तोरणा ते राजगड

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
25 Apr 2020 - 5:15 pm

तोरणा ते राजगड (दि.१४-१२-१९ ते १५-१२-१९)
फोटोसहित लेख वाचण्यासाठी या लिंकवर जा -

https://www.blogger.com/blogger.g?blogID=6920222328094762649#editor/targ...

शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुरुवातीला घेतला तो तोरणा किल्ला. या किल्ल्यावर तोरण जातीची खूप झाडे आहेत म्हणून तोरणा म्हणतात की महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून तोरणा माहीत नाही; पण या किल्ल्याचा प्रचंड आकार बघून महाराजांनी याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. गडाची दुरुस्ती करताना या किल्ल्यावर पुरून ठेवलेले धनाचे २२ हंडे सापडले. हे धन महाराजांनी तोरण जाई देवीचे मंदिर बांधण्यासाठी, गडाच्या दुरुस्तीसाठी वापरले आणि त्यातूनच जवळच्या मुरुंब डोंगरावर राजगड हा किल्ला बांधला. १७०४ मध्ये औरंगजेब, नंतर मराठे आणि शेवटी इंग्रजांकडे गडाचे हस्तांतर झाले. ज्याप्रमाणे योद्धा लढताना अंगाखांद्यावर चिलखत चढवतो त्याच प्रमाणे शत्रूचा मारा अंगावर घेणाऱ्या तटबुरुजांच्या बाह्य अंगाला संरक्षण देण्यासाठी काही ठिकाणी त्यांच्या तळापासून जवळच , काही सहाय्यक तटबंद्या उभारल्या गेल्या. या अनन्‍यसाधारण लष्करी शिल्पाची सारी गुणवैशिष्ट्ये राजगडाचा संजीवनी आणि सुवेळा या माच्यांच्या चिलखती बांधणीत पूर्णतया साकार झालेली आढळतात. राजगड ही जशी प्रामुख्याने शिवाजीमहाराजांची उभारणी त्याचप्रमाणे ही त्यांची पहिली दुर्गबांधणी. चिलखती बांधणी हे नाव सार्थ ठरविणारा राजगड इतका अभेद्य ठरला की त्याने पहिल्या राजधानी पदाची तब्बल वीस वर्षे यशस्वीपणे धुरा वाहिली आणि तीसुद्धा सुरुवातीच्या अस्थिरतेच्या काळात शिवाजीराजे सामर्थ्य आणि सुरक्षितता यांच्या शोधात, पारतंत्र्याच्या अंधारात चाचपडत असताना! युरोपात ल्युसेर्न येथे जगातील वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे संग्रहालय आहे. त्यात एका राजगडाचाच एकमेव समावेश आहे. हा सन्मान आहे अजोड अशा या लष्करी शिल्पाचा!
शनिवारी पहाटे साडेपाचला गाडी ठाण्याहून निघून गाडी वेल्ह्याच्या दिशेने भरधाव निघाली. केतकी आणि किशोरी मागे तर प्रसाद पुढे बसला. रात्री बारा ते पहाटे पावणेचार एवढीच झोप आणि ट्रेकची प्रचंड उत्कंठा; खूप दिवसांनी या ट्रेकचा योग जुळून आला होता. गप्पांच्या ओघात एक-एक गाव मागे पडत होतं. जुन्या ट्रेकच्या आठवणींना उजाळा मिळतानाच नवीन विषयांनाही तोटा नव्हता. आमच्या नेहमीच्या सवंगड्यांची अनुपस्थिती जाणवत होती. गाडीमध्ये डिझेल भरून आणि हवा तपासून निघालो ते थेट शिवनेरी मिसळलाच थांबलो. मराठे सर नसल्यामुळे कुठे नाश्ता छान मिळेल हे सांगणारे कोणी नव्हते. इथे फक्त मिसळ आणि भेळच होती. इथली मटकी भेळ म्हणजे भेळेचा निव्वळ आळशी प्रकार; शेव-कुरमुऱ्यांवर फक्त कांदा तोही अगदी कमी टाकून दिला होता. भेळ, मिसळ आणि वर एक-एक चहा घेतला.
