N.H.4 (रहस्यकथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
20 Aug 2019 - 6:22 pm

रात्र बरीच चढली होती. चंद्राची छोटीशी कोर आकाशात चमकत होती. अंधार दाटून आला होता. रात किड्यांच्या किर्र आवाजाने वातावरण भारून गेल होत. आणि या शांत वातावरणात त्याचा ट्रक वेगाने पुढे जात होता. पुणे राष्ट्रीय महामार्गावरून त्याचे येणे जाणे नित्याचे असल्याने, ट्रक चालविताना तो बेफिकीर होता. त्याच्या चेहर्‍यावरून तो बेफिकीरपणा जाणवत होता. शांत शीळ वाजवीत गाडीचे गोल स्टेअरिंग त्याने पकडले होते. स्टेअरिंग डावी  उजवीकडे वळवताना त्याला मजा वाटत होती.
तो मजेत वाहने चुकवित वेगाने मुंबईकडे निघाला होता. अठरा- एकोणीस वर्षाचा त्याचा क्लिनर बाजूच्या सीटवर घोरत पडला होता. दिवसभराच्या दगदगीने त्याला झोप लागली होती.
   भर्रकन काही वाहने पुढे निघून जायचे. काही वाहनांना हा मागे टाकून पुढे निघून जायचा. रात्रीच्या शांत वातावरणात वाहनांचा हा खेळ मजेशीर वाटू लागला. संथ एकाच गतीने आणि एकाच रेषेत धावणारे वाहने सपासप अंतर कापू लागले.
   त्याला रात्रीचा प्रवास आवडायचा. रात्री अंतर वेगाने कमी होते. अंतर कमी जाणवत आणि प्रवास लवकर संपतो. अस त्याच रात्री प्रवास करण्याच साध गणित होत.
  त्याचा हा रोजचा मार्ग होता. रोज पुणे-मुंबई तो फेरी मारायचा. त्यामुळे त्याला या फेरीचे विशेष असे अप्रुप वाटत नव्हते. पण आज तो विशेष आनंदात होता. एका मोठ्या वाहनाला मागे टाकत तो विचारमग्न झाला.
    आज सकाळी तो ट्रक धुण्यात मग्न होता. रात्रीची फेरी असल्यामुळे त्याला ट्रक धुवून स्वच्छ करन गरजेच होत. कुठलतरी  गाण म्हणत तो ट्रक धुण्यात गुंतला होता. तेवढ्यात त्याचा फोन खणखणला. माहेरी गेलेल्या बायकोचा फोन होता. त्याने फोन उचलून कानाला लावला तेव्हा; त्याला बायकोने ती आनंदाची बातमी सांगितली. तो बाप झाला होता. बर्‍याच वर्षांपासूनची त्याची इच्छा फळाला आली होती. त्या बातमीने त्याला खूप आनंद झाला.
     लग्न होऊन पाच सहा वर्ष झाली होती. पण एवढे वर्ष होऊन पण त्यांना काहीच अपत्य नव्हत म्हणून; तो आणि त्याचे घरचे सगळे नाराज होते. त्याच्या बायकोला रूपाला त्याच खूप दुःख वाटायच. अपत्य होत नाही म्हणून सगळ्यांचे बोलणे तिला ऐकून घ्यावे लागायचे. शहरात जाऊन सगळ्या तपासण्या केल्या. त्यांचे सगळे निकाल सामन्य आले. डॉक्टर म्हणाले होते, "तुम्हाला लवकर अपत्य होईल." आणि त्याच आशेवर आम्ही दिवस ढकलत होतो. पण अपत्य सुख काही पदरात पडत नव्हते. आणि मग एक दिवशी अचानक बायकोला कोरड्या उलट्या झाल्या. सासू जवळच होती. तिच्या हे लक्षात आल्यावर तिला लई सुख झाल. सगळ्या घरात आनंद उतू जाऊ लागला. तीन चार महिन्यानी तीला माहेरी धाडले. आणि आज अचानक तीचा हा फोन आला होता. त्याला आनंदाच उधाण आल होत.
    अचानक एका ट्रक च्या भोंग्याने तो विचारातून जाग्यावर आला. ट्रकची स्टेअरिंग डावीकडे ओळवुन त्याने मागच्या ट्रकला वाट करून दिली. स्वतःशीच हसत तो ट्रक वेगाने चालवत निघाला.
