गणित

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
15 May 2020 - 7:21 pm

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची स्वत:ची अशी काही गणिते ठरलेली असतात. पण या गणितांत ऐनवेळी अनोळखी अ, ब, क... च्या रूपात येणाऱ्या नव्या स्थिरांकांचा [(constants)/व्यक्तींचा] समावेश सुद्धा कसा चपखल होतो. जणू त्या समीकरणात त्यांची एक विशिष्ट जागा मुद्दामहून मोकळी ठेवली होती. खरेतर हे सुद्धा गणितच! पण अशी कमालीची, अनाकलनीय लवचिकता फक्त या जीवनाच्या गणितातच असते. काही व्यक्तींच्या प्रवेशाने आजवर न सुटलेली क्लिष्ट कोडी चुटकीसरशी सुटतात. तर काही तोंडी गणिते आता गणकयंत्राला सुद्धा अवघड वाटू लागतात. ही सगळी जादू फक्त व्यक्तींची. आपल्या सगळ्यांची सगळीच गणिते पृथ्वी नावाच्या या विशाल पाटीवर मांडून ठेवलेली आहेत. कधीकधी आपल्या गणितावर प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही उत्तर काही हाती येत नाही. पण आपण वापरलेली पद्धत मात्र दुसऱ्या कुणाच्या तरी प्रश्नाचे संपूर्ण समाधान करते तेव्हा आनंदाचा गुणाकार होतो. काही गणिते अचानक पुसली जातात. काही स्थिरांक (व्यक्ती) मध्येच चक्क दुसऱ्या समीकरणात जाऊन बसतात. तेव्हा मनाचा आणि मेंदूचा गोधळ उडणारच. माझाही असाच गोंधळ उडालाय आजवर खूपवेळा. पण मला मात्र यावर एक जालिम उपाय सापडलाय. मी मनापासून गणित सोडवायचा प्रयत्न करतो. मध्येच कुणी अ, ब, क... साथ सोडून गेले तर मी खचत नाही. कारण माझ्याकडे शून्य आहे. मग मी सगळ्या गणिताला गुणतो शून्याने. बाकी शून्य! मग पुन्हा एक, दोन.. आणि हो, शून्य आपल्याकडे तसाच राहतो. पुन्हा गरज पडलीच तर...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

16 May 2020 - 9:41 pm | Prajakta२१

गणिताचे रूपक चांगले वापरले आहे