तब्बेत : ‘त्यांची’ आणि आपली !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
7 Oct 2019 - 2:03 pm

माणूस हा एक प्राणी आहे. जीवशास्त्रानुसार प्राण्यांचे प्रजाती आणि जाती ( Genus & Species) असे वर्गीकरण करतात. त्यानुसार माणूस होमो सेपिअन्स या कुळात येतो. ‘सेपिअन’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘शहाणा’ असा आहे. सुमारे २४ लाख वर्षांपूर्वी या कुळाची निर्मिती झाल्याचे मानतात. तिथून पुढे उत्क्रांती होत माणूस आजच्या अवस्थेला पोचला आहे. मानवजातीच्या या अनोख्या इतिहासाचा विस्तृत आढावा युव्हाल नोव्हा हरारी यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘सेपिअन्स’ या पुस्तकात घेतला आहे. हे विद्वान जेरुसलेम इथल्या विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. त्यांचे हे पुस्तक २०११मध्ये प्रकाशित झाल्यानंतर जगभरात खूप गाजले. एव्हाना त्याचा ३० हून अधिक भाषांत अनुवाद झालेला आहे, ज्यात मराठीचाही समावेश आहे. सध्या मी हे मराठी पुस्तक वाचत आहे. एव्हाना जागतिक साहित्यविश्वात या पुस्तकावर अनेक लेख व परीक्षणे प्रसिद्ध झाली असून चर्चाही झडल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण पुस्तकाचा गोषवारा वगैरे लिहीण्याचा माझा इरादा नाही. लेखकाने या पुस्तकात मानवी आरोग्यासंबंधी बरीच मते व्यक्त केली आहेत. अश्मयुगातील मानव, भटके व शिकारी, शेतकरी आणि आजचा आधुनिक शहरी माणूस यांच्या एकंदरीत आरोग्याची तुलनाही केलेली आहे. तेव्हा फक्त आरोग्य हाच धागा पकडून मी या पुस्तकासंबंधी काही विवेचन करणार आहे.
.......
तब्बेतीच्या दृष्टीने दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपला दैनंदिन आहार आणि शारीरिक हालचाली. अश्मयुगातील आपले पूर्वज आणि आपण यांची तुलना करता यासंदर्भात खूप फरक पडलेत हे उघड आहे. पुस्तकात या जीवनशैलीचे सविस्तर वर्णन आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे असे:

आहार: अश्मयुगात माणूस गवताळ प्रदेश आणि अरण्यात राहत असे. इथे अन्नाची कमतरता होती. कशीबशी कंदमुळे आणि फळे मिळत. पिकलेली गोड फळे हे तर तेव्हाचे मिष्टान्न होते. जर अन्जीरांनी लगडलेले झाड दिसले तर त्यावर तिथल्या सगळ्या प्राण्यांचा हक्क असे. ही फळे जर बबून-माकडांच्या कळपाच्या नजरेस पडली तर ते त्यावर झडप घालून वेगात फस्त करीत. हे पाहिल्यावर माणूस एक गोष्ट शिकला. जर त्याने ही फळे आधी पहिली तर प्राण्यांच्या नजरेस पडण्यापूर्वीच ती शक्य तितकी खाऊन घ्यायची. त्यामुळे हे खाणे अर्थातच बकाबका होई. असे वारंवार झाल्यावर ती सवय त्याच्या हाडामासात रुजली आणि कालांतराने ती थेट जनुकांत नोंदली गेली. त्यामुळे अन्न दिसले रे दिसले की गरजेपेक्षा जास्तच खायची सवय अंगी मुरली.

• आता शिकारी व भटके यांचे आयुष्य पाहू. ते साधारण ३ दिवसातून एकदाच शिकार करत. त्यामुळे दिवसाचे मोजकेच तास अन्न शोधण्यात जात. ते रोज जेवणाचे वेळेपूर्वी घरी येत. त्यांना कुटुंबाबरोबर बराच वेळ घालवता येई आणि गप्पाटप्पा, मुलांशी खेळणे याही गोष्टी ते निवांत करीत.

• भटकंतीतून मिळणारे अन्न उत्तम पौष्टिक असे. हे अन्न विविधता असलेले होते, जसे की अळंबी, बेरी, फळे, गोगलगायी, कासव, ससा, रानटी कांदे.
• ते लोक सुपोषित होते आणि त्यांची उपासमार होत नव्हती हे त्यांच्या सांगाड्यांच्या अभ्यासावरून सिद्ध झालेले आहे. तसेच ते त्यानंतरच्या काळातील शेतकऱ्यांपेक्षा अधिक निरोगी व उंच असल्याचेही आढळले आहे.

• ते एकाच प्रकारच्या अन्नावर अवलंबून नसल्याने वेळप्रसंगी त्यांची उपासमार झाली नाही, असे दिसते.
• ते लोक येताजाता झाडावरील फळे आणि मधाची पोळी यांचे निरीक्षण करत. ती शोधण्यासाठी दक्षपणे कसे बसावे, चालावे आणि धावावे याची त्यांना खूप सवय होत असे. अशा प्रकारे शरीराच्या सतत वेगळ्या हालचाली केल्याने त्यांचे शरीर काटक आणि लवचिक राही.
• कधी एखाद्या भागात दुष्काळ पडला तर ते स्थलांतर करीत आणि नवा अन्नयुक्त प्रदेश शोधत.

• तत्कालीन पर्यावरण खूप ‘शुद्ध’ असल्याचा त्यांना चांगलाच फायदा मिळाला. तेव्हा प्रदूषण काय ते माहित नव्हते. दाटीवाटीने राहण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे हल्लीचे संसर्गजन्य रोग नसायचे.

• मात्र बालमृत्यू खूप असायचे याचे काही पुरावे मिळाले आहेत. जी बालके प्रौढ वयात पोचत त्यांना चांगले आयुष्य लाभे.
तर असे होते हे भटक्यांचे जीवन. अगदी मोकळेढाकळे आणि स्व‍च्छंदी. एकदा का पुरेसे अन्न प्राप्त केले की इतर कुठले झक्कू त्यांच्यामागे नव्हते. काही प्रकारच्या अन्नासाठी मात्र त्यांना प्राण्यांशी स्पर्धा करावी लागली. त्यामुळे असे अन्न दृष्टीस पडताच ते ओरबाडून बकाबका खायची सवय त्यांच्यात मुरली. ही अन्नाची अशाश्वतता संपविण्यासाठी टिकाऊ अन्नाची निर्मिती ही गरज कालांतराने निर्माण झाली असावी. त्यातूनच शेतीचा शोध लागला.

आता हा कृषीक्रांतीचा टप्पा पाहू.

इ स पूर्व ९००० पासून शेतीची सुरवात झाली. सुरवातीस गहू, तांदूळ व बटाटा ही मुख्य पिके घेतली जात. त्यापैकी गव्हाची शेती हा विषय लेखकाने विस्ताराने हाताळला आहे. शेतीपूर्व काळात जमीन अगदी खडकाळ होती. आता गव्हाची लागवड करण्यासाठी ती शेतीयोग्य करणे आवश्यक होते. हे काम प्रचंड कष्टाचे होते. तसेच लागवड केल्यावर त्या रोपांची निगा राखण्यात माणसाचा संपूर्ण दिवस कामात जाऊ लागला. शेतातील तण काढणे हेही कष्टप्रद होते. त्यासाठी दिवसभर उन्हात राबावे लागले. आता गहू हे खूप पाणी खाणारे पीक असल्याने जलसिंचन वाढवावे लागले. पुन्हा या पिकावरील टोळधाडीपासून बचाव करण्यासाठी शेताला कुंपण घालणे असे अनेक कष्ट चढत्या क्रमाने वाढत गेले. भटक्याच्या जीवनशैलीतून हे संक्रमण होत असताना त्याचे तब्बेतीवर असे अनिष्ट परिणाम झाले:
१. पाठीच्या कण्याचे विकार
२. मान आणि गुडघे यांचे विकार
३. हर्निया

या कृषीक्रांतीने अन्न्साठ्यात लक्षणीय भर पडली. पण ही पिके कर्बोदकप्रधान असल्याने आपल्या सर्वांगीण पोषणाच्या बाबतीत तोटा झाला. अति भरपेट खाण्याची सवय आपल्या जनुकांत अश्म्युगातच नोंदवली गेली होती. त्यात आता हे कर्बोदकप्रधान अन्न आपण गरजेपेक्षा जास्तच खाऊ लागलो. त्यातून आरोग्यावरील दुष्परिणाम अगदी बाल्यावस्थेतच दिसू लागले. भटक्या अवस्थेत बालकांच्या स्तनपानाचा कालावधी बराच जास्त होता. परंतु, आता त्यांना मातेचे दूध लवकर थांबवून धान्यांच्या खिरी चालू झाल्या. त्यातून त्यांची प्रतिकारशक्ती दुबळी होत गेली.