     आळेफाटा ओलांडून तो पुढे आला. एक छोटस गाव समोर दिसत होत. खंब्यावरचे पिवळे, पांढरे लाईट ट्रक मधून दिसू लागले. रोड मोकळा होता. त्याने ट्रकचा वेग  वाढवला. कुठलेतरी हिंदी गाणे गुणगुणत तो निघाला होता. पुन्हा एकदा बायकोचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. झालेल्या पोराच काल्पनिक चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभारून आल. त्याला आनंदाचा हर्ष झाला. एक सुखाची सणक डोळ्यापुढे येऊन गेली. आणि अचानक 'धाड्कन' असा जोरात आवाज आला. ट्रकने कोणाला तरी जोराची धडक दिली होती. कोणीतरी लांब जाऊन पडल्याचे त्याला दिसले. त्याची मती गुंग झाली. शरीर स्तब्ध झाल. क्षण दोन क्षण काय झाल हे त्याला कळालच नाही. संवेदना लुप्त झाल्या. त्याने महत्प्रयासाने ट्रकला ब्रेक मारला. कसातरी रोडच्या डाव्या बाजूला ट्रक लाऊन तो थरथरत्या अंगाने खाली उतरला. रोडच्या कडीला एका मोठ्या खडकाची एक खोल घळी होती. मघाशी धडक बसली तेव्हा कोणीतरी त्या घळीकडे उडाल्याचे त्याने पाहिले होते. तो घळीजवळ आला.
त्याला घळीतून कण्हण्याचा आवाज आला. कोणीतरी वेदनेने कण्हत होते. तो जवळ गेला. एक बाई तेथे रक्तबंबाळ होउन पडली होती. तीच वेदनेने कण्हत होती. तो तिच्या जवळ गेला. तीला त्याची चाहूल लागली. तिची मंद हालचाल झाली. तिने मोठ्या प्रयासाने डोळे उघडुन त्याच्याकडे पाहिले. तोंडातून हलकेसे शब्द बाहेर पडले,"पाणी! पाणी!". तिच्या डोळ्यात आशा दिसू लागली. हा माणूस मदत करेल अशी उमेद तिच्या डोळ्यात दिसून आली. ती हाताने मदतीचा इशारा करू लागली. सगळ शरीर रक्तबंबाळ झाल होत. डोक्यातून अजूनही रक्त गळत होत. शेजारी खडकात सगळ रक्तच रक्त पडल होत.
   हा आधीच घाबरला होता. त्याच्याच ट्रकच्या धडकेने ती उडाली होती. हिला दवाखान्यात घेऊन गेलो तर; पोलीस चौकशी करणार. तो आपलाच ट्रक होता हे ओळखणार. आपण अडकलो जाणार याची भीती त्याला वाटू लागली. तो द्विधा अवस्थेत पडला. काय करावे हेच कळेना. मेंदू काहीच उत्तर देईना. शेवटी त्याने एकदा तिच्यावर नजर टाकली आणि तो वेगाने ट्रककडे निघाला. पाठीमागून कण्हण्याचा जोरात आवाज येऊ लागला. ती बाई उरले सुरले अवसान गोळा करून त्याला आवाज देऊ लागली. "मला वाचव, मला वाचव" हे शब्द त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागले. पण त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. तो तडक ट्रककडे निघाला. आता तिचे शब्द अस्पष्ट झाले. ते ऐकू येईनात. तो ट्रक मधे चढला आणि त्याने ट्रकला वेग दिला.
   मध्यरात्रीच्या वेळी तो मुंबईत पोहोचला. ट्रक मधला माल त्याने गोदामात खाली केला. त्याच चित्त जाग्यावरच नव्हत. सारख मनात ती ट्रकची धडक येत होती. माल खाली झाल्यावर त्याने ट्रक गोदामाच्या बाहेर लावला. आणि ट्रक मधेच त्याने अंग टाकले. पण झोप येत नव्हती. ट्रकची धडक, घळीत पडलेली बाई आणि तीची मदतीसाठी केलेली याचना त्याच्या कानात सारखी घुमू लागली. तिच्या कण्हण्याच्या आवाजाने त्याची झोप मेली होती. डोळे पापण्यांच्या आड गेले की डोळ्यासमोर अंधार येण्याऐवजी लाल रक्त येत होते. 'तीला आपण मदत करायला पाहिजे होती?' हा प्रश्न इंगळ्या डसाव्यात तसा त्याच्या मनाला डसत होता. त्या बाईच्या ऐवजी आपली बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे असा भास त्याला होऊ लागला. पोट वाढलेली आपली बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे त्याला दिसू लागली आणि; आपण तीला एकटीला सोडून जात आहोत आशा विचित्र कल्पनांनी त्याच्या झोपेचे मातेरे  केले. त्याने डोक गच्च आवळून धरल. पण ते विचित्र विचार काही त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हते. त्याने काहीही दुसरा विचार करायला सुरुवात केली की ;तो फिरून फिरून त्याच विचारावर येऊन टेकायचा. कोणाला तरी हे सांगाव अशी प्रबळ इच्छा त्याच्या मनात डोकावून गेली पण ;या आशा मध्यरात्री कोणाला सांगणार? त्याने तो विचार डोक्यातून काढून टाकला.
