायगड हे अंतर फक्त १२ किलोमीटर एवढेच आहे (हे दोन किल्ल्यामधील थेट अंतर आहे. महामार्गवरून नव्हे). तसेच पन्हाळघर गावातून एक वाट गावापाठीमागच्या डोंगरधारेवरून सरळ रायगड खोर्‍यात उतरते व तिथून रायगड किल्ल्यावर जाते. गडाचे छोटेखानी आकारमान पाहता येथे मोजकी शिबंदी ठेऊन रायगडाला जाण्याच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजेच टेहळणीसाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असेल.पायथ्याचे पन्हाळघर गाव शिवकालीन असले पाहीजे कारण ह्या गावावर रायगडावरच्या घरांना पावसात लागणारे झाप (गवताच्या पेंढ्या) पुरवण्याची जबाबदारी होती. बहुदा पन्हाळघर किल्ल्याच्या किल्लेदारावर ह्या कामावर देखरेख करायची जबाबदारी दिलेली असेल. पन्हाळघर गाव तसेच आजूबाजूला खूप मोठा गवताळ भाग आहे त्यावरून रायगडावरच्या सर्व घरांना येथून गवत पुरवठा करता येऊ शकत असावा.
       माणगाव तालुक्यात असलेल्या पन्हाळघरला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे गाव गाठावे लागते. अर्थात फक्त पन्हाळघर किल्ला पहाण्यासाठी वेगळी मोहीम आखण्यापेक्षा या भागातील सोनगड, मानगड, दासगावचा किल्ला आणि त्याच्या जोडीला हा पन्हाळघर पाहील्यास बरेच गड खात्यावर जमा होतील.मुंबई - गोवा महामार्गावर माणगाव व महाडच्या मध्ये माणगावपासून ८ किमी वर लोणेरे गाव आहे. लोणेरे गावातून पन्हाळघर हे पन्हाळघरच्या पायथ्याचे गाव ५ किमी वर आहे. लोणेरे हे येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमुळे प्रसिध्द आहे.


लोणेरे फाट्यावरुन मोठ्या प्रमाणात रिक्षा आपल्याला युनिव्हर्सिटीकडे जाणार्‍या दिसतात.मात्र फार क्वचित रिक्षा पन्हाळघरकडे जातात.एकतर आपल्याला स्पेशल रिक्षा ठरवून पन्हाळघरकडे जावे लागते किंवा युनिव्हर्सिटीकडे जाणारी रिक्षा घेउन पन्हाळघर फाट्याला उतरुन चालत गड गाठावा लागतो.

      पुण्यावरुन यायचे झाल्यास ताम्हिणी घाट उतरून माणगाव येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागताच माणगाववरुन लोणेरेला येउ शकतो. हे गाव सुरु होण्याच्या फक्त ५०० मीटर आधी डावीकडे एक रस्ता पन्हाळघर नावाच्या छोट्या पाड्याकडे जातो.

 येथे पन्हाळघर नावाचे बुद्रुक आणि खुर्द असे दोन पाडे असून त्यापैकी पन्हाळघर खुर्द येथून किल्ल्यावर जाणारी मळलेली पायवाट आहे. पन्हाळघर खुर्द गावात किल्ल्याकडे तोंड करून उभे राहिल्यास डोंगराच्या पायथ्याशी अलीकडेच बसवलेल्या काळ्या रंगाच्या दोन सिंटेक्स टाक्या दिसतात. या टाक्यांच्या अगदी शेजारून एक मळलेली पायवाट किल्ल्यावर जाते.
      याशिवाय रेल्वेने ईथे यायचे झाल्यास कोकण रेल्वेची दिवा-मडगाव पॅसेंजर सकाळी ६,०० वाजता मुंबईवरुन सुटते,जी सकाळी १०:०० वाजता माणगावला पोहोचते. मानगड पाहून झाल्यावर लोणेरे गावाजवळील पन्हाळघर पाहून मडगाव दिवा पॅसेंजर (१७:०० वाजता) गोरेगाव स्थानकात पकडून परत येता येते.
     अर्थात सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वताच्या वहानाने या परिसराची भटकंतीचे नियोजन करणे. स्वत:च्या वाहनाने रात्री प्रवास करुन पहाटे माणगावला पोहचल्यास मानगड, कुर्डूगड, पन्हाळघर एकाच दिवशी पाहाता येतात, पण त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते.


 किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ४८५ फुट आहे. किल्ल्याची उंची जरी कमी असली तरी किल्ल्यावर जाणारी पायवाट मात्र खड्या चढणीची आणि दम काढणारी आहे.
 
गडाच्या खालील भागात असलेली तटबंदी, बुरुज व दरवाजा पुर्णपणे नष्ट झालेला असुन या वाटेने अर्ध्या तासात आपण एका लहानशा सपाटीवर येऊन पोहोचतो.