अन्नाच्या या मुबलक उपलब्धता आणि साठ्यामुळे हळूहळू लोक लाडावत गेले. तसेच भटकेपणा संपून एका ठिकाणी (शेतीजवळ) स्थिरावणे वाढत गेले. त्यातून स्त्री-पुरुष संबंधांचे प्रमाण वाढले. परिणामी लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि कालांतराने तिचा विस्फोट झाला.
या सुरवातीच्या शेतीचे अन्य काही परिणाम लक्षात घेण्याजोगे आहेत. तेव्हा आपली गुजराण ही मोजक्या पिकांवर अवलंबून होती. त्यामुळे जेव्हा मोठा दुष्काळ पडे किंवा जबरदस्त टोळधाड पिकांवर येई तेव्हा लोकांची खूप उपासमार होई. त्यातून खूप मृत्यू होत. कारण आता या नव्या जीवनशैलीत भटक्याप्रमाणे नैसर्गिक अन्न शोधण्याचे कष्ट झेपणार नव्हते; किंबहुना ते विस्मृतीत गेले होते.

माणूस आणि अन्नाची उपलब्धता या विषयाकडे आपण ऐतिहासिकदृष्ट्या क्रमाने पाहत गेलो तर असे टप्पे दिसतात:

मिळेल ते आणि मिळेल तेव्हाचे नैसर्गिक अन्न >> शेतीचा शोध >>> हरितक्रांती >>> मुबलक अन्नसाठे >> लाडावलेपणा >>> बहुसंख्यांची बैठी जीवनशैली >>> कर्बोदकप्रधान अन्नाचे बेसुमार सेवन >> विविध आजार.

हरितक्रांती ही शाप की वरदान हा नेहमीचा वादाचा विषय आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी हिरीरीने चर्चा होतात. त्यातील कुठलीच बाजू पूर्ण बरोबर किंवा चूक असे म्हणता येत नाही. प्रस्तुत लेखकाने या शेतीविषयक प्रकरणाला तर ‘कृषीक्रांती : इतिहासातील सर्वात मोठी फसवेगिरी’ असे शीर्षक दिले आहे.
……………..

आता अतिरिक्त खाणे आणि त्यातून निर्माण झालेल्या आजारांकडे आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहू. विसाव्या शतकात औद्योगीकरण झपाट्याने वाढले. त्यातून सामाजिक सुबत्ता वाढू लागली. ज्या देशांत अधिक संपत्ती निर्माण झाली तिथले लोक सुखासीन होऊ लागले. अन्नसाठे मुबलक झाले. विविध यंत्रांचा मानवी जीवनात शिरकाव झाला. त्यातून पूर्वीच्या सहज शारीरिक हालचालीही कमी झाल्या. उच्च उष्मांकयुक्त आहार आणि बैठी जीवनशैली यांच्या संयोगातून काही आजारांचा प्रादुर्भाव वाढला. यात मुख्यतः लठ्ठपणा आणि मधुमेह (प्रकार २) हे आजार येतात. या आजारांची कारणमीमांसा पाहताना जनुकीय पातळीवरील अभ्यास सुरु झाला.

१९६२मध्ये जेम्स नील या जनुकतज्ञाने यासंदर्भात एक गृहीतक मांडले. त्याचा सारांश असा आहे:
भटक्या अवस्थेत जेव्हा अन्न तुटवडा होता तेव्हा एकदम मिळालेले अन्न शरीरात ऊर्जारूपाने साठवणे आवश्यक होते. त्यामुळे खूप खाण्याची सवय काही जनुकांत बिंबली गेली. अनुवंशिकतेने तो गुण पुढील पिढ्यात जात राहिला. किंबहुना अशी अतिरिक्त ऊर्जा साठवू शकणारी माणसेच जगू आणि टिकू शकली. म्हणजेच हा जनुकीय गुणधर्म तेव्हा गरजेचा आणि फायद्याचा ठरला. मात्र सध्याच्या युगात जेव्हा अन्न मुबलक झाले तेव्हा उत्क्रांतीदरम्यान मिळालेला हा पुरातन गुण आता तब्बेतीस त्रासदायक ठरत आहे.

हे गृहीतक बरीच वर्षे चर्चेत राहिले. त्यावर दोन्ही बाजूंनी वादविवाद झडले. पुरेशा पुराव्यांअभावी ते सिद्ध करता आले नाही. त्यातून काही पर्यायी गृहीतके मांडली गेली:
१. सुबत्तेतून आलेल्या आजारांचे निव्वळ अति खाणे हे कारण असत नाही. पर्यावरणातील अनिष्ट घटकांमुळे व्यक्तीच्या काही जनुकांवर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे असे आजार होण्याची शक्यता बळावते. त्याच्या बरोबरच जीवनशैलीचाही परिणाम निर्णायक ठरतो.

२. बदलत्या जनुकांचे गृहीतक : यानुसार अति खाऊन उर्जेची साठवणूक करणे याचा जगण्याचे (survival) दृष्टीने काही फायदा पूर्वीही नव्हता आणि आताही नाही. लठ्ठपणाचे स्पष्टीकरण असे आहे. शरीरात जास्तीत जास्त किती मेद साठवला जातो, हे काही जनुकांच्या नियंत्रणात असते. या जनुकांच्या बिघाडातून हे नियंत्रण जाते आणि मग मेदनिर्मिती बेसुमार होते.

लठ्ठपणा आणि मधुमेह
हे गुंतागुंतीचे आजार आहेत. त्यांची कारणे देखील क्लिष्ट आहेत. कुठलाही एक घटक किंवा जनुक त्यासाठी जबाबदार नाही. अनेक पर्यावरणीय घटकांचा आपल्या जनुकांवर विपरीत परिणाम होतो.. त्यातून ग्लुकोज, इन्सुलिनचे कार्य आणि मेदनिर्मिती या त्रिकुटातील सुसंगती बिघडते. असे झालेल्या व्यक्तीस हे आजार होण्याचा धोका वाढतो. आता जर तिने गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लावली आणि त्याच्या जोडीस व्यायामाचा अभाव असेल तर तो धोका अजूनच वाढतो. अनुवंशिकतेने हे गुणधर्म पुढील पिढीत जातात.

मानवी उत्क्रांती आणि आपले आरोग्य हा कुतूहलाचा विषय आहे. एकेकाळी स्नायूंवर भिस्त असलेला मानव आज मेंदूच्या शक्तीवर अधिक अवलंबून आहे. शेती, औद्योगीकरण, विज्ञान, आहार आणि जीवनशैली अशा अनेक घटकांचे एकत्रित परिणाम आपल्या तब्बेतीवर झालेले आहेत. एकेकाळचे तुफान बालमृत्यू आपण आटोक्यात आणले. पण त्याच जोडीला प्रौढपाणीचे काही आजार एखाद्या साथीप्रमाणे समाजात फैलावले. त्यांचे मूळ शोधण्याचे प्रयत्न अनेक संशोधनांतून सतत चालू आहेत. ‘सेपिअन्स’च्या लेखनातून उत्क्रांती आणि आरोग्य या विषयावर चांगला प्रकाशझोत टाकलेला आहे.
*******************************************

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

थोडक्यात आणि छान!
अन्नाच्या या मुबलक उपलब्धता आणि साठ्यामुळे हळूहळू लोक लाडावत गेले.
- अगदी अगदी.

जॉनविक्क's picture

7 Oct 2019 - 5:44 pm | जॉनविक्क

यासाठीच मनसोक्त भटकांयची सवय बालपणीच अंगी मुरणे अत्यावश्यक आहे असे वाटते.

कुमार१'s picture

7 Oct 2019 - 6:32 pm | कुमार१

कंजूस आणि जॉन

धन्यवाद आणि सहमती.

