सांग सांग भोलानाथ

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
4 May 2020 - 8:27 am

शाळेत असतांना खरंच वाटायचं - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का - असे विचारल्यावर भोलानाथ बरोब्बर उत्तर सांगू शकेल.  आता विचारावेसे वाटत आहे - सांग सांग भोलानाथ - बिअरचा पाऊस पडेल कां ?

नाही, नाही, कोरोना व्हायरसमुळे माझ्या मेंदूवर काहीही परिणाम झालेला नाही - मी पूर्णपणे "होशोहवास के साथ (अविरत हिंदी चित्रपट बघण्याचा लिहिण्यावर मात्र परिणाम झाला आहे )" लिहितो आहे हे  थोड्याच वेळांत तुमच्या लक्षात येईल. 

आपण वसंतोत्सव वगैरे करत थंडीच्या दिवसांतून हळूहळू उष्ण काळांत प्रवेशतो. काही वर्षांपासून IPL (आणि त्यांतून सुचलेली "Pro Kabaddi") सुरू झाल्यामुळे TV वर या सगळ्या "मैदानी खेळांचा"  आनंद घेणारे खेळाडूदेखील झपाटयाने वाढले आहेत. पाश्चात्य देशांत हा हवामानाचा बदल होतानाच कांही तुफान लोकप्रिय  खेळांच्या वार्षिक वेळापत्रकाची सुरवात होते. 

मार्च महिन्याआधीपासूनच नंतरचे काही आठवडे अमेरिकेतले कडीचेंडू (basket ball) चे शौकीन आणि जाणकार विश्वविद्यालयीन कडीचेंडू वार्षिक स्पर्धा म्हणजेच  March Madness नांव दिलेल्या "सोहोळ्यात" गुंततात. फक्त तीन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धांत साधारण मार्चच्या मध्यापासूनच्या ३ शनिवार-रविवारी  ६८ संघांतील सामन्यांनी  सुरवात होत क्रमाक्रमाने त्यांतील सगळ्यात उत्तम  २ संघ अंतिम फेरीकरता पोचतात. अर्थातच स्पर्धा संपेपर्यंत लाखो प्रेक्षक जमेल तेव्हढे सामने आरडाओरड्याने गर्जणाऱ्या खेळाच्या मैदानावरच्या गर्दीत बसूनप्रत्यक्ष तर  पहातातच पण  थेट TV प्रक्षेपणात आणि नंतर त्यातील "थरारक क्षण" पुन्हा पुन्हा कधी पेयगृहे/खाद्यगृहे अशा ठिकाणच्या मोठया पडद्यावर तर कधी घरच्या सोफ्यावर बसून, कधी मित्रांसह तर  कधी अनोळखी लोकांच्या गर्दीत बसून देखील  पहातात. आणि अशा सगळ्या मेळाव्यात "बिअर" पिणे आणि पाजणे हा सगळ्या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग असतो. March Madness  संबंधित २०१९ सालांतली काही आंकडेवारी 
  -  सगळ्या सामन्यांचे प्रत्यक्ष  पहाणारे प्रेक्षक सुमारे ७ लाख     
-  फक्त अंतिम सामन्याचे प्रेक्षक ( प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) सुमारे २ कोटी   
-  TV  वरच्या जाहिरातींवर झालेला खर्च अंदाजे US$ १३५ कोटी (सुमारे रु. ९,४०० कोटी)
-  वेगवेगळ्या पद्धतीने निर्णयांवर सट्टेबाजीकरता लावलेली अंदाजे रक्कम : US$ ८५० कोटी (सुमारे रु. ५९,५०० कोटी)

March  Madness खेरीज अमेरिकेत मार्चच्या मध्याला सुरू होऊन जवळजवळ पूर्ण उन्हाळाभर चालणारे Major League Baseball तर्फेचे Baseball चे सामने, St  Patrics  Day अशा अनेक खेळांकरता आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नांवाखाली अमेरिकन लोक अमाप खाणे पिणे आणि विशेषतः बिअर फस्त करतात. 

