लोणीकंद गावाचा रिपोर्ट सन १८१९ - जो २९ फेब्रुवारी रोजी १८२० प्रबंध म्हणून वाचला गेला. …

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
15 Jun 2020 - 12:05 am
गाभा: 

लोणीकंद गावाचा रिपोर्ट सन १८१९च्या सुमारास बनवला गेला असावा
२९ फेब्रुवारी रोजी १८२० प्रबंध म्हणून वाचला गेला. …

लेखकः सर्जन थॉमस कोट्स.

संदर्भ - Transactions of the literary Society of Bombay. Volume. 1823. प्रकरण ८ - पान १८३पासून २८० एकूण ९७ पाने.

सर्जन डॉक्टर कोट्स दुसर्‍या बाजीरावांच्या औषधोपचारासाठी पर्वतीवर जात असावेत. खडकीच्या लढाईच्या धामधुमीनंतर ते दापोडी येथील आर्मीच्या बरॅक मध्ये होते.
त्यांचा फोटो, तैलचित्र अद्याप मिळालेले नाही. खालील एका प्रातिनिधिक चित्रात एक सर्जन डॉक्टर विल्यम ब्रायडन काबूलच्या लढाईतून वाचले होते. ते जलालाबाद (खैबरखिंडीच्या अफगाणिस्तानाकडील तोंडावरचे) लष्करी तळावर दमलेल्या घोड्यावर मफलर लावून कसेबसे पोहोचले याच्या संदर्भातील हे चित्र आहे.

1

आपले काम चोख सांभाळून हा शोध प्रबंध फावल्या वेळात गावातील लोकांना भेटून माहिती मिळवून तयार केलेला होता. या साठी बोली मराठी ते इंग्रजी भाषांतरकारची भूमिका कोण करत असावेत असे मनात येते. प्रस्तूत लेखकाने लोणीकंद गावातील सद्य परिस्थिती शोधताना गावातील शाळकरी मुलांनी मदत केल्याचे स्मरते.

सन १८१८ - १८१९ सालातील घटनांचा शोध घेताना सर्जन कमांडर कोट्स यांचा संदर्भ कुठे मिळेल का अशी इच्छा होती. तो त्या सर्जन थॉमस कोट्स यांचा संदर्भ शेवटी ग्रॅंट डफ यांच्या हिस्टिरी ऑफ मराठाज तिसऱ्या भागात पान ४१९च्या तळटीपेत लागला. डॉ थॉमस कोट्स पेशव्यांना औषधोपचार करत. शिवाय आसपासच्या गावातील जनतेला लस टोचून बरे केल्याने त्यांच्या बद्दल लोकात कृतज्ञता भाव होता. याची बाजीरावांनाही कल्पना होती. ती तळटीप.)

1

बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या डॉ घुर्ये यांनी सव्वाशे वर्षांनंतर या प्रबंधातील संदर्भात आपला एक शोध निबंध सन १९५५ सुमारास सादर केला. तो नंतर पॉप्युलर प्रकाशन यांनी पुस्तक रूपाने इंग्रजीत प्रकाशित केला. तो कै. व्यंकटेश माडगूळकरांच्या वाचनात येऊन त्यांनी आपल्या बालपणाच्या आठवणींवरून माडगूळ, माण खेड्यातील परिस्थिती कशी तशीच होती यावर भाष्य केले. या तिन्ही लेखनाला वाचून
११ वर्षांपुर्वी व्यंकटेश माडगुळकर यांच्या जन्म दिनानिमित्त त्यांच्या लेखावर आधारित लोणीकंद गावातील सद्य परिस्थिती कशी आहे याचा शोध घेण्यासाठी मी (विंग कमांडर शशिकांत ओक विमाननगर, पुणे) त्या गावी गेलो होतो.

शिवाय त्यांनी केलेले शोध कार्याचा निबंध देखील सापडला. ते शक्य झाले मनो यांच्याकडून अमेरिकेतून मिळालेल्या संदर्भामुळे. कै शिवराम म परांजपे यांच्या पुस्तकातील घटनांचा आढावा घ्यायलाही प्रेरित केले.

