कास्तकाराचं दुखनं

अंकुश इंगळे's picture
अंकुश इंगळे in काथ्याकूट
14 Jun 2020 - 5:04 pm
गाभा: 

1

बेकार गोठ झाली राजेहो...बेलखेडात कांदा उचल्याले बेपारी येऊन नाही राहीले...आले त 350 - 400 रूपये किंटलनं मांगून रायले...खर्च बी निंगत नाही या भावात...! वावराईनं कांद्याचे गंजच्या गंज पडेल आहेत..रोज झाकाव अन् उघडा कराव गंज...हेच काम पुरून रायलं...कांदा भरून ठेवाव की इकाव ते बी नाई समजून रायलं...मांगलची उधारी अन् पुढच्या हंगामाचा खर्च कुठून कराव कास्तकारानं...? बेकार गोठ झाली...कोरोनापेक्षा हा प्रश्न गंभीर झाला...पन पेपरात बातमी नाई...! टिवीवाले हिंदू मुसलमान सांगून राहिले...! चायना, पाकीस्तान अन् अमेरीकेतल्या गोष्टी दाखून रायले..! पन भारतातल्या कास्तकाराचं दुखनं कोनीच नाई दाखून रायलं..! विश्वगुरू आत्मनिर्भर व्हा म्हनते...! कास्तकार भनानला भऊ...!

तुमच्या येरीयात काय भाव चालू आहे ते सांगत जा हो तुईशीराम बॉ...तेवढाच अंदाज येते मानसाले...

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

14 Jun 2020 - 6:37 pm | प्रमोद देर्देकर

खरंच खूप भयानक परिस्थिती आहे.

प्रचेतस's picture

14 Jun 2020 - 6:49 pm | प्रचेतस

आजच्या परिस्थितीला समर्पक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2020 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोली आवडली. लिहिते राहा. येत राहा.

-दिलीप बिरुटे

ऋतुराज चित्रे's picture

14 Jun 2020 - 9:55 pm | ऋतुराज चित्रे

सरकार झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देत आहे. झिरो बजेट म्हणजे झिरो खर्च बरं का! मग २०२१ ला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटच काय १०० पटही वाढू शकेल. ह्यात सरकारचे योगदान शून्य आणि शेतकऱ्यांचा फायदाही शून्य, पण ढोल जोरात पिटला जाईल.

सुबोध खरे's picture

15 Jun 2020 - 10:57 am | सुबोध खरे

स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली आहेत तरी शेतकऱ्याची हि स्थिती तशीच का आहे ?

लोक त्यात "आपलं धुणं" धुवून घेत आहेत

. दर वर्षी कर्ज घेतलं जातं ते माफ हि होतं हे ७० वर्षे चालू आहे तरी रडगाणं?

आता कंटाळा आलाय याचा.

बाकी मागच्या वर्षी पूर आला शेतकऱ्याला निदान मिळालं कर्ज माफी झाली असं ऐकलं.

माझ्याकडे एक रुग्ण आला होता.बिचारा सवलत मागत होता. मी विचारले सवलत का द्यायची.
त्याचे कोल्हापूरला त्याचा संगणक दुरुस्तीचा दुकान होतं दुकानात पाणी शिरलं आणि लोकांचे दुरुस्ती साठी आलेले संगणक पाण्याने भरले. लोक त्याला सांगायला लागले आम्हाला आमचा संगणक चालू स्थितीत परत पाहिजे. मणी शिरलं हा आमचा प्रश्न नाही.
त्याच्या शेजारी एक शिंपी होता त्याच्याकडे लोकांनी येणाऱ्या गणपती दिवाळी सणासुदीसाठी कपडे शिवायला टाकले होते ते पण चिखलाने भरले त्याच्या कडे लोक पैसे परत मागू लागले.
रुग्ण म्हणत होता साहेब आमच्या सारख्या असंख्य छोट्या उद्योजकांचे नुकसान झाले पण आम्हाला कोणी कर्जमाफी सोडाच व्याज माफी सुद्धा देत नाही.
आम्ही आमच्या पायावर उभे राहतो आहे पण आम्हाला कोणी विचारात नाही कारण आमच्याकडे एक गठ्ठा मत नाही. प्रत्येकाचे आपले प्रश्न आहेतच.

नव्या मुंबईतील छोटा उद्योजक. दर महा कर्मचाऱ्यांचे वेतन बिल ५ लाखाच्या वर. २ महिने वेतन दिले असलेल्या ऑर्डर रद्द झाल्या. हातात ऑर्डर नाही.पुढचे तीन महिने माही येणार नाही अशी बाजारात स्थिती.
पावसाळ्याच्या अगोदर काम करायचे म्हणून कारखान्याचे छप्पर काढलेले होते. त्याच्या दुरुस्ती साठी माणसे येत नाहीत . यंत्र सामुग्री पावसात भिजली तर कायमचे दिवाळे वाजेल म्हणून पोलीस स्थानकावर खेटे मारून एकदाची परवानगी मिळवली. कामगारानी एक जून ला आमचा तिसऱ्या महिन्याचा पगार द्या म्हणून तगादा लावला. याने स्पष्ट सांगितले आता माझ्याकडे पैसे नाहीत तुरुंगात जायला लागले तरी चालेल. पगार देण्यासाठी कर्ज काढणार नाही.

काही दिवसापूर्वी एक कानडी मुलगा (वय २५) आला होता. हा सॉफ्टवेअर तंत्रज्ञ होता. बंगळुरू जवळच्या छोट्या शहरातून मुंबईत नोकरीसाठी आला. नवीन लग्न झालेलं. बायको गरोदर आणि करोनाची महामारी आली. याची कंपनी बंद झाली नोकरीवरून काढून टाकले. आणि लोकडाऊन झाल्यामुळे हा इकडे अडकलेला. परत जाऊ शकत नाही. खिशात पैसे नाहीत आणि बायकोचे गरोदरपण. शेजारी पाजारी कुणी ओळखत नाही.
कोकणातील अनेक आंबा उत्पादक. करोना मुळे जिल्हा बंदी. माल कुठे आणि कुणाला पाठवायचा. पण त्यांनी थेट ग्राहकांकडे संपर्क केला आणि आपल्या मालाची सोय केली. मित्राने चक्षुर्वैसत्यम कहाणी सांगितली.

प्रश्न सर्वानाच असतात. पण आमचाच प्रश्न सर्वात गहन असे रडगाणे.

बळीराजा अन्नदाता म्हणून सर्वानी गहिवर काढायचा

वर्षानु वर्षे तेच ते ऐकून आता कंटाळा आला आहे.

सर, तुम्हाला कंटाळा आला असेल तर इट्स ओके. पण समाजातल्या प्रत्येक घटकाला त्यांच्या व्यथा मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात येणाऱ्या प्रोब्लेम्सवर लिहले तर ते खूप छान आणि शेतकऱ्यांविषयी कुणी लिहले तर ते रडगाणे का बरं?( आता माझ्या व्यवसायात काही प्रॉब्लेम येतनाहींत, मी माझे काम चोख करतो हे नकाच सांगू कृपया) . अप्पल्स टू ऑरेंजेस तुलना करून काहीच उपयोग नाही.

प्रामाणिकपणे सांगायचं तर चार बियांची रोपं तयार करायला जीव आटला माझा, वर्षानुवर्षे हेच काम निसर्गाच्या सगळ्या तर्हा सांभाळत इतक्या मोठ्या प्रमाणावर करणं हे काही खायचं काम नाही. सगळेच शेतकरी चांगले असं नसेल कदाचित, पण भले बुरे लोक सगळ्याच व्यवसायात असतात. चढउतार प्रत्येक व्यवसायात येतात. आपण काही मदत करू शकत नसलो तर ठीक पण कमीतकमी त्यांना त्यांचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य तरी देऊया. माफ करा पण आपली प्रतिक्रिया अत्यंत टोकाची वाटली. तुमच्यापेक्षा वयाने, मानाने अत्यंत लहान आहे तरीही रहावले नाही म्हणून स्पष्ट बोलले.

सुबोध खरे's picture

15 Jun 2020 - 11:43 am | सुबोध खरे

आपले म्हणणे बरोबर आहे.

परंतु हाच विषय मिसळपावच्या इतिहासात किती वेळा चघळला गेला आहे हे एकदा काढून पहा. त्याच त्याच प्रतिक्रिया वर्षानुवर्षे येताना पाहून कंटाळा आला आहे. कारण याच्यापुढे शहरी लोक कसे संवेदनाहीन असतात. मातीत हात घातल्याशिवाय तुम्हाला आमचे प्रश्न कळणारच नाहीत इ इ.

यावर मी असेही म्हटले होते कि आपण पुरुष असलात तर आपल्याला स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करण्याचा हक्क नाही.

माझी प्रतिक्रिया टोकाची आहे हेही मला मान्य आहे.