ठाण्याहून वेल्ह्याला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. त्यापैकी सिंहगड रस्ता जवळचा पण खराब आहे. नसरापूर रस्ता उत्तम पण थोडा लांबचा आहे. आम्ही मधला कोंढरपूर मार्गे जाणारा रस्ता निवडला. कात्रज बोगदा मागे गेला होता.शिवनेरी मिसळनंतर लगेच डावीकडे वळलो आणि वेगाला लगाम लागला कारण रस्ता बरा पण छोटा होता; २-३ जागी तर फारच खराब होता. बाराव्या सुमारास वेल्हा बस थांब्यासमोरील मैदानात गाडी लावली आणि बूट मोजे घालून आणि सॕक घेऊन गाडीबरोबर एक सेल्फी काढून ट्रेकसाठी सज्ज झालो. नाश्ता तुडुंब झाला होता त्यामुळे तोरणा विहार मधून पिठलं -भाकरी बांधून घेतली आणि कदमांना रस्ता विचारुन तोरण्याकडे निघलो.आम्हाला त्यांनी काँक्रीटचा रस्ता न सोडण्याचा सल्ला दिला होता म्हणून मध्ये वर चढणारी पायवाट दिसत असूनही आम्ही रस्ता सोडला नाही. सुरुवातीलाच उन्हातून चालताना त्या रस्त्याचा अगदी कंटाळा आला.पण समोर दिसणारा प्रचंडगड बोलावत होता. तोरणा ते राजगड ट्रेकचा जीपीएस् ट्रॕक डाउनलोड करण्याचा आमचा प्रयत्नही नेटानी सुरु होता. पण ते काही होईना मग तो प्रयत्न सोडून दिला.
वाटेत पुण्याहून दीड वर्षाच्या अंशिकाला घेऊन आलेले एक जोडपे भेटले,अंशिकाला आमचे लाल-निळे ट्रेकिंग पोल फारच आवडले. ती दोन हातात दोन पोल घेऊन आमच्याबरोबर तुरु-तुरु तोरण्याकडे निघाली. आई-बाबांकडे बघायलाही तयार नव्हती.काँक्रीटचा रस्ता संपल्याचा आनंद एक मोठा ग्लास लिंबू सरबत पिऊन साजरा केला.मग लाल चुटूक मातीची पायवाट उभा चढ चढू लागली. आज विशेष घाई नव्हती. आम्ही मजेत चाललो होतो.गुंजवणे धरणाचे मनोहर दृश्य बघत वाटेत टेकलो होतो. तेवढयात पुण्याहून ट्रेकसाठी आमच्याबरोबर येणार असलेला अमित त्याच्या मित्राबरोबर येऊन पोहोचला. रविवारी वेळ नसल्यामुळे तोरणा-राजगड ट्रेक करण्याऐवजी एका दिवसात फक्त तोरणा करण्याचा तह त्यानी केला होता. त्यामुळे ते दोघे सगळा काँक्रीट रस्ता बाइकवर आले. पण आम्हाला दुसऱ्या दिवशी राजगड गुंजवण्याला उतरुन गाडी न्यायची होती. त्यामुळे गाडी खालच्या वाहनतळावरच ठेवली. कारण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बस किंवा सहा आसनी रिक्षा वगैरे वाहन मार्गासनी वरुन मिळू शकते. अडीच -तीन वाजले तशी भुकेची जाणीव होऊ लागली. मग एका झाडाखाली बसून झणझणीत पिठलं-भाकरी चवीनी खाल्ली. वर आजीकडे परत एक ग्लास लिंबू सरबतही घेतले. मग गडी ताजेतवाने होऊन पुन्हा निघाले. वळणा-वळणावर गुंजवणे धरणाचे दृश्य दिसत होते. सभोवार नजर फिरवली की मनाला आल्हाद मिळत होता. अमित त्याच्या मित्राबरोबर गडाला भोज्जा करुन परत जाताना भेटला. बहुतेक ग्रुप तोरणा उतरत होते. एकमेकांची विचारपूस तुम्ही कुठून वगैरे होत होती.आम्ही तोरणा-राजगड करणार हे ऐकून कोणाच्या चेहऱ्यावर किंचित असूया तर कोणाचे अनुभवाचे बोल ऐकायला मिळत होते. पुण्याचे दोघे म्हणाले की कधीपासून हा ट्रेक करायचा आहे पण ग्रुपच जमत नाहीये.आम्ही म्हटलं की मग चला परत आज तुम्हाला ग्रुप तयार मिळालाय अनायसे.