दर वर्षी March  Madness आणि MLB पहाणाऱ्या बिअरभक्तांच्या सोयीसाठी अमेरिकेतले बिअर बनवणारे साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटापासून विविध प्रकारे तयार करून ग्राहकांच्या समोर ठेवण्याकरता साठवलेली (draft, bottled इ.इ.) बिअर प्रथम वितरकांकडे आणि तेथून वेगवेगळ्या खाद्य/ पेय गृहांत मार्चच्या सुरवातीपासून पोचवू लागतात.  २०२० साली या तयारीच्या काळांत कोरोनाप्रतापाची फारशी कल्पना कुणालाच नसल्याने कुणीच  बिअर बनवण्याच्या आपापल्या वार्षिक कार्यक्रमांत फारशी कपात केली नाही. २०२० मार्चच्या मध्यापर्यंत सुमारे ३.५ कोटी लिटर बिअर वितरकांकडे आणि  वेगवेगळ्या खाद्य/ पेय गृहांत पोचली. परंतु त्यानंतर कोरोनाप्रतिबंधाकरता हे सगळेच खेळ आणि म्हणून त्याकरता होणारे लोकांचे संमेलन  २०२० सालाकरता स्थगित झाल्याने या सगळ्या अपेक्षित विक्रीकरता तयार ठेवलेल्या बिअरचा अजिबात उठाव झाला नाही. एव्हढेच नव्हे तर एकूण अनिश्चिततेमुळे ही बिअर तिचा दर्जा उतरू लागण्याआधी विकली जाण्याची शक्यता नसल्याने पुढे काय करावे हा यक्षप्रश्न अमेरिकेतील बिअर बनवणाऱ्याना पडला. 

या "विकण्यास तयार" बिअरचा सांठा अमेरिकेभरातल्या वितरकांकडे आणि  वेगवेगळ्या खाद्य/ पेय गृहांत पसरला आहे. त्यातील कित्येक ठिकाणें पुरेसा धंदा नसल्याने बंद आहेत आणि जी चालू आहेत ती सुद्धा किती काळ चालू शकतील किंबहुना दिवाळखोरी टाळू शकतील का हे अनिश्चित आहे. विकली जाण्याची शाश्वती नसणारी ही बिअर गोळा करून तिची "योग्य प्रकारे" विल्हेवाट लावणे जरूर आहे पण ते पुन्हा मोठा खर्च केल्याखेरीज होणार नाही कारण  या सगळ्याच देशात बिअर सारखे  पर्यावरण दूषित करणारे द्रव पदार्थ शुद्धीकरणाखेरीज नुसतेच गटारांत ओतून देता येणार नाहीत आणि शुद्धीकरणाकरता ही सगळी बिअर गोळा करणे आणि वाहून कारखान्यांत परत आणणे याकरता लागणारा मोठा खर्च  कुणी करावा हा वादाचा मुद्दा आहे. Draft Beer साठवलेले special steel containers  यांची किंमत त्यांत साठवलेल्या बिअरपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याने जर ते दिवाळखोरी जाहीर करायला लागणाऱ्या ठिकाणी अडकून पडले तर हा गुंता आणखीनच वाढेल. 

साधारण अशीच परिस्थिती युरोपमधल्या अनेक देशात उद्भवली आहे. ब्रिटन आणि जर्मनी या दोन्ही देशांत प्रत्येकी २ ते २.५ कोटी लिटर बिअर "अडकून" पडलेली असून जगभरातल्या अशा विकली जाण्याची शाश्वती नसणाऱ्या बिअरची अंदाजे किंमत सुमारे US$ २००,००० कोटी (रु . १,४००,००० कोटी)असावी.  त्यातील काही बिअर जरी salvage होण्यासारखी असली (उदा. त्यातला alcohol परत मिळवून त्यातून sanitiser बनवणे किंवा जास्त काळ साठवल्यामुळे गुणवत्तेत थोडी कमी झालेली बिअर कमी किमतीत विकणे) तरी त्या करता सुद्धा खर्च आणि/किंवा वेळ लागेल. अशा परिस्थितीत जगातले अनेक बिअर बनवणारे "आमच्याकडून तुम्ही स्वतःच्या खर्चाने जर बिअर घेऊन जात असाल तर  नगण्य किंमतींत घेऊन जा" किंवा "तुमची बाटली घेऊन याल तर बाटलीभर बिअर फुकट" अशा अफलातून कल्पना वापरत साठ्यातली बिअर कशी "काढून टाकता" येईल अशा विचारात असतील.    

