शेवटची चूक.

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
23 Jun 2020 - 9:57 am

शेवटची चूक.

प्रेम माणसाला किती असहाय बनवते नाही का ? आता माझ्या सारखा मध्यमवयीन माणूस आणि तो सुद्धा लंडन मधील एक प्रथितयश डॉक्टर असा कसा काय वागू शकतो? मी म्हणजे डॉक्टर राहुल.माझे लग्न झालेले आहे आणि एक अतिशय प्रेमळ आणि सुंदर बायको आहे मला .एक गोड मुलगी सुद्धा आहे. तीन वर्षाची . त्यांना जर हे सगळे कळले तर ते काय म्हणतील ? मी काही कामासाठी पुण्याला आलो आहे इतकेच त्यांना माहित आहे.
माझ्या बायकोला माझे लग्ना आधीचे प्रेम माहित आहे . मी लग्ना आधीच तिला रीना बद्दल सांगितले होते.
रीना. तिचे नाव घेतले तरी अजून पोटात कालवाकालव होते. तिला सुद्धा असेच होत असेल का ? एम बी बी एस च्या शेवटच्या वर्षी आमची भेट झाली. तो दिवस अजूनही मला लख्ख आठवतो आहे.शेवटच्या वर्षाचा पहिला दिवस. तास सुरु होत होता ,मी त्या विषयाची वही काढून बाकावर ठेवली होती.तेव्हड्यात एक मंजुळ आवाज माझ्या कानापाशी किणकिणला ..
“ May I sit here..?”
मी दचकून पाहिलं तर एक ठेंगणी ठुसकी ,काळी सावळी मुलगी मला विचारत होती. अतिशय गोड चेहरा, काळेभोर डोळे आणि चेहऱ्यावर एक बारीकसे स्मित हास्य ..आणि दोन्ही गालावर खळ्या. मी जरा गोंधळून गेलो आणि बहुतेक मी काहीच उत्तर दिले नसावे . तिने परत मला विचारले , आता मराठीत ,
“ मी इथे बसू का ? सगळा वर्ग जवळ जवळ भरून गेलाय ..”
“ हो ..हो ..बसा ना . by all means” असे काही तरी मी म्हणालो असेन . तिने आपली पुस्तके बाकावर ठेवली आणि आपली एक वेणी खांद्यावरून पुढे घेत ती माझ्या शेजारी बसली .
“ मी राहुल ..” मी माझी ओळख करून दिली.
“ मी रीना.” ती म्हणाली. तेव्हड्यात प्रोफेसर वर्गात आले आणि आमचे संभाषण तिथेच थांबले.
बहुतेक आम्ही दोघेही त्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडलो. आमचा नंतर बराच वाद व्हायचा ..पहिल्यांदा कोण कुणाच्या प्रेमात पडले ? मी का ती ? काय वेडेपणा ?
आणि आजचा हा वेडेपणा ? अगदी कहर आहे. काल मुंबई विमानतळावरून पुण्याला येताना किती वेळा तरी मनात विचार आला ,,परत जावे का लंडन ला ? रीना हे सगळे आता विसरून सुद्धा गेली असेल. फोन करावा का तिला ? आणि काय विचारणार तिला ?
“ काय ग ? तू तुझ्या संसारात सुखी आहेस ना ?”
मी Holiday Inn मध्ये पोचलो तरी ..माझे नक्की ठरत नव्हते. उद्या..१० जानेवारी २०१८. सकाळी १० वाजता सारस बागेत जायचे कि नाही ? रीना येईल का ? तिच्या लक्षात असेल का ?
खरे तर हि रीनाचीच कल्पना.
सारस बाग. आमचे भेटायचे आवडते ठिकाण. आम्ही जेव्हा शेवटचे भेटलो तेव्हा रीना किती भरभरून बोलत होती. मला तिची हि सवय माहित होती. ती खूप tense असेल तेव्हा ती खूप बडबड करायची . आणि ती काय बोलायची हे तिचे तिला बऱ्याच वेळा कळायचे नाही.
१० जानेवारी २०१३. सूर्य नुकताच मावळला असावा. संध्या छाया हळू हळू पसरत होत्या. माझ्या आयुष्यात अंधार असाच चोर पावलांनी शिरत होता का ? सारस बागेतील एका कोपऱ्यात हिरवळीवर बसून आम्ही दोघे ..एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दोघे .. आमचे पुढचे आयुष्य रेखाटायचा प्रयत्न करत होतो. ज्यात आम्ही दोघे एकमेकांजवळ नसू.
“ राहुल ,तू मला विसरू शकणार नाहीस हे मला माहित आहे ,तरी सांगते ,मला विसरून जा . माझ्या बहिणीच्या मुलांना माझी गरज आहे. “रीना मला सांगत होती. तिच्या थोरल्या बहिणीचे बाळंतपणात नुकतेच निधन झाले होते. मुल वाचले नव्हते आणि रीनाची बहिण सुद्धा वाचली नव्हती . तिला एक २ वर्षाचा मुलगा होता . आता तिच्या या लहान मुलाला कोण सांभाळणार ? म्हणून रीनाने आपल्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर लग्न करावे असे तिच्या वडिलांची सूचना होती. तिच्या बहिणीच्या नवऱ्याचे पाषाण मध्ये खूप मोठे हॉस्पिटल होते . रीनाचे शिक्षण संपले कि तिने सुद्धा तिथेच काम करावे असे सुद्धा ते म्हणत होते. रीनाच्या वडिलांनी जणू तिच्या जीवनाचा सगळा मार्ग ठरवला होता. खरे तर त्यांना आमचे प्रेम माहिती होते मग ते असे कसे करू शकतात?
