पाली गणपती सायकल भेट ०३.०३.२०२०

Primary tabs

सतीश विष्णू जाधव's picture
सतीश विष्णू जाधव in भटकंती
14 May 2020 - 8:01 pm

पाली गणपती सायकल भेट ०३.०३.२०२०

.

मंगळवार म्हणजे गणपतीचा वार !!!
आज ठरले, पालीच्या गणपतीला भेट द्यायची. विजयची संकल्पना मी उचलून धरली आणि आजची सायकल सफर सुरू झाली.

अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. बल्लाळ या गणपती बाप्पाच्या असीम भक्तामुळेच त्याला बल्लाळेश्वर म्हणतात.
.

पंधरा दिवसांपूर्वीच ओझरच्या बाप्पाची भेट घेतली. आज पालीच्या गणपतीच्या भेटीला निघालोय. अशा प्रकारे निसर्ग भ्रमणाबरोबर गणरायाचे दर्शन घडणार आहेच, तसेच प्रदूषणमुक्त भारत या संकल्पनेसह शारीरिक स्वास्थ्य; अशा बहुआयामी कार्यावर विजयसह निघालो आहे.
.
सकाळी पावणे आठ वाजता खोपोली वरून सायकल सफर सुरू झाली. खोपोली ते पाली ४२ किमी अंतर आहे. हा रस्ता पुढे कोलाडला जातो. अजूनही कोकणात जाणारे चाकरमानी पेण, वडखळ मार्ग टाळून खोपोली, कोलाड मार्ग अवलंबतात, त्यामुळे या रस्त्याला सतत ट्राफिक होती.
.
हा रस्ता चौपदरी करण्याचे काम प्रगती पथावर आहे. परंतु मध्ये काही काही पॅच अतिशय खराब आहेत. कभी खुशी कभी गम, तर कधी हसू कधी आसू असे ऑफ रोडिंग सायकलिंग होते. सिमेंटच्या रस्त्यावर सुसाट धावणारी सायकल अचानक दगडधोंढ्यात येते आणि सर्व अंग व्हायब्रेट होते.

सध्यातरी हा रस्ता फक्त MTB साठीच योग्य आहे. याच वेळी "हम है राही प्यार के हमसे कुछ ना बोलीये, जो भी प्यारसे मिला हम उसीके हो लिये" गाणे लागले होते. निसर्ग; येणारी प्रत्येक परिस्थिति स्वीकारण्याचा मंत्रच आमच्याकडून गिरवून घेत होता.

दीड तासात, अर्ध्या रस्त्यातील परळी गावात पोहोचलो. डोळे, कान, नाक, चेहरा सर्व धुळीने माखला होता. तोंडाला स्कार्फ असून सुध्दा नाकाच्या आत धूळ चिकटली होती. हाताला घातलेला स्किनर सुद्धा काळा पट्टेरी झाला होता. आज खूप दिवसांनी रीयल ऑफ रोडिंग सायकलिंग केली होती. चेहरा व्यवस्थित साफ करून, टपरीवर चहा घेतला आणि पुढची राईड सुरू केली.

दहा वाजता पाली मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराच्या मार्गावरून बदलापूर नगर परिषद शाळेचे बरेच विद्यार्थी बाप्पाचे दर्शन घेऊन परत निघाले होते.

.
त्यांनी आम्हा दोघांना गराडा घातला. त्या सर्वांना प्रदूषण मुक्तीचा आणि सायकल चालावा, तसेच झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला. विजयने गुरुजींना सांगितले तुम्ही सायकल चालविली तर विद्यार्थी तुमचे अनुकरण करतील. सर्वांबरोबर ग्रुप फोटो काढून त्यांना निरोप दिला.
.
आम्ही बाप्पाच्या मंदिरात गेलो. पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. हे मंदिर साडेतीनशे वर्षाचे पेशवेकालीन आहे. काळ्या पत्थराचा गाभारा आणि वरच्या गोल घुमटावरील आर्च अप्रतिम आहे. काळा दगड व्हर्निश लावल्यामुळे चमकत होता.