१० वर्षापूर्वी एक धागा सादर केला होता.

भाग १ https://misalpav.com/node/28016

भाग २ https://misalpav.com/node/28026

त्यानंतर पुन्हा २०१४ला त्यात भर घालून संपादित केला होता. काही कारणांनी त्यातील फोटो दिसेनासे झाले.

सर्जन कोट्स यांच्या निबंधाची सुरवात अशी दिसते -
1

या निबंधाचा गोषवारा पाहता तो छापील ९७ पृष्ठांचा आहे.

त्यात खालील उपशीर्षके आहेत -
हवामान. म्हैसूर ७ अंश अक्षांशावरून ते खानदेशाच्या (सातपुडा रांगेच्या) ३०ते ४० मैलाच्या रुद पट्ट्यात तील इतर हमानाप्रमाणेत लोणी गावचे हवामान असते. मार्च ते मे उन्हाळा जून ते ऑक्टोबर पावसाळा असतो. या भागातील उंच ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. बाकी ठिकाणी पाऊस बेताचा पडतो. थंडी फार पडत नाही. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्री थंड असतात.
जमिनीचा पोत - लोणीच्या भागातील जमिनीचा वरचा काही इंचाचा थर काळ्या मातीचा तर त्या खाली मुरुमाचा थर आहे. त्या खाली काळ्या बेसाल्टचा थर आहे. पावसाळ्यात व हिवाळ्यात त्यावर हिरवे गवत उगवते. भीमानदीच्या बाजूला जमिनीचा उतार होत जातो.
मोजणी - गावाचा घेर ९ मैलाचा आहे. ३६६९ एकरात म्हणजे ५¾ चौरस मैल आहे. पैकी १९५५ एकरावर किंवा २४२० बिघा, किंवा ३९२६½ चौरस यार्ड शेती केली जाते.
शेतसारा - वर्षातून ४ वेळा भरावा लागे.
पहिला ऑक्टोबर - तूसर पट्टी - मूग उडीद मका, साव?, राहळे? अशा पिकांवर,
दुसरी जानेवारी - खरीप पट्टी -,
तिसरी मार्च - रब्बी पट्टी,
चौथी मे ते ऑगस्ट - आखर पट्टी.
शेतसारा गोळा करायची पद्धत कशी असे?
मामलेदार जो त्या भागाचा स्थानिक कर गोळा करायचा अधिकारी असे तो आपला एक हत्यार धारी मेसेंजर निरोप्या गाव पाटलांना कुठल्या पिकाला किती पट्टी याची यादी घेऊन भेटे. ती आज्ञा अशी असे - ताह मुकादमसूक लोणी तरफ सांडस प्रांत पुणे(अरबी साल)मौजे मकसूर साल मकसूर पैकी तुसार पट्टी बद्दल रुपये २०० गाव हुजूर यांनी या कामास शिपाई पाठवले आहे.

1

यावर गावातील येसकर ( गावाच्या वेशीवर पहारा देणारा व निरोप देणारा महार गडी) घराघरात पाठवून दुसऱ्या दिवशी सकाळी चावडीवर येऊन आपापल्या वाट्याचा सारा भरायला तयार राहा अशी यायची दवंडी देत असे. त्याप्रमाणे चावडीच्या कचेरीत शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसकूर मांडून कुलकर्णी, पाटील व तो निरोप्या शिपाई येऊन बसत. कुळे आपापले सारा एकामागून एक करत भरून त्याची पावती घेऊन ठेवत असत.
(तह- तहसील?, मुकादम - मुख्य सूक - ? तरफ - ६० खेडे गावांच्या समूहाचा गट, महाल, मौजे मजकूर- नावाच्या मागे हा शब्द योजून विवक्षितसा उद्देशून, अमुक गाव? साल मजकूर - अमुक सन?

