भाग ७ अष्टी - मेंढापूरटेकडी पायथ्याशीची लढाई

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
11 May 2020 - 11:42 pm
गाभा: 

1

1

अष्टी - मेंढापूरटेकडी पायथ्याशीची लढाई

भाग ७

अष्टी, अष्टा, अष्टे ही गावांची नावे अनेक भागात असल्याने चकवणारी आहेत. कै. शि. म. परांजपे यांनी ‘गोपाळाची अष्टी’ असे नामोल्लेख केला असला तरी लढाईच्या संदर्भात ते ‘अष्ट्याची’ लढाई म्हणतात. त्या गावाचे नाव जे आज ही अष्टी हेच आहे. इंग्रजांनी अष्टीच असे म्हटले आहे. गोपाळ कृष्णाच्या ऐतिहासिक मंदीरामुळे ‘गोपाळाची अष्टी’ हे नाव रुढअसावे. ते पंढरपूरच्या उत्तरेला साधारण २५ कि. मीवर आहे.
1

१ जानेवारी 1818 रोजी कोरेगाव येथे इंग्लिशांच्या सैन्याचा पेशव्यांनी पराभव केल्यानंतर 'श्रीमंतांच्या फौजेपेकी दहा पाच हजार फौज नारो विष्णु आपटे घेऊन वाघोली पावेतो आले. तेव्हा पुण्यामध्ये इंग्रज यांची पळण्याची तयारी झाली' असे बखरकारांनी लिहिले आहे. वाघोली हे गाव पुण्यापासून फक्त दोन-तीन कोसांवरच आहे; आणि कोरेगावास इंग्लिशांवर विजय मिळविलेल्या मराठ्यांच्या फौजेपैकी दहापाच हजार फौज नारोपंत आपटे यांच्या हाताखाली पुण्याच्या रोखाने येत असलेली ऐकून पुण्यातील इंग्रज लोकांची गाळण उडावी आणि त्यांनी पळण्याची तयारी करावी, हे अगदी स्वाभाविक होते. परंतु पेशव्यांच्या काही फौजा जरी लोणीकंद आणि वाघोली येथपर्यंत येऊन पोहोचल्या होत्या, तरी पेशव्यांची मुख्य फौज कोरेगावहून राजेवाडीच्या मुक्कामाकडे गेली व तेथून पेशव्यांनी आपला मोर्चा साताऱ्याकडे वळविला.

1

याच्यापूर्वी सातारच्या राजांना वासोट्याच्या किल्ल्यात अटकेत ठेवण्यात आलेले होते. पण पुढे त्यांना तेथून आणवून पेशव्यांनी आपल्याबरोबर घेतले होते व त्यांना आपल्या स्वारीत आपल्याबरोबर घेऊन पेशवे कूच करीत असत. साताऱ्याहून श्रीमंतांची स्वारी निघाली, ती कर्नाटकामध्ये शिरली व तेथून त्यांनी अनेक ठिकाणी प्रयाणे केली. (ती ठिकाणे कोणती ते भाग ४ पलायनाचा खोखो खेळ मधे सादर केले आहे.)या वेळी इंग्लिश सैन्याच्या निरनिराळ्या टोळ्या त्यांचा पाठलाग करीत होत्या; पण त्या सगळ्या पाठलागात इंग्लिशांना कोठेही म्हणण्यासारखे यश आले नाही. पेशव्यांच्या सैन्यापैकी काही सैन्य इंग्रजी लष्करापुढे दोन तीन कोसांवर असे; आणि काही सैन्य त्यांच्या लष्कराच्या पाठीमागे दोनतीन कोसांवर असे. अशा रीतीने पेशव्यांच्या दोन सैन्यांच्या कचाटीमध्ये बहुतेक वेळा इंग्लिशांचे सैन्य सापडलेले असे. त्यामुळे त्यांना फारसे काही करता येत नसे. परंतु अशा रीतीने जरी पेशव्यांचे सैन्य बाजीरावसाहेबांना संरक्षण करीत एका ठिकणाहून दुसऱ्या ठिकाणी कूच करीत असे, तरी त्यांनी अशा या निरर्थक प्रयत्नांमध्ये तरी किती दिवस काढावयाचे ? त्यांना अशा या भुरट्या लढायांचा अखेरीस अखेरीस कंटाळा येऊ लागला व एकदा इंग्रजाला कोठे तरी गाठून त्याच्याशी एखादी मोठी लढाई द्यावी, असे पेशव्यांच्या सर्व सरदारांना वाटू लागले.

