कूर्ग डायरीज ४

Primary tabs

अभिरुप's picture
अभिरुप in भटकंती
10 Jan 2020 - 8:17 pm

कूर्ग डायरीज ४

दिवस पहिला

सूर्य उगवायच्या आतच मला जाग आली. आज कूर्ग मधील आमची ही पहिलीच सकाळ. रात्री छान झोप झाल्याने ताजे तवाने वाटत होते. बाहेर येऊन पहिले तर बाहेरचे दृष्य खूपच विहंगम होते. सगळीकडे अगदी घनदाट धुक्याची चादर ओढली गेली आहे असे वाटावे इतके सुंदर दृष्य होते ते. असे वाटत होते की जणू काही आपण आकाशातील ढगांमध्येच संचार करीत आहोत. हे दृष्य पाहून मुलींना उठवले हा अनुभव घेण्यासाठी. त्याही खूप खुश झाल्या ते धुके पाहून.

सर्व विधी आटपून नाश्त्यासाठी रिसॉर्टच्या किचनजवळ आलो. नाश्ता खूपच चविष्ट होता. गरम गरम इडल्या, मेदुवडा आणि डोसा असे टिपिकल दाक्षिणात्य नाश्त्याचे प्रकार जरी असले तरी सुद्धा खूपच चविष्ट होते. नाश्त्याचा फडशा पडून पुढील मार्गक्रमण करण्यासाठी आमच्या ड्राइव्हर प्रकाशशी संपर्क केला आणि कुर्गमधील आमच्या पहिल्यावहिल्या पर्यटनस्थळाला भेट देण्यास आम्ही सज्ज झालो.

राजा'ज सीट :Raja's Seat

Raja's Seat
कूर्ग मध्ये आम्ही पाहिलेले पहिले स्थळ म्हणजे राजा'ज सीट. हे एक सुंदर उद्यान असून सशुल्क असल्याने खूप छान मेंटेन केले गेले आहे. विस्तीर्ण असा परिसर, फुलांची सुंदर बाग , वाघ, हरीण,जिराफ ,हत्ती अश्या प्राण्यांचे पुतळे आणि आल्हाददायी हवा असे अद्भुत कॉम्बिनेशन म्हणजे राजा'ज सीट हे स्थळ. शनिवार असल्याने आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे अपेक्षित गर्दी होतीच. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे कूर्गचे शासक सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक दर्शन करण्यासाठी येत असत. त्यांच्या आसनाची व्यवस्था म्हणजेच ही राजा'ज सीट . इथला सूर्योदय आणि सूर्यास्त खूपच मोहक असणार यात शंका नव्हती. दुर्दैवाने आमच्याकढे तेव्हढा वेळ नव्हता. राजा'ज सीट हा छायाचित्रकारांची पर्वणीच ठरेल कारण छायाचित्रणासाठी योग्य अशा बरयाच जागा तिथे आहेत. पण काही जागांवर छायाचित्रण किंवा गेलाबाजार सेल्फी काढणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे आपल्या जीवाची काळजी घेऊनच असे प्रताप करावेत.
Raja's Seat

Raja's seat
Raja's Seat
Raja's Seat
एकूणच विहंगम अश्या राजा'ज सीटला भेट देऊन बाहेरआल्यानंतर कुल्फी आणि खमंग ,चटकदार भेळीचा आस्वाद घेतला. अगदी मुंबईतल्या चौपाटीच्या फील आला. पण इथली भेळ खरंच खूप चवदार होती. जोडीला आम्ही कैरी आणि अननसाचे तिखटमीठ लावलेले चाट घेतले जे आंबटगोड चवीचे अफलातून कॉम्बिनेशन होते.

