रिक्षा आणि सरकार!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
31 Mar 2020 - 8:49 am

सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात, पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे लक्ष एखाद्या संकटाचा सामना करण्यावर केंद्रित झालेले असतानाच असे कसे घडले असेही अनेकांना वाटून गेले. त्यावरही कडी म्हणजे, या घटनेत नेमके काय नष्ट झाले असा, जुन्या घटनेत अधोरेखित झालेलाच सवाल पुन्हा एकदा पुढे आला.
एका गंभीर समस्येमुळे अस्थिरता आणि अनिश्चिततेचा भस्मासुर अवघे भविष्य कवेत घेऊ पाहात असताना असे घडणे हे अघटितच! पण तरीही ते घडले. ‘हा अपघात असू शकतो’ असा सहज विचार करावयासही फारशी कुणाची तयारी जाणवली नाही.
मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी लागलेल्या त्या आगीमुळे, आता राजकीय चर्चांनाही ऊत येईल. अशा स्थितीत, अस्थिरतेचा सामना करण्याचे मनोबल कायम राखणे हे सत्ताधाऱ्यांपुढे मोठे नवे आव्हान असेल. अगोदरच ठाकरे सरकार ही तीनचाकी रिक्षा आहे. एका किमान समान कार्यक्रमाच्या इंधनावर ही रिक्षा ढकलण्याचे ‘शिव-धनुष्य’ उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर देण्यात आले आहे. हे सरकार चालविण्याची व अशाही परिस्थितीत राज्याच्या जनजीवनाचा किंवा दैनंदिनीचा तोल ढळू न देण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा असावी असे दिसते. अशा काळात तीनही चाकांनी एका गतीनेच नव्हे, तर एका दिशेने चालणे गरजेचे असते. प्रत्यक्षात मात्र, प्रत्येक चाक आपल्या आपल्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न सुरू असलेला दिसतो. सरकारने धोरण म्हणून एखादा निर्णय घ्यावा, शिष्टाचारानुसार नोकरशाहीने तो जाहीर करून अमलात आणण्याचे आदेश जारी करावेत आणि सत्तेवरील एका चाकाने त्याला टाचणी लावून दुसऱ्या चाकातील हवा काढून घ्यावी, असेही घडताना दिसू लागले आहे. कोरोनाच्या फैलावास आळा घालण्याच्या कठोर उपायांचा भाग म्हणून, या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या अंत्यविधीबाबत मुंबई महापालिकेने सरकारच्या वतीने काही ठोस निर्णय घेतला, आदेश जारी केले आणि एका मंत्र्याने तो निर्णय बासनात गुंडाळण्यास भाग पाडले.
मंत्रालयातील आग आणि मंत्र्याचा हस्तक्षेप या दोन भिन्न घटना. एकाच दिवशी घडल्या हा त्यातील समान धागा! अशा घटनांमुळे संशय वाढतो, आणि त्याचे निराकरण करण्यात वेळ व शक्ती वाया जाते. अशा कामात वेळ आणि शक्ती वाया घालविणे सध्या परवडणारे नाही. त्यामुळे अस्थिरतेत भर पडू शकते. ते टाळले नाही, तर किमान समान कार्यक्रम हा विनोद होईल. तसे झाले तर काय होते हे भूतकाळाने दाखवून दिले आहे. त्यामुळे निर्माण होणारी अस्थिरता वर्तमानकाळात परवडणारी नाही. म्हणून आता काहीही झाले, तरी ही तीनचाकी रिक्षा रेटत न्यावीच लागेल. ती जबाबदारी पार पाडणे हे ठाकरे यांची कसोटी असेल. एक चाकातील हवा काढून घेतली तर वाहन भरकटते. वेग मंदावतो. चालविण्याची व दिशा चुकू न देण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते. तेही करावे लागेल.
कारण बिघडलेले वाहन चालविण्यास दुसरे कोणी पुढे येईल अशी शक्यता नाही!
गाडी पुढे नेत रहावेच लागेल...

समाजप्रकटन