अए खुदा, अए परवरदिगार

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
29 Apr 2020 - 12:01 am

अमेरिकेने इराणच्या आर्थिक नाड्या आवळल्यापासून इराणमधल्या लोकांना मोहम्मद रफीच्या  एका गाण्याची  वेळोवेळी आठवण येत असावी ज्यात "परवरदिगार"ने किती तऱ्हेतऱ्हेच्या संकटांतून भक्तांना वाचवले याचे वर्णन आहे (https://www.youtube.com/watch?v=Rad2gbRFY8w ).

अमेरिकेच्या प्रोत्साहनाने सुरू झालेल्या (आणि चालू असलेल्या) "जागतिक आर्थिक बहिष्कारामुळे" इराणमधील लोकांवर फक्त हे गाणे गातच जगण्याची वेळ आली होती. ही संधी साधत चीननेइराणमधले आपले आर्थिक व इतर हितसंबंध  वाढवत, पसरवत  इराणला  मदतीचा हात पुढे केला.  

आणि तेथूनच अनिष्ट ग्रह इराणच्या पत्रिकेत एकाच घरात जमणे सुरू झाले आणि अनेक नको त्या गोष्टी इराणमध्ये घडत गेल्या - निदान असे म्हणत इराणच्या राज्यकर्त्यांना "इराणमध्ये  करोनाचे एव्हढे भयानक परिणाम होणे कसे अगदीच अपरिहार्य होते हो, आम्ही तरी आणखी काय करणार " अशासारखे आख्यान सुरू करून, इराणमधल्या गोंधळावर पांघरूण घालता  येईल.    

इराणने चीनला आपला तारणहार मानल्यावर चीन आणि इराणमधले दळणवळण वाढत गेले. इराणमधली महान एअर ही विमान कंपनी (जी "रिपब्लिक गार्ड" या इराणच्या खास लष्कराच्या मालकीचीअसल्याचे म्हटले जाते) आपली विमाने चीनमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी - प्रवासी आणि माल दोन्हीकरता - पाठवू लागली. "चायना साऊथ" या चिनी विमान कंपनीची विमाने देखील दोन्ही देशांमध्ये जाऊ येऊ लागली. चिनी तसेच इराणी व्यापारी, लष्करी आणि राजकीय क्षेत्रातले लोक दोन्ही देशात वाढत्या प्रमाणांत प्रवास करू लागले.     
  
डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० मधल्या चीनमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी लहानमोठ्या प्रमाणांत सुरू झालेल्या करोनाच्या प्रभावाची, इराणने - इतर बऱ्याच देशांप्रमाणे - फारशी दाखल घेतली नाही.  जरी चीनने आपल्या विमानांची इराणमधली आवकजावक थांबवली तरी महान एअरची विमाने - काही नियमित रूपांत पण बरीच कंत्राटी पद्धतीच्या माल वाहतुकीकरता -चीनमध्ये जात येत राहिली आणि त्यामुळे दोन्ही देशांत लोकांची ये जा चालूच राहिली.      

कोम हे, २००० वर्षांपेक्षा जास्त जुने (लोकसंख्या सुमारे १२ लाख) इराणच्या राजधानीपासून सुमारे १५० कि. मी. अंतरावरचे शहर आहे. धार्मिक आणि उद्योगधंद्याच्या दृष्टीने महत्वाचे  असलेले हे शहर इराणच्या जगातल्या शिया पंथी  मुसलमानांचे नेतृत्व करण्याच्या महत्वाकांक्षेचा केंद्रबिंदू देखील आहे. दरवर्षी धार्मिक श्रद्धास्थानांना (फातिमा मासुमेचे दफनस्थान आणि अनेक धर्मशिक्षण संस्था)  भेट देण्याकरता सुमारे २ कोटी शिया मुस्लिम (त्यामध्यें इराणबाहेरील सुमारे २५ लाख) कोममध्ये येतात. धार्मिक महत्वामुळे इराणमधले अनेक उच्चपदस्थ धर्मगुरू "Grand Ayatollah"  मुख्यतः  कोममध्ये   (तेहरानमध्ये  त्यांच्या राजकीय उपस्थिती नंतरचा ) मुक्काम ठेवून असतात. 