     तो बायकोच्या आणि झालेल्या पोराच्या विचारात गढून गेला. बायकोचा हसरा चेहरा, झालेल्या बाळाचा गोड चेहरा आता त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. बाळाचे बोबडे बोल त्याला मधुर संगीतासारखे वाटू लागले. त्याच संगीताच्या धुंदीत त्याच्यावर झोपेचा अंमल चढला. तो झोपी गेला.
    ट्रकच्या भोंग्याच्या आवाजाने त्याला जाग आली. सकाळ झाली होती. तो जागा झाला.  कालच्या धडकेची भीती जरा कमी झाली होती.  त्याचा फोन वाजू लागला. बायकोचा फोन होता. त्याला जरा हायस वाटल. ' पोराच तोंड पाहायला लवकर या!' अस ती म्हणत होती. त्याला आनंद झाला. आज दुपापर्यंत येतो अस म्हणत त्याने फोन ठेवला. 'आता लगबग करून निघाव लागेल' अस स्वतःशीच म्हणत तो जाग्यावरून उठला.
   ट्रकमध्ये गोदामातला दुसरा माल भरला आणि त्याचा ट्रक पुण्याकडे परत निघाला. कधी एकदा बायकोकडे जातो आणि पोराच तोंड पाहतो अस त्याला झाल. कालच प्रकरण काही काळ का होईना त्याच्या विस्मृतीत गेल. त्याची मळभ थोडी कमी झाली.
   ट्रक बराच पुढ आला. त्याने ट्रकचा वेग वाढवला. त्याच लक्ष डाव्या बाजूला गेल. एक माणूस हात करून लिफ्ट मागताना त्याला दिसला. एरव्ही तो असे अनेक माणसे ट्रक मध्ये बसवायचा. तेवढाच त्याचा चहापाण्याचा खर्च निघायचा. पण आज त्याने ट्रक थांबवला नाही. त्याला बाळाला पहायची घाई झाली होती. त्याला आता वेळेचा एक एक क्षण महत्वाचा वाटत होता. हात करणार्‍याला डावलून तो पुढे निघाला. काचातून तो माणूस रागाने त्याच्याकडे पाहतोय हे त्याला दिसले. ते पाहून तो स्वतःशीच मंद हसला.
     मुंबईपासून तीस चाळीस किमी पुढे आला होता. अचानक रोडच्या डाव्या बाजूला त्याला माणसांची आणि वाहनांची गर्दी दिसली. त्याने ट्रकचा वेग कमी केला. आणि काय झाले ते बघू लागला. कोणाचा तरी अपघात झाला होता. एक माणूस रोडच्या कडेला रक्तबंबाळ होऊन पडलेला त्याला दिसला. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. डोळ्यासमोर कालची धडक चमकून गेली. ती बाई पण अशीच रक्तबंबाळ होऊन पडली होती. त्या आठवणीने तो पुन्हा एकदा गंभीर झाला. तिथ एक क्षण पण थांबायची त्याची इच्छा झाली नाही. त्याने ट्रकला वेग दिला आणि; पुढे निघाला. पण पुन्हा पुन्हा त्या बाईचा रक्तबंबाळ देह त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आता समोरच्या काचात पण त्याला तिचा मदत मागतानाचा चेहरा दिसू लागला. त्याने भीतीने लगेच व्हायपर सुरू केले. तो चेहरा पुसण्याचा प्रयत्न केला पण;तो पुन्हा पुन्हा काचेवर प्रकट होत होता. त्याने निकराने ते सगळ मनातून काढण्याचा प्रयत्न केला. पण ते काही मनातून जात नव्हत.
  अचानक त्याला एक बाई ट्रकला हात करताना दिसली. पाहिल्या माणसासारखं तिच्याकडे पण त्याने दुर्लक्ष केले. पण अचानक मनात काय आल काही कळालंच नाही. कुठेतरी खोलवर मनात आज्ञा झाली की, 'थांब'. त्या आज्ञेच्या हुकुमाप्रमाणे  त्याने ट्रकला ब्रेक मारला. आपण ट्रक थांबवलाय याच त्याला आश्‍चर्य वाटल. आता तिला लिफ्ट देण भागच होत. ती बाई ट्रक जवळ आली. त्याने दार उघडल. ती बाई ट्रक मध्ये आली आणि बाजूच्या सीटवर बसली.
