काम

निमीत्त मात्र's picture
निमीत्त मात्र in जनातलं, मनातलं
15 Nov 2008 - 7:33 am

काम करणं अथवा न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. अर्थात काम करणारे आणि काम न करणारे असे समाजात ढोबळ मानाने दोन गट असतात. परंतु एवढ्या ढोबळ वर्गीकरणातून हा विषय पूर्ण होऊ शकतो असं मला वाटत नाही.
काम करणाऱ्या गटात अनेक उपगट असतात. आवडीनं काम करणारे, मनाविरुद्ध काम करणारे, काम एन्जॉय करणारे, मन मारून काम करणारे, सदा हसतमुख काम करणारे, रडत रडत काम करणारे, वेगानं काम करणारे, हळूहळू काम करणारे, आपणहून भरपूर काम करून नंतर त्याचीच तक्रार करणारे, केलेल्या कामाचा मोठा गाजावाजा करणारे, गुपचूप कामाचा डोंगर उपसूनही हूं की चूं न करणारे, आपलं काम करून इतरांचंही काम करणारे, आपल्यापुरतं काम करणारे.... असे कितीतरी उपगट करता येतील.
काम न करणाऱ्यांचे तर नक्‍कीच याहून जास्त उपगट असतील. काम थेट नाकारणारे, आपलं काम टाळणारे, आपलं काम दुसऱ्यावर ढकलणारे वा दुसऱ्याच्या गळ्यात बांधणारे, काहीच न करताही खूप काही केल्याचा आभास निर्माण करणारे, किरकोळ काम समोर पसरून ठेवून त्यातच दिवसभर काढणारे, महत्त्वाचं पण कठीण काम टाळण्यासाठी हलकं काम घेऊन बसणारे, कामाचं स्वरूप वारंवार बदलून मागणारे, काम करायचं नसल्याने पद्धतीतील दोष काढून त्यावरच चर्चा करत बसणारे, इतरांच्या चुका उगाळत बसणारे, विशिष्ट कामाच्या पद्धती ठाऊकच नसल्याचा कांगावा करणारे, काम टाळण्याच्या हेतूने नवीन पद्धती शिकण्याचे टाळणारे, अमुक काम आपल्याला कसं जमेल हे बघण्याऐवजी ते कसं जमणार नाही यावर लक्ष केंद्रित करणारे... ही यादी न संपणारी आहे.
आपण स्वत:ला कोणत्या गटात बसवलं आहे याचा विचार प्रत्येकानं करायचा असतो. हा विचार करतानाच आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, कुठून कुठं जायचं आहे हाही विचार सोबत असला पाहिजे. ही प्रक्रिया जर आपण करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात केली तर पुढची वाट स्वच्छ दिसू लागते. काम करायचं की नाही करायचं असले प्रश्‍न मनात उरत नाहीत.
काम करणारे पुढं जात राहतात. काम न करणारे वा काम टाळणारे आहे तिथंच उरतात; जग पुढं जातं, ते मागं पडतात. आजच्या तीव्र स्पर्धेच्या जमान्यात एखादं पाऊलही मागं पडून चालत नाही. पुढं जाणाऱ्याचा वेग वाढतच असतो, एकदा आपण एक पाऊल जरी मागं पडलो तरी नंतर वेग वाढवूनही पुढच्याला गाठता येत नाही. कारण आपण जेवढा वेग वाढवू त्याहून अधिक वेग पुढचा वाढवतो. आधीच पुढं गेल्याचा ऍडव्हान्टेज पुढच्याला असतो. मागं पडलेल्याला तो ऍडव्हान्टेज कधीच मिळत नसतो.
म्हणून आजच्या जगाचा नियम काय तर आपल्या वाट्याला आलेलं काम वेगानं, कार्यक्षमतेनं करायचंच. त्याचबरोबर नवीन काही काम करता येण्यासारखं आहे का हे बघून तेथेही आपलं कर्तृत्व दाखवायची संधी साधायची. हे सारं करत असताना आपण फक्‍त आपलीच प्रगती करत असतो असं नाही. अशा सकारात्मक वृत्तीनं काम करणाऱ्याच्या सभोवतालचं वातावरणही सकारात्मक बनतं. तो माणूस आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या सहकाऱ्यांवर प्रभाव पाडत असतो. त्यामुळे संपूर्ण वातावरणच बदलून जातं. अशा रीतीनं काम करणारा एखादा विभाग प्रमुख असेल अथवा त्याच्या अधिकाराखाली काही जणांची टीम असेल तर त्याच्या या सकारात्मक वृत्तीचा चांगला परिणाम खालपर्यंत जाणवतो. यातून तो अधिकारी आपली प्रगती करता करता जे त्याच्याबरोबर असतात त्यांनाही त्याच्या प्रगतीचा लाभ मिळतो. काम वेगानं आणि कार्यक्षमतेनं उत्तम प्रकारे केलं तर त्याचे जे अगणित फायदे आस्थापनाला मिळतात, त्याच प्रमाणात ते फायदे त्या कार्यक्षम अधिकाऱ्याला मिळतात आणि साहजिकच ते फायदे त्या टीममध्येही पोहोचतात.
पण हे सारं लक्षात घेतलं तर! कामाचं महत्त्व योग्य वेळी ओळखणं आणि त्यानुसार स्वत: ला प्रक्रियेचा भाग बनवणं हेही कौशल्याचं काम असतं. सर्वप्रथम कामाचं महत्त्व आपल्या लक्षात आलं पाहिजे. एकदा महत्त्व लक्षात आल्यानंतर त्याकडे आपण पुरेशा सकारात्मक वृत्तीनं बघितलं पाहिजे. आपण केलेल्या कामाचा दुसऱ्याला काय फायदा मिळतो याचा विचार करण्याऐवजी आपल्या कामातून आपण कसं मोठं व्हायचं आणि आपण मोठं होता होता आपल्या सहकाऱ्यांना कसं मोठं करायचं यावर लक्ष केंद्रित केलं तर करिअरचा ग्राफ उंचावत जाऊ शकतो. केवळ आपल्या नव्हे तर संपूर्ण टीमच्या करिअरचा ग्राफ भक्‍कम बनू शकतो.
खरं तर काम करत जाणं अगदी साधं-सरळ असतं. काम न करण्यात खूप कटकटी असतात. काम कसं करायचं याचं नियोजन सोपं असतं. काम न करण्याचं नियोजन गुंतागुंतीचं बनतं. काम करण्यात कर्तृत्व असतं, हुशारी असते. काम न करण्यामागं आपली निष्क्रियता असते, अपयश असतं.
आपलं आयुष्य आपणच घडवायचं असतं. काम करू इच्छिणारा देवाकडं यश मागतो आणि काम करू न इच्छिणारा देवाकडं अपयश मागतो. देव दोघांनाही तथास्तु म्हणतो.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरभाषामुक्तकप्रकटनविचारमाध्यमवेधआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

काळा डॉन's picture

15 Nov 2008 - 8:40 am | काळा डॉन

लेख आवडला!
-काळू