इराणचे रेल्वे मार्ग विस्तारित आणि अद्ययावत करण्याकरता चीनच्या मदतीने चालू असलेल्या नवरचनेप्रमाणे कोम हे रेल्वेमार्गांचे एक महत्वाचे केंद्र होणार असल्याने चीनमधील रेल्वेशी संबंधित अधिकारी आणि कामगार कोममध्ये येऊन जाऊन असत. चीनमधील मुस्लिम विद्यार्थी आणि शिक्षक देखील कोममधल्या शिक्षण संस्थांमध्ये शिया धर्मतत्वांचा अभ्यास करत असत.   

अशा या  (चीनशी वाढते संबंध असलेल्या) कोम शहरांत जेव्हा जानेवारी २०२० पासून  अनेक रुग्ण "श्वास घेण्यास त्रास होतो" म्हणून इस्पितळांत भरती होऊ लागले तेव्हा - इराणमध्येही जगातल्या इतर देशांप्रमाणेच  "चीनमध्ये काय असेल ते असो", आमच्याकडे "तसे" काही नाही, या विचारसरणीचा भर असल्यामुळे - कांही काळ त्यांना फ्लू  किंवा तत्सम आजार असल्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले गेले. कोम आणि इतर शहरांत असे रुग्ण जेव्हा झपाट्याने वाढू लागले तेव्हा सुरू झालेल्या धावपळींत अशा आकस्मिक संकटांना शासन समर्थपणे तोंड देऊ शकत नाही हे    उघडकीस येऊ लागले.  

इराणमधील राज्यशकट काही काळापासून तीन चाकांवर चालतो आहे. शहाला हाकलल्यावर इराणमधील उच्चपदस्थ धर्मगुरू - जरी शासनामध्ये वस्तुतः सामील नसले तरी लोकमत ताब्यात ठेवता येत असल्याने - शासनावर आपला जोरदार पगडा ठेवून आहेत. शासनाचा एक भाग असलेल्या सेनाधिकाऱ्यांचे कांहीवेळा, आपापल्या हितसंबंधाप्रमाणे शासनापेक्षा वेगळे विचार असतात. त्यामुळे  जर ही तिन्ही चाके एकाच दिशेने आणि एकाच गतीने जात नसतील तर शासकीय राज्यशकट हलूच शकत नाही.  (हे काहीसे ओळखीचे वाटते नां?)   

१९ फेब्रुवारी २०२० लाकोम शहरांत मृत्यू पावलेला -नुक्ताच चीनमधून परतलेला - एक व्यापारी इराणमधला कोरोनाचा पहिला मृत्यू म्हणून गणला गेला. त्यावेळपर्यंत अजून कोरोनाला नक्की कसेगारद करावे यांवर शासकीय विचार ठरत नव्हते. त्याकरता जरी जोरदार चक्रे फिरत असली तरी ती जर एकमेकांबरोबर फिरली तरच उपयोगी ठरतील  ना?.  कोम शहरांत जमावबंदी किंवा  गृहबद्धता जाहीर करायला अनेक उच्चपदस्थ धर्मगुरू "Grand Ayatollah" तयार नव्हते. असेच काहीसे वातावरण मशहदमध्ये ही (जिथे इमाम रेझा या शिया प्रेषिताची कबर असल्यामुळे कोम सारखेच इराणमधले तसेच इराणाबाहेरचे लोक धार्मिक पर्यटनाकरता येतात) निर्माण होत होते. सरकारला या शहरांत धार्मिक कारणामुळे होणाऱ्या गर्दीला कुठल्यातरी पद्धतीने आळा घालता आला तर कोरोनाविरुद्धच्या कारवाईत यश मिळेल असे वाटत होते.  जरी सेनाअधिकाऱ्याना तेहेरानमध्ये जमावबंदी, गृहबद्धता अशा कठोर  पद्धतीने लोकांना एकमेकांपासून अंतर राखणे भाग पाडायचे होते तर सरकारला नोव्हेम्बर २०१९ मधील पेट्रोल किंमतीच्या विरोधात झालेले दंगे, ते थांबवण्याकरता झालेले गोळीबार आणि त्यातून झालेले मृत्यू  यांच्या आठवणीने जनतेला आवर घालण्याकरता काहीही करणे -आणि त्यातून पुन्हा लोकांचा राग ओढवून घेणे -कठीण वाटत होते. 

