पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर

आबा पाटील's picture
आबा पाटील in भटकंती
22 Apr 2020 - 4:36 pm

पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - पुणे ते कराड

पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - २: कराड ते निपाणी

पुणे ते कन्याकुमारी - ३ : निपाणी ते कित्तुर

दिवस चौथा - 18 डिसेंबर 2018 मंगळवार
कित्तुर - येल्लापुर

सकाळी लवकर उठून बॅग पॅक करणे. सायकलला पॕनीयर जोडणे, इत्यादी गोष्टी आवरुन आम्ही खाली आलो.
पॕनीयर म्हणजे सायकल सोबत सामान वाहून घ्यायचे पिशवी, जी मागच्या चाकावरती कॅरियरवर लावल्या जातात आणि पीटर पॕनीयर घेऊन आला होता. त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण संसार होता त्याबद्दल अधिक माहिती येणाऱ्या भागात मिळेलच.
हॉटेलच्या मॅनेजर कडे किल्ल्याची चौकशी केली, त्यांनी सांगितले किल्ला, म्युझियम सकाळी नऊ वाजता उघडेल आणि ते हॉटेल पासून दोन किलोमीटर मागे आहे. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही रिक्षाने जाऊन यावे असे ठरले.
आता वेळ आहे तर चहापाणी करून घ्यावे म्हणून आम्ही हॉटेल बाहेरच्या टपरीवर पोहोचलो,चहा बनवणे सुरू होते इतक्यात दोन सायकलस्वार येताना दिसले. मी हात करून त्यांना थांबवले, ते जवळ येताच आमच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्या फार हिंदी, इंग्लिश मध्ये. मी आणि सरपंच काहीतरी मराठीत बोललो आणि त्यापैकी एक सायकलिस्ट आमच्यासोबत चक्क मराठीत बोलू लागले.
आम्हाला वाटले होते ते कर्नाटकातील असल्यामुळे त्यांना मराठी येत नसेल. पण ते तर बेळगाव चे होते आणि बेळगाव - नृसिंहवाडी सायकल प्रवास करणार होते, त्यामुळे तयारी म्हणून प्रॅक्टिस साईड साठी कित्तुर पर्यंत आले होते. त्या दोघांपैकी एक आजोबा जे की फक्त वयाने आजोबा होते पण शरीराने आणि मनाने ते खूपच तरुण होते. त्यांनी आमची चौकशी केली कुठून आलात, कुठे जाणार, कुठल्या रस्त्याने कन्याकुमारी जाणार वगैरे, वगैरे.. त्यांना आमचा प्लॅन सांगितला. त्यांनी सुचविले तुम्ही हायवेने जाणार, त्यापेक्षा दांडेली मार्गे किनारपट्टीने का जात नाही? कारण हायवेची कामे सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात ट्रक आणि इतर गाड्यांच्या ट्राफिक लागेल व रस्ते एक लेन बंद असल्यामुळे तुम्हाला सायकल चालवण्याची मजा येणार नाही. त्याचबरोबर दुसरे जे काका होते, त्यांनी त्यांच्या 2-4 मित्रांचे फोन नंबर दिले ज्यांचे हॉटेल मुर्डेश्वरला आहेत आणि आग्रहाने सांगितले मुर्डेश्वरला मुक्काम केला तर नक्की यांच्याकडे जा. आम्हीपण हो नक्की म्हणून सांगितले, तोपर्यंत चहा आला आणि त्यांच्यासोबत चहा-बिस्कीट घेऊन , फोटोसेशन झाले. त्यांनी पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या , आम्ही त्यांना निरोप देऊन कित्तुरचा किल्ला बघायला निघालो.
काल संध्याकाळी जिथे कॉफी ब्रेक झाला होता , तिथून जवळच राणी चन्नम्मा यांचा भव्य पुतळा होता. किल्ला व प्रदर्शन सुरू झाले होते, आम्ही तिथे गेलो तर अजिबात गर्दी नव्हती आणि एवढा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित बघून मनाला कसेतरीच वाटले. चन्नम्मा यांचा पराक्रम कितीतरी मोठा आहे , त्या प्रमाणात तिकडे काहीच व्यवस्था नाही.
1
कधीतरी लाईट - साऊंड शो सुरू असावा, सध्या तरी त्याचे तिकडे फक्त अवशेष दिसत होते. आजुबाजुला माहिती देण्यासाठी एखादा गाइड किंवा माहितीपुस्तिका वगैरे काहीही नव्हते.एकंदरच आपला भारतीयांचा ऐतिहासिक गोष्टी बद्दलचा आदरभाव बघता, यात काहीच नवल वाटलं नाही. थोडेफार फिरून, फोटो काढून आम्ही बाहेर आलो.
2