सुबोध खरे's picture

7 Oct 2019 - 7:27 pm | सुबोध खरे

पाठीच्या कण्याचे विकार
हे जेंव्हा पासुन माणूस ताठ (दोन पायांवर) चालू लागला तेंव्हा पासून चालू झाले. चार पायांवर चालणाऱ्या प्राण्यांमध्ये आणि माकडांमध्ये पाठीच्या कण्याचे विकार फारच कमी आढळतात.

जॉनविक्क's picture

7 Oct 2019 - 10:09 pm | जॉनविक्क

मी रोज दोन हात आणी पाय वापरून 5 मिनिटे चाललो तर फरक पडेल का काही ?

सैनिकांचा काय अनुभव ? त्यांना सिविलीयन्स च्या तुलनेत पाठीची दुखणी नैसर्गिक अवस्थेत कमी होतात काय ?

कुमार१'s picture

8 Oct 2019 - 10:16 am | कुमार१

मी रोज दोन हात आणी पाय वापरून 5 मिनिटे चाललो तर फरक पडेल का काही ?

>>>>

• तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर एखादा अस्थिरोगतद्न्यच देऊ शकेल. माझी काही निरीक्षणे लिहितो:
१. मणक्याच्या काही आजारांत अशा स्वरूपाचा व्यायाम सांगतात. त्यात गुडघे जमिनीस टेकून चतुष्पादासारखे राहून हात व पाय उचलायचे असतात.

२. काही आजारांत ताठ उभे राहून मागेमागे चालायला सांगतात.

*सैनिकांचा काय अनुभव ?

त्यांच्या दुखण्याबाबाबत कल्पना नाही. पण त्यांच्या उन्हातील कवायतीमुळे त्यांच्या त्वचेत ‘ड’ जीवनसत्व जास्त तयार होते.

एका अभ्यासात सहभागींचे २ गट केले होते. पहिल्यात डॉक्टर व नर्सेस तर दुसऱ्यात सैनिक होते. त्यांचे ठराविक काळ निरीक्षण केल्यावर त्यांच्या रक्तातील ‘ड’ची पातळी मोजली.
सैनिकांची पातळी पहिल्या गटापेक्षा कित्येक पट जास्त होती.

कुमार१'s picture

8 Oct 2019 - 10:16 am | कुमार१

मी रोज दोन हात आणी पाय वापरून 5 मिनिटे चाललो तर फरक पडेल का काही ?

>>>>

• तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर एखादा अस्थिरोगतद्न्यच देऊ शकेल. माझी काही निरीक्षणे लिहितो:
१. मणक्याच्या काही आजारांत अशा स्वरूपाचा व्यायाम सांगतात. त्यात गुडघे जमिनीस टेकून चतुष्पादासारखे राहून हात व पाय उचलायचे असतात.

२. काही आजारांत ताठ उभे राहून मागेमागे चालायला सांगतात.

*सैनिकांचा काय अनुभव ?

त्यांच्या दुखण्याबाबाबत कल्पना नाही. पण त्यांच्या उन्हातील कवायतीमुळे त्यांच्या त्वचेत ‘ड’ जीवनसत्व जास्त तयार होते.

एका अभ्यासात सहभागींचे २ गट केले होते. पहिल्यात डॉक्टर व नर्सेस तर दुसऱ्यात सैनिक होते. त्यांचे ठराविक काळ निरीक्षण केल्यावर त्यांच्या रक्तातील ‘ड’ची पातळी मोजली.
सैनिकांची पातळी पहिल्या गटापेक्षा कित्येक पट जास्त होती.

जॉनविक्क's picture

10 Oct 2019 - 1:08 pm | जॉनविक्क

परंतु मला पाठीच्या दुखण्याबाबत जास्त माहिती हवी होती. असो प्रश्न थोडा नाजूक असल्याने निश्चित विदा हाती नसल्यास अनुत्तरित राहणेच जास्त योग्य :)

सुबोध खरे's picture

11 Oct 2019 - 9:45 am | सुबोध खरे

सैनिक रोज कवायत आणि खेळ असे दोन्ही शारीरिक श्रमाचे काम करत असल्यामुळे त्यांना पाठीचे विकार नक्कीच कमी होतात. सर्वात जास्त पाठीचे विकार हे लठ्ठ व्यक्ती आणि बैठे काम करणारे लोक याना होतात.
आधुनिक काळात संगणकावर काम करणारे लोक शहरात फार वाढले असल्याने हे विकार ३०-३५ वयालाच दिसू लागले आहेत. त्यातून असे बरेचसे लोक ताण चुकीचा आहार आणि अति वजन यामुळे पाठदुखी बरोबर आम्लपित्त, बद्धकोष्ठ, अतिरक्तदाब आणि हृदयविकार याचीही शिकार होताना मोठ्या प्रमाणावर दिसतात.
पाठीच्या कण्यातील कूर्चेचे पोषण हे पुढे वाकल्यावर त्यातील द्रव पिळून बाहेर निघतो आणि मागे वाकल्यावर होणाऱ्या क्रियेने तेथे रक्तातील द्रव शोषला जातो. केवळ पुढे वाकून तासन तास बसल्यामुळे या कूर्चेचे पोषण होत नाही आणि पाठदुखी स्लिप डिस्क सारखे विकार होतात.

जॉनविक्क's picture

11 Oct 2019 - 10:00 am | जॉनविक्क

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 5:35 pm | कुमार१

ही चर्चा चालू असतानाच डॉ. बाळ फोंडके यांचा उत्क्रांतीबद्दल एक छान लेख वाचला :

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/there-is-no...

त्यातील प्राणी आणि माणूस यांची जन्मतःची तुलना रोचक आहे.
मानवी नवजात बालक हे एका अर्थी ते ‘अपुऱ्या’ दिवसांचंच असतं.

जरूर वाचा.

सुबोध खरे's picture

12 Oct 2019 - 1:30 pm | सुबोध खरे

लेखातील बऱ्याच गोष्टीशी मी असहमत आहे. आणि त्यांची कारणमीमांसा चुकीची आहे.
लवकरच लिहितो.

कुमार१'s picture

12 Oct 2019 - 1:49 pm | कुमार१

जरूर लिहा !

सुबोध खरे's picture

12 Oct 2019 - 8:58 pm | सुबोध खरे

माणसाच्या मुलासारखेच मांसाहारी प्राण्याचे असते. कुत्र्याची मांजराची वाघ सिंहांची पिल्ले यांचे सुद्धा डोळे उघडलेलं नसतात आणि ती सुद्धा चालू फिरू शकत नाही. त्यांच्या आईने दूध पाजल्यावर १-२ आठ्वड्यानेच ती चालू लागतात.

याउलट तृणभक्षी प्राण्यांचे आहे. ती जन्मल्यावर काही मिनिटातच चालू शकली नाहीत तर शिकारी प्राण्यांची शिकार होतील. खरं तर आफ्रिकेच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर तृणभक्षी प्राण्यांची पिल्ले पहिल्या वर्षात शिकारी प्राण्यांचे भक्ष्य होतात.

कारण आता आफ्रिकेतल्या त्या सॅव्हानाच्या प्रदेशात तो इतर प्राण्यांच्या मानानं अधिक दूरवर पाहू शकत होता.

माणूस केवळ उभा राहुन लांबचे पाहू शकत असे हे म्हणणे अक्षरशः मानवी मेंदूचा/ बुद्धीचा अपमान आहे. माणूस सहज एखाद्या टेकाडावर उभे राहून किंवा झाडावर चढून लांबचे पाहू शकेल. त्यासाठी माणूस उभा राहू लागला हे केवळ हास्यास्पद आहे.

माणूस हातांचा वापर केल्यामुळे प्रगत झाला हे म्हणणे पण हास्यास्पद आहे. कारण चिंपांझी आणि गोरिला सुद्धा हाताचा छान वापर करू शकतात.

माणसाची कवटी भली थोरली आहे हे म्हणणे चूक आहे. माणसाच्या नवजात बालकाचा मेंदू ३५०-४०० ग्राम असतो तर ओरँग उटान या मानवापेक्षा लहान असलेल्या मर्कटा च्या पिल्लाचा मेंदू ३७० ग्राम आणि गोरीलाच मेंदू ४५०-५४० ग्राम असतो. त्यामुळे मानवी मादीचे माकड हाड संकुचित झाले हे म्हणणे हास्यास्पद आहे.

मुलाची वाढ अपुरी असतानाच प्रसूती होऊ लागली.हि स्थिती केवळ मानवाची नसून सर्वच्या सर्व प्राण्याची आहे.