1

वरील प्रथा किती सहज सुंदर पणे सांगितली आहे. त्यातून आपल्या शिवाय इतरांना सारा किती द्यावा लागला तेही समजते. पावती मिळते. एकरकमी देता आली नाही तर हप्त्याची सोय पण होती. ती जमलेली रक्कम फोतेदार निरखुन गावच्या ये-वेसकर महाराच्या सोबतीने मामलेदाराला जमा करत असे.
दुकानांवर, बलुतेदारांवरील कर कसा असे याचा तपशील

1

कुणब्यांचे जेवणातील पदार्थ, जेवणाच्या वेळा, स्वयंपाक बनवायच्या तऱ्हा...२०६ पान क्र.

ते दारु पित नाहीत. कोणी असतील तर कधी तरी चोरुन मारून.

रोजचे जेवण - १भाकर, २भाजी(पाला), ३अळण, ४घट्ट (पिठलं) सणावारी - गव्हाच्या पिठाचे घारगे? (cakes made of wheat flour plus raw sugar) २. तळलेला कडबू? (Tail cher Pulse boiled and mixed with coarse sugar enclosed with wheat past ) ३. फोडणी ४. कढी (अमसुलाचे सार)५. शेवया ६. पापड ७. चटणी. दिवसातून न ते ३ वेळा जेवणात.
सकाळी न्याहारी, सुट्टी सोडून ८ला शेतात जातात. १ त २ तास काम करून मग विहिरीच्या ओढ्याचाय काठाला उकिडवे बसून कालची भाकरी, कांदा आणि चटणीशी खातात. दुपारचे जेवण त्याची बायको २ भाकऱ्या, भाजी, वरण कधी अळण तर कधी आमटी(Ambtee) असते. संध्याकाळी पुन्हा भाकरी, दही किंवा ताक, पापड - तो उडद डाळीचे पीठ, हिंग व काही मसालेदार पदार्थ घालून त्याची पेस्ट करून ती वेफर्स प्रमाणे पातळ लाटून वाळत घालतात व नंतर जेवणात खातात. शेवटी रात्री ८ नंतर आमटी पुन्हा वाढतात. सणाच्या दिवशी गोड म्हणून शेवयांची खीर, मटणाचे जेवण असेल तर त्याचे लहान तुकडे करून ते तेलात तळायला टाकून त्याला हिंग, लसूण कांदा व आणखी काही मसाले घालून किंवा उकडून त्याला फोडणी घालून भाकरी बरोबर तळलेले व नंतर भाताबरोबर ते रसदार करून खातात. मराठा शेतकऱ्याच्या बायकोला धरून महिन्याचा साधारण खर्च- २ शेर धान्य ८ पै (Seer ofOf 37 ounces each), परसदारात उगवलेला भाजीपाला 2 पै, काही डाळी २, तेल १ पै असा हिशेब केला तर १३ पै (Pice) एकूण ५½ d ( d means old ‘penny ’'denarius') साधारण येईल. त्यात तंबाखूचा खर्च जोडलेला नाही
शेतकऱ्याचा वेष खांद्यावर काळ्या रंगाचे लोकरीचे कांबळे,६ (Cubit) हात (१ हात म्हणजे साधारण दीड फूट) लांब २ हात रुंद, ते एखादे वर्ष टिकते त्याची किंमत दीड ते २ रुपये, मुंडासं साधारण पांढरे १४ हात लांब १४ इंच रुंद ६ महिने ते टिकते. धोतर १४ हात, असे पुरुषाच्या पोषाखाला दरवर्षी १५ ते साडेपंधरा रुपये लागत. रुमाल किंवा लंगोटी ते वापरतात. कांबळे, धोतर कधी अंथरायला तर काही गुंडाळून न्यायला ही ते सर्रास वापरतात.

