'तंबोरा' एक जीवलग - २

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
29 Aug 2019 - 6:56 pm

कालच्या लेखात तंबोर्‍याबद्दल माहिती लिहिली ती तंबोर्‍याची निमिती, जडणघडण आणि भाग या संबंधीची होती. आज जे लिहिणार आहे ते मला आलेल्या तंबोर्‍यासंबंधीच्या अनुभवाविषयी. लहानपणी तंबोरा हातात आला तो परंपरेनं. आई गायची म्हणून. मला खरं म्हणजे शिकायचं होतं. गाणं करायचं नव्हतं पण शिक्षणाचे वातावरण नव्हते. मला शिकवण्यासाठी फारशी उमेदही कुणी दाखवली नाही. कुणी म्हणजे आईनेच. तिचे आपले एकच " तू गाणंच कर व्यवस्थित" तोच आपला पोटापाण्याचा व्यवसाय. स्वराला पक्की होतेच, गळ्यात गोडवाही होता. बुद्धी तेज चालायची. हे सगळं गाण्याच्या पथ्यावर गेलं आणि शिक्षण राहिलं.

गंडा बांधला. रीतसर शिक्षण सुरू झाल ते भेंडीबाजार घराण्याचं. आई गाताना मागे तंबोर्‍यावर बसणं सहाजिकच होतं. एका बाजूला मी आणि दुसरीकडे अक्का. पण ती गात नव्हती. शिकतही नव्हती. तंबोरा वाजवता वाजवता आईबरोबर गायला लागले. खां साहेब तालमीला आले की सुरूवातीला तेच तंबोरा सुरात लावून देत. माझा सूर काळी पाचचा. उंच. आईचा नैसर्गीक चारचा होता. हळूहळू खां साहेबांनी तंबोरा लावायचा कसा हे शिकवलं. ज्या सुरात लावायचा तो आधी आपल्या डोक्यात हवा. गळ्यातून काढता यायला हवा. सर्वप्रथम मधल्या दोन तारा लावायच्या. त्यातली एकच आधी आपल्या स्वराला लावायची. ती लागली की मग दुसरी लावायची. एकदम दोन्ही तारा लावायला घ्यायच्या नाहीत अशी त्यांची ताकिद होती. गळ्यातून आपला स्वर काढावा मग तार त्या स्वराच्या वर आहे की खाली हे पहावे. तारेचा स्वर वर असेल तर त्या तारेची खुंटी किंचित सैल करायची. खाली असेल तर पिळायची. आधी नुसत्या खुंटीनेच स्वर लावता यायला हवा. मणी, दोरा हे सगळे नंतर.

षड्जाच्या जोडीपैकी एक तार चांगली सुरात लागली की मग दुसरी तार त्या लागलेल्या तारेशी जुळवायची. दुसरी तार लावताना पहिल्या तारेच्या स्वरात काहीही बदल करायचा नाही.

" जर दोन्ही तारा एकावेळी लावत बसलीस तर जन्मात लागायचा नाही तंबोरा " अशे खां साहेब म्हणायचे. ते खरंच आहे.

वाजणार्‍या दोन स्वरांचा तुलनात्मक अभ्यास इथं महत्वाचा आहे. एका स्वरापेक्षा दुसरा स्वर खाली आहे की वर हे लगेच कळायला हवे. "बेटी सूर पहले भेजे मे होता है बाद मे गले मे" असे ते म्हणायचे. खुंट्यांच्या सहाय्याने जोड तारा लागल्या की लावायची ती पहिली तार. तिथं रागाप्रमाणे पंचम किंवा मध्यम किंवा धैवत लावायचा. या साठी बाजाच्या पेटीची मदत घेतलेली आजिबात चालत नसे. लागलेल्या षडजावरून खालचा पंचम लावता यायलाच हवा. षड्ज पंचमाचं नातं असतं गाण्यात. एक बोलायला लागला की दुसरा आपसूक बोलतो डोक्यात. तो तारेने जुळावायचा. हे जुळवताना श्रुतींचं भान ठेवायला लागतं पंचम एखाद दुसरी श्रुती वर खाली लागला तर लगेच कळायला हवे. पंचम लागला की षडजाची जोडी पुन्हा मण्यांद्वारे सारखी करायची. बारीक काम बोटाने मणी खालीवर सरकवताना स्वरात फरक पडता कामा नये. फक्त श्रुतींचा फरक करायचा. स्वराचा नव्हे. हे झाले की मग पुन्हा पंचमाच्या श्रुती लावायच्या नीट. अशा या तीन तारा लागल्या की खालच्या जव्हारीवर प्रत्येक तारेत घालतेले सूत खालीवर करून लागलेल्या स्वरांना गुंजन द्यायचे. असे तीन स्वर गुंजायला लागले की खर्जाकडे वळायचे. (खां साहेव खरज म्हणत)

