लगीनघाई

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
23 Mar 2020 - 10:13 am

लगीनघाई
------------------------------------------------------------------------------------------------

शिवानीचं लग्न मोडलं होतं - हुंडयामुळे ! ...
समाज शिक्षित झाला ; पण सुशिक्षित नाही. अजूनही नाही. मुली शिकल्या. विचार करू लागल्या. घराबाहेर पडल्या. नोकरी करू लागल्या .पण अजुनही मुलीची बाजू पडतीच . हुंड्याचा प्रश्न अजूनही ज्वलंतच ! आईबापांना कर्जात घालणारा . प्रसंगी खड्ड्यात घालणारा.

अभिराज एक चांगला मुलगा होता. इंजिनीअर. उत्तम नोकरी आणि पगार असलेला . देखणा आणि टापटीप राहणारा. मुख्य म्हणजे लग्नासाठी अगदी योग्य उमेदवार असलेला.
स्थळं बघण्याची सुरुवात झाली. याचे – त्याचे, नातेवाईकांचे निरोप येऊ लागले.
एकदा रात्री जेवताना त्याची आई म्हणाली ,” अरे, तू सारखा इंटरनेट - इंटरनेट करतोस, आजकाल त्याच्यावरही स्थळं मिळतात ना ? सुधाताईंच्या मुलीने त्याच्यावरच जमवलं म्हणे !”
“हो ?” त्याला सुधाताईंची मनवा आठवली . सुंदर अन स्मार्ट पोरगी ! पण त्याला तिच्याबद्दल कधीच , काहीच वाटलं नव्हतं . मग तो पुढे म्हणाला,” अगं , इंटरनेटवर भरपूर अशा साईट्स आहेत . “
“अरे, मग बघ ना. “
“ठीक आहे. बघू या उद्या . आता खूप उशीर झालाय.”

दुसऱ्या दिवशी रात्री जेवणं झाली .अभिने लॅपटॉप उघडला .आई होतीच शेजारी.
त्याने ' लगीनघाई ' या एका मॅट्रिमोनिअल साईटवर रजिस्ट्रेशन केलं .
तो एकेका मुलीचं प्रोफाइल स्क्रोल करू लागला .
पहिलाच फोटो पाहिल्यावर आई म्हणाली , " अरे , ही मुलगी चांगली वाटते " .
“हं हं ! थांब जरा ,सगळं पाहू दे .” त्याने माहिती पाहिली . “ अगं, ही तर युएसला असते. काय उपयोग ?”
तो दुसऱ्या फोटोपाशी थांबला . मुलगी खरंच देखणी होती.
“जरा मोठा कर बरं तो “ , आई म्हणाली .तिलाही झूम- बीम माहित झालं होतं एवढ्यात .
त्याने फोटो मोठा केला . त्यांना ती मुलगी जामच आवडली.
पण - तिच्या प्रोफाइलमध्ये लिहिलं होतं – ‘मुलाचे पालक बरोबर राहणारे नकोत !‘
त्यांनी डोळे मोठे केले !
प्रत्येक मुलीच्या बाबतीत काही ना काही प्रॉब्लेम होताच.
शेवटी एक मुलगी पहायचं असं ठरलं - शिवानी !
“अहो, बघा हो जरा. हे स्थळ कसं आहे ते ? “त्या नवऱ्याला म्हणाल्या.
त्याचे वडील म्हणाले , “ त्यात काय ? तुम्हाला पसंत आहे ना ? मग झालं तर ! मुलगी चांगली हवी, शिकलेली हवी आणि घरचे लोक चांगले हवेत , बस ! आणि काय हवं ?” मग ते पुढे म्हणाले, ” पोरीने लव्हमॅरेज केलं आणि आपलं नाव धुळीला मिळालं ; पण आता पोराचं लग्न तरी रीतसर ,वाजतगाजत, धामधुमीत होऊ द्या . तुम्हाला तरी वरमाई म्हणून कधी मिरवायला मिळणार ? “
हे मात्र खरं होतं . त्यांच्या डोळ्यांसमोर, त्यांचा वरमाई असण्याचा तो लग्नातला डौल आला ! ...