बल्लाळेश्वराची मूर्ती वालुकामय आहे. तीला शेंदूर लेपन केले आहे. अष्टविनायकापैकी एक असलेले हे स्वयंभू देवस्थान आहे. बाहेरील सभामंडप, शिसवी लाकडाच्या खांबावर आहे. संपूर्ण लाकडी महिरप आणि महिलांसाठी गवाक्ष त्या खांबावर बनविलेला आहे. पेशवेकाळात आरतीच्या वेळी महिलांसाठी खास बसण्याची व्यवस्था या गवाक्षात होती.

मंदिराच्या सभागृहात बसविलेले पंखे, झुंबर, घड्याळ तसेच स्टीलचे रेलिंग आणि लोंबणाऱ्या विजेच्या वायर, या सुंदर दगडी आणि लाकडी पुरातन शिल्पाच्या कलात्मकतेला बाधा आणत होत्या. मंदिराच्या आत फोटो काढणे निषीद्ध आहे

मंदिराच्या प्रांगणात भलेमोठे दगडी "जाते" आहे.

.
या जात्यात चुना आणि गूळ दळून मंदिराच्या बांधकामासाठी, दगडी चिरे जोडण्यासाठी वापर करण्यात आला होता, अशी माहिती साठे गुरुजींनी दिली. या मंदिराच्या मागेच सरस गड आहे. बाप्पासाठी जागृत पहारा देणारा गण असावा.
बाप्पाचा परम भक्त बल्लाळच्या धुंडी विनायकाचे प्रथम दर्शन घ्यावे लागते.

अकरा वाजता महाप्रसाद सुरू होतो. फक्त वीस रुपयात सुग्रास भोजन-प्रसाद मिळतो. तो भक्षण करून परतीच्या प्रवासाला बारा वाजता सुरुवात केली.

आता उन्हाचा कडाका जबरदस्त होता. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि खोपोलीकडे सुसाटत निघालो. तीन तासात खोपोली फाट्यावर पोहोचलो. थंडगार ऊसाचा रस पिऊन ताजेतवाने झालो.

विजयची रग अजून शिल्लक होती. तेथून १४ किमी असलेल्या कर्जत स्टेशनकडे कूच केले. खोपोली, पळसदरी, कर्जत रस्ता चारपदरी आणि टकाटक आहे. बरोबर चार वाजता कर्जत गाठले आणि सायकल सफरीची सांगता झाली.

आज जवळपास शंभर किमी राईड झाली होती. ही राईड विजयने दमछाक न होता सहजपणे पूर्ण केली होती. हे आजच्या सायकल सहलीचे फलीत होते.
.

माझ्या काही दोस्तांना, हे सायकलिंग अतिरेक वाटतो. "खूप जास्त सायकलिंग करू नका, पायाचे सांधे कामातून जातील" असे सल्ले दिले जातात.

खरं तर सायकलिंग सोबत "प्रदूषण मुक्त भारत" या संकल्पनेचा प्रचार, प्रसार करतो आहे. या कार्यासाठी माझे शंभर वर्षाचे जीवन सुद्धा फार तोकडे आहे आणि जेव्हा असे सल्ले येतात, तेव्हा माझा जीवन प्रवास योग्य मार्गाने सुरू आहे याची खात्री पटते.

गणपती बाप्पा मोरया

सतीश विष्णू जाधव

प्रतिक्रिया

गणेशा's picture

15 May 2020 - 10:58 am | गणेशा

छान लिहिले आहे..
पण ती सफर चालू आहे ना कन्याकुमारीची..

एक संध एकच सफर वाचायला जास्त मज्जा येईल..

सतीश विष्णू जाधव's picture

15 May 2020 - 3:05 pm | सतीश विष्णू जाधव

होय, कन्याकुमारी सुरु आहे