खरं तर उत्क्रांती मध्ये प्राणी जितका उत्क्रांत तितकी प्रसूती अधिक अधिक उशिरा होत जाते.

माशांच्या, उभयचर माद्या फलन न झालेली अंडीच घालत असतात आणि त्यांचे फलनमादीच्या शरीराबाहेरच होते. ( मासे आणि उभयचर यांच्या संभोग नाहीच).यात बरीच अंडी फुकट जातात किंवा इतर प्राण्याचे अन्न होतात.कॅव्हिएर किंवा गाभोळी आपण खातो ती हेच आहे. कॉड माशाची मादी २५ लाख अंडी देते. स्टर्जन माशाची मादी ७ लाख अंडी घालते.

सरीसृप(साप) माद्या फलन झालेली अंडी घालत असतात. परंतु त्यांची पिल्ले अंड्यातून बाहेर आल्याआल्या स्वतंत्रपणे स्वतःचे भक्ष्य मिळवू शकतात

पक्षीगण माद्या फलन झालेली अंडी घालत असतात परंतु त्यांची पिल्ले स्वतःचे भक्ष्य लगेच मिळवू शकत नाहीत. कोंबडी वर्षाला २५० पर्यंत अंडी देते.

यानंतर सस्तन प्राणी येतात.

मानवी स्त्री फक्त महिन्याला एक अंडे तयार करते. जितकी अंडी फुकट जातात तितके बालपण लहान असतं
किंवा मानवात अंड्याचे फुकट जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे कारण गर्भ जीवित राहून मोठा होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

मानवी मूल हे एक वर्षालाच चालू लागते परंतु समपूर्णपणे स्वतंत्र होण्यास त्याला १६ -१८ वर्षे लागतात. मानवाचा मेंदू एवढा प्रगत असल्यामुळे मेंदूची शारीरिक (PHYSICAL) वाढ १६ -१८ वर्षे पर्यंत चालू असते. आणि यानंतर मानसीक वाढ आणि विकास २५ वर्षापर्यंत चालू असतो.
संगणकाच्या भाषेत हार्डवेअर १६ ते १८ वर्षे पर्यंत तयार होत असते आणि सॉफ्टवेअर लोड व्हायला २५ वर्षे जातात.
यानंतरही हा विकास तसा आयुष्यभर चालूच असतो.

आपण एखादी भाषा शिकतो म्हणजे काय होते तर संगणकाच्या भाषेत आपण आपल्या मेंदूत त्या भाषेचे ऍप डाऊनलोड करतो. यानंतर हि भाषा आपल्याला समजू शकते आणि बोलता येते.

एकंदर हा लेख फारच गंडला आहे.

फेरफटका's picture

17 Oct 2019 - 8:29 pm | फेरफटका

अप्रतिम प्रतिसाद आहे सुबोधजी!! ते झकास वेगवेगळं मुद्दाम लिहीलय. अत्यंत लॉजिकल आणी अर्थातच अनुभवातून आणी अभ्यासातून आलेलं तुमचं मत शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद!!

Rajesh188's picture

12 Oct 2019 - 11:21 pm | Rajesh188

ते नावाजलेले विज्ञान लेखक आहेत म्हणून ते सत्य सांगत आहे त.
हे स्वतंत्र बुध्दीचा माणूस मान्य करणार नाही .
मी व्यक्तिगत त्यांच्या मताशी पूर्ण असहमत आहे

यशोधरा's picture

7 Oct 2019 - 7:43 pm | यशोधरा

छान लेख.

कुमार१'s picture

7 Oct 2019 - 8:44 pm | कुमार१

सुबोध,
सहमत. चतुष्पाद ते द्विपाद हे तर मोठेच संक्रमण होते.

यशोधरा, धन्यवाद.

सतिश गावडे's picture

7 Oct 2019 - 9:16 pm | सतिश गावडे

पुस्तकातील अन्न विषयक लेखनाचा छान आढावा घेतला आहे.

चौकटराजा's picture

8 Oct 2019 - 10:43 am | चौकटराजा

माझे म्युटेशन झाले आहे असे वाटते ,आता मी जेंव्हा इतके विस्मय वाटावा इतके कमी जेवतो व तरीही उत्साह वयाच्या मानाने बर्यापैकी आहे मधुमेह असताना देखील तेंव्हा मला वाटते की माझ्या बाबतीत हे उत्क्रान्तीकारक म्युटेशन नसून क्रान्तीकारक आहे ! हा हा हा ! )))))) मी मिपावरच्या व परिचयातील काही व्यक्तींचे निरिक्षण केल्यावर असे दिसते की त्याना खादाडीचा विकार नवश्रीमन्त पणातून झाला आहे असे वाटते. असो . फार पूर्वी सर्व मांसाहारी मग शेतीच्या शोधानन्तर शाकाहारी आता पुन्हा मंसाहाराचे प्रमाण वाढतेय या बद्दल लेखक हरारी काय म्हणतात ?

सुबोध खरे's picture

9 Oct 2019 - 10:02 am | सुबोध खरे

माणूस कधीच १०० टक्के मांसाहारी नव्हता. सुरुवातीपासून तो जास्त करून फळे खाणारा शाकाहारी किंवा फार तर मिश्राहारी होता.
संपूर्ण मांसाहारी प्राण्यांच्या सारखी त्याच्या जठर आणि आतड्याची रचना अजिबात नाही. तसेच मानवी मेंदूला २४ तास ग्लुकोजची गरज पडते आणि हि ग्लुकोज कोणत्याही मांसाहारी पदार्थात नाही त्यामुळे १०० टक्के मांसाहारी असल्यास सामिष पदार्थातील चरबीचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्याचा अव्यापारेषु व्यापार मानवी शरीराला करावा लागला असता.

चौकटराजा's picture

10 Oct 2019 - 9:07 am | चौकटराजा

बरोबर ! कारण शेतीच्या अगोदर वनस्पती ची नैसर्गिक निर्मिती झाली असणारच !

चौकटराजा's picture

10 Oct 2019 - 9:13 am | चौकटराजा

पण माझी एक शंका अशी की मांसाहारातीळ प्रोटीन या घटकाचे रूपांतर देखील सावकाश का होईना साखरेत होते ना ? की हा काळ मेंदूला त्वरेने साखर पुरविण्यास अपुरा ठरतो ? सबब काही प्रमाणात कार्बो खाणे त्या अवस्थेत ही माणासाला आवश्यक ठरले असेल ?

सुबोध खरे's picture

10 Oct 2019 - 9:47 am | सुबोध खरे

प्रोटीनचे प्रथम अमिनो ऍसिड मध्ये पचन( विघटन) व्हावे लागते. नंतर त्यातील अमिनो गट काढून (deamination) त्याचे कार्बो हायड्रेट मध्ये रूपांतर करावे लागते.
या अव्यापारेषु व्यापारात नुकसानच फार आहे.
हे म्हणजे विमानाचे पेट्रोल केरोसीनचे ग्यासबत्तीमध्ये वापरण्यासारखे आहे.किंवा शतधौत घृत सायकलमध्ये वंगण म्हणून वापरण्यासारखे आहे.

ग्लुकोज कोणत्याही मांसाहारी पदार्थात नाही

>>>>
मांसात विशेषतः प्राण्याच्या यकृतात काही प्रमाणात Glycogen हे कर्बोदक आहे. त्याचे शरीरात विघटन होऊन ग्लुकोज तयार होते. ‘beef’ मध्ये यकृत मोठे असते.

कुमार१'s picture

8 Oct 2019 - 10:54 am | कुमार१

हा, हा, हा !
चांगले आहे हो तुमचे म्युटेशन ! त्याचा फायदा उठवत राहा.

“मांसाहार >> शाकाहार >> मिश्राहार “ यावर पुस्तकात विवेचन आहेच. सवडीने लिहितो.
धन्यवाद.

जालिम लोशन's picture

8 Oct 2019 - 3:49 pm | जालिम लोशन

सुरेख. बरीचशी पाश्च्यात संशोधने अपुरी माहिती व अपुर्‍या पुराव्यांवर आधारित असतात. किंवा बहुत प्रचंड मोठ्या कालखंडासाठी खुप तोकडे पुरावे ऊपल्बध असतात

सुधीर कांदळकर's picture

9 Oct 2019 - 7:36 am | सुधीर कांदळकर

लेख आवडलाच. तरी कही प्रश्न पडले. त्याने अंजीर खाऊनच का टाकले. काढून साठवून का ठेवले नाहीत? साठवण्याची अक्कल त्याला केव्हा आली? साठवले तरी अन्न फारसे टिकणार नाहीच. मग टिकवणे त्याला केव्हा जमले? सुमारे दोन लक्ष तीस हजार वर्षांपूर्वी माणसाला अग्नीवर थोडेफार नियंत्रण मिळवता आले. मग माणूस अन्न शिजवून केव्हा खाऊ लागला? त्यामुळे त्याला कोणते नवे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाले वगैरे वगैरे. त्याबद्दल आपल्या पुढील लेखनात वाचायला आवडेल.