शेती व जनावरांची देखभाल वापरायची हत्यारे

1

चांगल्या बैल जोडीला ८० ते १०० तर मध्यम जोडीला ४० ते ६०रू पडतात. एका दिवसात ते १८ ते २० मैल चाल करत, ९० ते १०० किलोचे( ) वजन वाहून नेतात. म्हशी २५ रुपयांपर्यंत मिळतात. दोन्ही वेळा दूध काढणे एक काम असते. १५ ते २० घोडी पाळून अनेकजण पेशव्यांकडे शिपाई बनायची प्रथा सध्या झाली आहे. ३०० पर्यंत घोडे, तट्टू पाळून, शेळ्या मेंढ्या, काही जण व्यवसाय करतात. डुकरे गावात पाळतात ती कोणाच्या मालकीची नसतात. हातचलाखी करणारे कोल्हाटी, डोंबारी दोरीवरची कसरत करणारे, वडारी काम करणारे पाथरवट हे त्या डुकरांना पकडून खातात.

शेतकऱ्यांची व घरची साधने
या जमिनीत खोल नांगरट करायची गरज नसते. ऑक्टोबर नंतर रब्बी हंगामात गहू, खपली गहू डाळी पेरतात त्याला कुळवाचा वापर करतात. खरीप हंगामात बाजरी, तूर, मटकी, पीक काढतात पुण्याजवळ ज्वारी लोक खातात. कडब्याच्या १०० पेंड्यांचा तीन राशींना १ ते २ रुपये व नंतर तो दर ४ ते ५ रुपये असा कडाडतो. इतर खालील धान्ये कडधान्ये पिकवतात - मका किंवा यावनाळ, तूर, मूग, मटकी, हुलगा, पावटा, वाल, चवळी, गवार, घेवडा, कारळे, तीळ, वरीचा तांदूळ, अंबाडी, ताग - मांग लोक याच्या वाखापासून दोर वगैरे बनवतात.

सधन शेतकऱ्याकडे ६ ते ८ बैल असतात. माजघर ( Muzghur), परसदार (Poorusder), ओसरी (woosary) हे घरातील वेगळे भाग असतात. बाळंतिणीची खोली अंधारी असते. जाते, तांबे पितळेची घागर, पाणी गरम करायला तांब्याचा बंब, किंमत २० रुपये, आणखी काही घागरी पाणी भरून ठेवायला, एक रांजण रोज सकाळी घुवून पुन्हा नव्याने भरून वापरायला ठेवला जातो. पाणी प्यायची काही भांडी, दूध-ताक ठेवायला काही भांडी, चुलीवर जेवण बनवायला गरम करायला, काही मातीची भांडी, आतल्या खोलीत काम झाले की धुवून एकावर एक उलटी करून ठेवतात, तवा (Iron griddle), कढई (frying pan), पाटा-वरवंटा, बांबूच्या काड्यांनी बनलेली सुपे, लहान मोठ्या दुरड्या, शिप्तरे, घर सफाईसाठी साळूते, लटकवलेली शिंकाळी, दिवा लावायला लटकवून ठेवलेली दोरी, साखळी, असे साधारण सामान असते. श्रीमंताकडे अशाच तऱ्हेचे सामान पण उंची प्रतीचे, बाजले काथ्या ऐवजी नेवारचे इतपत फरक. ( मात्र मुसळाचे वर्णन त्यात मिळाले नाही)