   बाईचा चेहरा रडवलेला होता. ती सारखी पदराने डोळे पुसत होती. हातात कसल्यातरी औषधांच्या बाटल्या होत्या. काही गोळ्या होत्या. बहुतेक कोणीतरी आजारी असेल त्याच्या गोळ्या आणि औषध असेल आणि त्याच कारणाने ती रडत असेल असा विचार त्याने केला. "कुठे जाणार बाई?" ट्रक पुढे नेत त्याने विचारले. ती काहीच बोलली नाही. त्याला नवल वाटल. त्याने पुन्हा जोरात विचारल, " बाई तुम्ही कुठे उतरणार?" तीने एकवार त्याच्याकडे पाहील आणि पुन्हा पदर डोळ्याला लाऊन रडू लागली. तो वैतागला. बाई काही उत्तरच देत नव्हती. काय करावे त्याला कळेनाच. उगाच हिला गाडीत घेतल अस त्याला त्याला वाटू लागल. ' जिथ उतरायाच असेल तिथ उतरेल. तीच ठिकाण आल की आपसूकच सांगेल.' असा विचार करून तिला काही विचारण्याच्या भानगडीत तो पडला नाही. ट्रक शांतपणे आपल्या वेगाने धावू लागला. तो अधून मधून तिच्यावर नजर टाकू लागला. ती अजूनही डोळ्याला पदर लाऊन रडत होती. त्यान न राहून पुन्हा तीला विचारल, " बाई काय झाल? तुम्ही मघापासून रडत आहात?" तीने वर मान करून त्याच्याकडे पाहील आणि एक हुंदका देऊन पुन्हा खाली मान घालून रडू लागली. तो आता खूप वैतागला. हिला आता काहीच बोलायच नाही, अस ठरवून तो पुढे पहात ट्रक चालवु लागला.
    'आळे फाटा वीस किमी' या उजव्या बाजूच्या पाटीवर त्याचे लक्ष गेले. आणि त्याला कालची धडक आठवली. धडकेची जागा इथून जवळच होती. त्याच्या अंगावर काटा आला. त्या बाईच काय झाल असेल? तीला कोणी दवाखान्यात नेले असेल का? ती जिवंत असेल का? का अजूनही ती तिथेच त्या घळीत पडून असेल? अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात घेर केला. त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला.
      " माझ नाव लता हाय." अचानक ती बाई बोलली. त्याने दचकून तिच्याकडे पाहील. त्याने मानेनेच तिला होकार भरला.
     " मोलमजुरी करून मी पोट भरते. पाच वर्षांपूर्वी माझा नवरा एका आजाराने मेला. तो मेल्यावर लई हाल झाले माझे. एक दहा वर्षाच पोरग पाठीशी हाय. मोलमजुरी करून आम्ही पोट भरतो. पोरग लई गुणाच हाय. परमेश्वर नाव हाय त्याच. तस नीटनीटक चालल हाय आमच." ती शून्यात दूर कुठेतरी बघत त्याला सांगू लागली. त्याला नवल वाटल. आधी एवढ बोललो तर ही काहीच बोलत नव्हती. पण आता चांगली बोलत आहे. आधी त्याला ती विचित्र वाटली पण आता ती मोकळ बोलत होती.
      " ह्या औषध गोळ्या कोणासाठी आहेत? " त्याने तिच्या हातातल्या औषध गोळ्याकडे बघत विचारल.
तिने एकवार त्याच्याकडे पाहिले. तीचा चेहरा आता करारी आणि भावनाहीन झाला होता. हळूहळू चेहर्‍यावर क्रोध जमा होताना त्याला दिसू लागला. त्याला त्याच नवल वाटलं.
ती त्याच्याकडे बघून पुन्हा बोलू लागली, "काल सकाळपासून माझ पोरग आजारी होत. तापान त्याच अंग फणफणत होत. लई ताप होता त्याला. तापेतच काहीही बरळू लागल. त्याला घेऊन गावातल्या नर्सकडे गेले. तीन त्याला काही औषध गोळ्या दिल्या. त्याला बर वाटू लागल. त्याला घरी घेऊन आले. पण रात्री अचानक त्याचा ताप वाढला. सगळ अंग जाळासारख पोळू लागल. त्याला झटके येऊ लागले. मला काय कराव कळेना. लई घाबरून गेले मी. औषध गोळ्या दिल्या तरी काही फरक पडला नाही. पोरग सारखे झटके देऊ लागल. न राहून तसच नर्सला बोलवायला धावत घराबाहेर पडले. नर्सच घर जरा लांब रोडच्या पलीकडे होत. कधी एकदा तिच्या घरी जाते आणि तिला बोलून आणते अस झाल होत. सारखा पोराचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. एवढा रोड ओलांडला की आल तीच घर अस स्वतःशीच म्हणत मी रोड ओलांडू लागले. आणि अचानक जोरात एक ट्रक वेगात माझ्या दिशेने आला. आणि काही कळायच्या आत त्याने मला जोरात धडक दिली.
त्याच्या धडकेने मी लांब जाऊन त्या खडकाच्या घळीत जाऊन पडले. " तीने कालच्या घळीकडे बोट दाखवत इशारा केला.
ती आता क्रोधाने पेटली होती. डोळ्यात अंगार दाटला होता. तिचा चेहरा हळू हळू भेसूर दिसू लागला. ती हळू हळू त्याच्या दिशेने येऊ लागली. कधी त्याच्या जवळ येऊन त्याचा गळा दाबेल याचा नेम उरला नाही.

