नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!!

Primary tabs

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
9 Aug 2019 - 9:54 pm

नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!!

खरं सांगू का माझं नृत्यकलेवर खूप खूप प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही चित्रपटातील कलात्मक नृत्याविष्कार मला आकर्षित करतो. मला असं वाटतं की नृत्य म्हणजे केवळ पदंन्यास किंवा हस्ताविष्कार किंवा चेहेऱ्यावरील भाव दाखवणे नाही; तर केवळ एखाद्या बोलक्या डोळ्यांच्या अभिनेत्रीकडून फारशी नृत्यकला अवगत नसताना देखील एक अजरामर गीत आपल्याला मिळतं. हिंदी चित्रपटांमध्ये अशी अनेक अजरामर गाणी आणि मास्टर पिस आहेत की जे कधी त्यातील नृत्यामुळे तर कधी नृत्यांगनेमुळे सर्वश्रुत आहेत. अगदी आजच्या पिढीतील अनेक तरुणांना देखील या गाण्यांनी आणि त्यातील नृत्याने भुरळ घातली आहे. असच जबरदस्त नावाजलेलं आणि All time hit गाण म्हणजे 'प्यार किया तो डरना क्या.....' अर्थात हे गाणं इतकं बहुश्रुत आहे की आता यावर नवीन काही सांगण्यासारखं असूच शकत नाही; हे मला मान्य आहे. 'मधुबाला' आणि 'अनारकली' एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात अस वाटण्याइतकं मधुबालाने हे गाणं जिवंत केलं आहे. 

मला नृत्यविषयाची आवड असल्याने, मी या गाण्यातील तिच्या नृत्यासंदर्भात बरेच वाचन केले. हे गाणं मी किमान हजारवेळा तरी बघितलं असेल. या गाण्यात तिने जे नृत्य केलं आहे; याचे एकतर long shots आहेत किंवा colse shots मध्ये केवळ पदन्यास दाखवले आहेत. याचं कारण मधुबाला ही काही नृत्यांगना नव्हती. त्यामुळे सुरवातीला तिने संपूर्ण नृत्यसभेला मारलेल्या २७ गिरक्या, त्यानंतरचा पदन्यास, नंतरच्या एका पायाच्या ९ गिरक्या हे सर्व कोणा उत्तम नृत्यांगनेकडून करून घेतले असणार असे वाटते.

यातील नृत्य बाजूला ठेऊन आपण हे गाणं जर मनापासून बघितलं तर संपूर्ण चित्रपटाची कथा या एका गाण्यात मधुबालाने तिच्या डोळ्यांमधून सांगितली आहे; हे दिसेल. ज्या ज्या वेळी तिने 'प्यार का इजहार' केला आहे त्या त्या वेळी तिने शेहेजाद्याकडे आर्त... प्रेमळ... आव्हानात्मक... आणि स्वतःच्या प्रेमावर असलेल्या विश्वासाने बघितले आहे. त्यावेळेस तिच्या नजरेतलं 'दर्द भरा इश्क' प्रत्येक 'डोळस' माणसाला दिसल्याशिवाय राहाणार नाही.

गाण्याची सुरुवात होताना ती म्हणते 'इन्सान किसीसे दुनिया मे एक बार मोहोब्बत करता हे... इस दर्द को लेकर जीता हे.....' या दोन ओळींमध्ये तिने शेहेजाद्याला स्पष्ट केलं आहे की माझ तुझ्यावर आणि केवळ तुझ्यावर प्रेम आहे; जे मी आता पूर्णपणे स्वीकारते आहे. त्यामुळे यापुढे  'इश्क' बरोबर जे 'दर्द' येतं ते देखील मी माझ्या मनात साठवून जगणार आहे. त्याच्या पुढच्या ओळीत ती म्हणते  'इस दर्द को लेकर मरता हे...' हे जे काही 'मरता हे...' तिने त्या एका क्षणात बादशहाला नजरेने सांगितलं आहे ते केवळ आणि केवळ अप्रतिम! कारण त्या एका नजरेच्या फटकाऱ्यातून पुढच्या संपूर्ण गाण्यात ती जी भावना व्यक्त करणार आहे त्याचा अंदाज बादशहाला दिला आहे; आणि तरीही मनात असूनही बादशहा त्याक्षणी तरी तिला थांबवू शकत नाही आहे.