निपाणीजवळ ही लढाई द्यावी, असे एकदा त्यांनी ठरविले. पण ठरलेल्या वेळी त्या ठिकाणी सगळीकडच्या मराठी सैन्याची जमवाजमव झाली नाही, म्हणून निपाणीचा बेत रहित करण्यात आला. पुढे फेब्रुवारी महिन्यात सोलापूरनजीक कोठे तरी हा लढाईचा बेत जुळवून आणावा. असे ठरविण्यात आले. बापू गोखले यांच्या चरित्रात याबद्दलची हकिकत दिलेली आहे ती अशी की, "शेवटील प्रसंगी सर्व सरदारांचा बेत असा ठरला होता की, सोलापूर येथे इंग्रजांशी मोठी लढाई द्यावी. (जी नंतर ९ व १० मेला पेशव्यांच्या शिवाय निकराची झाली.) सरदारांस पळण्याचा फारच कंटाळा आला होता. त्या बेताप्रमाणे पानशांचा तोफखाना सोलापुरी रवाना झाला होता. पटवर्धनमंडळीही सोलापुरास आली होती. बापू गोखल्यांजवळच्या, गोसाव्यांच्या व अरबांच्या पलटणी सर्व तयार होऊन राहिल्या. ही लढाई झाली असती, तर इंग्रजांस कदाचित् तोंड मागे फिरविणे भाग पडले असते. कारण, या वेळी लढाईची सर्व तयारीच मोठी विलक्षण होऊन राहिली होती.

1

इंग्रजांची चौथी डिव्हीजन साताराच्या आसपास थांबलेली होती. त्यावेळी पेशवा देशामध्ये पंढरपूर ते शोलापूरच्या भागात होता; त्या भागात त्याने व्यापाऱ्यांकडून भरमसाठ पैसे कर म्हणून आकारून खर्चासाठी पैसे जमवले असे म्हणतात. ब्रिगेडियर-जनरल स्मिथने त्यानंतर ताज्या सैन्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवायची तयारी केली. १९ फेब्रुवारीला तोफखाना न घेतलेली हलकी फौज निघाली. सालपे घाट ते रेडनी व नंतर वेळापुरला ते निघाले होते. ( Salpa and Rednee to Yellapoor,) कारण तेथे शोलापूरहून पश्‍चिमेकडे जाण्यासाठी तयारी चालली आहे अशी पेशव्यांच्या हालचालीची माहिती कळली. परंतु शत्रूने अचानक करकंबकडे (दौंडच्या जवळचे नाही)

जायचा बेत केला आहे असे समजले. म्हणून इंग्रजांनी आपल्या मोर्चाची दिशा बदलली.त्यानुसार ब्रिगेडियर-जनरलने त्याच रात्री संबंधित माहिती गृहीत धरून हालचाल केली; त्यांनी कोरोली (पटवर्धनांची) येथे भीमा नदी पार केली.(इंग्रजी लेखनात उच्चार व स्पेलिंग असे केले आहे. - suddenly turned on Kurkum, he likewise changed his direction, passed the Beemah at Karaollee.)

गोरसल्ला(?) जवळ, त्यांनी ऐकले की अष्टी येथे मराठे आदल्या संध्याकाळी होते. कुठेही न थांबता तडक, यांनी मेंढापुरकडे कूच सुरू ठेवले; आणि रातोरात फे. १९तारखेला प्रवास करत ते सकाळी जवळच्या टेकडीवरून आठ वाजता ब्रिगेडियर-जनरलने शत्रूच्या नगाऱ्यांचाआवाज खालील सखल भागातून ऐकला. इतकी धावाधाव व्यर्थ गेली नाही याचे समाधान त्याच्या नजरेतून त्यांना लपवता आले नाही. (तथापि, ती जागा त्यांच्या दृष्टिने लढाईस पूर्णपणे अनुकूल नव्हती; आणि संघर्ष टाळणे ही शक्य नव्हते. तिकडे पेशव्यांची देखील त्या ठिकाणी लढ्याची तयारी नव्हती. त्यांनी त्यांचे तंबू जास्त काळ थांबायच्या दृष्टीने ठोकले होते. जनावरे चरावयाला सोडली होती. लादलेले अवजड सामान अस्ताव्यस्त होते. अचानक इंग्रजांचे सैन्य अगदी जवळ आल्याचे हेरांकडून १९च्या रात्री समजल्यावर त्या दिवशी मोर्चाचा प्रस्ताव बापू गोखल्यांनी बाजीरावांसमोर ठेवला होता.

