मी, woodland चे बूट आणि Man Vs Wild

चिंतामणी करंबेळकर's picture
चिंतामणी करंबेळकर in भटकंती
22 Apr 2020 - 1:17 pm

मी, woodland चे बूट आणि Man Vs Wild

आंबोली मध्ये माझ्या मित्राचं रिसॉर्ट आहे; हेमंत चं Whistling Woods. आज हेमंतला भारतातील एक आघाडीचा फुलपाखरू तज्ञ म्हणून बरेच लोकं ओळखतात मध्यंतरी त्याचं फुलपाखरांवरचं एक पुस्तक पण प्रकाशित झालं. माझी आणि त्याची ओळख नक्की कधी म्हणजे नक्की किती साली वगैरे झाली ते लक्षात नाही पण अगदी सोपं करून सांगायचं झालं तर जेव्हा हेमंतकडे आणि माझ्याकडेही SLR नव्हता तेव्हा पासूनची.... आमच्या एका कॉमन मित्रामुळे ओळख झाली हे नक्की. तर..... त्यावेळेस माझी निसर्ग भ्रमंती ला सुरुवात व्हायची होती. तेव्हा हेमंत कडे गेलो असताना त्याने आम्हा मित्रांना तिथल्या जंगलात फिरवून आणलं होतं, साप वगैरे दाखवला होता, त्यामुळे एकूणच जंगलाबद्दल सॉल्लिड थ्रिल वाटायला सुरुवात झाली होती.
त्याच सुमारास डिस्कवरी चॅनेल वर Man Vs Wild सुरू झालं होतं त्यातल्या Bear Grylls चे adventure पाहून तर फारच भारावून गेलो होतो.
पावसाळ्याचे दिवस होते मी आणि माझे आई-डॅडी आंबोली ला आलो होतो, त्यांच्या बरोबर नेहमीचे ठरलेले पॉईंट बघून झाले होते. हेमंत मला म्हणाला इथे जवळच एक धरण आहे तिथे कधी कधी सांबर येतात आणि फुलपाखरे पण दिसतात तिकडे जाऊ, तिथे थोडं डोंगरात चढायचं असल्याने मी आणि हेमंत दोघेच जायचं ठरलं,त्याच्या पल्सर वर आम्ही तिथे गेलो. मी Man Vs Wild मुळे भारावून गेलो असल्यामुळे एकदम भारी दिसणारे woodland चे button सोल असलेले बूट घेतले होते, आम्ही छोटा डोंगर चढून वर गेलो. धरणाचं छान पाणी दिसायला लागलं होतं वातावरण पण नुकताच पाऊस पडून गेल्या मुळेखूपच छान होतं, माझ्याकडच्या छोट्या कॅमेऱ्याने मी फोटो काढत होतो. हेमंत पुढे चालत होता आणि मी त्याच्या मागोमाग थोडं पुढे गेल्यावर छानसा पावसाळी ओढा आला पाणी स्वच्छ होतं, ओढा खोल नव्हता पण त्याची रुंदी जास्त होती एका ढांगेत ओलांडता येण्या इतका नव्हता, हेमंत नि साधी slipper घातली असल्याने तो पाण्यात पाय टाकून पलीकडे गेला ओण मी अलीकडेच थबकलो म्हणलं एवढे नवीन बूट आहेत पाण्यात घालून कशाला ओले करायचे आणि खराब करा.. बूट काढले तरी पायाला चिखल लागून आत जाईल म्हणलं नकोच . मग म्हणलं bear grylls करतो तसं काहीतरी करून बघावं. विचार केला थोडं आजू बाजूला जाऊन पाहू ओढ्याच पात्र छोटं झालं असेल तर तिथून ओलांडू ओढा, म्हणून हेमंत ला म्हणालो तू हो पुढे मी बघतो दुसरीकडून येता आलं तर, त्यावर तो म्हणाला कुठे एवढा विचार करतोस बूट झाले ओले तर झाले ये इथूनच. पण मला काहीतरी adventure करूनच अडथळा पार करायचा होता.. मग बूटाचा उपयोग नको का व्हायला... त्यामुळे मी त्याच्या कडे दुर्लक्ष केलं. आणि मी धरणाच्या दिशेला जिथे ओढा धरणाच्या पाण्यात जात होता तिथे गेलो तर कमाल साधारण तीन चार फुटाचा खड्डा होता तिथे तो ओढा खाली पडत होताना पुढे त्याचं पात्र अगदीच महाबजे दीड दोन फुटाचं झालं होतं.... bingo!! ... Man Vs Wild पाहण्याचा मला अभिमान वाटला , एक छोटी उडी खाली आणि दुसरी उडी ओढ्याच्या पलीकडे की माझे बूट ओले होण्यापासून वाचणार होते!! आणि आता बूट न ओले करता टास्क पूर्णत्वाला जाणार ह्या कल्पनेने मी खुश झालो.
