पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ४ )

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
28 Jul 2020 - 8:41 pm

या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ३ )

पौर्णिमेच्या रात्रीचा पहिला प्रहर उलटून गेला होता.सज्जाकोठीजवळ सहाशे बांदल सेना शस्त्रास्त्रांसह सज्ज होउन निघायच्या तयारीत होती.आज स्वराज्याचे प्राण त्यांना आपल्या खांद्यावर वाहून न्यायचे होते. आजच्या त्यांच्या कामगिरीवर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलक्ष्मीच्या कुंकवाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. शिवरायांसाठी पालखीची व्यवस्था केली होती. इतक्यात राजे तिथे आले आणि सगळ्यांचा निरोप घेउ लागले "आम्ही आता येथून जातो.पुढचे राजकारण तडीला नेण्यासाठी आमची येथून सुटका जरुरीची आहे.आमच्या माघारी आपण सर्वजण हा गड सांभाळाल असा आम्हाला विश्वास आहे.त्रिंबकपंत गडाची चोख व्यवस्था ठेवतील. गोदाजी,हिरोजी,सिदोजी दुष्मनाला तसुभरही वर चढू देणार नाहीत याची खात्री आहे.आपण आमची चिंता न धरावी.आई भवानी आम्हाला यश देईल.भवानीच्या कृपेने गनीमाची फौज आज रात्री आदिमायेच्या मोहजालात असेल आणि आम्ही वेढा पार करुन सुखरुप जाउ".एकाचवेळी काळजीने धास्तावलेले मन कसेबसे काबु करुन आणि राजे सुखरुप जावेत यासाठी वारंवार हात जोडत सर्वजण आपआपल्या तैनात केलेल्या जागेवर परतले. मावळ्यांनी पालखी उचलली आणि कोणताही आवाज न करता सहाशे जणांची ती सेना राजदिंडीची वाट जवळ करु लागली. वरुन पावसाची संततधार सुरु होती.ढगांच्या आडून अस्पष्ट चंद्रप्रकाश सगळीकडे पडला होता.गडाचे बुरुज मागे पडले आणि राजदिंडीच्या वाटेवरच्या चिखलात सहाशे जणांच्या पायाचा चप्प चप्प आवाज येउ लागला.गड उतरायला सुरवात झाली तसे न रहावून बाजी महाराजांना म्हणाले, "महाराज ! नेमका काय मनसुबा आहे. चाळीस हजाराच्या फौजेचा वेढा आहे.कसा ओलांडायचा आपण? बर बरोबर सहाशे जणं आहेत. त्यात हा तुफान पाउस आणि चिखलाने भरलेली वाट"
"त्याचा विचार झालेला आहे.आपण चिंता करु नये बाजी. एकतर आम्ही शरण येउन तह करण्याची बातमी वेढ्यात पसरवल्यामुळे कंटाळलेली फौज आज नक्कीच बेसावध असणार आहे. शिवाय आणखी एक मह्त्वाची चाल आम्ही खेळली आहे. विजापुरच्या फौजेकडून रुस्तमेजमान आला तेव्हाच आम्हाला एक आशा होती.अहो, त्याच्याच कुडाळ, आचरा, खारेपाटण या मुलुखावर हल्ला करुन आम्ही तो प्रदेश काबीज केला तरी त्याने विरोध केला नाही. आम्हीही त्याला त्याचा फायदा दिला.कोल्हापुरला रुस्तम फाझलखानाबरोबर आला, तेव्हा आमच्या समोरुनच तो पाच-सहा सैनिकांबरोबर पळाला.दुसरा एखादा सरदार असता तर एव्हाना आमच्या जगंदबेखाली आला असता. आज पुन्हा एकदा रुस्तम आपल्या मदतीला आला आहे. पन्हाळा आणि हे मसाई पठार जोडणार्‍या धारेवर आज जी फौज तैनात आहे, ती सर्व रुस्तमची आहे.