परंतू लघु उद्योगाचे प्रश्न किंवा शेतमजुरांचे प्रश्नच नाहीत का? शेतकरी १८ कोटी आहेत पण शेतमजूर २७ कोटी आहेत. त्यांना ना कर्ज मिळतं ना कर्ज माफी.

सत्तर वर्षांपासून चा प्रश्न लगेच मोदी सरकारच्या डोक्यावर घालून टीका करणाऱ्या लोकांचे प्रतिसाद पाहून हसावे कि रडावे कळेना.

रातराणी's picture

15 Jun 2020 - 12:50 pm | रातराणी

माफ करा पण गावी भावांची जी शेती आहे त्यांचे अनुभव असे आहेत की, शेतमजुरसुद्धा दिवसाचे रोख पैसे घेऊन काम करतात आज काल. स्वतःची शेती असण्यापेक्षा एकवेळ मजुरी केलेली परवडेल. डोक्याला ताप नुसता. शेतीच्या कुठल्याही कामासाठी रोख पैसे दिले तरच कामं होतात, पण फायनल प्रॉडक्ट् कधी पाऊस ओरबाडून नेतो, कधी दुष्काळ नेतो तर कधी उत्पादन जास्त म्हणून व्यापारी भाव पाडतात. कधी कधी नफा कमी उलट खिशातले पैसे घालावे लागतात. आणि हे एव्हरेज कष्ट करणारे भाऊ नाहीयेत. अक्षरशः माळावरचे दगड फोडून त्यांनी तयार केलेली रानं मी पाहिली आहेत. स्वतःला वेळोवेळी शेतीच्या नवीन पद्धती, पिकांचा अभ्यास करून आपलं तंत्र वेळोवेळी अपग्रेड करणारे आहेत ते. पण त्यांच्या तोंडी अशी निराशेची भाषा ऐकली की वाईट वाटतं इतकंच.

लघुउद्योगांच्या प्रश्नाचे म्हणाल तर मी माझ्या मूळ प्रतिसादात म्हणलेच आहे की चढउतार प्रत्येक व्यवसायात असतात. उद्या सॉफ्टवेयर इंजिनीयर लोकांचे ले ऑफ झाले तरी मला तेवढेच वाईट वाटेल. त्यांच्या धाग्यावर जाऊन मी काय बेंचवर बसून छापत होते ना, आता कशाला रडगाणं गाता असं नाही म्हणणार.

सत्तर वर्षांपासून चा प्रश्न लगेच मोदी सरकारच्या डोक्यावर घालून टीका करणाऱ्या लोकांचे प्रतिसाद पाहून हसावे कि रडावे कळेना.

>> तुम्ही हसूही नका आणि रडूही नका. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करायचा अधिकार आहे आणि त्याचा आदर करणं एवढंच अपेक्षित आहे. हा विषय चावून चोथा झालाय वगैरे आपलं मत असेल तर तुम्हाला कुणीही गन पॉइंटवर बसवून इथे प्रतिसाद द्याच असं तर म्हणलं नाही ना? मग का एवढा त्रागा करताय.

यावर मी असेही म्हटले होते कि आपण पुरुष असलात तर आपल्याला स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करण्याचा हक्क नाही.

>> हे वाक्य काही कळलं नाही. ते कुठल्या context मध्ये म्हणलं गेलंय हे मला माहीत नाही. तुम्हाला जर कुणी असं म्हणालं असेल तर ते चुकीचं आहे. आणि तुम्ही स्वतःच असं म्हणालं असाल तर _/\_

असो, याहून जास्त चर्चा मी करू शकत नाही. भावनेच्या भरात एखादा शब्द उणा बोलला गेला असेल तर माफ करा.

कपिलमुनी's picture

15 Jun 2020 - 3:04 pm | कपिलमुनी

हा विषय चावून चोथा झालाय वगैरे आपलं मत असेल तर तुम्हाला कुणीही गन पॉइंटवर बसवून इथे प्रतिसाद द्याच असं तर म्हणलं नाही ना? मग का एवढा त्रागा करताय.

जबर्‍या !

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।।
पाण्यातला मासा झोप घेतो कैसा।
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।।
तुका म्हणे संत कैसे वळखावे।।
आपण संत व्हावे तेव्हा कळे।।

सुबोध खरे's picture

15 Jun 2020 - 6:24 pm | सुबोध खरे

अक्षरशः माळावरचे दगड फोडून त्यांनी तयार केलेली रानं मी पाहिली आहेत.

हीच परिस्थिती मी लघु/ मध्यम उदयोगांची पाहिलेली आहे.

माझ्या भावाचे दोन कारखाने आहेत. त्याने ते १०० % स्वतः च्या घामातून आणि कष्टातून उभे केलेले आहेत. कारण आमच्या वडिलांकडे पैसेच नव्हते. सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत काम करून त्याने आपला उद्योग भरभराटीला आणला. त्याच्या कारखान्यात पुराचे पाणी घुसले तर त्याला सरकारी मदत कधीच मिळत नाही. उलट प्रत्येक ठिकाणी सरकारी अधिकारी नाडण्याचा प्रयत्न करतात.

उद्योग करणारे सर्व चोर आहेत गरिबांच्या घामावर आणि रक्तावर आपले इमले उभे करतात आणि शेतकरी मात्र बळीराजा हि विचारसरणी डोक्यात जाते.

असेच कष्ट करणारे अनेक लघु उद्योग त्याच्या आजूबाजूला आहेत.

काही लोक अयशस्वी होतात. आमच्या आजूबाजूला अनेक हॉटेले सुरु झाली आणि बंद झाली.

असेच अनेक उद्योगधंदे बंद झाले पण त्यांच्याबद्दल कोणाही राजकारण्याने एवढा गळा काढलेला पाहिला नाही.

आज केवळ शेतीवर आपले चालत नाही तर दुसरा व्यवसाय/ जोड धंदा करावा हे का होत नाही. दुकान चालत नाही हॉटेल चालत नाही म्हणून लोक बंद करतातच ना? मग शेती हा सुद्धा शुद्ध व्यवसाय म्हणून का पाहिला जात नाही.

उद्योगाला वीज १२ रुपये दराने मिळते. शेतीचा किफायतशीर दर नाही. प्रत्येक गोष्टीत सरकारी परवाने लागतात. त्याबद्दल कोणी बोलताना दिसत नाही.

आज शेतीप्रधान राहून आपला देश चालू शकणार नाही हि वस्तुस्थिती लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. सरकार काय करणार आहे याबद्दल रडण्यापेक्क्षा आपल्याला यातून काय मार्ग काढता येईल ते शोधणे आवश्यक आहे.

७० वर्षे केवळ सरकारने आमच्यासाठी काहीच केले नाही म्हणून रडारड करण्यात काय हशील आहे?

तुम्हाला हे कुणी सांगितलं की ते जोड धंद्याचा विचार करीत नाहीत? माझ्या भावांचे गावी दुकानही आहे किराणा मालाचे. त्यातूनही थोडंफार उत्त्पन्न होतं. शिवाय दुधदुभते, भाजीपाला घरचा त्यामुळे तो खर्चही वाचतो. पण त्यामुळे घाम गाळून शेतीत केलेल्या कामाचं महत्व कमी होत नाही. तुम्ही एकाच चष्म्यातून शेतकरी वर्गाकडे पहात आहात. बहुतांश शेतकरी काळाच्या बरोबर पावले टाकत आहेत. पण साहजिकच कुठल्याही समाजात असते तसे सगळेच शेतकरी एकाच बौद्धिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर नाहीत अजून त्यामुळे त्यांच्या प्रगतीचा वेग मंद आहे. सगळेच शेत सोडून शहराकडे यायला लागले तरी शहरातले ओरडतात 'गर्दी' होते म्हणून. शहरात मिळणाऱ्या कामातही अनिश्चितता असतेच. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावं? आत्महत्या?

आज शेतीप्रधान राहून आपला देश चालू शकणार नाही हि वस्तुस्थिती लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. सरकार काय करणार आहे याबद्दल रडण्यापेक्क्षा आपल्याला यातून काय मार्ग काढता येईल ते शोधणे आवश्यक आहे.

>> सहमत आहे. जो दुसर्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला असं कुणीतरी म्हणलं आहे ते उगीच नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2020 - 2:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, आपल्या प्रतिसादातील उदाहरणांशी आणि त्याच्या सारांशाशी मी सहमत आहे.

-दिलीप बिरुटे

गोंधळी's picture

15 Jun 2020 - 8:47 pm | गोंधळी

You either have to be part of the solution, or you're going to be part of the problem.'

