जशी मराठीमध्ये ओवी, हिंदीमध्ये दोहा, तसा संस्कृतमध्ये अनुष्टुप छंद मला खूप लवचिक आणि सार्वत्रिक वाटतो. अनुष्टुप संस्कृतमध्येच नव्हे तर मराठीमध्ये लिहिण्यासाठीही खूप सोयीचा आहे. सगळ्यांच्या ओळखीची भीमरूपी वापरून हा सोपा छंद स्पष्ट करायचा हा प्रयत्न. लघु गुरु यांची तोंडओळख आपल्याला असेलच असं मानून पुढचं लिखाण आहे.
परंपरेनुसार अशी त्याची लक्षणे दिल्यामुळे तो विनाकारण अवघड वाटतो-
श्लोके षष्ठं गुरु ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम्।
द्विचतुष्पादयोर्ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥
ह्याचा आकृतिबंध सोपा करून दिला तर असा दिसेल.
XXXX लगागागा
XXXX लगालगा {1}
XXXX लगागागा
XXXX लगालगा {2}
X म्हणजे लघु किंवा गुरू काहीही.
प्रत्येक चरणामध्ये आठ अक्षरे असतात, पण नेहमीच्या वापरामध्ये आपण दोन चरण एकत्र करून सोळा अक्षरांची एक ओळ घेतो. म्हणजेच वरचा आकृतिबंध असा दिसू शकतो-
XXXX लगागागा XXXX लगालगा {1}
XXXX लगागागा XXXX लगालगा {2}
आता XXXX च्याठिकाणी लघु आणि गुरुच्या वेगवेगळ्या योजना (कंसामध्ये) करून काही उदाहरणे पाहू.
1) (लगागागा) लगागागा, (लगागाल) लगालगा
मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे
2) (गालगागा) लगागागा, (गागागागा) लगालगा
कोटिच्या कोटि उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे
3) (गागालगा) लगागागा, (गालगागा) लगालगा
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा
4) (ललगाल) लगागागा, (गालगाल) लगालगा
धनधान्य पशूवृद्धी, पुत्र पौत्र समग्रही
5) काही ओळींमध्ये दोन लघु अक्षरे = एक गुरू असे मानून जास्त लवचिकता आणली आहे. उदा
(गालगागा) लगागागा, (गालगागा) लगालगा
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती
येथे 'हनु' या दोन लघु अक्षरांचा एक गुरु मानलेला आहे.
या काही उदाहरणांमुळे इतक्या सुडौलआणि लवचिक छंदाची थोडीशी भीती गेली असेल अशी आशा आहे.
प्रतिक्रिया
7 Aug 2020 - 7:16 pm | निनाद
इतक्या सुलभतेने उलगडून उदाहरणासहीत समजावून दिल्याने खरोखरच हा छंद समजायला मदत झाली.
गोष्टी सोप्या करण्याची हातोटी आहे तुमच्याकडे!
अनेकानेक धन्यवाद!
7 Aug 2020 - 11:59 pm | धष्टपुष्ट
अनुष्टुप छंद किंवा श्लोक याची उदाहरणं बहुशः संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत. आधीच बर्याच लोकांची लघु-गुरुमध्ये गल्लत होते, वरून अनेकांना संस्कृतची भीती, म्हणून भगवद्गीतेची उदाहरणं घेतली नाहीत. प्राकृतात असलेली सोपी उदाहरणं का वापरू नयेत अशा विचारानं हे लिहिलं.
खरंतर विनोबांच्या गीताई मध्ये पण खूप रसाळ उदाहरणं आहेत. पण काही लघु अक्षरं उच्चारताना लांबवल्यामुळे गुरू म्हणून वापरली जातात अशी जास्तीची गुंतागुंत आहे. म्हणून भीमरूपी मधली सोपी उदाहरणं घेतली.
पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता ।
या गीताईमधल्या उदाहरणामध्ये तेज हा शब्द तेजऽ असा लांबवल्यामुळे ज हे अक्षर गुरु बनते. याचा खुलासा करता करता लेख आटोपशीर राहिला नसता.
