बिबट्याशी सामना

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
21 Oct 2019 - 7:24 pm

बालकथा
खास दिवाळी सुट्टीनिमित्त
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बिबट्याशी सामना
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“हॅलो नीलम, मी मुग्धा बोलतेय,”
'शी ! हिचा फोन आता रात्री कशाला ?’ नीलमला वाटलं . ती ट्रीपची तयारी करत होती. तरीही ती म्हणाली, “बोल गं.”
“ अगं, आमच्या मासिकाला पहिलं बक्षीस मिळालंय !”
“ अरे वा ! छान !” नीलम उगाच म्हणाली,” मी तुला नंतर फोन करू का ? आत्ता जरा गडबडीत आहे,” असं म्हणून तिने फोन ठेवूनही दिला. मग तोंड वेंगाडलं. आणि एका ब्रँडेड ,डार्क निळ्या सॅकमध्ये तिचे महागडे कपडे भरायची सुरुवात केली.
नीलम आणि तिचे आई बाबा ट्रीपला जाणार होते. त्यासाठी ती आईला मदत करत होती.
मुग्धा तिची वर्गमैत्रिण होती. त्यांच्या ग्रुपने एका बालमासिकाने भरवलेल्या ' हस्तलिखित मासिक' स्पर्धेत भाग घेतला होता. पूर्ण मासिक मुलांनीच तयार करायचं होतं. तिने त्यावेळी नीलमला विचारलं होतं. पण नीलमने तोंड वेंगाडलं होतं व भाग घेतला नव्हता. आता तर त्यांच्या मासिकालाच पहिलं बक्षीस मिळालं होतं.
मुग्धाने तिला आनंदाने ही बातमी सांगितली होती. पण नीलमला त्याचं काय ?
उन्हाळ्याची सुट्टी पडली होती. तिच्या बाबांनी त्यांच्या एका मित्राच्या शेतावर दोन दिवस जायचं ठरवलं होतं.
त्यांचा मित्र राजेंद्र याचं नारायणगावाजवळ एका खेडेगावात घर होतं. अगदी शेतातलं घर .
' बाबा, शेतावर काय मजा येणार ?' या तिच्या प्रश्नाला बाबांनी उत्तरही दिलं नव्हतं. आई अगदी उत्साहात होती. नीलमला वाटलं,या मोठ्या माणसांचं काही कळत नाही. खरं तर कुठेतरी भारी ठिकाणी जायला हवं होतं. जिथे भारी हॉटेल असेल, महागडे गेम्स असतील, पंजाबी खाना आणि चायनीज डिशेस असतील. पण छे !
नीलम एक पक्की शहरी मुलगी होती . स्मार्ट . केसांचा बॉय कट ठेवलेली . अन भाव खाणारी .
दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्यांच्या काळ्या ,फोर्ड कारमधून काकांच्या घरी गेले. दोन तासात ते पोचले होते. काकांचं शेत मोठं होतं. काका-काकूंनी त्यांचं स्वागत केलं. काकूंनी नीलमला जवळ घेतलं. आत मोठा हॉल होता. एका जुन्या झोपाळ्यावर जपमाळ घेतलेल्या आजी बसल्या होत्या. त्याही तोंड भरून हसल्या.
काकूंनी आईशी बोलता बोलता पोहे केलेसुद्धा. पोह्यांचा अगदी भूक खवळून टाकेल असा वास सुटला होता.
पोहे खाताना नीलमने दोन मुलांना पहिलं. एक मोठी मुलगी आणि एक लहान मुलगा. ते दाराआडून लपून तिच्याकडे पहात होते.
काकांची मुलं मोठी होती. ती शिक्षणासाठी शहरात होती. घरात माणसं तीनच. पण त्यांच्या घरी कामाला एक कुटुंब होतं.सदा, त्याची बायको शालन आणि त्यांची मुलं- मंगी आणि मन्या.
काका म्हणाले , “ निलू, मस्त खायचं प्यायचं . आराम करायचा. इथं शहरी गजबजाट नाही. मस्त वाटेल.”
‘ काय मस्त वाटेल ? इथे कम्प्युटर दिसत नाही, म्हणजे इंटरनेट नाही न फेसबुक नाही,' नीलमला वाटलं.
त्यात तिथे मोबाइलला रेंज नव्हती . येत-जात होती . वेळ लागत होता. म्हणजे वैतागच . व्हाटसअप नाही न इंस्टाग्राम नाही !
नंतर बाबा आणि काका बाहेर पडले. त्यांच्यामागे नीलम आणि तिच्यामागे मंगी आणि मन्या . तीच दारामागून लपून पाहणारी मुलं.
उन्हाळ्याचे दिवस असले तरी तेवढं , शहरासारखं गरम होत नव्हतं . शेतावर तर थांबून थांबून वारं येतच होतं. लांबवर नजरेला मोकळं दिसत होतं . कुठे शेतं , कुठे झाडी तर कुठे गुरं .