"Those who are not for us are against us "

एक सामान्य मानव's picture

15 Jun 2020 - 12:19 pm | एक सामान्य मानव

शेत्कर्यान्च्या समस्या, प्रश्न कित्येक वर्षे झाली वाचत व ऐकत आहे. कर्जमाफी हा उपाय नाही हे ही कळाले. हमी भाव वाढवुन मिळाला तर प्रश्ण सुटेल असा एक उपाय मला तरी कळाला. अजून काही उपाय ह्यावर आहेत का? सरकार, बाकी समाज ह्यानी काय करावे म्हणजे शेतकरी सुखी होइल? मला प्रामाणिक्पणे जाणुन घायचे आहे. समजा हमी भाव जाहीर झाला तर प्रत्यक्शात तो मिळेल हे कसे करता येइल? म्हणजे समजा व्यापारी म्हणेल मला हा भाव परवडत नाही मी माल घेणार नाही तर उपाय काय? मला खात्री आहे हे असेच होत असणार पण सरकार कोणालाही माल घ्याच म्हणुन जबर्दस्ती तर करु शकत नाही. दुसरा मार्ग सरकार्ने सगळा माल घेणे व विकणे. पण भाजीपाला व फळे ह्यामधे हे व्यावहारीक ठरेल का?सध्या ऊस, कापुस ह्यामधेही सरकारी खरेदीत प्रचन्ड प्रश्न आहेत. नक्की उपाय काय. शेतीशी सम्बन्धीत कोणी उत्तर देऊ शकतील का?

ऋतुराज चित्रे's picture

15 Jun 2020 - 12:27 pm | ऋतुराज चित्रे

सत्तर वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही आणि सहा वर्षात ते सुटले पाहिजे असे कोणीच म्हणत नाही.परंतू शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात विद्यमान सरकार कमी पडल्याने " उत्पन्न दुप्पट " ची हमी देण्यात आली आहे. त्यासाठी झिरो बजेट चे पद्मश्री पुरस्कार वाटप असले खोटारडे धंदे सरकारी पातळीवर चालू आहेत. हमी भावातही आकड्यांचे खेळ चालू आहेत. सरकारचा हा खोटारडेपणा दाखविल्यास विरोध का केला जातो? मागचे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास कमी पडले म्हणून ह्या सरकारनेही तोच कित्ता गिरवावा असा काही नियम आहे का?

अभ्या..'s picture

15 Jun 2020 - 12:48 pm | अभ्या..

ह्याच्यावर एकच उपाय.
आणि तो मा. मोदीकाकांनी सांगितला आहे.
आत्मनिर्भर व्हा.
आश्वासनलेस निवडणूका घ्यायच्या. पाळायचा प्रश्नच नाही.
कुणी सरकारला काही करा म्हणायचेच नाही. सरकारने करतो म्हणायचेच नाही. केले तर छानच. नाही केले तर नेक्स्ट.
त्रास झाला, सहन करा... फायदा होत असेल, वरपून घ्या....बघवत नसेल, डोळे मिटा....तरीही पायजे, डोळे मिटून खा......
एकूण काय सिस्टिममध्ये राव्हा. ह्या आत्मनिर्भरांच्या सिस्टिममध्ये सगळेच आत्मनिर्भर व्हा..

ऋतुराज चित्रे's picture

15 Jun 2020 - 12:47 pm | ऋतुराज चित्रे

नक्की उपाय काय. शेतीशी सम्बन्धीत कोणी उत्तर देऊ शकतील का?

ह्यासाठी स्वामिनाथन आयोगाचा अहवाल संपूर्णपणे वाचा आणि अभ्यासा. हा अहवाल लागू केल्यास फक्त पाच वर्षात शेतकऱ्यांचे ५०% पेक्षा अधिक आर्थिक प्रश्न सोडवले जातील, हमीभावासकट. ह्यात सरकार आणि शेतकरी दोघांचे सहकार्य अपेक्षित आहे. शेतकरी संघटना ह्या अहवालातील फक्त सोयीच्या तरतुदींवर जोर देतात. हमी भाव आणि मार्केटिंग ह्यात अनुक्रमे सरकार आणि शेतकरी अडचणीत येतात.

एक सामान्य मानव's picture

15 Jun 2020 - 2:36 pm | एक सामान्य मानव

मिसळ्पाव सारख्या ठिकाणी माहितिचे आदान प्रदान होते. ज्याना माहिती आहे ते इतराना देतात व शन्का निरसन करतात. हे वाचा त्याचा अभ्यास करा हेच उत्तर असेल तर मग चर्चा प्रतिसाद कशाला? स्वामिनाथन समितिच्या २०० सूचना सरकारने स्विकारल्या आहेत. अजुन बर्याच सूचना आहेत. पण तरिही प्रश्ण सुटत नाहिच पण बिकट होत आहेत. तेव्हा नक्की काय चुकतय? हे जर कुणी शेतीशी सम्बन्धीत व्यक्तीनी सान्गितले तर माहीती मिळेल. अन्यथा अवहाल, समित्या इ. बर्याच गोष्टी आहेतच पण प्रत्यक्ष सम्बन्धीत कुणी माहिती दिली तर जाणुन घ्यावी म्हणून प्रश्न विचारला.

मराठी_माणूस's picture

15 Jun 2020 - 1:33 pm | मराठी_माणूस

आपल्या पोटात रोज जे अन्न जाते त्या साठी कोणीतरी उन्हातान्हात घाम गाळलेला असतो त्या बद्दल लोकांच्या मनात कृतज्ञता नसवी ह्याचे वैषम्य वाटले.

आपल्या पोटात रोज जे अन्न जाते त्या साठी कोणीतरी उन्हातान्हात घाम गाळलेला असतो त्या बद्दल लोकांच्या मनात कृतज्ञता नसवी ह्याचे वैषम्य वाटले.

@मराठी_माणूस

हा विषय तुम्ही तुमच्यासारखे लोकं नेहमीच भावनिक पातळी वर का नेऊन ठेवता?
जगात प्रत्येक जण काही ना काही काम करत असतो हे लक्षात घ्या. कोणी कोणावर उपकार करत नसतो.
शेती हा एक व्यवसाय आहे आणि याकडे सर्व शेतकरी एक व्यवसाय म्हणून पाहतील तेव्हाच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने सुरवात होईल.

उगाच बळीराजा, अन्नदाता कष्टकरी अशी विशेषणे लावून शेतकऱ्याला उगाच एक वोट बँक बनवून राजकारणी आपली पोळी शेकत आलेयत..!! आणि तुमच्यासारखे लोकं देखील या प्रवृत्ती ला खतपाणी घालतायेत

परखड बोलले कि तुम्ही इमोशनल डाव खेळायचा...
जर वर्षानुवर्षे शेती करून सुद्धा तुमच्या शेतमध्ये उत्प्न्न मिळत नाही आणि हे माहिती असून पण शेतकरी पुन्हा तीच पिके, तेच टेकनॉलॉजि, तेच मार्केट, आणि त्याच स्टेटर्जी वर भरवसा ठेऊन शेती करत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख माणूस नाही. अश्या लोकांना कर्जमाफी का द्यावी??

आणि दरवर्षी करोडो रुपयांची कर्जमाफी लाटून सुद्धा शेतकरी कर्जबाजरी च असेल तर खरंच प्रश्न अवघड आहे.

या प्रतिसादाला जर कोणी इमोशनल रिप्लाय (जसे कि कष्ट, घाम गाळने, दिवसभर कष्ट करणे, राबणे, अन्नदाता, बळीराजा इ इ ) दिला तर प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येतील.

मराठी_माणूस's picture

15 Jun 2020 - 2:53 pm | मराठी_माणूस

दुर्दैवी

शशिकांत ओक's picture

15 Jun 2020 - 3:07 pm | शशिकांत ओक

पेशवेकालीन पुस्तके वाचली त्यातही शेतसारा भरायची दैना, कर्जबाजारीपणा, यातून शेतकर्‍यांच्या जीवनातील कहाणी काही वेगळी नाही हे जाणवते...!

आमचा माल , आमची किंमत , आमचे मार्केट हे आहे का ?
आयात - निर्यात धोरणे सरकार रात्रित बदलते,
१०० रुप्ये किलो झाला कि निर्यात बन्द करते आयात करते
माल कुठे विकायचा हे बन्धन घालते , बर्‍याच ठिकाणी कोणते पीक घ्यायचे हे पण ठरवते.

मग सरकारनेच पाणी उपसा करायच का हे पण ठरवते
मागचे काहि वर्शे विमा सक्ति केलि, हप्ता कापला , त्याचे भरपाई आकडे लोकांना माहिती नस्तात.

मग सरकारने कर्जमाफि दिलि की ओरडायचे एवढे माहिति आहे

कपिलमुनी तुमच्या मुद्यांशी सहमत आहे.
पण प्रॉब्लेम हा आहे कि आपण लिहिलेल्या मुद्यांवर कोणीही काम किंवा प्रयोग करत नाही. प्रत्येक वेळेला कर्जमाफी, हमीभाव आणि अनुदान अश्या प्रकररच्या मालमपट्या केल्या जातात.

ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी कोणताही शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या राजकीय संघटना पुढे येत नाही. दरवेळी त्यांचा जोर फुकट काय मिळतेय ( जसे कि अनुदान, कर्जमाफी, शासकीय मदत इ ) वर असतो.