  त्याच्या पायाखालची वाळू सरकली. तिचे शब्द कोणीतरी कानात शिसे ओतावे तसे कानात शिरले.  हे कस शक्य आहे? अस त्याला वाटू लागल. त्याचे अंग थरथर कापू लागले. स्टेअरिंगवरचे हात कंप पावु लागले. त्याच्या डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसेना. कालची बाई साक्षात त्याच्या पुढे बसली होती. त्याने भीतीने गपकन डोळे मिटले. काय होईल ते होईल. आता आपण मरणार याची जाणीव त्याला झाली. ट्रक जागेवर थांबला होता. काहीही होऊ दे डोळे उघडायचे नाही अस त्याने ठरवल.
   बराच वेळ झाला. त्याने हळूच डोळे उघडले. शेजारी सीटकडे त्याने भीतभीतच पाहिले. सीटवर कोणीच नव्हत. ती बाई निघून गेली होती. तीने काहीच का केले नाही? ती आपला बदला घ्यायला आली होती? मग तिने आपल्याला जिवंत का सोडले? अशे प्रश्न त्याला पडले. पण ती गेल्याने त्याला हायस वाटल. त्याचे डोळे पाणावले. त्याला पश्चाताप होऊ लागला. तिच्या बरोबर आपण तिच्या पोराचा पण बळी घेतला या जाणिवेने त्याला कसतरी झाल. तीला आपण का नाही वाचवल? या प्रश्नाने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक फोनच्या रिंगने तो भानावर आला. त्याने थरथरत्या हाताने फोन उचलला. पलीकडून त्याची सासू बोलत होती. ती मोठ्याने हुंदके देऊन बोलू लागली, "जावईबापू लवकर निघून या. आम्ही पोराला लस टोचायला  घेऊन जात होतो. रुपाच्या हातात पोरग होत. रोड ओलांडत असताना अचानक एक ट्रक जोरात आला आणि त्याने रूपाला धडक दिली. पोरासोबत ती उंच हवेत उडून दगडावर पडली. दोघही जागेवर गेले. दोघही संपले."
    त्याच्या मेंदूवर कोणीतरी घणाचे घाव घालत आहे, असंख्य मुंग्यां शरीराचा चावा घेत आहेत आणि खोल गर्तेत आपण बुडत आहोत असा भास त्याला होऊ लागला. क्षण दोन क्षण आपण काय ऐकल हेच त्याला कळेना. कानावर जे ऐकलंय त्याचा विश्वास बसेना. तीने आपला बळी का नाही घेतला? तीने आपल्याला का नाही मारले? या सगळ्या प्रश्नाचे उत्तरे त्याला मिळाली. तीने बरोबर डाव साधला होता. माय लेकाच्या बदल्यात माय लेकाचा बळी तिने घेतला होता. तो क्रोधाने ट्रक मधून खाली उतरला. धावत त्या घळीजवळ गेला. घळीत डोकावून पाहिले तेव्हा, त्या बाईचा मुदडा समोर पडला होता. आता तो मुडदा रक्तबंबाळ नव्हताच. तो मुडदा शांत दिसत होता. तो मंद हासत होता आणि त्याला त्या मुडद्याच्या चेहर्‍यावर सुड घेतल्याचे समाधान दिसत होते. त्याने बायको आणि पोराच्या आठवणीच्या दुःखात मोठ्या मुश्किलीने पुण्याकडे ट्रकला वेग दिला....

