मराठी दिवस २०२०

मनिषा (भाग २)

Primary tabs

तमराज किल्विष's picture
तमराज किल्विष in जनातलं, मनातलं
2 Sep 2019 - 7:52 am

मी पत्र तर पाठवलं, पण पुढं काय होणार हे कळणार कसं याच विचारात होतो. योगायोगाने एका आठवड्यानंतर मनिषाच आमच्या घरी आली. काहीतरी काम होते. सायकलवरून आली होती. आईकडे तिचं काम होते. ती काहीच बोलली नाही पण डोळ्यांनी खूप काही बोलली. माझी धडधड एकदाची थांबली. तिच्या कडून ग्रीन सिग्नल मिळाला यात मी खूपच खुश झालो होतो. परत एक पत्र पाठवले. दरम्यान माझं कॉलेज संपून एका कंपनीत जॉईन झालो होतो. आता मी माझा पत्ता दिला होता. नंतर मला तिने पत्राचं उत्तर दिले. एक ग्रिटींग कार्ड व चार पाच ओळींचं पत्र त्यात होतं. ' मला तुमची खूप आठवण येते' असं लिहिलं होतं. मग पत्रातून बोलणं सुरु झालं. मात्र समोरासमोर आल्यावर बोलत नव्हती. लाजाळूच्या झाडा सारखी नुसतीच लाजायची व हसून नजर चोरायची. एकदा मी पत्रातून तिला काही पैसे पाठवले तर माझी भेट होताच थोड्या घुश्शात व रडक्या चेहऱ्याने " हे घ्या." असे म्हणून माझ्या हातात ठेवले. परत पत्र पाठवल्याबरोबर तिने मला तिच्या 'चुलत भावाच्या लग्नाला या. तिकडं मी माझं मनोगत तुम्हाला सांगणार आहे.' असे पत्र पाठवले. मला काही धीर धरवला नाही. मी लग्नाआधी च तिला भेटायला गेलो. पण ती जवळ येऊन बोललीच नाही. पुढे परत मी तिला दोनशे रुपये मनीऑर्डर करून पाठवले. काही दिवसांनी तिने दोनशे रुपये मला परत मनीऑर्डर करून पाठवले. मग मी सुध्दा परत पत्र पाठवलं नाही. बरेच दिवस अबोला राहिला.
मनिषा शाळेत खूप हुशार होती. कायमच पहिला नंबर मिळवायची. स्कॉलरशीप मध्येही तालुक्यातून पहिली आली होती. तिचे वडील एक खुशालचेंडू माणूस होते. मुले लहान असतानाच त्यांनी नोकरी सोडून दिली. मनिषाची आई एक सुशिल स्त्री होती. शेतात चारा, भाजीपाला पिकवून संसार चालवत होती. तर वडील काहीच कामधंदा करत नव्हते. मनिषा चार भावंडांमध्ये मोठी होती. तिने सायन्स साइडला जावं अशी माझी खूप इच्छा होती. पण परिस्थिती मुळे तिच्या वडिलांनी आर्टला जायला लावलं. तिच्या वडिलांच्या वागणुकीमुळे माझी आई मनिषा बरोबर लग्न करु नकोस असे मला समजावत होती. पण मी एके दिवशी आईला आग्रह करुन तिच्या आई-वडिलांना लग्नाविषयी विचारून ये म्हणून पाठवलं. पण दुर्दैवाने मनिषाच्या चुलत्याने त्याच दिवशी एक स्थळ तिच्यासाठी आणले होते हे पाहून माझ्या आईला थोडासा रागच आला. ती घरी आल्यावर मला समजले की मनिषाने दुसऱ्या मुलापुढे मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमाला विरोध केला नाही. मी तर एकदम उद्विग्न झालो.
मी तिचा नादच सोडला. भेट घेणं सुध्दा टाळलं. तीनेही बोलणं,पत्र पाठवणं काही केले नाही. व तिच्या मनात काय आहे हे सांगितले नाही. असेच काही दिवस गेले. तिचं लग्न जमलं नाही. पण मी एक मुलगी पसंत केली. साखरपुडा झाला. तिच्या पर्यंत हे समजलंच होतं. पण ती पुढे आली नाही. नंतर माझं लग्नही झालं. विशेष म्हणजे माझ्या लग्नाला ती आली. तिला पाहून माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. लग्न लागल्यानंतर ती तिच्या घरी न जाता माझ्या घरी आली. जणू काहीच घडले नाही असं निर्विकारपणे दाखवत होती.
माझ्या आजूबाजूला असायची पण काही बोलत नव्हती. मलाही आता बायकोसमोर काही बोलता येत नव्हतं. नंतर ती तिच्या घरी गेली. काही दिवसांनी मी तिच्या घरी गेलो होतो तेव्हा तिची चुलत बहीण म्हणाली " काय हो, इतकी काय घाई झाली होती लग्नाची? हिला तुमच्याशीच लग्न करायचं होतं." हे ऐकून मी म्हणालो " हे तिला माझ्याशी डायरेक्ट बोलता येत नव्हतं का? खुशाल दुसऱ्या मुलाबरोबर दाखवण्याचा कार्यक्रम केला. तेव्हा काही कसं वाटलं नाही? " तरी सुद्धा ती गप्पच राहिली. आता ती माझ्याशी बोलायला लागली पण प्रेमाविषयी नाही तर इतर विषयांवर. मी तिकडं गेलो तर तिच्या चेहऱ्यावर आनंद मावायचा नाही. माझ्या इतकं पुढे पुढे करायची की मलाच तिच्याशी लग्न न केल्याचे वाईट वाटायचे. एक दिवस मी तिला विचारले " मी तुला विसरू शकत नाही, आता करशील का लग्न माझ्या बरोबर." तर ती रोमांचित होऊन म्हणाली " दोन दोन लग्न? " मी म्हणालो माझी तयारी आहे. ती विचारात पडली. तीचा निर्णय होत नव्हता.
असेच दिवस जात राहिले. एकदीड वर्षाने तिच्या मामाने एक स्थळ आणले, मुलगा नेव्हीमध्ये होता. पण त्याचं कुटुंब तर्हेवाईक असल्यानं कोणी मुलगी देत नव्हते. त्यांना घाई होती व मनिषाच्या वडिलांची ऐपत नव्हती. लग्न जमल्यावर मनिषा खूप खूष दिसत होती. व माझ्या कडे पाहून माझ्या भावाला म्हणाली " आठ दिवस आधीच या हं लग्नाला. तिचं लग्न जमलं हे पाहून मी फारच व्यथित झालो होतो. मी खूप पझेसिव्ह झालोय असं मलाच जाणवत होते. खूप राग येत होता. असं वाटत होतं जाऊन नवऱ्या मुलाला सांगावं सगळं. पण तिच्या कुटुंबाची बदनामी मला, माझ्या घरातल्यांना सुध्दा सहन झाली नसती. खानदानाची इज्जत जाईल असे केले तर. आणि तिच्या बहिणभावांची लग्नं अडचणीत येतील असा विचार करून शांत राहिलो व पत्नीमध्ये तिला शोधत राहिलो.
तिचं लग्न झालं,मी काय तिकडे फिरकलोच नाही. तीचा माझा काही संबंध नव्हता असे मानून पुढे चालायला सुरुवात केली.
क्रमशः

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

2 Sep 2019 - 3:33 pm | जॉनविक्क

बाकी प्रतिसाद शेवटच्या भागात.