भाग_३_प्रतापगडाची_उलटलेली_बाजी शिवाजीमहाराजांपुढील_आव्हाने_,_संध्या

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
12 Mar 2020 - 4:07 pm
गाभा: 

शिवाजी महाराजांच्या पुढील परिस्थिती - आव्हाने आणि संध्या

भाग ३

बंधू संभाजीची हत्या

सन १६२८ पासून शाहजहान बऱ्हाणपुरहून, आग्र्याला व नंतर दिल्लीतून राज्य कारभार चालवत होता.
शहाजीराजांचे सुटका करून देण्यासाठी सन १६४९ महाराजांनी किल्ले परत केले होते. शहाजीराजे बंगलोरला परतले. १६५३ साली महाराजांच्या मोठ्या भावाची - संभाजीची हत्या कर्नाटकात कनकगिरीला झाली. त्या हत्येत अफ़झलखानाचा हात होता. संभाजीराजेंनी कनकगिरी-हंपीच्या आसपासच्या वैभवपूर्ण वास्तू पाहून आपल्या राज्याची राजधानी करता येईल असा कयास बांधून अब्बाखान नामक तिथल्या किल्लेदाराला त्याच्या गचाळ आणि हिंदूंना छळणाऱ्याला कामगिरीमुळे काढून तिथे आपल्याकडील किल्लेदार नेमला. कागाळी आदिलशहाकडे गेली. त्याचा निवाडा करायला अफ़झलखानाला नेमले गेले. अफ़झलखानाला संभाजीराजेंनी पूर्वी बंगलोरच्या एका लढ्यात हुसकाऊन लावल्याचा राग होता. वरवर मदत करतो असे दाखवून अब्बाखानाच्या बाजूने त्याने आपले सैन्य अचानक उभे केले आणि संभाजीराजेंना दगा करून मारले. भावाला असे मारलेले महाराजांच्या जिव्हारी लागले.
(बंगलोर - हंपी - कोप्पळ - कनकगिरी नकाशा )

शिवाजी महाराजांच्या पुढील परिस्थिती

प्राचीन काळापासून जहागिरदार हा एका लहान मोठ्या भागापुरता मुलुकी व्यवस्थापन करणारा राजाच असे. फरक असा होता की जहागिरीतील शेतीवाडीचा मुलुख त्याच्या ताब्यात असे. पण त्या भागातील किल्ले, गढ्या, जकात वसूली नाकी यावर याचा ताबा नसे! गडावरील गडकरी, बंदरावरील मालधक्का, जहाजांची वाहतूक यावर जहागीरदारांचे नियंत्रण नसे. त्यामुळे गडावरील मुखियाची मर्जी पण त्याला सांभाळावी लागत असे. चालू घटनाक्रमात, राजसत्तेतील शाह्यांच्या सत्ता संघर्षात त्यांना आपल्या निष्ठा बदलत्या ठेवाव्या लागत असत.
महाराजांच्या मते जहागीरदार आपण असूनही राजा, नबाब, शाह्या, यांच्या हातातील बाहुले बनून, त्यांच्या राजकारणातील समस्या, लहरी सांभाळून, परतंत्राने का वागावे? महाराजांची कुचंबणा ही होती की ज्या रयतेचा मुख्य कारभारी मी, त्या रयतेच्या समस्या समजून घेऊन, अवर्षण, अतिवृष्टी, जंगली जनावरांच्या धाडी, अन्य नैसर्गिक आपत्तीत रयतेच्या समस्यांसाठी तोंड द्यायचे मी, त्यांना शेती आणि अन्य उद्योगातून शांत सुखाने राहू देण्याची गरज असताना, विविध धार्मिक सण, प्रथा, यात्रांसाठी जमणाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी माझ्या अंगावर असते. मात्र गडावरील सत्तेच्या राजकारणात होणाऱ्या बऱ्यावाईट घडामोडीत मला सामिल केले जात नाही. आदिलशाह, निजाम, कुतुबशाह, पोर्तुगीज किंवा मुगलांच्या सुभेदारांना आम्हा जहागिरदारांनी कधी धड पाहिले देखील नाही अशांच्या बाजूने आपल्या फौजा तैनात करून लढाईत का उतरायचे? त्यांच्या फौजा आपल्या मुलुखातून जात असताना त्यांची का बडदास्त ठेवायची? माझ्या मुलुखातील गड आणि किल्ले माझ्या अखत्यारीत असले पाहिजेत. त्याच्या आसपासच्या मार्गावरून होणारी जकात, मालगुजारी यावर माझी मालकी असली पाहिजे.