रीतसर ठरवून बघण्याचा कार्यक्रम झाला . अगदी कांदापोहे आणि चहाबरोबर . मुलीच्या घरी प्रसन्न वातावरण होतं .
फाल्गुन महिना . संध्याकाळी सोनेरी ऊन आणि शीतल हवा असण्याचे दिवस होते .
शिवानी पेटल पिंक रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर वाटत होती . तिच्या आत्मविश्वासपूर्ण वावरण्याने ती जास्त आकर्षक वाटत होती . अभिच्या आईला तर सून म्हणून ती एकदम आवडलीच !
पोहे छान होते . नक्कीच पोरीच्या आईने केले असणार - अभिच्या आईला वाटलं . पुन्हा पोहे घेऊन त्याचं कौतुक करणाऱ्या आपल्या मिस्टरांना त्यांनी डोळ्यानेच दटावलं .
खाणं-पिणं झालं, बोलणं झालं . दोन्ही घरची मंडळी खुशीत होती.

पण नंतर पुढची बोलणी जेव्हा झाली , तेव्हा अभिच्या वडलांनी हुंड्याचा विषय काढला . शिवानीच्या वडलांना ही गोष्ट पुसटशी अपेक्षित होतीच; पण ते मात्र त्याच्या पूर्ण विरुद्ध होते. त्यांनी स्वतःच्या लग्नात सासऱ्याकडून एक नवा रुपया घेतला नव्हता .
गाडी तिथे अडली ती अडलीच . आणि पुढे बोलणी फिसकटलीच.
ज्या क्षणाला शिवानीच्या बाबांनी ती गोष्ट आईला सांगितली, तसं तिच्या डोळ्यात पाणीच उभं राहिलं. तिला नवऱ्याचा जिद्दी, तत्वनिष्ठ स्वभाव माहिती होता.
शिवानीलाही धक्का बसलाच. लग्नाच्या उंबरठ्यावर असलेली तरुण मुलगी ती . मन हळवंसं झालेलं असतं…
आई - बाबा दोघेही मराठी मालिका बघण्यात गुंतले. तशी ती बेडरूममध्ये आली. आता काही तिला कोणी डिस्टर्ब् करणार नव्हतं.
तिने त्याला फोन केला...त्याला, ज्याच्यावर तिचं मनापासून, खरंखुरं प्रेम होतं !
एकमेकांच्या मिठीमध्ये त्यांनी कितीदा प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या .
' हॅलो ... आपल्याला लवकर पावलं उचलायला हवीत नाहीतर ? ... '
ती बोलत होती.
रोजच्या प्रमाणे दोघांचं संभाषण झालं. जेव्हा तिने फोन ठेवला तिच्या दुःखी चेहऱ्यावर थोडी का होईना आनंदाची छटा उमटली.
बाहेर बाल्कनीमधून मोठा चंद्र दिसत होता . होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसाचा . त्या बदामी चंद्राकडे पाहताना त्या युगुलाने ठरवलं होतं की ते त्यांच्या प्रेमाची होळी होऊ देणार नाहीत
त्यांचा प्लॅन ठरला होता. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न करण्यासाठी काही डेअरिंग करणं आवश्यकच होतं. अर्थात त्यांनी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं.