राजेंद्रकाका चांगले शिकलेले होते. पण ते जाणीवपूर्वक शेतीकडे वळले होते. शेती त्यांच्या वडलांची होतीच; पण मुख्य म्हणजे ते प्रगतिशील शेतकरी होते. ते त्यांच्या प्रयोगांबद्दल सांगत होते.-त्यांनी तयार केलेल्या वांग्याच्या रोपाला सहा-सात वर्षं वांगी येतात. एरव्ही नेहमीची रोपं चार-पाच महिनेच काय ती टिकतात. ही द्राक्षाची नवीन जात. आणि असं बरंच काही.
नीलमला त्यामध्ये काही रस नव्हता. नाईलाजाने तिने त्या मुलांकडे मोहरा वळवला.
मंगी दहा-बारा वर्षांची होती. तिच्याच वयाची . सावळी , काटकुळी पण तरतरीत. साधा, जुना फ्रॉक. केसांना चप्प तेल लावून त्यांच्या दोन वेण्या बांधलेल्या. मंग्या तर लहानच होता. सात-आठ वर्षांचा. तोही सावळाच . ढगळ कपडे घातलेला. गंमतशीर वाटणारा .दोघांचेही कपडे मातीत मळलेले होते.
नीलमने एकदा त्यांच्याकडे पहिलं व एकदा स्वतःच्या पॉश कपड्यांकडे . तिने तोंड वेंगाडलं.
तरीही तिने दोघांना त्यांचं नाव विचारलं. मंगीनेही तिला तिचं नाव विचारलं.
“तुम्ही दिवसभर काय करता ? काय खेळता ?” नीलमने विचारलं.
त्यावर मंगीने तिला जवळचा, वाळलेल्या चाऱ्याच्या पेंढ्यांचा मोठा ढिगारा दाखवला.
मन्या न सांगता लांब जाऊन उभा राहिला. मंगी ‘एक-दोन-तीन’ म्हणाली. त्याबरोबर मन्या पळत पळत आला व त्याने पाण्यात उडी मारावी तशी त्या ढिगाऱ्यावर उडी मारली. जोरजोरात हात मारत, पेंढयाच्या काड्या उडवत तो बाहेर आला. मंगीनेही तसं करून दाखवलं.
नंतर मंगी लांबून पळत पळत गेली व तिने उडी मारली. तिच्या मागोमाग मन्या. मन्या तिच्या अंगावर उडी मारणार होता. पण मंगी चपळाईने उडी मारल्या मारल्या बाजूला सरकून बाहेर आलीसुद्धा. मन्याला वेळ लागला.
नीलमला वाटलं, यांना जरा आपलं कौशल्य दाखवावं, पाण्यात डाइव्ह मारतो तसं. तीही पळतपळत आली व तिने त्या पेंढीवर सूर मारला. तिला पाण्यात उडी मारल्यासारखं वाटेल, असं वाटलं होतं. प्रत्यक्षात तिला त्या चाऱ्याच्या काड्या टोचल्या .ती कशीतरी हात मारत ' शी ! शी ! ' म्हणत बाहेर आली. तिला अंग खाजल्यासारखं व्हायला लागलं. एक काडी तर तिच्या डोक्यावर शेंडीसारखी अडकून बसलेली होती. ते पाहून त्या मुलांना हसूच आलं .
‘ शी ! हा कसला युसलेस खेळ ?’ ती फणकाऱ्याने म्हणाली व तिने तोंड वेंगाडलं.
“युसलेस म्हंजी ?” मंगीने विचारलं.
“ म्हणजे एकदम छान खेळ हां, कळलं ?” नीलम म्हणाली.
दुपारी जेवायला वांग्याचं भरीत होतं. वांगं शेतातलंच, ताजं - ताजं . त्यामुळे भाजी एकदम चविष्ट होती. नंतर गरमागरम वरण भात . त्यावर साजूक तुपाची धार . घरच्या तुपाचा हाताला लागलेला वास तो वास जाता जात नव्हता . नीलमने त्यामुळे भातही दोन घास जास्त खाल्ला होता.
जेवतानाही काका गमती सांगत होते.
“आमच्या शेतात पाण्याचा प्रश्न नाही, पण काही भागात आहे. जनावरं शेतात शिरतात.”
“ अय्या ! जनावरं ? म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स पण का ?” नीलमने विचारलं.
“ नीलू बेटा , इथे फारसे वाईल्ड ॲनिमल्स नाहीत. ससा ,साप,तरस, आणि क्वचित बिबटे. इथे जुन्नर भागात बिबटे जास्त. पण मी स्वतः अजून एकदाही पहिला नाही.”
“ का बरं ?” तिने अगदी उत्सुकतेने विचारलं .
“ ते रात्री येतात ना. पण असे सहजी दिसत नाहीत. पाणी नाही, जंगलं नाहीत. या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. बिच्चारे ! त्यामुळे त्यांना मानवी वस्तीत यावं लागतं.. तसा एकदा पाहिला होता मी. पण मोकळ्यावर फिरणारा नाही , पकडलेला , '”