“मांसाहार >> शाकाहार >> मिश्राहार “ यावर पुस्तकात विवेचन आहेच. सवडीने लिहितो

अशी वाक्ये जास्त आनंद देऊन जातात.

रच्याकने: उत्क्रांती हा विषय आम्हांला शाळेत भूगोल विषयात होता. हवाई दल निवृत्त साठे सर आम्हांला तेव्हा शिक्षक होते. दांडगाई करणार्‍या मुलांना त्यांनी होमो इरेक्टस्, होमो सेपियन, हायडेल्बर्ग, नीअँडर्थल, क्रोमॅन्यॉन, वगैरे नावे ठेवली होती. मुख्य म्हणजे माफक थट्टामस्करी त्यांना चाले. मुले दांडगाई करणारच. ती नाही तर काय मोठी माणसे दांडगाई करणार काय? असा त्यांचा पवित्रा असे. त्यामुळे पुढील वर्षभर त्यांचा तास खूप आनंदात गेला.

छान माहिती देऊन वर आठवणी पण जागविल्यात.

धन्यवाद.

सुबोध खरे's picture

9 Oct 2019 - 10:22 am | सुबोध खरे

साठवण्याची अक्कल त्याला केव्हा आली?
साठवण्याची अक्कल हि काही फक्त माणसाची मक्तेदारी नाही. उंदीर, मुंग्या असे अनेक जीव आपले अन्न हिवाळा किंवा उन्हाळ्यासारख्या प्रतिकूल ऋतू साठी साठवून ठेवतातच. मोठ्या प्रमाणावर अन्न साठवून ठेवणे हे माणसाला शेती सुरु केल्यावरच जमू लागले.

कुमार१'s picture

9 Oct 2019 - 8:43 am | कुमार१

जा लो व सुधीर,
नियमित प्रतिसादाबद्दल आभार !
.........
@ सुधीर,
तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाने छान विचारमंथन झाले.

अंजीर खाऊनच का टाकले. काढून साठवून का ठेवले नाहीत

>>>>>>>
ते अश्मयुग होते. त्यामुळे माणसाचे ‘घर’, गोदाम असे काही नसावे ! किंवा अन्न लपवले तरी प्राणी धाड घालण्याची भीती असावी. का कुठलाही ‘साठा’ न करण्याचा प्राण्यांचा गुण अजून टिकून होता !


दांडगाई करणार्‍या मुलांना त्यांनी होमो इरेक्टस्, होमो सेपियन, हायडेल्बर्ग, नीअँडर्थल, क्रोमॅन्यॉन, वगैरे नावे ठेवली

>>>>>>
हे तर एकदम झकास !

संदर्भात ‘सेपिअन्स’ मधील ठळक मुद्दे:

(फक्त लेखकाने काय म्हटले आहे ते लिहीत आहे )

१. भटके कुठल्याही प्राण्याची शिकार करत. त्यात बदल होऊन निवडक प्राण्यांची शिकार चालू झाली.
२. कोकरे पकडायची, सुगीच्या काळात त्यांना खाऊ घालून पुष्ट करायचे. नंतर कोकरांची पुढची पिढी जन्मास येते. त्यातल्या आक्रमक कोकरांना मारून टाकायचे , तर आज्ञाधारक कोकरांना जगू द्यायचे. अशा प्रकारे माणसाळलेल्या मेंढ्यांचा कळप तयार होतो.

३. कोंबड्या आणि गाईंना माणसाळवण्यासाठी तर क्रूर वागणूक दिली गेली. अशा प्राण्यांचे आयुष्य कमी असते आणि त्यांची कत्तल लवकरच केली जाऊ लागली.
४. फक्त अंडी देणाऱ्या कोंबड्या, दूध देणाऱ्या गाई आणि ओझ्याची जनावरे यांना जास्त जगू दिले जाते.

५. गाईचे दूध खरे तर तिच्या वासरासाठी असते. पण दूध वाहू लागले की वासराला त्यापासून तोडायचे आणि मग आपल्यासाठी हे दूध वापरायचे.
......
प्राण्यांच्या उत्क्रांतीबद्दल एक कटू सत्य लेखक असे सांगतो. गायीबैल हे उत्क्रांतीच्या संदर्भात सर्वात यशस्वी प्राणी आहेत पण, त्याचबरोबर ते सर्वात दुख्खी प्राणीही आहेत.

फेरफटका's picture

9 Oct 2019 - 8:09 pm | फेरफटका

"कोंबड्या आणि गाईंना माणसाळवण्यासाठी तर क्रूर वागणूक दिली गेली. अशा प्राण्यांचे आयुष्य कमी असते आणि त्यांची कत्तल लवकरच केली जाऊ लागली."

ह्या विषयावर अधिक लिहू शकाल का? मला हा प्रश्न नेहमीच पडला आहे की माणसाने ठराविक प्राणीच कसे माणसाळवले / पाळले? ती प्रक्रिया कशी असेल?

जेम्स वांड's picture

10 Oct 2019 - 10:26 am | जेम्स वांड

पण रानकोंबड्यांचे (जंगल फाऊल) सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून आपण पाहतो त्या "पाळीव कोंबड्या" पाळणे प्रथम सिंधू संस्कृतीत सुरू झाल्याचे एका ठिकाणी वाचले होते.

अनिंद्य's picture

9 Oct 2019 - 10:58 am | अनिंद्य

उत्तम विषयावरचा लेख आणि अनुषंगाने छान चर्चा.

लई भारी's picture

9 Oct 2019 - 8:47 pm | लई भारी

नेहमीप्रमाणे सुटसुटीत मांडणी आवडली.
पुस्तक वाचायला सुरुवात करुन एका उत्क्रांती एवढा कालावधी गेला असेल :-)
संपवायला हवं!

पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत!

कुमार१'s picture

9 Oct 2019 - 8:58 pm | कुमार१

नियमित वाचकांचे प्रोत्साहनाबद्दल आभार !

@ फेफ,
माणसाळवलेल्या प्राण्यांची अंदाजे जागतिक संख्या अशी आहे;
१. कोंबडी : २५ अब्ज
२. गाय : १ अब्जाहून अधिक
३. डुक्कर : १ अब्ज आणि
४. मेंढी : १ अब्ज.

आता ठराविक प्राणीच का माणसाळवले गेले? मी या विषयाचा अभ्यासक नाही. माझा अंदाज सांगतो. हे प्राणी साधारण स्वभावाने गरीब आणि आपल्यासाठी उपयुक्त आहेत. हा स्वार्थ उत्क्रांतीदरम्यान व्यवस्थित समजला असेल. यातून शेतीच्या जोडीला पशुसंगोपन हा दुसरा उद्योग जोमाने सुरु झाला.

.... कोणाचा याचा अभ्यास असल्यास जरूर लिहा.

सुबोध खरे's picture

10 Oct 2019 - 9:51 am | सुबोध खरे

गज:नैव, व्याघ्र: नैव
सिंह: नैवच नैवच
अजापुत्रो बलीम दद्यात
देव: ( अपि) दुर्बलनाशक:

हत्ती नाही
वाघ नाही
सिंह तर नाहीच नाही
बोकडाचाच बळी दिला जातो
कारण
देव (सुद्धा) दुर्बळांचा नाशक आहे.

कुमार१'s picture

10 Oct 2019 - 10:11 am | कुमार१

अगदी !
हेच सुभाषित मनात आले होते. फक्त मी वाचलेले थोडे वेगळे आहे:

अश्वं नैव गजं नैव
व्याघ्रं नैव च नैव च …..

(पुढचे वरील प्रमाणेच).
धन्यवाद.