या प्रसंगाची हकिकत कै. शंकर तुकाराम शाळिग्राम यांनी तयार केलेल्या बापू गोखल्यांच्या चरित्रामध्ये दिलेली आहे..."शके 1739 माघ शु. चतुर्दशी रोजी रात्री सातारच्या राजाची मुले बरोबर घेऊन गोपाळाचे अष्टीवर श्रीमंत बाजीरावसाहेब मुक्कामाला आले होते. बापू गोखले व त्यांची स्त्री यमुनाबाई व सातारचे राजे व त्यांचे विठ्ठलपंत दिवाण हे बाजीरावसाहेबाबरोबर होते; आणि रामचंद्रपंत सुभेदार व काही स्वार मागे होते. पौर्णिमेच्या दिवशी प्रात:काळ (सायंकाळ?) होण्याच्या पूर्वी जेवणाचा बेत उरकून श्रीमंतांचा पुढे जाण्याचा विचार होता. पण ब्रिगेडिअर जनरल स्मिथ यांची जी टोळी चाल करून येत असल्याबद्दलची बातमी होती, त्या टोळीतील तोफेच्या आवाजांचा कानोसा दोन कोसांवरून ऐकू आला. तो ऐकून श्रीमंतांजवळ बापू गोखले गेले आणि म्हणाले की, आपण आजपर्यंत पळत आलो, परंतु आता पळू नये असे मनात आहे. बाजीरावसाहेबांनी गोखल्यांचा तिरस्कार केला, आणि म्हणाले की, लढाईची मसलत तुम्ही दिलीत आणि आता त्यामुळे आमच्या जेवण्याखाण्यास हरकत पडते. ते ऐकून बापूंस राग येऊन ते म्हणाले की, आपली जरी लढाईची संमती नसली, तरी मी लढाई देणार. इतके बोलून बापू आपल्या गोटात येऊन त्यांनी तयारी करण्याचा हुकूम दिला’. ...या हकिकतीमध्ये बाजीरावसाहेबांच्या वर्तनावर आक्षेप घेता येईल, असे काही उल्लेख आलेले आहेत. कै. शाळिग्राम यांनी आपल्या ह्या पुस्तकामध्ये बाजीरावसाहेबांच्या बद्दलच्या कित्येक निराधार आक्षेपांचे स्वत:च खंडन केले आहे, ही गोष्ट कोणालाही नाकबूल करता यावयाची नाही. पण बाजीरावसाहेबांच्या संबंधाने इंग्लिश लोकांनी आणि लेखकांनी आणि त्यांना फितुर झालेल्या अशा आपल्याही कित्येक लोकांनी इतके खोटे आक्षेप पसरवून ठेविले आहेत की, त्यामुळे बाजीराव हा आपल्या लोकांनाही एक अतिशय दुष्ट माणूस आहे, असे वाटू लागले होते.
… याचे चित्र कसे बदलले त्याचे वर्णन करताना कै. शि. म. परांजपे म्हणतात, ‘...मि. एल्फिन्स्टन हे पुण्याचे रेसिडेंन्ट झाल्याबरोबर पुण्यातील सगळे गाडे बदलले. बाजीराव इतके दिवसपर्यंत जो एक साधारणपणे चांगला राजा होता, तो अतिशय बदमाष म्हणून पुण्यातील लोकांना दिसू लागला ! युरोपातील मॅकिओव्हेलीचे कुटिल राजनीतीचे मार्ग मि. एल्फिन्स्टन यांनी पुण्यात फार जारीने सुरू केले. इंग्रजी पैसा जिकडेतिकडे पेरण्यात आला; चाहड्या सांगणारे हरामखोर लोक स्वामिनिष्ठ लोकांमधूनही आढळून येऊ लागले; पेशव्यांकडच्या गुप्त बातम्या बेटावरच्या बंगल्यात कळू लागल्या; आणि बाजीरावाच्या दुर्गणांच्या राईचे पर्वत होऊ लागले’ !