आणि या "काय करू आणि काय नको" मध्ये काही दिवसांतच इराणमध्ये चीनबाहेरच्या जगातले सगळ्यांत जास्त कोरोनाचे मृत्यू  तर घडलेच पण त्याखेरीज  साऱ्या जगातले सगळ्यांत जास्त  "कार्यरत मंत्री" कोरोनाग्रस्त ठरण्याचा "बहुमान" देखील इराणला मिळून गेला. त्यामुळे सरकारने गडबडीने कोममधले फातिमा मासुमेचे दफनस्थान, मशहदमधील इमाम रेझा यांची कबर आणि इतर काही तशीच महत्वाची  धार्मिक स्थळे लोकांना प्रवेश करण्याकरता बंद केली. ही अनेक शतकांपासूनची लोकांच्या श्रद्धेची स्थाने बंद झाल्याने लोकांत सुद्धा उलटसुलट प्रतिक्रिया निर्माण होऊन हजारो लोक जरी या प्रार्थना स्थळांच्या कुंपणाबाहेर प्रार्थना करण्यास तयार असले तरी तसेच हजारो लोक आपल्या प्रार्थना करण्याच्या आणि या "पवित्र कबरीना स्पर्श करून स्वतःलाही पवित्र करण्याच्या" हक्काची मागणी म्हणून या स्थळांना लावलेली कुलुपे फोडण्याच्या तयारीला लागले.      

त्यानंतर जी जोरदार चक्रे फिरली ती बहुतेक एकमेकांबरोबर फिरली असावीत कारण त्यानंतर इराणमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आंकडा जो जगांत दुसरा होता तो  - जरी २१ फेब्रुवारी २०२० ला निवडणुका आणि म्हणून त्यामुळे पुन्हा लोकांचे आपापसांत मिसळणे झाले तरी देखील - हळू हळू खाली येत येत, सध्या इराणची जागा सातवी आहे.   

अशा सगळ्या कोरोनाच्या विरोधातल्या अस्मानीसुलतानीबद्दल जर साधारण इराणी माणसाचे मत विचारले गेले तर त्याच्यापुढे  "काय बोलावे" हा मोठाच यक्षप्रश्न उभा राहील - त्यालाही नोव्हेंबर २०१९ मध्ये पेट्रोलच्या किंमतवाढीच्या विरोधात झालेल्या निदर्शनांच्या वेळी निदर्शकांवर झालेला गोळीबार आणि त्यातून झालेले मृत्यू विसरून चालणार नाही  - त्यामुळे बिचाऱ्याला " अए  खुदा, अए परवरदिगार" असे "नरो वा कुंजरोवा"पद्धतीने बोलण्याची सुरवात करत, पुढे काहीच न बोलता, सूज्ञपणे तिथेच थांबावे लागेल! 

जाता जाता: 
हल्ली बराच काळ आपल्या देशातील हरितवर्णप्रिय मंडळी निरोप घेतांना "खुदा हाफिझ" म्हणण्याऐवजी "अल्ला हाफिझ" म्हणत आहेत हे आपल्या लक्षात आले आहे का?  

मांडणीविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

29 Apr 2020 - 7:16 am | आनन्दा

रोचक माहिती..
बाकी हरितवर्णप्रिय पेक्षा शांतताप्रिय हा अधिक योग्य शब्द वाटतोय..

शेखरमोघे's picture

29 Apr 2020 - 7:36 am | शेखरमोघे

शांतताप्रिय सगळेच असतात. त्यातील काही थोडेच हरितवर्णप्रियअसतात.

शा वि कु's picture

29 Apr 2020 - 8:15 am | शा वि कु

खुदा हाफिज ते अल्ला हाफिज आणि रमजान ते रामादान झिशान आयुब (आर्टिकल 15 मधला) चा इंटरव्यूह