त्यानंतर प्रत्येकवेळी ती 'प्यार किया तो....' हे शेहेजाद्याकडे बघून म्हणते. त्यात एक प्रेमळ हास्य आहे. स्वतःच्या प्रेमाची कबुली आहे आणि 'डरना क्या...' हे बादशाहाकडे बघून म्हणते. ज्यात आता यापुढे मला तुमची भिती नाही; केलेल्या प्रेमासाठी मी पुढे येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला सामोरी जायला तयार आहे. हेच तिची नजर सांगते आहे. 'आज कहेंगे दिल का फसाना जान भी ले ले चाहे जमाना....' हे म्हणताना तिच्या नजरेत हे स्पष्ट आहे की आता याक्षणी तरी तुम्ही मला थांबवू शकणार नाही आहात; त्यामुळे मी माझ्या भावना इथे भर सभेत व्यक्त करणार आहे. पुढे 'मौत वही जो दुनिया देखे.... घुट घुटकर यु मरना क्या...' हे म्हणताना ती बादशहा आणि शेहेजादा दोघांना हे स्पष्ट सांगते आहे की माझं पुढे काय होऊ शकतं हे मला माहित आहे आणि ते मी स्वीकारलेलं आहे.

'उनकी तमन्ना दिल मे रहेगी.... शम्मा इसी मेहेफील मे रहेगी...' हे म्हणताना तिने शेहेजाद्याला हे सांगून टाकलंय की तुझा आणि माझा 'निकाह' होऊ शकणार नाही आहे. मी एक नृत्यांगना आहे या दरबाराची आणि कायम केवळ नृत्यांगना राहाणार आहे. 'इश्क मे जीना.... इश्क मे मरना...' यावेळी ती बादशहा आणि शेहेजादा दोघांना सांगते आहे की मी लवकरच मारणार आहे; याची आता मला जाणिव आहे. मात्र जोवर जिवंत आहे तोवर मी प्रेम करत राहाणार; आणि पुढे  'और हमे अब करना क्या....' हे म्हणताना तिने कृतीपेक्षा देखील नजरेने बादशहाला आव्हान दिलं आहे की जे करायचं ते कर. हा शॉट एका बाजूने घेतलेला आहे. त्यामुळे खर तर तिच्या डोळ्यातल्या भावना स्पष्ट दिसलेल्या नाहीत. मात्र यावेळी बादशहाच्या चेहेऱ्याकडे बघितलं तर त्याच्या उतरलेल्या चेहेऱ्यात  मधुबालाच्या डोळ्यातल्या भावना आपल्याला दिसतील. त्यापुढची ओळ आहे 'जब प्यार किया तो...' जे तिने बादशहाच्या पुढ्यात उभं राहून आणि शेहेजाद्याकडे हात करून स्पष्ट केलं आहे आणि 'डरना क्या...' हे म्हणताना मी मृत्युला आता घाबरत नाही हे तिच्या मोठ्या बोलक्या डोळ्यांनी सर्वांसमोर दाखवून दिल आहे.

'छुप ना सकेगा इश्क हमारा... चारो तरफ हे उनका नजारा....' यावेळी तिने बादशहाला जाणीव करून दिली आहे की तू मला मारलस तरीही यापुढे अनारकालीच्या 'इश्कची दुहाई' कायम दिली जाणार आहे; आणि पुढे 'पर्दा नाही जब कोई खुदा से... बंदो से पर्दा करना क्या...' म्हणताना तिच्या आर्त डोळ्यांनी बादशहाला त्याच्या मनमर्जी कृतीचे उत्तर कधीतरी त्या 'परवरदिगार'ला द्यावे लागणार आहे हे स्पष्ट केले आहे.

हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वार्थाने 'मास्टर पिस' आहेच. पण नृत्यांगाना नसूनही केवळ नेत्रांमधून भावना सादर करून मधुबालाने या गाण्याला 'चार चांद' लावले आहेत.... याबद्दल कोणाचेही दुमत नसेल; याची मला खात्री आहे.

अशाच एका नेत्रांगनेबद्दल पुढच्या शुक्रवारी सांगेन.