स्थळ - आळंदी देवाची. ज्ञानेश्वर माऊलीची.
एक छोटं मंगलकार्यालय . साधंसंच.
आळंदीमध्ये स्वस्तात लग्नं लावली जातात.जिथे लग्नाचा सगळा जामानिमा तयारच असतो. पोशाखापासून ते अगदी गुरुजींपर्यंत. जिथे अनेक लग्नं लावली जातात. फक्त मुला- मुलीची पसंती असली की झालं.
तिथे शिवानी आणि तिच्या दोन - चार खास मैत्रिणी होत्या. शिवानीचं सौंदर्य पेस्टल ग्रीन रंगाच्या साडीमध्ये खुलून दिसत होतं.
तोही आला होता. अगदी सूट वगैरे नाही ; पण रेशमी सोनेरी झब्ब्यामध्ये . पण छान दिसत होता तोही. बरोबर त्याची आई आणि दोन-चार मित्र होते.
लग्न लागलं. लोकांची उपस्थिती फार नसली तरी अलंकापुरीची माउली होतीच की आशीर्वाद द्यायला .
एक मित्र म्हणाला नाव घ्या.
त्याने नाव घेतलं.

हुंडा पाहिजे अजून
किती जमाना बदलला तरी
शिवानीचं नाव घेतो
हीच माझी जीवनसाथी खरी.

उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.
थोड्यावेळाने अभि आणि शिवानी हे नवविवाहित जोडपं आनंदाने गाडीत बसलं. त्यांचे चेहरे वसंतातल्या बहाव्याच्या पिवळ्या बहरासारखे खुलले होते .

त्याचं झालं होतं असं -
अभि आणि शिवानीचं एकमेकांवर प्रेम होतंच. आधीपासूनच. पण त्याच्या मोठ्या बहिणीने प्रेमविवाह केल्यामुळे त्याच्या वडलांचा तसल्या विवाहाला विरोध होता.
म्हणून त्या दोघांनी मिळून रीतसर प्लॅन केला होता. अगदी पारंपरिक पद्धतीचा .व्हाया लगीनघाई मॅट्रिमोनिअल साईट . अन तो यशस्वी झालाही असता. सारं जमून आलंही असतं. पण हुंडा ? - तो आडवा आला होता.
मग शिवानीने पळून जायचा विचार मांडला होता. कारण अभिच्या वडलांना हुंडा पाहिजे होता तर तिचे वडील त्याच्या अगदी विरुद्ध . व्यवहारात प्रेमाचा बळी जाणार होता !
पण अभि त्या गोष्टीला घाबरत होता . त्याची प्यारकी कसमें वगैरे तिथे कमी पडत होती. पोराची मनःस्थिती ओळखलेल्या त्याच्या आईने त्याला जवळ घेऊन प्रेमाने विचारलं ....
जेव्हा तिला सारी स्टोरी कळली ,ती म्हणाली , " जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा ह्यांनी हुंडा घेतला होता ,मी काही बोलू शकले नव्हते तेव्हा .पण आता पुन्हा तुझ्या लग्नात हुंडा कशासाठी ?- आपण पळून जायचं म्हणजे जायचं ! - "
“आपण ? म्हणजे ?...”
“ म्हणजे मी सुद्धा येणार आहे तुझ्याबरोबर . ओके ?”
त्यावर त्याने आईला मिठीच मारली , तिचा गालगुच्चा घेतला तिचा पापाच घेतला त्याने !
मग पुढे सारं घडून आलं होतं

अभिच्या वडिलांचं घरात चालत असलं तरी बायको वाचून त्यांचं पान हलत नाही .शेवटी त्यांनी घर सोडलेल्या बायकोपुढे शरणागती पत्करली. हो ना ! मुली पळून जातात मुलाबरोबर , इथे तर बायकोच पळून गेली होती- मुलाचा हात धरून, त्याचे दोनाचे चार हात करायला !

आता ते स्वतःच एक जोरदार लग्न लावून देणार आहेत . पुन्हा ! बायकोला वरमाई म्हणून मिरवण्याचा चान्स देण्यासाठी !

नवीन जोडपं मजेत आहे. त्यांची आधीची लगीनघाई संपली आणि पुन्हा त्यांची नवीन लगीनघाई घाई सुरु होणार आहे.
ते लग्न लागेल तेव्हा लागेल., बाकी - इतर घाई त्यांना आहेच की ! ...
------------------------------------------------------------------------------------------------
.bip499@hotmaifl.com

हे ठिकाण