“ मान्य आहे मला. त्या मुलाला तुझी गरज आहे .आणि मला तुझी गरज नाही ?. आपण त्याला सांभाळू .पाहिजे तर त्याला आपण दत्तक घेऊ पण हे अघोरी वागणे सोडून दे. रीना असे सिनेमात घडते ..आपल्या खऱ्या जीवनात असले काही नसते. “ मी कसा बसा म्हणालो. हे सगळे माझ्या समजुतीच्या बाहेरचे होते.
रीनाने माझा हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या गालावर ठेवला. तिच्या डोळ्यातील अश्रुने माझा हात ओला झाला.
“ हे अश्रू तुला काय सांगत आहेत राहुल ? मी हा निर्णय स्वखुशीने घेतला नाही. हा प्रसंग आलाय हे सत्य आहे. मला यातून दुसरा मार्ग दिसत नाही म्हणून मी हा निर्णय घेते आहे. आपल्या जीवनात असेच जर व्हायचे होते तर आपण भेटलोच का राहुल ? आणि आपण प्रेमात का पडलो ?”
“ नको रीना असा निर्णय नको घेउस. जीवनात बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात कि त्यावेळी घेतलेले निर्णय तुमच्या सगळ्या जीवनाची दिशा ठरवतात. आपण या क्षणी जर एकमेकाबरोबर राहायचे ठरवले तर आपण एकमेकाचे पती पत्नी म्हणून आपले पुढचे आयुष्य जगू शकतो ...नाही तर आहेच तू कुणाची तरी पत्नी आणि मी कुणाचा तरी पती.”
“ The die is cast.. राहुल . आपल्या हातात फक्त खेळायचे असते.”
“ Rubbish, आपण आपले आयुष्य घडवू शकतो .. तू फक्त हो म्हण ..आपण आत्ता लग्न करू शकतो. आपण तुझ्या बहिणीच्या मुलाला सुद्धा सांभाळू ..” मी असे बरेच काही बोलत होतो. पण रीनाचा निर्णय झाला होता. मी त्या निर्णयाचा हिस्सा नव्हतो . ती मला फक्त सांगायला आली होती ..तिचा निर्णय.
आम्ही जायला उठलो. तेवढ्यात रीना मला म्हणाली ,
“ राहुल जाण्या आधी ..एकदा तुझ्या मिठीत येऊ ? फक्त एकदाच.”
मी आवेगाने तिला मिठीत घेतले. . माझ्या छातीवर डोके ठेऊन ती म्हणाली ,
“ एका क्षणापूर्वी मी हक्काने तुझ्या मिठीत येत असे आणि आता मला तुझी परवानगी घ्यावी लागते ...I hate this life.. I hate this..”
शेवटी अगदी जड पावलांनी आम्ही निघालो . तो रीनाच्या गाडीपर्यंत चा प्रवास माझ्या कायम लक्षात आहे. मी आणि माझ्या शेजारून मला स्पर्श सुद्धा न करता चालणारी रीना. मला वाटले एका अंधाऱ्या बोगद्यातून आम्ही दोघे जात आहोत. एक न संपणारा बोगदा. एक वेड्यासारखा विचार मनात आला. या क्षणी आकाशातून उल्का पडावी आणि आम्ही दोघेही त्यात जळून भस्म व्हावे. पण तसे काहीही झाले नाही . आम्ही सुखरूप गाडीपाशी पोचलो. रीनाने गाडीचा दरवाजा उघडला. मग माझ्या डोळ्याकडे न बघता ,आपल्या पायाकडे बघत रीनाने आपला उजवा हात माझ्या दिशेने करत ,किती तरी वेळाने आपल्या तोंडातून पहिले वाक्य उच्चारले. ,
“ राहुल ..माझी एक विनंती आहे ..मान्य करशील ?”
मी तिचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला ..तो उबदार घामाने थोडा ओलसर झालेल्या तिच्या हाताचा स्पर्श ..जीवघेणा ..मग किती तरी दिवस मला आठवत राहिला .
“ काय सांग ..”
“ आपण आता ,एकमेकांना भेटूया नको. फक्त एकदाच भेटूया. आज पासून बरोबर पाच वर्षांनी . सकाळी दहा वाजता. इथेच सारस बागेच्या देवळाच्या दारात. १० जानेवारी २०१८. आपल्या जीवनात आपण काय कमावले आणि काय गमावले हे समजून घ्यायला. तो पर्यंत काहीही संपर्क नाही. नाही तरी तू लंडन मध्ये ,तुझे MS झाल्यावर तू तिकडेच राहणार आहेस. चालेल ? येशील मला भेटायला ५ वर्षांनी ?”
मी तिचा हात अगदी घट्ट माझ्या हातात धरून ठेवला ,
“ म्हणजे आता ५ वर्षे तुला भेटायचे नाही ..असेच ना ? इतकी दुष्ट तू कशी काय होऊ शकतेस ? आपण मित्र मैत्रीण म्हणून का नाही भेटू शकणार ? अगदी थोड्या वेळासाठी ..मधून मधून ..मी भारतात जेव्हा येईन तेव्हा.”
रीनाने नुसतेच नकारात्मक डोके हलवले. मी बहुदा या सगळ्या वेळात तिचा हात माझ्या हातात धरून ठेवला होता. तो बहुदा मी जास्तच जोरात दाबला असावा ..ती एकदम विव्हळली,
“ हाय ..Rahul You are hurting me…”
मी एकदम तिचा हात सोडला आणि तिला म्हणालो , माझी सगळी वेदना जणू त्या वाक्यातून आक्रन्दली,
“ so you are ..my girl..so you are”
मग मी एकदम वळलो आणि तिच्याकडे पाठ करून ,तिच्याकडे एकदाही मागे वळून न पाहता माझ्या गाडीकडे निघून गेलो.
ती माझी रीनाची शेवटची भेट.
**********

