प्रवास एक अनुभव

Primary tabs

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
11 Jan 2020 - 7:57 am

निशा , उषा , आसिफा आणि जया चार बाल मैत्रिणींचा ग्रुप सगळ्या जवळ- जवळ पंचेचाळीशीच्या आसपास असतील . सगळ्या आपल्या आयुष्यात बऱ्यापैकी स्थिर झाल्या होत्या . सगळ्यांची मूल मोठी झालेली त्यातल्या काही तर चक्क आज्या सुध्दा झालेल्या . आता संसाराच्या जबाबदारीतून जरा मोकळ्या झाल्या होत्या .मग दर वर्षी ठरवून कुठ तरी फिरायला जात असत .या वेळेस ही असाच बेत ठरला होता .
चौघी रेल्वे हायस्कूलमध्ये शिकलेल्या त्या काळाच्या म्हणजेच 1983 -84 च्या प्रथेप्रमाणे कोणाचं सातवीत तर कोणाचं आठवीत , तर कोणाचं नववी तर दहावीत लग्न झालेले . त्या मुळे सगळ्या लवकरच संसाराच्या जबाबदारीतून जरा मोकळ्या झालेल्या होत्या. तर या वेळेस मुंबईच्या एका मैत्रिणीकडे फिरायला जायचा बेत होता त्यांचा मग काय झाल्या सगळ्या कुर्डुवाडी मध्ये जमा . कुर्डुवाडीत का तर सगळ्याच जणीचं माहेर कुर्डुवाडी त्यात आसिफा आणि उषा तिथेच होत्या स्थायिक म्हणजे त्यांच माहेर व सासर तेच . जया दौडची तर निशा कोल्हापूरची .
कुर्डुवाडी हे तस छोटस गाव पण भौगोलिक स्थिती मुळे रेल्वे स्टेशनला मोठे जंक्शन आहे . तसेच तेथे रेल्वेचा बोगी दुरूस्ती कारखाना त्या मुळे रेल्वे कामगार जास्त आहेत . तर आसिफा ही मुस्लिम दिसायला सुंदर पण वयपरत्वे ती गोलमटोल झालेली . उषा हिंदू ,ती ही सुंदरच आहे ती शिक्षक .निशा हि हिंदू ती ही गोरी गोमटी व नाजूक ,जया मद्रासी ख्रिश्चन ती मात्र काळी – सावली व रांगड्या व्यक्तिमत्वाची तिला पाहिलं की ती पोलीसात नोकरीला आहे की काय! असा प्रश्न पडायचा . तर या चौघी मुंबईला निघाल्या होत्या .पण त्यांना प्रवासाचा नवीन अनुभव घ्यायचा होता म्हणून त्यांनी ट्रेनच्या जनड्रल डब्या मध्ये जायचं ठरवलं होतं कारण नेहमीच फर्स्ट क्लास मध्ये जावून त्या कंटाळलेल्या होत्या .पण त्या चौघी च्या घरचे काळजीत होते त्यांच्या या निर्णयाने ;कारण एक तर या चौघीच जाणार होत्या आणि तेही जनरलने .
शेवटी निघाल्या सकाळची ट्रेन होती हैद्राबाद एक्सप्रेस .ठरल्या प्रमाणे सगळ्या स्टेशनवर जमल्या सकाळी नऊची ट्रेन होती . आसिफा आणि जयाने तिकीट काढले .निशा आणि उषाचे यजमान रेल्वे नोकरदार असल्याने त्यांना काय अजीवन फ्री पास होता तो ही फर्स्ट क्लासचा त्यामुळे त्यांना तिकीट काढायची गरज नव्हती . जस काही लहान मुली पिकनिकला चालल्या आहेत असे त्यांच्या घरचे सोडायला आले होते त्या चौघींना ट्रेन यायला अजून वेळ होता मग काय बसल्या चौघी आणि त्यांचे कुटुंबीय .
स्टेशनवर बरीच गर्दी होती चार प्लँट फॉर्म आहेत .आणि प्रत्येक प्लॅट फॉर्म वर लोक उभे होते .कुठे ट्रेन येऊन उभारली होती तर कोठे यायची होती . प्रवाश्यांची लगबग तसेच विक्रेत्यांची लगबग तर कुठे सामानाची खरेदी विक्री चालली होती. लोक स्टेशनवर येत होते, जात होते . तर येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनची उद्घोषणा होत होती तर टीसी ठिक- ठिकाणी उभारून तिकीट चेक करत होते तर गाडीवर जाणारे टिसी ब्यागा घेऊन ट्रेन मध्ये चढत होते तसेच रेल्वे पोलीस फोर्स चोरी होऊ नये याची दक्षता घेत त्यांचे कर्तव्य बजावत होते .सगळीकडे नुसता गोंगाट होता पण या चौघींना त्याच काही नव्हते .
पण उषाचे यजमान, निशाचा भाचा,असिफचा मुलगा व जायचा भाऊ वेगळ्याच चिंतेत होते