संध्याकाळ झाली. चहापाणी झालं .
काका म्हणाले, “ आत्ता हवा मस्त असते. चला शेतात जाऊ या. “
सगळे बाहेर पडले.
सूर्य खाली आला होता. पण डोंगराआड जायला वेळ होता. हिरवं शेत वाऱ्यावर मखमल लहरावी तसं डोलत होतं. हवा मोकळी नि आल्हाददायक होती. शेतातलं डेरेदार आंब्याचं झाड मावळतीचं पिवळं ऊन ल्यालं होतं. हिरव्या रंगाच्या कैऱ्या असलेलं . हिरव्या कैऱ्यांवर पिवळं ऊन भारी वाटत होतं . हवा खूप होती आणि तिला मातीचा वास होता. नीलमला तो वास वेगळा वाटला.
शांत वातावरण होतं. त्याचा शांतपणा वाऱ्याच्या आवाजाने, बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळांमुळे भंग पावत होता.
ते सगळे आंब्याजवळ पोचले. मग तिथेच बसले. नीलम पळत निघाली. मंगी आणि मन्या होतेच तिच्या मागे.
ते बरेच लांब आले. तिथे मोकळी जागा होती. एक कडुनिंबाचं डेरेदार झाड होतं. पलीकडे विहीर होती . तिच्यावर बसवलेल्या इंजिनाच्या भवती पाण्याचं तळं साठलेलं होतं.
विहिरीला चांगलं पाणी होतं . स्वच्छ ! नितळ . खोल ,हिरव्या रंगाचं . विहीर पाहून नीलम खुश झाली. तिला टाईमपास सापडला होता .
“ ए मंगे. तुला पोहता येतं ?”
“ व्हय . मलाबी अन मन्यालाबी ,” मंगी म्हणाली.
नीलमला एकदम पोहण्याची सूरसूरी आली . तिला वाटलं, ' या गावरान मुलांना दाखवून द्यावं. आपण किती भारी पोहतो ते. यांना काय आपल्यासारखी ' डाईव्ह ' मारता येणारे ?'
“ चला आपण पोहुया. कपडे घेऊन यायचे ?” असं म्हणत नीलम मागे सरकली. आणि-
आणि शेतात जोराची सळसळ झाली...
दुसऱ्या क्षणाला एक तेजतर्रार बिबट्या बाहेर पडला व तिच्यावर झेपावला .
त्याने मागून झेप टाकल्याने नीलमला कळलं नाही. पण तिचं बोलणं मन लावून ऐकणाऱ्या मंगीने एकदम आरोळी ठोकली – “ नीलम ! ”...
तिच्या कर्णकर्कश्श आरोळीमुळे नीलम दचकली. तिचा पाय खालच्या एका दगडावरून घसरला व ती सपशेल मातीमध्ये आडवी झाली. तिचे चांगले कपडे व चेहरा मातीने भरला.
पण हे सुदैवच ! त्यामुळे बिबट्याची उडी तिच्यावर न पडता शेजारी पडली.
मंगीने बिबट्या पहिल्यांदाच पहिला होतं. तीही घाबरली होती. पण क्षणभरच… तिला कळून चुकलं कि तो बिबट्या नीलमवर पुन्हा हल्ला चढवणार. तिचा जीव वाचवला पाहिजे या विचाराने तिच्या अंगात, तिच्या काटकुळ्या हातात जणू हत्तीचं बळ संचारलं .
बिबट्या धडपडत उठला व मागे वळला . कारण त्याला मागच्या धोक्याचा अंदाज घ्यायचा होता . मागून त्याच्या अंगावर एक सणसणून दगड बसला होता .
तो दगड मंगीने मारला होता. आणि तीही जिवाच्या भीतीने पळाली व लपण्यासाठी तिने तिथे असलेल्या चाऱ्याच्या पेंढीवर सूर मारला. पण तिला डोळ्यांच्या कोपऱ्यातून बिबट्याही उडी मारतोय, हे कळलं. तिने उडी मारली व एका बाजूने ती धडपडत बाहेर पडली सुद्धा.
जशी ती मन्याला चुकवायची .
बिबट्याने जोरात उडी मारल्याने तो चाऱ्यात जणू बुडाला. तर, जमिनीचा कठीणपणा नसल्याने त्याला पटकन बाहेर निघता आलं नाही. तो जोरात, अगदी धडकी भरवणाऱ्या भयानक आवाजात ओरडला.
मन्या व नीलम धावत मोठ्या माणसांकडे पळाले.
मंगी आता एकटीच राहिली होती. प्रसंग बाका होता. ती विहिरीजवळ होती. बिबट्याने चिडून तिच्याकडे मोहरा वळवला . तो पिसाळला होता. त्याचं पिवळं , ठिपकेदार शरीर पिवळसर उन्हात चमकत होतं.
एकच क्षण अन बिबट्याने मंगीवर झेप टाकली.
चलाख अन चपळ मंगीने शेवटच्या क्षणी त्याला झुकांडी दिली.
