आशय - भाग ७ - समाप्त

Primary tabs

किंबहुना's picture
किंबहुना in जनातलं, मनातलं
6 Dec 2019 - 8:04 pm

भाग ६

प्रस्तावना -
पहिल्या प्रस्तावनेत पण मी म्हणालो होतो, की महिला अत्याचार हा साधारणपणे नेहमीच ऐरणीवर येणारा विषय आहे, पण पौगंडावस्थेतील मुले देखील बऱ्याच वेळेस अश्याच गोष्टीना सामोरी जात असतात. या भागात अजून काही टाळता ना येण्याजोगे प्रसंग येतील. यामध्ये मला स्वतःला victim card खेळायची इच्छा नाही, देवाच्या कृपेने मी आता वयाच्या अश्या टप्प्यावर आहे की या गोष्टींचा काहीही दृश्य परिणाम माझ्या आयुष्यावर नाही, मला स्वतःला मुलगा पण नाही, ज्याची मी काळजी करावी. परंतु माझ्यासारखे अनेक जण या जगात असतील, ज्यांची समलैगिकतेशी झालेली ओळख अशीच वेदनादायक असेल. त्यांना काय वाटते, याच गोष्टी आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणून काय केले पाहिजे वगैरे विषय मला मांडायचे होते, कदाचित या भागात काही प्रसंग, आणि पुढच्या भागात उपसंहार, अशी मांडणी होईल. किंवा याच भागात संपेल.

पुढे चालू
मागे लिहिल्याप्रमाणे बस चा प्रवास ही माझ्यासाठी नेहमीची बाब होती. घरी जायचे असेल तर साधारण दुपारी 1 वाजता मी कोलेजवरून निघायचो, आणि बस पकडून मजल दरमजल करत साधारण 9 पर्यंत घरी पोचायचो. घरून महिन्याला साधारण 1000 मिळायचे, त्यामध्ये दोन वेळा घरी जाऊन येणे आणि मेस वगैरे धरून खर्च भागवायचा असे. पैसे संपले तर ते कोणाकडे मागणे लाजिरवाणे वाटायचे. घरी सगळ्यांचीच शिक्षणे चालू असल्यामुळे आई वडिलांना महिन्याला 5000 खर्च साधारण हॉस्टेलसाठीच व्हायचा. तेव्हा 5000 म्हणजे सामान्य माणसाची साधारण महिन्याची कमाई हाती...

साईड बिझिनेस म्हणून घरी दूध विकले जायचे. त्याचे पैसे घरी रोजच्या खर्चाला म्हणून वेगळे ठेवले जायचे.. मी कधी वाटलं तर त्यातून 50 रु वगैरे घेऊन जायचो, कधी आईच सांगायची या महिन्यात त्यातून पैसे घेऊन जा. पण एकदा गंमत झाली.
एका वर्गाच्या पार्टीसाठी मुलांनी 20रु वर्गणी काढली होती. ते 600-800रु माँझ्याकडेच होते. योगायोगाने पार्टी रद्द झाली, आणि ते पैसे माझ्याकडेच राहिले. आणि का कोण जाणे, कदाचित तेव्हाच्या स्वभावाला अनुसरून मी ते खर्च केले.
नंतर साधारण 15 दिवसांनी 2 मुलांनी माझ्याकडे पैसे परत मागितले, तेव्हा मला या 600रु च्या खाड्ड्याची जाणीव झाली, पण तोपर्यंत बजेट कोलमडले होते. मी ते पैसे तर सगळ्यांचे परत देऊन टाकले, पण हे 600रु कुठुन आणायचे असा मला प्रश्न पडला. सगळेच महिन्याचे गणित बिघडले होते. घरी मागायचे तर मग कुठे खर्च केले त्याचा हिशोब द्यावा लागला असता. शेवटी मी निर्णय घेतला की घरी जाऊ तेव्हा दुधाच्या पैशातले पैसे उचलून आणायचे.
घरी गेलो, निघताना ठरल्याप्रमाणे पैसे उचलले, पण ते खिशात ठेववेनात. आई बाबा करत असलेले कष्ट आठवले, त्यांनी ते पैसे कदाचित एखाद्या कामासाठी राखून ठेवले असतील, आपण गेल्यावर त्यांना हे पैसे चोरीला गेले हे कळेल, आणि आपल्यावरचा त्यांचा विश्वास उडेल, वगैरे अनेक विचार मनात आले, आणि मी ते पैसे परत ठेवून दिले.
त्यादिवशी मनाशी खूणगाठ बांधली, आपल्या चुकीची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे. पैसे खर्च झाले, ही आपली चूक आहे, मग ते पैसे आपणच वाचवले पाहिजेत.
पुढचे 3 महिने खूप कठीण गेले, सगळे खर्च कमी करत मी ते पैसे वाचवले, त्यासाठी शेवटचे 15 दिवस मेस बंद करून मला रूमवर नुसता भात करून जेवावे लागले. Exams चालू होत्या, घरी जायला रेल्वेने 50रु लागायचे, आणि माझ्याकडे खिशात 100रु होते. मी तांदूळ आणून शिजवून खाल्ले, नशिबाने गॅस होता, 5 लिटरवाला, त्यामुळे ते जमले.
पण हे मी तेव्हा केलं, म्हणून आज मी स्वतःच्या नजरेत पडलो नाहीये.
हा टर्निंग पॉईंट आला नसता, तर मला पैशाची किंमत कधीच कळली नसती. आज मला ती किंमत माहितेय, अजूनही मी खर्च करतो, पण फसवणुकीचा पैश्यापासून कायम 4 हात लांब आहे.. घरात चोरी करणारा मुलगा होतो मी. नशिबाने सावरलो म्हणून!