जेम्स वांड's picture

10 Oct 2019 - 10:33 am | जेम्स वांड

तुमचा एक एक लेख उत्तम अभ्यासाचा नमुना आहे, असतो. विषयाच्या खोलीत जाऊन उगाच ताबडतोब नेटवरून काहीतरी वाचून परप्रकाशीत हॅलोजन शायनिंग मारून सोशल मीडियावर भाव खाणाऱ्या भाऊगर्दीत तुमची ही सवय उठून दिसते. तिला अजून जोपासावे ही विनंती अन अजून उत्तमोत्तम लेख लिहावेत ही विनंती.

हरारींचे सेपियन्स मी ऐकून आहे पण अजून वाचायचा योग आलेला नाही. लवकरच मिळवून वाचावे लागणार असे भासते. मध्यंतरी मानवी झोपेचा इतिहास ह्या विषयावरचा हा लेख सायन्स अलर्ट मध्ये वाचला होता, सुरस आहे एक मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून तुमचं ह्यावर मत जाणून घेणे आवडेल.

कुमार१'s picture

10 Oct 2019 - 11:35 am | कुमार१

जेम्स,
अभिप्राय आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद ! तुमच्या प्रतिसादामुळे अभ्यासाची जबाबदारी अधिक वाढते.

‘झोपेचा इतिहास’ हे शब्द वाचल्यावर क्षणभर मला झोप घ्यावीशी वाटली ! सवडीने तो दुवा वाचतो. जमल्यास भविष्यात काही लिहेन.

जेम्स वांड's picture

10 Oct 2019 - 12:58 pm | जेम्स वांड

मागे एक लेख वाचला होता ट्युडर इंग्लंड मधील लोकांचे हायजीन, खानपान, शरीरसंबंध आणि झोप थोडक्यात राजेशाहीचे भय वजा करता आहार निद्रा आणि मैथुनाची कथा होती ती मध्ययुगीन इंग्लंड मधली, तत्कालीन लंडन कशी बजबजपुरी होती, आगी, प्लेग, कॉलरा कसा उच्छाद मांडी ते नीट लिहिलं होतं. त्याशिवाय एक गंमत म्हणजे तत्कालीन डॉक्टर लोकांच्या पाणवठे प्रदूषित करायच्या सवयीने इतके कंटाळले होते की ते लोकांना पाण्याऐवजी बिअर प्या एल प्या वगैरे सल्ले देत असत असाही एक उल्लेख होता. एकंदरीत फारच मजेदार प्रकरण होते.

कुमार१'s picture

10 Oct 2019 - 3:35 pm | कुमार१

जेम्स,
तो झोपेबद्दलचा लेख वाचला. रात्री सलग झोपण्याऐवजी २४ तासांत दोनदा झोपावे असा त्याचा मथितार्थ आहे. औद्योगिकरणपूर्व आपले पूर्वज तसे झोपत होते. ‘झोपेचा अभ्यास’ ही आता वैद्यकातील विशेष शाखा म्हणून विकसित होत आहे. महानगरांत काही ‘स्लीप क्लिनिक्स’ चालू झाली आहेत. मी यातला तज्ञ नाही. पण काही मुद्दे नोंदवतो:

१. साधारण ३० वर्षांपूर्वीचे चित्र असे होते. बहुतेक नोकरदार ९ ( किंवा १०) ते ५ – ५.३० अशा वेळाच्या नोकऱ्या करत. त्यामुळे घरी सामान्य वेळेत पोहोचत. >> लवकर झोपी जाणे >> सलग छान झोप >>> लवकर उठणे.

२. तेव्हाचे काही व्यावसायिक पहा. ९ ते १ काम >>> जेवायला घरी >>> १- १.३० तास झोप >> ५ ते ९ काम >> व्यवसाय बंद व घरी >>> थोडे उशीरा झोपणे व थोडे आरामात उठणे; पण सलग झोप.

..... मला वाटते की वरील दोन्ही प्रकार आरोग्यास उत्तम होते. सध्याची दोन्ही प्रकारांतील शहरी जीवनशैली आपण जाणतोच ! त्याचे झोपेसंबंधातील अनुभव तरुणांनी लिहावेत असे आवाहन करतो.
सवडीने मी भर घालेन.

कुमार१'s picture

10 Oct 2019 - 3:45 pm | कुमार१

रात्रपाळी आणि अत्यावश्यक कामाच्या लोकांना वगळले आहे याची नोंद घ्यावी.

kool.amol's picture

10 Oct 2019 - 11:05 pm | kool.amol

खूपच छान जमला आहे लेख! एका मुद्द्याला धरून तुम्ही विस्तृत लिहिलं आहे. गुदस्त साली हे पुस्तक वाचलं, खरं सांगतो ह्या पुस्तकाने सगळेच दृष्टीकोन बदलून गेले. मी माझ्या ब्लॉगवर एक स्वतंत्र पोस्ट लिहिली आहे पूर्ण पुस्तकावर.

https://koolamol.wordpress.com/2019/06/27/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%aa%e0...

तुमचा लेख खूपच आवडला.

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 7:37 am | कुमार१

कूल अमोल,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
तुमचा लेख सवडीने वाचतो. रोचक असणार.

.’गुदस्त’ साली

>>
कित्येक वर्षांनी हा मस्त शब्द वाचला ! आजी-आजोबांचे तोंडी असायचा.

kool.amol's picture

11 Oct 2019 - 6:07 pm | kool.amol

नक्की वाचा काही सूचना असतील तर सांगा.
मी मुद्दामच वापरला तो शब्द! एक तर मला तो आवडतो आणि असे जुने शब्द आपण जरूर वापरावेत म्हणजे कालौघात ते नष्ट होणार नाहीत असं मला वाटतं.

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 6:17 pm | कुमार१

‘गुदस्त’ प्रमाणेच ‘तिगस’ साली असाही एक शब्द त्या पिढीकडून ऐकायचो. तो मूळ शब्द ‘तिगस्तां’ आहे.
म्हणजे गेल्याच्या मागील वर्षी !

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 6:17 pm | कुमार१

‘गुदस्त’ प्रमाणेच ‘तिगस’ साली असाही एक शब्द त्या पिढीकडून ऐकायचो. तो मूळ शब्द ‘तिगस्तां’ आहे.
म्हणजे गेल्याच्या मागील वर्षी !

सही रे सई's picture

16 Oct 2019 - 9:48 pm | सही रे सई

जुने शब्द आपण जरूर वापरावेत म्हणजे कालौघात ते नष्ट होणार नाहीत अगदी खरं आहे तुमचं म्हणणं
मी खासकरून मराठीतले आजकाल फारसे वापरात नसलेले शब्द माझ्या लेकी समोर मुद्दामून वापरते जेणेकरून तिला ते चांगले समजतील.
गुदस्त म्हणजे नक्की काय ते नाही कळले मात्र.

कुमार१'s picture

17 Oct 2019 - 6:43 am | कुमार१

गुदस्त आणि तिगसता
हे फारसी शब्द आहेत, इति शब्दरत्नाकर.

गुदस्त आणि गत मध्ये साम्य वाटते.
महितगारांनी भर घालावी

kool.amol's picture

11 Oct 2019 - 11:02 pm | kool.amol

नक्की वाचा काही सूचना असतील तर सांगा.
मी मुद्दामच वापरला तो शब्द! एक तर मला तो आवडतो आणि असे जुने शब्द आपण जरूर वापरावेत म्हणजे कालौघात ते नष्ट होणार नाहीत असं मला वाटतं.

थोडेसे विषयांतर करतो,
दातांचे बिघडलेले आरोग्य (माझ्या माहिती प्रमाणे) फक्त मनुष्यातच आढळते. हा देखील या क्रांतीचाच परीणाम असावा का?
मी तरी एखादा बैल किंवा हत्ती सकाळी उठून आणि रात्री झोपताना ब्रश ने दात घासताना पाहिलेला नाही.
हा पण हल्ली पाळीव कुत्रांमधे हा दंतरोग पसरला आहे असे कुठेतरी वाचनात आले होते.
पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

11 Oct 2019 - 2:57 pm | जेम्स वांड

(खाण्याचे दात) वयानुरूप वृद्धपकाळात झिजून जातात आणि हत्ती आपला आहार म्हणजेच गवत, पाने फांद्या वनस्पती वगैरे न खाऊ शकल्यामुळे उपासमारीने खंगुन मरतो असे एकदा वाचले होते खरे.