आणि उद्या मला रीना पाच वर्षांनी भेटणार. किती घटना घडल्यात माझ्या आयुष्यात ! लंडनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतानाच माझ्या आईच्या पसंतीच्या मुलीशी माझे लग्न झाले. अतिशय सुंदर आणि सुशील. शिरीन पुण्यातीलच होती. तिचे सगळे कुटुंब आमच्या ओळखीचे होते. मग मी आणि शिरीन लंडन ला राहायला लागलो. मला मुले झाल्यावर आई आणि बाबा सुद्धा माझ्याकडेच राहायला आले.
पण खरेच रीना येईल ? तिच्या लक्षात असेल उद्या भेटायचे ?
मी जणू एखाद्या नुकतेच मिसरूड फुटलेल्या तरुणाच्या अधिरतेने ,साडे नऊ वाजताच सारस बागेतील मंदिराच्या पायऱ्यापाशी जाऊन थांबलो. रीना कशी दिसत असेल आता ? आपल्याला ओळखू येईल का ती ? आणि मूळ म्हणजे ती मला ओळखेल का ? मी आपले शरीर दररोजच्या जोग्गिग मुळे आणि योगामुळे अगदी तंदुरुस्त ठेवले होते ..पण माझे केस बरेच कमी झाले होते आणि मी अगदी बारीकश्या मिश्या ठेवल्या होत्या.
पावणे दहाच्या सुमारास एक पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी रुबाबदार चालीने देवळाकडे आली. डोळ्यावर काळा चष्मा .. अगदी मानेपर्यंत नीट कापलेले केस. ..रीनाची तर नेहमी एक वेणी असे..आणि ती इतक्या भरभर चालत नसे. रीना अगदी सडसडीत होती . ही अगदी बांधेसूद . ती जवळ आली आणि आणि चष्मा काढून हातात घेतला.निची नजर कुणाला तरी शोधात होती. अरे ही रीनाचा . तिनेही मला लगेच ओळखले. माझ्या अगदी समोर येऊन उभी रहात ती हळूच हसली. तिच्या दोन्ही गालावरच्या खळ्या एकदम दिसायला लागल्या. तेच ते जीवघेणे हास्य आणि ते मला पाहून आनंदाने नाचणारे ते काळेभोर डोळे. मी त्यांना नाचरे डोळे म्हणत असे.

