"मित्रा"स पत्र...!!

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
27 Sep 2020 - 12:34 pm

*"मित्रा"स पत्र...!!*

आज *"रवि"* वार, माझा आवडता वार. रोजच्याप्रमाणे सकाळी, पक्षांच्या किलबिलाटाने लवकर जाग आली. लोळत बसण्याचा कंटाळा आहेच मला. पटकन चहा घेऊन तुझ्या आठवणीने माडीवर गेले. आजही तुझं दर्शन नशिबात दिसेना... मस्त ढगाळ हवा होती. गार वाराही सुटला होता... काय रे हे.....? किती वेळ वाट पाहू..? दोन दिवस झाले आपली भेटच होत नाहीये. नुसत्याच मनात आठवणी दाटून येत आहेत. डोळ्यासमोर येतोय तुझा तेजस्वी चेहरा.. सकाळी भेटतोस, तेव्हा नं तू अगदी नुकत्याच न्हाऊ-माखू घातलेल्या लहान बाळासारखा निरागस, लालचुटूक दिसतोस.. तेव्हा मला खूप आवडतोस.. पण आज मात्र.... *कशी केलीस माझी दैना, मला तुझ्या बिगर करमेना…* असं झालयं खरं. अरे मी उदास आहे ना, तशी झाडं, पशुपक्षी, लता वेली, सगळीच मला उदास वाटत आहेत. आपल्या रोजच्या गच्चीवरच्या भेटीचे तेही अबोल साक्षीदारच आहेत ना....!!
माझ्या जीवनात तुझं अनन्यसाधारण स्थान आहे. पण तुझं कौतुक करेकरे पर्यंत, तू इतकं रौद्ररूप धारण करतोस की कधी कधी ते मला सहन होत नाही. आणि कधी संध्याकाळचे पश्चिम क्षितीजावरचे मनोहर रंग पाहिले की तुझी आठवण जाता जात नाही.. आहेस कुठे तू ....? अरे श्रावणसरी सारखा अचानक ये ना... मग आपणही झाडांमागे नेहमीचा लपंडाव खेळू...!! बघ ही सरच तुझ्या आधी आली. आगंतुक कुठली...! माझं मन तुझ्या सयीत चिंब भिजवून गेली... आता या विरहानं, अन् गारव्यानं मी थरथरतेयं... प्रेमाची- मायेची उब, मला तुझ्याशिवाय देणार आहे तरी कोण...?? कुसुमाग्रजांच्या *"पृथ्वीच्या प्रेमगीतातील"* पृथ्वी सारखी थकले हं मी वाट पाहून....!!
तू ना, अगदी जगाचा राजा असल्यासारखं वागतोस... जी हुज़ूर म्हणून अगदी कमरेत वाकत अन्.. *ॐ मित्राय नमः।* असं म्हणत म्हणत, बारा नमस्कार सुद्धा केले रे मी...आणि पंचांगात पाहून उद्या सकाळी, ६.४३ वाजता आपल्या भेटीचा मूहूर्त सुद्धा काढलाय...!!
. .खरंतर माहित आहे मला, *अमर्याद "मित्रा" तुझी थोरवी अन् मला ज्ञात मी एक धूलिकण*.. पण तरीही आतुरतेने वाट बघते....
*जीवलगा, कधी रे येशील तू.....!!*

तुझीच,
...सृष्टी !!

जयगंधा...
१३-९-२०२०

कथालेख

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2020 - 6:03 pm | चौथा कोनाडा

*आमी नै ज्जा*

😒

(हेच मी कायप्पा आणि फेबुवर लै वेळा वाचलंय.
कॉपी पेस्ट वाल्यांनी वैताग आणलाय नुसता !
संपादक, प्लिज लक्ष द्या असल्या धाग्यांकडे !
हा कॉपीपेस्ट विषाणू कोरोना पेक्षा घातक आहे
असल्या धाग्यांच्या वरच्या विषाणूंनी मिपाचे सुज्ञवाचक लवकरच दगावतील)