16व्या वर्षापासूनच प्रवास हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. (हा लेख लिहिताना पण मी बस मध्ये बसलेला आहे. ) पण एक टीनेजर म्हणून प्रवास करताना माझे अनुभव खूपच विचित्र होते. अर्थात मागे म्हटल्याप्रमाणे चेहऱ्यावर बावळटपणा लिहिलेला आहे म्हणून देखील असेल.. तसे दोन अनुभव खाली येत आहेत.
पहिला आहे बस मधून स्टँडिंग ने जाताना.. अर्थात बसमध्ये खूप गर्दी होती, परंतु अचानक माझ्यामागून सुस्कारे सोडण्याचा आवाज यायला लागला. मी थोडा सावध झालो, माझ्यामागे उभा असलेला माणूस माझ्या अंगाला अंग घासत होता. अनुभवाने तो काय करतोय हे मला लगेच कळले, परंतु भिडस्त स्वभावामुळे मी पुन्हा गप्प राहिलो. साधारण 15 ते 20 मिनिटे हा खेळ चालू होता , आणि त्यात माझा मूक सहभाग होता. कितीही वाटले तरी मी तिथून निघू शकत नव्हतो.
हा अनुभव तसा फार वाईट नाही.

दुसरा खूप विचित्र होता.
मी घरून निघालो, आणि बस बदलत बदलत रात्री 8 वाजता चिपळूण स्टॅन्ड वरती आलो. मला मुंबईची बस पकडून पुढे यायचे होते. आता गंमत बघा, खिशात फक्त उताराएव्हढे पैसे, आई नेहमी सांगायची की उताराच्या दुप्पट पैसे घेऊन निघ, पण त्या वेळेस नेमका मी त्या 600रु वाल्या भानगडीत होतो, त्यामुळे कडकी चालू होती.
चिपळूणला बसची वाट बघत असताना, माझ्याकडे एक माणूस आला, आणि मला म्हणाला माझ्याकडे मुंबईचं रिझर्व्हेशन आहे. तुला यायचे असेल तर तू बस माझ्याजवळ. मला काय ते पैसे दे. प्रथमदर्शनी ही डील चांगली वाटली, आणि मी त्याच्यासोबत जायला तयार झालो. बस आली, आम्ही बसलो, तिकीट दाखवून झालं.
माझा शेजारी शाल घेऊन झोपला होता. लाईट बंद झाले, आणि शो सुरू झाला. प्रथम त्याने माझ्या पॅन्ट वरती हात ठेवला, त्याचे उद्योग सुरू झाले. मी विचित्र परिस्थितीत सापडलो होतो. वय होतं 16. खिशात नवीन तिकीट काढायला देखील पैसे नाहीत. भिडस्त स्वभाव. शांत बसून राहिलो. खाद्य वेळाने त्याने माझा हात त्याच्या पॅन्ट वर ठेवला. मी तसाच स्तब्ध बसून होतो. त्याचे उद्योग चालुच होते, ते मला काही गोष्टी करायला सांगत होता, आणि अर्थात मी ते करत नव्हतो. पण एक क्षणी त्याने माझे डोके धरून त्याच्या मांडीवर माझे तोंड चेपले. (माफ करा वाचायला त्रास होत असेल तर, पण शब्दशः असेच झाले आहे). माझ्या अंगावर अक्षरश शिसारी आली. कशीबशी मी त्याच्यापासून सुटका करून घेतली.
