गावातील कोरोना पॉजीटीव्ह...

Vivekraje's picture
Vivekraje in काथ्याकूट
6 Jun 2020 - 12:12 pm
गाभा: 

आपण सगळीकडे कोरोनाची परिस्थिती बघत आहोत त्यात शहरातला कोरोना आणि गावातला कोरोना यात थोडा फरक जाणवतो त्यात गावातल्या कोरोना कशा पद्धतीने हाताळला जातो याच थोडं वर्णन....
काही वाक्य मुद्दाम गावातील बोलीभाषेत लिहिली आहेत....
=============================================================================
जसा भारतात कोरोनाचा प्रसार होऊ लागला आणि सरकारने लॉकडाऊन ची घोषणा केली तस गावात सुद्धा गावकरी कोरोना बद्दल जागरूक होऊ लागले. टीव्ही आणि मोबाईल वर जी कोरोनाची दृश्य बघितली जात होती त्यानुसार गावकरी जास्तीत जास्त जागरूकतेने गावात काळजी घेत होते.गावात कुणी बाहेरगावाहून आले की लागलीच त्याची माहिती पोलिसांना कळवण्यात येत होती. गावातील लोकांचा निर्धार होता की गावात कोरोना यायलाच नको. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये गावाच्या परिसरात कुठेही कोरोनाबधित रुग्ण नव्हता त्यामुळे गावकरी बऱ्यापैकी निवांत होते. गावाच्या एक बाजूला जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला तालुक्याचं ठिकाण त्यामुळे गावाला तसं म्हटलं तर केव्हा तरी कोरोनाचा धोका होताच. पण गावात ग्रामपंचायत आपल्या परीने जनतेत जागृती निर्माण करत होती. आणि अखेर जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्ण सापडले आणि लगोलग तालुक्याच्या ठिकाणी पण. आणि काही दिवसातच फक्त काही आकड्यांच्या फरकाने संख्या वाढायला लागली.
गांव हायवेवर असल्याने आणि जिल्हा व तालुक्याच्या शहरापासून अवघ्या १०-१५ कि.मी .अंतरावर असल्याने गावातील लोकं आणखी सावध झाले. गावातील ओट्यावर कुणी गप्पा मारत बसू नये म्हणून वंगण टाकली, मध्येच ड्रोन ने निगराणी होऊ लागली. गाव मोठं आणि ग्रामपंचयतीत तरुण आणि उच्चशिक्षित वर्गाचा भरणा जास्त असल्याने तसेच गांव धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असल्याने चौका- चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले. गावात प्रत्येक व्यक्ती जणू ' कोरोना साक्षर' त्यामुळे अगदी थोडंफार जरी संशयास्पद वाटलं की लगेच पोलिसात माहिती दिली जायची. पण इतकं असूनही रस्त्याने जाणाऱ्या स्थलांतरितना जेवणाची व्यवस्था गावाने केली होती.
तर असा सावधगिरीने गावाचा रहाटगाडा चालला होता आजूबाजूला रोजचा आकडा वाढत होता. आणि अचानक एका ७० वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉजिटिव्ह आला आणि क्षणात गावातलं वातावरण बदललं. गावात लगेच म्हणजे अहवालाची बातमी आल्याच्या अर्धा तासात संचारबंदीच लागू झाली. सफाई कर्मचाऱ्यांनी फवारणीला सुरुवात केली , ग्रामपंचायत कर्मचारी फेसशील्ड , मास्क, ग्लोव्हज आणि हातात काठ्या घेऊन रस्त्याने मार्च करायला लागले. बघणाऱ्याला अस वाटावं की आता जर कोरोना समोर आला तर तो काही वाचणार नाही. गावात तीन दिवस पूर्ण कर्फ्यु लागला आणि मग गावात ओट्यावरच्या चर्चा लपूनछपून खळ्यात सुरू झाल्या.....
"कारे...खरंच आला का तो पॉजीटिव्ह...??"
"रात्री त ऍडमिट केलं होतं...लगेच रिपोट आला बी...??"
"अरे यार.!! ह्या म्हताऱ्याले बी गुपच्याप घरी बशाले काय झालतं.."
"अबे मी न्ह त आताच भाजीपाला आणला व्हता त्याच्या कडून..."
खरं म्हणजे जी व्यक्ती पॉजीटीव्ह सापडली होती त्या व्यक्तीचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता आणि गेल्या कित्येक वर्षांपासून ती व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब फक्त भाजीपलाच विकत होते..आणि दुर्देवाने ती व्यक्ती मृत झाल्यावर त्याचा रिपोर्ट पॉजीटीव्ह आला होता.
मग काय त्यांच्याकडून भाजी पाला घेणाऱ्या सगळ्यांचीच तंतरली..
ज्यांनी त्या आठवड्यात त्यांच्याकडून भाजीपाला घेतला होता ते सगळे कोरोना झाल्यासारखे बागू लागले. अख्खा गाव सुतक पाळायला लागलं...
शासनाने त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेस करून बऱ्याच लोकांचे नमुने घेतले. आता शहरात आणि गावात एक मोठा फरक म्हणजे शहरात बाजूच्या गल्लीत काय झालं हे पण कळत नाही पण गावात मात्र लगेच सगळं समजतं त्यामुळे त्या व्यक्तीला अक्ख गावं ओळखत होतं आणि त्यामुळे जो पर्यंत बाकीच्यांचे रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत सगळं गांव 'स्वतःच्या' चिंतेत होत. सुदैवाने बाकी सगळ्यांचे म्हणजे त्यांच्या कुटुंबियांचे सुद्धा रिपोर्ट १० दिवसात निगेटिव्ह आले आणि गावाने सुटकेचा निश्वास सोडला.
आणि गावात पुन्हा चर्चा सुरू झाली...
"अरे ..सरकारन मुद्दाम संगीतल अशीन ....म्हणजे असबी त म्हतारा मेलाच होता पण लोकांना जर पॉजीटीव्ह सांगितलं त लोकं जास्त नियम पाळतीन....."
"मले त वाटतं भो त्याले दवाखान्यातच लागण झाली आशीन....नही त त्याच्या घरातले सगळे निगेटिव्ह कशे आले...."

अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तार्किक चर्चा गावात रंगू लागल्या....

पण ह्या सगळ्या चर्चात मृत व्यक्तीबद्दल कुठलीही सहानुभूती कुणालाही नव्हती...उलट ती व्यक्ती कोरोना मुळे गेली याचा संतापच होता...आणि बाकीच्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणून आनंद जास्त होता....
कोरोनांन जगण्याचा आणि मरणाचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे..
गावात ह्या गोष्टी जास्त प्रकर्षाने जाणवतात कारण इथं प्रत्येक व्यक्ती एकमेकाला ओळखते.

एखादाच्या मरणाला अख्ख गांव दुःखात सहभागी होतं पण कोरोनामुळे आता त्या दुःखाचीही विभागणी झालीय...

कोरोनामुळे गेला की गावात आधी भीती आणि संताप अशा संमिश्र भावना व्यक्त होतात...

कोरोनाव्यतिरीक्त दुसऱ्या कारणाने गेला की आधी सुटकेचा निश्वास आणि नंतर दुःख...

प्रतिक्रिया

गावात लोक अती सावध आहेत हे मात्र खरे आहे.
सर्व एकमेकाला ओळखतात त्या मुळे कुणी नियम तोडायचा प्रयत्न जरी केला तरी गाव पातळीवर त्या व्यक्ती वर दबाव टाकला जातो.
शहरात मला काय करायचे आहे अशी वृत्ती नाही.
त्या मुळे गाव तशी corona pasun लांबच आहेत.

Nitin Palkar's picture

6 Jun 2020 - 2:17 pm | Nitin Palkar

गावातील लोक सावध असतात हे चांगलेच आहे.... शहरात, बाजूचा बाहेर फिरतोय मग मीच कशाला घरात थांबू, ही मानसिकता प्रामुख्याने दिसते. त्यामुळे प्रादुर्भावाचे प्रमाण वाढताना दिसते.

गणेशा's picture

6 Jun 2020 - 3:28 pm | गणेशा

अवांतर -
गावातील लोक हे सुशिक्षित जास्त असतात.. त्यांना निसर्ग.. माणुसकी जास्त समजलेली असते असे माझे मत..

जेम्स वांड's picture

7 Jun 2020 - 7:48 am | जेम्स वांड

काही पेशल अपमान तुमच्या दिशेने प्रवास सुरू करत असावेत महाराष्ट्राच्या राजधानीतून (अन् हो कदाचित सांस्कृतिक राजधानीतून पण)

Hysterical Laughter

अभ्या..'s picture

7 Jun 2020 - 8:50 am | अभ्या..

पण ते तर टॅक्स भरत नाहीत म्हणे.

नाही नाही ते धाग्याला अती अवांतर होईल :-)

त्या साठी मागे शेती आणि राजकारण या माझ्या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे.. आता पुन्हा ताकद नाही आपल्यात :-))