सुधीर कांदळकर's picture

11 Oct 2019 - 11:20 am | सुधीर कांदळकर


१. प्राण्यांच्या उत्क्रांतीबद्दल एक कटू सत्य लेखक असे सांगतो. गायीबैल हे उत्क्रांतीच्या संदर्भात सर्वात यशस्वी प्राणी आहेत पण, त्याचबरोबर ते सर्वात दुख्खी प्राणीही आहेत.


हे विधान पुस्तकलेखकाच्या अनुभवाशी मर्यादित समजावे. भारतातील परिस्थिती वेगळी आहे. आम्ही सात वर्षांपूर्वी सध्याचे घर बांधतांना गावात एका घरी तात्पुरते राहात होतो. तेव्हा आमच्या शेजारच्या दोनतीन घरातल्या गायी अजूनही आमच्या सौ.ला ओळखतात आणि तिला पाहिले की दुरून ओढीने धावत येतात आणि आनंद व्यक्त करतात.

शेतकर्‍याने लहानाचे मोठे केलेले बैल विकले की कधीकधी ओढीने मूळ घरच्या माणसांना भेटायला दूरवरून ओढीने येतात आणि भेटल्यावर आनंद व्यक्त करतात.


२. झोपेसंबंधातील अनुभव तरुणांनी लिहावेत असे आवाहन करतो.


झोपण्याच्या वेळा या शरीराच्या जैविक घड्याळास अनुरूप असाव्यात. तसे नसल्यामुळे जेट लॅग येतो.

व्यापारी बोटींवर नियमभंगाबद्दल खलाशांना एक शिक्षा देतात. काही काळ त्यांच्या कामाची आठ तासांची वेळ दुपारी १२ ते ४ आणि रात्री १२ ते ४ अशा दोन भागात विभागतात. ही शिक्षा फार कठोर समजली जाते आणि झोपेचे चक्र पार बिघडून त्या खलाशाचे मोठ्या प्रमाणावर मानसिक खच्चीकरण होते. एकदोन आठवड्यात खलाशी बहुधा 'सरळ' होतो.

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 12:41 pm | कुमार१

गायबैलांचे भारतीय अनुभव लिहील्याबद्दल धन्यवाद !

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 11:23 am | कुमार१

ज्ञा पै , धन्यवाद !

दातांचे बिघडलेले आरोग्य

>>>
प्राण्यांबाबत नक्की माहित नाही. एक अंदाज असा. रवंथ करणऱ्या प्राण्यांना त्या सवयीचा काही फायदा होत असावा. दुसरे असे की ब्रेड, बिस्कीट आणि चॉकोलेट हे दातांना चिकटणारे आणि नंतर त्यांची वाट लावणारे पदार्थ माणूसच सतत चरत असतो.
.......
उत्क्रांती दरम्यान माणूस अधिकाधिक नाजूक होत गेला. पचनसंस्था तर अति नाजूक. त्यामुळे अमिबासंसर्ग- जुलाब हा आजार माणसालाच होतो.

सुबोध खरे's picture

11 Oct 2019 - 1:36 pm | सुबोध खरे

पचनसंस्था तर अति नाजूक. त्यामुळे अमिबासंसर्ग- जुलाब हा आजार माणसालाच होतो.

मी याच्याशी सहमत नाही

बहुतेक प्राण्यांमध्ये अमिबाचा संसर्ग होतो. फक्त माणसाला होणाऱ्या अमिबाचा ENTAMOEBA histolytica चा संसर्ग मर्कट आणि कुत्रे मांजरींना होतो तर याच्या इतर जातींचा संसर्ग इतर प्राण्यांना होतो. E invadens of reptiles is also morphologically identical to E histolytica, but it is not transmissible to mammals.

https://www.petmd.com/dog/conditions/infectious-parasitic/c_dg_canine_am...

https://www.msdvetmanual.com/digestive-system/amebiasis/overview-of-ameb...

मानवी पचनशक्ती नाजूक आहे याला हि कोण्ताही आधार नाही.उलट मानवाचे आयुष्यमान वाढल्याने अनेक रोग जे वाढत्या वयात होतात ते आता जास्त दिसू लागले आहेत. पोटातील जंत कृमी इ जलशुद्धीकरणामुळे मानवात बरेच कमी झालेले आहेत. आजही जंगली प्राणी अँथ्रॅक्स सारख्या रोगाला बळी पडताना ( आफ्रिकेत) दिसतात. पण वेळेत उपलब्ध असणाऱ्या लसीमुळे आणि औषधांमुळे पाळीव जनावरात हा रोग बराच कमी झाला आहे.

याउलट जंगली प्राण्यात जंत आणि कृमी मोठ्या प्रमाणात आढळतात आणि यामुळे कमकुवत झालेले तृणभक्षी प्राणी शिकाऱ्यांची शिकार होतात आणि शिकारी कमकुवत झाला तर शिकार करू न शकल्याने उपासमारीला बळी पडतात.

मानवी आहाराचे प्रकार बदलत गेल्यामुळे पचनशक्तीचे विकार निर्माण होतात. उदा. जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ पचनाचा आकृतिबंध (pattern) बदलून टाकतात. त्यामुळे बद्धकोष्ठाचा विकार होऊ शकतो.

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 1:58 pm | कुमार१

धन्यवाद !

जास्त पाठी न जाता 300 ते 400 वर्ष पूर्वीचा विचार केला तरी लठ्ठ पना लोकांन मध्ये कमी होता .
आहार,विहार,आणि व्यायाम ह्याचे संतुलित प्रमाण होते .
आता बैठी जीवनशैली ,कष्टाचं अभाव,प्रक्रिया केलेले अन्न ह्या मुळे लठ्ठ पना वाढला आहे .
त्याचा संबंध जबरदस्तीने मानवाच्या पूर्वज जातीशी जोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे .
वास्तव्य शी त्याचा संबंध नसावा

सुबोध खरे's picture

17 Oct 2019 - 12:09 pm | सुबोध खरे

जास्त पाठी न जाता 300 ते 400 वर्ष पूर्वीचा विचार केला तरी लठ्ठ पना लोकांन मध्ये कमी होता .
आहार,विहार,आणि व्यायाम ह्याचे संतुलित प्रमाण होते .

याचे कारण आरोग्यपूर्ण जीवन नसून अन्नाची कायम कमतरता आणि सुखसोयींचा अभाव हेच आहे. साधे पाणी आणण्यासाठी मैलोगणती चालणे हे रोजचेच होते. शेती साठी मैलोगणती चालणे हेही कायमच होते. दळण वळणाच्या सोयी फारच प्राथमिक स्थितीत होत्या.

आरोग्याची स्थिती तर अजूनच गंभीर होती.
तेंव्हा लोक साधारणपणे १०० वर्षे जगत हाच एक मोठा गैरसमज आहे.

अनेक बालके तरुण माणसे प्लेग कॉलरा विषमज्वर क्षयरोगासारख्या रोगांना बालपणात तरुणपणातच बळी पडत असत हिच वस्तुस्थिती होती. स्त्रिया मोठ्याप्रमाणावर बाळंतपणात दगावत असत. जगाच्या सात पैकी एक आश्चर्य असलेला ताजमहाल मुमताज बाळंतपणात मृत्यू पावल्यावरच बांधलेला आहे.
त्यातून जे जगत असत त्यांचे आयुष्य बऱ्यापैकी कष्टाचे होते. शिवाय दुष्काळ तर भारतात पाचवीलाच पुजलेला होता. सात वर्षे, ११ वर्षे असा सतत दुष्काळ पडलेला इतिहासात अनेकवेळेस आढळतो. त्यामुळे कुपोषण हाच स्थायीभाव होता अतिपोषण नव्हतेच.

आज सुद्धा आदिवासी भागात कुपोषण आणि उपास हे सर्रासच दिसतात.

कुमार१'s picture

12 Oct 2019 - 8:56 pm | कुमार१

@ राजेश,
हरकत नाही. प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे.
..............
थोडा वेळ उत्क्रांती बाजूला ठेऊ.
लठ्ठपणा आणि जनुके या संदर्भात चालू असलेल्या संशोधनाची भर घालतो:

१. अतिरिक्त मेद साठविण्यात जनुकांचा वाटा महत्वाचा आहे.
२. अनेक जुळ्या भावंडांच्या अभ्यासात असे दिसले आहे की लठ्ठपणा आणि अनुवांशिकतेचा खूप संबंध आहे.

३. लठ्ठ वडील आणि निरोगी वजनाची आई असलेल्या अपत्यात लहानपणीचा लठ्ठपणा अधिक आढळतो.
४. मानवी जनुकांच्या व्यापक अभ्यासात लठ्ठपणाशी संबंधित बऱ्यापैकी जनुके शोधली जात आहेत.