मी आणि किशोरी पुढे तर प्रसाद आणि केतकी थोडे मागे होते. तेवढयात प्रसादनी आवाज दिला, 'नमिता, मागे ये, दगड पडलाय' मला कळेना दगड पडलाय तर मी काय करु; बाजूनी या म्हणावं. पण पुन्हा हाक आली तशी मी खाली गेले. वर बसलेल्या माकडांनी एक मोठा धोंडा खाली ढकलला होता,आणि तो केतकीला डोक्याला आणि हाताला चाटत गेला होता. केतकीची काय अवस्था झाली असेल यची मला कल्पना आली; कारण मी सांधण दऱ्याला हा अनुभव घेतला होता. फक्त तिथे दगड ढकलणारी माकडं नव्व्हती तर ते आपोआपच कोसळत होते. असा एखादा दगड आपल्या डोक्यात पडला तर काय होईल या विचारानी काही सुचत नाही. प्रसादनी केतकीला पाणी वगैरे दिले आणि धीर देऊन हळुहळू पुढे घेऊन आला.मी थोडी खाली जाऊन ते निघेपर्यंत जरा थांबले कारण सॕक सोडून जायची सोय नव्हती. वानरसेना तर टपूनच बसली होती. सुदैवाने केतकीला फक्त थोडे खरचटले होते. ती लगेच सावरली आणि चालू लागली. पण पाच मिनिटे तरी विचित्र थरार अनुभवला.
लवकरच बिनी दरवाजा आला आणि मग कोठी दरवाजा. तोरण्यावर दुरुस्तीचे बरेच काम झालेले दिसते. त्यामुळे किल्ल्याच्या दरवाजातून प्रवेश करतानाचा अनुमव वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांना जोडणारा होता. गडावर बरीच मंडळी मुक्कामी आहेत अशी माहिती वाटेत मिळाली होती. आम्ही खोकड टाक्याजवळ अंबारखान्यातील एका खोलीत आमच्या सॕक ठेवल्या आणि ग्लास काढून तोरणाविहार मधून आणलेला गरमा-गरम चहा प्यायला. आता पाणी भरणे आवश्यक होते. किशोरी बूट मोजे काढून टाक्यात उतरायला सज्ज झाली. टाके १०-१२ फूट खोल होते आणि कोपऱ्यातले जिवंत झऱ्याचे पाणी पिण्यासाठी भरायचे होते. उतरायला पायऱ्या वगैरे नव्हत्या. उतरु तर भले पण चढताना गंमत येणार. किशोरीनी पांढरे निशाण फडकवल्यावर मी प्रसादला मोठ्या मनानी संधी दिली.आणि तो गडीही हिंमतीनी खाली उतरला. टाक्यातले थंडगार पाणी पिऊन अपार आनंद अनुभवला आणि गडफेरीसाठी निघालो. बुधला माचीकडे मावळतीच्या रंगांची उधळण सुरु झाली होती. दूरवर लिंगाणा आणि रायगड दिसत होते. एकदा तोरणा रायगड ट्रेक करायचा मानस आहे, आणि लिंगाण्याची चढाईही. तूर्तास डावीकडे दिसणारा राजगड आणि राजगडाकडे धारेवरुन जाणारी वाट नीट पाहून घेतली. मग केतकीनी अमेयला जळवायला व्हिडिओ काॕल लावला तो बिचारा प्रिलिमचा शेवटचा पेपर बाकी असल्यामुळे ट्रेकला येऊ शकला नव्हता. मावळतीच्या रंगांमाध्ये न्हाऊन निघालेल्या अशा ङोंगररांगा या जगापासून दूर एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. मागच्या डिसेंबरमन्ये आम्ही रतनगडावर होतो . दीपश्री आणि अमेयची खूप आठवण येत होती. बुधला माचीवर संतोष ढेबे भेटले. तोरणा-रायगड ट्रेकला ते वाट दाखवायला येईन म्हणाले. त्यांचा नंबर लगेच घेतला. तोरणा ते राजगडच्या वाटेवर एकमेव घर आहे ते त्याच्या मामांचे आहे.