लग्न समारंभ, लहानपणी लग्नानंतर मुलगी वडिलांकडे राही व वयात आली की सासरला जाई. लग्नाचा खर्च मुली कडील करत, अगदी गरीबाच्या मुलीच्या लग्नाचा खर्च मुलाकडून ही केला जाई. क्वचित श्रीमंतात जास्त बायका केल्या जात.
लग्न संबंधात १. कुळ व जात २. कुंडली मिलान ३. मुलगी अव्यंग आणि धडधाकट असावी हे पाहिले जाते. लग्न समारंभ २-३ दिवस चाले. मुलगा ४०-५० नातलग मित्रपरिवारासह हळद लावून घोड्यावर बसून मिरवत येई. वधू-वर (उजवीकडे) मंडपात (arbour) बसून भटजी संस्कृत श्लोक म्हणून त्यातील काही समजतील असे तर काही गडबडगुंडा करून (unintelligible) शेवटी जमलेले अक्षता (sprincle rice) टाकून साजरा करत. (अंतरपाटाचे असे वर्णन मात्र त्यात नाही) त्या रात्री मेजवानी असे. दुसऱ्या दिवशी दोन्ही घरातील लोक एकत्र येऊन गप्पागोष्टी, घरगुती खेळ, विनोदी, फाजिल वात्रटपणा सुद्धा (Not in very delicate language) करत दिवस साजरा करत. असेच साधारण अन्य जातीत घडत असे
बाळंतपण, नंतरचे विधी, १२ महिन्यानंतर जावळ काढतात. मुलांना घेरा ठेऊन शेंडी (Tuft), सतीची प्रथा लोणी गावात ४०-५० वर्षांत नव्हती. जयराम श्रीराम म्हणत प्रेतयात्रा काढतात. मुलगा लोटक्यात निखारे घेऊन पुढे असतो. शवाचे कपडे काढून शेण्या व लाकडांची चिता करून अग्नी देतात. नंतर एक जण रात्रभर तिथेच राहातो दुसऱ्या दिवशी राख गोळा करून नदीच्या वाहत्या पात्रात सोडून देतात. अन्य चालीरिती, देव देवतांचे सण, काही कुप्रथा यावर बरेच लेखन केले आहे. भूत, झोटिंग, हडळ वगैरे विस्तार भयास्तव देत नाही.
बायकांची नावे गोपी, चिमी, काशी, तुकी, भागी, रडी, अशा सारखी तर रंगोजी, अमृता, बाबाजी, बाळा, लक्ष्मण, चंदू, विठू, पांडू भिमा, नागू नावे प्रचलित आहेत. 'जी आणि बाई' अशी विवाहितांना संबोधन करताना वापरतात. घरगुती संदर्भात बाबा, नाना, बापू तर नानी, ताई अब्बी, काकी असे संबोधतात. जाधव, गायकवाड, पवार, कदम, कट्टी, सांडाजी, शितोळे, मगर ही आडनावे इकडे प्रचलित आहेत.
खेळ मनोरंजन
बाद मेंढी, झप्पा-पाणी? हुतूतू, रंग पंचमी दसरा दिवाळी साजरा करतात.

लोणी गाव
अक्षांश १८.३७ N रेखांश ७४.८ पुण्यापासून १२ मैलावर. सरळ रेषेत गेले ७० मैलावर समुद्र लागतो. समुद्र सपाटीपासून १४७० फूट उंचीवर वसले आहे. ( २०० वर्षांच्या पुर्वीची ही किती माहिती नेमकी आहे? (The wikipedia-Coordinates: 18.622°N, 74.026°E, area of 1723.2 hectares, population of 7944, located in 1820 houses 2011 census)
गावाच्या प्रथेप्रमाणे पुर्वेच्या वेशीबाहेर महार वस्ती आहे. गावाचा टाऊनहॉल - चावडी ३० फुटाची खोली आहे. त्याला कौलारू छत आहे. काही वाटसरू, सरकारी वार्ताहर, नोकरांना राहायची सोय त्यात करतात. एक पाणी आणणारा कोळी तिथे नोकर असतो. महादेवाचे दगडी बांधकामाचे देऊळ आहे. म्हणतात यशवंतराव शिंद्यांच्या पदरी शिलेदार असताना इथल्या पाटलाने गैरमार्गानी खूप संपत्ती जमवली. नंतर पश्चात्तापाने पापक्षालन म्हणून त्याने हे मंदिर १८ वर्षांपुर्वी बांधले. १६ फूट लांब, १२ फूट रुंद गाभाऱ्यात लिंग आणि शाळुंका आहे. (Silvanka - Emblem of male and female organs) हनुमानाचे मंदिर आहे. एका दगडाला शेंदूर (Cinnabar) फासून साधारण माकडासारखा दिसेल अशी त्याची मूर्ती आत टेकवून ठेवली आहे.
त्या काळातील लोणीकंद दाखवलेला नकाशा आणि आजच्या काळातला नकाशा
1

