कोकणी वडे

मनीमोहोर's picture
मनीमोहोर in जनातलं, मनातलं
21 Oct 2019 - 4:14 pm

वडे म्हटलं की मराठी मनाला आठवतात ते वरती बेसनाचे पातळ कुरकुरीत आवरण, आत लसूण आलं घातलेली बटाट्याची भाजी, आकाराने लहान आणि चपटे, खरपूस तळलेले, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाल्ले जाणारे, कायमच कमी पडण्याचा शाप असलेले, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बटाटेवडे. पण कोकणी माणसाला वडे म्हटलं की हे वडे न आठवता पुरी सारखे दिसणारे तांदुळ, उडीद डाळीचे वडे जे " मालवणी वडे " म्हणून ही प्रसिद्ध आहेत तेच वडे आठवतात.

कोकणात आमच्याकडे कोणत्याहि शुभ कार्याला, कुळाचाराला, तसेच श्रद्धपक्षादि विधींना हे वडे लागतातच. कोकणातला पदार्थ असल्याने नॅचरली ह्यात मुख्यत्वे तांदुळच असतात. तांदळात थोडी उडीद डाळ आणि थोडे धणे जिरं घालून भरडसर दळून आणलं की झालं वड्याचं पीठ तयार. एकदा कोणताश्या कार्यासाठी वड्याचं पीठ करायचं होतं पण उडीद डाळ थोडी कमी होती घरात. त्याकाळी दुकानं नव्हती घराजवळ हवी ती वस्तु लगेच विकत जाऊन आणायला. तडजोड म्हणून माझ्या तिथे रहाणाऱ्या सासुबाईनी मग त्यात थोडे गहू घातले. त्या पिठाचे वडे गव्हामुळे मऊ आणि तांदूळ उडीद डाळीमुळे खुसखुशीत आणि चवीला खूप छान झाले. सगळ्यांनाच आवडले. म्हणून तेव्हापासून थोडे गहू ही घातले जातातच पीठ तयार करताना. आमच्याकडे कार्यप्रसंगी वडे भरपूर लागतात आणि मुंबईच्या चाकरमान्यांना ही जाताना थोडं पीठ देतोच. म्हणून पीठ केलं की ते भरपूर प्रमाणावरच कराव लागतं.

वड्याचं पीठ भिजवायचं काम नेहमी माझ्या जाऊबाईच करतात. त्यामागे कारण ही तसंच आहे. एकदा असंच काहीतरी कार्य होतं घरात. घरची मंडळी, पाव्हणे , गडी माणसं मिळून भरपूर पानं जेवायला होती. वडे केले होतेच कुळाचारासाठी म्हणून. त्या दिवशी जाऊबाई काहीतरी दुसऱ्या कामात बिझी होत्या म्हणून आचाऱ्याने वड्याचं पीठ भिजवलं होतं. दुपारी पंगत बसली. मात्र नेहमी वड्यांवर तुटून पडणारी मंडळी आज वडे नको म्हणत होती. अगदी गड्यांच्या पंगतीत ही मंडळी “ वैनीनू, वडो नको , भातचं घेतंय “ असंच म्हणत होती. पंगतीच्या शिष्टाचारा नुसार वडे का नकोत हे कोणी सांगत ही नव्हतं. शेवटी सैपाकघरात जाऊबाईंनी एक तुकडा तोंडात टाकून बघितला आणि कारण कळलं. वडे खूपच कडक झाले होते. ते दातांनी चावण ही कठीण होत. कडकपणामुळे खाताना तोंड ही हुळहुळलं जात होतं आणि म्हणूनच वड्यांकडे पाठ फिरवली जात होती. रात्री घरातल्या एका सुगरणीने ते वडे हाताने चांगले कुस्करले. त्यात कांदा टोमॅटो मिरची वैगेरे घालून जरा मुरवत ठेवले आणि एका नवीन चवदार पदार्थाचा जन्म झाला. सगळ्यांनी ते आवडीने खाल्ले. मात्र तेव्हापासून काही झालं तरी जाऊबाईच पीठ भिजवतात वड्याचं.

वड्याची कृती तशी सोपीच आहे. करायचं काय तर पिठात मीठ, अगदी थोडं तिखट, किंचित हळद आणि तेल घालून सगळं सारखं करून घ्यायचं . नंतर त्यात गरम पाणी घालून ढवळून थोडा वेळ झाकून ठेवायचं. थोडं मुरलं की थंड पाणी आणि तेलाचा हात लावून ते पोळ्यांच्या कणके इतपत सैल मळून घ्यायचं. मग त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून केळीच्या पानावर लिपुन म्हणजेच थापून त्याची पुरी करायची आणि गरम तेलात सोडून खरपूस तळून काढायचे.