माझा मुद्दा एवढाच आहे कि शेती ला एक उपकारकार्य बनवून ठेवले आहे, शेतकरी शेती करून इतरांवर उपकार करतो असे जे काही वातावरण आहे ते शेतकऱ्यांसाठी च घातक आहे. शेतीला एक व्यवसाय बनवणे आवश्यक आहे आणि शासनाने आणि शेतकऱ्यांनी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेतला तर च शक्य आहे.. आणि शेतकऱ्याच्या मागण्या सुद्धा एखाद्या व्यावसायिका प्रमाणे असायला हव्यात..

अभ्या..'s picture

15 Jun 2020 - 6:04 pm | अभ्या..

शेतीला एक व्यवसाय बनवणे आवश्यक आहे
बनवायचा कशाला? आहेच त्यो व्यवसाय.
फक्त तो शेतकर्‍यांचा नाहीये, सरकारचा आहे.
म्हणूनच तर सरकारला साकडं आहे. शेतीसाठी करा, शेतकर्‍यांना आपोआप मिळेल.

तुषार काळभोर's picture

15 Jun 2020 - 6:32 pm | तुषार काळभोर

परत तोच लेख
परत तेच प्रतिसाद
परत तीच सत्तर वर्षे
परत तेच मोदी
परत तेच अ-शेतकरी लोकांचे प्रतिसाद
परत तेच भावनिक उपप्रतिसाद

हमीभाव दिला तर काय फायदा होईल?
एक उदाहरण घेऊ. (माझे आकडे माझ्या मनाचे आहेत, तुम्हाला हवे ते घ्या, आणि नवीन अंकगणित करा)
आपण हमीभाव असा ठरवू (काल्पनिक उदाहरणात)
मेथी तीस रुपये
कांदा चाळीस रुपये
कोथिंबीर वीस रुपये
बटाटा चाळीस रुपये
गहू / ज्वारी / बाजरी तीस रुपये
फ्लॉवर / कोबी / गवार इत्यादी भाज्या ऐंशी रुपये
(हा हमीभाव व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना द्यायचा आहे. पुढे ग्राहकाला विकायचा भाव किती असायला पाहिजे?)
समजा रोज पाच हजार मेथीच्या जुड्यांचा खप असताना वीस हजार जुड्या बाजारात आल्या तरी व्यापाऱ्यांनी त्या तीस रुपयांना खरेदी करायच्या?
आणि .....? बाकीच्या पंधरा हजार मेथीच्या जुड्या फेकून दिल्या जात असताना पहिल्या पाच हजार जुड्या ग्राहकांना पन्नास रुपयांत विकायच्या?
दहा रुपयांची जुडी आठ रुपयांत मागून वरती आल्याचा तुकडा नाहीतर कोथिंबिरीची काडी मागणारे ग्राहक घेतील?

बरं. या पन्नास रुपयांच्या पाच हजार मेथीच्या जुड्या फक्त शहरातले असंवेदनशील , उच्चवर्गीय, ग्राहक घेणारेत का? ग्राहकांत निम्न मध्यमवर्गीय, गरीब, दरिद्री, झोपडपट्टीमध्ये राहणारे, चाळीत राहणारे, रिक्षा चालवणारे, हमाल, बांधकामावर विटा वाहणारे आणि...... मेथी न पिकविणारे इतर शेतकरी आहेत की नाही? त्यांनी मेथी घेऊच नये का? की उकिरड्यावर फेकलेली इतर पंधरा हजार जुड्यापैकी उचलावी?

चला. आता यात मेथी ऐवजी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो हे शब्द आणि हवी ती किंमत वापरून मनातच एकदा परत वाचा.

काय करायचं?

गोलपोस्ट बदलायचा?
ठीके.

शेतकऱ्यांनी अन्नप्रक्रिया उद्योग केला पाहिजे.
पैसे? सरकारने दिले पाहिजेत. बरोबर. तेच अपेक्षित आहे. (कर्ज म्हणून दिले तरी त्याचा अर्थ तोच होतो. कारण कर्जमाफी शंभर टक्के मागितली जाणार अन ती होणार.)
पहाटे काढलेली मेथी दुपारनंतर जरा सुकली तर विसची गड्डी दहाला नाहीतर पार पाचला विकावी लागते. मग प्रक्रिया करून सुकावलेली किंवा फ्रोजन करून ताजी ठेवलेली मेथी घेणार? हमीभाव तीस + प्रक्रिया दहा. चाळीस रुपये उगमापाशी किंमत असलेली मेथी विकायची केवढ्याला? वाहतूक, हमाली, पॅकिंग...... म्हणजे ताजी मेथी पन्नास रुपयांना शहरातल्या माजलेल्या असंवेदनशील ग्राहकांनी घ्यायची. अन् प्रक्रिया केलेली गरिबांनी, इतर शेतकऱ्यांनी साठ रुपयांना घ्यायची?

अजुन एकदा गोलपोस्ट बदलायची?
अडते, दलाल, व्यापारी लुटतात. म्हणून हे सगळं होतं?
ओके.
सहमत. सगळ्या शेतकऱ्यांनी पहाटे उठून मेथी खुडून, जुड्या बांधून, त्याची गाठोडी बांधून स्वतःच्या गाडीतून दहा - पंधरा - वीस - तीस - पन्नास - शंभर - दोनशे किलोमीटर लांब बाजारात जाऊन स्वतः विकलं पाहिजे. ती मेथी संपे पर्यंत तिथे थांबायला पाहिजे. मग परत घरी येऊन दुसऱ्या दिवशी रिपीट करायला पाहिजे.
हा! आता सगळं व्यवस्थित होईल. नो वाहतूक, नो हमाल, नो दलाल, नो व्यापारी. थेट शेतकरी ते ग्राहक. एकदम orgasmic Utopia.

मी शेतकरी आहे. भाजी व्यापारी आहे आणि ग्राहक सुद्धा आहे.

मागे कुठं तरी लिहिलं होतं ते परत सांगतो. आवक वाढली तर व्यापारी शेतकऱ्याला म्हणतो ' पाचेशेनी देत असला तर घेतो नाहीतर चाललो.'
आवक कमी असली तर शेतकरी व्यापाऱ्याला तितक्याच तुच्छतेने म्हणतो ' दोन हजारात घ्यायचं तर घे नाहीतर निघ.'
आवक खूप जास्त असेल तर बऱ्याचदा शेतकऱ्यांना माल फेकावा लागतो. आणि आत्मविश्वासाने घेतलेला माल दिवसाच्या शेवटी विकला गेला नाही, तर व्यापाऱ्याला तो फेकून द्यावा लागतो. पावसाने पीक झोपले की शेतकऱ्याची मेहनत शून्य होते आणि राहिलेलं थोडंसं महागात विकत घेताना ग्राहकांची कंबर मोडते. (परत एकदा ग्राहकांत माजलेल्या असंवेदनशील शहरी लोकांबरोबर गरीब आणि इतर शेतकरी सुद्धा येतात. आणि, मार्केट आणि महागाई मोदिभक्त आणि मोदी विरोधक यात फरक करत नाही! दोघानाही एकाच रेट)

आम्ही सर्व चुलत भावंडे नोकरी आणि व्यवसाय करतो कारण अर्ध्या एकर शेतीत घंटा भागणार नाही हे चांगलं कळतं. आमच्या आधी आमच्या वडिलांनी आणि चुलत्याना पण हेच कळलं होतं. आता माझे बहात्तर वर्षाचे चुलते टाईमपास म्हणून अर्ध्या एकरात भेंडी, कोथिंबीर, मेथी करत राहतात. महिन्याला तीन चार हजार आरामात मिळतात. कधी पाच हजार, कधी एक हजार. पण सरासरी तीन हजार. अर्ध्या एकरात.
कधी कधी दसऱ्याला झेंडू, संक्रांतीला हरभरा असतो, त्यात दहा वीस हजार एकदम मिळून जातात. कधी अजिबात नाही मिळत.
खरं सांगतो, गावाकडे तीन हजार रुपयात चार जणांचं कुटुंब खावून पिऊन सुखी राहू शकतं. सिनेमा, मॉल, डी मार्ट, हॉटेल ,शॉपिंग असलं काही नसतं. चपाती, भाकरी, भाजी, भात, आठवड्यात एकदा अंडी अन एकदा मटण आरामात होतं! पण त्यावर अवलंबून राहता येत नाही, कारण त्यापलीकडे खर्च असतात. घराची दुरुस्ती, दुखणं, नातेवाईकांची लग्नं, कार्यक्रम, पोरं नातवंडं असतात. म्हणून शेतावर अवलंबून न राहता आम्ही नोकरी व्यवसाय केले. शेती आहेच. ती विकली नाही आणि विकणार नाही. कारण सातबाऱ्यावर आमचं नाव आहे म्हणून गावाच्या नावात पण आमचं नाव आहे. ते पुसून द्यायचं नाहीये.
जाऊ दे तेज्यायला. मोबाईलची बॅटरी बावन्न वरून छत्तीस वर आली टाईप करून करून. अंगठे अवघडले ते वेगळेच.