नृत्यविचार

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

9 Aug 2019 - 10:07 pm | अमर विश्वास

छुप ना सकेगा इश्क हमारा... चारो तरफ हे उनका नजारा...

या ओळीच्या वेळी शीशमहालात दिसणारी अनेक प्रतिबिंबे.. आणि कोरस चा घुमणारा आवाज ....
चारो तरफ हे उनका नजारा... हे सिद्ध करणारा

ज्योति अळवणी's picture

9 Aug 2019 - 10:27 pm | ज्योति अळवणी

खरंय

जॉनविक्क's picture

9 Aug 2019 - 11:09 pm | जॉनविक्क

जव्हेरगंज's picture

9 Aug 2019 - 11:57 pm | जव्हेरगंज

सुंदर!!

पद्मावति's picture

10 Aug 2019 - 12:36 am | पद्मावति

सुरेख रसग्रहण !

ज्योति अळवणी's picture

10 Aug 2019 - 12:46 am | ज्योति अळवणी

धन्यवाद जॉनविक्क जी, जव्हेरगंज जी, पद्मावती जी

ज्योति अळवणी's picture

10 Aug 2019 - 12:46 am | ज्योति अळवणी

धन्यवाद जॉनविक्क जी, जव्हेरगंज जी, पद्मावती जी

मारवा's picture

10 Aug 2019 - 5:15 am | मारवा

माझे अत्यंत आवडतं गाणं अनेकवेळा बघतो तुम्ही जे म्हणता ते तंतोतंत खरं आहे मधुबाला चे नृत्य फारच प्राथमिक इनफॅक्ट पुअर दर्जाच आहे. सब जान तिच्या डोळ्यातच आहे खर म्हणजे तिच्या डोळ्यावरुन लक्ष हटत नाही त्या गाण्यात हिप्नॉटीक आहे ते.
यातील दोन्ही चॅलेंजींग मोड मधल्या ओळी
आज कहेंगे दिलका फसाना जान भी ले ले चाहे जमाना
आणि
पर्दा नही जब कोई खुदा से बंदो से पर्दा करना क्या
या प्रचंड आवडतात
गाण्यातला ठेका पण सुंदर आहे.
शीशमहालातील प्रतिबिंब दाखवण्यासाठी त्या काळात एक भारी युक्ती दिग्दर्शकाने योजलेली होती असे वाचल्याचे स्मरते.

योगी९००'s picture

10 Aug 2019 - 10:03 am | योगी९००

फार छान रसग्रहण ...माझे आवडते गाणे..!!
शीशमहालातील प्रतिबिंब दाखवण्यासाठी त्या काळात एक भारी युक्ती दिग्दर्शकाने योजलेली होती असे वाचल्याचे स्मरते.
अशीच युक्ती संगीतकार नौशाद यांनी कोरस साठी वापरली. के.आसिफ(दिग्दर्शक) ने जेव्हा त्यांना ह्या गाण्याची सिच्युएशन सांगितली आणि शीशमहालात अनेक अनारकलीच्या प्रतिमा गात असतात असे सांगितले तेव्हा नौशाद यांना काहीतरी वेगळे करावे असे वाटले. त्यामुळे त्यांनी कोरसच्या आवाजासाठी इतर कोणाला न घेता लता मंगेशकर यांचाच आवाज अनेक टेपरेकॉर्डवर एकाच वेळी वाजवून परत रेकॉर्ड केला. असे त्यांनी २-३ दा केले असावे. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकले की जाणवते की कोरसमधले सगळेच आवाज लता मंगेशकरांचेच आहेत. "छुप ना सकेगा " आणि शेवटी "प्यार किया तो डरना क्या" हे जेव्हा शीशमहालातील अनारकली म्हणत असतात तेव्हा कोरस ऐकू येतो.

तसेच अजून एक मला वाटलेले वैशिष्ठ म्हणजे प्रत्येक कडव्याची चाल थोडी वेगळी आहे. बर्‍याचदा गाण्यांचे सर्व कडवी एकाच चालीत असतात. इथे थोडाफार फरक जाणवतो.

कंजूस's picture

10 Aug 2019 - 5:32 am | कंजूस

बरंच असतं की डोळ्यांत आणि पायांत!