आपल्या एकाही शिपायाला तलवारीचा घाव काय, साधे बोटही लागणार नाही, याची खात्री आहे.मागे शिवाला फकीराच्या वेशात पाठवून आम्ही रुस्तमशी संधान बांधून हा बेत ठरवला आणि आजचा दिवसही मुक्रर केला. पण हा बेत पन्हाळ्यावर सगळ्यांसमोर सांगणे धोक्याचे होते.पन्हाळ्यावर एखादा जरी विजापुरचा हेर असेल तर सगळा बेत फसण्याचा धोका होता, शिवाय रुस्तमही अडचणीत आला असता. हा शिवाजी त्याच्या मित्राला कधी धोका देत नाही आणि शत्रुवर कधी विश्वास ठेवत नाही.आपण वेढापार होणार याबध्दल निश्चिंत रहा बाजी! आम्हाला स्वराज्याचे एक एक माणुस मोलाचे आहे.एकाही माणसाला गमवायची आमची तयारी नाही".
राजांच्या या दुरदृष्टीवर, नियोजनावर आणि कार्याला वाहून घेण्याच्या गुणावर बाजी थक्क झाले.असा राजा आपल्याला लाभला हे परमभाग्यच. खणखणीत आवाजात त्यांनी मावळ्यांना पावले उचलायचा हुकुम केला.
गडाचा निम्मा उतार संपला आणि पन्हाळगड व मसाईपठार जोडणारी धार जवळ आली.पहारा जवळ आला. प्रत्येक मावळ्याला आपल्याच उरातील धडधड स्पष्ट एकु येत होती, कोणाच्या पायात काटा मोडला तरी निमुटपणे सहन केले जात होते. आपल्याच पायाचा चिखलात होणारा आवाज मोठा वाटत होता. आणि वेढा जवळ आला.प्रत्येकजण मनात आई भवानीला साकडं घालत होता, शंभु महादेवाला विनवत होता. आणि काय आश्चर्य ? वेढ्याच्या जागेवर हशम नव्हतेच, कोणी पहारेकरी आसपास नव्हते.सहाशे मावळ्यांचे जीव एकदमच भांड्यात पडले.आता वेगाने उतरायचे होते. सर्वजण पन्हाळगडाचा उतार पार करुन सपाटीला आले.आता म्हाळूंगे गाव गाठून तिथून मसाईच्या पठारावर चढायचे होते. हा टप्पा पार केला तर विशाळगडाचा पायथा गाठेपर्यंत चिंता करायचे कारण नव्हते,ईतक्यात _ _ _ _ _ _ _
घात झाला ! म्हाळूंगे गावाच्या दिशेने गेलेल्या काही आदिलशाही सैनिकांनी या तुकडीला बघीतले.पोषाखावरुन हे आपल्या फौजेतील नसून मराठे आहेत, हे त्यांच्या लक्षात आले आणि घाईघाईने ते आजुबाजुच्या शेतात गडप झाले. विजापुरच्या काही सैनिकांनी आपल्याला पळताना पाहिले, हे आघाडीवरच्या मावळ्यांच्या लक्षात आले.पण काही हालचाल करायच्या आत ते आजुबाजूच्या झाडीत गडप झाल्याने त्यांची तिथेच खांडोळी करायचा मौका गेला. आता वेळ घालवून उपयोग नव्हता. हि बातमी पटकन बांदल सेनेत पसरली आणि वेगात ते सर्व जण म्हाळूंगे मागे टाकून मसाईच्या पठारावर पोहचले.
आज उत्तररात्र झाली तरी सिद्दी जोहरची छावणी जागी होती. जोहरच्या शामियानात फाझल, मसुद, सादतखान, भाईखान एकत्र जमले होते. मोठा खुशीचा माहोल होता.उद्या सिवा ताब्यात आला की लगेच विजापुरला रवाना व्हायचे आणि सिवाला दरबारात उभे केले आपली जबाबदारी संपली, हा मनसुबा जोहर रचत होता. अब्बुजानच्या कत्लचा बदला घेतला याचे समाधान फाझलच्या चेहर्‍यावर होते, तर एकदाची ही मोहीम संपली ह्या सुटकेच्या आनंदात बाकीचे होते. तहाच्या अटी काय असाव्यात याचा खल सुरु होता, तोच_ _ _ _