उषाचे यजमान , “ काय ग उषा तुम्हीं चौघी जाताय बरं आरक्षण करून मग जा म्हणाले तर ते नाही ;एसी च राहू दे पण
कमीतकमी स्लीपर क्लासच तरी; काय हे खूळ आहे जंड्रल मधेच जायचं काळजी वाटतेय मला तुमची”
निशा ,” काळजी करू नका भाऊजी जाऊ आम्ही व्यवस्थित जाऊ .”
निशाचा भाचा , “ आत्या मी येऊ का तुमच्या बरोबर ?लगेच दुसऱ्या ट्रेनने माघारी येईन .”
आसिफा , “ तू फिकर मत कर बेटा, मैं 'तेरी आत्या को व्यवस्थित लेके जाएगी और लेके आएगी !”
हे तीच मुद्दाम बोललेले परांडा हिंदी ऐकून सगळे हसू लागले . तो पर्यंत ट्रेन आली आणि या चौघी गर्दीतून मार्ग काढत चढल्या ट्रेन मध्ये व जागा ही मिळाली लकिली चौघींना. ते जंड्रलचे लेडीज कंपार्टमेंट होते .चौघींचा प्रवास सुरु झाला आणि एक नवा अनुभव सुध्दा जो त्यांच्या सुरक्षित जगा पेक्षा खूप वेगळा होता . सकाळची वेळ होती.हवेत गारवा होता . निशा आणि उषा दोघी खिडकीत समोरासमोर बसल्या होत्या . खिडकीतून येणारी गार हवेची झुळूक .तिथून दिसणारे पळणारे ढग , ट्रेन मधून दिसणारी पळती झाडे,घरे , लोक, कुठे झाडांच्या गर्दीत दिसणारे सुंदर पक्षी ,क्वचित दिसणारे एखादे जंगली जनावर; अस वाटते की सगळं जग आपल्या बरोबरच पळत आहे . त्या दोघी हे सगळं पाहण्यात गुंगल्या होत्या .तशा उषा व निशा स्वभावाने शांत होत्या . कोणाशी स्वतःहुन बोलत नसत .
ट्रेन मध्ये नुसता गोंगाट होता . फेरीवाल्यांची काही- बाही विकण्याची लगबग लहान मुलांचा काही तरी घेण्या साठी आई कडे हट्ट करण . तसेच बायकांचे एकमेकांशी बोलण्याचे आवाज .ट्रेनचा धड -धड असा आवाज मधेच ट्रेनच्या हॉर्नचा आवाज असा सगळा गोंगाट सुरू होता .आसिफा आणि जया दोघी बडबड्या चौकस बुद्धीच्या होत्या .त्या दोघी प्रवाशांचे निरीक्षण करत होत्या त्यातच त्यांना त्यांच्या समोरच्या सीटवर रडत असलेली बाई दिसली .ती दिसायला सुंदर होती जवळपास त्यांच्याच वयाची पण विस्कटलेले केस ,मळलेली साडी, मलूल चेहरा ,जवळ ना कसले सामान ना कसली ब्याग ,आसिफा मागच्या एक तासा पासून पाहत होती व जायाला ही खुणेने दाखवत होती की ती बाई नुसती रडत होती. चेहऱ्या वरून ती मुस्लिम समाजातील वाटत होती .पण ती सतत रडत का होती? व तिचा अवतार असा का असावा हा विचार सतत आसिफा आणि जया करत होत्या . जयाने खुणेनेच त्या बाईला निशा आणि उषा यांना दाखले.त्या दोघी ही तिचा तो अवतार व रडणे पाहून विचारात पडल्या . शेवटी चौघींनी चर्चा करून आसिफने त्या बाईची चौकशी करावी असे ठरवले कारण ती बाई चेहऱ्या- मोहऱ्या वरून मुस्लिम वाटत होती . या चौघींच हे गूळपीठ चाललं होतं पण त्या बाईच यांच्या कडे लक्ष नव्हतं
शेवटी आसिफाला त्या बाईशी बोलण्यासाठी उषाने तयार केले आणि आसिफा त्या रडणाऱ्या बाईला बोलण्यासाठी सरसावली.
आसिफा , “क्या हुवा हैं बाईजी हम जबसे ट्रेन मे बैठे हैं ,तबसे देख रहे हैं ;की आप बस रोये जा रही हैं ।क्या हुआ और आपका समान काहा हैं ।आप कहाँ से आ रही हैं कहाँ जा रहीं है ।”
बाई , “ कुछ नहीं ” अस म्हणून ती सावरून बसली .तेव्हढ्यात तिला ठसका लागला अस वाटत होतं की तिने दोन -तीन तासा पासून पाणी पिले नाही . ते पाहून आसिफाने तिला पाण्याची बाटली देऊ केली पण काही केल्या ती पाणी प्यायला तयार होई ना , शेवटी निशा ने एका पाणी विकणाऱ्या फेरीवाल्याला बोलावून घेतले व एक मिनरल वॉटरची सील बंद बाटली घेऊन त्या बाईच्या हातात दिली .त्या बाईने बाटली घेतली व अर्धी बाटली पाणी घटाघाट प्याली . या त्यांच्या कृतीने त्या बाईला त्या चौघींन वर विश्वास बसला व ती बोलू लागली.