शिवाजी महाराजांच्या पुढील आव्हाने

महाराजांच्या मते जहागीरदारीची प्रथा जुनी झाली होती. घराण्यातील कोणी एकाने साहसी कामे, लढाईत पराक्रम गाजवला म्हणून त्याच्या नंतरच्या पिढ्यांना वारसाहक्काने जहागीरदारांचे पद देण्याऐवजी केलेल्या कामगिरीचा मोबदला पैशाच्या रूपात दिल्याने ऐदी बनलेल्या जहागीरदारांना चाप बसेल, नव्याने तरूण, होतकरू, साहसी सैन्याची फळी उभी राहिल, यासाठी वेळेवर पगार, भत्ते, नवीन जनावरे, शस्त्रे यासाठी खेळते धन मिळवायला विविध परमुलुकातील श्रीमंत, व्यापारी हे त्यांचे लक्ष्य होते.
सलोख्याने अशा गोष्टी होत नाहीत म्हणून शिवाजी महाराजांनी एक एक गडावर आपली सत्ता स्थापन करायला सुरवात केली. शहाजीराजांच्या मुलगा म्हणून सुरवातीला दुर्लक्ष केले गेले. नंतर पुरंदर गडाचा कब्जा केल्यावर शहाजी राजांना पकडून शिवाजीला वठणीवर आणायची खेळी केली गेली. जेंव्हा महाराजांनी आपल्या जहागिरीच्या बाहेरच्या भागातील गडांवर, किनाऱ्यावर, कब्जा केला तेंव्हा ती जास्त गंभीर व तातडीची बाब झाली. या त्यांच्या विचारसरणीला आसपासच्या जाहगिरांची मान्यता मिळणे अशक्य होते. कारण त्यांनी असा विचारच केला नव्हता. महाराजांचे कोवळे वय असल्याने काही दिवसात हे भूत उतरेल असे काहींना वाटले. काहींच्या आपापसातील हेव्यादाव्यात शिवाजीची बाजू पकडून आत्ता मदत केली तर तो आपल्याला नंतर कामाला येईल असे वाटले. हळू हळू महाराजांचे तेजस्वी व्यक्तिमत्व, चारित्र्य, वैचारिक बैठक, प्रजेबद्दल असलेली कळकळ जाणवू लागली तेंव्हा अनेक सरदार वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असूनही महाराजांना आव्हान न देता त्यांच्या बरोबर आनंदाने ते सामिल झाले. तुटपुंजी शस्त्र सामग्री, दुबळी अर्थ व्यवस्था बदलायची गरज होती. त्यांनी घोडेस्वारी करून वेगाने शत्रूच्या सामानावर, पैशाअडक्यावर घात करून मिळवायचा प्रयोग यशस्वी होत गेला. ती संपत्ती आपल्या चैनीसाठी न वापरता शस्त्र सज्जता, गड दुरुस्ती, प्रजेची देखभाल, उच्च जातीची जनावरे, यावर लावून आपल्या विचारांनी आचाराची जोड दिली.