आता अंधार दाटू लागला. आम्ही तटबंदीवरुन चालत थोडे फिरु या म्हणून निघालो. महार टाके लागले. किशोरीनी तिच्या ट्रेकिंग पोलला सायकलचा दिवा लावून आणला होता. त्यामुळे त्याच्या प्रखर प्रकाशझोतात टाके नीट पाहता आले. तिथे जवळच तटबंदीवर बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी ट्राॕलीला पुली लावलेली होती; त्यात भगवा ध्वज अडकून फडकत होता. तिथून मेंगाई देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तिथे वीस जणांचा ग्रुप राहिला होता. संध्याकाळी बुधला माचीवर ते खाली गेले होते. तिथे कोणीतरी जाळ केल्यामुळे मधमाश्या पिसाळून त्यांच्या ग्रुपमध्ये काहीजणांना चावल्या होत्या. त्यातल्या एकाची परिस्थिती जरा गंभीर झाली होती. मधमाश्यांनी हल्ला केल्यास निःस्तब्ध राहावे आणि आरडाओरडा- गोंधळ अजिबात करु नये. तसेच आपले पूर्ण शरीर झाकलेले असावे म्हणजे कमीतकमी नुकसान होते असे अनुभवाचे बोल वाचल्याचे आठवले. तिथून मग तोरणजाई देवीच्या मंदिरात गेलो. इथेही मंदिराच्या आवारात तंबू लावलेले होते. पुण्याहून आलेला विनय आणि त्याचा मित्र यांच्याशी ओळख झाली. त्यांचा तीस जणांचा ग्रुप रात्री नऊ नंतर गड चढणार होता. त्यांना आकाशदर्शनाची खास आवड होती. आज रात्री १२ ते ४ उल्कावर्षाव होणार होता. अवकाशातील हा झगमगता सोहळा अनुभवण्यासाठी ते आज तोरण्यावर आले होते. त्यांच्या कडून केतकीने स्कायवाॕक - २ हे अॕप घेतले आणि आम्हीही आकाशातील ग्रह-तारे न्याहळू लागतो. अजून खूप फिरण्याचा उत्साह होता. पण ढेबे मामांनी रात्रीचे गवतामध्ये साप वगैरे निघतात त्यामुळे जास्त फिरु नका अशी सूचना केली होती. त्यामुळे आम्ही आमच्या मुक्कामी परत फिरलो.
पुदीना-कोबी पराठे, तिखटा- मिठाच्या पोळ्या ,शिरा, सुकी भेळ असे अंगत-पंगत करुन जेवलो. प्रसादला आग्रह करुनही त्यानी जास्त काही खाल्ले नाही. आज तरी काही फार दमणूक झाली नव्हती. पण त्याला भूकच नव्हती. पहाटे पावणे दोनचा गजर लावून आम्ही स्लिपिंग बॕगामध्ये शिरलो. अशी गाढ झोप लागाली की पहाटे गजरानीच जाग आली. पटापट उठून आम्ही उल्का वर्षाव बघायला निघालो. विनयचा ग्रुप बुरुजावर जाऊन बसला होता. मंदिरासमोरच्या पठारावर त्यांनी शेकैटी केली होती. आम्ही गप्पा मारत त्या शेकोटीभोवती बसलो. त्यामुळे थंडी असूनही वाजात नव्हती.आम्हाला फार प्रतीक्षा करावी लागली नाही.आकाशातून भूतलाकडे झेप घेणाऱ्या ताऱ्यांशी दृष्टिभेट होऊ लागली. आणि इकडे आडवे होऊन हा अनुभव घ्यावा अशी प्रबळ इच्छा झाली. कोणाला ईशान्येला तर कोणाला नैऋत्येला उल्कापात दिसू लागला. साधारण तासभर हा खेळ बघून आम्ही पुन्हा निद्रादेवीच्या आधीन झालो आणि पहाटे पाचला उठलो. झटपट आटपून मेंगाई देवीकडच्या आजीकडे गेलो. लगेच तोरण्याकडे गेलो असतो पण कालच्या मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे उजाडल्याशिवाय निघू नका असे सगळ्यांनी बजावले होते. आजींनाही चहासाठी येण्याचे कबूल केलेले होते.