     **समाप्त..

  अभिप्राय नक्की कळवा.
 
    वैभव नामदेव देशमुख.
   (STA, GST भवन मुंबई)
    mo. n- 9657902283.

कथालेख

प्रतिक्रिया

उपेक्षित's picture

20 Aug 2019 - 7:30 pm | उपेक्षित

अपेक्षित वळणे असलेली पण मस्त कथा होती.

vaibhav deshmukh's picture

20 Aug 2019 - 9:11 pm | vaibhav deshmukh

धन्यवाद सर

पद्मावति's picture

20 Aug 2019 - 10:51 pm | पद्मावति

अपेक्षित पण तरीही मस्तं. लेखनशैली चांगली आहे तुमची. पु.ले.शु.

vaibhav deshmukh's picture

21 Aug 2019 - 11:57 am | vaibhav deshmukh

धन्यवाद सर

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Aug 2019 - 1:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

आहो त्यांचा आयडी "पद्मावति" आहे "खिलजि" नाही.

पैजारबुवा,

खिलजि's picture

21 Aug 2019 - 6:57 pm | खिलजि

पैबु काका नम्स्कार

किल्लेदार's picture

23 Aug 2019 - 4:53 pm | किल्लेदार

हा हा हा हा हा हा हा हा हा !!!

जॉनविक्क's picture

20 Aug 2019 - 11:09 pm | जॉनविक्क

vaibhav deshmukh's picture

21 Aug 2019 - 11:58 am | vaibhav deshmukh

पुढच्या कथेत येईल मजा सर..

जॉनविक्क's picture

21 Aug 2019 - 12:40 pm | जॉनविक्क

या वेळी राज्य कर सहायक च्या ऐवजी STA लिहलेले दिसले, बहुदा State Tax Assistant असावे या विचाराने STA means google केले तर पहिला रिजल्ट अरबन डिक्षनरी चा होता, डिफीनेशन होती STRAIGHT TO ANNAL.

आधीच gst त्यात sta म्हणजे असे काही असेल म्हटल्यावर बोबडीच वळली की _/\_

नि३सोलपुरकर's picture

21 Aug 2019 - 1:19 pm | नि३सोलपुरकर

जॉन राव _/\_ दंडवत .
कहर आहे .

पुणे नासिक रोडवरचा आळेफाटा पुणे मुंबई रोडवर?

vaibhav deshmukh's picture

21 Aug 2019 - 11:54 am | vaibhav deshmukh

दुरुस्त करतो सर.. धन्यवाद

जव्हेरगंज's picture

21 Aug 2019 - 12:49 am | जव्हेरगंज

उत्तम लिवलंय!

vaibhav deshmukh's picture

21 Aug 2019 - 11:55 am | vaibhav deshmukh

धन्यवाद सर

प्रामाणिक पणे सांगायचे तर जमली नाहीये.
म्हणजे लेखनशैली उत्तम, रंगवणे पण उत्तम, पण मूळ कथाबीज मला आवडलं नाही.

धन्यवाद सर.. पुढची कथा आवडेल तुम्हाला.

विनिता००२'s picture

21 Aug 2019 - 10:26 am | विनिता००२

लेखनशैली चांगली आहे.
पण भौगोलिक माहीती करुन घेवून मग लिहा. आळेफाटा पुणे - नाशिक हायवे ला लागतो.