“ Good Morning..राहुल ..आलास तू . कसा काय झाला प्रवास ? कुठे उतरला आहेस ?”

तिने एकदम माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. खूप Tense असेल तर बोलत सुटण्याची तिची सवय अजून होती तर ?
“ Good Morning, रीना. तू तर आपला गेटअप एकदम बदलून टाकलास ? पण आता एकदम प्रथितयश डॉक्टर वाटतेस .. Nice..”
मी काहीतरीच बोलत होतो का ?
“ मग आहेच मी प्रथितयश डॉक्टर. मी माझी गाडी तिकडे पार्क केली आहे. चल जाऊ या. जाता जाता बोलू या. तुझे केस अगदीच कमी झालेत पण बाकी होतास तसाच आहेस.” रीना म्हणाली आणि त्याच आपल्या भरभर चालीने मागे वळून आपल्या गाडीकडे चालायला लागली. पूर्वी माझ्या बरोबर चालायचे म्हणजे तिला भर भर चालायला लागायचे . आता ती सहज माझ्या बरोबर चालत होती.
मग आंम्ही एकमेकांना फारसा स्पर्श होणार नाही याची काळजी घेत तिच्या गाडीपर्यंत आलो.

गाडीत बसताच मी रीनाला विचारले ,
“ रीना ..आपण आज पाच वर्षांनी भेटतोय . मी इतके काय काय ठरवले होते ..तुझ्याशी बोलायचे पण आता काहीही सुचत नाही . पण एकच मनापासून विचारतो . कशी आहेस ? सुखी आहेस ना ?
तुझे मिस्टर कसे आहेत ? काय नाव त्यांचे ? हो जीवन. जीवन बरे आहेत ना ? तुला किती मुले आहेत ?”
रीना एकदम खळखळून हसली. तेच ते तिचे जीवघेणे हसणे . अशी ती हसली कि जणू तिचे सगळे शरीर हसायला लागले आहे असे वाटायचे. मला फार आवडायचे ते. तिला एकदम मिठीत घ्यावे अशी एक अनाकलनीय तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. मी हिला विसरून गेलो आहे अशी जी मी माझी समजूत करून घेतली होती ती किती तकलादू होती ...मी स्वतःलाच किती फसवत होतो …
“ अरे किती प्रश्न ? माझी सवय तुला लागली कि काय ? जीवन माझे पती छान आहेत. हॉस्पिटल मध्ये फार व्यस्त असतात ते. मी सुद्धा व्यस्त असतेच म्हणा. मला दोन मुले आहेत. एक ताई चा कैवल्य तो आता सात वर्षाचा आहे. मी त्याला माझाच मुलगा मानते . दुसरा रीहान तो पाच वर्षाचा आहे. . तुझे काय ?”
“ मला एकच मुलगी आहे. तीन वर्षाची इशा. . आपला आता plan काय आहे ? आपण आता कुठे निघालोय ?”