बाहेरुन काही हशम आरडाओरडा करत सिद्दीच्या छावणीच्या दिशेने आले. परवानगीची वाट न बघता ते धाड्कन तंबुत शिरले. त्यांची हि गुस्ताखी बघून जोहरला संताप आला.तो काही बोलणार तोच, त्यांनी एकच गोंधळ करत बोलायला सुरवात केली.
"काय झाले ? ईतका गोंधळ कशासाठी ? आधी थोडे शांत व्हा आणि एकेकाने नीट सांगा पाहू" फाझल त्यांचावर डाफरला.
"हुजूर ! क्या बताये, सिवा भाग गया" एक शिपाई कसाबसा धापा टाकत म्हणाला.
"क्या बकते हो ?सिवा भाग गया ? कैसे ?किले को हमने अभी भी पुरी तरह से घेर लिया है और इतनी फौज को धोका दे के सिवा कैसे भाग सकता है ?" आश्चर्याने थक्क झालेला फाझल म्हणाला.
"जी हुजूर्,सचमुच भाग गया, हम कुछ खानेपिने का सामान लाने के लिये म्हालुंगे गाव गये थे, परत येताना सिवाची फौज दिसली. मराठ्यांच्या पोषाखावरुन आम्ही ओळखले"
"क्या ?? तो सिवा सचमुच भाग गया! या अल्ला.अब मै क्या करु ? ये क्या हो गया ?अभी भी मुझे यकीन नही आ रहा है" जोहरचे डोळे खोबणीतून बाहेर येतील की काय असे वाटत होते,त्याला तीव्र धक्का बसला होता.हाताच्या मुठी वळवून तो आपल्याच कपाळावर मारत होता.रागारागाने त्याने आपला किमाँश डोक्यावरुन काढून जमीनीवर फेकला. चिडून पाय जमीनीवर आपटत तो इकडे तिकडे फेर्‍या मारु लागला.त्याचे क्रुध्द रुप बघून ते हशम घाबरले आणि मागच्या मागे कनातीतून पळून गेले.
थोड्यावेळाने जोहर धक्क्यातून सावरला.कसाबसा तो बैठकीवर बसला.दोन्ही हातात डोके गच्च धरुन मान खाली घालून बोलला, "या खुदा ! ये कैसा गजब है. पहेली ही मै बगावतखोर हू, एसा ईल्जाम मुझ पे है, हा कलंक धुवून काढण्याची हि नामी संधी होती.सिवा पळाल्याने आता बादशहा सलामत मला कडी से कडी सजा देणार. अब मै क्या करूं ? क्या करू ?"
"हौसला रखिये खानसाहब. मी तर आधीपासून सांगत होतो, सिवावर विश्वास ठेवू नका.दगाबाज आहे तो, माझ्या वालिदना गोड बोलून आणि घाबरल्यासारखे दाखवून त्याने असेच भुलवले आणि ठार मारले. तुम्ही त्याचा अजिबात यकीन करु नका असे वारंवार सांगत होतो.लेकीन आपने मेरी सुनी नही. अब अगर हम उसे पकड नही पाये तो हमारा जिंदा बचना मुष्कील है. हमारे वालिदने कल्याणी के किले मे औरंगजेब को एसेही जखड के रखा था. वो उसे मारना ही चाहते थे.पण खानजनानने त्या औरंगजेबाला सोडले, बडी बेगमला गुस्सा आला आणि विजापुरात खानजनान येत असतानाच त्याला मारला.आता आपलेही हाल तेच होणार आहेत.अजून वेळ गेलेली नाही.मी आणि मसुद त्या सिवाच्या मागे जातो. मसाई डोंगराकडून सिवा गेला म्हणजे तो विशाळागडाला गेला असणार.