34
समोरच नाश्त्यासाठी हॉटेल दिसले. एकदम छोट्या गावातील लुक, मोजून चार टेबल आणि खुर्च्या, चार मोजकेच पदार्थ, जास्त व्हरायटी मेनू नाही.
जे काही पदार्थ होते, ते अप्रतिम चवीचे होते. इडली, डोसा आणि उत्तप्पाची भरपेट मेजवानी झाली. सगळ्यात शेवटी स्टीलच्या कपातील कॉफी झाल्यावर,आता निघूया असे ठरले.
5
परत रिक्षाने हॉटेल गजराजला पोहोचलो, हॉटेलचे बिल देऊन, कपडे चेंज करून, सायकली बाहेर काढल्या. सकाळी भेटलेल्या काकांनी सांगितल्याप्रमाणे दांडेलीचा रस्ता पकडला. हॉटेलमधून बाहेर पडलो आणि उजव्या बाजूला वळले की दांडेली कडेच.

6
हॉटेल बाहेर आल्यावर प्रथेनुसार फोटोसेशन केले आणि सासा समूहावर अपडेट केलं की प्लान चेंज झाला आहे. हायवे टाळुन शक्यतो किनारपट्टी ने जाण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यावर सासावाल्या लोकांच्या टिप्स आणि सूचना सुरू झाल्या. सासा समूह लोकसुद्धा आमच्यासोबत पुणे कन्याकुमारी प्रवास करत होते. एक तर इतकी महीने चर्चा, तयारी झाली होती. सुरुवातीला पंधरा ते वीस जण तयार झाले होते. नंतर हळूहळू प्रत्येकाच्या काही न काही अडचणीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता. हो- नाही करत करत आम्ही चौघेजण शेवटी निघालोच होतो आणि आज चौथ्या दिवसाची सायकल सफर सुरू करत होतो.
त्यामुळे जे येऊ शकले नाहीत आणि ज्यांना येणं शक्य नव्हतं त्या कार्यकर्त्यांसाठी आमची सायकल सफर म्हणजे एक विशेष आकर्षण होतं. आम्ही दिवसभरात एखादा फोटो शेअर केला किंवा एखादा मेसेज ग्रुपवर टाकला, तर लगेच सर्व जण आवर्जून प्रतिक्रिया द्यायचे आणि आम्हा चौघांचा उत्साह वाढवायचे, सोबत स्वतः सुद्धा सफरीमध्ये सहभागी व्हायचे.
7

10

आम्ही दांडेलीचा रस्ता पकडला आणि त्या आजोबांना शतशः धन्यवाद दिले. मस्त जंगल, दोन्ही बाजूला छान हिरवी झाडे, दूरदूरपर्यंत मनुष्यवस्ती नाही. फक्त आणि फक्त चारजण सायकलवर चालले आहेत, वाह काय मजा होती. वाटेतले रस्ते एकदम रोलर्कॉस्टर राईडचा अनुभव देणारे होते. कुठे थोडा ऊंचवटा, कुठे थोडा उतार, एक मस्त अनुभव घेत सर्व सायकलस्वार, आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत, मस्त गाणी गात, फोटो काढत चाललो होतो.
10 11