अर्थात जनुके + आहार +व्यायामाचा अभाव + इतर कारणे, असे अनेक घटक मिळूनच लठ्ठपणा येतो. (multifactorial).

Rajesh188's picture

12 Oct 2019 - 9:53 pm | Rajesh188

अन्न साठवून ठेवणे ही साजिवाची प्रवृत्ती आहे .आणि तसे जीन्स मानवी शरीरात असणार ह्या मध्ये बिलकुल शंका नाही.
पण अन्न साठवून ठेवणे आणि लठ्ठ पना ह्याचा संबंध पटत नाही .
स्पष्ट मता बद्द्ल राग नसावा .
साठवून ठेवलेली चरबी आपण वापरत नाही हे कारण असावे .
असे वाटते .
तरी तुमच्या मताचा आदर आहे .
मी त्या क्षेत्रात अभ्यासू नाही (हेटाळणी नाही मना पासून )

टर्मीनेटर's picture

17 Oct 2019 - 8:30 am | टर्मीनेटर

रोचक विषय!
प्रदूषणमुक्त, दाटीवाटी विरहित भटकी जीवनशैली मस्त होती. पृथ्वीतलावर आजही अशी जीवनशैली जगण्यायोग्य जागा उपलब्ध असेल तर तिचा स्वीकार करायला आवडेल :)

कुमार१'s picture

17 Oct 2019 - 9:17 am | कुमार१

रक्तवाहिन्या काठिण्य ( Atheosclerosis ) या आजाराबद्दल एक मजेदार अवतरण पाठ्यपुस्तकात होते. ते आठवून लिहीत आहे:

प्रश्न : असा कोणता माणूस आहे की ज्याला Atheosclerosis होण्याची शक्यता कमीतकमी आहे?

उत्तर : तो माणूस खालीलप्रमाणे असेल :

१. १९२० पूर्वी जन्मलेला,

२. भरपूर चालणारा व फक्त सायकल हेच वाहन वापरणारा,

३. एका शांत बेटावर एका खोलीत गर्दी करून राहणारा !,

४. बेकार व भटक्या आणि ...

५. कंदमुळे खाऊन जगणारा .

असा कोणी आज सापडेल काय !

कुमार१'s picture

17 Oct 2019 - 3:33 pm | कुमार१

Atherosclerosis असे वाचावे.

सुबोध खरे's picture

17 Oct 2019 - 12:15 pm | सुबोध खरे

१९२० साली आपली आयुर्मर्यादा २० होती म्हणजेच तेंव्हा जन्माला आल्यावर सरासरी माणूस २० वर्षे जगत असे मग तो त्याच्या तिप्पट जगला तरी त्याला रक्तवाहिन्या काठिण्य ( Atheosclerosis) होण्याची शक्यता ० टक्के च असणार.
http://www.me-jaa.com/October2015/LifeTable.pdf
रक्तवाहिन्या काठिण्य ( Atheosclerosis) हे रोग आता आपली आयुर्मर्यादा ७० वर्षे झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिसतो हे मूळ कारण आहे. बाकी बैठी जीवन पद्धती व्यायामाचा अभाव आणि अति खाणे हे यशस्वी कलाकार आहेतच.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2019 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा

लेखन आवडले.

कुमार१'s picture

25 Nov 2019 - 6:06 pm | कुमार१

लठ्ठपणा हा जास्ती करून जनुकीय कारणामुळे की अति खाण्यामुळे हा वैद्यकातील नेहमीचा काथ्याकूटाचा विषय आहे. या संदर्भातील एक जागतिक अभ्यास परिषद नुकतीच झाली. त्यातील काही रोचक वृत्त :

• परिषदेच्या सुरवातीस एका वैज्ञानिकाने असे विधान केले – लठ्ठपणा हा ४०% जनुकीय तर ६०% जीवनशैलीशी निगडीत आहे.

• त्यानंतर विविध देशांतील संशोधकांनी आपापले निष्कर्ष सभेसमोर मांडले. त्यातले काही ठळक मुद्दे असे होते:

१. जनुकीय बदल ही फार संथ प्रक्रिया आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांत लठ्ठपणाची जी साथ आली आहे, तिचे खापर निव्वळ यावर फोडता येत नाही.

२. अति खाणे हे कारण वरवर महत्वाचे वाटते. पण, शारीरिक हालचाली कमी होणे, वाहनांचा प्रचंड वापर, व्यायामाचा अभाव, बैठे छंद व आवडी ही कारणे अधिक महत्वाची.

३. सामाजिक पर्यावरणातील बदलांचा जनुकांवर लक्षणीय परिणाम. त्यामुळे विशिष्ट जनुकीय रचना नसलेले लोक सुद्धा लठ्ठ होतात.

• परिषद समारोपाचे वेळीस सर्वांनी या मुद्द्यावर मतदान केले. त्याचा निष्कर्ष:
जनुकीय (nature) घटक अधिक महत्वाचे : ५३% मते.
जीवनशैली (nurture) .......,,....................४७% मते !!

कुमार१'s picture

14 Apr 2020 - 7:11 pm | कुमार१

सेपिअन्सचे लेखक हरारी यांची कोवीदोत्तर जगाबद्दल एक अभ्यासू मुलाखत इथे :

https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/e-conclave-coronavi...

त्यातील रोचक मुद्दे:
१. अमेरिकेच्या जागतिक नेतेपदाला धक्का?
२. जागतिकीकरण संपुष्टात ?
३. लोकांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणार ?

कुमार१'s picture

14 May 2020 - 11:44 am | कुमार१

सध्या वेळ मिळाल्यामुळे 'सेपिअन्स' पुस्तक सावकाशीने वाचत आहे. त्यातून लेखकाने मांडलेल्या इतिहासातील अन्य सामाजिक व राजकीय गोष्टी समजत आहेत. एका प्रकरणातील रोचक वाटलेला भाग इथे देतो :

एके काळी युरोपीय लोकांनी जगभर आक्रमण करून त्यांची साम्राज्ये प्रस्थापित केली होती. या साम्राज्यांमुळे स्थानिक लोकांचे कल्याण की अकल्याण झाले, हा नेहमीचा चर्चेचा मुद्दा असतो. लेखकाने तो फार छान मांडला आहे.

१. जर आपल्याला असे वाटत असेल, की या साम्राज्यांनी जगभर शोषण, छळ आणि हिंसा केली, तर त्यांच्या या कृत्यांनी एखादा ज्ञानकोशही भरेल.

२. याउलट जर असे वाटत असेल, की या साम्राज्यांनी नवी औषधे, आर्थिक सुस्थिती आणि अधिक संरक्षण देऊन स्थानिक प्रजेचे कल्याण केले, तर या मुद्द्यांनी देखील अजून एक ज्ञानकोश भरेल !

कुमार१'s picture

26 Dec 2021 - 7:29 pm | कुमार१

मानवी उत्क्रांती संदर्भात एक चांगला लेख इथे

त्यातील हा भाग रोचक वाटला :


शिकारकाळात धिप्पाड माणूस टोळीचा प्रमुख होत असे. तो आपले रक्षण करेल, शिकार करून अन्न मिळवण्यात मदत करेल असे टोळकऱ्यांना वाटणे साहजिक होते. या भावनेचे अवशेष आजही अमेरिकेत दिसतात. दोन उमेदवारांतील जो उंच व भारदस्त असेल त्याची निवड राष्ट्राध्यक्ष म्हणून ८३ टक्के वेळा झाली आहे.

मुक्त विहारि's picture

26 Dec 2021 - 7:38 pm | मुक्त विहारि

आकर्षक आणि सुदृढ व्यक्तिमत्वांना, सर्वसामान्य माणूस भुलतोच

नट-नट्यांची मंदिरे, हेच दाखवतात

शाम भागवत's picture

26 Dec 2021 - 7:57 pm | शाम भागवत

ट्रंप-बायडेन हा अपवाद असला पाहिजे.
:)

शाम भागवत's picture

26 Dec 2021 - 7:57 pm | शाम भागवत

ट्रंप-बायडेन हा अपवाद असला पाहिजे.
:)

कुमार१'s picture

26 Dec 2021 - 9:27 pm | कुमार१

१७% वेळा उलटी परिस्थिती असणार ना !
:)

बायडन खरोखर जिंकला आहे का?