खर्ज म्हणजे खालच्या सप्तकातला षड्ज. मधल्या जोड तारेचाच स्वर फक्त खालच्या सप्तकातला. हा निट लागला की तारांच्या एकत्रीत छेडण्याने गंधार उमटतो आपोआप. तो गंधार पंचमात मिसळला की रिषभ मिळतो. तो रिषभ खर्जात मिसळला की धैवत मिळतो. धैवत आणि षडजाच्या मीलनातून मध्यम मिळतो. मध्यम आणि षडजातून निषाद. अशा प्रकारे सगळे सातही शुद्ध सुर मिळतात.

खां साहेबांनी तालिम कधीच बाज्याच्या सुरांवर घेतली नाही. बाज्याचे काम मैफिलीत. एरवी तंबोराच. तंबोरा निट लागला की गाणार्‍याच्या चित्तवृत्ती आपोआप खुलतात. चित्त एकाग्र होते. गळा षडज लावायला उतावीळ होतो. तंबोर्‍याचे गुंजन वाढत वाढत स्वरांची वलयं मोठी मोठी होतात आणि गळा 'आकार' लावतो. शुध्द निरागस सूर. निराकार.

तंबोर्‍याच्या सुरात जादू आहे. सुरात एकाबर हुकूम लावलेल्या दोन तंबोर्‍यापैकी एक छेडला की दुसरा आपोआप छेडला जातो. स्वर मात्र तंतोतंत जुळलेले हवेत दोघांचेही. हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. अनुभवले आहे. अतिषयोक्ति आजिबात नाही. लहान मूल बोलायचं वय उलटून गेलं तरी बोलत नसेल तर त्याच्या समोर सुरात लावलेला तंबोरा छेडावा. काही दिवसात बोलू लागतं. तंबोर्‍याच्या गुंजनाने घरात काही बाधा असेल तर ती जाते. बाधा म्हणजे तिथं काही अऋप्त आत्म्यांचा वास असेल तर ते पळतात. आणखी एक मज्जा. पावसाळ्यात दही लागत नाही नीट. विरजण लाऊन दह्याचे भांडे तंबोर्‍याजवळ ठेऊन तो दहा पंधरा मिनिटे छेडावा छान दही लागते.

एकदा एका मैफिलीत माझा तंबोरा काही केल्या लागेना. सगळे उपाय झाले. तारा कुरवाळल्या. दोरे खालीवर केले. खुंट्या पिरगाळल्या. आजिबात म्हणता आजिबात स्वर लागे नाही. नेहमी दोन श्रुती वर नाहितर दोन श्रुती खाली लागायचा. हैराण झाले. रडायची पाळी आली. या संबंधी पुढच्या लेखात सांगते.

गौरीबाई गोवेकर.

कलालेख

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

29 Aug 2019 - 8:18 pm | प्रमोद देर्देकर

मस्त. अतिशय सखोल माहिती.
संगीताबरोबर तुम्ही लेखणीच्या सुध्दा उत्कृष्ट ताना घेत आहात.
तुमचे मैफीलीतले अनुभव सुध्दा येवू द्या नंतर.
म्हणजे ही मालिका अशीच चालु राहू द्या ही विनंती.

शलभ's picture

29 Aug 2019 - 8:57 pm | शलभ

खूप सुंदर लेख

धर्मराजमुटके's picture

29 Aug 2019 - 9:04 pm | धर्मराजमुटके

मस्त ! पहिला आणि दुसरा भाग एकदम आवडला. भैरप्पांचे "मंद्र" वाचल्यापासून मला शास्त्रीय संगीतात गोडी निर्माण झाली. वेळ असल्यास आणि वाचनाची आवड असल्यास हे पुस्तक एकदा वाचून पहा असे सुचवतो.

यशोधरा's picture

29 Aug 2019 - 9:04 pm | यशोधरा

वाचतेय..

उगा काहितरीच's picture

29 Aug 2019 - 9:23 pm | उगा काहितरीच

वाचतोय ! खूप सुंदर वर्णन . आपले काही video असतील तर लिंक मिळेल का ?

संजय पाटिल's picture

30 Aug 2019 - 4:13 pm | संजय पाटिल

व्हिडीओ लिंक असेल तर द्या...

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

30 Aug 2019 - 7:02 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

मुंबई दूरदर्शनच्या सुहासिनी मुळगांवकरांनी एक कार्यक्रम केला होता. खूप वर्ष झाली. त्यात माझी एक मुलाखत होती. पण त्याचे व्हिडीओ नाहीत माझ्याकडे. त्या वेळेस आजच्यासारखे कॅमेरे, मोबाईल फोन नव्हते. आता शक्य आहे सगळं पण उशीर झाला फार.