धाड !......केवढा तरी आवाज झाला.
बिबटोबा विहिरीत पडले होते, अगदी नेम धरून. नीलमच्या भाषेत त्यांनी ' डाईव्हचं ' मारली होती जणू !
बिचारा बिबट्या तहानलेला होता. पण अशा रीतीने पाणी प्यायची त्याचीही काही इच्छा नव्हती . पण तो आता पाण्यातच अडकला. असा - की बाहेर पडणं अवघड . तो बावरला. विहिरीमध्ये दुसऱ्या बाजूला काही कामासाठी बांबू बांधले होते . तो त्या बांबूंवर , पाण्याच्या बाहेर येऊन बसला . तो चिडलेला होता व सतत घशातल्या घशात गुरगुरत होता . त्याला बाहेर येणं किंवा काढणं अवघड होतं.
मुलांचा आवाज ऐकून पळत आलेल्या काकांनी त्याची शेवटची उडी पहिली होती. त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता .
त्यांनी आधी वाकून विहिरीत पाहिलं . बिबटोबा आत अडकले होते. ते पाहिल्यावर धाडस दाखवलेल्या व आता हरणासारखं काळीज झालेल्या मंगीला त्यांनी जवळ घेतलं . त्यांनी पाठ थोपटल्यावर तिला धीर आला व ‘आई ‘असं ओरडत ती तिच्या आईला चिकटली. मन्या तिला .
नीलम तिच्या आईला चिकटली होती व मंगीकडे बघत होती. शूर मंगीकडे !...तिनेच दगड मारून नीलमवरचं संकट स्वतःवर घेतलं होतं . स्वतःच्या धाडसाने ते परतवलं होतं . नाहीतर ...?
नीलम च्या आईने देवाचे आभार मानले .
नीलमचा त्या मुलांकडे पहायचा दृष्टिकोनच बदलला होता . मुलं साधी होती . पण भारी होती . तिच्यापेक्षा ऍक्टिव्ह . हुशार . प्रसंगावधानी !...
बिबट्या तहानलेला होता , भुकेलेला होता . खरं तर त्याने आधी छोटे प्राणी शोधले असते; पण कासावीस करणाऱ्या भुकेने तो पिसाळला होता व त्याने माणसावर हल्ला केला होता .
माणसांमुळेच त्याला नाईलाजाने माणसांकडे यावे लागत होते !...
सगळ्याच मोठ्या माणसांचा जीव भांड्यात पडला होता . एक तीच चर्चा चालू होती . त्यादिवशी मंगी ' हिरोईन ' ठरली होती . आजूबाजूच्या शेतामधले लोक , गावामधले लोक येत होते .
बिबट्याला पहायला , मंगीला पहायला , तिचं कौतुक करायला!
त्या दोन्ही मुलांशी नीलमची आता चांगलीच गट्टी जमली . रात्री उशिरापर्यंत ते काय काय गप्पा मारत बसले.
दुसऱ्या दिवशी सकाळी वनविभागाचे लोक त्याला घेऊन गेले . त्यांनीही मंगीचं कौतुक केलं.
नीलमने मुलांना पत्त्यांचा खेळ शिकवला. ते क्रिकेटही खेळले . तिने काकांकडे परत यायचं व या मुलांशी खेळायचं असं मनाशी ठरवून टाकलं . नेहमी !
निघताना नीलमच्या आईने मंगल आणि मनेशच्या हातात हजार - हजार रुपये ठेवले . ती त्या मुलांची खरी नावं होती . बाबा काकांना म्हणाले ,"या मुलांच्या शिक्षणासाठी जी काही मदत लागेल, जेव्हा लागेल, ती मी करत जाईन . मला आवर्जून सांगा ."
ते निघाले. नीलमने काका , काकू व आजींना टाटा केला . मंगल आणि मनेश तर रस्त्यापर्यंत पळत आले ,टाटा करत करत .
गाडी पळत होती . नीलम गप्प बसली होती . तिला आता मुग्धाला भेटायचं होतं . कधी एकदा हा प्रसंग तिला सांगते ,असं तिला वाटत होतं . पुढच्या वेळी मासिकात भाग घ्यायचं तिने ठरवलं होतं . हाच प्रसंग ती लिहिणार होती . ती विचार करत होती .
' माझ्यावर बिबट्याने केलेला हल्ला ' हे शीर्षक -नाही नाही .
' मंगलचा बिबट्याशी सामना ! ' हे शीर्षक जास्त योग्य आहे .
मग तिच्या मनाला बरं वाटलं . तिने डोळे मिटून घेतले व ती शांत बसून राहिली .
गाडी पळत होती . वारं लागत होतं आणि तिच्या मनाला मस्त वाटत होतं .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
Bip499@hotmail.com