कपिलमुनी's picture

15 Jun 2020 - 6:55 pm | कपिलमुनी

सरकारी हस्तक्षेप आहे म्हणून हमीभाव आहे.
आयात निर्यात बन्धने आहेत ,
या कायद्यात बियाणे सुद्धा येतात , आपल्या इथे काय लावावे हे सरकार ठरवते . जी एम बियाणे लावून देते का सरकार ?

हा लेख वाचून घ्या .

अभ्या..'s picture

15 Jun 2020 - 7:04 pm | अभ्या..

शेतीला एक व्यवसाय बनवणे आवश्यक आहे
बनवायचा कशाला? तो आहेच मुळी.
फक्त तो शेतकर्‍याच्या मालकीचा नाहिये. तो सरकारच्या अन ग्राहकाच्या मालकीचा आहे. शेतकर्‍याच्या मालकीचे शेतजमीन फक्त (तसे मालकीचे नव्हेच, लीजवर म्हना हवे तर कारण रस्ते, धरणे, तलाव, उद्योग, प्रकल्पासाठी ते सरकार घेतेच परत.परतावा कसा, कधी, केंव्हा मिळेल ते सरकार ठरवते.)
जमीन पडून ठेवायची तर ती भाकड होते, थोड्या वर्षानी सार्वजनिक होते. कारण ती परत उपजाऊ करायची ताकद शेतकर्‍याचीच. विकता येते पण एकदा नाव उडले सातबार्‍यावरुन की मग पुन्हा ही वाट नाही. त्यात काय पिक घ्यायचे ते शेतकरी एकटा ठरवतो का? काय पेरायचे ह्यात सुध्दा सिस्टिमॅटिकली अवलंबून टाकलेय. सरकारनेच सुरुवातीला दाखवलेल्या हरितक्रांती अन सलग शेतीच्या पट्ट्यांच्या स्वप्नांनी आपले बियाणे स्वतः राखायची कला शेतकरी विसरुन गेलाय. जेनेटिकली मॉडीफाईड बियाणे, कृत्रिम खते आणि किटकनाशकांनी सगळ्यांच्या जीवाशी खेळ सुरु केला तेम्व्हा परत ऑर्गॅनिक शेतीकडे वळा म्हनून सल्ला देणे सोपे आहे पण मधल्या काळात जी जमिनीची, शेतीतंत्राची, जित्राबाची आणि शेतीसंकल्पनांची हानी झालीय ती भरुन काढणे एकट्या शेतकर्‍याचे काम नाही. मुळात परदेशातल्या फार्मिंगची अन भारतीय शेतीची तुलनाच करणे चुकीचे आहे. उष्ण हवामान काही पिकांना भले फायदेशीर ठरते पण तेच हवामान नाशवंत शेतीमालाचा काळ कमी करते. तसे कोल्ड स्टोरेज, तसे ट्रान्स्पोर्टेशन आणि रस्ते भारतात परवडण्यासारखे आहे का? ते एक असो, पुढची सरकारी चाल म्हणजे शेतीचे पाणी. त्याचे नियमन. धरणे उभारली शेतीसाठी, शेतजमिनी घेऊनच. पाणी जास्त कुठे जाते त्याचे? शहरांनाच ना. त्याचे कॅनॉल आणि दरवाजे ह्याचे नियंत्रण कोण? बरं स्वत:ची सोय विहिरी, तळे करुन केली तरी उपश्याला लाईट कुणी द्यायची? ती गावाकडे कशी असते ते बघा जरा. डिझेलचे पंप चालवायचे म्हणले तरी आहेत का गावोगावी पेट्रोलियम पंप? नगदी पिकातून पैसा मिळतो म्हनून उस लावायचा ठरला तरी त्याचा कंट्रोल कसा असतो हे बघा जरा. साखरकारखान्यांना कुठे आणि कशी परवानगी द्यायची हे कसे ठरवले? कुणी? बर इतर शाळू अन कडधान्याची आगरे अशा पैसानीतीने उध्वस्त होत गेली तरी दोष कुणाला? जरा कडधान्यातून पैसा मिळू लागला की परदेशातून दाळि आयात करण्याचे धोरण कोण राबवणार? जरा कांदा वर चढू लागला की तो का दुसरीकडून मागवायचा? कमी भाव झाला तर मग मात्र विका की मातीमोल.
अजुन लै स्टोरी है. लिहतो निवांत.

तुषार काळभोर's picture

16 Jun 2020 - 6:40 am | तुषार काळभोर

लोणीपासून पाटस पर्यंत बघितलं असेल. दोन्हीकडे बागायती शेती आहे. माझं निरीक्षण तिथलं आहे.
दुसरं निरीक्षण दुष्काळी भाग. सगळे सख्खे नातेवाईक.
माझं आजोळ पुरंदर तालुक्यात. सासवड कोंढवा रस्त्यावर हिवरे. तिथं कधी अपवाद म्हणून सुद्धा सरासरी पाऊस किंवा अतिवृष्टी होत नाही. माझे तीन मामा शुद्ध शेतकरी आहेत. प्रत्येकी आठ ते बारा एकर शेती. प्रत्येकाकडे विहीर. तिन्ही कुटुंब त्यांच्या गावातली आर्थिक दृष्ट्या उच्च मध्यमवर्गीय म्हणता येतील अशी. त्या भागात फक्त शेतीवर अवलंबून राहण्यासाठी पाच सहा एकर असायला हवी. माझ्या तिन्ही मामांकडे तेवढी असल्यामुळे ते त्यावर अवलंबून आहेत. मी एकदा पण कुणाला गाऱ्हाणं, रडगाण, कर्जमाफी, असलं काही करताना पाहिलेलं नाही.
कांदा, टोमॅटो, वाटाणा, गाजर, असं चालू असतं. माल जातो सासवड, हडपसर, मार्केट यार्ड नाहीतर वाशी मार्केट ला.
कुणी शेतीकर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे कर्जमाफी नाही.
प्रत्येकवेळी सोन्या सारखं पीक येतं अन त्याला बाजार सापडतो असंही काही नाही. कधी वर्षाला एक दोन लाख उत्पन्न. कधी पाच सहा लाख. एकदा तर एकानं नुसता गाजर विकून अल्टो घेतली.
लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे जमेल तसं जमेल तितकं शेतात काम करत राहतात (राबतात असं नाही म्हणत मी).
एका मामाची मुलगी त्यांनी जवळच्याच भिवरी गावात दिलीय. ते पण शुद्ध शेतकरी. दुसरीच्या घरी बियाणे आणि खत दुकान आहे. बाकी दोघींच्या सासरी एवढी शेती नसल्याने ते एकतर नोकरदार किंवा व्यवसाय करणारे.
दिवे घाट चढून गेल्यावर लगेच झेंडेवाडी आहे. तिथे माझी आत्या आहे. अजुन एक शुद्ध शेतकरी कुटुंब. पाच सहा एकर शेती. दसऱ्याला झेंडू अन बाकी वेळेत गहू किंवा बाजरी. पण त्यांना तीन मुले असल्यामुळे, त्यांना कळलं इथून पुढं शेतीत भागणार नाही. थोरल्या मुलाने सासवडला गॅरेज टाकलं. बाकी दोघे नोकरी. थोडं पुढं गेल्यावर काळेवाडी. तिथे थोरली आत्या राहते. त्यांना तीनच एकर शेती. त्यामुळे त्यांच्या नवऱ्याने, मग दोन्ही मुलांनी सुरुवातीपासून नोकरी व्यवसायच केले. घरच्या शेतीत थोडे अंजीर आणि सीताफळ असतात. ते अतिरिक्त उत्पन्न.

तिसरं उदाहरण.
परत हवेली तालुका. मांजरी गाव.
माझ्या सासऱ्याना आणि त्यांच्या दोन भावांना प्रत्येकी चार एकर बागायती शेती. प्रत्येक जण शुद्ध शेतकरी. एकाला दोन मुले. त्यांनी दोन एकरात भागणार नाही म्हणून सुरुवातीपासून (दहा पंधरा वर्षांपासून ) काही ना काही व्यवसाय केले. माझा मेहुणा एकटा असल्याने तो फक्त शेती करतो. सगळी मध्यमवर्गीय कुटुंब.

आता माझं निरीक्षण तोकडे असेल किंवा या उदाहरणातील लोक नशीबवान असतील किंवा प्रदेशानुसार मराठवाडा - सोलापूर पट्टयात किंवा इतर महाराष्ट्रात शेतीचे प्रश्न वेगळे, जटील असतील. तरी आपल्याला शेतीत पुरेसं मिळणार नाही हे ओळखून किमान पुढच्या पिढीला तरी वेगळ्या वाटेला लावायला पाहिजे असं वाटतं.

