(कपाळ)मोक्ष!! :-)

Primary tabs

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
15 Dec 2019 - 11:27 am

सर्व व्यर्थता उमजत असते
तरि चित्ताला थारा नसतो
संदेशाची तिच्या प्रतीक्षा
मी प्रतिचातक बनुनी करतो

हस्तसंच मज गमे उपांगच
क्षणिक दुरावा असह्य होतो
'अजुनी उत्तर का येईना?'
प्रश्न मनाला कच्चा खातो

सतरा कामांचा खोळंबा
भार्या घोष ठणाणा करते
तरी पालथी घागर माझी
आंतरजालावर गडगडते

शेवटची कधि 'दिसली' होती
किती त्यावरी प्रहर लोटले
मोजुन घटिका तिज गमनाच्या
पंचप्राण कंठाशी रुतले

अन्य पुरुष तर नसेल कोणी?
भिवविति लाखो शंका हृदया
'निळ्या खुणे'ला विलंब होता
चलबिचले मम अवघी काया

कुठे वावगे, अधिक-उणे कधि
चुकून बोलुन मी गेलो का,
तपासतो ते पुनःपुन्हा मी
तरी न होई निरसन शंका

अखेर उगवे सूर्यासम ती
हर्षवायु मज पाडी भूल
कुडीत माझ्या प्राण परतती
प्रेमवसंताची ये चाहुल

"कुठे उलथली होतिस तू बे?"
लटक्या रागे विचारतो मी
"गेले होते स्मशानभूमित"
पटकन येई जवाब नामी!

"प्रभातसमयी फुरसत नसते
भोजनसिद्धी, शाळा, बाई
शंभरवेळा सांगुनही हे
तुझ्या मस्तकी घुसतच नाही"

पाठवतो मी हास्यआकृती
ओठावरही हास्य उमलते
जगात पसरे शांती, शांती
मोक्षाची मज प्राप्ती होते
---------

टीप:
निळी खूण: व्हॉटसॕपवरची 'तुमचा संदेश वाचला गेला आहे' हे दर्शवणारी ब्लू टिक
हास्यआकृती: स्माइली

कविताप्रेमकाव्यविनोद

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

15 Dec 2019 - 5:41 pm | अनन्त्_यात्री

आवडली!

चलत मुसाफिर's picture

15 Dec 2019 - 8:13 pm | चलत मुसाफिर

धन्यवाद!

श्वेता२४'s picture

16 Dec 2019 - 11:24 am | श्वेता२४

कोणताही इंग्रजी शब्द न वापरता कायप्पाच्या संज्ञांची रचना बेमालूमपणे कवितेत करण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासारखे आहे. बाकी एक शंका 'ती' कोण? :)

चलत मुसाफिर's picture

16 Dec 2019 - 3:48 pm | चलत मुसाफिर

निखळ, निरागस कविता समजून वाचा. :-)
प्रशंसेबद्दल धन्यवाद.

प्राची अश्विनी's picture

16 Dec 2019 - 11:32 am | प्राची अश्विनी

कविता आवडली.

चलत मुसाफिर's picture

16 Dec 2019 - 3:49 pm | चलत मुसाफिर

कृतज्ञ

खिलजि's picture

16 Dec 2019 - 12:27 pm | खिलजि

मस्तच झालीय ... सद्यस्थितीस अनुकूल ... --^-- दंडवत स्वीकारा

चलत मुसाफिर's picture

16 Dec 2019 - 3:50 pm | चलत मुसाफिर

पण दंडवत घालताना कपाळमोक्ष होणार नाही याची काळजी घ्या बरं का! :-)

राघव's picture

16 Dec 2019 - 12:57 pm | राघव

:-)

चलत मुसाफिर's picture

16 Dec 2019 - 3:51 pm | चलत मुसाफिर

सूचक, समंजस हास्य! :-)

mrcoolguynice's picture

17 Dec 2019 - 9:05 am | mrcoolguynice

कविता छान.

पण कवी आपल्या पत्नीशी फेस टू फेस न बोलता.
व्हाट्सएपवर का बरे संवाद साधत आहे ? ते कळले नाही.

चलत मुसाफिर's picture

17 Dec 2019 - 10:05 am | चलत मुसाफिर

काही सूक्ष्मदृष्टी काव्यरसिक हा मुद्दा बरोबर पकडणार हे कविता प्रकाशित केल्यावर लक्षात आले. जर सुरुवातीला "संदेशाची 'तिच्या' प्रतीक्षा" असं असतं ('सतत प्रतीक्षा'ऐवजी) तर प्रश्न मिटला असता. अर्थात वाचकाला कवितेचा अर्थ तरीही समजतोच.

तुमचा हा प्रतिसाद म्हणजे गंमतदार चावटपणाचे उदाहरण आहे. (स्वतःच्या!) पत्नीशी असा निर्मळ व नियमित संवाद व तसे नाते ज्यांचे असेल ते खरोखरच भाग्यवान म्हणावेत.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :-)

चलत मुसाफिर's picture

17 Dec 2019 - 10:22 am | चलत मुसाफिर

व्यवस्थापकाधिकार वापरून करणे जर शक्य असेल तर 'संदेशाची तिच्या प्रतीक्षा' असा बदल कराल का?

जव्हेरगंज's picture

20 Dec 2019 - 8:43 pm | जव्हेरगंज

केलं हो!
भारी कविता!!