रमत-गमत हसत-खेळत प्रवास सुरू होता. वाटेत पीटरला चिंचेचे एक झाड दिसले , मग सायकली थांबवून , चिंचा गोळा करणे, चिंचा खाणे हा कार्यक्रम झाला. बर्याच वर्षांनी झाडाच्या चिंचा पाडून खाण्याचा मस्त कार्यक्रम झाला.
8
कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मस्त मजा असते , लहानपणीची गम्मत जम्मत असते, हे आपण वाढत्या वयानुसार आणि जबाबदारीच्या ओझ्यात विसरुनच जातो. पण आता आम्ही चिंचा गोळा करून खाण्यात, ते सुख परत अनुभवत, येणारे पंधरा दिवस कसे असणार आहेत याची झलक बघत होतो.
दोन ते अडीच तास सायकल चालवली की एक ब्रेक झालाच पाहिजे असा आमचा नियमच झाला होता. चिंचा खाण्याचा कार्यक्रम आटपतोय , तोच एक नारळ पाणीवाला दिसला आणि ब्रेक झालाच पाहिजे असा प्लान झाला. नारळ पाणीवाला अण्णा शबरीमलाचा भक्त होता.
9
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अण्णा बरीच वर्षे मुंबईत राहिल्या कारणाने चांगले मराठी बोलत होता. मग तर काय आमच्या गप्पा अजूनच रंगल्या. त्याच्याबरोबर गप्पा मारताना शबरीमला बद्दल अधिक माहिती मिळाली. शबरीमलाचे भक्त काळे कपडे का घालतात ? शबरीमला यात्रा काय असते? त्याचे रीतिरिवाज आणि नियम , एकूणच आण्णाने आम्हाला भरपूर माहिती सांगितली.
नेमके त्याच वेळी शबरिमला महिला प्रवेश आंदोलन जोरदार सुरू होतं. त्याची प्रतिक्रिया परखड पण एका साध्या सर्वसामान्य भाविकाची होती. विषय थोडा गंभीर असल्याने आणि आम्हाला त्यातली जास्त काही माहिती नसल्याने, आम्ही जास्त काही बोलणे योग्य नह्वते. मग इतर विषय मदतीला धावून आले. जसे की कुठून आलात ? कुठे चाललात? काय काय मुक्कामाची ठिकाणे, वगैरे वगैरे नेहमी प्रमाणे तेच प्रश्न, तीच उत्तरे. आमचा कन्याकुमारीचा प्लॅन समजल्यावर, त्यांने सांगितलं की तुम्ही हलियार मार्गे जा. अण्णाचे एकंदर राहणीमान आणि तिथल्या सोयीसुविधा याच्याबद्दल गप्पा सुरू असतानाच फोटोसेशन झाले आणि थोड्या वेळानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
वाटेत ठिकठिकाण थांबून फोटोसेशन, व्हिडीओग्राफी सुरू होती. दुपारच्या जेवणासाठी हॉटेल मिळतेय का याचा शोध सुरू होताच. अशातच आम्ही दांडेली जंक्शनला येऊन पोहोचलो. दांडेली मधील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट या ठिकाणापासून जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर आत मध्ये होती. म्हणजे आमच्यासाठी एक तासभर जाणे, जेवण ब्रेक आणि परत एक तास बाहेर येणे. यामध्ये एकंदर तीन तास गेले असते आणि त्यामुळे पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागला असता.
नेहमीप्रमाणे चर्चा करून पटकन असा निर्णय घेतला की दांडेलीतुन बाहेर पडू, जिथे एखादे हॉटेल दिसेल तिथे नाश्ता किंवा हलकेसे जेवण घेऊन पुढे निघू.
एकंदरच वातावरण आणि आजूबाजूची हिरवीगार वनराई बघून सायकल चालवायला मस्त मजा येत होती. आम्ही दांडेली जंगलातून बाहेर पडलो आणि भगवती नावाच्या एका गावाजवळ पोचलो, तोपर्यंत संध्याकाळचे चार वाजत आले होते. छोटेसे हॉटेल दिसले आणि आम्ही तिकडे शिरलो. ते हॉटेल पेक्षा गावातले एक छोटेसे घर होते. शेव, चिवडा आणि चहा असा नाश्ता झाला. आम्ही आता मुक्कामाला जवळपासचे ठिकाण कुठले यावर चर्चा करत होतो, इतक्यात एक जण आमच्या जवळ येउन मराठीत विचारु लागला. कुठून आला ? कुठे निघाला? वगैरे दरवेळीचे ठराविक प्रश्न, त्याच्या बरोबर बोलताना समजले की तो इथे एका गेस्टहाऊसवर कुकचे काम करतो आणि भगवती गावात चिकन न्यायला आला आहे.
तो मुलगा सोलापूरचा होता, तिथल्याच एका धरणाच्या साइटवर कामाला होता. तो आम्हाला आग्रह करू लागला, तुम्ही माझ्यासोबत चला, गेस्टहाऊसला राहायची सोय करतो, जेवण बनवतो. पण तुम्ही चला. त्याला कसाबसा समजावला आणि सांगितले की आत्ता नको कारण धरणाकडे जाणारा रस्ता खराब आहे आणि रात्री-अपरात्री सायकलला काही झाले तर आम्ही धड तुझ्याकडे पण येऊ शकणार नाही की परत या गावात पण पोहोचू शकणार नाही. त्याला आमची अडचण समजली आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन गेला.
भगवती गावचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सिद्दी लोक आहेत. भगवती गावचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सिद्धी लोक आहेत. भारतात थोड्याच ठिकाणी सिद्धी शिल्लक आहेत. यांचे पूर्वज कधी एकेकाळी आफ्रिकेतून आले. आपल्यासाठी सिद्धी म्हणजे जंजिरा किल्ला आणि त्याच्या संदर्भातल्या ऐतिहासिक गोष्टी. पण आज त्यांना बघताना ते आपल्यापेक्षा वेगळे दिसतात हे जाणवत होतं. त्यांची चेहऱ्याची ठेवण, जडणघडण आफ्रिकन लोकांसारखी आहे. एक दोघांसोबत बोलायचा प्रयत्न केला, पण भाषेचा अडसर आल्याने जास्त काही बोलता आले नाही.