“ इथे जवळच एक कॉफी हाउस आहे . तिथे कॉफी घेऊ गप्पा मारू ..मला खूप काही तुला सांगायचे आहे.”
रीना म्हणाली. मग तिथे जाऊन कॉफी ची ऑर्डर देऊ पर्यंत आम्ही काहीच बोललो नाही.
मग मीच परत विचारले .
“ तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस ? तू सुखी आहेस ना ?”
रीनाने पहिल्यांदा माझ्या डोळ्यांत पहात मला प्रतिप्रश्न केला.
“ आणि तू .?..तू सुखी आहेस का ? “
“ तुला आत्ता भेटेपर्यंत मी सुखी आहे असेच मला वाटत होते. लौकिक अर्थाने सुखी आहे. प्रेमळ बायको आहे. गोड मुलगी आहे. स्वतःचे हॉस्पिटल आहे. लौकिक आणि पैसा दोन्ही आहे. पण जे दिवस मी तुझ्या बरोबर घालवले ते अतीव सुखाचे दिवस होते. आता मी फक्त सुखी आहे . तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस. “
“ मी तुला विसरू शकत नाही आणि जीवन ताई ला विसरू शकत नाही . आमचा एक तडजोडीचा संसार आहे. पण मी तू म्हणतोस तशी लौकिक दृष्ट्या सुखी आहे. तू म्हणतोस तसे तुझ्याबरोबर मी अतीव सुखात होते पण मला तरी तक्रार करायला जागा नाही. मी माझ्या निर्णयाचे परिणाम भोगते आहे. ..मी आज कबूल करते राहुल माझी चूक झाली. मी जीवन बरोबर लग्न करायला नको होते. तू म्हणालास तसे आपण कैवल्य ला सांभाळायला हवे होते ..पण त्या वेळी जीवन त्याला तयार नव्हते. त्यांना त्यांचा मुलगा त्यांच्या जवळ हवा होता. आपण त्यातून काही तरी मार्ग काढायला हवा होता. माझी पहिली चूक.”
मी एकदम दचकलो ही काय म्हणते आहे. ?
“ पहिली चूक म्हणजे ? आणखी कुठल्या चुका ? ..रीना तू काही तरी लपवते आहेस ..” मी पुढे झुकलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. रीनाने इकडे तिकडे पहात आमच्या कडे कोणी पहात नाही ना याची खात्री करून घेतली. आम्ही एका कोपऱ्यात होतो आणि त्या वेळी फारशी गर्दी सुद्धा नव्हती.
रीनाने माझा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. मला काय होते आहे हे समजतच नव्हते. पण मी रीनाला थोडे शांत होऊ दिले.
“ रीना कृपा करून काही लपवू नकोस ..what is it ? कसली दुसरी चूक ?” मला एकदम जाणवले . आमच्या मधील ते पाच वर्षाचे अन्तर ..आमचे दोघांचे लग्न झाले आहे हे सगळे जणू एकदम विरून गेले. इथे फक्त मी होतो आणि माझी रीना होती. माझ्या पोटात एकदम खड्डा पडावा असे झाले. मी ..अजूनही रीनाला माझीच समजत होतो.
“ तेच सांगायला आज मी तुला भेटायला आले. तुला त्रास होईल ..म्हणून मी तुला सांगितले नव्हते ..पण काही दिवसा पासून मला लक्षात आले आहे कि मी तुला हे सांगितले नाही तर तुझ्यावर अन्याय होईल ..आणि रीहान वर सुद्धा. ..”
“ रीहान चा यात काय संबध ?”
रीनाने माझा हात सोडला आणि ती आता एकदम कावरी बावरी झाली होती. टेबलावरील नुकत्याच आलेल्या कॉफी कडे ती एक दोन क्षण पहात राहिली .मग जणू एकदम कसला तरी निश्चय करून म्हणाली ,
“ रीहान आपला मुलगा आहे राहुल. तुझा आणि माझा. माझी ही दुसरी चूक झाली, मी हे तुला सांगितले नाही . आपण शेवटचे भेटलो तेव्हा मला माहित नव्हते. तू लगेच लंडनला निघून गेलास. काही दिवसांनी मला समजले कि मी प्रेग्नंट आहे. पण ..तो पर्यंत खूप उशीर झाला होता. माझ्या आणि जीवन च्या लग्नाची तारीख ठरली होती. मी जीवनला सगळे सांगितले आणि त्याने या मुलाला आपले नाव द्यायचे ठरवले. मला माफ कर राहुल ..मी या पुढे अशी चूक करणार नाही. फक्त या दोनच चुका ...तुझ्या लाडक्या रीनाला माफ कर. “
मी सुन्न झालो होतो. मला आठवले. आमच्या परीक्षा संपल्यावर आम्ही काही मित्र मैत्रिणी महाबळेश्वर ला गेलो होतो. आमचे प्रेम माहित असल्याने आमच्या मित्रांनी आम्हाला एक वेगळी रूम दिली होती. तिथल्या त्या दोन धुंद रात्रीची आठवण माझ्या मनात साऱ्या जीवनभराची ठेव म्हणून मी सांभाळून ठेवली होती.
“ पण रीना ..त्या वेळी..”मी एकदम बोलून गेलो. आम्ही काळजी घेतली होती.
“ I really do not know Rahul .. But I feel blessed. खूप गोड आणि शहाणा मुलगा आहे रीहान .” रीना म्हणाली.
आम्ही दोघेही गार होत असलेल्या आमच्या कॉफी कडे बधिरपणे पहात तसेच बसून राहिलो.
“ तू हे रीहानला सांगितले आहेस ? ..”
“ नाही. पण माझा कॉलेज मधील एक मित्र लंडन ला असतो आणि त्याचे नाव राहुल आहे हे त्याला मी सांगितले आहे. पण आज मी तुझी आणि त्याची भेट घडवून आणणार आहे. पण तुझे आणि त्याचे खरे नाते तो १८ वर्षाचा होई पर्यंत त्याला कळू नये असे मला वाटते. तुला काय वाटते हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. “
“ मला त्याला केव्हा भेटतो असे झाले आहे ..पण तू म्हणतेस ते बरोबर आहे .आपण तो अठरा वर्षाचा होई पर्यंत थांबू. मला शिरीनला हे सांगायला पाहिजे. तिला काय वाटेल कुणास ठाऊक ? ..आणि काल परवा पर्यंत मला वाटत होते .. माझे आयुष्य सुरळीत चालले आहे ..मी तुला विसरून गेलो आहे...तुही मला विसरली असशील ..एका दिवसात काय काय माझ्या समोर आले. …”
“ I am sorry Rahul.. माझ्या दोन चुकांमुळे हे सगळे घडत आहे. पण नक्की सांगते आता मी एकही चूक करणार नाही. रीहान बद्दल तुला सांगितले नाही ही माझी नक्की शेवटची चूक.”