तिथे आपले सुर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर आहेतच. मसाई डोंगराकडची वाट कोणाला माहिती असल्यास तिकडून फौज पाठवतो.मसुद मलकापुरकडून घोडदळ घेउन जाईल.सिवाची फौज पायी चालली आहे,त्याना मलकापुरपाशी आपण अजूनही गाठू शकतो.लेकीन आप यही रहिये, कदाचित यातही त्या सिवाची काही चाल असेल, आपण सगळेच विशाळगडाकडे गेलो तर ईथे वेढ्यात कोणी असणार नाही, त्याचाच फायदा घेउन सिवा ईकडून पळून जायचा.चलो मसुद"
फत्तेखानाने तातडीने सुत्रे हाती घेतली.जोहरचा चेहरा मात्र साफ पडला होता.संतापाने थरथरत तो छावणीतून बाहेर पडला.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
रात्रीचा उत्तर प्रहर लोटून आता पुर्वेला तांबड फुटायला लागलं. पाउस मात्र उसंत घ्यायला तयार नव्ह्ता. सहाशे मावळ्यांची ती मृत्युला चकवा देणारी धाव अजूनही संपली नव्हती.सह्याद्रीचे आणि महाराष्ट्राचे प्राण विशाळगडाच्या कडेकोट तिजोरीत पोहचवल्याशिवाय ती संपणारही नव्हती. बर हि वाटचाल तरी सोपी होती का ? शत्रु मागावर असणार याची खात्री होतीच.पण तो कोठून हल्ला करणार काही माहिती नाही. एकवेळ नरकाची वाट सोपी अशी हि विशाळगडाकडे जाणारी आडवाट होती. जांगडभर चिखल, त्यात धड पाव कोससुध्दा सरळ नसणारी वळणाची वाट, मध्येच बांधावरून जायची तर कधी सुर्याचे किरणही खाली पोहचणार नाहीत अशी घनदाट झाडी, पर्जन्यकाळात ईथे जळवांचा मुक्त वावर, कधी पायावर चढली आणि आणि कधी रक्त प्यायला बसली कळायचे नाही, तीचा तरी काय दोष ? गेले तीनशे वर्ष पातशहा तरी काय वेगळ करत होते ? भरीला वाटेत येणारे कंबरभर पाण्याने फुफाटत वाहणारे ओढे, जरा पाउल चुकले कि क्षमा नाही, माणुस थेट धारेला लागणार. विशेष म्हणजे अश्या दुर्गम ठिकाणीही काही गाव वसली होती. झुंजार सह्यपुत्रांनी या अडचणीच्या भागातही वस्त्या उभारल्या होत्या.
या वाटेने जायचे म्हणजे माणुस कितीवेळ दम धरणार ? कधी चिखलात पाय घसरून आपटायचे भय, तर कधी बांधावरुन तोल जाउन पाण्यात बुडायचा धोका, शेवाळाने माखलेल्या दगडावर पाय पड्ला तर मुरगाळणे तर ठरलेले, दाट जंगलाने वेढलेल्या वाट कधी गुडूप व्हायची, बरोबर वाट सापडली तर ठिक नाही तर चकवा लागलाच म्हणून समजा. या वाटेने पावसात जायचे म्हणजे प्रत्यक्ष भुतांनाही भिती वाटावी. पण सह्याद्रीच्या भुतांना हि भिती नव्हती, त्यांच्यावर कामगिरीच तशी होती.
अश्या वाटेवरुन रात्रीची धावपळ करुन सहाशे मराठे अखेर पांढरपाण्याला पहाटे फटफटण्याच्या वेळी पोहचले. इथे मलकापुरकडून येणारी वाट अणुस्कुर्‍याकडे जात होती. आता दम नव्हता. पालखी पुढे पळत होती आणि कासारी नदीचे दरीतील पात्र समोर आले. पलिकडच्या तीरावर गजापुर होते. कासारी पावसाच्या पाण्याने तट्ट फुगली होती. पात्र मागे टाकून राजे आणि मराठे गजापुरच्या वेशीवर पोहचताहेत तोपर्यंत मागच्या डोंगर उतारावर घोड्यांचा टापा एकू येउ लागल्या.अखेरीस घात झाला तर ! रात्रभर दमलेली फौज घोड्यावरून बेभान होउन येणार्‍या आदिलशाही फौजेसमोर किती टिकाव धरणार होती ? अवघे सहाशे मावळे त्या लांडग्याना पुरे पडणार होते का ? मोठे प्रश्नचिन्ह होते. बाजींनी करड्या आवाजात आज्ञा दिली "पालखी थांबवा "