आमचा हा नाश्ता ब्रेक जवळपास तासभर सुरू होता, त्याच वेळी पीटर, सरपंच आणि गुरुजी मुक्कामाच्या जागेची शोध मोहीम राबवत होते.
सासा समूहातून शेफ केडी आमच्या ठिकाणापासून जवळपास उपलब्ध असलेली हॉटेल आणि त्यांचा नंबर पाठवत होता. एक - दोन ठिकाणी फोनाफोनी झाली पण जागा उपलब्ध नाही किंवा एकच रूम आहे असा प्रतिसाद मिळाला. शेवटी येल्लापुरच्या इथले एक हॉटेल श्री संकल्प यांचा नंबर मिळाला. त्यांना फोन केला आणि चौकशी केली. त्याने रूम उपलब्ध आहेत असे सांगितले. आम्ही त्यांना कन्फर्म केलं. हॉटेलचा पत्ता, अंतर चौकशी केली आणि त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार भगवती गावापासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर होते. आम्ही आता निवांत झालो होतो, मुक्कामाची सोय झाली. आता पाच वाजताहेत पंचवीस किलोमीटर म्हणजे सहा साडेसहा पर्यंत आपण हॉटेलवर पोहोचतोय.
अजून एक एक चहा, थोडे फोटोसेशन, व्हाट्सअप अपडेट झाल्या आणि आम्ही बाहेर पडलो.
दोन्ही बाजूला मस्त झाडी आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. मी पुढे चाललो होतो, सरपंच, गुरुजी आणि पीटर मागे-मागे येत होते. रस्ता सुनसान, शांत आणि हळू पसरणारा संधिप्रकाश जबरदस्त वातावरण वाटत होतं.
जवळपास दहा मिनिटे माझ्या पाठीमागे कोणीच आलं नाही म्हणून मी एका शेड जवळ उभा होतो. जंगलातून चोरटी लाकूड वाहतूक होऊ नये म्हणून तिथे चौक्या आहेत. रात्री ते रस्ते बंद करतात, ट्रक किंवा इतर गाडी आली, तर तुमचा परवाना दाखवायचा आणि मगच चौकीदार गेट उघडतात. थोड्याच वेळात सरपंच आणि पीटर सायकल ढकलत येताना दिसले. आणि माझ्या लक्षात आले कुणाचीतरी सायकल पंचर झाली आहे. दोघे जवळ येतात तोपर्यंत गुरुजी जवळ आले. सरपंच आणि पीटर दोघांच्या सायकली एकाच खड्ड्यात पंचर झालेल्या होत्या. पटापट चाकं काढून पंक्चर ट्यूब काढल्या आणि नवीन ट्यूब टाकल्या.
12
ट्रीप मधल्या पंक्चरचा सिलसिला सुरू झाला. आतापर्यंत हात काळे झाले नह्वते, आता सुरुवात तर झाली. मजा-मस्ती, फोटोसेशन करत करत चाकं लावून झाली. हे सर्व आवरता आवरता सहा-साडेसहा झाले आणि मुक्काम अजून लांब होता. प्रत्येकाकडे पुढचा-मागचा लाईट होता. लाईट लावून सर्वजण एका पाठोपाठ एक सायकल चालू लागलो. कारण परत जर कोणाची सायकल पंचर झाली तर मग अजूनच मजा आली असती.
पूर्ण अंधार, काळोख आणि फक्त चार मिणमिणते लाईट एका पाठोपाठ चालले आहेत, बघायला भारी वाटत होतं. आम्ही मोठ्याने गाणी म्हणत, ओरडत जंगलातून चाललो होतो. अंधार असल्यामुळे रस्ता चढ आहे की उतार, चढ असेल तर किती आणि उतार असेल तर किती. काही काही समजत नव्हते, फक्त धर हँडल , मार पँडल एवढी एकच गोष्ट समजत होती. एक तासाभरात घरं, दुकानं दिसू लागली आणि लक्षात आलं की आपण गावाच्या जवळ पोहोचलो आहोत. पण मघाचा एक तास जी काय मजा , अनुभव आला, तो केवळ अविस्मरणीय होता.
हॉटेल ला फोन करून पत्ता आणि रस्ता विचारून घेतला. ते गावाच्या दुसऱ्या बाजूला होतं. यल्लापुर शहर/गावाच्या मधून जाऊन एकदाचे हॉटेल श्री संकल्पला पोचलो.
आम्हाला वाटले होते सहा साडेसहा पर्यंत पोहोचू, ते आम्ही आठच्या दरम्यान पोचलो होतो. रूमवर जाऊन मस्त फ्रेश होऊन. तिथल्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवलो. परत रूम वर येताना हॉटेल मॅनेजर भेटला, रीतीप्रमाणे चौकशी झाली. त्यांनी एक रस्ता सुचवला जो आम्हाला गोकर्ण मुरुडेश्वरला पोहोचवेल आणि गर्दी, वर्दळ नसल्यामुळे सायकलिंगला मजा येईल अशी खात्री दिली.
12
थोडा वेळ घरच्या लोकांसोबत फोनवर बोलणं झाल्यानंतर, सासा समुहाचे प्रसाद दाते उर्फ मोसादाते यांच्याशी व्हिडीओ कॉलवर गप्पाटप्पा झाल्या.
आज दिवसभराच्या प्रवासातील अनुभवांमुळे हे नक्की झाले होते कि जे काही स्थानिक नागरीक माहिती सांगतील, त्यांचं नक्की ऐकायचं. कारण गुगल मॅप पेक्षा त्यांची माहिती जास्त बरोबर आणि उपयुक्त असते.
दिवसभरातल्या गमतीजमती, किस्से बोलत करत रुमवर पोहोचलो आणि मेसेज व्हाट्सअप वाचत, रिप्लाय करत कधी झोप लागली ते कळलेच नाही.
चार दिवस प्रवास सुखरूप आणि विना अडथळा पार पडला होता. पहिल्या दिवसापासून राहायची, जेवणाखाण्याची सोय एकदम मस्त होत होती.
13
आम्ही कुठेच ऍडव्हान्स बुकिंग न केल्याचा फायदा होता. जिथे वाटले, तिथे थांबा. जे वाटले, ते खा. अजिबात टेन्शन नाही. दिवसभर १००-१२५ किमी सायकल चालवल्यावर संध्याकाळी जे मिळेल ते सुग्रास लागायचे, कॅलरी बिलरी नो टेन्शन.
एकंदरच माहोल असा होता की खाओ पिओ, सायकल चलाओ...आराम...रीपीट....