कै. शि. म. परांजपे यांच्या मते बाजीरावसाहेबांना दूषणे देणे मान्य नव्हते म्हणून ते या अष्ट्याच्या लढाईच्या याच प्रसंगसंबंधाने जुन्या विश्वसनीय अशा एका पाच्छापुरकरांच्या बखरीवरून त्यांनी जी हकिकत दिली आहे, ती शाळिग्राम यांच्या हकिकतीपेक्षा बाजीरावसाहेबांच्या स्वभावचित्राच्या बाबतीत बरीच भिन्न दिसते. ती हकिकत येणेप्रमाणे :-"श्रीमंतांनी पंढरपुराचा बंदोबस्त करून परांड्याच्या रोखे कूच करत व अष्टे गावाजवळ मुक्काम झाला. स्मिथ साहेब दोन-तीन दिवसात येणार ही बातमी कळताच श्रीमंतांनी (१९फेब्रूवारीच्या) रात्री कूच करावे असे गोखल्यांच्या विचाराने ठरले. पण अप्पासाहेब देसाई सरलष्कर यांनी दुसरे दिवशी पौर्णिमेचे स्नान व भोजन करून जाणेविषयी आग्रह केला, व त्या दिवशी छापा आल्यास आपण सांभाळू अशी हमी दिली. (बोल्ड केलेले माझे) हे ऐकून गोखले चिंताग्रस्त झाले. सरदार मंडळी गोखल्याचे तर ऐकत नव्हतीच, पण श्रीमंतास बदसल्ला देत असताना असता लढाई संपल्यावर मागे काहीही होवो, असा विचार करून स्वस्थ होते. चतुर्दशीस दपारी कूचनगारा होऊन फौज परांड्याच्या रोखे गेली तयार झाले. सूर्योदयी श्रीमंत भोजनास बसले असता छापा आला. गोखल्यांनी सरलष्कर यांस बोलविणे पाठविले, व आपण श्रीमंतांकडे गेले व छापा आल्याचे कळविले. मध्यरात्री कूच करणेचा बेत निपाणीकर सरलष्कराच्या सर रहित केला. न जेवता जावे तर अधीर व बेसावध (सरदार?)म्हणतील इत्यादी विचाराने श्रीमंत त्रस्त झाले. उत्तर देताना गोखले यांस कठोरपणे बोलले की, “आपण शूर, सावध व कुशल हे जाणून तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवून बेफिकीर असावे. तो आपण नेहमी निष्काळजीने वागून आयते वेळी गडबड करावी." हे ऐकून गोखल्यांनी उत्तर केले की, “दुसऱ्याचे ऐकून कालचा बेत बिघडविला व आमच्यावर आता रोष झाला. सेवकावर स्वामींची गैरमर्जी झाली असता त्याने लढाईत स्वामिकार्थी मरावे किंवा जय संपादून त्यास भेटावे हेच योग्य. तेव्हा आपण भोजन सावकाश करून निघावे; आपले चरणदर्शन पुनरपि होईल तर ठीकच, नाही तर हेच शेवटचे." असे बोलून नमस्कार केला व श्रीमारुतीचे स्मरण करीत निघाले. तो सरलष्कर “फौज घेऊन येतो सांगा" असे बोलून झाड्यास (शौच्याला) गेल्याचे कळले."
वरील हकिकत देऊन रा. आपटे हे आपल्या पुस्तकात बाजीरावाच्या स्वभावसंबंधाने एकंदर हकिकतीचे पर्यालोचन करून असे म्हणतात की, "शेवटचे बाजीराव पेशवे शूर नव्हते म्हणणे अगदी मूर्खपणाचे होईल. ते शूर होते ; व भित्रे तर नव्हतेच, रणसंग्रामामधून निघून जाण्याबद्दल बापूंनी कित्येक वेळा श्रीमंताची आर्जवे केली; परंतु ते न ऐकता श्रीमंत लढाईमध्ये बापूंच्या जवळ सारखे असत. (व्यक्तिशः मला – ओकांना - जर बाजीरावांनी कधी लढाईच्या मैदानात हातात तलवार घेतली नसेल, रणांगणात सैन्य संचलनाचे नेतृत्व केले नसेल तरीही ते शूर आहेत व भित्रे नाहीत असे शि. म. परांजपेंचे म्हणणे सर्वस्वी अमान्य आहे) बापूंचे म्हणणे 'दहांचा पोशिंदा असावा' म्हणून वेळोवेळी बापूसाहेब श्रीमंत बाजीरावसाहेब यांना लढाईतून दूर राहाण्याबद्दल आग्रह करीत होते. (त्याचे कारण वेगळेच असावे. म्हणजे ऐत्यावेळी ते काय व कसे लहरीपणाने वागतील सांगता येत नसल्याने, ते बरोबर नसणेच चांगले हे असे असावे. मात्र बोलताना मोठेपणा द्यायच्या पद्धतीने त्यांनी ‘पोशिंदा’ वगैरे आलंकारिक भाषा वापरून म्हटले असावे.) पाच्छापूरकराच्या बखरीतील वर दिलेल्या लांबलचक उताऱ्यातील न जेवता जावे तर अधीर व बेसावध म्हणतील," हे बाजीरावाच्या (नको त्या समयास खोट्या प्रतिष्ठेच्या, मोठेपणाच्या - माझे मत ) विचाराचे द्योतक असे एक लहानसेच वाक्य आहे. पण या एका लहानशा वाक्यामध्येही बाजीरावांच्या व्यापक अंतःकरणाचे एक सुंदर प्रतिबिंब पडलेले आपल्याला दिसत आहे.आणि जेवणासारख्या साध्या गोष्टींच्या बाबतीत देखील ज्यांच्या मनात इतके सूक्ष्म विचार येत होते, त्यांच्या एकंदर मनाची कल्पना यावरून येण्यासारखी आहे. असे असता व आपल्याला चांगले राजे लाभलेले असतानाही त्यांची स्वभाव चित्रे इंग्लिश मुत्सुद्यांनी स्वतःच्या राजकीय हेतूंसाठी जी काळीकुट्ट करून टाकलेली आहेत तीच आपण खरी मानत आलो आहोत. ही मोठ्या खेदाची गोष्ट आहे. (वरील विचारांना कसे सामोरे जावे ते वाचकांनी ठरवावे)