येथे समोरच खडकात खोदलेली तीन पाण्याची टाकी आपले लक्ष वेधून घेतात. या सर्व टाक्यात फक्त पावसाळ्यातच पाणी साठते. इतरवेळी ही टाकी एकतर गाळाने भरलेली किंवा कोरडी ठणठणीत असतात.या टाक्यांच्या काठावर बांबू रोवण्यासाठी खळगे दिसुन येतात. उघडय़ावर असलेल्या टाक्यांतील पाण्याचे सूर्यप्रकाश किंवा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होते. ते कमी करण्यासाठी टाक्यांच्या बाजूला बऱ्याचदा कातळात काही भोके खोदलेली दिसतात. या भोकांचा उपयोग बांबू रोवण्यासाठी केला जात असे. बांबू रोवून त्यावर कापडाचे आच्छादन टाकल्यामुळे पाण्याचे झाडाझुडपांचा केरकचरा आणि बाष्पीभवनापासून संरक्षण होत असे. या टाक्यांना लागुनच दगडांचा एक चर बांधलेला असून तो थोड्या अंतरावर डोंगराच्या नाळेपर्यंत नेलेला आहे. याचे प्रयोजन मात्र लक्षात येत नाही.
  टाक्याच्या पुढील भागात काही प्रमाणात तटबंदीचे दगड पहायला मिळतात. टाकी पाहुन पुढे आल्यावर या वाटेचे दोन भाग होतात. एक वाट सरळ वरच्या बाजुला जाते तर दुसरी वाट डावीकडे समांतर वळते. डावीकडील वाटेने कड्याला वळसा मारून सरळ पुढे आल्यावर मातीत बुजलेले अजुन एक टाके दिसते.
 
 येथुन वर पहिले असता समोर डोंगर कड्यावर एका उंच लोखंडी खांबावर भगवा ध्वज फडकताना दिसतो. हे टाके पाहुन आल्या वाटेने मागे फिरावे व ध्वजस्तंभाकडे जावे.
 
 या ध्वजस्तंभाच्या उजवीकडे कड्याला लागुनच कातळात खोदलेले अजुन एक टाके असुन त्याशेजारी मातीत बुजलेले दुसरे टाके आहे. गडावर पाण्याची एकुण ६ टाकी पहायला मिळतात.  ध्वजस्तंभाकडून वर जाणारी वाट आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथ्यावर एका वास्तुचा चौथरा व तुरळक तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. गडाला फेरी मारत उत्तर बाजुला गेले असता या टोकावर बुरुजाचे अवशेष दिसुन येतात. समुद्रसपाटीपासून  490 फुट उंचीच्या या बुरुजावरून रायगड किल्ल्याचे सुंदर दर्शन होते.

बुरुजाशेजारील वाटेने गडाखाली उतरता येते. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. पायथ्यापासुन माथ्यापर्यंत यायला व परत जाण्यासाठी दोन तास पुरेसे होतात.गडावर अवशेष जरी मोजकेच असले तरी, हे अवशेष भयंकर वाढलेल्या झाडीझुडपात शोधणे म्हणजे थोडे अवघड काम आहे. गडाच्या उत्तर बाजुच्या दरीत  बाबासाहेब आंबेड्कर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा परिसर पसरला आहे.         गडावर फार कोणी दुर्गप्रेमी येत नाहीत. याच गडाचा परिसरात बाबासाहेब आंबेड्कर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे. दर १९ फेब्रुवारीला शिवज्योत नेण्यासाठी विध्यार्थी येथे येतात. आधी फक्त येथे गुराखी त्यांची गुरे घेउन चारायसाठी यायचे. त्यांची गुरे पाण्याच्या टाकीत पडायला लागली, म्हणून त्यांनी गडावरची टाकी बुजवली.    एकंदरीत अचानक हरवलेला हा गड उजेडात आल्याने या परिसरातील भटकंतीत याला भेट द्यायलाच हवी.

   संदर्भः-
१) www.durgbharari.com   हि वेबसाईट
२) www.trekshitiz.com   हि वेबसाईट
३) रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव- श्री. सचिन जोशी

प्रतिक्रिया

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Oct 2020 - 8:26 pm | स्वच्छंदी_मनोज

या पन्हळघर गावाचे शिवकालात फार उपयोगी महत्व होते कारण या आणी आजूबाजूच्या इतर गावच्या भागातून रायगडावर पाउसकाळात घर गोठ्यांवर बांधल्या जाणार्‍या गवती छपरांकरता गवताचे भारे जायचे. या भागात खुप मोठा गवताळी मैदानी प्रदेश असल्याने इतके मुबलक गवत त्याकाळी इतरत्र उपलब्ध नसावे.

आणी याच पन्हळघर गावापाठच्या डोंगररांगेवरुन पुढे चालत गेलो की पलीकडे आपण महाड-रायगड रस्त्यावरील मेढा गावात उतरतो. खुप पुर्वी मी हा ट्रेक दोन वेळा केलाय आणी पुढे मेढा कोंझर मार्गे रायगडला चालत गेलोय त्यामुळे इथल्या डोंगर रांगा परीचयाच्या आहेत. पण अर्थात त्याकाळी पन्हळगड उजेडात यायचा होता त्यामुळे पन्हळघर एक साधेसेच गाव होते.

चौथा कोनाडा's picture

12 Oct 2020 - 4:28 pm | चौथा कोनाडा

पन्हाळघरदुर्गची माहिती प्रथमच वाचण्यात आली !
भारी लिहिलंय, तिकडं गेलं की गडाला भेट द्यायला हवी !

प्रचेतस's picture

12 Oct 2020 - 4:37 pm | प्रचेतस

हा लेख पण फार आवडला.

सतिश गावडे's picture

12 Oct 2020 - 7:33 pm | सतिश गावडे

माझ्या गावापासून मानगड सत्तावीस कीमी आहे तर हा पन्हाळघरदुर्ग फक्त अकरा किमी आहे. गडाच्या जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात मी चार वर्ष शिकलो. मात्र या गडाबद्दल कधीच ऐकले नव्हते.