अरे वा, काय नाव कार्यक्रमाचं?

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

30 Aug 2019 - 8:05 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

पण गोव्यासंबंधित कार्यक्रम होता. गाणं आणि गोवा यांचं नातं. गोव्यातले कलाकार. असं काही होतं त्यात. माझी आई त्या वेळेस हयात होती. तिलाच बोलावलं होतं पण ती नाही म्हणाली. मग तुम्ही याल का अस विचारल त्यांनी. गोव्याचे आणखीही वेगवेगळ्या क्षेत्रातले कलाकार होते त्यात.

अच्छा. बघायला हवं काही मिळतंय का.

कंजूस's picture

30 Aug 2019 - 5:31 am | कंजूस

फुलपाखरांना कोणत्या फुलात मध आहे ते दिसतं तसं काहींना सुरांंचं ज्ञान असतं.
छान लिहिताय. तंबोरा म्हणजे काय ते कळलं. ( कळलं म्हणजे तांत्रिक माहिती कळली, सुर कधीच ऐकू येत नाहीत.)
हल्ली गायक एक छोटा इलेक्ट्रॉनिक 'तानपुरा' आणतात त्यातही हे सर्व असतं का?

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

30 Aug 2019 - 7:05 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

इलेक्ट्रॉनिक तानपुरा म्हणजे यंत्रच की. तंबोर्‍याचा आवाज यांत्रीक रितिने काढणारं. त्यात अस्सल स्वर आणि नाद कसा असेल? हाताळायला सुटसुटीत. दुधाची तहान ताकावर. माझ्याकडेही आहे. पण रियाझाला बरा. मैफिलीतसुद्धा वापरतात पण तो जास्तीचा म्हणून. खरे तानपुरे असतातच साथीला.

जॉनविक्क's picture

30 Aug 2019 - 9:10 am | जॉनविक्क

ऐकावे ते नवलच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Aug 2019 - 11:40 am | ज्ञानोबाचे पैजार

जसा पेटी किंवा तबला शिकवण्यासाठी क्लास असतो तसा तंबोर्‍याकरता कुठे बघण्यात आला नाही.
पैजारबुवा,

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

30 Aug 2019 - 7:11 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

बुवा पेटी आणि तबला या वाद्यांची तंबोर्‍याशी कुठे तुलना करताय. पेटी गाणार्‍याच्या स्वरांचा मागोवा घेते तर तबला तालाचा. तंबोर्‍यातून अखंड स्वरनिर्मिती होते. ज्या स्वरांवर गाणारी व्यक्ती आपल्या कंठातल्या स्वरांचं स्वरविश्व उभारतो. पेटीला तीनही सप्तकांचे बारा सुर मिळून छत्तीस तरी असतात. तंबोर्‍यात दोनच स्वर पुन्हा पुन्हा वाजतात. बुवा, पण तुम्हाला हे माहित आहे. उगीच चेष्टा करता का?

रविकिरण फडके's picture

30 Aug 2019 - 12:00 pm | रविकिरण फडके

हे अर्थातच तुमचे घेतलेले नाव आहे. तुमचे गातानाचे नाव काय आहे?

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

30 Aug 2019 - 7:14 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

माझे पाळण्यातले नाव गौरीच आहे. गातानाचे नाव वेगळे कसे असेल. घरात लाडाचे नाव तानी.

रविकिरण फडके's picture

30 Aug 2019 - 7:41 pm | रविकिरण फडके

मिळाले नाही. म्हणून विचारले.

बोलघेवडा's picture

30 Aug 2019 - 2:38 pm | बोलघेवडा

वाचत आहे. खूपच नवीन माहिती आहे. तंबोऱ्यात एवढी सेटिंग असतात हे प्रथमच कळले.
एक सांगाल का? शास्त्रीय संगीतात तंबोऱ्याचा नक्की काय उपयोग आहे? म्हणजे जर एखाद्या मैफिलीत तंबोरा नसेल तर गायकाला काय अडचण होईल.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

30 Aug 2019 - 7:20 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

गाणार्‍या व्यक्तीला गाताना स्वरांचा एक पाया निर्माण करणे हा तंबोर्‍याचा उपयोग. या पायावरच स्वरांचे विश्व उभारते. तयार होताना समोर आरसा नसेल तर काय होईल? तसे होईल. मैफिलीत तंबोरा नसेल तर हा पाया निर्माण होणार नाही. परिणामी पायाशिवाय बांधलेली इमारत जशी अल्पायु , कोसळेल. तसे गाणे पडेल. बाकी काही अडचण नाही

शास्त्रीय संगीताबद्दल काहीही कळत नाही हे आमचे दुर्दैव आहे परंतु ऐकायला छान वाटते.