आजींनी प्रेमानी साखर लोटून केलेला चहा प्यायल्यावर आमच्या कडच्या थर्मासमधला चहाही गरम करुन प्यायला. सोबतीला खारी-गोड बिस्किटे होतीच. इतक्यात पूर्वेकडे उजळू लागले. पूर्वेच्या झुंजार माचीवरुन 'उदयोस्तु भगवन् भास्करा' असे नमन करायचे होते. पण आज राजगडाचा दूरवरचा पल्ला गाठायचा असल्यामुळे गडमाथ्यावरुन प्रथमो मे नमस्कारः प्रचोदनाय मित्राय म्हणून कोकण दरवाजातून खाली उतरायला सुरुवात केली. बुधला माचीसारखीच पलीकडे झुंजार माची आहे. ही माची बघितली की गडाच्या अजस्त्र आकाराची कल्पना येते. बुधला माचीच्या थेट टोकावर जाऊन बघितले की पूर्वी जा-ये करण्यासाठी वापरला जाणारा पण आता चिणलेला चिणला दरवाजा दिसतो. पण इतके टोकापर्यंत जायची गरज नाही. कारण राजगडाची वाट थोडी आधीच उजवीकडून खाली उतरते आणि माचीला वळसा घालत पुढे निघते. इथे जरा घसरडे आहे त्यामुळे जरा जपून जावे लागते. त्यानंतर शिडीचा जरा रोमांचक टप्पा आला. किशोरी पुढे राहून सगळ्यांना काळजीनी सूचना देत होती. मी माझा कॕमेरा पाउच सॕकच्या आत ठेवून दिला.कारण अडचणीच्या जागी सॕकमुळे पुढे ढकलले जायला व पुढच्या कॕमेरा पाउचमुळे चढताना पाय अडकणे होते. शिडी आणि कातळटप्पा पार केल्यावर पुढची वाट सुसाट होती. अधे- मधे कुठेही न थांबता साधारण मध्य गाठला की एकमेव घर लागते. ढेबेंचे मामा- मामी तिथे राहतात. तिथेच थांबावे असे ठरले. आज राजगड-तोरणा मॕरॕथाॕन असल्यामुळे मार्गावरील झाडांना वाट कळण्यासाठी भगव्या फिती बांधलेल्या होत्या. राजगडाकडून तोरण्याकडे जाणारे वेगवेगळे ग्रुप वाटेत भेटत होते. कोणी पहाटे चारला निघाले होते तर कोणी सहाला; मोठ्या ग्रुपमधधले इंजिनचे डबे पुढे, मधले डबे मधे तर गार्डचे डबे सगळे थांबे घेत मागे राहिलेले होते. ते सगळे आम्हाला भेटले. एक ग्रुप पालेघाट उतरुन डांबरी रस्ता लागतो तिथल्या गावात राहिला होता. तोरण्याकडून राजगडाकडे जाणारे उरफाटे वीर फक्त आम्हीच होतो. धारेवरुन सुसाट जाताना चहुकडे ङोंगररांगा आणि मध्ये आपण असे सुंदर दृश्य होते. फार छान वाटत होते. 'राजगड के रस्ते में , कारवी के जंगल में, गाने की धुन-धुन में चले हम जोर-जोर में, शहर से दूsssर.....,'असे शीघ्रकाव्यही ओठी आले. इथून शहरे, रस्ते, वाहने, कोलाहल सगळे दूर होते. जंगल, पक्षी , झाडे, निसर्ग आणि पाच सोबती तेवढे बरोबर होते. तोरण्यापासून आमच्याबरोबर दोन काळू आले होते आणि ते आता राजगडापर्यंत येणार याची खात्री होती. या कुत्र्यांची चालण्याची एक विशिष्ट शैली असते. ते आधी जोरात पळतात , मग दमतात मग हाsहाsहाsss करत दम खातात आणि मग बाजूच्या झाडीत अदृश्य होतात. नंतर आपण आपल्या लयीत चालत असताना आपली तंद्री लागली की अवाचित आपल्या वाटेत प्रकट होतात आणि आपण दचकतो. एखाद्या ठिकाणी अवघड किंवा अरुंद वाट असेल तर हे हटकून आडवे येऊन वाट अडवून ठेवतात. हळुहळू हे सगळे आपल्या अंगवळणी पडते. त्यांना काठी दाखवून पुढे चला म्हणून सांगितले तर बिचारे घाबरतात. मी म्हटले, अरे बाळांनो सकाळपासून तुम्हाला एकदा तरी कोणी मारले वगैरे आहे का? नाही ना, मग कशाला घाबरता?