“ असू दे. जे झाले ते झाले. चल आपण निघू या. मला केव्हा एकदा रीहानला भेटतो असे झाले आहे.” मी म्हणालो.
“ अजून थोडा वेळ थांब. मला तुला खूप खूप माझ्या डोळ्यात ,माझ्या मनात साठवून ठेवायचे आहे. “ रीना म्हणाली. मग आम्ही किती तरी वेळ नुसते एकमेकांकडे पहात बसून होतो. किती वेळ गेला कुणास ठाऊक.? मग एकदम रीना भानावर आली. मला म्हणाली ,
“ चल ..आता जाऊ या.आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात ..त्यातीलच ही एक. मला तुझी पत्नी नाही होता आले पण ..माझे भाग्य ,मला तुझ्या मुलाची आई होता आले. ..आज रीहान माझ्या बाबाकडे गेला आहे. तू आला आहेस त्या बंगल्यावर . पाषाण रोड वर. चल जाऊ या. ..”

थोड्याच वेळात आम्ही रीनाच्या बाबांच्या बंगल्यावर पोचलो. गेट उघडेच होते. रीनाने गाडी गारेज जवळ घेतली.
मग का कोण जाणे तिने एकदम माझा हात हातात घेतला आणि तो आपल्या निमुळत्या बोटाने दाबत ती मला म्हणाली
“ माझ्या चुकांबद्दल मला माफ करशील ? मी तुझी खूप खूप अपराधी आहे. ..” माझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. मला काहीच बोलता आले नाही. मी नुसतीच मान हलवली.
“ तू पुढे हो. रीहानला भेट. बेल वाजवलीस कि तोच बाहेर येईल. मी गाडी पार्क करून आलेच.” रीना म्हणाली.
मी खाली उतरलो आणि पोर्चमध्ये जाऊन बेल वाजवली. दरवाजा उघडला तो रीहाननेच. अंगात घरी घालायचा निळसर रंगाचा ..त्यावर पिवळ्या रंगाची फुले असलेला ड्रेस. काळेभोर केस ..सावळा रंग. रीना सारखा. आणि तसेच नाचरे डोळे आणि गालावर तश्याच खळ्या. माझ्याकडे आपल्या नाचऱ्या डोळ्याने पहात ,मोठ्या गोड आवाजात त्याने मला विचारले ,
“ कोण हवंय ?. आत्ता फक्त आजोबाच घरी आहेत. ..”
“ असू दे. मला त्यांनाच भेटायचे आहे आणि तुला सुद्धा. ..” मी हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ..माझ्या मुलाचा पहिला स्पर्श .
“ आजोबा ..कोणी तरी आले आहे ..” असे म्हणत तो आत निघाला .तेवढ्यात रीनाचे बाबा बाहेर आले. मी पाच वर्षा पूर्वी पहिले होते त्या पेक्षा मला एकदम खूप थकल्या सारखे वाटले. हातातील काठी टेकत टेकत ते पुढे आले. ,
“ कोण आपण ? “ त्यांनी विचारले ..पण एकदम मला त्यांनी ओळखले ,
“ अरे ,राहुल ..तू कसा काय आलास ? ..ये ये आत ये. ..”
“ येतो ..रीना ..” रीना मागून येते आहे असे मी सांगणार एवढ्यात मी बघितले ..एकदम त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले. हातातील काठी लटपटली ..मी पुढे होऊन त्यांना आधार दिला . रीना कुठे आहे म्हणून मागे वळून पहिले तर गारेज मध्ये रीनाची गाडी पार्किंग मध्ये कुठेच दिसली नाही. ही काय परत कुठे बाहेर गेली कि काय ? . येईल आत्ता ..असे स्वतःची समजूत काढत , मी रीनाच्या बाबांना दिवाणखान्यात नेऊन सोफ्यावर बसवले. शेजारच्या टेबलावरील पाणी त्यांना दिले. रीहान एका बाजूला भेदरून उभा होता. पाणी घेताच रीनाचे बाबा बरेच सावरले. ..
“ sorry राहुल ..तुला उगीचच त्रास दिला. बैस ना ? .. केव्हा आलास ? ...तुला कसे काय समजले ?”
“ काय समजले …? “ यांना सुद्धा रीहान बद्दल माहित आहे कि काय ? असलेच पाहिजे . ..आणि ही रीना कुठे गेली ?
“ मला माफ कर. तुझा नंबर माझ्याकडे नसल्याने तुला मी कळवू शकलो नाहो. आज बरोबर एक महिन्यापूर्वी ..रीनाच्या गाडीला अपघात झाला आणि ती जागच्या जागीच गेली. ती गाडीत एकटीच होती. ..” त्यांना एकदम एक हुंदका फुटला आणि त्यांची नजर माझ्या पाठी मागील भिंती कडे गेली.