एव्हाना त्यालाही कळले असावे की आता काही नवीन प्रयत्न केला तर प्रकरण हाताबाहेर जाईल, त्यामुळे तो देखील शांत झाला आणि झोपला. पण मी मात्र जीव मुठीत धरून त्याच्या शेजारी बसलो होतो.
दुर्दैवाने त्या दिवशी बस माणगाव ला थांबली नाही, आणि मला त्याच्यासोबत बसून पनवेलपर्यंत प्रवास करावा लागला.. आजही 20 वर्षांनंतर तो प्रवास माझ्या संपूर्ण लक्ष्यात आहे. पनवेलला उतरलो, आधी तोंड धुतले, पुढची उलटी बस पकडली, आणि रूम वर आलो. आजही हा विषय कितीही प्रयत्न केला तरी डोक्यातून जात नाही.
रूम मेट ला म्हणालो आज होमो भेटला, तर तो म्हणाला शाब्बास! मीही काही बोललो नाही अधिक. पण तो म्हणाला ST ने प्रवास करायचा तर असे काही अनुभव आणि प्रसंग येतातच, त्याला तोंड देणे हाच उपाय.

तिसरा प्रसंग काही प्रमाणात असाच आहे.
कॉलेजमध्ये तरुणांचे संघटन करणारी एक संघटना होती, आणि त्या संघटनेचे एक हितचिंतक होते. ते एक हॉटेल पण चालवायचे, त्यामुळे परवडणाऱ्या दरात खाण्यासाठी आम्ही नेहमीच तिथे असायचो. सुट्टीच्या दिवशी त्यांचौ घरी चित्रपट बघायला, किंवा मॅच बघायला आम्ही त्यांच्या घरी पडीक असायचो. काकू पण चांगल्या होत्या, एकंदरीत चांगले लोक.
पण
एकदा एका रविवारी मी एकटाच होतो, बाकी कोणी मित्रा पण नव्हते, म्हणून टाईमपास करायला मी त्यांच्या घरी गेलो. योगायोगाने काकू पण नव्हत्या.
मॅच चालू होती, मी बघत होतो. थोड्या वेळाने ते सहज म्हणाले, अरे बसलास कशाला, आडवा हो, मी पण होतो.
पुढे काय झाले असेल हे मी सांगायची गरज नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवाने मी सावध होतो. 10-15 मिनिटे झाल्यावर मी काहीतरी कारण सांगून तिथून बाहेर पडलो, आणि पुन्हा कधीही त्या घरात पाऊल ठेवले नाही.
नंतर चौकशी केली असता मला कळले की अजून काही जणांना तसाच अनुभव आहे, त्यामुळे त्याच्या घरी एकटे कोणीच जात नाही. मीही पुव्ह गेलो नाही, पण अन्य काही मित्रांइतके त्यांना तोंडावर शिव्या घालण्याइटके धाडस माझ्या अंगात नव्हते हे मात्र खरे. अर्थात त्या व्यक्तीने माझ्यावर देखील जबरदस्ती केली नव्हती, पण मी ओपन आहे का हे आजमावायचा प्रयत्न केला होता, हे कालांतराने माझ्या लक्षात आले, त्यामुळे माझा राग/त्रागा देखील कमी झाला. आज आमचे संबंध नसले, तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही, जसा नं 2 वाल्या पिसाटाबद्दल आहे.