धन्यवाद सर.. दुरुस्ती करतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2019 - 11:00 am | डॉ सुहास म्हात्रे

लेखनशैली चांगली आहे, पण घटनाक्रम आणि त्यांच्या वेळांत गडबड झाली आहे... 'गोड बातमी सांगण्याचा फोन येतो आणि लगेच दुसर्‍या दिवशी बायको बाळंत होते', हे कसे काय ?!

धन्यवाद सर.. पुढची कथा आवडेल तुम्हाला.

उपेक्षित's picture

21 Aug 2019 - 12:52 pm | उपेक्षित

ते तेवढ प्रत्येक प्रतिसाद कर्त्याला सर/सर नका हो करू (काही महिला मंडळाला पण तुम्ही सर करून टाकलाव) इथ सगळे सारखेच आहेत.

आनन्दा's picture

21 Aug 2019 - 1:08 pm | आनन्दा

धन्यवाद सर, पुढच्या वेळेस लक्ष्यात ठेवेन :P

उपेक्षित's picture

22 Aug 2019 - 4:02 pm | उपेक्षित

:) काहीही ह सर :P

आवडली. अपेक्षित शेवट होता. पण एकुण शैली , कथा आवडली.

मृणालिनी's picture

21 Aug 2019 - 3:37 pm | मृणालिनी

खरचं वाईट बदला घेतला त्या भूताने.
मला वाटलं त्याचा ट्रक दरीत घालवेल ती.
पण घटनाक्रम आणि काही अजून बाबींना विचारात घेतलतं तर अजून छान होईल.

पु.ले.शु.

मृणालिनी's picture

21 Aug 2019 - 3:38 pm | मृणालिनी

कथा छान आहे.

mayu4u's picture

21 Aug 2019 - 3:49 pm | mayu4u

धन्यवाद सर

आधी प्रतिसाद वाचले .आता कथा वाचायला घेतोय मग पुन्हा प्रतिसादेन. तोपर्यंत एक प्रश्न मनात पडलाय तो हा कि तुम्ही सर्व आयडीना सर असे का संबोधले ? काही गूढ आहे कि काय त्यामध्ये ? नाही म्हणजे असेच विचारतोय ...

रहस्यकथा म्हणण्यापेक्षा सूडकथा जास्त उचित ठरेल .. तरीही लिहिले आहेत चांगले .. अजून जास्त रंगवता आले असते .. असो पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ... शुभम भवतु

खरचं वाईट बदला घेतला त्या भूताने.
मला वाटलं त्याचा ट्रक दरीत घालवेल ती.>>+११११

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Aug 2019 - 10:39 am | ज्ञानोबाचे पैजार

मला वाटलं त्याचा ट्रक दरीत घालवेल ती

तिच्या कडे लुना असती तर ट्रक नक्की दरीत गेला असता

पैजारबुवा,

आनन्दा's picture

22 Aug 2019 - 11:14 am | आनन्दा

ठो ठो हसतोय मी!!

नि३सोलपुरकर's picture

22 Aug 2019 - 3:13 pm | नि३सोलपुरकर

" तिच्या कडे लुना असती तर ट्रक नक्की दरीत गेला असता"- लेखक हे पुढच्या वेळी नक्की लक्षात घेतील .
बाय द वे धन्यवाद सर.

ऋतुराज चित्रे's picture

23 Aug 2019 - 8:13 pm | ऋतुराज चित्रे

अठरा- एकोणीस वर्षाचा त्याचा क्लिनर बाजूच्या सीटवर घोरत पडला होता. दिवसभराच्या दगदगीने त्याला झोप लागली होती
क्लिनर होता की कुंभकर्ण? ट्रक बाईला उडवतो, थांबतो, मुंबईला येतो, माल उतरवतो,दुसऱ्यादिवशी माल भरून ट्रक पुण्याला निघतो,भूत ट्रक मध्ये बसते तरी ह्याची झोप उडत नाही. रहस्यच आहे.
लेखनशैली सोडल्यास आनंदी आनंद आहे.

किसन शिंदे's picture

23 Aug 2019 - 11:57 pm | किसन शिंदे

पुढील कथेच्या प्रतिक्षेत..

नाखु's picture

24 Aug 2019 - 8:20 am | नाखु

कथा, जीवन भाऊ,मंदार कात्रे,निमिष सोनार आणि अकु काका कशी लिहितील याचाच विचार करीत होतो.

वाचकांची पत्रेवाला नाखु

तूर्तास तो बाजुला ठेऊ.