केविलवाणी ..भिरभिरती.

मी सुद्धा आता मागे वळून पाहिले .रीनाच्या बाबांना आत घेऊन येण्याच्या नादात माझे लक्ष गेले नव्हते. रीनाच्या ताई च्या फोटो शेजारी रीनाचा एक नवीनच फ्रेम केलेला ..हसऱ्या चेहऱ्याचा फोटो होता. त्याला आजच ताज्या फुलांचा हार घातला होता.

आता मटकन सोफ्यावर बसायची पाळी माझी होती. रीना एका महिन्यापूर्वी गेली होती तर आज इतका वेळ माझ्या बरोबर कोण होते ? ही माझी शेवटची चूक असे मला कुणी सांगितले होते ?

रीहान माझा मुलगा आहे हे तिला मला सांगायचे होते आणि माझी माफी मागायची होती म्हणून तिने हा सगळा अती मानवी आभास निर्माण केला होता का ?
माझ्या पुरते तरी रीना मला शेवटची का असेना .. भेटली होती हे सत्य होते.

**********************************************************

कथालेख

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

23 Jun 2020 - 1:01 pm | योगी९००

मस्त आहे कथा... शेवट एकदम धक्कादायक..!!

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 9:07 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

शेशाद्री's picture

2 Jul 2020 - 8:44 am | शेशाद्री

तुमची भाषा खूप प्रवाही आहे . शेवट वेगळा असल्याने कथा आठवणीत राहील.

Jayant Naik's picture

2 Jul 2020 - 9:30 am | Jayant Naik

प्रतिसादाबद्दल आभार.

रातराणी's picture

23 Jun 2020 - 1:30 pm | रातराणी

मस्त !! कथा आवडली.

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 9:07 am | Jayant Naik

आपले अनेक अनेक धन्यवाद

सुन्दर! कथेच्या शेवटची कलाटणी सुन्दर!!

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 9:08 am | Jayant Naik

आभारी आहे.

छान कथा !! जेव्हा वाचले की, मी मागे वळून बघितले, रीना कुठे आहे पण रीना दिसली नाही पार्किंग लाॅट मधे तिची गाडीही दिसत नव्हती. तेव्हाच कळले रहस्यकथा किंवा भयकथा असावी. प्रथम प्रेमकथा नंतर रहस्यकथा. छान कलाटणी व थोडीफार पूरवीच्या झुंजार कथां प्रमाणेही वाटली. कुणाला काय नि कुणाला काय वाटेल नेम नाही!!

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 9:09 am | Jayant Naik

वाचकाचे मत हे लेखकाला नेहमीच महत्वाचे असते. मग ते कसे हि असू द्या.

फिल्मी वाटली, त्यात कथानक ही original नाही.

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 9:12 am | Jayant Naik

थोडा जास्त खुलासा केलात तर बरे होईल

सुचिता१'s picture

24 Jun 2020 - 11:19 am | सुचिता१

"मोठ्या बहीणी च्या बाळासाठी प्रेमाचा त्याग" ही कल्पना २-३ हिंदी चित्रपटांमध्ये आलेली आहे,

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jun 2020 - 11:42 am | ज्ञानोबाचे पैजार

चांगली लिहिली आहे की गोष्ट.... मला तरी आवडली...बरीच मेहनत घेतली आहे लिहिताना...