भोई झालेले मावळे थांबले.बाजींनी हि अशी आज्ञा का दिली ? सार्‍यांनाच प्रश्न पडला. महाराज पालखीतून उतरुन बाहेर आले आणि बाजींना विचारले, "काय झाले बाजी ? का थांबलात ?"
"महाराज ! प्रसंग मोठा बाका आला आहे.गनीम पळभरात आपल्याला गाठणार हे निश्चित आहे. विशाळगड तर अवघे चार कोस राहिला आहे. थोडक्यासाठी सगळीच मसलत वाया जाण्याचा धोका आहे. गनीम संख्येने किती आहे, आपल्याला ठाउक नाही, पण आपण वेढ्यातून निसटलो आहे, त्यामुळे आदिलशाही फौज चिडली असणार. तेव्हा सगळ्यांनीच ईथे थांबण्यापेक्षा निम्मी फौज घेउन महाराज, आपण पुढे विशाळगडाकडे जावे, आम्ही तीनशे बांदल घेउन ईथे गजापुरापाशी घोडखिंड आहे, तिथे उभारतो. खिंड चिंचोळी आहे, एकच वाट वर चढते.अश्या बिकट जागेवर शत्रु संख्येने कितीही असला तरी पुढे येउ शकणार नाही. आपण फक्त विशाळगडावर पोहचल्यावर तोफेचे बार करावेत.आपण सुरक्षित पोहचल्याची खात्री पटताच खिंड सोडून आजुबाजुच्या जंगलातील वाटेने विशाळगडावर आपल्या मुजर्‍याला येतो. " बाजी निश्चयाने म्हणाले.
"नाही बाजी, आम्हाला हे मान्य नाही.आपल्याला एकटे सोडून जाणे मनाला पटत नाही.अहो आपण ईतक्या अडचणीत जीवावरच्या संकटात एकत्रच ईथपर्यंत आलो. आता बाका प्रसंग आला आहे, तर मिळून लढू. जे होईल त्याला एकत्रच तोंड देउ. आम्हीही ईथेच ठाम उभे राहुन या शाही फौजेला तोंड देउ." महाराज निश्चयाने म्हणाले.
"नाही महाराज ! गनीम जास्त आहे.आपल्यासारखे लाख मोलाचे प्राण कित्येक वर्षांनी मराठी मुलुखाला लाभले आहेत, ते या अश्या लढायांना तोंड देण्यासाठी पणाला लावणे योग्य नाही.त्यासाठी हा बाजी आणि हे बांदल पुरेसे आहेत. महाराज, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशींदा जगला पाहीजे.आमची चिंता न धरावी.लहानपणापासून हे बांदला आम्ही पहातो आहोत. जिथे उभारतील तिथे शत्रुला अंगठा ठेउ देणार नाहीत. ह्या बाजीच्या कुडीत जोपर्यंत प्राण आहेत, तोपर्यंत हि खिंड ओलांडून एकही गनीम पलीकडे येणार नाही. आपण चलावे महाराज ! आपल्याला आई भवानीची शपथ आहे.आजचा दिवस या बाजीची आज्ञा आपल्याला मानावी लागेल"
महाराजांचा नाईलाज झाला.भर्रकन पालखी पुढे आली.एका क्षणाचीही उसंत नव्हती. राजांनी बाजींची गळाभेट घेतली आणि एकाच वाक्यात निरोप घेतला , "बाजी,आम्ही विशाळगडावर आपली वाट पहातो आहोत हे लक्षात घ्या,शक्य तितक्या लवकर विशाळगड जवळ करावा".
बघता बघता महाराजांची पालखी पावसाच्या झडीत वळणावर अदृष्य झाली.