7 Aug 2020 - 11:29 pm | कानडाऊ योगेशु
रामदासस्वामींबद्दलचा आदर शतगुणित झाला. मनाचे श्लोक भुजंगप्रयात वृत्तात तर आणि ह्या लेखावरुन समजले कि भीमरुपी स्तोत्र अनुष्टुभ छंदात लिहिले आहे त्यांनी.
लेख आवडलाच हे.वे.सां.न.ल.
7 Aug 2020 - 11:38 pm | धष्टपुष्ट
"न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते" अशी गण लक्षात ठेवायची ओळ आहे. करुणाष्टकांच्या चालीवरच म्हणायची हे उघडच आहे.
पहिली सहा-सात अक्षरे ओळीने लघु असली पाहिजेत या अटीमुळे मालिनी वृत्तामध्ये लिहिणे अजून अवघड आहे.
8 Aug 2020 - 2:16 am | कानडाऊ योगेशु
अनुदिन अनुतापे तापलो रामराया
परमदीन दयाळा नीरसी मोहमाया
संतकवींच्या प्रतिभेने अगदी दिग्मूढ व्ह्यायला होते.!
8 Aug 2020 - 7:53 am | तुषार काळभोर
सहमत..
काव्य असलं पाहिजे, यमक, गेयता असली पाहिजे, अर्थ असला पाहिजे, भाव असला पाहिजे, आणि एवढं सांभाळून त्यात एका अक्षराची चूक होऊ न देता वृत्त असलं पाहिजे!!
कमाल!
8 Aug 2020 - 1:50 am | चित्रगुप्त
@धष्टपुष्ट: मराठी साहित्यात जास्त प्रचलित असणार्या इतर अनेक वॄत्तांबद्दल अवश्य लिहावे. वाचणाराला अजिबात काही माहिती नाही असे समजून सर्वात आधी एक परिचयात्मक लेख लिहून पुढे एकेका वॄत्ताबद्दल लिहीले तर जास्त उपयोगी होईल. माझ्यासारखे या विषयात रस असणारे, पण प्रत्यक्षात त्यातले फारसे कळत नसणारे अनेक जिज्ञासू इथे असतील, अशी खात्री आहे.
तसेच वामन पंडित, रघुनाथ पंडित, मोरोपंत, समर्थ रामदास इत्यादींच्या काव्याबद्दल सोदाहरण रसग्ररहणात्मक लेखही नक्की लिहा.
पुढील लेखनाबद्दल अनेक शुभेच्छा.
8 Aug 2020 - 7:28 am | संजय क्षीरसागर
प्रत्येक चरणामध्ये आठ अक्षरे असतात, पण नेहमीच्या वापरामध्ये आपण दोन चरण एकत्र करून सोळा अक्षरांची एक ओळ घेतो. म्हणजेच वरचा आकृतिबंध असा दिसू शकतो-
XXXX लगागागा XXXX लगालगा {1}
XXXX लगागागा XXXX लगालगा {2}
वरचा आकृतीबंध >
१. (लगागागा) लगागागा, (लगागाल) लगालगा
२. (गालगागा) लगागागा, (गागागागा) लगालगा
३. (गागालगा) लगागागा, (गालगागा) लगालगा
४. (ललगाल) लगागागा, (गालगाल) लगालगा
कुठेच फॉलो होतांना दिसत नाही, फक्त लगालगा शेवटी येतंय.
का हे समजून घेण्याचा काही वेगळा प्रकार आहे ?
8 Aug 2020 - 8:20 am | धष्टपुष्ट
खाली फोड करून दोन उदाहरणे देतोय.
(लगागागा) लगागागा, (लगागाल) लगालगा
मनासीटा किलेमागे, गतीसीतु लनानसे
(गागालगा) लगागागा, (गालगागा) लगालगा
आरक्तदे खिलेडोळा, ग्रासिलेसू र्यमंडळा
8 Aug 2020 - 9:40 am | संजय क्षीरसागर
पण हा पॅटर्न >
XXXX लगागागा XXXX लगालगा {1}
XXXX लगागागा XXXX लगालगा {2}
कुठे येतो ? ल आणि गा च्या जागा बदलत जातात
तुमचा प्रतिसाद बघा : (लगागागा) लगागागा, (लगागाल) लगालगा
१. ऑर्डरमधे लगालगा ऐवजी लगागागा आलंय,
२. अंडर लाईन केलेला क्रम कुठेही नाही
8 Aug 2020 - 10:33 am | धष्टपुष्ट
लनानसे हे लगालगा असंच आहे ना. आणि गतीसीतु हे पण लगागाल असंच आहे की.