इंग्रजांच्या लेखनातून... बापू गोखल्यांचे डावपेच सांगताना म्हटले...
गोखले यांनी संपूर्ण चवथी डिव्हीजन आपल्या जड सामानासह पुढे सरकत असल्याचे बहुधा गृहीत धरले होते. त्यांनी ब्रिगेडियर-जनरलला तोफखाना पुढे करून गोंधळ घालता येईल व नंतर नेहमीप्रमाणे बंदुकाधारी शिपाई नेम धरून पेशव्यांचे सैनिक मारून टाकतील. परंतु जेव्हा ब्रिटिश घोडदळीच्या पलटनी टेकडीवरुन खाली उतरताना पाहून गोखल्यांनी ते आव्हान स्वीकारून आपल्या सैन्याच्या व्यूहाची तातडीने योजना आखली. त्यानुसार पेशव्याने गोखले यांना आठ ते दहा हजार घोड्यांसह सोडले. आणि पालखीमध्ये स्वत: ला सुरक्षित मानले नाही. म्हणूनच त्याने घोड्यावर स्वार होऊन एका पर्याप्त रक्षकासह तातडीने पळ काढला.
लढाई कशी झाली?

ता. 20 फेब्रुवारी 1818 रोजी सकाळी प्रहर दिवसाचे सुमारास अष्ट्याच्या लढाईला सुरुवात झाली. ब्रिगेडिअर जनरल स्मिथ ह्याच्या हाताखालील लष्कर शेजारच्या टेकडीवरून अष्ट्याच्या खोऱ्यामध्ये सकाळी प्रहर दिवसाच्या सुमाराला उतरू लागले होते. ते सैन्य अशा रीतीने कूच करून डोंगरावरून खाली उतरत असता बावीसाव्या ड्रगून पलटणीच्या दोन टोळ्या मध्यभागी चालल्या होत्या; त्याच्या उजव्या बाजूला मद्रासची सातवी नेटिव्ह घोडेस्वारांची पलटण आणि डाव्या हाताला दुसरी घोडेस्वारांची नेटिव्ह पलटण चाललेली होती; आणि या सैन्याच्या तीन रांगांच्या बाहेरच्या उजव्या बाजूला कॅप्टन पिअर्स आणि डाव्या बाजूला फ्रिथ यांच्या हाताखाली घोड्यावरील तोफखाना चालविण्यात आलेला होता. सैन्याच्या रांगा अशा क्रमाने कूच करीत जाऊन शत्रू जवळ आला म्हणजे प्रत्यक्ष लढाईला सोईस्कर अशी सैन्याची रचना बदलून मग शत्रूवर हल्ला करावयाचा. असा ब्रिगेडिअर जनरल स्मिथ याचा इरादा होता. ज्या टेकडीवरून अशा रीतीने इंग्लिशांचे सैन्य खाली उतरत होते, त्या टेकडीच्या पुढे खाली काही अंतरावर एक लहानशी नदी होती, व त्या नदीच्या पलिकडच्या काठावर पेशव्यांच्या सैन्याची छावणी होती.

1

ही छावणी जवळ येऊ लागली, त्या वेळी इंग्लिश सैन्यातील घोडेस्वारांची पलटणे कूच करण्याच्या वेळच्या आपल्या रांगा बदलून शत्रूला तोंड देण्याकरिता एका लांब रांगेमध्ये उभे राहाण्याच्या तयारीला लागली. पण या त्यांच्या रांगा तयार झाल्या नाहीत, आणि इंग्लिशांच्या घोडेस्वारांना लढाईच्या शिस्तीने उभे राहाण्याला फुरसत सुध्दा सापडू शकली नाही...