राजा'ज सीट पाहून आम्ही ठरल्याप्रमाणे डुब्बारे फॉरेस्ट ला निघालो. डुब्बारे फॉरेस्ट हे कूर्ग सहलीतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ. कारण इथे रिव्हर राफ्टिंग तसेच एलिफंट सफारीचा आनंद घेता येतो. डुब्बारे फॉरेस्ट ला पोचल्यानंतर पाहिले तर आज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गर्दी दिसत होती. बऱ्याचशा स्थानिक शाळाहि सहलीसाठी मुलांसह आल्या होत्या. आम्ही पोहोचलो तेव्हा दुपारचे साधारण दोन ते अडीच वाजले होते. एलिफन्ट सफारी साडेचार वाजता सुरु होणार होती म्हणून प्रथमतः रिव्हर राफ्टिंगचे तिकीट काढले.
Dubbare
आयुष्यात पहिल्यांदा प्रॉपर रिव्हर राफ्टिंग करणार होतो तेही पूर्ण कुटुंबासमवेत. त्यामुळे नाही म्हणले तरी पोटात गोळा आला होता. सेफ्टी किट घालून आमची बोट कावेरी नदीच्या पात्रात उतरली आणि पोटातला गोळा थोडा मोठा झाला. आमच्याबरोबर अजून एक युगुल होते. म्हणजे आम्ही पाच जण , ते युगुल आणि आमचा मार्गदर्शक पवन असे आठ जण बोटीत होतो. मी, बायको आई ते युगल असे चौघे आणि मार्गदर्शक पवन असे नाव वल्हवणार होतो. माझी आई पहिल्यांदा असे काही धाडस करणार होती, त्यामुळे ती प्रचंड उत्साहित होती. आम्ही नाव वल्हवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू नदीच्या पात्राच्या मध्यभागी आलो. नदीचे विस्तीर्ण पात्र मध्यभागातून खूपच सुंदर दिसत होते. नाव वल्हवणे किती कठीण काम असते हे क्षणाक्षणाला प्रत्ययास येत होते. हात भरून येण्यास सुरुवात झालीच होती. पण एकंदर खूपच मज्जा येत होती नाव वल्हवण्यास. आमचा मार्गदर्शक पवन यास हिंदीसुद्धा येत असल्याने भाषेचा प्रॉब्लेम नव्हता. तो आम्हाला खूप मस्त समजावत होता. वेळोवेळी काही ठिकाणी जाऊन छायाचित्रण करण्यास सांगे. ते लाईव्ह क्षण टिपणे हे खरेतर अलौकिकच. आम्हाला त्याने काही ठिकाणी पोहोण्यास सुद्धा सांगितले पण पर्यायी कपडे आणले नसल्याने आम्ही तो विचार टाळला. साधारण अर्ध्या तासाच्या रपेटीनंतर आम्ही किनाऱ्यास लागलो. रिव्हर राफ्टिंग नंतर एलिफंट सफारीचा बेत होता पण गर्दी खूप होती. एलिफन्ट सफारीसाठी पात्र ओलांडून पलीकडच्या जंगलात जायचे होते. त्यासाठी सरकारी बोटींची व्यवस्था असते. या बोटीतून पलीकडे जात येते. पण रांग खूप असल्याने आम्ही तो बेत रद्द केला. आता आम्ही निसर्गधाम ला जाण्याचे ठरवले.

भूक लागली होतीच. ड्रायव्हरच्या सल्ल्यानुसार जवळच असलेल्या आर्यन किंवा तत्सम नावाच्या हॉटेलला भेट दिली. मुळात ज्या ठिकाणी आपण भेट देतो तिकडच्या स्थानिक खाद्यप्रकारांचा नक्कीच आस्वाद घ्यावा अश्या मताचा मी आहे. प्रत्येक ठिकाणाची एक खासियत असते मग ती खाद्यप्रकाराच्या स्वरूपात असू शकते किंवा इतर काही. प्रत्येक पर्यटनस्थळांची आपली अशी एक खाद्यसंस्कृती सुद्धा असते आणि तिचा आस्वाद घेणे हे प्रत्येक पर्यटकांचे आद्य कर्तव्य आहे असे मी समजतो. दक्षिणेत जाऊन उत्तरेतील खाद्यप्रकार खाणे शक्यतो टाळावे. अर्थात चांगले स्थानिक खाद्यप्रकार मिळणे हे ज्याच्या त्याच्या नशिबावर किंबहुना अनुभवावर अवलंबून आहे. पण एखाद्या पर्यटकाला जर स्थानिक रेसिपीज चाखायच्या असतील तर थोडे संशोधन करून घरगुती अन्न मिळण्याची ठिकाणे पालथी घालणे गरजेचे आहे . कारण बरेचसें स्थानिक अन्नपदार्थ हॉटेल मध्ये नाही मिळत किंवा त्यांची ऑथेंटिक चव हॉटेलमध्ये न मिळता एखाद्या घरी मिळू शकते.

तर आम्ही या हॉटेलमध्ये पारंपरिक दक्षिण भारतीय थाळी मागवली. दक्षिणेत भात हा मुख्य खाद्यपदार्थ. त्यामुळे ताटातील बहुतांश गोष्टी या भाताशी संलग्न होत्या. सांबार भात तर अप्रतिम होता. गरम गरम भात आणि चवदार सांबार.... भन्नाटच ! जेवण होईस्तोवर संध्याकाळचे साडेचार वाजले होते.