आमचं कुटुंब मोठं असल्याने वडे नेहमीच खूप मोठया प्रमाणात करावे लागतात. त्यामुळे जनरली हे मागच्या पडवीत चूल मांडूनच केले जातात. नवीन लग्न झालेली सुनबाई घरात असेल तर शकुनाचे म्हणून तिच्याकडून पहिले पाच वडे लिपुन घेतात. एक दोघी पीठ मळून लाट्या करायला, दोघी तिघी वडे थापायला आणि एक तळणीशी इतक्या जणी तरी कमीत कमी लागतातच. गप्पा मारत मारत मागे कधीतरी कोणाच्या तरी लग्नात वडे कसे कमी पडले पण जाऊबाईंनी चतुराईने परत पीठ भिजवून वेळ कशी साजरी केली वैगेरे आठवणी सहाजिकच निघतात. तसेच माझ्या एका सासूबाईंची आठवण ही नेहमी निघते वडे करताना. त्या अगदी गोऱ्या पान आणि शेलाट्या होत्या. एक पाय दुमडून त्या पाटावर वडे थापायला ( कोकणात वडे लिपतात , थापत नाहीत खरं तर ) बसत असत. आपल्या लांबसडक नाजूक बोटांनी हळुवार हातानी वड्यावर बोटांचे ठसे न उमटवता त्या इतके सुंदर वडे लिपत असत की बघत रहावे. बांगड्या, पाटल्या घातलेले , वड्यावर नाजूकपणे गोल गोल फिरणारे त्यांचे हात विलक्षण सुंदर दिसत असत. अगदी एकाग्र चित्ताने त्या वडे लिपत असत आणि म्हणूनच S तेव्हा त्या अतिशय सुन्दर ही दिसत असत. असो. तर काय सांगत होते अश्या पाच सहा जणी लागल्या करायला की बघता बघत वेचणी मध्ये टम्म फुगलेल्या, पिवळसर लालसर रंगावर तळलेल्या वड्यांचा ढीग जमू लागतो. तळणीचा धूर आणि वड्यांचा खमंग वास नाकात जाऊन आता थोड्याच वेळात पंगत बसणार आहे ह्याची वर्दी ही देतो.

जेवणाची पंगत बसली की वडे सर्वानाच आवडत असल्याने त्यानाच जास्त डिमांड असते. गरम गरम वडे चवीने खाल्ले जातात. लहान मुलं ही हातात धरून नुसता वडा मजेत खातात. खोबऱ्याची चटणी, लोणचं, वांग्या बटाट्याची भाजी , लोणी, दही ह्या गोष्टी वड्याची चव आणखी खुलवतात. वड्यांबरोबर पाण्याला तांदळाचं पीठ लावून त्यात गूळ आणि भरपूर नारळाचा चव, किंचित मीठ आणि जायफळ घालून केलेलं घाटलं किंवा आम्ही त्याला " रस " ही म्हणतो त्या बरोबर ही छान लागतात हे वडे. संध्याकाळी जेवताना वड्यांबरोबर खाण्यासाठी कुळथाच पिठलं केलं जातच. कु पी आणि वडे हा एकदम हिट बेत आहे आमच्याकडे. एवढं करून ही जर वडे उरलेच तर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर ही हे मस्तच लागतात. ताज्या वड्यांपेक्षा शिळे वडे आवडणारी मंडळी ही आहेत घरात. तात्पर्य काय तर वडे संपेपर्यंत अगदी शिळे झाले तरी आवडीने खाल्ले जातात. आणि संपले की “ अरे रे ! संपले का “? अस ही वाटतंच नेहमीच.

अशी ही कोकणातल्या वड्यांची चवदार कहाणी इथे सफळ संपूर्ण

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

21 Oct 2019 - 4:42 pm | जेम्स वांड

वड्यासोबत कोंबडीचा उल्लेख नाही! असं कसं बुआ? , बाकी स्मरणरंजन उत्तम, तुमच्या घरी वडे एकंदरीतच जरा जास्त लागतात हे चांगलेच ठसले मनावर (कृपया हलके घेणे)

एकंदरीत मस्त लेख, एका खाद्यपदार्थ असणाऱ्या वास्तुभोवती गुंफलेले स्मरणरंजन आवडले.

सतिश गावडे's picture

21 Oct 2019 - 5:05 pm | सतिश गावडे

कोकणातील वड्यांचा उल्लेख कोंबडीच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. तुमचं घर शाकाहारी दिसतंय.

जेम्स वांड's picture

21 Oct 2019 - 5:11 pm | जेम्स वांड

कोकणातील मांसाहार (मासे सोडून इतरही) फारच सुरस प्रकरण असल्याचे मत खालील विडिओ पाहून झालेले आहे, चक्क नारळाच्या कोळशाची पावडर घातलेला रस्सा, तो काळा रसा पाहून आमच्या घाटावरचे काळ्या मसाल्यातील मटण आठवले, पण रंग काही त्याचाही इतका अट्टल नसतो, एकदा तरी हे बनवून पाहायचा मानस आहे.

पद्मावति's picture

21 Oct 2019 - 5:28 pm | पद्मावति

मनीमोहर, खूप मस्तं वर्णन.

आमच्या घरात जेवणाच्या आधीच थोडे वडे बाजूला काढले जातात दुसऱ्या दिवशी चहात बुडवून खाण्यासाठी