1

वरील तक्ता वाचताना मारवाडी २ घरे, जैन वाणी २१ जण म्हणजे ३ ते ४ किराणा दुकाने, रामोशी पोलिसाचे काम करणारे ११, मुसलमान ३ घरात १७जण, ११ मोलकरणी, ८ पुरुष व ७ बायका गुलाम ही माहिती रंजक वाटते. ५५७ जणांच्या १३० कुटुंबात १६४ पुरुष १९८ बायका तर १०५ मुले ९८ मुली गावात जनसंख्याची शिरगणती त्यांनी कष्टपूर्वक केली आहे. पाटील (Patail) कुलकर्णी (Koolcurnee) पाटलाला शेतसाऱ्याच्या मिळकतीच्या 1/12 भाग (एका महिन्याचा पगार मिळतो)
बलुतेदारांची माहिती माझ्या आधीच्या लेखातून आली आहे म्हणून त्याचा उल्लेख इथे करत नाही)

घरे व आजूबाजूचे वातावरण
या शेतकऱ्यांची घरात वागायची, राहायची पद्धत अत्यंत गचाळ आहे. घरात अंधार असतो. एकाच छपराखाली ते आणि गोठा असतो. घाण व वास यामुळे स्वच्छता नसते. पाणी दुरून आणणे, यामुळे बायकांवर कामाचा ताण असतो. या शिवाय इतर लोक ओंगळ, कमी जेवायला मिळत असलेले वाटतात. कर्ज काढलेले बरेच लोक असतात. ४० ते २०० रुपये, २४ ते ४० टक्के व्याजाने मारवाडी, ब्राह्मण त्यांना देतात. याशिवाय घर सामान, वैरण हे शेजाऱ्याकडून उधार घेतलेले असते. दुसरा बाजीराव सत्तेत आल्यापासून त्याने शेतसारा वसूलीसाठी ठेकेदार नेमले त्यामुळे गरीब रयतेवर प्रचंड ताण पडत आहे. अवर्षण, अती पाऊस, टोळधाडी वगैरेमुळे पीकाची आणेवारी न ठरवता ठेकेदार बळजबरीने वसूली करतात.

शेतकऱ्याच्या घरातील बायकांचे वर्तन करमणूकीची साधने -
या प्रबंधात पुढे ब्राह्मणांचे राहणीमान, वाण्याच्या दुकानात मिळणाऱ्या जिन्नसांची यादी, रामोशी, मुसलमान, गुलाम यांचे वर्णन केले आहे. गुलाम कर्नाटकातून आलेले असतात. १०० ते ५०० पर्यंत त्यांची किंमत असते. काही काळानंतर त्यांना गुलामीतून मुक्त केले जाते. काही ठिकाणी मुलींना घरच्या पुरुषांच्याशी संबंध ठेवावे लागतात. मिरासदार व वतनदारांची कामे, गावातील रोगराई व औषध पाणी, या विषयावर भाष्य केले आहे.

पुरुष साधारण ५’ 4” उंचीचे, वजनाने 55 ते 60 किलोचे (7 stone 11.34 lb- एक स्टोन १४ पौंड =६.३५ किलो) , लहान चणीचे असतात. डोळे काळे, डोक्यावर केस बारीक, घेरा-शेंडी, ओठांवर झुपकेदार मिशा असतात. बहुतेकांचा रंग सावळा, क्वचित अगदी काळा असतो. ब्राह्मणांच्या, वाण्यांच्या मुलांसाठी एक शाळा आहे, त्यात लिहायला, वाचायला, अंक गणित शिकवतात. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्याची मुलांना लिहायला, वाचायचा येत नाही. चोऱ्या झाल्याचे ऐकिवात नाही. साधारण माणसे स्वभावाने गरीब, मनमेळाऊ, कष्ट करत राहाण्याने सहनशील वाटतात. गावात एक जण ९६ तर एक बाई ७२ वर्षांची आहे असे म्हणतात. पण जन्म मृत्यूची नोंद करायची पद्धत नसल्याने नक्की आकडा कळणे शक्य नाही.