बापू गोखले यांनी श्रीमंतांचा निरोप घेतला; त्यांची सुरक्षितपणे रवानगी करून देण्याची तजवीज केली आणि आपण आपल्या हाताखालील लोकांनिशी ते शत्रूवर हल्ला करण्याकरिता तडक निघाले. पेशव्यांची छावणी आणि शत्रूचे सैन्य यांच्या दरम्यान एक लहानशी जी (माणगंगा) नदी होती, ती ओलांडून बापू गोखल्यांचे स्वार एकदम आणि अचानक इंग्रजी सैन्याच्या सातव्या पलटणीची जी रांग बनविण्यात येत होती, तिच्यावर चाल करून आले. इतक्यात बापू गोखले यांचा हल्ला इंग्लिशांच्या लाइनीवर येऊन पडला ! बापू गोखल्यांचा हा एकदम छापा आल्यामुळे त्या सातव्या घोडेस्वारांच्या पलटणीमध्ये फारच घोटाळा उडून गेला. बापू गोखल्यांचे स्वार शत्रूच्या लोकांवर आपल्या बंदुकी झाडीत तसेच पुढे चालले. बावीसावी ड्रगून्सची पलटण मध्यभागी आणि सातवी मद्रासची नेटिव्ह घोडेस्वारांची पलटण उजव्या बाजूला, अशा रीतीने मागून कूच करीत येताना या पलटणी चालल्या होत्या, हे पूर्वी सांगितले आहे. या दोन तुकड्यातील लोक सोबतच्या नकाशात दाखविलेल्या ठिकाणी आपली रांग बनवून उभे राहाण्याच्या उद्योगात होते.

1

आणि या रांगेमध्ये मद्रासची सातवी पलटण उजव्या बाजूला आणि बावीसावी ड्रगून्सची पलटण डाव्या बाजूला अशा रीतीने या पलटणी आपल्या रांगा बनविण्यात गुंतलेल्या होत्या. अशा संधीत बापु गोखल्यांचे घोडेस्वार या ब्रिटिश लाइनीच्या समोर येऊन उभे राहिले; आणि त्या लाइनीच्या उजव्या बाजूला जी सातवी घोडेस्वारांची जी पलटण होती, तिला वळसा घालून बापू गोखले यांचे काही स्वार सदर लाइनीच्या डाव्या बाजूकडील बावीसाव्या ड्रगून पलटणीच्या पिछाडीवरही हल्ला करण्याकरिता पुढे सरसावले. अशा रीतीने पेशव्यांच्या सैन्याने शत्रूच्या बावीसाव्या ड्रगून पलटणीला आणि सातव्या मद्रासच्या पलटणीला चोहोकडून व्यापून टाकले. या ही छावणी जवळ येऊ लागली, त्या वेळी इंग्लिश सैन्यातील घोडेस्वारांची पलटणे कूच करण्याच्या वेळच्या आपल्या रांगा बदलून शत्रूला तोंड देण्याकरिता एका लांब रांगेमध्ये उभे राहाण्याच्या तयारीला लागली. पण या त्यांच्या रांगा तयार झाल्या नाहीत, आणि इंग्लिशांच्या घोडेस्वारांना लढाईच्या शिस्तीने उभे राहाण्याला फुरसत सुध्दा सापडू शकली नाही...