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

22 Apr 2020 - 5:48 pm | चौथा कोनाडा

वाह, हा ही भाग सुंदर !
भटकंती वर्णन व सायकलिंगचे फोटो एक नंबर !
कित्तूर किल्याच्याचे फोटो भारी आहे. पहिल्यांदाच पहिला हा किल्ला !
केळीवाल्या हॉटेलचा फोटो आकर्षक !

पुभाप्र.

कंजूस's picture

22 Apr 2020 - 8:06 pm | कंजूस

आवडले लेखन. आणि काय ते कर्नाटक घाट रस्ते अहाहा!!!

चौकस२१२'s picture

23 Apr 2020 - 4:48 am | चौकस२१२

सिद्धी लोक आहेत
त्यांचे काही फोटो? कोणती भाषा बोलतात?

प्रचेतस's picture

24 Apr 2020 - 7:30 am | प्रचेतस

ते सिद्धी नसून सिद्दी आहेत. सिद्दी म्हणजे हबशी, हबसाण-एबिसीनियातून आलेले. कोकण प्रांतात ह्यांनी भरपूर उत्पात माजवला होता. जंजिरा ह्यांनीच बळकावला. आजदेखील सिद्दीचे वंशज मुरुड जंजिरा प्रांतात आहेत. पूर्वी जरी ह्यांच्या राज्यकारभाराची भाषा फारशी अरबी अशी मिश्रित असली तरी आजचे त्यांचे वंशज मराठी कोकणी हिंदी मिश्रित भाषेत बोलतात.