ता क - या उदाहरणांमध्ये जे शेतकरी आहेत, ते सामान्य शेतकरी आहेत. कुणीही उच्चविद्याविभूषित नाहीत. ते जिएम्, सेंद्रिय, झिरो बजेट असले जड शब्द ना वापरता सामान्य शेती करत राहतात.

तुषार काळभोर's picture

16 Jun 2020 - 5:53 am | तुषार काळभोर

वरचे दोन्ही प्रतिसाद (मला) प्रो- शेतकरी वाटत आहेत. पहिल्या प्रतिसादात जिएम् बियाणे का बंद केले म्हणून तक्रार दिसते.
दुसऱ्या प्रतिसादात जिएम् बियाणे आणणे ही चूक होती असा स्वर आहे.
जर अशी टीका दोन्हीकडून होत असेल तर कसं करावं?

हमीभवाचा मुद्दा काढला तर तो सोडा.
मग कुठला पकडू?

रस्ता, वीज, पाणी.

हे विषय शेतकऱ्यापासून ते उद्योजक अन सामान्य लोकांच्या आयुष्याशी निगडित आहेत. त्याच्या दुरावस्थे चा त्रास सगळ्यांना होतो.
शेती अन शेतकऱ्यांच्या अडचणीचं भावनिक भांडवलीकरण बंद व्हायला हवं.
शेतीचे तुकडे होत होत ती एकवेळ इतकी छोटी होते की व्यावहारिक दृष्ट्या त्या शेतीवर सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अशक्य होतो. जसं माझ्या वडिलांनी, त्यांच्या भावांनी, आम्ही भावंडांनी ओळखलं की आमच्या अर्ध्या एकराच्या तुकड्यात कुणाचच पोट नाही भरणार. मग आम्ही त्या शेतीवर अवलंबून न राहता नोकरी व्यवसाय सुरू केले. आमच्या आधीच्या पिढीने लहानपणापासून फक्त शेती बघितल्या मुळे दुसरं काही कौशल्य नव्हतंच. एका काकांनी दुकान टाकलं, एकानं वडापाव मिसळपाव चं हॉटेल टाकलं. एक जण मुंबईला जाऊन नोकरी करू लागले तर वडिलांनी पुण्यात नोकरी केली. आम्हाला शेतीशिवाय काही जमत नाही असं n म्हणता जे जमेल ते केलं.
किती लहान तुकडे झाल्यावर अवलंबून राहणे सोडावं हे प्रदेशानुसार ठरेल. आमच्याकडे दोन एकरावर एक कुटुंब अवलंबून राहू शकतं. उस्मानाबाद ला कदाचित दहा एकरांवर सुद्धा अवलंबून राहता येणार नाही. मग आपल्याला आपल्या मालकीच्या शेतीच्या तुकड्यात अवलंबून नाही राहता येणार, उदरनिर्वाह नाही करता येणार, हे ज्याचं त्यानं ओळखून पुढचं पाऊल टाकायला नको का? हजारो लोकांनी कर्ज काढून रिक्षा आणि कार घेतल्यात प्रवासी धंदा करायला. तीन महिने बसून आहेत. लवकर बाहेर पडतील असे वाटत नाही. कारण प्रवासी प्रवास करणं शक्यतो टळतील.
किती जणांकडून कर्जमाफीची मागणी ऐकली? हे लोक उच्च शिक्षित, उच्चवर्गीय, श्रीमंत आहेत का?

सुमीत's picture

16 Jun 2020 - 9:27 pm | सुमीत

प्रतिसाद संग्रहित करण्या सारखाच, खुप अभ्यास करून लिहिलेला

सुमीत's picture

16 Jun 2020 - 9:28 pm | सुमीत

प्रतिसाद संग्रहित करण्या सारखाच, खुप अभ्यास करून लिहिलेला

सुचिता१'s picture

17 Jun 2020 - 9:33 am | सुचिता१

+100 सगळे मुद्दे व्यवस्थीत मांडले आहेत.
प्रक्रिया उद्योजकांना उत्तेजन दिले तर काही तरी व्यवहारीक उपाय सापडेल, अशी आशा वाटते.

सुनिल1975's picture

15 Jun 2020 - 7:31 pm | सुनिल1975

Me zbnf shetkari ahe.jya kunala zbnf vishayi Shanka astil tya vicharu shakata.

कपिलमुनी's picture

15 Jun 2020 - 7:44 pm | कपिलमुनी

किति एकर क्षेत्र आहे ? बागायति कि जिरायति ?

सुनिल1975's picture

15 Jun 2020 - 7:38 pm | सुनिल1975

Call me 8007437075 for zbnf

सुनिल1975's picture

15 Jun 2020 - 8:09 pm | सुनिल1975

Bagayati 2 acre

सुनिल1975's picture

15 Jun 2020 - 8:14 pm | सुनिल1975

What is zbnf
Multilayer farming
Organic mulching
Desi seeds
No till
Jivamrut is not fertiliser it helps to increase soil micro biology
No buying any inputs from outside.

सुनिल1975's picture

15 Jun 2020 - 8:17 pm | सुनिल1975

Any one who want to visit my multilayer zbnf farm 2 year old can visit.adress at umbarde post gursale tal khatav dist satara pin 415506 maharashtra.

प्रसाद गोडबोले's picture

15 Jun 2020 - 8:39 pm | प्रसाद गोडबोले

असे काही लेखन वाचले की शेतकर्‍यांच्याविषयी फार वाईट वाटतं . स्वतः सप्लाय चेन मध्ये अ‍ॅक्टीव्ह रोल घेतल्याशिवाय शेतकर्‍यांचे भले होण्याची काहीही चिन्हे नाहीत !

बाकी

साईड वाईज एक समांतर विचार फार दिलासा देऊन जातो : आजोबांची गावाकडे बरीच शेतजमीन होती ते सर्वच्यासर्व कुळकायद्यात गेली , वाडा आधीच जाळला गेला होता. गावाशी असलेले सगळे नातेच तुटले अचानक. पण त्यामुळे आजोबा निराश झाले नाहीत उलट शहरात येऊन स्थायिक झाले आणि नवीन शहरी जीवनाशी जुळवुन घेऊन पुढे गेले म्हणुन आपण वाचलो नाहीतर आपल्या नशीबीही हीच अवस्था आली असती !
कुठं वीसहजार अन आठहजार अन चारशे आठशे ची रडगाणी नशिबात आलि असती , त्या पेक्षा ही मिलियन बिलियन ची रडगाणी बरीच बरी आहेत ब्वा !

आपण काय शिकलो :
शहरांकडे चला
शिका , पण संघटित होऊ नका , अन संघर्ष करण्याच्या तर विचार सुध्धा करु नका !
We are alone and that's the easiest way of achieving prosperity !!

वामन देशमुख's picture

15 Jun 2020 - 9:10 pm | वामन देशमुख

शहरांकडे चला
शिका , पण संघटित होऊ नका , अन संघर्ष करण्याच्या तर विचार सुध्धा करु नका !
We are alone and that's the easiest way of achieving prosperity !!

नेमकं मनातलं बोललात! +१

वाईट वाटतं वाचून. कोणाचं कुठे काय चुकतं कळत नाही. यावर काय उपाय हे हि कळत नाही.

मी लहान असताना आई आणि तिच्या मैत्रिणीनि ५-६ शेतकरी पकडून ठेवले होते. १ शेतकरी वर्षाचे गहू आणि तांदूळ द्यायचा (गहू त्याच्या शेतातला आणि तांदूळ बहिणीच्या असं कायतरी होतं), आणि एक लोणी गावातला छोटा शेतकरी होता तो बराच भाजीपाला घ्यायचा, आणि बाकी कुठेच न जाता आई च्या मैत्रिणीच्या घरी पोतं टाकायचा, त्यांच्या ओळखीतला का दूरच्या नात्यातला होता. थोडंसं आधी ऑर्डर घेऊन केल्यासारखं. दार शनिवारी सकाळी तिकडून यायचा. त्याचाही फायदा आणि आमचाही. नंतर ती मैत्रीण गेली आणि काही कारणाने बंद झालं हे सगळंच. पण अशी काही व्यवस्था करता येणं सगळ्यांना कितपत शक्य आहे देव जाणे.

एक प्रश्न मात्र आहे, जर एकाच गावातले १० शेतकरी कांदा लावताना दिसत असतील तर ११ वा शेतकरी, या वर्षी कांदा लावून उपयोग नाही वेगळं काहीतरी लावूया असं विचार का करत नाही? कारण एका वर्षी प्रचंड कांदा उत्पादन आणि दुसऱ्या वर्षी कांदा कमी उत्पादनामुळे प्रचंड महाग हे सतत कस होत राहतं.