क्रमशः

इतिहासलेख

प्रतिक्रिया

ईश्वरदास's picture

28 Jul 2020 - 9:59 pm | ईश्वरदास

या भागात संपूर्ण युद्धकांड येईल वाटलं होतं.‌ पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

पैलवान's picture

29 Jul 2020 - 6:33 am | पैलवान

जबरदस्त!!

बऱ्याच वर्षांपूर्वी समद माने यांचा एक वीर बाजी प्रभू देशपांडे नावाचा अॅनिमेशन व्हिडिओ पाहिलेला. एक फेसबुक पेज पण होतं. पुढं काय झालं काय माहिती. एकदम सुंदर व्हिडिओ होता.

शिवा काशीद चा उल्लेख कसा आला नाही यात

दुर्गविहारी's picture

29 Jul 2020 - 12:24 pm | दुर्गविहारी

उत्तम आणि अपेक्षित शंका. पुढचा भाग शेवटचा असेल. यानंतर या घटनेचा मुळं इतिहासावर सविस्तर स्पष्टीकरण देणारा वेगळा धागा काढणार आहे.

मराठी_माणूस's picture

30 Jul 2020 - 11:02 am | मराठी_माणूस

भाग ३ मधे तर उल्लेख आला आहे.

प्रचेतस's picture

29 Jul 2020 - 9:50 am | प्रचेतस

अप्रतिम.
खूप सुरेख लिहिलंय.

बेकार तरुण's picture

29 Jul 2020 - 1:16 pm | बेकार तरुण

फारच सुरेख लेखमाला चालु आहे...
खरच डोळ्यासमोर चित्र उभे करु शकता तुम्ही...

योगी९००'s picture

30 Jul 2020 - 10:29 am | योगी९००

सर्व भाग खूप सुरेख लिहीले आहेत...

रुस्तमेजमान सारख्या लोकांनी महाराजांना मदत केली हे खरे आहे का? आधी कधी ऐकले नव्हते. तसेच शिवा काशिद शिवाजी महाराजांचे सोंग घेऊन गेला त्याचाही उल्लेख नाही. (हे ही खरे आहे का?)

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jul 2020 - 3:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

शिवा काशीद चा उल्लेख मी सुध्दा शोधत होतो

तसेच अजून एक प्रश्ण बरेच दिवस पडला होता की महाराज पालखीत बसून का बर गेले असतील? त्या मुळे त्यांचा वेग कमी झाला असेल. ते जर बाकीच्या लोकांबरोबर चालत किंवा पळत गेले असते तर अजून वेगाने जाउ शकले असते.

पुढचा भाग बहुतेक फक्त बाजीप्रभुंचा असेल

पुभालटा

पैजारबुवा,

अश्या प्रसंगांमध्ये केवळ वेग नव्हे, तर एकूण सावधानता महत्वाची आहे. आणि एकंदर मोठ्या लढाईसाठी स्टॅमिना टिकवणे देखील..
विशाळगड चढताना हाच स्टॅमिना (शिल्लक ठेवलेला) कामी आला असेल.
तिथे देखील 2 गट केले असतील, ज्यामध्ये एक गट सेनेला खिंडार पाडेल आणि दुसरा निवडक 10-12 मावळ्यांचा गट राजांना घेऊन गडावर जाईल अशी योजना असणे अपेक्षित आहे. दुर्गविहारी काय म्हणतायत ते बघुयाच..

दुर्गविहारी's picture

31 Jul 2020 - 12:32 pm | दुर्गविहारी

शिवकालीन अस्सल साधनांपैकी एक म्हणजे कविंद्र परमानंद लिखीत शिवभारत.यात महाराज पालखीतून गेले असा स्पष्ट उल्लेख आहे.शिवाय बरोबर घोडे, खजीना घेतला असाही उल्लेख आहे. काही चमत्कारीक विधानेहि आहेत.म्हणजे शिवाजी महाराज गडावरुन खाली आले आणि सिद्दी जोहरला द्वंद युध्दाचे आवाहन केले.ते त्याने स्विकारले नाही, त्यामुळे ते गडावर परत गेले, त्यामुळे असे संदर्भ थोडे साक्षेपाने घ्यावे लागतात.
बाकी हि पन्हाळा ते विशाळगड हि वाटचाल फार मोठी होती, शिवाय वाटेत चिखल, पाय मुरगळण्याचा धोका, जळवा, ओढे ह्या सर्व शकयतांचा विचार करुन राजांना कोणताही धोका पोहचू नये म्हणून पालखीची योजना असावी.

कानडाऊ योगेशु's picture

30 Jul 2020 - 9:48 pm | कानडाऊ योगेशु

लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशींदा जगला पाहीजे

अजरामर वाक्य आहे हे.!

एस's picture

30 Jul 2020 - 10:18 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

बबन ताम्बे's picture

30 Jul 2020 - 10:59 pm | बबन ताम्बे

लेख वाचून शिवकाळात वावरतो आहे असे वाटते. पुढचा पावनखिंडीतील लढाईचा भाग असाच रोमांचित करणारा असणार !

सर्वच जाणकार सद्स्यांचे आणि असंख्य वाचकांचे मनापासून आभार. अश्या प्रतिसादामुळे लेखनाचा हुरुप वाढतो. धन्यवाद.