उपसंहार-
हे सगळे अनुभव मी वयाची 17 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीचे आहेत. या अनुभवावरून अर्थातच नि शहाणा झालो, आणि पुढे असे काही झाले नाही माझ्या आयुष्यात. परंतु याचे उठलेले ओरखडे मात्र काही केल्या पुसले जात नाहीत.
काही गोष्टी जाणून घ्यायची मला देखील इच्छा आहे,
१. आपल्यापैकी अजून कोणी अश्या अनुभवातून गेले आहे का?
2. त्या वयात , त्या ठिकाणी तुम्ही असतात, तर कसे रिऍक्ट केले असते?
3. या अश्या अनुभवामुळे समलैंगिकतेबद्दल माझ्या मनात तिरस्कार, घृणा बसली आहे. तुम्हाला देखील असेच काही वाटते का?
४. या गोष्टी जेव्हा मी पुनरावलोकन करतो, तेव्हा मला असे वाटते, की योग्य वयात योग्य ते शिक्षण ना मिळाल्यामुळे मला या अनुभवांना सामोरे जावे लागले. आपल्या मुलांना असे अनुभव मिळू नयेत, किमान त्यांना या अनुभवांना सामोरे कसे जावे हे समजावे म्हणून काय करता येईल? कदाचित मी खूप जास्त संवेदनशील आहे, आणि भिडस्त पण आहे, म्हणून मला कदाचित हे जास्त लागले असेल. पण माझ्यासारखी अनेक मुले या जीवनाच्या शाळेत अश्याच ठेचा खत असणार, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो?

समाप्त
माझा पहिलाच प्रयत्न होता अशी लेखमाला लिहिण्याचा, त्यामुळे सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. अनेक लोक इच्छा असूनही केवळ ओळख उघड होण्याची भीतीने बोलत नसतील, त्यांना देखील मी समजू शकतो. धन्यवाद!

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

जेसिका ब्राउन's picture

7 Dec 2019 - 2:29 am | जेसिका ब्राउन

हो, एक मला असे अनुभव आले आहेत.
पण मी एक स्त्री आहे आणी मला असे अनुभव पुरुषांमुळे आले आहेत. बसमधे, शाळेत, ज्यांच्यावर खुप विश्वास होता अश्या मित्राकडुन. मी सगळ्या पुरुषांविषयी मनात घृणा ठेऊ का?

थोडे समलैंगिकतेबद्दल:
समलैंगिकता हा मानसिक किंवा शाररिक आजार नाही. समलैंगिकता ही लैंगिकतेची नैसर्गिक अभिव्यक्ती (expression) आहे. आपल्या समाजामध्ये ही अभिव्यक्ती दाबली गेली आहे. जर दोन व्यक्ति परस्परसम्मतिने लैंगिक संबंध ठेवत असतील तर समाजानी त्यात लुडबुड करायची काय गरज आहे? पण तसे होत नाही. आत्ताआत्तापर्यन्त समलैंगिकता हा भारतीय दंडविधानाखाली गुन्हा होता. एखादी समलैंगिक व्यक्ती उघड झाली तर त्या व्यक्तीचे काही खरे नाही - bullying, lynching, काहीही होऊ शकते. हा 'वेगळेपणा' समाज स्विकारत नाही. त्यामुळे विषमलैंगिक व्यक्ति ज्याप्रकरे उघडपणे आकर्षण व्यक्त करू शकतात त्याप्रमाणे समलैंगिक करू शकत नाहीत. मग अशी माणसे असे उद्योग करतात.

यावर उपाय - लैंगिक शिक्षण
वाढत्या वयात, शारीरिक व मानसिक बदल होत असतात, आई-वडिलांनी/guardians मुलांना समजून घेणं गरजचे असते. हे समजवणे गरजेचे आहे की एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे, त्याचबरोबर consent काय असतो आणि नाही कसे म्हणायचे हे ही समजावणे गरजचे आहे. त्या वयात मुलांशी मनमोकळे बोलणे अवघड असते पण तुम्हाला जर जमले तर ते अश्याप्रसंगा नंतर तुमच्याशी येऊन बोलतील आणि तुम्ही त्यांना मदत करू शकाल.