हे ठिकाण

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

21 Oct 2019 - 7:59 pm | जेम्स वांड

आणि खऱ्या अर्थाने "गोष्ट" म्हणावी अशी बालकथा खूपच आवडली. जमल्यास ही बालभारतीला पाठवा, बालसाहित्याला वाहिलेल्या किशोर मासिकात पण स्थान मिळु शकेल असे वाटते. खूप रिफ्रेशिंग आहे की "गोष्ट" मनातले प्रेज्युडायसेस पक्के न झालेली मुले किती लवकर परिस्थिती अनुरूप तोंडाने न बोलता आपल्या चुका मान्य करत सुधारणा करतात ते पाहणे कायम फ्रेशच असते.

सोत्रि's picture

22 Oct 2019 - 10:47 am | सोत्रि

शब्दाशब्दाशी सहमत! अतिशय सुंदर लिखाण.

- (बालपण आठवलेला) सोकाजी

यश राज's picture

22 Oct 2019 - 12:09 pm | यश राज

पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा असा लेख...
आवडला

जॉनविक्क's picture

21 Oct 2019 - 11:38 pm | जॉनविक्क

कोवळी निरागसता, अत्यन्त सुंदर.

जॉनविक्क's picture

21 Oct 2019 - 11:41 pm | जॉनविक्क

मिपा दिवाळी अंकात तुम्हाला नक्की मिस करेन

सोन्या बागलाणकर's picture

22 Oct 2019 - 4:14 am | सोन्या बागलाणकर

अतिशय निरागस आणी सुंदर बालकथा, सांगळे सर!

तुमच्या सगळ्याच कथा अतिशय वाचनीय आणि ताज्या असतात. मुख्य म्हणजे तुमच्या बालकथा त्या वयाला अनुरूप लिहिलेल्या असतात नाहीतर आजकाल बालमासिकांत उगाच मुलांना वयापेक्षा प्रौढ दाखवणाऱ्या कथा काही कमी नाहीत.

तुमच्या सारख्या लेखकांची सध्या नितांत गरज आहे. लिहीत रहा!

नरेश माने's picture

22 Oct 2019 - 11:45 am | नरेश माने

खुप सुंदर बालकथा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Oct 2019 - 5:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

एकदम भारी गोष्ट,
खरंतर याला बाल कथा का बरे म्हणावे?
अपण मोठे तरी कुठे फार वेगळे वागतो या पेक्षा?
पैजारबुवा,

नाखु's picture

22 Oct 2019 - 6:38 pm | नाखु

पु ले शु

उपेक्षित's picture

22 Oct 2019 - 7:34 pm | उपेक्षित

दादा असेच लिहिते राहा इतकेच बोलतो. (तुमच्या कथांमुळे बालपण आठवत साला.)