छापेमारी करून बेसावध शत्रू सैन्यात भगदड करणे हे सूत्र त्यांनी वापरले. रात्रीच्या अंधारात अनेक कारवायातून वेगवान हालचाली करून धक्कातंत्राने अनेक प्रसंगात अदभूत यश मिळविले. ही तंत्रे शत्रू पक्षाला माहिती नव्हती असे नाही. पण त्यांचा गलथान कारभार, बेजबाबदार अधिकारी वर्ग, बोजड युद्ध साहित्य, जनानखाना वगैरे कारणांमुळे त्यांना महाराजांच्या सैन्यावर छापेमारी करायला अशक्य होत असे.
महाराजांनी काही महत्त्वाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. कुठल्याही स्त्रियांच्या अब्रूला धक्का बसला नाही पाहिजे. धनिक व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाकडून पैशाच्या स्वरूपात खंडणी वसूल करायची. शक्यतो त्याचा शारीरिक छळ न करता पुन्हा व्यवसाय करायला सोडून द्यायचे. अपराधांची गय केली जात नसे. गुन्हा सिद्ध झाला कि लगेच काही अवयव तोडून किंवा मारून टाकले जायचे. या उलट केलेल्या पराक्रमाची नोंद घेऊन त्या व्यक्तीला लगेच कुवतीनुसार पैशांची बक्षिशी मिळत असे. गोपिनाथपंत बोकिलांना खानाला मारल्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी १ लाख होन बक्षीस देऊन गौरविण्यात आले. शिवाय अन्य साहसी सहभाग्यांचा पैसे देऊन विशेष सत्कार केला.
महाराजांच्या काळात मुगल सत्तेचा धर्म मुस्लिम होता. त्यामुळे त्या विरोधात जाऊन कामगिरी करताना धार्मिक कट्टरतेला टक्कर देण्यासाठी सदैव संघर्ष करावा लागला होता. मुस्लिम धर्मातील पंथाच्या आपापसातील मतभेदांचा पदर देखील महाराजांच्या वर्तनातून लक्षात येतो.
अफ़झलखानाची नेमणूक शिवाजी महाराजांना खलास करण्यासाठी करण्यात झाली असल्याच्या वार्ता हेरांकडून कानावर पडत होत्या. महाराजांच्या कार्याची कळकळ असलेल्यांनी काव्यमय निरोप पाठवून येत्या संकटाची चाहूल करून दिली.

संकटातून संधीचा शोध

असे म्हणतात की सामान्य लोकांना भोवतालच्या परिस्थितीशी समेट करून नमते घ्यावे लागते. काहींना परिस्थितीशी जुळवून न घेता आल्यामुळे नामशेष व्हावे लागते. तर काही आपल्याला पूरक परिस्थिती हिमतीने निर्माण करतात. अशी लोकोत्तर व्यक्तिमत्वे महान म्हणून जगात मान्यता मिळवतात.
आदिलशाहीतील कमकुवतपणा, मुगलांच्या आपापसातील हेवेदाव्यांना ऊत आला होता. भावाभावातील द्वेषभावनेने दिल्लीतील तख्तावर अधिकार मिळवायला लढाया सुरू होत्या. दोन सत्तांना खिळखिळे करायला हीच संधी आहे. हे महाराज जाणून होते.
अफ़झलखानाची नेमणूक झाल्यावर आपल्या सर्व सरदारांना एकत्र करून काय करावे यावर विचार विमर्श केला गेला. वेगवेगळी मते मांडली गेली. अफ़झलखानाचा पुर्व इतिहास पाहता त्यांच्याशी समझोता करणे हा शहाणपणाचा मार्ग आहे हे ठळकपणे समोर आले. आपल्याला अफ़झलखानाला टक्कर द्यावी लागेल. कारण तो फास आवळत एक एक महत्त्वाचे किल्ले, गढ्या, नाकी आपल्याकडे वळवत राहील. मग अगतिक होऊन समझोत्याच्या शर्ती कडक होत जाऊन विजापूरच्या दरबारात जीवंत जायची पाळी येईल. पुरंदर, सिंहगड, राजगड आणि आसपासच्या परिसरातील बळकट किल्ल्यातून, युद्धाच्या तयारीतून आपण किती दिवस टिकाव धरू शकू यावर विचार केला गेला.
एप्रिलमधे निघालेला अफ़झलखानाचा ताफा पुरंदरच्या आसपास यायला किती दिवस लागतात यावरून येऊ घातलेल्या पावसाळी मोसमाचा फायदा कसा करता येईल यावर चर्चा झाली. वेळोवेळी निर्णय काय घ्यायचे ते अफ़झलखानाच्या सैन्य हालचालींवर लक्ष ठेवून बातम्या काढायला हेरांच्या ताफ्याची विशेष नेमणूक करण्यात आली.
महाराजांनी आपल्या अंतस्थ मंडळाला खानाच्या बाजूने वश होण्याची शक्यता असलेल्या जागीरदार, सरदारांची यादी तयार करून त्यांच्या कडील सैन्य, शस्त्रे, जनावरे यांचा आढावा घेतला. सध्या आपल्या बाजूने असलेल्यांचा कल काय आहे. ते चाचपायला मध्यस्थ पाठवले.