1

या रिपोर्ट वाचून डॉ घुर्ये यांनी एक प्रबंध तयार केला -

1

या शिवाय अनेक इंग्रजी अधिकार्‍यांनी आपापले प्रबंध तिसऱ्या व्हॉल्यूममधे सादर केले होते. ते असे-

1

1

पहिली तीन प्रकरणे आधी सादर केलेल्या लेखांवर चर्चेची आहेत.
प्रकरण ४ -चिंचोरे गावातील जागृत स्थान सध्याचे मोरगाव.
प्रकरण ५ - दसऱ्याचा सण कऱ्हाडे ब्राह्मणांचे राहणे वागणे
प्रकरण ६ - कच्छमधे झालेल्या भुकंपावरील माहिती
प्रकरण ७ - कोकणात सापडलेल्या ४ हस्तलिखितांचे अनुवाद
प्रकरण ८ लोणीकंद गावाचा अहवाल

प्रकरण १४ - काटीफ ते यांबूचा सौदी अरबस्तानातील भयावह प्रवास वर्णन
यावरील लेख बनवायचे काम चालू आहे.

प्रतिक्रिया

लेख आवडला. इथे दिल्यामुळे हे सर्व वाचनात आले. अन्यथा आम्ही इतिहासाच्या वाटेला गेलो नसतो. शिवाय वाचक कमी असले की प्रकाशकही असल्या विषयांवरची पुस्तके छापण्याचे काम घेत नाहीत.
एकूण मजेदारच आहे.

शशिकांत ओक's picture

15 Jun 2020 - 2:37 pm | शशिकांत ओक

इतिहासाच्या वाटेवर जायचे टाळणारे, पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तके विकत घेऊन वाचणारे आपण नसून देखील वाचनात रमले! हे ही नसे थोडके!

सुनील's picture

15 Jun 2020 - 9:17 am | सुनील

दोनशे वर्षांपूर्वीदेखिल ग्रामिण महाराष्ट्रातील दुकानदार मारवाडी आणि जैन हेच होते हे रोचकच आहे!

शशिकांत ओक's picture

15 Jun 2020 - 10:49 pm | शशिकांत ओक

आपल्या म्हणण्यातील भाव कळला... खरे आहे. शेकडो वर्षांपासून आज पर्यंत ही वाणीकाम, सावकारी करणारी जैन, मारवाडी मंडळी आपली भाषा चालीरिती, वेषभूषेची वैशिष्ठ्ये सांभाळून मराठी किंवा भारतातील अन्य प्रदेशातील समाजात गुण्या गोविंदाने राहात होती. वर्षा दोन वर्षांत, किंवा लग्नसंमारंभासाठी, त्यांच्या देवमंदिरांना भेटी द्यायला गावी म्हणजे साधारण सध्याच्या पाली जिल्ह्याच्या परिसरातून हे प्रामुख्याने येतात असे माझ्या आसपासच्या किराणा मालाच्या दुकानदारांना बोलते करताना समजून आले.
त्यांनी कोरोनाच्या काळात न बोलता, बिनबोभाट किराणा भांडार, सुपर मार्केट वेळेची,अंतराची बंघने पाळून ग्राहकांची केलेली सेवा लक्षात राहाणारी आहे.

शशिकांत ओक's picture

15 Jun 2020 - 10:50 pm | शशिकांत ओक

आपल्या म्हणण्यातील भाव कळला... खरे आहे. शेकडो वर्षांपासून आज पर्यंत ही वाणीकाम, सावकारी करणारी जैन, मारवाडी मंडळी आपली भाषा चालीरिती, वेषभूषेची वैशिष्ठ्ये सांभाळून मराठी किंवा भारतातील अन्य प्रदेशातील समाजात गुण्या गोविंदाने राहात होती. वर्षा दोन वर्षांत, किंवा लग्नसंमारंभासाठी, त्यांच्या देवमंदिरांना भेटी द्यायला गावी म्हणजे साधारण सध्याच्या पाली जिल्ह्याच्या परिसरातून हे प्रामुख्याने येतात असे माझ्या आसपासच्या किराणा मालाच्या दुकानदारांना बोलते करताना समजून आले.
त्यांनी कोरोनाच्या काळात न बोलता, बिनबोभाट किराणा भांडार, सुपर मार्केट वेळेची,अंतराची बंघने पाळून ग्राहकांची केलेली सेवा लक्षात राहाणारी आहे.

