सरांनी सांगितलेली गोष्ट

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
15 Oct 2019 - 10:54 pm

सरांनी सांगितलेली गोष्ट
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(बालकथा - वयोगट - मोठा )
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आज शाळेचा पहिला दिवस होता. उन्हाळ्याची सुट्टी संपली होती. आकाशात ढगांची गडगड होती आणि वर्गात मुलांची गडबड !
क्रीडांगणाच्या एका बाजूला प्राथमिक आणि दुसऱ्या बाजूला हायस्कूल .
सर यायला वेळ होता. नवीन वर्ग असूनही हर्ष बिनधास्त होता. अफाटच पोरगा होता तो ! त्याने फळ्याजवळचा खडू उचलला. त्याने फळ्यावर एक चित्र काढलं -
सुरवार - झब्बा घातलेला एक माणूस. तो घसरलाय आणि त्याच्या डोक्यावरची गांधी टोपी उडाली आहे. आणि त्यामुळे त्याचं टक्कल दिसतंय ,असं गंमतीशीर चित्र त्याने काढलं होतं.
ते चित्र चव्हाण सरांचं होतं. ते प्राथमिकचे पर्यवेक्षक होते.
आठवीचे वर्गशिक्षक विश्वनाथ सर वर्गात आले.दणकट बांध्याचे , बारीक केस कापलेले .
त्यांच्या पहिलवानी शरीराकडे पाहून मुलं 'आता पुढे काय होणार ?' याचा विचार करू लागली. हर्षकडे पाहू लागली. तो गप्प झाला.
सरांनी शांतपणे डस्टर उचललं व फळ्यावरचं चित्र पुसलं. मग ते म्हणाले, " मुलांनो, मी तुम्हाला इतिहास शिकवणार आहे . त्याआधी, आपण शिवाजीमहाराजांचं चित्र काढू या. कोण काढेल ? कोणाची चित्रकला चांगली आहे ? "
मुलं ओरडली - "हर्ष !"
मुलांना मजा वाटली. चित्र काढणारा मुलगा अलगद सरांच्या जाळ्यात अडकला होता..... सर भारी होते !
" हर्ष, पुढे ये. फळ्यावर शिवाजीमहाराजांचं चित्र काढ ," सर म्हणाले .
हर्ष वरमला.
"अरे, घाबरू नकोस. खरंच काढ ."
त्याने एक घोड्यावर बसलेल्या शिवाजीमहाराजांचं छान चित्र काढलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा, सरांनी हर्षकडे पाहिलं. ते हसले. त्यांना काही आठवलं. ते म्हणाले," मी एक गोष्ट सांगतो."
मुलं येsss करुन ओरडली. पहिल्याच दिवशी गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून !
सर सांगू लागले.-
" ही गोष्ट खूप जुनी आहे. जवळजवळ १९५० सालातली.कोकणातली.
कोकणात दापोली नावाचं शहर आहे. त्या जवळच्या एका खेड्यात एक साधा पण हुशार मुलगा राहायचा. त्याला शिकण्याची खूप गोडी. पण घरची अतिशय गरिबी. त्यावेळचं वातावरण , कष्ट व गरिबी असलेल्या आयुष्याचा तुम्ही आज विचारही करू शकणार नाही.
अंगभर कपडे नाहीत. खाली फक्त एक लंगोटी. दप्तर नाही. एका फडक्यात वह्या-पुस्तकं बांधायची. शाळा दहा मैल दूर. शाळेत चालत जायचं. कधी कोणी बरोबर असायचं नसायचं . बरं, रस्ता ? तोही धड नाही. खाच-खळगे, दगड -धोंडे, ओढे-नाले आणि साप-विंचू ! ... सकाळी खायचं आणि शाळेला सुटायचं. घरी आलं की अभ्यास. पटपट अभ्यास उरकायचा. अंधार पडायच्या आत- कारण लाईट नाही आणि दिव्यात वात असली तरी तेल नसायचं. पोटं रिकामी असली तरी रात्री जेवण नसायचं !...."
सर सांगत होते. मुलं डोळे विस्फारून ऐकत होती.
"एकदा काय झालं ? शाळा सुटली. रस्त्यावर गारुड्याचा खेळ चालू होता. तो एका देखण्या नागाला टोपलीबाहेर काढून त्याच्याशी सहजपणे खेळत होता. मुलं आश्चर्याने पहात होती. घाबरून नव्हे, कारण कोकणातल्या मुलांना सापाचं काय कौतुक ? त्यांच्या इथं साप पैशाला पासरी . त्यांना गारुड्याचं कुतूहल वाटत होतं. तो विषारी नागाशी लीलया खेळत होता. डोलत होता. पुंगी वाजवत होता, डमरू वाजवत होता.
- आणि जमलेली गर्दी पैसे देत होती !
त्या मुलाला फक्त पैसे गोळा करणारा तो गारुडी दिसत होता.
खेळ संपला तसा मुलगा निघाला. त्याच्या डोक्यात आता जणू विचारांची पुंगी वाजत होती. तो त्या धुनेवर जणू डोलत पुढे सरकत होता.
झाडांच्या शेंडयावरून संध्याकाळ खाली उतरत होती. त्याला झपाझप पाय उचलायचे होते. पण ? - त्याच्या वाटेवर एके ठिकाणी सागाची झाडं होती. त्यापलीकडे वारूळ होतं. त्याच्या आसपास त्याने एक चमकदार नाग दोन-तीन वेळा पहिला होता... काय असावं त्याच्या डोक्यात ? ...
- त्याला तो नाग धरायचा होता. जिवंत, तुकतुकीत, विजेसारखा सळसळणारा !
आणि त्याला तो गावला. तडफदार फण्याचं रुबाबदार जनावर !डोक्यावर काळसर दहाचा आकडा असलेलं .
मुलाने विचार न करता त्याच्यावर झेप घेतली. ते जनावर कसलं चपळ ! ते झटक्यात पुढे गेलं. पण हवाच कोंदटलेली होती. अस्वथ करणारी. त्या नागालाही कसनुसं होत असावं.तो पुढे गेला आणि मागे वळून फणा काढून उभा राहिला.
आता मात्र मुलगा घाबरला. आता प्राणाशी गाठ होती ! आजूबाजूला कोणी नव्हतं.मुलाने धडपडत त्याची पुस्तकं उचलली व तो पळत सुटला. जीव खाऊन , वेडावाकडा -लांब ! धापा टाकतच तो घरी पोचला.
आई त्याच्याकडे पहात राहिली. " काय रे ? काय झालं ? "
मग त्याने आईला सगळं सांगितलं. त्याला तो नाग धरायचा होता. गारुड्यासारखा खेळ करण्यासाठी ! पैसे मिळवण्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी.
आई कडाडली ," मी अजून काम करीन. उपाशी राहीन. पण असल्या थेराच्या मागे लागू नकोस. शिक अन मोठा हो."
मुलगा शरमला.
पुढे तो शिकला. खूप शिकला. शिक्षक झाला. मग मुख्याध्यापक ! पण तो त्याची परिस्थिती व आईची शिकवण विसरला नाही.
गरिबीमुळे कोणाच्या शिक्षणाला अडथळा येऊ नये, याची त्याला तळमळ होती. तो विद्यार्थ्यांना नेहमी मदत करायचा. जमेल ती, वाट्टेल ती !
त्याच्या शाळेत एक मुलगा होता. त्याला गरिबीमुळे एकदा फी भरणं शक्य नव्हतं. तेव्हा त्या मुख्याध्यापकांनी ते पैसे स्वतः भरले. त्यावेळी त्यांनी स्वतःची कहाणी त्या विद्यार्थ्याला सांगितली.
मग त्यांचा तो विद्यार्थी पुढे शिकतच गेला. पण तो मुख्याध्यापकांची शिकवण विसरला नाही. नेहमीच त्याने शिक्षणाला महत्व दिलं. आपण शाळेत शिकण्यासाठी येतो, हे तो कधीच विसरला नाही.....
आता तुम्ही मला सांगा. उद्यापासून तुम्ही दंगा करणार का अभ्यास ?"
इतक्या वेळ गोष्ट ऐकणाऱ्या मुलांच्या माना खाली गेल्या. वर्गात चिडीचूप शांतता पसरली. एखादा हळू आवाज-' अभ्यास ! '
सर पुढे बोलू लागले , " साप पकडायचा प्रयत्न करणारा तो गरीब मुलगा, जो पुढे मुख्याध्यापक झाला, तो म्हणजे या हर्षचे आजोबा !......"
मुलं आश्चर्यचकित . हर्ष त्यांच्या दुप्पट !
" आणि त्यांचा तो लाडका विद्यार्थी विशू- म्हणजे मी !...."
पूर्ण वर्ग अवाक होऊन सरांकडे पहात राहिला.
"हर्ष, संध्याकाळी नुसतं खेळण्यापेक्षा, मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा आजोबांच्या जवळ बस. त्यांच्या तोंडून हे सारं ऐक . त्यांच्याकडे गोष्टींचा ,ज्ञानाचा , अनुभवांचा खजिना आहे."...
सरांचं बोलणं ऐकून हर्षला लाजल्यासारखं झालं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं . पण जवळ येऊन सरांनी जेव्हा स्वतः त्याची पाठ थोपटली , त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं, तेव्हा त्याचे डोळे काहीतरी चांगलं करण्याच्या उर्मीने चमकले.
बाहेर- तास संपल्याची घंटा वाजली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