चौकस२१२'s picture

24 Apr 2020 - 8:16 am | चौकस२१२

हो बरोबर

शेखरमोघे's picture

23 Apr 2020 - 8:51 am | शेखरमोघे

लिखाण आवडले. पुढील प्रवासवर्णनाच्या प्रतिक्षेत.

चन्नम्मा यांचा पराक्रम कितीतरी मोठा आहे : याबद्दल मुळीच दुमत नाही. पण राणी चन्नम्माने जरी "इन्ग्रज सरकार" विरुद्ध युद्ध पुकारले होते तरी, प्रत्यक्षात "इन्ग्रज सरकार" म्हणून राणी चन्नम्माबरोबर लढणार्‍या फौजा बर्‍याचशा सान्गलीकरान्च्या होत्या आणि या विजयाबद्दल इन्ग्रज सरकारने सान्गलीकराना आणखीच्या काही सवलती, इनामे आणि जमिनी दिल्या.

भगवतीचे "सिद्धी": आपल्याला बहुतेक "शिद्दी" म्हणायचे आहे (जसे जन्जिर्‍याचा शिद्दी). गुजरातेतही गीर जन्गलाजवळ शिद्दी वस्त्या आहेत.

Nitin Palkar's picture

23 Apr 2020 - 3:01 pm | Nitin Palkar

लेख आणि फोटोज दोन्ही सुंदर. पुभाप्र.

मस्त लेख, मस्त प्रतिसाद.

प्रचेतस's picture

24 Apr 2020 - 7:34 am | प्रचेतस

हा धागा खूपच लवकर आल्याने धन्यवाद. मला वाटलेलं वर्षभर थांबावे लागतेय की आता पुढच्या भागासाठी.

सुरेख आणि तपशीलवार वर्णन.

चौकटराजा's picture

24 Apr 2020 - 12:24 pm | चौकटराजा

१९७४ मध्ये माझ्या ओळखीचा एक मुलगा व त्याचे मित्र साध्या सायकली घेऊन पुणे ते कोलम्बो असे गेले होते. त्याकाळी अशी मोहिम विरळाच होती. त्यापूर्वी माझे एक मेहुणे १९५८ साली ज्यावेळी भारत देशात रिक्षा उत्पादन होत नव्हते त्यावेळी पुणे ते श्रीनगर रिक्षा घेऊन गेले होते. आता उत्तमोत्तम सायकली, वाटेत रहाण्याच्याही व खाण्याच्याही सोयी यामुळे अशा मोहिमा आता वरचेवर केलेल्या दिसतात. याचा अनुभव काही वेगळाच. आपण सर्वानी तो मस्त एन्जॉय केलेला दिसतोय !

जेम्स वांड's picture

24 Apr 2020 - 3:57 pm | जेम्स वांड

आजच चारही भाग वाचून काढले, फर्मास ट्रिप आहे ही, माफ करा ट्रिप नाहीच सायकल स्वारी म्हणायला हवी दक्षिण दिग्विजयाची. ह्या अगोदर मायबोलीवर आशुचॅम्प आणि त्यांच्या सायकल गटाने केलेली पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम आणि त्यांनीच नंतर केलेली जम्मू ते पुणे सायकल मोहीम वाचली होती (आयकॉनिक होती ती, जम्मू ते पुणे राईड फॉर पीस, मेरिडा वगैरेंच्या स्पॉन्सररशीपनं केली होती बहुतेक), आता ही तिसरी वाचतोय पुणे कन्याकुमारी,

तुमच्या लिखाणाची बेस्ट पावती देऊ ?

मी म्हणजे बऱ्यापैकी गोल गरगरीत, व्यायाम अन आमचा संबंध गाव सुटलं अन कायमचा सुटला, आता चार पावले चालणे होत नाही, पण ही सिरीज वाचून मनात आलं काय हरकत आहे नवीन पुन्हा प्रयत्न करायला ?? लॉकडाऊन आहे तोवर घरीच सूर्यनमस्कार घालावेत चार, टेरेसवर ब्रिस्क वॉकिंग करावे, ही आग तुम्ही जर एका आळशी गोळ्याला किमान डोक्यात लावू शकताय तर मला वाटतं मी माझ्या औकातीत ह्याहून मोठी पावती देऊ शकणार नाही....

(पर-प्रेरित) वांडो

जेम्स वांड's picture

24 Apr 2020 - 4:00 pm | जेम्स वांड

त्या किल्ल्याबाहेर नाश्ता केलात तिथं किती केळी टांगून ठेवली आहेत बाबाऊ!! हॉटेल पूर्ण केळेमय केले आहे.