आता ढेबेंच्या मामांचे रानातले ते एकुटवाणे घर आले. त्यांच्या राखणदारानी आमच्याबरोबर आलेल्या काळू-बाळूंना बघून हा माझा इलाका आहे अशी घोषणा केली. एका झाडाखाली बसून आम्ही न्याहरी करणार होतो; पण आधी काळू - बाळूला शांत करायला हवे होते. मग आमची श्वानप्रेमी किशोरी बिस्किटं घेऊन त्यांना शांत करायला लांब घेऊन गेली. तिला परत यायला बराच वेळ लागला म्हणून विचारलं तर त्यांचा हट्ट समजला; बिस्कटं खाली टाकली तर ते खात नव्हते मग हिनी ती त्यांना प्रेमानी भरवली. मग शिरा, पराठे, खाकरे वगैरे आम्ही तिघींनी खाल्ले, प्रसादनी पुन्हा काहीच खायला भूक नाही म्हणून सांगितले. त्यानी अगदी एखादा चमचा शिरा चाखत- माखत खाल्ला आणि थोडे टँग प्यायले. टँग, इलेक्ट्राॕल दोन्ही एक-एक पाकीट टाकून सरबत तयार ठेवले होते. तिथे पाण्याच्या दोन बाटल्याही भरुन घेतल्या. हे मामा सगळ्या ग्रुप्सचे नंबर वगैरे लिहून ठेवतात. इथे मुंबईच्या साद अॕडव्हेंचर्सचे ट्रेकर्स आले होते. त्यांनीही त्यांच्या वहीत मामांचा नंबर लिहून घेतला. आता तोरणा मागे राहून राजगड जवळ दिसायला लागला होता.
वाट खूप छान होती. वातावरणही थंड होते. मध्येच कारवीनी गर्दी केली होती. सोनकी फुलली होती. मोकळ्यातून जातानाही उन्हाचा चटका जाणवत नव्हता. लवकरच डांबरी रस्ता लागला.रस्ता ओलांडल्यावर पाले खिंडीतून वाट चढू लागली. हा चढ छान वाटला. आता पटापट राजगडावर पोहोचू असे वाटले, कारण किल्ला अगदी दृष्टिपथात आला होता. पण चढ संपून आम्ही मोकळ्या जागेवर पोहोचलो आणि पुन्हा उतार सुरू झाला. आता ऊनही जाणवू लागले होते. प्रसादला पायात गोळे यायला लागले. त्यामुळे थोड्या-थोड्या वेळानी थांबण्याची गरज भासू लागली. पुन्हा चढ सुरू होऊन एक छोटा कातळ लागला. वेळेचे गणित जमण्याची शक्यता जरा कमी होते आहे की काय? अळू दरवाज्यातून बाहेर पडून मॅरेथॉन साठी धावणारे गडी दूरवर दिसू लागले. राजगडाची संजीवनी माची ही बालेकिल्ल्या पासून बरीच दूर आहे. राजगडावर दोन-तीन वेळा मुक्कामी येऊनही ही बाजू बघितली नव्हती. संजीवनी माचीचा अळू दरवाजाशी येऊन पोहोचलो. प्रसाद काही न खाता नुसता सरबतावर तग धरून होता. किल्ल्यात प्रवेश केल्यावर माची वरती पाण्याची तीन टाकी लागली. पाणी स्वच्छ दिसत होते. थोडे पिऊन चव बघितली आणि थंडगार पाणी तोंडावर मारून तजेला आला. प्रसाद दोन वर्षांपूर्वीच हा गड सफाईसाठी राजगडावर आला होता हे योग्य वेळी आठवले. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या भरून झाल्यावर त्याला आणि किशोरीला म्हटलं की तुम्ही तिघे चोर दरवाज्याने राजगड उतरून या. वाटेत पिठलं-भाकरी वगैरे पद्मावती माचीवर मिळेल ते जेवून घ्या. गुंजवण्यावरून काही वाहन मिळाले तर मार्गासनी पर्यंत या किंवा तिथे थांबून राहा. मी पुढे जाते आणि वेल्ह्याला जाऊन गाडी घेऊन येते. चोरदरवाजाची वाट माहीत असल्यामुळे किशोरी आणि केतकी यांना बरोबर घेऊन येईन असे सांगून प्रसादनी मला आश्वस्त केल्यावर मी तडक निघाले. खरं तर चार जणांच्या ग्रुपमध्ये शेवटपर्यंत सगळ्यांनी एकत्र गेलेलेच चांगले असते पण त्यासाठी फार जास्त वेळ लागणार होता. त्यामुळे नाईलाज होता. संजीवनी मातीवरची मजबूत चिलखती तटबंदी रेखीव दिसत होती. अवाढव्य बालेकिल्ला मध्ये होता आणि दूर पद्मावती माचीवरती माणसांची झलक अधून-मधून दिसत होती. गडफेरी करत संजीवनी माचीपर्यंत आलेले दोघे भेटले. त्यानंतर मात्र मी एकटीच वाटेनी चालत होते. डावीकडे पाली दरवाजाची वाट उतरताना दिसत होती. बालेकिल्ल्याची ही बाजू मी प्रथमच बघत होते. मागच्या वेळी बालेकिल्ल्यावर गेलो होतो तेव्हा वरच्या टाक्यांमध्ये पाणी मे महिन्यामुळे खूप खोल होते; तेव्हा मेधाच्या ओढणीला बाटली बांधून पाण्यात सोडून पाणी काढले होते ते आठवत होते.यावेळी खाली उतरुन पुढे ठाणे गाठायचे होते त्यामुळे बालेकिल्ल्यावर जाणे शक्य नव्हते. वाटबालेकिल्ल्याला प्रदक्षिणा घालून वाट खाली पठारावर आली. अंबारखाना, नगारखाना फरसबंद करुन गडावर बरेच बांधकाम झालेले दिसत होते. रविवार असल्यामुळे किल्ल्यावर बरीच गर्दी होती. पद्मावती देवीला व शंकराला नमस्कार करुन पुढे निघाले. पद्मावती टाके निखळ पाण्यानी तुडुंब भरले होते. पुणे परिसरातून बरेच हौशी ट्रेकर्स मोसावरुन दोघे-दोघे आले होते. ठाण्याचा एक ग्रुप मिनी बस करुन आला होता.बरीच मुले पटापट उतरत मग थोडं विसावत, सरबत- पाणी पित चालली होती. मी पुढे जाणाऱ्यांना वाट देत माझ्या लयीने चालले होते . वाटेत एकदाच पाणी पिऊन पद्मावती माचीवरुन साधारण दोनच्या सुमारास निघून मी सव्वाचारला खाली पोहोचले आणि चारचाकी वाहनांची पार्किंगची सोय होती तिथे हॉटेलच्या बाकड्यावर बसून कोणी गाडीकडे येत आहे का याची वाट पाहू लागले. तसेच मार्गासनीला जायला काही वाहन मिळेल का याची चौकशी केली. पण फार वाट बघावी लागली नाही. समोरच्या नव्या कोऱ्या गाडी कडे एक जण आला. एकटाच निघतोय म्हटल्यावर मी त्याला मार्गासनीपर्यंत सोडाल का असे विचारता त्यानी सांगितले की हो फक्त तिथपर्यंतच सोडू शकतो कारण मार्गासनीला माझे मित्र माझ्या प्रतीक्षेत आहेत. याचे नाव मयुर रणशिंगे, तोही ठाण्याचाच होता. वाटेत त्यांच्यातले दोघे आम्हाला भेटले होते; डांबरी रस्याकडे येऊन तिथे मुक्कामी होता तो यांचाच चौघांचा ग्रुप. आणि विशेष म्हणजे मयुरनी मला बरोबर ओळखले. आम्ही युथ होस्टेल