महाराजांनी अफ़झलखानाच्या संकटाबाबत आपले ध्येय काय आहे यावर चर्चेत मत मांडले.
१. कुठल्याही परिस्थितीत आपण मैदानी लढाईच्या फासात अडकायचे नाही.
२. खानाच्या एकत्रित सैन्यबळाला सामोरे न जाता छोट्या तुकड्यात घेरून मोहिमेचा पसारा दूरपर्यंत वाढवण्याची शक्यता तयार करायची.
२. खानाशी टक्कर टाळायची असेल तर कोकणात सटकून जायला सोईस्कर घाट रस्ता असला पाहिजे.
३. खानाला कोकणात उतरायला मनाई करायला सैन्य रचना तयार पाहिजे.
४. निजामाच्या सत्तावाटण्यातील मुगलांच्या ताब्यातील कोकणातील मिळवलेले गड, बंदरावरील नाकी सुरक्षित केली पाहिजेत.
४. व्यापारी वखारी, नौका, परदेशाशी व्यापार थांबता कामा नये. संपत्तीचे निर्माण करणाऱ्या जहाजांच्या दळणवळणाच्या व्यवस्थेला धक्का लागता कामा नये.
५. अफ़झलखानाची ही गड किल्ले काबीज करायची मोहीम संपली तरी आपण कोकणातील पट्ट्यातून राज्य कारभार चालवत राहिला पाहिजे.
आपली संपत्ती, वैभव, दरारा आणि वैयक्तिक शरीर सौष्ठव यावर दक्ष खान मजल दरमजल करत येत राहिला. तिकडे महाराजांच्या खलबतातून परिस्थितीचा आढावा घेत वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी होत राहिली.

पुढे चालू...

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

13 Mar 2020 - 7:01 am | दुर्गविहारी

खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण लिखाण ! मुख्य घटनेची छान पार्शवभूमी तयार होते आहे. शक्य झाल्यास थोडे मोठे भाग करा.

बाप्पू's picture

13 Mar 2020 - 11:49 am | बाप्पू

अत्यंत सुंदर लेखन.. पुढील भागाच्या प्रतीक्षेत

विजुभाऊ's picture

13 Mar 2020 - 12:06 pm | विजुभाऊ

वा खूप डिटेल महिती देत आहात

Rajesh188's picture

13 Mar 2020 - 12:27 pm | Rajesh188

लेख वाचायला आवडतोय

अभिरुप's picture

13 Mar 2020 - 2:09 pm | अभिरुप

छान लेखमाला. अतिशय अभ्यासपूर्ण लेखन.

सुधीर कांदळकर's picture

13 Mar 2020 - 7:07 pm | सुधीर कांदळकर

जहागिरदारीच्या मर्यादा प्रथमच कळल्या. आचरट इतिहासकारांनी रंगवलेला शंकास्पद इतिहास शालेय अभ्यासक्रमात लावला गेला हे फारच वाईट झाले.

अनेक अनेक धन्यवाद.

योगविवेक's picture

14 Mar 2020 - 6:47 pm | योगविवेक

अजून अफजल खान निघाला नाही विजापुरहून! मग तो पोचणार कधी?

शशिकांत ओक's picture

14 Mar 2020 - 7:46 pm | शशिकांत ओक

काम वेळखाऊ आहे...
शिवाय येत्या भागाचे शीर्षकच आहे "खानाची सुस्त अजगरनीती!"

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

15 Mar 2020 - 9:50 pm | सौ मृदुला धनंजय...

अप्रतिम लेख

शशिकांत ओक's picture

18 Mar 2020 - 11:28 pm | शशिकांत ओक

आपला प्रतिसादाबद्दल