ओढा जिथून खाली पडत होता तिथून धरणाचं पाणी अगदी १०-१२ फुटांवरच होत. मी मोठ्या झोकात उडी मारली............... आणि.............. सिनेमात दाखवतात ना तसे अगदी तस्सेच सगळे आवाज थांबले ........ आणि मी quick sand मध्ये पडलो होतो, पडलो कसला ऊडीच मारली होती... मी गुडघाभर वाळूत रुतलो होतो. काही क्षण मी blank च झालो होतो.. भानावर येऊन नीट पाहिलं तर मी खरं तर धरणाच्या पाण्याच्या पात्रातच होतो जिथे ही quick sand ओढ्यानी वाहून आणली होती. ओढ्यानी वाहून आणलेली ही वाळू वरून दिसायला कोरडी होती पण आतून पूर्णपणे भुसभुशीत होती. आणि वाळू खाली किती खोल आहे काहीच माहीत नव्हतं, वर पाहिलं तर जिथून उडी मारली होती तो भाग माझ्या डोक्याच्या वर दोन अडीच फूट होता. Virtual गुरू श्री श्री bear grylls यांचे धडे आठवले, त्यामप्रमाणे मी वरच्या झाडाच्या आधाराने वर यायला बघत होतो. पण ती झाडं, झाडं कसली पावसाळ्यात उगवतात ती झुडुपंच होती ती खरं तर त्याची काटकी धरून ओढली होती, व्हायचं तेच झालं काटकी मोडून हातात आली. आणि तेव्हढ्या झालेल्या हालचालींनी मी आजून ३-४ इंच वाळूत खाली गेलो होतो..... आता काय करायचं... माझी धडधड आणून वाढली होती... अशी situation आली तर काय करायचं ह्याचे धडे अजून पर्यंत grylls सरांनी दिले नव्हते ना.... आता पर्याय एकच होता हेमंत ला हाका मारणे!! मी त्याला हाका मारल्या पण हेमंत कडून काहीच उत्तर नाही... मला भीती वाटत होती की हेमंत पुढे निघून गेला असला तर त्याला माझा आवाज तरी ऐकू जाईल का?? पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता... M-v-W मध्ये तो पर्यंत quick sand मधून बाहेर कसं यायचं हे ही दाखवलं नव्हतं ना...
मी अजून मोठया मोठ्याने हेमंत ला हाका मारल्या. माझ्या नशिबाने हेमंत ला हाक ऐकू गेली व त्याला मी कुठेच दिसेना कारण मी खड्यात होतो ना.....पण हेमंत आवाजाच्या दिशेने शोधत आला... मला आठवतंय तो वरून डोकावला आणि विचारलं काय रे खाली काय करतोयस??? मी म्हणलं अरे वर घे मला आधी मी खाली रुतत चाललोय, हेमंत लगेच माझ्या हाताला धरून वर ओढू लागला, पण एक गोष्ट लक्षात आली की तळपायाकडे वाळू चांगलीच घट्ट होती, मला वाटलं आता माझा नवीन बूट खालीच वाळूतच अडकून पडणार आणि नुसताच माझा पाय बाहेर येणार... पण म्हणलं हेमंत ओढतोच आहे ना मला रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेच ना मग थोडा पाय हलवून बघु तर खरं... मग मी पाऊल हलवलं, आणि मी वर ओढला गेलो आणि काय आश्चर्य माझ्या बरोबर माझे बूट पण वर आले होते !!!! हेमंत नी मला माझ्या बुटासकट वर काढलं होतं.... मी पूर्ण चिखलाने भरलो होतो... ( चला man vs wild सारखं काहीतरी झालं म्हणायचं) आणि माझे बूट नुसते ओलेच झाले नव्हते तर चिखल आणि वाळूने भरले होते . मग आम्ही परत त्याच ठिकाणी आलो जिथे मला पाण्यात पाय टाकायचा नव्हता, त्याच पाण्यात मी ते चिखलाचे बूट धुतले, माझे कपडे धुतले आणि गप गुमान रूम वर परतलो. जीव वाचल्याचा आनंद होता पण बूट खराब झाल्याचं दुःखही ... पण थ्रिल मात्र पुरेपूर झालं...