पाषाणभेद's picture

22 Oct 2019 - 10:23 pm | पाषाणभेद

फारच छान गोष्ट!

लई भारी's picture

23 Oct 2019 - 4:53 pm | लई भारी

असेच लिहीत राहा!

श्रीरंग_जोशी's picture

23 Oct 2019 - 6:20 pm | श्रीरंग_जोशी

वाह, ही कथा व तुमची वर्णनशैली खूप आवडली. नीलमच्या वयोगटातल्या मुलांचे भावविश्व उत्तमपणे परिवर्तित झाले आहे.

श्रीरंग_जोशी's picture

24 Oct 2019 - 4:53 am | श्रीरंग_जोशी

कृपया 'परिवर्तित झाले आहे' ऐवजी 'परावर्तित झाले आहे' असे वाचावे.

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Oct 2019 - 9:43 pm | बिपीन सुरेश सांगळे

मी सर्वच वाचकांचा मनापासून आभारी आहे .
लोकांना गोष्ट आवडली आहे , हे पाहून बरं वाटतं .
मुलांपर्यत पोचवावी , ही विनंती .
लोभ असावा .

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Oct 2019 - 9:47 pm | बिपीन सुरेश सांगळे

जेम्स
खूप आभार .

सोकाजी
बालपण आठवलं ?
लिहिताना मीही थोडं जगून घेतो ते.

यशराज
नशिबात असेल तर जाईल पाठयपुस्तकात . आभार

नरेश
नाखु
पाषाणभेद
लै भारी

हुरूप आला

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Oct 2019 - 9:49 pm | बिपीन सुरेश सांगळे

जॉन
आभार
साहित्य संपादक तुम्हाला नाराज करणार नाहीत , असा आशावाद मी बाळगतो
प्रतीक्षेत

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Oct 2019 - 9:51 pm | बिपीन सुरेश सांगळे

| सोन्या बागलाणकर
अहो सर वगैरे काय ?
संकोच वाटतो

तुमच्या सगळ्याच कथा अतिशय वाचनीय आणि ताज्या असतात. मुख्य म्हणजे तुमच्या बालकथा त्या वयाला अनुरूप लिहिलेल्या असतात नाहीतर आजकाल बालमासिकांत उगाच मुलांना वयापेक्षा प्रौढ दाखवणाऱ्या कथा काही कमी नाहीत.

तुमच्या सारख्या लेखकांची सध्या नितांत गरज आहे. लिहीत रहा!

मी सहमत आहे . \\

पण माझ्या या प्रकारच्या लेखनावर चुकीच्या प्रतिक्रिया हि आलेल्या आहे त .
कारण माहित नाही

सोन्या बागलाणकर's picture

6 Nov 2019 - 3:48 am | सोन्या बागलाणकर

तुम्ही मनावर घेऊ नका अश्या प्रतिक्रियांचे... कुछ तो लोग कहेंगे , लोगो का काम है केहना... तुम्ही उत्तम लिहिता, असाच मिपावर प्रेम असू द्या.

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Oct 2019 - 9:52 pm | बिपीन सुरेश सांगळे

पैजारबुवा
अधिक काय बोलावे ? ...

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Oct 2019 - 9:56 pm | बिपीन सुरेश सांगळे

| उपेक्षित
दादा असेच लिहिते राहा इतकेच बोलतो. (तुमच्या कथांमुळे बालपण आठवत साला.)

उपेक्षित दादा
मला पण बरं वाटलं साला ! . खरंच .
लै आभार .

लेखक आणि वाचक -
रोजच्या आयुष्याच्या धबडग्यात हेच तर थोडे क्षण मनाला फुंकत घालण्याचे

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Oct 2019 - 9:57 pm | बिपीन सुरेश सांगळे

| श्रीरंग_जोशी
वाह, ही कथा व तुमची वर्णनशैली खूप आवडली.

खूप आभार

जुइ's picture

24 Oct 2019 - 4:24 am | जुइ

मराठीत लिहिलेली बालकथा खूप काळानंतर वाचली. अजूनही अशा बालकथा वाचायला आवडतील.

सुचिता१'s picture

24 Oct 2019 - 1:43 pm | सुचिता१

छान!! छोट्या वाचकांना तर नक्कीच आवडेल.
कथेत घटनांचे वर्णन छान जमलेले आहे. पुलेशु!!