बाई , “ बहुत शुक्रिया आपका , क्या बताऊ मैं आपको मेरे साथ किस्मत ने कैसा खेल खेला हैं ।(अस म्हणून तीने डोळे
पदराने पुसले व ती बोलू लागली ) मेरा नाम हसीना शेख , मी नगर जिल्ह्यात ल्या एका छोट्याशा गावातली
राहणारी एक मुस्लिम स्त्री आहे . माझं शिक्षण जेमतेम वाचता लिहता येण्या पुरतं झालाय . मला दोन मुली आहेत
रजिया आणि सुफीया दोघी उच्च शिक्षित आहेत व त्यांच्या संसारात सुखी आहेत . माझा नवरा सेन्ट्रीग कामगार
होता . त्याने आणि मी खूप कष्ट करून आमचा संसार केला . मुलींना शिकवले .चांगल्या ठिकाणी लग्न करून
दिली . मुलगा नाही याचं कधी दुःख आम्ही नाही केलं. पण एक दिवस कामावर गेला असताना माझा नवरा दुसऱ्या
मजल्यावरून खाली पडला त्यांच्या पाठीला व मणक्याला खूप दुखापत झाली होती . त्याच्या मणक्याचे ऑपरेशन करावे लागले . त्याला खूप खर्च आला आणि डॉक्टरनी त्याला आता तो सेन्ट्रीग चे काम करू शकणार नाही असे सांगितले कारण तो माणक्याने पूर्ण बाद झाला होता . माझ्या दोन्ही मुलींनी खूप मदत केली त्यांनी काही कमी पडू दिले नाही .माझा नवरा गेल्या दोन वर्षापासून घरीच आहे मी शिवण काम करून कमावते पण त्यात आमचे भागत नाही. मुलीनं कडून तर किती मदत घेणार ना . या आमच्या परिस्थितीची माहिती आमच्याच गावात राहणाऱ्या आमच्या एका नातेवाईकाला होती .तो एक दिवस एका माणसाला घेऊन आला .जो दुबई मध्ये घर कामासाठी बायका व मुली पुरवतो असे तो म्हणाला . मला व माझ्या नवऱ्याला मला दुबईला काम मिळवून देण्याची गळ घातली . महिना तीस हजार पगार व तिथे राहणे खाणे फुकट असे तो म्हणाला; की दोन वर्षे काम करून परत माघारी तुम्हीं येवू शकता . तुमची म्हातारपानांची सोय होईल व राहिलेले आयुष्य आरामात जाईल. आम्ही विचार करायला त्याच्या कडे वेळ मागितला त्याने दोन दिवसांत कळवा असे सांगितले.पासपोर्ट व विमानाचे तिकीट ही तोच काढणार होता व त्याचे पैसे नंतर देण्याचे तो म्हणाला. मला व माझ्या नवऱ्याला त्याचे बोलणे पटले . त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पण तीच आमची चूक होती ” असे बोलून ती बाई पुन्हा रडू लागली
तिला जयाने शांत केले .व म्हणाली
जया , “ मग पुढे काय झालं ”
हसीना , “ मी दुबईला कामासाठी जायचे ठरवले व माझा नवरा ही पाठवायला तयार झाला .आम्ही त्या माणसाला आमचा होकार कळवला.पण मुलींना मी जाऊ पर्यंत काही सांगायचे नाही असे आम्ही दोघांनी ठरवले कारण त्या मला कामासाठी दुबईला जाऊ देणार नाहीत ;हे आम्हां दोघांना चांगलं माहिती होत . एका महिन्यात माझा पासपोर्ट तयार झाला व मी त्या मानसा सोबत एका नवीन व अनोळखी देशात जायला तयार झाले . तो मला प्रथम हैदराबादला घेऊन गेला. तिथे एका सेठच्या घरात मला ठेवण्यात आले . त्या घरात चार पुरुष राहत होते व माझ्या सारखी घरकाम करायला घेऊन जाण्यासाठी आणलेली एक मुलगी आम्हां दोघींना तिथे घरकाम लावण्यात येत होते पण घरकाम करताना ते लोक खूप विचित्र वागत असत . फरशी पुसायची झाल्यास पदर झाकून घेऊन न पुसता पदर अंग दिसेल असा घ्या तसेच ब्लाउजची सर्व हुके न लावता वरची हुके उघडी सोडा जेणेकरून अतिक अंगे दिसतील असे ते सांगत होतो. या गोष्टी मला खटकत होत्या व माझ्या मनात वेगळाच संशय निर्माण करत होत्या . दोन दिवस कसे तरी गेले . तिसऱ्या दिवशी मला तयार राहायला सांगितले .