1

त्यावेळी शत्रूचे सैन्य बापू गोखले यांनी आपल्या घोडेस्वारांच्या वर्तुळाकार कोटामध्ये चोहो बाजूनी कसे वेष्ट्रन आणि कोंडून टाकले होते, हे सोबतच्या लढाईच्या नकाशावरून कोणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. बापू गोखले यांचे जे कौशल्य होते, ते यातच होते. तेथील ब्रिटिश लष्कराच्या रांगेतील उजव्या ला खुद्द ब्रिगेडिअर जनरल स्मिथ हा होता. आणि डाव्या बाजूला मेजर डॉवेस हा होता. असे असतानाही बापू गोखले हे आपल्या हाताखालील थोड्याश्या घोडेस्वारांच्या मदतीने या सगळ्या इंग्रजी मेजरांना आणि ब्रिगेडिअर जनरलांना चोहोकडून हां-हां म्हणता गराडा घालू शकले आणि इंग्रजी फौजेच्या पुढून आणि मागून अशा दोन्हीही बाजूंनी बापू गोखल्यांनी शत्रूच्या सैन्यावर एकाच वेळी हल्ला करण्याला सुरुवात केली, ही लष्करी कौशल्याच्या दृष्टीने अत्यंत वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. या लढाईत बापू गोखले यांनी दोन गोष्टींमध्ये आपले युध्दकौशल्य प्रदर्शित केले. त्यापैकी पहिली गोष्ट ही की, आपल्या सैन्याच्या रांगा व्यवस्थितपणे बनवू देण्याला त्यांनी शत्रूला अवकाश मिळू दिला नाही. आणि शत्रू अशा बिनतयारीच्या स्थितीमध्ये गोंधळून गेलेला असताना बापू गोखले यांनी शत्रूच्या सैन्याला चौफेर रोखून आणि वेढून टाकले, ही दुसरी गोष्ट होय.
लढाईमध्ये अखेरीस जय मिळणे किंवा पराजय होणे, ह्या गोष्टी दैवाधीन असतात. परंतु सेनापती आपले सैन्य शत्रूवर हल्ला करण्याकरिता केव्हा नेतो, कसे नेतो, आणि त्या सैन्याच्या मदतीने तो काय कर्तबगारी करतो, यावरच त्या सेनापतीचे गुणावगुण अवलंबून असतात. नेपोलियन हा एवढा मोठा योध्दा, पण त्याचाही वॉटरलूच्या लढाईमध्ये पराभव झाला. परंतु त्यामुळे शूर योध्दा आणि कुशल सेनापती या दृष्टीने त्याने जी अजरामर कीर्ती कमावून ठेविलेली आहे, तिच्यामध्ये यकिंचितही कमतरपणा आलेला नाही; आणि बाप गोखले याचीही तशीच गोष्ट आहे. बाजीरावसाहेबांवर अचानक छापा घालण्याकरिता वेळापूरहून इग्लिशांचे सैन्य ताबडतोबीने कूच करून अष्ट्याला आले होते अशा वेळी बाजीरावसाहेबांची आधीच पुढे दुसरीकडे रवानगी करून देऊन बापू गोखल्यांनी आपल्या धन्याच्या जिवाला धक्का लागू न देता त्यांच्यावरील छाप्याचा प्रसंग अजिबात टाळला; आणि जे इग्लिश लोक बाजीरावांवर छापा घालण्याकरिता आलेले होते, त्यांनाच उलट बेसावध स्थितीत गाठून, गोखल्यांनी दिवसाढवळ्या त्यांच्यावरच छापा घातला; आणि त्यांनाही कोंडून टाकले. हा पराक्रम त्यांनी ज्या अष्ट्याच्या रणांगणावर करून दाखविला त्या रणांगणावर दैवाच्या दुर्निवारतेमुळे जरी ते मरण पावले असले तरी कीर्ती त्या ठिकाणी आणि महाराष्ट्रीयांच्या सर्व अंत:करणामध्ये अद्यापिही आहे ! बापू गोखले यांचा देह अष्ट्यास पतन पावला; पण त्यांच्या की ध्वजा त्या ठिकाणी कायमची उभारण्यात आलेली आहे ! आणि महाराही लोकांच्या अंत:करणामध्ये जोपर्यंत आपल्या मागील इतिहासाची स्मति जागत आहे, तोपर्यंत ती ध्वजा त्या ठिकाणी नेहमी फडकत राहील ! आपले राज्य गेल्यामुळे त्याच्याबरोबर आपल्यातील मोठ्या लोकांची किंमतही गेलेली आहे। बापू गोखले ! तुम्ही एखाद्या स्वतंत्र देशात जन्मास येऊन असे पराक्रम केले असते, तर तुमची किती थोरवी गाण्यात आली असती ! तुमच्याकरिता किती रणस्तंभ उभारण्यात आले असते ! त्या रणस्तंभावर किती लोकांनी येऊन तुमच्या पराक्रमाच्या स्मरणासाठी पुष्पहार अर्पण केले, भावी पिढीतील किती तरुणांनी तुमच्या त्या रणस्तंभाकडे पाहून मी या बापू गोखल्यांसारखा आपल्या देशाची सेवा करणारा सेनापती होईन' असे आपल्या मनाचे दृढनिश्चय केले असते ! आणि ‘या बापू गोखल्यांच्या सारखा शूर आणि स्वामिनिष्ठ पुत्र माझ्या पोटी जन्मास यावा' अशी तुमच्या त्या रणस्तंभाकडे पाहून किती आयांनी
आपल्या मनामध्ये प्रार्थना केल्या असत्या ! पण बापू गोखले ! हल्ली तुमची स्थिती काय आहे ! तुम्ही या हतभाग्य हिंदुस्थान देशात कशाला जन्माला आला? तुमचे नाव आदरयुक्त भावनेने असे किती लोकांना माहीत आहे ? पुण्यातील तुम्ही एवढे मोठे शूर आणि स्वामिनिष्ठ सरदार ! पण पुण्यात पेशव्यांच्या राज्याबद्दल ज्यांनी फारशी कधी काळजी घेतली नाही, त्यांचे राजवाडे, त्याची इनामे आणि त्यांच्या जहागिरी मोठ्या ऐषआरामामध्ये नांदत असताना पुण्यात तुमचे काय उरले आहे ? पुण्यात तुमचा वाडा नाही, पुण्यात तुमचे इनाम नाही, किंवा पुण्यात तुम्हाला कोठे जहागीर नाही ! असा देवाच्या घरचा उलटा न्याय…