ऑस्ट्रेलिया मध्येही शेतकरी कायम तंगी मध्ये असतो. दुष्काळ तर पाचवीला पूजलेला आहे.
माणसे नसल्याने यांत्रिक शेतीच फक्त होऊ शकते. बागायती आणि फळे यांचे विकत घेणे सर्व सुपर मार्केट च्या हातात आहेत. ते म्हणतील तो (च) भाव अन्यथा कचर्‍यात फेकावी लागतात. आणि या बड्या कंपन्या आहेत. त्यामुळे त्यांची दादागिरी चालते. मागे एका अशाच ज्युस कंपनीने संत्री घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी हजारो एकराच्या बागा लावल्या होत्या. पण नंतर न्युझिलंडची संत्री अजून स्वस्तात मिळाली तर या शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून ती संत्री घेतली. शेतकर्‍यांनी खुप ओरडा आरडा केला तरी काही उपयोग झाला नाही. शेवटी टनावारी संत्री वाया गेली.

येथे अनेक कुटुंबांनी लहान शेती सोडून दिली आहे. सिडनी मेलबर्न सारख्या शहरांची वाट धरली आहे. अनेक शेतकरी फक्त गाई पाळतात आणि त्या कसायाला विकायचा धंदा करतात. अनेक लहान गावे ओस पडली कारण सगळी तरुण मंडळी शहरात आली. गावात जगणे शक्य राहिलेले नाही. आणि ही परिस्थिती पुढारलेल्या देशातली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jun 2020 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर या विषयावर अनेकदा काथ्याकूट होतो अनेकदा अनेक बाजूंनी चर्चा होते, चर्चा व्हायला पाहिजे. सर्वप्रथम अनेकदा या विषयावर चर्चा झाली की सरसकट किंवा जे काही कर्ज घेतल्या जाते ते माफी करुन प्रश्न सुटत नाही, सुटला नाही हे वास्तव आहे. आता काहींनी तर हेच नियमित सुरु केले आहे. शेतीवर कर्ज घ्यायचे काही काळ नियमित व्याज भरायचे मुद्दल माफ होते. आता असे किती शेतकरी असतील असा कोणताही विदा आत्ता माझ्याकडे नाही. सर्वच शेतकर्‍यांना असे लाभ मिळत नसतील असेही गृहित धरु पण शेती हा प्रत्येकवेळी नुकसानीचाच धंदा होत आहे असे दिसते. वर बाप्पू म्हणाले तसे शेती व्यवसाय आहे, नुकसान फायदा होणारच आहे. शेतकरी, बळीराजा आहे, अन्नदाता आहे हे कोणालाही मान्यच आहे आणि त्याचवेळी ती एक मोठी मतपेटी आहे. या मतपेटीला समोर ठेवून बरेच निर्णय घेतले जातात. म्हणून वर्षानुवर्ष नव्या काळात आता कर्जमाफी ही दिलीच पाहिजे हे सुरु आहे, असेच दिसते ते अजिबात योग्य नाही असे मला वाटते. वर प्रतिसादात उल्लेख आला तसा एखाद्या नवयुवकाने एखादा नवा उद्योग सुरु केला आणि त्यावर्षी तो उद्योग नैसर्गिक किंवा अन्य कोणत्याही आपत्तीने बुडाला तर सरकार त्याला नव्या उद्योगासाठी पैसे देऊन त्याला त्याचे मुद्दल माफ करीत नाही हेही लक्षात घेतलेच पाहिजे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी एकूण छत्तीस लाख लोकांची यादी आली होती त्यात सरकारने दोनलाख कर्ज ज्यांचे असेल त्यांचे ससकटकर्ज माफ़ करु असे सांगितले होते. पीक कर्ज, मध्यममुदतीचे कर्ज अशा गोष्टी त्यात होत्या. सारांश, वर्षानुवर्ष कर्जमाफ़ी सुरु आहे. पण त्यामुळे प्रश्न सुटलेत का त्यावरही विचार व्हायला पाहिजे.

आजच्याच दैनिक लोकमत आवृत्तीत किसानपूत्र अमरहबीब यांचा लेख आला आहे. कमाल शेतजमीन धारणा कायदा हा पक्षपात करतो. ''पहिल्या घटना दुरुस्तीने शेतकर्‍यांचा घात केला असे ते म्हणतात बाकी तपशीलवार त्यात सर्व आहे तरीही ''शेतजमीनीवर सिलिंग लावल्यामुळे उद्योगजकांनी वा व्यावसायिकांनी शेतीकडे पाठ फिरवली. शेतकर्‍यांच्या तयार कंपन्या होऊ शकल्या नाहीत. शेतीत भांडवल आटले व नवी गुंतवणूक थांबली. जमीनीचे छोटेछोटे तुकडे झाले. शेतजमीनींचा आकार इतका लहान झाला की त्यावर गुजराण करणेही अशक्य झाले आहे. शेवटी शेतकर्‍यांना आत्महत्त्या कराव्या लागतात त्याला कारण परिशिष्ट ९ आणि पहिली घटनादुरुस्ती कारणीभूत आहे'' परिशिष्ट ९ मधे अडीचशे कायदे हे थेट शेती व शेतक-यांशी निगडीत आहेत. आवश्यक वस्तू कायदा आणि असंख्य अशा शेतकरी विरोधी कायद्यामुळेही शेतकर्‍यांचे नुकसान झाले याही गोष्टींकडे दुर्लक्ष करता येत नाही.

वडिलोपार्जीत जमीनीचे तुकडे झाले आणि आता लहान लहान तुकड्यांवर रोजगाराअभावी शेतीचे प्रयोग सुरु आहे आणी तो उद्योग घाट्यातच चालला आहे. शेतीकडे नवनव तंत्रज्ञानाअभावी केली जाणारी पारंपरिक शेती, उत्पादनाची हमी नाही, बाजारमुल्य नाही. अशी शेतकर्‍याची दयनीय अवस्था आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण प्रत्येकवेळी भावनिक होऊन प्रश्नाकडे पाहताही येणार नाही. जेव्हा जेव्हा शेतीविषयक अडचणी आणि प्रश्न समोर येतो तेव्हा तेव्हा स्वामीनाथन आयोगाच्या शिफ़ारशी शिफ़ारशींची चर्चा सुरु होते.

सकारने शेतक-यांसाठी जीवनविमा, जलयुक्तशिवार, दलाल यांच्यापासून सुटका केलेली दिसते परंतु काही प्रमाणात पण सरकारची मूख्य अडचण दिसते ती हमीभाव, जमीनधारणा आणि शेतीची विक्री बाबत. शेतीमालविक्री आणि उत्पादन नियंत्रण यावरही विचार करुन शेतक-याची आर्थिक बाजू सुधारु शकते. बरं शेतक-याचं असं आहे की शेजा-याने कोणते पीक घेतले तेच पीक तो घेतो त्यामुळे एकच पीक सर्वत्र घेतल्याने त्याच्या मालाला भाव मिळत नाही. आर्थिक तंगी त्याच्या वाटेला येते. स्वामिनाथन आयोगात कर्जमुक्ती दिसत नाही, असे असले तरी कमीदरात कर्ज देऊन त्याची परतफ़ेड करुन घेतली पाहिजे. शेतक-याला वरच्यावर कर्जमाफ़ी देऊन शेतक-याला पंगू करण्यापेक्षा त्याच्या रोजीरोटीची व्यवस्था लावून शेतक-याला ’आत्मनिर्भर’ करणेही गरजेचे आहे, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

कोण's picture

16 Jun 2020 - 11:22 am | कोण

उत्तम प्रतिसाद

उद्या माझ्या कामात प्रॉब्लेम आला तर मला प्रॉब्लेम कळत नाहीये आणि आता मला कंटाळा आलाय तोच तोच प्रॉब्लेम बघायचा असं कोणी म्हणत नाही, प्रॉब्लेम संपेपर्यंत प्रयत्न करत राहतात. अजून ४ लोकांना गोळा करून सुटतो का बघतात.
मला वाटतं कि जोपर्यंत समस्या आहे तोपर्यंत चर्चा चालूच राहिली पाहिजे, भले ती रटाळ वाटेल तीच तीच वाटेल, पण कदाचित कोणाला तरी काहीतरी वेगळं सुचेल.

बरं शेतक-याचं असं आहे की शेजा-याने कोणते पीक घेतले तेच पीक तो घेतो त्यामुळे एकच पीक सर्वत्र घेतल्याने त्याच्या मालाला भाव मिळत नाही.

हे करण्यामागे शेतकऱ्याच्या काही अडचणी आहेत का? बाजारात कांदे भरपूर झाले तर आपल्याला १ पैसा पण मिळणार नाही, किंवा कोणीच कांदा लावतं नसेल तर आपल्याला कांदा विकून चांगले पैसे मिळू शकतात, हे इतक्या वेळात कळलं नसेल असं शक्यच नाहीये. किमान आपल्या गावातले (शक्य असेल तर शेजार पाजारच्या ३-४ गावातले ) शेतकरी काय लावतात याचा अंदाज घेणं अशक्य आहे का?

