दोन आण्याची ( पैशाची ) गोष्ट

Primary tabs

तमराज किल्विष's picture
तमराज किल्विष in जनातलं, मनातलं
5 Sep 2019 - 8:57 pm

माझ्या लहानपणी ही गोष्ट माझा आजा मला रोजच सांगायचा. बाबा म्हणजे माझा आजा विड्या वळायचं काम करायचा.
बाबा विड्या वळत असायचा, अन् कोठूनही माझी स्वारी आली की लगेच " बाबा गोष्ट सांग" ऑर्डर सुटायची. बाबा म्हणायचा. " थांब, सांगतो." मी " नाही, आता लगेच सांग".
मग बाबाची गोष्ट सुरू व्हायची.
एक होती म्हातारी. ती चालली कुपाटी कुपाटीना. तिला सापडले दोन पैसे. दोन पैशाचं तिनं दूध आणलं. ते ठेवलं तापायला.
ते गेलं उतू. म्हातारी गेली उतरायला. हाताला आले तीन फोड. फोड फुटले. एकात निघली सकू. एकात निघली बकू. एकात निघला डिंगऱ्या. सकू पाणी आनती का? मी नाही आनीत जा. बकू पाणी आनते का? मी नाही आनीत जा. डिंगऱ्या पाणी आनतो का? आनतो आनतो. डिंगऱ्या माझा कामाचा. शाळेत जातो नेमाचा.
"बाबा, अजून सांग" बाबा म्हणायचा " तुजं पोट भरणार नाही, सांगतो."
एक होता राजा. त्याच्या डोक्यावर सात बाजा. तोच तुजा आजा.
"बाबा आजून सांग".
एक होता सांगू. एक होता नकोसांगू. सांगू चढला झाडावर. मंग खाली कोण राहीला?
मी " नकोसांगू"
बाबा " मंग नही सांगत. "
"बाबा अरिंग मिरिंग".
मग बाबा आणि मी दोन्ही पाय एकमेकांच्या पायाला जूळवायचो. मग बाबा बोटाने एक शब्द बोलत एका पायावर बोट ठेवत खेळ चालू करायचा. अरिंग मिरिंग लवंगा तिरिंग लवंगातीरचा डुबडुब बाजा गाई गोपाळ उतरला राजा. असे शेवटचं बोट ज्या पायावर थांबे. तो पाय मागे घ्यायचा.
हा खेळ झाला की, आपडी थापडी...
"आपडी थापडी गुळाची लापडी. तेलणीच्या तीन पुऱ्या. चाकूत्याचं एक पान. धर गं बेबी हाच कान. " मग कान धरून " च्याव म्याव पिताळाचं पाणी प्याव" हे करायला खूप मजा येई.
मधीच लहर आली की, "बाबा, कुकुचिकू!"
मग बाबाच्या पायावर बसायचं. बाबा पाठीवर झोपून पाय हवेत वर खाली करी व तोंडानं म्हणे. " कुकुचिकू, कुकुचिकू. राजाची लेक माझ्या बाळाची बायकू." मला इतका आनंद व्हायचा. माझा आनंद पाहून बाबाला डबल टिबल आनंद व्हायचा.
दुर्दैवाने मी तिसरी चौथीत असतानाच बाबा वारला. आमच्याकडे कुणाकडेच त्याचा फोटो नाही. चुलत्यांना, आत्यांना विचारलं पण कुणाकडंच नाहीय. अंधूक सा फोटो मनात मात्र आहे. आणि बाबाच्या गोष्टी आठवत राहतात. बाबा मी तुला फार फार मिस करतो रे.

व्यक्तिचित्रणप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

5 Sep 2019 - 9:14 pm | कंजूस

मज्जाच होती की रे.

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 9:20 pm | तमराज किल्विष

हो ना. खूप खूप मजा होती . बालपणीचा काळ सुखाचा!

जव्हेरगंज's picture

5 Sep 2019 - 9:34 pm | जव्हेरगंज

अप्रतिम लिहीलंय हो...!!!
ग्रेट!!

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 9:44 pm | तमराज किल्विष

पाय लागू जव्हेरजी. आपल्या कडून अशा शब्दात प्रतिक्रिया मिळाली हे भाग्य माझे. खूप धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2019 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत !

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 10:56 pm | तमराज किल्विष

धन्यवाद सर.

यशोधरा's picture

5 Sep 2019 - 10:21 pm | यशोधरा

लिखाण आवडलं.

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 10:56 pm | तमराज किल्विष

धन्यवाद यशोधरा जी.

पद्मावति's picture

5 Sep 2019 - 11:00 pm | पद्मावति

खूप मनापासून लिहिलंय. सुंदर आठवण.

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 11:03 pm | तमराज किल्विष

धन्यवाद पद्मावति जी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Sep 2019 - 8:26 am | ज्ञानोबाचे पैजार

आजोबांच्या आठवणी आवडल्या,
प्रत्येकाच्या मनात असे एक अजोबा असतातच
पैजारबुवा,

तमराज किल्विष's picture

6 Sep 2019 - 9:39 am | तमराज किल्विष

धन्यवाद पैजारबुवा जी.

सुधीर कांदळकर's picture

6 Sep 2019 - 9:23 am | सुधीर कांदळकर

मी पण बालपणीं पोहोचलो. अडम तडम तड तड बाजे, चाऊ म्याऊ गरे खाऊ, अटक मटक चवळी चटक. आमच्यातली काही मुले इरिंग मिरिंग म्हणायची.

मस्त लेख. धन्यवाद.

तमराज किल्विष's picture

6 Sep 2019 - 9:39 am | तमराज किल्विष

धन्यवाद सुधीर भाई.

श्वेता२४'s picture

6 Sep 2019 - 12:05 pm | श्वेता२४

हा घोडा कुणाचा? राजाचा, बटो बटो कुठे गेला होतात
अशा प्रकारचे अनेक खेळ आठवले.
छान लिहीलंय

तमराज किल्विष's picture

7 Sep 2019 - 5:30 am | तमराज किल्विष

धन्यवाद.

खूप सुंदर. आजोबांचं निर्व्याज प्रेम.

तमराज किल्विष's picture

7 Sep 2019 - 5:30 am | तमराज किल्विष

धन्यवाद इरामयी.