कुठेतरी आपल्या तारा जुळत नाहीयेत काय? :)
8 Aug 2020 - 11:40 am | संजय क्षीरसागर
१. लनानसे हे लगालगा असंच आहे ना > हे बरोबरे पण
२. गतीसीतु हे पण लगागाल असंच आहे की > हा लगागाल प्रकार
लगागागा लगालगा {1}
लगागागा लगालगा {2}
यात कुठेच नाही शिवाय ते वरील क्रमानंच यायला हवं ना ?
8 Aug 2020 - 1:48 pm | धष्टपुष्ट
XXXX लगागागा XXXX लगालगा.
जिथे XXXX असं लिहिलं आहे, तिथे लघु गुरुची कुठलीही चार अक्षरी योजना करता येते. ललगाल, लगागागा, लगागाल, गागालगा, गालगागा असलं काही पण चालतं.
त्याचे वेगवेगळे पर्याय कंसामध्ये लिहिले आहेत, आणि या पर्यायांची भीमरूपी मधली उदाहरणं दिली आहेत. आता पहा बरं?
8 Aug 2020 - 3:03 pm | संजय क्षीरसागर
अनुष्टुप छंदात अशी अक्षर योजना असायला हवी :
१,२,३,४ > काहीही
५,६,७,८ > लगागागा
९,१०,११,१२ > काहीही
१३,१४,१५,१६ >लगालगा
बरोबर ना ?
हे स्वप्न की हसे तीचा चेहरा, चैनना मला
8 Aug 2020 - 3:21 pm | धष्टपुष्ट
आता चैन पडेल!
8 Aug 2020 - 3:46 pm | संजय क्षीरसागर
हे स्वप्न की हसे तीचा चेहरा, चैनना मला
चंद्र हा माझा की भासे, सखे तुझी कलाकला |
8 Aug 2020 - 12:08 pm | प्रमोद देर्देकर
@ धष्टपुष्ट साहेब,
तुमचा व्य.नि. पहा जरा.
8 Aug 2020 - 8:29 pm | Gk
अनुष्टुभ छंद हा मात्रा छंद आहे की केवळ अक्षर संख्या छंद ?
माझ्या मते , अनुष्टुभ छंद अन मात्राचा काही संबंध नाही , 8 वर्ण / अक्षरे घेऊन 4 चरण रचले की अनुष्टुभ छंद होतो. म्हणजे टोटल 32 अक्षरे
अनुष्टुभ हा छंद वाल्मिकी ऋषींनी सर्व प्रथम वापरला
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।
8 , 8 , 8 , 8
त्या आधी तो वापरायची पद्धत नव्हती,
पण तरीही एका वेगळ्या रुपात तो ऋग्वेदापासून वापरला आहे , तो म्हणजे गायत्री छंद , ज्यात गायत्री मंत्र आहे , यात 8 , 8 , 8 अशा तीनच ओळी असतात ,लिहिताना 3 ओळी , पण प्रत्यक्ष यज्ञ कर्मात तीन ओळी मुख्य ऋषीने म्हटल्या की शेवटची ओळ संपूर्ण टीम पुन्हा म्हणत असे
म्हणजे लिहिताना 8,8,8 आणि म्हणताना 8,8,8,8
पण असा 8बाय 4 चा एक नवा छंद वापरून त्यातही काही लिहावे , ही प्रथा नव्हती , म्हणूनच ऋग्वेदात गायत्री छंद विपुल आहे , पण अनुष्टुभ छंद फारसा नाही, वाल्मीकीच्या स्फुरण्याने तो सर्वप्रथम अस्तित्वात आला आणि त्यामुळेच ऋग्वेदातील अनुष्टुभ ऋचा ह्या प्रक्षिप्त किंवा अर्वाचीन मानतात
तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्
( मूळचा ऋग्वेदातील गायत्री मंत्र इतकाच आहे, ते ओम वगैरे नंतर लावले आहे)
हा गायत्री छंद , 7,8,8 ( 7 अपवादात्मक आहे, त्यामुळे काही लोक म्हणताना हलकेसे र्वरेSण्यं - रे लांबवून म्हणतात , युपी बिहार वाले हिंदीवाले तर सरळसरळ वरेणियम् म्हणतात , शेवटच्या ओळीतील पाय मोडकी अर्धा त मोजायची पद्धत नव्हती , म्हणून तेही चरण 8 चे)
शेवटची ओळ पुन्हा रिपीट केली की ,
तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्
धियो यो नः प्रचोदयात्
हे भीमरूपीच्या चालीत बसेल.
