प्रॉन्स स्टू ......

Primary tabs

किल्लेदार's picture
किल्लेदार in पाककृती
18 May 2020 - 4:44 am

पटकथेत फारसा दम नसला, दिग्दर्शक नवखा असला तरीही फक्त आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुभवी नटांनी एखादा चित्रपट ओढून न्यावा तशीच ही एक पाककृती आहे.

यातले प्रमुख अभिनेते म्हणजे कोळंबी आणि नारळाचे दूध आणि बाकी बरेच सहाय्यक व चरित्र अभिनेते.

प्रमुख अभिनेते -
सात ते आठ मोठे प्रॉन्स
२००-३०० मिली नारळाचे दूध

सहाय्यक अभिनेते -
थोडा चिरलेला कांदा
अर्धा चमचा चवीपुरती आलं -लसणाची पेस्ट
हिरवी मिरची
कोथिंबीर
सेलरी (आवडत असल्यास...आज खूप दिवसांनी ही मिळाल्यामुळे "सॅलरी" मिळाल्यागत आनंद झालाय)
थोडे मीठ

चरित्र अभिनेते -
थोडी दालचिनी
१-२ तमालपत्रं
पाच-सहा अक्खे मिरे (मी स्वतःच्याच डोक्यावर वाटलेली मिरपूड घातली.)
तीन-चार चक्रफुलं.

(कढी-लिंब या सहाय्यक अभिनेत्याच्या तारखा मिळाल्या नाहीत आणि गाजर याचा रोल ऐन वेळेवर दिग्दर्शकाने कापला याची नोंद घ्यावी)

Ingredients

Prawns

पटकथा अगदीच आटोपशीर आहे... (खाली दिलेल्या क्रमाने आणि वेळेनुसार पात्रांची एन्ट्री होते)

कांदा आणि आलं लसणाची पेस्ट - १० मिनिटे
मिर्ची आणि इतर सर्व चरित्र अभिनेते - ५-७ मिनिटे
प्रॉन्स - ५-७ मिनिटे
नारळाचे दूध - ५-७ मिनिटे (उकळी येईस्तोवर)
क्लायमॅक्सला मीठ, कोथिंबीर आणि सेलरी ची एन्ट्री

....बस्स....

Stew

तर हे असे "प्रॉन्स स्टू" भाताबरोबर खाऊ शकता. पातळ हवे असल्यास थोडे पाणी घाला. घट्ट-सर बनवले तर अप्पम बरोबर सुद्धा छान लागेल.

याबरोबर थोडी स्पायसी आणि लवंगीचा स्वाद असलेली "लेफ्फे" बिअर असेल तर क्या बात है !!! ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.
(आता लेफ्फे बिअर सगळीकडेच आणि नेहमीच मिळेल असे नाही. त्यामुळे उपलब्ध कच्च्या मालावर संशोधन करून "आत्मनिर्भर" बनण्याचे प्रयत्न चालू आहेत)

प्रतिक्रिया

किल्लेदार's picture

18 May 2020 - 4:51 am | किल्लेदार

संकलनाच्या चुकीमुळे सर्व मिश्रण तेलावर परतावे हा भाग टाकायचा राहून गेला... चवीला थोडे बटर घालू शकता...

चौकस२१२'s picture

18 May 2020 - 6:19 am | चौकस२१२

गंमत म्हणून लिखाणाची शैली आवडली ..
एक प्रश्न पडला, या सादरीकरणाचा चा एकूण थाट भारतीय मसाल्यांचा किंवा थोडाफार थाई ! वाटतोय मग त्यात सेलरी या नटाचे काय काम? कोणता रंग तो या नाट्यास आणतो? रामायणात महाभारतातले पात्र आले कि काय !
साधारण "वेजिटेबल stok करताना सेलरी कांदा आणि गाजर आणि इतर वनस्पती असतात ) म्हणून विचरावेसे वाटले
आपला चौथ्या रांगेतील समीक्षक

किल्लेदार's picture

18 May 2020 - 7:38 am | किल्लेदार
किल्लेदार's picture

18 May 2020 - 7:44 am | किल्लेदार
चौकस२१२'s picture

18 May 2020 - 7:24 pm | चौकस२१२

हो बरोबर थाई करीत सेलरी नसते .. मी चुकून थाई उल्लेख केला कदाचित नारळी दुधामुळे

पैलवान's picture

19 May 2020 - 5:39 pm | पैलवान

टाकू नका प्रतिसादात.
त्यामुळे प्रतिसाद रिकामा उमटतो.

सरनौबत's picture

18 May 2020 - 10:09 am | सरनौबत

क्या बात किल्लेदार! पदार्थाइतकीच बनवण्याची कृती सुद्धा मजेदार! छायाचित्रकाराचे काम देखील (नेहेमीप्रमाणे) मस्त जमले आहे. प्रॉन्स-२ हिंदीत "प्रॉन्स जाये पर शान ना जाये" नावाने रिलीज करा निर्मात्याला सांगून ;-)

किल्लेदार's picture

18 May 2020 - 4:08 pm | किल्लेदार

हा हा हा !!!

