मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा) ०२.११.२०१९ सेलम ते दिंडीगल

Primary tabs

सतीश विष्णू जाधव's picture
सतीश विष्णू जाधव in भटकंती
11 Jun 2020 - 10:01 pm

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा) ०२.११.२०१९

सेलम ते दिंडीगल

सकाळी साडेसहा वाजता सेलम जवळच्या 'अन्नामार हॉटेल' कडून राईड सुरू झाली. आज राईड सुरू करतानाच सुर्योदयाचे दर्शन झाले होते.

.

सोपान, नामदेव आणि विकासने पंढरपूर सायकल वारीचे भगवे टीशर्ट घातले होते. विकासचा पाय दुखत होता. पण जिद्द कायम होती. दोन्ही पायाला
नी-कॅप लावून आज सायकलिंग करत होता.

.

दिंडीगल येथे आजचा मुक्काम होता. सर्वजण एकत्र राईड करत होते. आज मी आणि लक्ष्मण लीड करत होतो.

साडेसात वाजता सेलमच्या मुख्य चौकात पोहोचलो. १६ किमी राईड राईड झाली होती.

पुढच्या तासाभरात एकूण ३० किमी राईड झाली आणि नामक्कल गावात पोहोचलो. तेथील टपरीवजा उडुपी हॉटेल मध्ये डोसा ऑर्डर केला. त्याच डोसा तव्यावर आम्लेट सुद्धा बनवले जात होते. शाकाहारी लक्ष्मणची गोची झाली, त्याने इडली ऑर्डर केली. मी डोसा आणि डबल आम्लेट ऑर्डर केले. इथली कॉफी मस्त होती.

पुढे कन्याकुमारीच्या एका माईल स्टोन जवळ पंढरपूर वारकरी सोपान, नामदेव आणि विकासचे विठोबा स्टाईल फोटो काढले.

.

.

नामदेवराव तर पुंडलिकाच्या आवेशात विठोबाला द्यायची वीट हातात असल्यासारखे, त्या माईल स्टोनवर एक हात वर करून उभे होते. तर दिपकचा त्या माईल स्टोनवर 'लाफिंग बाबा' आवेशात फोटो काढला. आज खऱ्या अर्थाने पळत सुटणारे सायकलस्वार निसर्गाचा, फोटोग्राफीचा आनंद घेत होते.

साडेअकराच्या सुमारास नामक्कल टोल प्लाझाला पोहोचलो. ७५ किमी राईड झाली होती. आज सुद्धा जेवणा ऐवजी इडली डोसा खात होतो.

ऊन चढले होते. दर अर्ध्या तासाने हायड्रेशन ब्रेक घ्यावा लागत होता. या हायवेवर धाबे तुरळक होते. एका हायड्रेशन ब्रेकमध्ये पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला घरी बनविलेली बलुशाही आणि चिवडा खायला दिला.

.

मुंबई कन्याकुमारी सायकल राईड करत "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश सर्वाना देत असल्याबद्दल त्या पोलीस अधिकाऱ्याने आमचे कौतुक केले. त्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सुद्धा लक्ष्मण होते, हे विशेष.

पुढे गेलेल्या सोपान आणि कंपनीला आम्ही करूर शहराच्या अलीकडेच गाठले.

.

आता भरगच्च नारळाच्या वाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरभरून लागत होत्या. या नारळांच्या झाडांखालची जमीन सुद्धा हिरवीगार दिसत होती. जणूकाही हिरवळीची दुलई अंथरली होती.

तीनच्या दरम्यान १२० किमी राईड झाली होती. करूर शहर जवळ आले होते. विकासच्या लक्षात आले, सोपनच्या सायकलचे मागचे चाक व्होबल करते आहे. थांबून तपासताच समजले, चाकामधील एक तार तुटली आहे. कन्याकुमारी अजून ४०० किमी होते, त्यामुळे सायकल दुरुस्त करण्यासाठी लक्ष्मण, विकास, सोपान आणि मी करूर शहरात घुसलो. दोन सायकलची दुकाने सापडली, पण नवीन तार सापडली नाही. सोपनने पुढे तशीच राईड करायचे ठरविले.

.

या शहरातील "ताशी स्वीट बेकरी" मध्ये लक्ष्मण आणि मी मिठाईचा आस्वाद घेतला. विकास आणि सोपान पुढे गेले होते.
तामिळनाडूचे रस्ते एकदम मस्त होते. रस्त्यावर रहदारी कमी असल्यामुळे वायू प्रदूषण नव्हते.
उन्हाचा चटका जाणवत होता. मी आणि लक्ष्मण दमलो होतो. पुढे पाच किमी हायवेला आलो आणि जोरादार स्प्रिंट मारायला सुरुवात केली. रस्त्यात सर्वजण भेटले. आम्हाला पुढे जाऊन हॉटेल बुकिंगची कामगिरी मिळाली. दिंडीगलच्या भर चौकात "सुकन्या इन रेसिडन्सी" हे छान पैकी हॉटेल मिळाले. रात्री आठ वाजता बाकीची मंडळी सायकलिंग करत हॉटेलवर पोहोचली. बेसमेंटमध्ये सायकल पार्किंगसाठी जागा होती.

१७० किमी राईड उन्हामुळे खडतर झाली होती, परंतु कन्याकुमारी आता जवळ आल्यामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास बुलंद झाला होता.

सतीश विष्णू जाधव

प्रतिक्रिया

१७० किमी राईड उन्हामुळे खडतर झाली होती, परंतु कन्याकुमारी आता जवळ आल्यामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास बुलंद झाला होता.

वा मस्त...

सतीश विष्णू जाधव's picture

3 Jul 2020 - 11:16 pm | सतीश विष्णू जाधव

धन्यवाद गणेशा........

सिरुसेरि's picture

12 Jun 2020 - 12:04 pm | सिरुसेरि

मस्त प्रवासकथन .

सतीश विष्णू जाधव's picture

3 Jul 2020 - 11:19 pm | सतीश विष्णू जाधव

खूप आभारी आहे.