बिअरचा माझ्या माहितीतला सगळ्यांत "अभिनव आणि आश्चर्यकारक" उपयोग एका (भारतीय) पंथ प्रसारक गुरुजींनी केला होता. त्यांना (भारतांतून पळ काढण्याची वेळ आल्यावर) अमेरिकेत स्थलांतर करून आपले जगभरचे शिष्य (त्यांना वाटेल तसे वागता येणे या करता) राहू शकतील अशा तऱ्हेचा आश्रम अमेरिकेतल्या एका छोट्या गांवात स्थापायचा होता. जेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की त्यांना  हवा तसा "बेबंदपणा"  त्या गांवातल्या नियमांप्रमाणे करता येणार नाही तेव्हा या "अडचणी"वरचा त्यांचा "उपाय" जगभरांतल्या कसलेल्या राजकारणी लोकांना  लाजवणारा होता.  गुरुजींनी अमेरिकेतल्या अनेक मोठ्या शहरातले बेघर भणंग लोक शोधून त्यांना "प्याल तितकी बिअर, दोन वेळचे जेवण, राहणे आणि येणे जाणे फुकट, पण आमच्या आश्रमातल्या सगळ्या कार्यक्रमांत रोज उपस्थित राहायला हवे" या अटीवर अनेक बस भरभरून आपल्या आश्रम गांवी आणवले. हे सगळे अमेरिकन नागरिक असल्यामुळे त्यांना आणण्याकरता कुठल्याच परवानग्या घेण्याची जरूर नव्हती. एव्हढेच नव्हे तर ते लगेच त्या "गांवचे" मतदार म्हणूनही नोंदता आले.  या "नव्या मतदारांच्या" (बिअरच्या पुरवठ्याला जागून केलेल्या) "सहकार्याने" गुरुजींनी गांवातल्या  प्रत्येक निवडणुकीत "आपले" लोक, प्रत्येक पदाकरता निवडून आणले आणि आपल्याला हवे तसे गांवचे नियम बदलून घेतले. त्यामुळे "आश्रमांत चाललेल्या घडामोडीत" गांवपातळीवरआक्षेप घेण्यासारखे काहीच नियम  शिल्लक राहिले नाहीत.  बाहेरून आणलेले बेघर भणंग लोक, काही काळातच त्यांना एकाच ठिकाणी बराच काळ राहण्याची कधीच संवय नसल्यामुळे त्यांचा फार काळ सांभाळ करण्याची वेळ येणार नाहीं हा गुरुजींचा होरा देखील बरोबर ठरला आणि काही काळातच हे आता त्यांचा उपयोग संपलेले लोक आश्रमांतून हळू हळू पळाले.  

या कथेचं इथे संबंध एव्हढाच - भारत देशात जगातले सगळ्यांत जास्त मतदार राहातात. 

मतदारांना "त्यांची विचारधारा ठरवण्याकरता" बियरचे प्रलोभन हे किती जोरदार ठरू शकते हे आपण पाहिलेच; जगभरांत अतीशय मोठ्या प्रमाणात झालेल्या बिअरच्या साठ्याला कुठेच गिऱ्हाईक मिळत नसल्यामुळे अशी बिअर जवळ जवळ फुकटात "काढून टाकण्याची" वेळ येते आहे हे देखील पाहिलेत, मग आता सांगा बरे  - कां विचारून पाहू नये  "सांग सांग भोलानाथ, भारतांत बिअरचा पाऊस पडेल कां ?"       

आणि असेल (मतदारांचे) नशीब जोरावर तर कदाचित भोलानाथ मान हलवत हो म्हणेलही!! 

मांडणीविचार

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

4 May 2020 - 9:26 am | अनिंद्य

‘भगवान’ देता है तो छप्पर फाड के (बियर) देता है :-)

कुमार१'s picture

4 May 2020 - 10:39 am | कुमार१
गामा पैलवान's picture

4 May 2020 - 9:58 pm | गामा पैलवान

शेखरमोघे,

बरीच रंजक माहिती मिळाली. धन्यवाद! :-)

आश्रमवाले कोण? ओशो?

आ.न.,
-गा.पै.

शेखरमोघे's picture

6 May 2020 - 8:09 am | शेखरमोघे

एकदम बरोब्बर!!

गामा पैलवान's picture

6 May 2020 - 2:13 pm | गामा पैलवान

अवांतर :

शेखरमोघे,

ओशो खास बुवा होता. सारे बुवाबाजी करणारे साधारणत: स्वत: व्यसनाधीन असतात व इतरांना चांगलं वागण्याचा उपदेश करतात. ओशो हा मला माहीत असलेला एकमेव बुवा आहे की ज्याने इतरांना स्वैर वागायची अनुमती दिली, पण स्वत: मात्र स्वैरपणा केला नाही.

आ.न.,
-गा.पै.

शेखरमोघे's picture

6 May 2020 - 11:38 pm | शेखरमोघे

त्यान्च्या भारतातून निघून अमेरिकेतल्या येण्याबद्दलच्या आणि (विशेषत) अमेरिकेतून जाण्याबद्दलच्या अनेक गोष्टी इतक्या वेगवेगळ्या तर्‍हेने वर्णिल्या गेल्या आहेत की नक्की काय घडत होते हे कळणे कठीण आहे.