कारण आज दुबईला जायला निघायचे असे सांगितले . मी तयार झाले तर एक ट्रक कंटेनर त्या घरा बाहेर उभे होते त्यात अनेक मुली व बायका कोंबण्यात आल्या होत्या मला ही त्यात बसायला सांगितले . मी ही बसले . माझ्या बरोबर असणारी ती तरुण मुलगी जी मला काल रात्री पासून दिसली नव्हती . ती विमनस्क अवस्थेत बसली होती व सतत रडत होती . तिचा अवतार ही काही बरोबर नव्हता मी कडेला व तिच्या जवळचं बसले होते . त्या कंटेनर वजा ट्रक मध्ये अजून मुली त्या लोकांना बसवाच्या होत्या म्हणून ट्रक थांबला होता .ट्रक निघायला अजून अवकाश होता .मला त्या मुलीची अवस्था पाहुन संशय येत होता की हे काही वेगळंच प्रकरण आहे .मी त्या मुलीला तुला काय झाले असे विचारले तर ती रडू लागली व मला म्हणाली,
” बाई इन लोगोने हमे धोका दिया है ।ये लोग हमें दुबई घरका काम करवाने नही बल्कि हमें बेचकर धंदा करवाने ले जा रहे हैं । ओ भी हवाई जहाज से नही बल्कि पानी के जहाज से इस कंटेनर मे से , कल रात मुझे इन में से एक ने रुम साफ करने के बहाने बुलाया और नशेकी हालत में मुझसे जबरदस्ती की और सब कुछ बताया मुझे , मैं बर्बाद हो गई बाई।”
अस म्हणून ती रडू लागली .हे ऐकून मी खुप घाबरले . माझा संशय खरा होता पण हातपाय गाळले तर आपण संपणार हे मला कळून चुकले होते व काहीच न करता बसलो तर पुढे काय वाढलय याची कल्पना आली होती म्हणून मी हिंमत करुन त्या ट्रक मधून उडी मारली मला धरण्याचा त्या लोकांनी खूप प्रयत्न केला माझा पाठलाग ही केला पण रस्ता लक्षात ठेवण्याच्या माझ्या सवयी मुळे मला माहीत होत की इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे व रस्ता ही येतांना नीट पहिला होता मग काय , त्या लोकां पासून लपतछपत मी स्टेशन गाठले .ते स्टेशन पर्यंत माझ्या मागे आले पण रेल्वे पोलीसांना पाहून माघारी फिरले त्यांना माहिती होत की माझ्याकडे कुठे ही जायला पैसे नाहीत कारण माझं सामान पर्स सगळं तेथेच राहिले होते . पण मी हार नाही मानली मी स्टेशनवर लोकांना तिकीटासाठी पैसे मागू लागले बऱ्याच लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले पण एका नेक माणसाने माझी चौकशी केली. मला हैदराबाद- मुंबई गाडीचे तिकीट काढून मला स्वतः या ट्रेन मध्ये बसवले.एक पाण्याची बाटली व खायला घेऊन दिले ”
हसीनाने हे सर्व सांगून एक मोठा उसासा घेतला . हे सर्व ऐकून चौघी स्तब्ध झाल्या होत्या . त्यांच्या कडे शब्दच नव्हते काय बोलायला . आता दुपारच्या बारा वाजून गेल्या होत्या . सगळ्या जणींना आता भुकेची जाणीव झाली मग सगळ्या जणींनी आपले डबे काढले . हसीनाला ही त्यांच्यात सामील करून घेतले व तिला आग्रहाने जेवायला घातले. आता सगळ्या जरा सुस्तावल्या , मग परत त्यांनी हसीनाची चौकशी सुरू केली.