मुंबईबरोबर AMK ट्रेक एकत्र केला होता. मग गप्पा सुरु झाल्या. मयूरकडून नसरापूर रस्ता उत्तम असल्याचे कळले तर कोंढरपूर मार्गे जवळचा रस्ता असल्याचे मी त्याला सांगितले. वेल्ह्याला वाहन तळासमोरच बस थांबा होता. जोपासू डस्टरनी झटपट गाडी पुसली आणि तोंड धुवून ताजी-तवानी होऊन मी लगेच गुंजवण्याकडे निघाले. प्रसादचा लगेच फोन आला आम्ही पंधरा मिनिटात खाली पोहोचतो, मीही तोपर्यंत गुंजवण्याला येईन, तुम्ही तिथेच थांबा असे ठरले. सव्वा सहाला गुंजवण्यात पोहोचून पुन्हा त्याच हॉटेलच्या बाकड्यावर मी तिघांची वाट बघू लागले. सगळ्यांसाठी चहा आणि बटाटेवडे आणायला सांगितले. माझा फोन डिस्चार्ज झाला होता त्यामुळे हॉटेल मालकांच्या फोनवरुन प्रसाद केतकी आणि किशोरी तिघांनाही फोन लावला पण कोणालाच रेंज नव्हती. थोडी वाट बघावी नाहीतर जाऊन शोधावे असा विचार करुन बसले होते. पाच-दहा मिनिटांत किशोरी आली आणि केतकी आणि प्रसादही मागोमाग पोहोचले. चहा,वडे, मँगोला, वेफर्स, भेळ इ. खाऊ खाऊन आम्ही साडेसातच्या दरम्यान ठाण्याकडे निघालो. ट्रेक तर झकास झाला एवढी जबरदस्त चाल असूनही कोणालाही विशेष काही त्रास झाला नाही. याचे समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता. मागच्चे ट्रेक्स, गाणी, नाटक, सिनेमे अशा भरपूर गप्पा झाल्या. किशोरीला उद्याची अॉफिसमधली मिटिंग दिसत होती त्यामुळे ती थोडी झोप काढण्याच्या विचारात होती. त्या दोघांनी हुशारीनी केतकीला पुढे बसवले होते. आता नेटवर्क आल्यामुळे केतकीचे एकीकडे चॕटिंग आणि फोन सुरु झाले. मीही घरी फोन करुन मला जेवायला काय मिळेल असे विचारले. आमचा मित्र मधू देहानी जरी कळव्यात असला तरी मनानी मात्र आमच्याबरोबर होता. सतत संपर्कात राहून आमची आस्थेनी चौकशी करत होता. त्यामुळे त्याला फोन लावून त्याच्याशी सगळ्यांनी गप्पा मारल्या. पुढच्या ट्रेकचे मनसुबे रचले जाऊ लागले. गाण्यांच्या जादुई स्वरांनी ट्रेकचा आनंद द्विगुणित झाला. रस्त्यात ट्रॕफिकमुळे बराच खोळंबा झाल्याने ठाण्याला पोहोचेपर्यंंत रात्रीचे बारा वाजले आणि नवा दिवस नव्या आशा घेऊन आला.

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

25 Apr 2020 - 6:28 pm | गामा पैलवान

नमिता श्रीकांत दामले,

मस्त ट्रेक झाला. धावपळीचा वाटतो. पण एकंदरीत मंडळी खूष झालेली दिसतात. शेवटी ठाण्याच्या वर्दळीने रसभंग केला, पण त्याला काही इलाज नाही.

आ.न.,
-गा.पै.

ऋतु हिरवा's picture

30 Apr 2020 - 6:28 pm | ऋतु हिरवा

yhai अंबरनाथ बरोबर आमचा हा ट्रेक ठरला होता, पण पावसामुळे तो रद्द झाला. आमच्या राजगड ट्रेकची आठवण झाली. चालणार्यांचा कस बघणारा ट्रेक वाटतो