मिपावर टीका** केली जात नाही हे मात्र नक्की, फक्त लोकांना मिश्किलतेचे वावडे नसले पाहीजे :)


**

Provided that, you are not pushing your own propaganda. नैतर बाजार उठलाच समजा _/\_

vaibhav deshmukh's picture

24 Aug 2019 - 2:18 pm | vaibhav deshmukh
vaibhav deshmukh's picture

24 Aug 2019 - 2:20 pm | vaibhav deshmukh

ज्यांनी कौतुक केले, टीका केली त्या सगळ्यांचे आभार...! मिपा मला नवीन आहे. काही गोष्टी कळल्या नाहीत. कथा लेखन पण नवीन आहे. लहान मुलगा सुरुवातीला अडखळतच चालत असतो पण;त्याचा अर्थ असा नाही की तो, पुढे चालून वेगाने धावणार नाही. काही जणांनी खिल्ली उडवली. माझ्या प्रोफेशनची उडवली. त्याच मला वाईट नाही वाटल. पण नवीन माणसाच्या स्वागताची ही कोणती पद्धत? स्वतः मोठे विद्वान समजणारे खूप असतात पण इतरांना समजून घेणारे खूप कमी. असो..
'जॉन' भाऊंना दंडवत...

तूर्तास तो बाजुला ठेऊ.

मिपावर टीका** केली जात नाही हे मात्र नक्की, फक्त लोकांना मिश्किलतेचे वावडे नसले पाहीजे :)

**
Provided that, you are not pushing your own propaganda. नैतर बाजार उठलाच समजा _/\_

सर मिपावर कौतुक हा विषय दीर्घ चिंतनाचा आहे

गूगलबाबांची कृपा अन्यथा मीपा (मि पामर) काहीही करायला असमर्थ.

काही जणांनी खिल्ली उडवली.

याबाबत काही मिपवाचकांची ध्येयधोरणे माझ्या आकलनानुसार स्पष्ट करायचा प्रयत्न केला आहेच.

माझ्या प्रोफेशनची उडवली. त्याच मला वाईट नाही वाटल.

प्रोफेशन चा उल्लेख लोकाना तुमचा मिपा प्रोफ़ाइल सोडून इतर ठिकाणी वाचकाना अप्रस्तुत वाटत असणार. (मी सहमत आहे याबाबत). तुम्हाला वाइट वाटावे हा(माझा तरी) उद्देशच न्हवता /नसेल. तरीही ख़िलाडूपणा मुळे आपणास एक कडक सल्यूट.

पण नवीन माणसाच्या स्वागताची ही कोणती पद्धत?

वेल हा प्रश्न आजच्या काळात जावई तरी विचारेल का हा एक प्रश्नच आहे. आपण तर एक होतकरु लेखक आहात.

तूर्तास तो बाजुला ठेऊ.

मिपावर टीका** केली जात नाही हे मात्र नक्की, फक्त लोकांना मिश्किलतेचे वावडे नसले पाहीजे :)

**
Provided that, you are not pushing your own propaganda. नैतर बाजार उठलाच समजा _/\_

'जॉन' भाऊंना दंडवत...
गूगलबाबांची कृपा अन्यथा मीपा (मि पामर) काहीही करायला असमर्थ.

काही जणांनी खिल्ली उडवली.
याबाबत काही मिपवाचकांची ध्येयधोरणे माझ्या आकलनानुसार स्पष्ट करायचा प्रयत्न केला आहेच.

माझ्या प्रोफेशनची उडवली. त्याच मला वाईट नाही वाटल.
प्रोफेशन चा उल्लेख लोकाना तुमचा मिपा प्रोफ़ाइल सोडून इतर ठिकाणी वाचकाना अप्रस्तुत वाटत असणार. (मी सहमत आहे याबाबत). तुम्हाला वाइट वाटावे हा(माझा तरी) उद्देशच न्हवता /नसेल. तरीही ख़िलाडूपणा मुळे आपणास एक कडक सल्यूट.

पण नवीन माणसाच्या स्वागताची ही कोणती पद्धत?
वेल हा प्रश्न आजच्या काळात जावई तरी विचारेल का हा एक प्रश्नच आहे. आपण तर एक होतकरु लेखक आहात.

लिहा हो तुम्ही छान लिहिता :)

mayu4u's picture

31 Aug 2019 - 12:01 pm | mayu4u

धन्यवाद सर