दिलीप बिरुटे, एकदम संतुलित प्रतिसाद.

वर पैलवान यांच्या प्रतिसादाशी सहमत. मी स्वतः देखील पुरंदर तालुक्यातील असल्याने तेथील शेतकरी, त्यांचे उत्पन्न, राहणीमान, अडचणी जवळून पाहिलेल्या आहेत.

शेतकरी म्हणल्यावर एकदम फटका, राबून राबून खंगलेला, भोळा भाबडा, अन्नदाता, दलाल आडते यांच्या समोर हात जोडून उभा राहिलेला, कर्जबाजारी, कष्टकरी इ इ अशी image डोळ्यासमोर येते.. किंबहुना मीडिया, राजकीय संघटना, इ लोकांनी ती बनवलेली आहे.
आणि ती अत्यंत चुकीची आहे. शेतकऱ्यांना उपकारकर्ता असे प्रमोट करणे चुकीचे आहे. त्यांनी पिकवले नाही तर खाणार काय हा प्रश्न मुळातच हायपोथेटिकल आहे. मग त्याच न्यायाने उद्या टेलर लोकांनी कपडे शिवले नाही तर सर्वांनी घालणार काय? डॉक्तरांनी उपचार केले नाहीत तर जगणार कसे? पोलिसांनी संरक्षण केले नाही तर आपण वाचणार कसे? नोकरदारांनी आणि श्रीमंतांनी टॅक्स दिला नाही तर सरकार चालणार कसे?
समाजातील प्रत्येक घटक असे इमोशनल अपील करू शकतो.

शेतकऱ्याला आणि त्यांच्या प्रश्नांना भावनिक अंगाने विचार करून समस्या अजुन बिकट होणार आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त तोटा खुद्द शेतकऱ्याचाच आहे. कारण त्यामुळे त्यांच्या मूळ प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष होत राहतेय. आणि याचा फायदा आजवर राजकीय संघटना आणि इतर लोकं उचलतायेत.

मी माझ्या नातेवाईकांपैकी आणि माझ्या आणि आजूबाजूच्या गावातील जितके शेतकरी पाहिलेत त्यापैकी अगदी हातावर मोजण्याइतपत लोकांना कर्जमाफी चा लाभ मिळाल्याचे पाहिलेय. सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी आमच्याइथल्या शेतकऱ्यांनी केली असे ही चित्र नाहीये.
तसेच आजपर्यंत आमच्या इकडे कोणी कर्जबाजारी पणाने आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही.
आमच्याइकडे शेतकरी बऱ्यापैकी कमावतो, तेदेखील बहुतांश भाग दुष्काळी असून सुद्धा 4-5 माणसांचे कुटुंब आरामात जगेल इतके.
माझ्या सासऱ्यांनी फक्त शेतीच्या उत्पन्नावर गेल्या च वर्षी चार चाकी घेतली आणि स्वतः चे घर बांधले . ( मी नोकरदार असून सुद्धा मला या दोन्ही गोष्टीत कर्ज घ्यावे लागले होते ) पण त्याचा अर्थ असा नाही कि ते नेहमीच फायद्याची शेती करतात. बऱ्याच वेळेला नुकसान ही झालेय. पण फायदा + नुकसान यांचे ऍव्हरेज काढले तर उत्तर फायदाच येते.

ज्या लोकांना शेती कमी आहे किंवा शेतीतून उत्पन्न मिळत नाही त्यांनी आपापले व्यवसाय सुरु केलेत. आणि पुरंदर तालुक्यातील सर्वात यशस्वी व्यवसाय म्हणजे रसवंती गृह. आज तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, अगदी टोकाला जरी गेलात तरी तुम्हाला रसवंती गृह दिसेल आणि त्याचा मालक हा आमच्याच तालुक्यातील असेल ( विशेतः बोपगाव चाम्बळी, हिवरे, कोडीत, भिवरी, अस्करवाडी, गराडे या गावातील. पटत नसेल तर कधी विचारून पहा 90% हेच उत्तर मिळेल. ). कानिफनाथ रसवंती गृह हा एक प्रकारचा ब्रँड च तयार केलाय या लोकांनी.
यातले काही शेतकरी हे वर्षातले 7-8 महिने शेती करतात आणि उन्हाळ्याचे 4 महिने दुकान चालवतात. या व्यवसायाबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल, ते घेत असलेल्या कष्टाबद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे ते कधीतरी वेगळ्या लेखात लिहीन..

तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे कि समस्या असून सुद्धा बरेचसे शेतकरी शेतीतून उत्पन्न मिळवत असतात. आता व्यवसाय म्हणले कि कधी कधी तोटा होणार आणि तो शेतकऱ्यांना हाताळता आला पाहिजे. एखादा शेतकरी जर कायमच तोट्यात असेल तर ही त्या शेतकरयाची चूक आहे शेती व्यवसायाची नव्हे. त्याने शेती सोडून दुसरा काही मार्ग पाहावा. उगाच तोटा होतोय तरी शेतीतच गाढवासारखे कष्ट करायचे आणि नंतर सरकार आणि नॉन शेतकरी लोकांच्या नावाने गळे काढायचे.. हे चुकीचे आहे.. !
जर एखाद्या शेतकऱ्याला तोटा होत असेल तर सरकारने किंवा इतर लोकांनी त्याला शेतीच केली पाहिजेस अशी काही जबरदस्ती केली नाहीये. त्यांनी दुसरा एखादा मार्ग निवडावा जिथे त्यांना फायदा होईल आणि 4 पैसे मिळतील. उगाच रडीचा डाव खेळून त्याच्या नुकसानीचा भार इतर वर्गावर टाकू नये. आणि सरकाने देखील दरवर्षी कर्जमाफी आणि इतर डायरेक्ट पैसे वाटण्याची जी काही पद्धत पडलीये ती पूर्णतः चुकीची आहे आणि तात्काळ बंद केली पाहिजे.. आणि हे होणार नसेल तर मग याच न्यायाने सरकारने इतर सर्व छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायिकांना, नोकरदारांना त्यांच्या त्यांच्या संकट समयी सरळ पैसे वाटून आणि कर्जमाफी करून मदत करायला पाहिजे. त्यांनी काय घोडे मारलेत. ??

सुबोध खरे's picture

17 Jun 2020 - 8:18 pm | सुबोध खरे

बापू साहेब

असं परखड आणि सरळ सत्य लिहू नका.

ते राजकारण्याच्या प्रकृतीच्या दृष्टीने फार घातक आहे.

आवडाबाई's picture

20 Jun 2020 - 10:13 am | आवडाबाई

पटले आहे .

अशाने सामान्य लोकांची शेतकरी वर्गासाठी असलेली सहानुभूती देखील कमी होत आहे.

बबु's picture

17 Jun 2020 - 7:17 pm | बबु

पैलवान यान्च्या मताशी सहमत

सरकारचे एक चांगले पाऊल

शाम भागवत's picture

20 Jun 2020 - 11:03 am | शाम भागवत

मला काही शंका आहेत.
१. “शेतकरीच फक्त शेतजमीन विकत घेऊ शकतो.” ह्या नियमाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे की तोटा?
२. असा नियम अथवा कायदा, भारतातल्या सर्व राज्यात आहे का?
३. “शेत जमीन विकता येते पण एकदा नाव उडले सातबार्‍यावरुन की मग पुन्हा ही वाट नाही.” त्यामुळेच वेगळी वाट चोखाळायचं धाडस होत नसेल का?
४. शेती जरी विकली तरी तो शेतकरी, त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीही शेती विकत घेऊ शकेल अशी सवलत असल्यास, त्याचा फायदा होऊ शकेल काय?

सुबोध खरे's picture

20 Jun 2020 - 11:32 am | सुबोध खरे

“शेतकरीच फक्त शेतजमीन विकत घेऊ शकतो.” ह्या नियमाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे की तोटा?

शेतकऱ्यांबद्दल माहिती नाही परंतु अडते आणि दलाल यांचा मात्र फायदा झालेला आहे.

योग्य ठिकाणी पैसे दिले कि त्या राज्यातील सात बाराच्या उतार्यावर तुमचे नाव येते. मग तो एक गुंठा का असेना.
आणि त्या पुराव्यावर आपण कितीही जमीन विकत घेऊ शकता.

पुरेसे पाहसी असले कि हरणाने आत्महत्या केळींचेही सज्जड पुराव्यानिशी दाखवता येते मग हि तर किरकोळ गोष्ट आहे

मग राजकारण्याबरोबर साटेलोटे करून जमीनीचा एन ए करून तेथे घरे बांधून प्रचंड पैसे कमावता येतो याचा भूखंड आणि श्रीखंड आवडणाऱ्या राजकारण्यांनी महाराष्ट्रात आदर्श घालून दिलेला आहे.