विजुभाऊ's picture

10 Aug 2019 - 6:18 am | विजुभाऊ

खूप छान लेख आहे. मधुबाला कितीही वेळा पाहिली तरी मन भरत नाही इतकी सुंदर चेहेर्‍याची नटी होती.
डोळे दाक्षीणात्य मीनाक्षी पद्धतीचे नसूनही जीचे डोळे खूप बोलके होते. अशी
तीच्या अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना या गाण्यायात तो पुनः प्रत्यय येतोच.
एकच गोष्ट खटकली.
नृत्यांगना हा शब्द योग्य आहे मात्र नेत्रांगना हा शब्द चुकीचा आहे असे मला वाटते.
नृत्य जिच्या अंगी आहे ती नृत्यांगना
हे असे

नेत्रांगना

या शब्दा बद्दल म्हणता येणार नाही.
नेत्रांगना या ऐवजी सुनयना., चंचलनयनी विद्युतनयनी , मृगनयनी असे शब्द वापरता येतील

ज्योति अळवणी's picture

10 Aug 2019 - 7:45 pm | ज्योति अळवणी

नेत्रांगना हा शब्दच नाही. पण नृत्याचे उत्तम अंग असलेली ती नृत्यांगना!

म्हणून....

नेत्रातून उत्तम भावना व्यक्त करण्याचे अंग असलेली ती नेत्रांगना! असा विचार करून शब्द रचना केली आहे

यशोधरा's picture

10 Aug 2019 - 7:47 am | यशोधरा

छान लिहिलंय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Aug 2019 - 9:50 am | ज्ञानोबाचे पैजार

मधुबाला असे नुसते जरी कोणी म्हणाले तरी काळजात कचकन कळ जाते, आणि तोच मधुबालाचा यु एस पी होता.

"प्यार किया तो डरना क्या?" असे म्हणणारी मधुबाला आपल्या सुंदर चेहर्‍याने आणि बोलक्या डोळ्यांनी अख्खे गाणे तारून नेते. मधे मधे दिसणारा दिलीपकुमारचा मख्ख आणि निर्विकार चेहरा पाहून असे वाटते की अरे ही बया का बरं या दगडा साठी एवढे सुंदर गाणे वाया घालवते आहे? पण परत मधुबाला साठी म्हणून अ‍ॅटजेस्ट करत हे गाणे संपूर्ण पहावे लागते. मधुबालाला अजिबातच नाचता येत नव्हते पण त्याने काही फरक पडत नाही.

मधुबालाचे असेच आवडणारे अजून एक गाणे म्हणजे "आईये मेहेरबां" या गाण्यात ती जास्त मोहक दिसली आहे आणि ज्या लडिवाळ पणे ती हे गाणे पेश करते त्याला तोड नाही. अर्थात आशाताईंच्या आवाजाला सुध्दा तितकेच श्रेय द्यावे लागेल.

देवानंदला "अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना" असे म्हणणारी मधुबाला जास्त रमलेली दिसते ती किशोरकुमार बरोबर

"मिस्टर अँड मिसेस ५५", "हाफ तिकीट", "झुमरु" आणि "चलती का नाम गाडी" हे या जोडीचे सिनेमे मी अनेक वेळा पाहिले आहेत.

पैजरबुवा,

टर्मीनेटर's picture

10 Aug 2019 - 1:52 pm | टर्मीनेटर

मुघल-ए-आझम चित्रपटातील 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'तेरी मेहफिल में किस्मत अजमा कर' ही दोन्ही गाणी मला फार आवडत असल्याने युट्यूब वर कित्येकदा बघत असतो.
मधुबाला बद्दल काय बोलणार? लाजवाब होती ती!

शब्दसखी's picture

11 Aug 2019 - 6:33 pm | शब्दसखी

छान रसग्रहण!

अवांतर: मागे एकदा बहुधा इसाक मुजावर (चू. भू. दे. घे. ) यांच्या एका लेखात असे वाचले होते की ह्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मधुबाला आजारी होती. त्यामुळे तिचे close-ups फक्त तिने दिले होते आणि long shots मध्ये गोपीकृष्ण हा नर्तक- नट होता. तो तिचा फॅन असल्यामुळे ह्यासाठी तयार झाला होता.