शॉर्ट फिल्म आवडल्या गेली आहे.

किल्लेदार, आपण जेव्हा कॅनडाच्या स्वारीवरून परत याल, त्यावेळी काही डिश तुमच्या आणि काही आमच्या.. असे करत काही दिवस खास करण्याचा मनसुबा करूयात. :-)

किल्लेदार's picture

18 May 2020 - 4:09 pm | किल्लेदार

जरूर...

मोदक's picture

18 May 2020 - 6:54 pm | मोदक

पटकथेत फारसा दम नसला, दिग्दर्शक नवखा असला तरीही फक्त आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुभवी नटांनी एखादा चित्रपट ओढून न्यावा..

माझ्या एका अनुभवास हे वर्णन अगदी तंतोतंत लागू होईल..

अमेरिकेत एकदा श्रिंप कॉकटेल नावाची डिश मागवली तर थोड्यावेळाने समोर कच्चे प्रॉन्स आले, कांहीतरी डिप होते सोबत.. "ही डिश आमच्यायेथे अशीच देतात" म्हणून. मोठाले प्रॉन्स होते त्यामुळे परत पाठवणे जीवावर आले. मग ते सगळे टू गो करून घेतले आणि हाटेलवर आणले.

दुसर्‍या दिवशी एके ठिकाणहून टॉम खा सूप आणले.

गरमागरम बटर मध्ये ते प्रॉन्स गुलाबी होईपर्यंत झक्कास परतून घेतले आणि शेवटची दोन मिनीटे थोडे टॉम खा सूप पॅन मध्ये घालून त्यात ते प्रॉन्स शिजवले.

कोकोनट करीमधले प्रॉन्स तयार झाले होते. :)

चौकस२१२'s picture

18 May 2020 - 7:23 pm | चौकस२१२

आपली काहीतरी गैरसमजूत होतीय श्रिम्प कोटेल मधील श्रिम्प हे कच्चे नसतात तर उकडून गार केलेले असतात त्यामुळे तुम्हाला कदाचित ते कच्चे वाटले असतील

असेल ब्वा.. गार, पांढरे व मूळ शेप आजिबात न बदललेले बघून तसे वाटले असेल.

किल्लेदार's picture

18 May 2020 - 7:58 pm | किल्लेदार
जव्हेरगंज's picture

18 May 2020 - 7:05 pm | जव्हेरगंज

शिनेमा आवडला!!

स्मायल्या आहेत का प्रतिसादात.?

त्या काढा, मग द्या प्रतिसाद.

किल्लेदार's picture

18 May 2020 - 8:08 pm | किल्लेदार

@ मोदक... तुम्हाला निदान कच्चे प्रॉन्स मिळाले. मला तर एकदा साखरेत घोळवलेले मिळाले. टाकून द्यावे लागले. बाय द वे, हे टॉमखा सूप काय प्रकार आहे ?
@चौकस.. वर प्रतिसादात स्माइली मुळे काहीतरी घोळ होत होता. नुसते शीर्षक डकवल्या जात होते.
तुमचे बरोबर आहे. थाई करी मध्ये सेलरी टाकत नाहीत. मला त्याची एक फ्रेश चव आवडते म्हणून टाकली थोडी. कढीलिंब बाहेर जाऊन आणायचा कंटाळा केला नाहीतर ते हवेच. भाज्या आपल्या आवडीनुसार टाकू शकतो पण प्रॉन्सला स्वतःची एक विशिष्ट चव असल्यामुळे सगळ्याच भाज्या कदाचित चांगल्या लागणार नाहीत. असो. उपलब्ध साहित्यातून बऱ्यापैकी काहीतरी करण्याचा प्रयत्न
@जव्हेरगंज ... धन्यवाद...

पुन्हा साखरेतले प्रॉन्स मिळाले आणि साखर अगदी मुरलेलीच असेल व तशी नको असेल तर कोमट पाण्यात प्रॉन्स ठेवा आणि थोड्या वेळाने पाणी बदलत रहा. असे केल्यास १०-१५ मिनीटात गोडसरपणा कमी होईल.

नाहीतर सरळ एखादे स्टेक रब किंवा हनी गार्लीक रब मिळवा आणि झकास "हनी ग्लेझ्ड प्रॉन्स बनवा"
तिखटाचे प्रमाण थोडे जास्त ठेवा आणि वरून मध घालून तिखट-गोड ब्रॉथ बनवा.

गरमागरम ब्रॉथ, मधूनच एखादा प्रॉन्स आणि सोबतीला तुमच्या आवडीचे पेय. वल्लाह..!!!

किल्लेदार's picture

19 May 2020 - 5:24 pm | किल्लेदार

ते गोड प्रॉन्स सर्व इंद्रियांना एकदा धक्का देऊन गेलेत. परत विषाची परीक्षा परीक्षा कशाला ?

मन्या ऽ's picture

18 May 2020 - 8:08 pm | मन्या ऽ

रेसिपी आणि लेखनशैली दोन्ही आवडली..

किल्लेदार's picture

19 May 2020 - 5:18 pm | किल्लेदार

धन्यवाद