निशा , ” तुमच्या कडे मोबाईल फोन नव्हता का हसीनाताई ?”
हसीना , “ माझा फोन होता पण त्यात इंटरनॅशनल सिम कार्ड घालतो म्हणून माझ्या कडून त्या माणसाने हैदराबादमध्ये गेल्यावरच काढून घेतला .”
जया ,” तुम्हीं तिथेच पोलीसात का नाही गेलात ?सगळ्याच मुली -बायका सुटल्या असत्या ना ?”
हसीना ,” मी खूप घाबरले होते स्वतःचा जीव व इज्जत वाचवण्या पलीकडे मला काही सुचलं नाही ”
आसिफा ,” तुम्हीं आता कुठे जाणार म्हणजे कुठे उतरणार आणि कोणा कडे ? आणि ते लोक तुमच्या मागावर नसतील का?”
हसीना ,” मी मुंबईला मुलीकडे जाणार आणि ते लोकं माझ्या मागावर नसणार करण ते पकडले जाऊ शकतात हे त्यांना ही
माहिती आहे आणि मी तुमच्या सारख्याच एकाबाई कडून ट्रेन मध्ये बसल्यावर फोन मागून घेतला होता व माझ्या
मुलीला फोन करून सांगितले आहे की तू आणि शोहेब मला विटी स्टेशनवर घ्यायला या तर ते ट्रेनच्या वेळेत मला
घ्यायला येतील .”
चोघींच्या ही शंकांचे निरसन झाले होते . हसीना आता जरा रिल्याक्स झाली होती . कारण तिला आता प्रवासासाठी चांगल्या सहप्रवासी भेटल्या होत्या.दुपारी चार वाजता ट्रेन विटी स्टेशनवर पोहचली . ठरल्या प्रमाणे कल्पना त्यांची मैत्रीण स्टेशनवर आली होती तिच्या नवऱ्याला घेऊन पण त्या स्टेशनवर थांबल्या कारण हसीनाची मुलगी व जावई यायचे होते ते आले आणि हसीना मुलीच्या गळ्यात पडून खूप रडली ते पाहून या सगळ्या जणींचे डोळे पाणावले हसीनाला तिच्या मुलीच्या हवाली करून त्या चोघी गेल्या त्याची लाईफ एन्जॉय करायला पण बरोबर आयुष्यचे एक नवीन रूप घेऊन ,एक नवीन धडा एक नवीन अनुभव घेवून.
आज भारतातून मानवी तस्करीचे प्रमाण वाढले आहे .खास करून मुली व स्त्री यांची तस्करी जास्त होते म्हणून बाहेर देशात नोकरीसाठी जाताना स्त्रीयांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे .

( ही घटना सत्य असून त्या चौघीं मध्ये एक माझी आई आहे . नावानं मध्ये बदल केला आहे )

.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

शब्दांगी's picture

11 Jan 2020 - 7:58 am | शब्दांगी
शशिकांत ओक's picture

11 Jan 2020 - 7:17 pm | शशिकांत ओक

खास करून मुली व स्त्री यांची तस्करी जास्त होते म्हणून बाहेर देशात नोकरीसाठी जाताना स्त्रीयांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे .

इतके लांबलचक लिहिले आहेत चांगले रंगवून पण ही परिस्थिती आज हजारो वर्षांपासून चालू आहे. हे आफ्रिकी लोक अनेरिकेत दिसतात, भारतात हबशी, अनेक बेटावरील चहा, ऊस मळ्यात कामाला त्यांचे पुर्वज असेच नेले गेले होते. निदान गुलाम म्हणून विकायची पद्धत सध्या कायद्याने बंद आहे.

अनुभव विषण्ण करणारा आहे. मानवी तस्करी आणि त्यातून स्त्रिया व लहान मुलांवर होणारे अत्याचार पाहिले की माणसातल्या चांगुलपणावरील विश्वास डळमळीत होतोय असे वाटू लागते.