....

भाग ४ मधील नकाशा दर्शनमधे भर धाललेली आहे... इच्छुकांनी काहू काळानंतर तिथे नवे नकाशे पहावेत...

प्रतिक्रिया

शोधणाऱ्या मित्रांनो,
गोपाळाची अष्टी या गावाने कसे मला छकवले ते रंजक आहे. पण या धाग्याचा विषय वेगळा आहे म्हणून कोणाला ते समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या करता काही करावेसे वाटते.

सन १८१८ - १८१९ सालातील घटनांचा शोध घेताना सर्जन कमांडर कोट्स यांचा संदर्भ कुठे मिळेल का अशी इच्छा होती.
याचे कारण असे की ११ वर्षां पुर्वी व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखावर आधारित लोणीकंद गावातील सद्य परिस्थिती कशी आहे याचा शोध घेण्यासाठी मी त्या गावी गेलो होतो. त्या कोट्स यांचा शेवटी संदर्भ लागला.
शिवाय त्यांनी केलेले शोधकार्याचा निबंध देखील सापडला. ते शक्य झाले मनो यांच्याकडून अमेरिकेतून मिळालेल्या संदर्भांचा, कै शिवराम म परांजपे यांच्या पुस्तकातील घटनांचा आढावा घ्यायला प्रेरित केले.