निसर्गधाम हे ठिकाण मदिक्केरी सिटीपासून साधारण ४० किमींवर आहे. आम्हाला तेथे पोहोचेपर्यंत सव्वापाच झाले होते. ड्रायव्हर ने सानित्याप्रमाणे निसर्गधाम हेसुद्धा एक लोकप्रिय स्थळ आहे. निसर्गधाम हे एक मानवनिर्मित जंगलच आहे. येथूनच कावेरी नदीचा एक प्रवाह सुद्धा जातो. आम्ही तिकीटं काढून आत जायला सज्ज झालो. आत प्रवेश करताच कावेरीची दर्शन होते. सुरुवातीलाच नदीवरचा झुलता पूल पार करावा लागतो आणि जंगलात आपण प्रवेश करतो. निसर्गधाम मध्ये बांबूचे विस्तीर्ण जंगल आहे. पाहावे तिकडे बांबूची बेटे . मदिक्केरीच्या पारंपरिक वेशातील जनजीवन निसर्गधाम मध्ये मूर्तिस्वरूपात निर्माण केले गेले आहे. काही ठिकाणी रोप क्लाइंबिंग किंवा तत्सम धाडशी खेळ सुद्धा मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. पण निसर्गधामचे मुख्य आकर्षण म्हणजे कावेरीच्या पात्रातील बोटिंग.
ND
nd
nd
nd
nd

आम्ही अगोदरच रिव्हर राफ्टिंग केले असल्याने आम्हाला बोटिंग मध्ये एव्हढा रस नव्हता. पण एका ठिकाणी नदीचे पात्र उथळ होते तेथे बरेच लोक पोहोण्याचा आणि पाण्याचा आनंद लुटत होते. मुलींचीही इच्छा होती पाण्यात खेळण्याची .... मग काय नेकी और पूछ पूछ! गेलो पाण्यात. तासभर पाण्यात खेळलो . पाणी खूप थंड होते तरीही मुली खुशाल खेळात होत्या. ते पाहूनच मज्जा येत होती. साधारण तासाभरानंतर अंधार पडण्यास सुरुवात झाली आणि पर्यटकांची पांगापांग झाली तसे आम्हीही बाहेर पडलो आणि रिसॉर्टवर परतण्यास तयार झालो. निसर्गधामचा सुंदर अनुभव घेऊन आणि ते विहंगम स्थळ डोळ्यात साठवून आम्ही निसर्गधामच्या शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेश केला. स्वस्त आणि मस्त अश्या वस्तू हे या शॉपिंग सेन्टरचे वैशिष्ट्य. निसर्गधामच्या तिकीट खिडकीजवळच हे प्रशस्त शॉपिंग सेन्टर आहे. मनसोक्त खरेदी करून आम्ही परतीची वाट धरली. एव्हाना रूमवर पोचेपर्यंत आठ वाजले होते. मस्तपैकी चहा घेतिला आणि फ्रेश होऊन जेवण मागवले.

थकलो होतोच त्यामुळे जेवण झाल्यावर तडक बेड गाठला. कधी झोप लागली हे कळलेच नाही आणि कुर्गमधील दुसऱ्या दिवसासाठी सज्ज झालो.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

10 Jan 2020 - 10:34 pm | चौथा कोनाडा

वाह, सुंदर ! भारी आलेत फोटो !
निसर्गधामचे फोटो तर खासच !

आमच्या सहलीत राजा'ज पॉईन्टला सुर्यास्त पाहण्याचा अनुभव कधीच विसरणार नाही ! पर्यटकांसाठी पायर्‍या-पायर्‍यांनी बसण्याची सोय खुपच सुंदर आहे !
कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुर्यास्त पाहणे खुपच रोमांचक ! महाबळेश्वरसारख्या ठिकाणी गर्दी आणि कमर्शियल हुल्लडबाजीत सुर्यास्त पाहणे म्हणजे अत्याचारच !

छान मालिका सुरु आहे, पुढिल भागाच्या प्रतिक्षेत ! अभिरुप _/\_

श्वेता२४'s picture

11 Jan 2020 - 11:20 pm | श्वेता२४

वाचतेय

मुक्त विहारि's picture

13 Jan 2020 - 6:54 pm | मुक्त विहारि

वाचत आहे.