दुसरे उदाहरण , ऋग्वेद पहिली ऋचा
अग्निमीळे पुरोहितं
यज्ञस्य देवमृत्विजम् ।
होतारं रत्नधातमम् ॥
हा गायत्री छंद 8 , 8 , 8
म्हणताना तिसरी ओळ रिपीट करून 8 , 8,8,8 केलेत की तोच अनुष्टुभ छंद होईल.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय //
हापण टिपिकल अनुष्टुभ छंद आहे
वर म्हटले तसे गायत्री छंदात एखाद दुसरे अक्षर / मात्रा कमी जास्त असले तर त्या छंदानाही निचृद्-गायत्री छंद वगैरे नावे आहेत , पण ते गायत्रीचेच प्रकार मानतात , गायत्री मंत्र खरे तर ह्यात येतो , पण पहिले चरण ओढूनताणून ते गायत्रीत 'बसवतात'
9 Aug 2020 - 12:04 am | संजय क्षीरसागर
या अँगलनं पण बघायला हवं.
तुम्हाला मोगा खान वगैरे म्हणणार्यांनी हा प्रतिसाद आवर्जून वाचायला हवा.
9 Aug 2020 - 10:00 am | धष्टपुष्ट
तपशीलवार प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अनुष्टुप हा छंद आहे आणि वृत्त नाही. वृत्तामध्ये अक्षरगणवृत्त (बंधाग्रही) आणि मात्रावृत्त (थोडा अधिक लवचिक) असे प्रकार असतात, पण माझ्या माहितीप्रमाणे छंद वृत्तापेक्षा अधिक लवचिक असतो. म्हणून ओवी हा एक छंद प्रकार आहे, वृत्त नाही.
मला गायत्री आणि त्रिष्टुभ याबद्दल जिज्ञासा आहे; ज्ञान नाही. अनुष्टुभ छंदाचा आकृतिबंध (XXXX लगगागा XXXX लगालगा, XXXX लगगागा XXXX लगालगा) वरकरणी पाहता गायत्री छंदाची शेवटची ओळ पुन्हा गायली असता अनुष्टुभ बनेल असे वाटत नाही.
तुम्ही दिलेलं उदाहरण भीमरुपी चालीत मला म्हणता आलं नाही. त्रिष्टुभ व गायत्री या छंदांबद्दल अजून खुलासा करता येईल काय? चर्चेमध्ये खोली आणि रंग आणल्याबद्दल धन्यवाद.
वेगळा विषय - कोणाला आर्या वृत्ताची चाल माहिती आहे काय?
9 Aug 2020 - 12:22 pm | Gk
अग्निमीळे पुरोहितं
यज्ञस्य देवमृत्विजम् ।
होतारं रत्नधातमम् ॥
होतारं रत्नधातमम् ॥
भीमरूपीच्या चालीत म्हणून बघा.
गायत्री छंदात गायत्री मंत्र आहे , त्याची निर्मिती महर्षी विश्वामित्र ऋषींनी केली असे म्हणतात , सकाळी नदीवर सूर्याला पाहून त्यांना गायत्री मंत्र स्फुरला
10 Aug 2020 - 3:57 am | रातराणी
मस्त!! शाळेत असताना फक्त मार्क मिळवण्यापुरताच अभ्यास केला होता. पण आत्ता मजा वाटली हे समजून घ्यायला, नवीन लेखाच्या प्रतीक्षेत :)