15 Oct 2019 - 11:28 pm | धर्मराजमुटके

सुंदर कथा. आवडली.

रमेश आठवले's picture

16 Oct 2019 - 3:41 am | रमेश आठवले

छान गोष्ट

प्राची अश्विनी's picture

16 Oct 2019 - 8:59 am | प्राची अश्विनी

आवडली गोष्ट.

नूतन's picture

16 Oct 2019 - 9:15 am | नूतन

कथा आवडली

यशोधरा's picture

16 Oct 2019 - 9:20 am | यशोधरा

कथा आवडली.

जालिम लोशन's picture

16 Oct 2019 - 2:11 pm | जालिम लोशन

आवडली.

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Oct 2019 - 9:50 pm | बिपीन सुरेश सांगळे

सर्व रसिक वाचकांचा खूप आभारी आहे
लोभ असावा

सुचिता१'s picture

16 Oct 2019 - 10:08 pm | सुचिता१

खूप च छान!!

वकील साहेब's picture

17 Oct 2019 - 11:55 am | वकील साहेब

छान कथा. अगदी नेहमीप्रमाणे

नाखु's picture

17 Oct 2019 - 12:17 pm | नाखु

मुलांच्या कलाने सांगितलेली गोष्ट आवडली

बाल कथा पंखा नाखु

समीरसूर's picture

17 Oct 2019 - 2:11 pm | समीरसूर

अतिशय सुंदर, साधी, आणि ओघवती कथा! मनाला भिडणारी...खूप आवडली.

बिपीन सुरेश सांगळे's picture

19 Oct 2019 - 1:56 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाचकांचा खूप आभारी आहे .
वकीलसाहेब, नाखु,समीरसूर -

बिपीन सुरेश सांगळे's picture

19 Oct 2019 - 1:57 pm | बिपीन सुरेश सांगळे

ही कथा आपल्याला जमेल तशी मुलांपर्यंत पोचवावी , ही विनंती