केवळ सुरेल आहे कि नाही यापलीकडे मजल नाही.

या ऐकण्यास छान वाटण्याच्या मागे किती तपश्चर्या आहे हे बऱ्याच कलाकारांकडून ऐकले/ वाचले आहे.

परंतु आज तंबोरा या वाद्याबद्दल प्रथमच वाचतो आहे.

आमच्या सारख्या अतिसामान्य ( रसिक म्हणवण्याची सुद्धा लायकी नसलेल्या) वाचक कडून एक हृदयाच्या तळापासूनच मानाचा मुजरा

__/\__

धन्यवाद. ऐकायला छान वाटते. तेच आपल्या गाण्याचं यश. नाहीतर तिकडे ह्युस्टनला मुलाकडे गेले असताना तिथले गाणे ऐकायचा दोनदा योग आला. चित्तवृर्‍त्ती शांत न होता विचलीत करणारं गाणं ते. अर्थात अपवाद असतात. आपल्या नादब्रम्हाची सर जगात कुठ्ठे नाही हे खरे.

जालिम लोशन's picture

31 Aug 2019 - 12:20 am | जालिम लोशन

तालात लिहिले आहे.

सुधीर कांदळकर's picture

31 Aug 2019 - 6:42 am | सुधीर कांदळकर

वगैरे.

आपल्या नादब्रम्हाची सर जगात कुठ्ठे नाही हे खरे.

अगदी खरे.

पुढील भागांची वाट पाहातो आहे.

संगीता मध्ये रुची आहे (म्हणजे ऐकायच्या) परंतु ओ कि ठो काही कळत नाही.
पुढे कधी जमलंच तर शिकायची मनीषा देखील आहे.

तुमच्या ह्या लेखांमुळे थोडंफार काही समजलं, आणि विशेषतः तंबोऱ्या बद्दल समजावून घेता आलं त्याबद्दल धन्यवाद !!

तमराज किल्विष's picture

31 Aug 2019 - 1:40 pm | तमराज किल्विष

गौरी जी खूप खूप धन्यवाद!! ही लेखमाला अशीच सुरू ठेवा. जीवनातील इतर अनुभव, छंद, प्रवास, परदेश दौरा याविषयी वाचायला खूप आवडेल. कृपया लिहित रहा. संगीत मनुष्याला समृध्द , विनम्र बनवतं असे माझं मत आहे.

इरामयी's picture

31 Aug 2019 - 6:27 pm | इरामयी

खूप सुंदर... पुन्हा एकदा!

झेन's picture

31 Aug 2019 - 7:32 pm | झेन

तंबोरा आणि लेखन दोन्हीचा सूर मस्त लागला आहे.
शास्त्रीय संगीतातील जादू अद्भुत आहे पण अभ्यास करण्याएवढा पेशन्स माझ्याकडे नाही ;-(

सस्नेह's picture

31 Aug 2019 - 10:01 pm | सस्नेह

अतिशय सुरेल लेख !
भारतीय शास्त्रीय संगीत हे खरेखुरे नादब्रह्मच !!
वाचतेय, लिहा अजून..

जॉनविक्क's picture

2 Sep 2019 - 12:08 am | जॉनविक्क

नादब्रम्ह नावाचे हॉटेल बघितले काहीच उणे नसलेल्या शहरात. कहर आहे. काय आहे आतमध्ये बघायला एकदा जाऊन आले पाहिजे.

गामा पैलवान's picture

2 Sep 2019 - 6:39 pm | गामा पैलवान

गौरीबाई,

फारंच सुरेख लिहिलंय तुम्ही. मला संगीतातलं ओ की ठो कळंत नाही. त्याबाबतीत मी औरंग्याच्या फक्त एक पायरी खाली आहे. मात्र शास्त्रीय संगीताबद्दल पराकोटीचा आदर आहे. तुमचं लेखन वाचून बरीच माहिती मिळाली. लिहित्या राहा अशी विनंती.

तंबोऱ्यावरनं आठवली ती आकाशवाणीची सकाळी पहिली वाजणारी धून. सहा की साडेपाच वाजताची आहे. तिच्यात (बहुतेक) सनई वापरली आहे. धुनेत मागे (बहुतेक) तंबोरा वाजतोय.

इथली पहिली धून : https://www.youtube.com/watch?v=ELHqKmXwGjM

तंबोऱ्याचा आवाज मनांत आजूनही घर करून आहे.

आ.न.,
-गा.पै.