त्या वेळेस माझं वजन आत्तापेक्षा बरंच कमी असल्याने हेमंत मला वर ओढू शकला होता आत्ताचा मी असतो तर हेमंत पण खाली पडला असता... यातून तुम्ही काय बोध घ्यायचा तो घ्या पर्याय देतोय
१.. बूट ओले झाले तर झाले
२.. Man vs Wild मध्ये दाखवतात तसं
सगळंच करायला जाऊ नका
३.. वजन कमी ठेवा म्हणजे वर ओढायला सोपं जाईल
तळ टीप: हेमंत सारखा मित्र बरोबर घेऊन जायला विसरू नका हे नक्की

- चिंतामणी करंबेळकर

प्रतिक्रिया

मोदक's picture

22 Apr 2020 - 1:24 pm | मोदक

हा हा हा...

इतकी काळजी होती तर बुटं हातात घेऊन ओढा ओलांडायचा आणि पुढे जाऊन परत पायात घालायचे - पण.. आळशास दुप्पट... :D

नशीब.. शर्ट पँट नवीन नव्हती.. ;)

चिंतामणी करंबेळकर's picture

22 Apr 2020 - 1:31 pm | चिंतामणी करंबेळकर

परत चिखल लागला असता रे, आणि adventure झालं नसतं ना

आयला धमालच आहे. मलाही पूर्वी कुणी सांगितलं होतं की तुला भटकंती आवडते ना तर ग्रिलचे एपिसोड बघ. मग वेळ शोधून लावला एक. पण त्याला ( आणि त्याच्या फोटुग्राफर टीमला) प्रथम एका हेलिकॉप्टरने जंगलात कुठेतरी सोडण्यात येते आणि तिथून पार बाहेर यायचे असते. म्हटलं हे प्रकरण हाईटेक आहे. आपल्यासाठी नाही. शिवाय फक्त अर्धा लिटर पाणी. आपल्याला पाच लिटर पाणी पुरत नाही. सह्याद्रीत पाण्याची बोंब १५ सप्टेंबरमध्येच सुरू होते.
----------
लेख मजेदारच झालाय.

मन्या ऽ's picture

23 Apr 2020 - 10:17 am | मन्या ऽ

लेख मजेशीर झालाय..
तरी ऍडव्हेंचर च्या नावाखाली जिवाच काही बरवाईट झाल असतं तर? हा प्रश्न मनात डोकावुन गेलाच.

प्रशांत's picture

24 Apr 2020 - 1:20 pm | प्रशांत

असेच लिहत रहा..

वेगळाच अनुभव आणि त्याचे उत्तम वर्णन, त्यावेलच्या विचारधारेसकट !!
तुम्ही जरी सन्कटातून सुटलात तरी इतके काळजी घेतलेले बूट त्या आफतीतून शाबूत राहिले का?

चौथा कोनाडा's picture

25 Apr 2020 - 11:59 am | चौथा कोनाडा

थरारक धाडस ! मजा आली वाचायला !
आपण कष्टाने घेतलेल्या महागड्या वस्तूंना जीवापाड जपतो आणि जीवावर बेतलं की असे साक्षत्कार होतात.
पुलेप्र.

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 7:46 pm | जेम्स वांड

लहानपणी अश्या कित्येक अश्या गोष्टी असतात ज्या आपण हौसेने घेतो पण त्या पुरवून वापरण्याच्या नादात बऱ्याचवेळा स्वतःचे हसे करून घेतो