चौथा कोनाडा's picture

15 Jun 2020 - 10:48 am | चौथा कोनाडा

अतिशय रोचक इतिहास ! लेखनशैली भारी आहे. लेख आवडला !
बलुतेदाराचे तपशिल, त्यांचे वाटे पाहून मजा वाटली !

शशिकांत ओक's picture

15 Jun 2020 - 2:53 pm | शशिकांत ओक

आपली वैद्यकीय सेवा चालू ठेवून कोणतेही पारितोषिक किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार नसताना, भाषा, लोकांशी संपर्क करायची साधने कमी असताना त्यांना बोलते करून त्यावर रात्री कंदिलाच्या प्रकाशात असा शोध निबंध लिहायला आतून उर्मी असावी लागते. पैसे घेऊन ते काम करता येत नाही असे मला वाटते. आपल्याला काय वाटते?
समाज रचनेचा अभ्यास आवड म्हणून करताना पाहून आजचे डॉक्टर कितपत रस घेतील अशी विचारणा करावीशी वाटते.

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2020 - 9:50 pm | चौथा कोनाडा

+१

पण,

आजचे डॉक्टर कितपत रस घेतील अशी विचारणा करावीशी वाटते.

आजच्या काळाशी तुलना करणे योग्य होणार नाही असे मला वाटते, आजच्या काळातील आव्हाने पुर्णतः वेगळी आहेत.

शशिकांत ओक's picture

18 Jun 2020 - 2:18 am | शशिकांत ओक

कोणी डॉक्टर पुढे येईल... काही गायक तर काही नायक, तर काहीआय ए एस ऑफिसर म्हणून आपले करीयर करु शकतात तर ज्याला अशी आवड असते त्यानाच ते जमते. त्याकाळातही इतर इंग्रज डॉ असतील पण त्यांना या कामात रस नसावा. असो.

खुपच अज्ञात आपल्या लेखमालेमुळे उजेडात येत आहे.उगाच भावनेला हात घालणार्‍या सोशल मेडीयावरच्या भंपक पोस्ट पाहील्या कि अस्सल संदर्भ घेउन लिहीलेल्या अश्या लेखांचे मोल वाटते. अशीच माहिती अजून येउ द्यात. अश्याप्रकारचे मराठीतून लिखाण आंतरजालावर येणे गरजेचे आहे.

वरील लिखाण अंतरजालावर येणे गरजेचे आहे.

म्हणजे काय करायला हवे यावर मार्गदर्शन करावे.

दुर्गविहारी's picture

18 Jun 2020 - 11:35 pm | दुर्गविहारी

लिखाण मिसळपाव, मायबोली अश्या संस्थळावर पोस्ट करणे, ब्लॉगस्वरुपात लिहीणे शिवाय फेसबुकवरही पोस्ट केले तर जेव्हा भविष्यकाळात कोणी संदर्भ शोधायला गेले की त्याला हे लिखाण समोर दिसायला हवे. आजही मराठी भाषेत अनेक विषयावर लिखाण ईंटरनेटवर उपलब्ध नाही. सध्या लॉकडाउनमुळे वेळ असल्याने मी शक्य तितका काळ लिखाणात करण्यात व्यस्त आहे. भविष्यकाळात हे लिखाण मि.पा. माझे व्हॉटस अ‍ॅपग्रुप यावर पोस्ट करणार आहे, ज्यामुळे अज्ञात माहिती उपलब्ध होईल.

अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण लेख.