"मोठ्या बहीणी च्या बाळासाठी प्रेमाचा त्याग" ही कल्पना २-३ हिंदी चित्रपटांमध्ये आलेली आहे,

असा नियम लावायला गेले तर जगात काहीच ओरीजनल नाही हे ज्ञानेश्वर माउलींनी सुध्दा सांगितले आहे

म्हणऊनि महाभारतीं जे नाही | ते नोहेचि लोकी तिहीं।
येणे कारणे म्हणिपे पाहीं | व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥

पैजारबुवा,

Jayant Naik's picture

2 Jul 2020 - 9:28 am | Jayant Naik

आपण नेहमीच मला प्रोत्साहन देत असता. आपण म्हणता ते बरोबर आहे . जे काही सांगायचे आहे ते अगोदरच सांगितले गेले आहे.

सुचिता१'s picture

24 Jun 2020 - 1:48 pm | सुचिता१

नकारात्मक टिकेचा उद्देश नव्हता.

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 6:28 pm | Jayant Naik

मला नकारात्मक टीका सुद्धा हवी आहे. कारण लेखकाची प्रगती यातूनच होते. बहिणीच्या पतीशी लग्न हि सिनेमात अनेक वेळा आलेली गोष्ट आहे. मुळात हे सिनेमात घडते जीवनात नाही हेच राहुल सांगतो आहे. जीवनात असे घडत नाही ,,ते तू करू नकोस हेच तो सांगतो आहे. हि त्यांच्या प्रेमाची हत्या आणि रीनाची आत्महत्याच आहे ..हे या मुलीला समजावण्याचा तो प्रयत्न करतो आहे . हे समजवण्यासाठी मला हा सिनेमाचा प्रसंग आणावा लागला. तेवढ्या प्रमाणात मुद्दाम हि कॉपी करावी लागली.

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 Jun 2020 - 9:08 am | अनिरुद्ध.वैद्य

रंगवली!

कलाटणी अनपेक्षित, पण दोघांच पिल्लू असणार वाटलं होतच.

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 9:12 am | Jayant Naik

आपला प्रतिसाद आवडला.

विजुभाऊ's picture

24 Jun 2020 - 9:21 am | विजुभाऊ

छान आहे कथा. मस्त रंगवलीये

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 6:29 pm | Jayant Naik

आपला आभारी आहे.

कानडाऊ योगेशु's picture

24 Jun 2020 - 12:33 pm | कानडाऊ योगेशु

कथा ओघवती आहे. आवडली. बाकी एकुण जीवन बद्दल काहीतरी प्रॉब्लेम दिसतो आहे. त्याच्या आयुष्यात येणार्या स्त्रीयांचा अनपेक्षित मृत्यु होतोय.

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 6:31 pm | Jayant Naik

हा जीवनच चा मुद्दा तुम्ही नवीनच काढताय. माझ्या लक्षात आला नव्हता.

गवि's picture

24 Jun 2020 - 8:08 pm | गवि

छान आहे.

एकच गोष्ट जाणवली की त्या दोघांचा करियर प्रकार आणि आलेख बघता तो पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जातो (म्हणजे अजून पदव्युत्तर सुरू व्हायचंय) इथपासून पाचच वर्षात अन्य स्त्रीशी लग्न आणि तीन वर्षांचं मूल ऑलरेडी असणं इतकी सर्व सेटलमेंट होणं एका PG लेव्हल डॉक्टरच्या बाबतीत खूप फास्ट वाटतंय.

Jayant Naik's picture

25 Jun 2020 - 2:22 pm | Jayant Naik

याला थोडे साहित्यिक स्वातंत्र्य म्हणा. थोडे कथेची जेव्हा काटछाट केली तेव्हा काही गोष्टी काढून टाकल्या त्याचा परिणाम म्हणा. यात राहुल चे वडील ब्रिटीश आहेत आणि त्यांचे लंडन मध्ये हॉस्पिटल आहे ..त्यांचा राहुलच्या आईशी घटस्फोट वगैरे तपशीलास कात्री लावली ...त्याचा परिणाम म्हणा.

टर्मीनेटर's picture

2 Jul 2020 - 11:13 am | टर्मीनेटर

छान कथा! आवडली.
पाच वर्षांनी भेटल्यावर जेव्हा रीना राहुलला सांगते

दुसरा रीहान तो पाच वर्षाचा आहे.

तेव्हाच अंदाज आला होता, रिहान त्या दोघांचा मुलगा असावा.

Jayant Naik's picture

2 Jul 2020 - 2:15 pm | Jayant Naik

आपली प्रतिक्रिया आवडली.